भारतातील काही अप्रसिद्ध युनेस्को जागतिक वारसा स्थळांबाबत बोलण्याआधी, आपण युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणजे नेमके काय हे समजून घेऊ या. जागतिक वारसा स्थळ म्हणजे अशी कुठलीही मानवनिर्मित वास्तू किंवा नैसर्गिक जागा, जी सांस्कृतिक, ऐतिहासिक, शास्त्रीय किंवा इतर कुठल्याही कारणाने महत्त्वाची आहे आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी जिचे जतन होणे गरजेचे आहे. निसर्गाने किंवा मानवाने बनवलेली अशी एक सुंदर कलाकृती, जी कलात्मकदृष्ट्या किंवा नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाची आहे, एक असा अमूल्य ठेवा, जो भविष्यात जन्म घेणार्या सगळ्या मानवांसाठी जपून ठेवायला हवा. युनेस्को अर्थात United Nations Educational, Scientific and Cultural Organization ही जागतिक संस्था जगभरातल्या अशा ठिकाणांना जागतिक वारसा स्थळे घोषित करण्याचे काम करते. एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित स्थळाचे महत्त्व अधोरेखित करणे, त्याचा मोठेपणा जगासमोर आणणे आणि त्याचे संवर्धन व्हावे ज्यासाठी जागरूकता निर्माण करणे, त्या दृष्टीने जनमत तयार करणे ह्या कारणांसाठी त्या ठिकाणाचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश केला जातो.
जगभरात ११९९ जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यातली सर्वाधिक (५९) इटली ह्या देशात आहेत. त्याखालोखाल चीनचा क्रमांक लागतो, ह्या देशात ५७ जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यानंतर फ्रान्स आणि जर्मनी हे देश संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत, ह्या देशांमध्ये प्रत्येकी ५२ जागतिक वारसा स्थळे आहेत. या यादीत आपला भारत सहाव्या स्थानावर असून आपल्या देशात ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत.
मला फिरायला आवडते, खासकरून जागतिक वारसा स्थळांना भेट द्यायला तर मी एका पायावर तयार असतो. युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा शिक्का म्हणजे आपण भेट देत असलेले स्थळ सुंदर, महत्त्वाचे, इतरांहून वेगळे, कलात्मकदृष्ट्या संपन्न आणि उत्तम स्थितीत राखले गेले असल्याची एक पावतीच असते म्हणा ना! भारतातल्या ४२पैकी जवळजवळ २७ जागतिक वारसा स्थळांना मी भेट दिलेली आहे, राहिलेल्या इतर ठिकाणांना भेट देऊन ही टक्केवारी १००% करण्याचा माझा मानस आहे, पाहू कधी योग येतो ते!
भारतातल्या जागतिक वारसा स्थळांपैकी ताजमहाल, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, खजुराहोतील मंदिरे, हंपीतील मंदिरे अशी काही ठिकाणे आपल्या परिचयाची असतात, पण त्याच वेळी आपल्याला तामिळनाडूतील चोल मंदिरे, भीमबेटकातील गुहाचित्रे, तेलंगणातील काकतीय रुद्रप्पा रामेश्वर मंदिर अशा अनेक जागतिक वारसा स्थळांची काहीच माहिती नसते. अशाच काही अपरिचित जागतिक वारसा स्थळांची माहिती करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
तामिळनाडूतील महान जिवंत चोल मंदिरे अर्थात Great Living Chola Temples
तामिळनाडू राज्यातील थंजावूर येथील बृहदीश्वर मंदिर, गंगाकोंडाई चोलापूरम येथील बृहदीश्वर मंदिर आणि कुंभकोणम येथील ऐरावटेश्वर मंदिर ह्या तीन मंदिरांना एकत्रित 'तामिळनाडूतील महान चोल मंदिरे' म्हटले जाते. ह्या मंदिरांच्या इंग्लिश नावात Living हा शब्द दिसतो. हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे उभारणीपासून ते आजपर्यंत ह्या मंदिरांमध्ये अखंड पूजाअर्चा चालू आहे, त्यात कधीही खंड पडलेला नाही! ह्या मंदिरांपैकी थंजावूर येथील बृहदीश्वर मंदिर हे सगळ्यात जुने असून नुकतीच ह्या मंदिराने आपला १०००वा वाढदिवस साजरा केला. आकाराने प्रचंड अशी ही मंदिरे १००० वर्षांपूर्वी कशी बांधली असतील ह्या विचाराने थक्क व्हायला होते आणि आत्ताच एवढी सुंदर दिसणारी ही मंदिरे ऐन भरात असताना किती देखणी दिसत असतील, ह्या विचाराने मती गुंग होते. २०२३ सालच्या फेब्रुवारी महिन्यात आम्ही ह्या मंदिरांना भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -
गंगाकोंडाई चोलापूरम येथील बृहदीश्वर मंदिर:
कुंभकोणम येथील ऐरावटेश्वर मंदि:
भीमबेटकातील गुहाचित्रे अर्थात Rock Shelters of Bhimbetka
मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळहून फक्त ४५ कि.मी. दूर असलेली ही गुहाचित्रे जवळपास १२००० वर्षे जुनी आहेत. काळ १०००० वर्षांपूर्वीचा असो, आजचा असो किंवा १०००० वर्षांनंतरचा असो, माणूस कलेशिवाय जगू शकत नाही, हे ही चित्रं पाहिली की स्पष्ट होतं . अश्मयुगातील मानवाने काढलेली ही चित्रे त्या काळातले मानवी जीवन कसे होते, हे दाखवणारा एक आरसाच आहेत म्हणा ना! २०१४ सालच्या मे महिन्यात आम्ही ह्या मंदिरांना भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -
चंपानेर पावागद पुरातत्त्व उद्यान अर्थात Champaner-Pavagadh Archaeological Park
गुजरातमधील बडोद्याला अर्थात वडोदऱ्याला अनेक जण जातात, पण तिथून फक्त ४५ कि.मी. दूर असलेल्या चंपानेर पावागद पुरातत्त्व उद्यानाची माहिती अनेकांना नसते. किंबहुना खुद्द वडोदऱ्यात राहणाऱ्या अनेकांना असे कुठले ठिकाण आपल्या शहराजवळ आहे याची कल्पना नसेल. मी म्हणेन की इथल्या काही मशिदींच्या छतावर केलेल्या कोरीवकामाचा भारतातल्या सर्वोत्कृष्ट कोरीवकामामध्ये समावेश करावा लागेल. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही ह्या मंदिरांना भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -
काकतीय रुद्रप्पा रामेश्वर मंदिर अर्थात Kakatiya Rudreshwara (Ramappa) Temple
तेलंगणातील वरंगल शहरापासून ६६ कि.मी. दूर असलेल्या ह्या मंदिराचा अगदी अलीकडे, म्हणजे २०२१ साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. काकतीय राजांच्या काळात, साधारण १२१३ साली बांधून पूर्ण झालेले हे मंदिर भव्य आणि देखणे आहेच, ते विशेष प्रसिद्ध आहे ते बाहेरील बाजूस बसवलेल्या काळ्या पाषाणातील नर्तिकांच्या मूर्तींमुळे. ह्याच वर्षी एप्रिल महिन्यात आम्ही ह्या मंदिराला भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -
होयसाळ राज्यांनी बांधलेली मंदिरे अर्थात Sacred Ensembles of the Hoysalas
होयसाळ राजांनी बांधलेल्या बेलूर, हळेबिडू आणि सोमनाथपूर येथील हिंदू मंदिरांचा ह्याच वर्षी जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. २०१७ साली जेव्हा बेलूर, हळेबिडू येथील दोन मंदिरांना मी भेट दिली, तेव्हा ही मंदिरे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट नाहीत ह्या गोष्टीचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते आणि ही मंदिरे आज ना उद्या या यादीत येणार, याची खातरीही होती. आणि झालेही तसेच! मी हे मागेही म्हटलो आहे आणि पुन्हा एकदा म्हणतो, भारतातल्या मंदिरांमध्ये दिसणारी सर्वोत्कृष्ट मूर्तिकला ह्या मंदिरांमध्ये दिसते. भारतातली अनेक प्रसिद्ध मंदिरे मी फिरलो आहे, पण ह्या मंदिरांमध्ये जे मूर्तिकामाचे सौंदर्य दिसते, त्याला तोड नाही. अशी मूर्तिकला भारतात काय, अख्ख्या जगात नसेल. २०१७ सालच्या मार्च महिन्यात आम्ही ह्या मंदिरांना भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -
चला, आपण अधिकाधिक युनेस्को जागतिक वारसा स्थळांना भेटी देऊ या, त्यांबाबत इतरांना सांगू या आणि ही वारसा स्थळे टिकवू या!
प्रतिक्रिया
13 Nov 2023 - 8:24 pm | कर्नलतपस्वी
खुप खुप धन्यवाद. अतिशय सुंदर असा सचित्र लेख.
21 Nov 2023 - 6:06 pm | चौथा कोनाडा
अप्रतिम, सुंदर !
मंदिरांच्या शिल्पकलेतील तपशील, सूक्ष्म कलाकुसर, आणि अशक्य वाटणारे कोरीव काम पाहून डोळ्यांचे पारणे फिटले !
बृहदीश्वर मंदिर, ऐरावटतेश्वर मंदिर, बेलूर, हळेबिडू आणि सोमनाथपूर ही जर टॉप स्टार जागतिक वारसा स्थळे !
ही ठिकाणे पाहण्याचा योग अजून आलेला नाहीये आता आणावाच लागेल !
भीमबेटकातील गुहाचित्रे जबरदस्त आहेत.
काकतीय रुद्रप्पा रामेश्वर मंदिर याला नुकताच जागतिक दर्जा मिळाला आहे त्यामुळे याबद्दल ची माहिती उत्सुकतेने वाचली होती.
चंपानेर पावागद पुरातत्त्व उद्यानाबद्दल पहिल्यांदाच वाचले ! अतिशय उच्च पातळीचे शिल्पकला !
खूप खूप धन्यवाद एक_वात्रट साहेब !
21 Nov 2023 - 6:53 pm | कंजूस
सुंदर फोटो आले आहेत.
मी हळेबिडू,बेलूर इथले काढलेले फोटो Wikimedia commons site वर टाकले आहेत. तुमचे खूप चांगले आले आहेत (आणि वाटरमार्क नाहीत!) ते टाकू शकता.
वारंगळ फोर्ट पाहिला. तिथली सर्व शिल्पे आणि राजवाडा खिलजीने तोडला आहे. पण जे उरले आहे तेही पाहून समजते की काय कला होती. विशेष म्हणजे ती अतिशय कठीण काळ्या दगडात कोरलेली आहेत. पण वर दिलेलं मंदिर पाहिलं नव्हतं.
चोल मंदिरे पाहण्याची ठरवलं आहे. बघू कधी जमतं. तमिळनाडूत मंदिरं पाहाणे सोपं नाही. कारण बहुतेक सर्व पुजेत आहेत आणि अकरा ते पाच बंद ठेवतात. त्यामुळे दिवसांचा बराच वेळ निष्फळ जातो. शिवाय मंदिरांत रांगा लावाव्या लागतात.
कोकणातही काही घडीव सुबक मंदिरे आहेत. परंतू तेथील स्थानिक आपल्याला भलत्याच बाजारू मंदिरांकडे जा सांगतात. गुहागरला एक ग्रामदेवता देऊळ आहे ते पाहिल्याचे आठवते. संपूर्ण लाकडी कोरीव काम आणि बांधणीचे आहे. फक्त एक तेलाचा दिवा असतो. परंतू भाविक पर्यटकांना रिक्षावाले नेऊन दाखवत नाहीत. व्याडेश्वर,दुर्गामाता(नवे),उफराटा गणपती दाखवतात. आम्ही चालत जाऊन सर्व पाहिले होते.(१९९५). म्हणजे चालण्याच्या अंतरात आहेत. पावसातही एक दगडी बांधकामाचे छान मंदिर आहे. पण जो जातो तो पावसच्या मठात. इकडे कुणीही जात नाही.
केरळलाही सुंदर मंदिरे आहेत. भित्ती चित्रांसह. पण पांढरी लुंगी नेसून जावे लागते. मग लोक टाळतात. केरळ म्हणजे मुन्नार ,थेक्कडी,कोवालम आणि पद्मनाभ(आता माहीत झाले लोकांना २०१२). पण पद्मनाभ पॅलेस,राणी पॅलेस पाहायचे नाहीत. हे खाजगी मालकीचे असल्याने युनेस्कोत जाणार नाहीत.
तोच प्रकार वडोदरा लक्ष्मी विलास पॅलेसचा. (वडोदरा लक्ष्मीविलास महाल विडिओ (एक तास) https://youtu.be/QlGZkkZ4yEQ?si=HbkhO5yWGTiE4zkc )
या दोन्ही ठिकाणी उत्तम चित्रे आहेत. राजा रविवर्माची.
युनेस्कोच्या यादीवर न येणाऱ्या बऱ्याच जागा आहेत भारतात.
21 Nov 2023 - 8:40 pm | Bhakti
मस्तच धागा.
21 Nov 2023 - 9:07 pm | गवि
छान तपशील. उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेखन.
अवांतर: या युनेस्कोला बऱ्याच लोकांनी व्हॉट्सॲप आणि अन्यत्र फारच बदनाम करून ठेवले आहे. युनेस्को काय काय जाहीर करेल नेम नसतो. ;-)
23 Nov 2023 - 3:10 pm | अमरेंद्र बाहुबली
युनेस्को दिवाळीच्या रात्रीचा फोटो, जगातील सर्वोत्तम राष्ट्रगीत, जगातील सर्वोच्च नेता (विश्वगुरूभक्त शिकलेले असले तरी दणादण फोरवर्ड करतात) असं काही बाही देखील जाहीर करीत असते. :)
25 Nov 2023 - 6:06 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
हाण्ण तेच्यामारी !
22 Nov 2023 - 9:49 am | नि३सोलपुरकर
उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेखन
खुप खुप धन्यवाद __/\__
23 Nov 2023 - 7:08 am | वामन देशमुख
माहितीपूर्ण, चित्रमय, प्रवासप्रेरक लिखाण आवडले.
यांतील काही ठिकाणांना मी गेलेलो आहे, इतर ठिकाणांची आता नोंद करून ठेवतो आहे.
23 Nov 2023 - 10:28 am | सौंदाळा
एकही ठिकाण पाहिले नाही पण सुंदर फोटो बघून डोळ्यांचे पारणे फिटले.
मस्तच
27 Nov 2023 - 11:58 am | सस्नेह
फोटो अतिशय सुंदर आले आहेत.
भारतीय प्राचीन शिल्पकलेला तोड नाही जगात.
एक नंबरला असायला हवा भारत. पण पाश्चिमात्य इकडे बघत नाहीत.
27 Nov 2023 - 12:17 pm | कंजूस
पाश्चिमात्यच इकडे बघतात.
अजिंठा,वेरूळ,घारापुरी,ओर्छा,खजुराहो,कोणार्क.
21 Dec 2023 - 7:52 pm | एक_वात्रट
प्रतिसाद देणा-या सगळ्यांना धन्यवाद.
28 Dec 2023 - 3:53 pm | श्वेता व्यास
अप्रसिद्ध युनेस्को स्थळांची माहिती आवडली.
किती ठिकाणांना भेट देणं होतंय बघायचं आता.
11 Jan 2024 - 11:25 am | गोरगावलेकर
माहितीपूर्ण लेख आणि फोटोही सुंदर.
माझी काही युनेस्को जागतिक वारसा स्थळे पाहून झाली आहेत : अजिंठा, वेरूळ, घारापुरी लेणी, ताजमहाल, हुमाँयू कबर, कुतुब मिनार, फत्तेपूर शिक्री, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, गोव्यातील चर्च, कालका-शिमला रेल्वे, दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे, पश्चिम घाट पर्वत रांगामधील काही भाग, राजस्थानमधील जैसलमेर आणि चित्तोडगड किल्ला, गुजरात मधील राणी की वाव
27 May 2024 - 12:51 am | जुइ
खूपच सुरेख फोटो आणि माहिती. या स्थळांची ओळख दिल्याबद्द्ल आभारी.