लाल सागर

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in काथ्याकूट
24 Dec 2023 - 9:34 pm
गाभा: 

Kochi

भारतीय ध्वजधारक एमव्ही साईबाबा या तेलवाहू जहाजावर हुथी बंडखोरांनी 23 डिसेंबरला दक्षिण लाल सागरात ड्रोन हल्ला केला. एकाच दिवसात हुथी बंडखोरांनी व्यापारी जहाजांवर केलेला हा दुसरा होता. त्यामध्ये कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी लाल सागरातील परिस्थिती किती धोकादायक झाली आहे, हे दिसून येत आहे.

लाल सागराच्या दक्षिणेला येमेनच्या पश्चिम किनाऱ्याच्या जवळपासच्या भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिथून जाणाऱ्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतानं भा.नौ.पो. कोलकाता (INS Kolkata) आणि ‘कोची’ या अत्याधुनिक विनाशिका त्या परिसरात तैनात केल्या आहेत. यापैकी ‘कोची’ भारतीय नौदलाच्या Mission-based deployment अंतर्गत एडनच्या आखाताजवळ आधीपासूनच तैनात होत्या. मात्र लाल सागरातील बदललेल्या परिस्थितीनंतर तिला आणि पाठोपाठ ‘कोलकाता’ला लाल सागराच्या जवळच्या परिसरात धाडण्यात आलं आहे. त्या नव्या जबाबदारीवर जाण्याच्या आधी 16 डिसेंबरला ‘कोची’नं एडनच्या आखाताजवळ माल्टाचा ध्वज असलेल्या MV Ruen मालवाहू जहाजाची सुटका केली होती. सोमाली चाचांनी त्या जहाजाचं अपहरण केलं होतं.

MV Ruen

उत्तरेला सुएझ कालवा आणि दक्षिणेला बाब एल-मंदेबची चिंचोळी सामुद्रधुनी यांच्या दरम्यान वसलेल्या लाल सागराचं युरोप आणि आशिया यांच्यातील व्यापाराच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्व आहे.

येमेनमध्ये इराणसमर्थक हुथी (Houthi) बंडखोरांनी देशाच्या उत्तर भागावर आणि काही प्रमाणात पश्चिम भागावर ताबा मिळवलेला आहे. राजधानी सनाच्या काही भागावरही त्यांचा ताबा आहे. हुथी बंडखोरांचं इस्राएलशी कायम शत्रुत्व राहिलेलं आहे. सध्याच्या इस्राएल-हमास युद्धात इस्राएलकडून गाझामधील सामान्य नागरिकांवर बाँबवर्षाव केला जात असून तो थांबत नाही, तोपर्यंत लाल सागरातून जाणाऱ्या इस्राएलच्या मालकीच्या आणि इस्राएलकडे माल घेऊन जाण्याऱ्या अन्य देशांच्या व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याची घोषणा हुथींनी केलेली आहे. त्यांनी अलीकडेच माल्टा, नॉर्वेच्या लाल सागरातून जाणाऱ्या 3 व्यापारी जहाजांवर हल्लेही चढवले आहेत. या हल्ल्यांसाठी हुथींकडून ड्रोन्स, क्षेपणास्त्रे आणि हेलिकॉप्टरचाही वापर होत आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत अनेक कंपन्यांनी आपल्या जहाजांना लाल सागर-सुएझ कालव्याऐवजी दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जाण्यास सांगितलं आहे. परिणामी त्या जहाजांना 6000 सागरी मैल (nautical mile) अंतर जास्त कापावं लागणार असून प्रवासाचा कालावधीही 3 ते 4 आठवड्यांनी वाढणार आहे आणि खर्चही वाढणार आहे. त्याचा विपरीत परिणाम तेल आणि अन्य वस्तूंच्या पुरवठ्यावर होऊन युरोपात महागाई वाढण्याची भीती आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळं युरोपात आधीच महागाई भडकलेली आहे.

आशिया आणि युरोप यांच्यातील व्यापारापैकी 40 टक्के व्यापार सुएझ कालव्यातून चालतो. एकूणच लाल सागरातील हुथींचे हल्ले आणि सुरक्षेच्या कारणास्तव व्यापारी जहाज कंपन्यांनी घेतलेला निर्णय यांचा आंतरराष्ट्रीय बाजारावर विपरीत परिणाम होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन अमेरिकेनं लाल सागरातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना सुरक्षा देण्यासाठी Operation Prosperity Guardian सुरू केलं आहे. त्यात ब्रिटन, स्पेन, इटली, सेशल्स आणि बहरीनसह एकूण 10 देश सहभागी झालेले आहेत. भारत या मोहिमेत थेट सहभागी झालेला नसला तरी या क्षेत्रातील सुरक्षित जलवाहतुकीसाठी तिथं त्यानं आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत.

https://avateebhavatee.blogspot.com/2023/12/blog-post_22.html

प्रतिक्रिया

मोठ्या आगामी वणव्याची ठिणगी ठरणार.
विविध कारणांनी यामध्ये भारतालाही झळ पोहोचत आहे. आतूनही एकजूट व्हायला हवी.

वरील लेखात लेखकांने सतत लाल सागर असे म्हटले आहे पण हे नाव फार खटकते शाळेपासून आपण तांबडा समुद्र काळा समुद्र, मृत समुद्र ( संपूर्ण मिठाने bharlela) ही नावे ऐकली आहेत पण लाल सागर असे कधी वाचले नाही त्यामुळे रेड सी किंवा तांबडा समुद्र असा उल्लेख बरोबर वाटेल असे मला वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Dec 2023 - 4:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तांबड्या समुद्राशी सहमत. बाकी लेखन माहितीपूर्ण आहे. लेखकाचे आभार.

-दिलीप बिरुटे

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Dec 2023 - 12:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

नाक दाबले की तोंड उघडते तसे आंतर राष्ट्रीय राजकारणात अनेक प्रकारचे शह काटशह चालतात. ईराणने पॅलेस्टीनी लोकांना पाठींबा देण्याच्या किंवा ईस्त्राएलला विरोध करण्याच्या हेतुने जरी हुथी बंडखोरांना भडकावले असले तरी याची झळ पूर्ण जगाला पोचणार हे नक्की.

आधीच, ज्या युरोपने १० वर्षात फारसे इन्फ्लेशन बघितलेच नाही त्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. युक्रेनकडे होणारे दुर्लक्ष हा त्याचाच एक परीणाम. ईकडे रशिया-युक्रेन आघाडी अणि तिकडे पॅलेस्टीन-ईस्त्राएल संघर्ष यामुळे जगाची पुरवठा साखळी बिघडली आहे त्या आगीत तांबड्या समुद्रातील घडामोडी तेल ओतणार हे नक्की.

भारतीय नौदलाने या आधीही सोमाली चाच्यांपासुन व्यापारी जहाजांचे रक्षण करण्याची कामगिरी एडनच्या आखातात बजावली आहे, त्यामुळे त्यांना ही नवी कामगिरी जमेलच असा विश्वास आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Dec 2023 - 12:53 pm | अमरेंद्र बाहुबली

एडन हा भारताचा भाग होता. मुंबई प्रांतात मोडायचा ब्रिटीश काळात तरीही त्यावर भारताने हक्क का सांगीतला नाही?? आज एडन भारताच्या ताब्यात असतं तर किती तो राजकीय फायदा असता भारताला?

कंजूस's picture

26 Dec 2023 - 5:55 pm | कंजूस

हो ना. एडन आणि रंगून.
बाकी काश्मीर आणि पूर्वांचल राज्ये भारताचाच भाग आहेत का अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे.
बघुया सहा महिन्यांनी काय होते.