जीवधन - वानरलिंगी रॅपलिंगचा थरार

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जनातलं, मनातलं
9 Nov 2023 - 3:14 pm

जीवधन !!! ऐन घाटमाथ्यावरचा उभ्या बेलाग कडय़ावरील दुर्ग. सहय़ाद्रीचा भेदक भूगोल, सातवाहनांच्या पाऊलखुणा आणि प्राचीन नाणेघाटाची सोबत या साऱ्यांनीच हा गड भारलेला आहे. दोन वर्षांपुर्वी, सप्टेंबरच्या शेवटाला कोसळधारांच्या संगतीने दाट धुक्याच्या कोंदणातून "जीव" अक्षरक्ष: मुठीत धरून "जीवधन" फत्ते केला होता.

15

त्याचवेळी, गडाच्या साधारण पश्चिम टोकाला जिथे वाट अचानक संपते आणि त्या तुटलेल्या धारेवर काळजात धस्स करणारी खोल दरी समोर खाली कोसळते तिथेच तिला तितक्याच ताकदीने वर उसळणारा एक बेलाग सुळका आव्हान देत उभा राहतो. दोन-एक हजार फुटांचा हा कातळकडा आणि त्याच्या एका अंगावर विसावलेला हा तीन-चारशे फुटांचा सुळका !!!

हाच तो प्रसिद्ध "वानरलिंगी" सुळका....

2

त्याच्या त्या धुक्याच्या चादरीआडून झालेल्या पहिल्या दर्शनानेच काळजात धडकी भरली होती. त्याचवेळी, तिथे ठोकलेले फास्टनर्स आणि बोल्टस पाहून, मुख्य जीवधन किल्ला ते वानरलिंगी दरी क्रॉस करून पुर्ण वानरलिंगी कडा रॅपल करीत उतरण्याचा किडा डोक्यात वळवळू लागला होता.....फक्त मुहुर्त लागायला मध्ये दोन वर्षे जावी लागली….असो.....

3

भल्या पहाटे पुण्यावरून चाकण- मंचर- नारायणगाव मार्गे जुन्नर गाठलं व तिथून नाणेघाटाची वाट पकडून सकाळी ७ च्या सुमारास घाटघर मध्ये पाय ठेवला. साडेसातला गडाच्या वाटेला लागलो. पावसाळ्याने मागे सोडलेल्या पाऊलखुणा न्याहळत, निवांतपणे रमतगमत, फोटोग्राफीला भरपूर वेळ देत सुरुवातीला लागणारा पठारी भाग पार करून चढाईला सुरुवात केली. किल्ल्यावर एव्हाना "ऍक्टिव्हिटी" ला सुरवात झाली होती, झिपलाईन पार करणारे, रॅपल करून उतरणारे ट्रेकर्स एव्हाना खालून दिसू लागले होते.

4

काहीचं वेळात आम्ही वानरलिंगी सुळक्याच्या पायथ्याला चिकटून जाणाऱ्या नाळेतून खडकात खोदलेल्या पायऱ्यांवर होतो, तिथल्या दरीच्या बाजूला आता नव्याने बसवलेले स्टेनलेस स्टीलचे बॅरिकेड्स हा बदल दिसत होता. पुढील सर्वच धोकादायक जागा स्टील बॅरिकेड्सने सुरक्षित केलेल्या दिसल्या. जास्त वेळ न घालवता हा टप्पा चढून कल्याण दरवाजा गाठला. दरवाजाच्या वरच्या बाजूला, व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंगसाठी लागणारे गियर्स अंगावर चढवून झिप लाईन सेटअपपाशी जाऊन बसलो.

5

साधारण दोन तास वाट पाहिल्यावर नंबर आला व झिप लाईनच्या तोंडाशी कड्यावरून खाली उतरत अधांतरी लटकू लागलो. खालच्या दरीत पाहिल्यावर पोटात एकदम गोळाच आला. नजर एका जागी ठरत नव्हती. दोन हजार फुटांची हिरवीगच्च दरी छातीत धडकी भरवत होती. काही सेकंद तिथेच उभा राहून झिप लाईनवर गेलो, उताराच्या बाजूला स्लाईड होत काही सेकंदात मध्यभाग पार करून वानरलिंगी पासून २० फुटांवर जाऊन थांबलो. तिथून मग रोप हाताने हळू हळू मागे सरकवत वानरलिंगीवर पाय ठेवण्याची संधी मिळाली.

6

वानरलिंगी कड्यावर जागा अतिशय तोकडी आहे ८-१० माणसांची ही गर्दी वाटावी अशी अवस्था.....जागा मिळाली तिथे बुड टेकवल्यावर, चारही बाजूला नजर भिरभिरु लागली. सगळ्या बाजूने अगदी चार-सहा फुटांवर हजार दीड-हजार फुटांच्या सरळसोट दऱ्या, खाली पसरलेलं जंगल, दूरवरचा हिरव्या रंगाच्या विविध छटां मधील परिसर लक्ष वेधून घेतो.

6

पुढच्या १०-१५ मिनिटांतच रॅपलिंगसाठी तयार झालो, कड्याच्या टोकावर उभा राहून सर्व गियर्स चेक करून झाल्यावर ग्रीन सिग्नल मिळताच उतरायला सुरुवात केली. पहिल्या दहा फुटात थोडफार अडखळायला होतंच पण थोडं खाली जाताच हात-पायांचा मेंदूशी ताळमेळ पुन्हा "नॉर्मल" पातळीला येतो व मग त्या अजस्त्र उंचीला, बेलाग कड्याला आणि खाली आ वासून वाट पाहणाऱ्या दरीलाही वाकुल्या दाखवत उतरण्याचा प्रवास सुरु होतो. साधारण साडेतीनशे फुटांची ही रॅपलिंग शारीरिक क्षमतेची अगदीच परीक्षा पाहत नसली तरी मानसिक कणखरतेला मात्र नक्कीच आव्हान देते. त्याचवेळी कचखाऊ काळजाच्या लोकांनी या वाटेला जाऊ नये हे ही खरंच आहे याची ही जाणीव होते.

7

साधारण १० मिनिटांच्या आतच अगदी आरामात वानरलिंगी च्या पायथ्याला पोहोचलो. शेवटचे ७०-८० फूट तर निव्वळ फ्री फॉल करत पार केले होते, त्यामुळे रोप आणि हातांच्या घर्षणाने ग्लोव्हज गरम झाले होते. कॅरेबिनरला हलकासा हात लावला तर चटकाचं बसला एवढा तो गरम झाला होता. पायथ्याला अर्धा तास बसून इतर सर्वजण खाली उतरल्यावर गियर्स उतरवले आणि मग गड उतरायला सुरुवात केली. पुढच्या अर्ध्या तासात पायथा गाठला.

8

एव्हाना दुपार कलायला सुरुवात झाली होती. तिथून निघून नाणेघाट जवळ केला. आता एका उंच चौथऱ्यावर विराजमान प्रसिद्ध दगडी रांजण पार करीत लेण्यांपर्यंत गेलो. नाणेघाटाच्या इतिहासाची उजळणी करीत तिथे काही वेळ घालवला. जेवणाची वेळ कधीची टळून गेल्यामुळे एव्हाना पोटात कावळे कोकलू लागले होते. पुन्हा घाटघर गाव गाठलं, जेवणाची सोय केलेल्या घरी परसबागेत बसून तांदळाच्या भाकरी, वांगे-बटाटा भाजी, बेसन आणि गोडाला शेवयांची खीर असा शुद्ध शाकाहारी बेत करून यथेच्छ पोटपूजा झाली.

9

तद्नंतर, परतीच्या मार्गाला लागलो आणि मजल-दरमजल करीत साडेआठला घरी पोचते झालो.

सातवाहनकाळापासून जागता, राबता असणारा जीवधन हा तसा अवघड श्रेणीतला किल्ला, नाणेघाटला येणारे सर्वसाधारण पर्यटक सहसा याच्या वाटेला जात नाहीत. जवळच्या जुन्नरला जोडलं असलं तरी तसा आजही दुर्गम म्हणावा असा हा भाग. पण वानरलिंगीच्या आकर्षणापायी सध्या जीवधन ट्रेकर्समध्ये लोकप्रिय झालाय. त्यांची गर्दी दर वीकएंडला चढत्या क्रमाची आहे. संख्येवर मर्यादा आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे पाळूनच ह्या ऍक्टिव्हिटी होतील हे सुनिश्चित करणे मात्र गरजेचे आहे एवढं नक्की..

1

10

11

12

13

14

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

चक्कर_बंडा's picture

9 Nov 2023 - 3:18 pm | चक्कर_बंडा

सदर धागा भटकंती सदरात हलवावा ही विनंती

कंजूस's picture

9 Nov 2023 - 6:28 pm | कंजूस

अवघड आहे.

फोटोबिटो छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2023 - 10:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच अवघड. महाअवघड वाट. वानरलिंगी कड्यावर सहाव्या फोटोतले रॅपलिंगवाले बिंधास्त लोक पाहुन पोटात गोळा आला. तिथे जायचं तर फकीर माणसानेच जावं. जगाचे कोणतेच व्याप नसलेल्या माणसाने तिथे वेगवेगळ्या अँगलने मस्त सेल्फी घेत राहावे. अवघड आहे सगळं. :/

बंडाशेठ, नमस्कार घ्या...!

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

10 Nov 2023 - 11:12 am | कंजूस

एकदम सहमत.

वानर लिंगी नाव फिट्ट.

चक्कर_बंडा's picture

10 Nov 2023 - 2:27 pm | चक्कर_बंडा

वानरलिंगीवर केवळ रोपच्या जीवावरचं ट्रेकर्स बिनधास्त... असो... बाकी वृत्तीच्या फकीर माणसांना सह्याद्री तीर्थक्षेत्रीच काय तो आराम.....

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Nov 2023 - 7:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

आणि कातील फोटोज!! हा सुळका फक्त लांबुनच पाहीला आहे. जीवधन आणि नाणेघाट दोन्ही वेळा ईथे जायचा योग आला नाही.

धाडसी ट्रेक आहे.याविषयी जुन्नर ग्रुप वर खुपदा वाचलंय.

स्नेहा.K.'s picture

9 Nov 2023 - 11:38 pm | स्नेहा.K.

लेख आणि फोटो दोन्ही मस्त!

विंजिनेर's picture

10 Nov 2023 - 12:48 am | विंजिनेर

वा मस्त!. कधी काळी केलेल्या पावसाळ्यात हिरव्याकंच, धुक्याने भरलेल्या नाणेघाटातल्या ट्रेकच्या, जीवधनच्या गुहेतल्या ब्राह्मी (?) शिलालेखाच्या आठवणी ताज्या झाल्या

चक्कर_बंडा's picture

10 Nov 2023 - 2:33 pm | चक्कर_बंडा

नाणेघाटातील लेण्यांत आहे शिलालेख पण जीवधनवर शिलालेख असलेली गुहा नाही पाहण्यात आली माझ्या, पण धान्य कोठार ही वास्तू आणि दरवाजे वैशिष्ट्यपुर्ण, बाकी वास्तूंचे आता फक्त अवशेषचं राहिलेत

विंजिनेर's picture

10 Nov 2023 - 10:07 pm | विंजिनेर

अर्रर्र...खुलासा -
नाणेघाटातली गुहा + जीवधनचा ट्रेक

चौथा कोनाडा's picture

10 Nov 2023 - 8:26 am | चौथा कोनाडा

थरारक - खतरनाक - जबरदस्त!

चढाई वाचताना अंगावर काटा येत होता.
फोटो अप्रतिम.

गोरगावलेकर's picture

10 Nov 2023 - 10:58 am | गोरगावलेकर

फोटो पाहूनच धडकी भरते. भारी ट्रेक

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2023 - 11:52 am | कर्नलतपस्वी

तरूणाईला आव्हान आशी भटकंती. आव्हान स्वीकारून पुर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

चक्कर_बंडा's picture

10 Nov 2023 - 2:28 pm | चक्कर_बंडा

सर्वांचे मनापासून आभार !