दिवाळी अंक २०२३ - चकली

निमी's picture
निमी in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am
1


'आमच्या आईची चकली जशी आमच्या लहानपणी आम्ही खाल्ली आहे, तशीच आजही होते!' आमचे एक जेष्ठ स्नेही सांगत होते. ७८ वर्षाच्या आजीही कौतुकभरल्या हसऱ्या चेहऱ्याने 'लेक सांगतोय ते बरोबर आहे!' असं सांगत अभिमानाने मान डोलवत होत्या. एक-दोन जणांनी 'अरे व्वा.. येऊ आम्ही दिवाळीत चकली खायला' असं जाहीर केलं. काही दिखाऊ हौशी सुगरणींनी 'प्रमाण काय घेता भाजणीला? मी करेन तुमच्याप्रमाणाने' असं विचारून घेतल! आजींनी प्रमाण सांगितल्यावर काहींनी 'यात काय वेगळं आहे?' असा भाव जाहीर धारण केला. काहींनी मात्र 'हरभरा डाळीऐवजी फुटाण्याच डाळं घातलं की हलक्या होतात' असंही ज्ञान दिलं. एकूण जमलेल्या सर्वांकडे चांगल्या चकल्यांची स्वतःची अशी हमखास रेसिपी होती. मी आणि माझ्यासारख्या एक-दोनजणींची चकली कोंडी फोडत मी कबुलीजबाब दिला.. 'माझी चकली-लॉटरी चकली असते.' "म्हणजे?" अनेकांनी एकदम विचारलं..आणि मी आठवायला लागले. खरंच माझी चकली 'हमखास यशस्वी!' अशी होत नाही.

माझ्या लहानपणी आईला 'मदत' करायला आम्ही जी काही लुडबुड करायचो तेंव्हा मोहन घालणे, आधण/ओतवणी घालणे, सोऱ्या असे नेहमी न वापरले जाणारे शब्द कानावर यायचे. घरात बरेचसे पदार्थ होत असताना 'चकली'च्या दिवशी मात्र 'घाट घातला' वाटावं अशी अनेक वस्तूंची गर्दी स्वयंपाकघरात दिसायची. तळणीचा खमंग वास घराघरातून येताना, बाहेर खेळून दमलेल्या आमच्या बालजीवांच्या पोटी भूक जन्म घ्यायची. पण ते सगळे पदार्थ 'नैवेद्य व्हायचाय!' एवढ्या एका वाक्यावर डब्यात भरले जायचे.

घरोघरी चकली तळणीत पडेपर्यंत अन् नंतर तळून झाल्यावर 'ती मऊ पडणार का कुरकुरीत रहाणार' यावर चर्चा व्हायची. कधी कुणाची चकली तेलकट तर कधी कटकटीत असायची. कधीतरी दिसायला 'देखणी' पण चवीला 'चकणी' असायची. प्रत्येकीची भाजणी-मळणी- तळणी याची तंत्रं निराळी असायची. तेव्हापासूनच कदाचित ह्या चकलीनं माझ्या बालमनावर स्वतःच्या काटेरी खुणा ठेवल्या असाव्यात. माझी मी चकली करायची ठरवली आणि माझ्यासाठी पहिली 'हमखास रेसिपी' मैत्रीणीकडून आली. तोंडी माहिती बदलू शकते म्हणून ती लिखीत स्वरुपातही घेतली. चकली बरी झाली पण तिच्या वर्णनाइतकी 'भारी' काही झाली नाही. हमखास रेसिपी सखीला विचारलं तर म्हणाली 'माझी छान झालीय.. तु मळलं कमी असशील'. भाजणी प्रमाण लिखीत होतं, कृती तोंडी होती. त्यामुळे मी गप्प! पुढील वर्षी 'नवा राजा, नवा राज' या न्यायाने जुनी मैत्रीण नवीन हमखास रेसिपी घेऊन आली. या वर्षी मागील चुकांची पुनरावृत्ती न होण्याचे भान फक्त मला सांभाळायचे होते. ही भाजणी व भरपूर मळणी असा क्रम नक्की झाला. चकली करायच्या दिवशी दोन्ही वेळचा स्वयंपाक करून ह्या कामी लागायचं आणि चकली 'जमवायची' अस ठरवलं. काम सुरू केल. तळल्याबरोबर चकली खाऊन पाहिली.चकली मऊ वाटली. मैत्रीणीला फोन केला तर म्हणाली.. 'गार झाल्यावर बघ, मस्त कुरकुरीत होणार..गरम असताना मऊच वाटते!'

अंधविश्वास का काय तो ठेऊन चकली काम पूर्ण केलं. गार झाल्यावर डब्यात ठेवतानाही 'चकली बाई' मऊसुतच राहिल्या आहेत अस वाटलं. पण विश्वास होता ना मैत्रीणीवर म्हटलं.. दगाफटका नाही होणार! प्रत्यक्षात मात्र दिवाळी संपली - चकली संपत आली पण अंगी बाणलेले मृदुपण चकलीने सोडले नाही, थंड काय थंडी संपल्यावरही मृदुपण चकलीकडे अबाधित राहिले.

मैत्रिणीला कारण विचारले. उत्तर मिळाले 'अगं, कमी तळली गेली असेल, तेल खूप तापलं असणार, गॅस बारीक ठेवला होतास का?' दीड महिन्यांनी मी गॅस बारीक होता की मोठा हे नक्की ठासून न सांगितल्याने ती विजयी झाली. 'तेलाच तापमान योग्य हवं चकलीला!' अस् मला सुनावून, माझं तापमान वाढवून, माझ्या घरचा भरपूर तापमानाचा चहा घेऊन मैत्रीण घरी निघून गेली. कढईतल्या तेलाचं तापमान दर्शवणारे थर्मामीटर हिला कुठं मिळालंय ते मात्र बहाद्दरणीने सांगितल नाही. हे शास्त्रज्ञांनो, भांडयांच्या नवनिर्माणकारांनो 'कढई वुईथ अचूक थर्मामीटर' असे कुणीतरी बनवा हो!

त्यानंतरच्या दिवाळीत माझ्या एका आत्तेबहिणीचा चकलीच्या पाककलेच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याचा मला सुगावा लागला. घरच्यांना सोडून आपण बाहेरच्यांचं मार्गदर्शन घेतोय हया टोचणीने ह्यावेळी ताईकडे सपशेल शरणागती पत्करून सांगितलं, "चकलीबद्द्ल मला काहीही माहित नाही असं समजून सगळं सगळं सांग, मग म्हणू नको मला वाटलं तुला हे माहित असेल..म्हणून सांगितलं नाही!" ती म्हणाली 'मी तुला करूनच देऊ का?' पण स्वकर्तृत्वाचा खरा आनंद 'असीम' की काय असतो ना, तो मिळवण्याच्या ध्यासापोटी मी 'हमखास विजेत्या' पाककृतीची लेखी कृती व विशेष सूचनांसह मी मागणी केली. तिचे मिस्टर तज्ज्ञ, निष्णात वकील असल्याने कदाचित लेखी पुराव्यात अडकू नये असा सल्ला मिळाल्याने ती पाककृती अद्याप मिळालेली नाही. स्मरणफोन केल्यावर म्हणाली 'अगं, तेंव्हा स्पर्धा होती म्हणून काही धान्यं मी नेहमीपेक्षा वेगळी घातली होती.. आणि काही गोष्टी अंदाजानं घालते मी. तू ये ना माझ्याघरी, मी करूनच दाखवते तुला' अश्या कारणांमुळे विजेती पाककृती मिळवण्यासाठी दोन दिवस सुट्टी घेऊन तिच्याकडे जावे लागणार होते.

एकवर्षी चकल्याची भाजणी विकत आणावी आणि चकल्या घरी कराव्या असा मनात विचार येऊ लागला. कुणीतरी म्हणालं, 'विकतची भाजणी कशाला? डाळ-तांदूळ नीट धुवून, भाजलेत की नाही कळत नाही. सगळे पदार्थ चांगले आणि योग्य प्रमाणात असतील तरच भाजणी चांगली होणार ना?' ते म्हणणे पण अगदी पटलंच! पुन्हा चकली भाजणी नवे प्रमाण आजमावावे की जुन्या हमखास प्रमाणावरच प्रयोग करावा अशी द्विधा मनस्थिती झाली. नव्यांना संधी देण्याकडे मन झुकले आणि घरचे- बाहेरचा असा भेद मिटवून चक्क वैश्विक माहिती खजिन्यात पहायचे ठरवले. इंटरनेटवरही अनेकजणी 'परफेक्ट चकली रेसिपी माझी वापरा!'असा आग्रह करतच होत्या. वेगवेगळ्या कृती, त्यांचे प्रमाण, तसे न केल्यास होणारे परिणाम, धोके यांचे इशारेवजा सूचना पण देत होत्या. 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' अश्या विचाराने यावेळी उचल घेतली..एका नव्या भाजणीचा जन्म होणार होता. भाजणी, मळणी, तळणी करत चकल्या झाल्या. अति उत्तम नाही पण 'बऱ्याच बर्‍या' चकल्या झाल्या. दिवाळीत नैवेद्य झाल्यावर आमची लेक म्हणाली 'आई, चकली अजून तिखट हवी होती!' झालं...ह्या एका वाक्यावर चकलीच्या मागणीला ओहोटी लागली. नेमका त्यावर्षी चिवडा आणि शेवसुद्धा सुंदरच झाली होती. बिचारी चकली 'तुलनात्मक' मोजणीत कमी पडली आणि मागे पडली.

एकवर्षी मी ठरवले 'कमलाबाई ओगले' यांना 'गुरु' मानायचे. म्हटलं तर रोज स्वयंपाकघरात राहणाऱ्या, पण बाहेरच्या जगात असणाऱ्या! त्यांनी पण त्याच्या पुस्तकात दोन कृती दिल्या आहेत. तरीही एका पाककृतीचेच पालन करायचे ठरवले. त्याप्रमाणे भाजणी, मळणी, तळणी झाली. चकली कढईत सोडली की आकार बदलून सरळसोट व्हायची. चकलीचे असंख्य 'च.तु.' जन्मू लागले. च.तु. म्हणजे 'चकली तुकडे!' कमलाबाईनां फोन करणे शक्य नव्हते आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून त्या फक्त मंद हसत होत्या. बोलत काहीच नव्हत्या. जाणकार, तज्ज्ञ नातेवाईक आणि मैत्रिणींच्या मते 'मोहन जास्त झालं..ओतवणी जास्त झाली!

त्यानंतरच्या एका वर्षी मी चकली सर्व्हे सुरू केला. आमच्या एका नातेवाइकांकडून येणाऱ्या चकल्या इतक्या मजेदार मऊ असतात की या उलगडल्या तरी तुटत नाहीत. सरळ करून पुन्हा गुंडाळूनही ठेवता येतात. 'स्प्रिंग चकली' आहेत त्या. एकांकडील चकल्या या 'शनीमारुती चकल्या' असतात. इतक्या तेलकट की घेताना, खाताना, खाऊन झाल्यावर हाताला तेल लागतंच. 'काटेरी चकल्या' ह्या प्रकारात चकल्या ह्या दिसण्याला एक नंबर पण खाताना त्यांचे काटे टोचत राहतात. पाण्याच्या घोटाबरोबरच ते काटे गिळावे लागतात. 'जहाल चकल्या' अतिशय तिखट आणि कटकटीत चकल्या. पुढील काही तास ते दिवस आपले अस्तित्व दाखवतच राहतात. हे आणि असे अनेक प्रकार दिसले.

मी एक नवाच प्रकार आणला. 'भूमिगत चकल्या!!' कुठुन आल्या.. कुठे गेल्या..कधी आल्या.. कश्या आल्या..कश्या संपल्या काहीही मागमुस लागत नाही. काम अतिशय चोख, उत्तम ! योग्य धनाचा मोबदला देऊन मिळणाच्या, घरच्या वाटाव्या अश्या 'विकतच्या चकल्या' असंही काहीजण म्हणतात त्यांना! एका वर्षी फारसं काहीही विशेष न करता मी चकली केली. खरोखर विजेत्या पाककृतीप्रमाणे अंदाजाने घातलं सगळे आणि अहो आश्चर्यम्! चकली फारच देखणी-कुरकुरीत- खुसखुशीत सुंदर झाली..आणि मला लॉटरी लागली..ती होती माझी 'लॉटरी चकली!'

हया वर्षी तुफान पावसाळ्यामुळे भाजणी कधी करावी असा प्रश्नच पडत होता. तश्या कुंद, ढगाळ वातावरणात चकल्या कश्या करायच्या? त्या कश्या होणार? असे प्रश्न पडू लागले. एक दिवस मैत्रीणीचा मेसेज आला 'हया वर्षी चकली मऊ पडली तर द्यायचं पावसावर ढकलून!' ही आयडिया योग्य होती, त्यामुळे मी आणि धान्य भिजलेले असूनही भाजणी झाली. इतक्यातच 'क्यार चक्रीवादळ' दिवाळीपूर्व दिवसात आमच्या भागाकडे येणार असे स्पष्ट चित्र उपग्रह दाखवत होते. चक्रीवादळाचे चित्र आणि चकलीच्या चित्रात कमालीचे साधर्म्य दिसत होते. हा मोका सोडायचा नाही असे मी मनोमन निश्चित केले. चक्रीवादळ - पाऊस असल्याने चकली मऊ का पडली? असं कुणी विचारणार नव्हते. वादळाचा तडाखा येणार त्याच दिवशी मी चकली करायचे ठरवले. माझा दिवस निश्चित होता. भाजणी आणि मी तयार होतोच..मळणी,तळणी, चकल्या असा क्रम पार पडला. चकल्या तयार झाल्या- कुरकुरीत झाल्या! माझ्या चकल्यांच्या धाकाने चक्रीवादळाने धसका घेऊन वेगळ्या देशाकडे आपला मार्ग वळवला होता. वादळ ओमानकडे सरकले. भविष्यात चक्रीवादळाला घालवण्यासाठी मला बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही..'चक्रीवादळ हटाव चकल्यांसाठी..!!'

प्रतिक्रिया

दिवाळीच्या फराळातल्या पदर्थांतले बहुतेक सर्वच पदार्थ मला आवडतात, त्यात चकलीचे स्थान थोडे वरचे असल्याने चकली सारखाच 'कुरकुरीत आणि खुसखुशीत' असा हा लेख आणि वरच्या चित्रातली 'चकलीवाली' दोन्ही खुप आवडले 😀 👍

कर्नलतपस्वी's picture

13 Nov 2023 - 8:16 pm | कर्नलतपस्वी

खुलभर दुधाच्या कहाणी सारखं करावं.....

चकल्या बनवताना घरातील सर्वांना चवीसाठी खायला द्याव्या. नैवेद्य वगैरे सब झुठ.

पतिराज, चकली छानच झाली असेच म्हणणार त्यामुळे हिरमोड न होता उत्साह वाढेल.

मुलांनी सुचवलेल्या लहान सहान सुचना लक्षात घ्याव्या.

नंतरच बाहेरच्यांना नैवेद्य दाखवावा. शपथेवर सांगतो चकल्या हमखास चांगल्याच होणार.

निमी's picture

15 Nov 2023 - 8:05 am | निमी

कर्नल साहेब, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि सूचना नेहमीच स्वागतार्ह..पतीराजांच्या मदतीशिवाय चकली आमच्याकडे होतच नाही त्यामुळे त्यांना 'भूमिगत चकल्या' जास्त पसंत आहेत.

लेखाच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. कुरकुरीत चांगल्या चकल्या विकत मिळण्याच्या हमखास ठिकाणांसाठी मला विचारा पण सुंदर चकल्या तळणारीसाठी मिपा संपादक मंडळास संपर्क करा.. इतकी आवरून नीटनेटक्या चकल्या तळणारी पाहून एक्टिंग करतेय असंच वाटतंय..पण आहे मात्र सुंदर..

गोरगावलेकर's picture

15 Nov 2023 - 7:43 am | गोरगावलेकर

'लॉटरी चकली' शब्द आवडला. मलाही लागते अशी लॉटरी कधीकधी.

धमाल आली वाचताना. अनेक प्रकारच्या चकल्यांच्या आठवणीने "अगदी अगदी" असे वाटून हसू येत राहिले. यात तुकडे होणारी चकली आली पण "तेलात विरघळणारी" व्हर्शन आलेली दिसत नाही.

सौंदाळा's picture

23 Nov 2023 - 10:40 am | सौंदाळा

अगदी असेच माझ्या आईचे पण व्हायचे. कधी छान, कधी नरम, कधी कड्कडीत चकल्या. पण मी साधारण पाचवी सहावीत असताना मात्र आजीच्या मैत्रीणीकडून एक प्रमाण मिळाले आणि तेव्हापासून आमच्या घरच्या चकल्या सुपरहीट झाल्या. एकदा खाल्लेले लोक अजूनही फोनवर आठवण काढतात. शेजारीच्या काकू तर हक्काने चार चकल्या मागायला येतात.
त्यामुळे लेख खूपच भावला. चकली पुराण आवडले.

सरिता बांदेकर's picture

29 Nov 2023 - 6:52 pm | सरिता बांदेकर

छान आहे चकली पुराण.
माझी एकदाच चकली बिघडली होती.मोहन जास्त झालं होतं.भाजणी कमी केली होती म्हटलं आपली चकली काही बिघडत नाही भिजवूया एकाच वेळी.
आणि चकल्या विरघळायला लागल्या.आईने सांगितलं उरलेली भाजणी घालून बघ. पण तिला काय माहित तिच्या अति हुश्शार मुलीनी सगळं पीठ वापरलं होतं.
मग म्हटलं थालिपीठ करून बघूया. पण ते ही जमेना . शेवटी पीठ मासूंदा तलावात नेऊन टाकलं,रात्रीच्या वेळी हळूच.
माशांनी कुठे तक्रार केली असेल माहित नाही.
पण मग त्या दिवाळीत गहू पीठ आणि मूग डाळीची चकली केली.
प्रत्येक दिवाळीत मैत्रीणीशी चर्चा करताना मजा यायची.कुठचा पदार्थ चांगला झाला कुठचा बिघडला.
पण आता लोक फराळ विकतचाच आणतात त्यामुळे चर्चा होत नाही.

पियुशा's picture

30 Nov 2023 - 2:40 pm | पियुशा

चकली या वर्षी मीही करून बघितली पण राम बंधू चकली पिठाची पण मला अपेक्षित result मिळाला नाही खूप strong flever होता.

मुक्त विहारि's picture

2 Dec 2023 - 9:35 pm | मुक्त विहारि

एकदम, खुसखुशीत

मला आवडणाऱ्या खमंग चकलीईतकाच खमंग लेख!!

- (खमंग) सोकाजी

विवेकपटाईत's picture

12 Dec 2023 - 3:51 pm | विवेकपटाईत

चकली कथा आवडली. सौ.मस्त करते.

श्वेता व्यास's picture

28 Dec 2023 - 3:11 pm | श्वेता व्यास

लेख आवडला. चकलीच फराळातील सर्वांत आवडता पदार्थ आहे.
भाजणीची चकली कधी करून पाहिली नाही पण जालावर बघून ज्वारीच्या पिठाची करून पहिली होती, ती सोपी होती.
माझ्या लहानपणी शेजाऱ्यांकडून फराळाची देवाणघेवाण होत असल्याने तुम्ही उल्लेख केलेल्या आणि इतरही अनेक प्रकारच्या चकल्या खायला मिळाल्या आहेत. पण तेव्हा कोणाच्याच पाकृमध्ये पुढील वर्षी काहीही सुधारणा नसायची. :D