दिवाळी अंक २०२३ - मध्य प्रदेश - धर्मराजेश्वर मंदिर, चतुर्भुज नाला, भानपुरा आणि हिंगलाजगड

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am

काही सहली तुम्ही आयोजित करता, तर काही सहली आपसूक तुमच्या समोर येऊन ठाकतात. २०२२ सालच्या जुलै महिन्यात आम्ही केलेली रतलाम आणि आजूबाजूच्या परिसराची सहल ही ह्यातल्या दुस-या प्रकारची सहल होती.

त्याचं असं झालं , हरिद्वारमध्ये राहणा-या आमच्या बंधुराजांसाठी आम्ही टाटा नेक्सॉन ही नविन गाडी घेतली. तोपर्यंत हे साहेब टाटा नॅनो(ने काम) चालवत होते. ही गाडी तिकडे आणि ती गाडी इकडे कशी पोहोचवायची याची माहिती काढायला लागल्यावर पहिला पर्याय समोर आला तो म्हणजे गाड्या ट्रक्सद्वारे पाठवून देण्याचा. पण या पर्यायात पैसा बराच खर्च होतो आहे असं दिसल्यावर 'गाड्या चालवत न्याव्यात, मध्ये कुठेतरी भेटावे आणि तिथे गाड्यांचे अदलाबदल करावी ' हा दुसरा पर्याय खूपच आकर्षक भासू लागला. गूगल मॅप्सवर अंतर मोजल्यावर गुना हे शहर दोघांसाठी मध्यभागी पडते आहे असे दिसले, तेव्हा तिथेच भेटायचे ठरले.

कुठेही जायचं म्हटलं की मी त्या ठिकाणी बघण्यासारखं काय आहे हे शोधायला सुरुवात करतो. त्यात मध्यप्रदेश हे राज्य असं आहे की कितीही भेटी दिल्यात तरी त्या कमीच पडाव्यात.(२०२२ सालच्या ह्या सहलीनंतर २०२३ सालच्या मे महिन्यात कान्हा अभयारण्य पहायला मी पुन्हा एकदा मध्यप्रदेशात गेलो, ही ह्या राज्यातली माझी सातवी सहल होती.) मध्यप्रदेशातल्या धर्मराजेश्वर मंदिर आणि चतुर्भुज नाला या दोन ठिकाणांची एक सहल मी मागे बनवून ठेवली होती. थोडी शोधाशोध केली आणि भानपुरा येथील यशवंतराव होळकर यांची छत्री आणि हिंगलाजगड किल्ला ही दोन ठिकाणंही त्या सहलीत जोडून टाकली.

शेवटी बेत असा ठरला:

०६ जुलै २०२२ : पुणे ते रतलाम प्रवास, रतलाम येथे मुक्काम
०७ जुलै २०२२ : रतलाम ते धर्मराजेश्वर मंदिर प्रवास, मंदिर व मंदिराशेजारची बौद्ध लेणी पाहणे, तेथून भानपुरा जाणे, तेथील छत्री पाहणे, भानपुरा येथे मुक्काम
०८ जुलै २०२२: भानपुरा ते चतुर्भुज नाला प्रवास, त्यानंतर हिंगलाज गड किल्ला पाहून गुना येथे मुक्काम
०९ जुलै २०२२ : गाड्यांची अदलाबदल करून गुना ते इंदोर प्रवास, इंदोर येथे मुक्काम
१० जुलै २०२२: इंदोर ते पुणे प्रवास

जोपर्यंत नेक्सॉन गाडी सोबत आहे, तोपर्यंत सर्व भटकंती उरकावी आणि नॅनो ताब्यात आल्यावर परतीचा प्रवास करावा असे एकंदर नियोजन होते.

०६ जुलै २०२२

ह्या दिवशी पहाटे साधारण पाच वाजता आम्ही प्रवासाला सुरूवात केली. पुणे ते सिन्नर, तिथून चांदवड आणि त्यानंतर मुंबई आग्रा महामार्गावर बराच वेळ प्रवास करून तो सोडल्यावर डावीकडे रतलाम असा मार्ग गूगल दाखवत होतं. ह्यातल्या सिन्नर ते चांदवड मार्गाविषयी खात्री नसल्याने (हा साधा दोनपदरी रस्ता दिसत होता) आम्ही पुणे ते नाशिक आणि पुढे मुंबई आग्रा महामार्ग पकडून नाशिक ते रतलाम असा प्रवास करायचं ठरवलं. पुणे ते नाशिक ही महाराष्ट्रातली दोन मोठी शहरं जोडणारा महामार्ग अजूनही तयार नाही ही खरंतर एक लाजिरवाणी गोष्ट आहे. चाकणला होणारी वाहतुकीची कोंडी, राजगुरूनगर शहरात लागणा-या वाहनांच्या रांगा, मंचर वगैरे शहरातून करावा लागणारा दोनपदरी रस्त्यांवरचा प्रवास हा सगळाच प्रकार चीड आणणारा आहे. वाटेत एके ठिकाणी नाश्ता उरकून साधारण साडेदहाच्या सुमारास आम्ही नाशिकला पोहोचलो. आत्तापर्यंतचा प्रवास त्रासदायक होता, आता मुंबई आग्रा महामार्गावर तरी जरा वेग पकडू असा विचार आम्ही केला खरा, पण तसं व्हायचं नव्हतं. जागोजागी टोलरुपी जिझिया कर द्यावा लागत असूनही (नाशिकजवळचा एक टोल तर चक्क २२० रुपयांचा होता.) ह्या महामार्गाची अवस्था अतिशय बिकट होती. ह्या महामार्गावरच्या काही खड्ड्यांचा 'विकास' चक्क एकेका फुटापर्यंत झालेला होता. धुळ्याच्या पुढे मध्य प्रदेश सुरू झाल्यावर परिस्थिती काहीशी सुधारली. शेवटी संध्याकाळी साधारण सहा वाजता आम्ही रतलामला पोहोचलो.

रतलामला पोहोचल्यावर तिथलं स्थानिक जेवण जेवण्यासाठी आम्ही हॉटेलचा शोध सुरू केला. तेव्हा जवळच दालबाटी देणारं एक छानसं हॉटेल आहे असं गूगलबाबानं दाखवलं. हॉटेल जवळ,चालत जाण्यासारखं असल्यामुळे आम्ही गाडी हॉटेलातच ठेवून निघालो. रतलाम हे मध्य प्रदेशातलं एक प्रातिनिधिक शहर दिसत होतं. अरूंद रस्ते, जवळजवळ बांधलेल्या इमारती, इकडे तिकडे पसरलेला कचरा, अंगावर येणारी आणि कर्णकर्कश हॉर्न वाजवणारी वाहनं हा सगळा सुंदर प्रकार तिथे होता. काही मिनिटांतच आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. हॉटेल बरंच लोकप्रिय असावं, कारण तिथं जेवणासाठी थांबावं लागत होतं. दहा एक मिनिटांत आम्हाला जागा मिळाली. पण त्यानंतर तिथं जे जेवण मिळालं ते त्या दिवशीचा प्रवासाचा सगळा शीण विसरायला लावणारं होतं. जेवण चवीला अप्रतिम होतंच पण भयानक स्वस्तही होतं! पुण्यासारख्या शहरात ज्या पैशात एका माणसाचं पोट भरणार नाही त्या पैशात आम्ही चार जणांनी तिथे जेवण केलं. जेवण करून तृप्त मनाने आणि भरलेल्या पोटाने आम्ही हॉटेलवर पोहोचलो आणि मस्त ताणून दिली.






०७ जुलै २०२२

आज आम्ही सकाळी लवकर उठलो आणि आवरलं. त्यानंतर, काल विकत घेतलेल्या काही फळांचा आणि घरून आणलेल्या खाऊचा नाश्ता खोलीतच उरकला आणि निघालो. काल ह्या हॉटेलात आम्ही आलो तेव्हा एक गंमतच झाली होती. रतलाममध्ये त्या दिवशी निवडणुका चालू होत्या आणि अर्थातच दारूची सारी दुकाने आणि बार बंद होते. आम्ही ह्या हॉटेलात पिण्यासाठी आलो आहोत असा समज होऊन काल तिथल्या पो-या 'बंद है, बंद है' असं म्हणत आम्हाला चक्क हाकलूनच काढत होता, पण तेवढ्यात हॉटेलचा मालक आला आणि त्यानं आम्हाला आत घेतलं.

रतलाम ते धर्मराजेश्वर मंदिर हे अंतर साधारण दीडशे किलोमीटर आहे. पहिल्या काही किलोमीटर्सचा प्रवास चांगल्या चारपदरी रस्त्याने आहे. नंतर मात्र छोटा, दोनपदरी रस्ता आहे. मध्यप्रदेशातले रस्ते चांगले आहेत हे मी अनेकदा ऐकलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी दिसत होती. साधारण पावणेबाराच्या आसपास आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराला लागूनच बौद्ध लेणी आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे मंदिर पाहण्यासाठी तिकीट नसले तरी शेजारची बौद्ध लेणी पाहण्यासाठी मात्र तिकीट आहे. आम्ही आधी मंदिर पहायचं ठरवलं.

एक सलग, महाप्रचंड दगड कोरून हे मंदिर बनवलं गेलं आहे, आपल्या वेरूळच्या कैलास लेण्याची एक प्रतिकृतीच म्हणाना. एका बाजूला जिथे हा दगड उतरता निमुळता होत गेला आहे, तिथे एक खिंड खोदून मंदिरात जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. हा रस्ताही चांगलाच लांब आहे, शंभरेक मीटर तरी असावा. ह्या लांब रस्त्याने चालत आल्यावर बांधलेल्या दगडी मंदिरांना असते तसे एक भव्य प्रवेशद्वार पार करून आम्ही मंदिरात शिरलो. मध्यभागी मुख्य मंदिर, बाजूला दुय्यम मंदिरे आणि कडेला जिच्यावरून चालता येईल अशी रुंद तटबंदी अशी मंदिराची एकंदर रचना आहे. मंदिरसमूह कमालीचा देखणा आहे. मुख्य मंदिर आणि आजूबाजूची दुय्यम मंदिरे ही सगळीच मंदिरे सुंदर आहेत, त्यांत डावेउजवे करणे कठीण आहे. दगड तासून ते एकमेकांवर रचून मंदिर उभे करणे एकवेळ सोपे, पण भलाथोरला हा दगड फक्त छिन्नी हातोड्याने कोरून हे मंदिर कसे बनवले असेल ह्या नुसत्या विचारानेच थक्क व्हायला होते. अर्थात् मंदिराचा दगड ग्रॅनाईटसारखा टणक नसल्याने मंदिरावरील कोरीवकाम आज बरेचसे बोथट झालेले दिसते. तरीही आजे जे समोर दिसते आहे तेही विलक्षण सुंदर आहे.


















मंदिर फारसे प्रसिद्ध नसावे. आम्ही एक तासभर तरी मंदिरात होतो, ह्या वेळात मंदिर पहायला आलेली फक्त ७/८ माणसेच आम्हाला दिसली.

नुकताच पाऊस पडून गेला होता, वातावरणात एक हवाहवासा गारवा होता. वातावरण कुंद, भलतेच प्रसन्न होते. आयुष्यात काही मोजकेच क्षण येतात जेव्हा सगळेच कसे जुळून येते आणि 'सालं हे आयुष्य इतकंही वाईट नाही' असे वाटून जाते, हा क्षण असाच एक क्षण होता. कुठेतरी दगडाला पाठ टेकून बसावे आणि हे मंदिरांचे सौदर्य डोळ्यांत साठवत आणि निरव शांतता अनुभवत नुसते बसून रहावे असे वाटत असूनही मी निघालो. शेजारची बौद्ध लेणी पहायची होती आणि शिवाय भानपु-याला मुक्कामाला जायचे होते.

मंदिराच्या एका कोप-यात एक सुंदरशी विहीर आहे. तिच्यात आजही पाणी आहे.



मंदिर पाहून आम्ही निघालो शेजारची बौद्ध लेणी पहायला. मघाशी मी सांगितल्याप्रमाणे इथला खडक सच्छिद्र आणि ठिसूळ असल्याने बौद्ध लेण्यांचीही बरीचशी हानी झालेली दिसते. प्रामाणिकपणे सांगायचे तर आत काहीच बघण्यासारखे नाही. ना वेरूळसारखे कोरीवकाम ना अजिंठ्यासारखी सुंदर चित्रे. काही निवडक लेण्यांत काही मूर्ती आहेत खरं, पण त्यांची 'जेमेतेम आकार ओळखता यावा' एवढी झीज झालेली आहे.







"बडी कचहरी" ह्या इथल्या सगळ्यात मोठ्या आणि प्रसिद्ध लेण्यातही आवर्जून जावे असे काही नाही. इथल्या भिंतींवर आणि छतावर काही चित्रे कोरली असावीत, पण कालौघात ती नष्ट झाली आहेत.



ह्या लेणीसमूहातील काही लेणी आतल्या भागात आहेत - ह्या लेण्यांपर्यंत नेणारा रस्ता मात्र कमालीचा सुंदर आहे. वीसेक फुटी दगड पार अगदी खालपर्यंत कोरून बनवलेल्या ह्या रस्त्यावरून चालणं हा एक थक्क करणारा अनुभव आहे.



लेण्यांमध्ये बघण्यासारखे फार काही नसले तरी लेण्यांमधून दिसणारे दृश्य मात्र अप्रतिम होते. समोरच्या घळीत झाडांची दाट गर्दी होती आणि दूरवर पठारावर काही पवनचक्क्या मान उंचावून आमच्याकडे पहात होत्या. लेण्यांची दूरवरची बाजू पहात असतानाच एक मेंढपाळ दगड वर चढून माझ्या दिशेने आला. गर्द हिरव्या झाडीत शेळ्यांमागे फिरावं आणि पाऊस आला की हळूच ह्या लेण्यांमध्ये शिरावं, काय सुंदर आयुष्य होतं बेट्याचं!


लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ एका पिंज-यात काही ससे ठेवले होते. ते दुडूदुडू धावत होते आणि मधेच थांबून गवत खात होते.



धर्मराजेश्वर मंदिरापासून भानपुरा जवळजवळ ६० किलोमीटर लांब आहे. आम्ही गाडीत बसलो आणि निघालो. साधारण चारच्या आसपास आम्ही भानपु-याला पोहोचलो. भारतातल्या शंभर गावांपैकी नव्व्याण्णव गावे असतात तसंच भानपुरा गाव अस्वच्छ होतं. या गावाचं एकमेव आकर्षण आहे, यशवंतराव होळकर (प्रथम) यांची छत्री - इकडेतिकडे विचारत विचारत आम्ही ह्या छत्रीपर्यंत पोहोचलो.








भव्यदिव्य अशी ही छत्री अतिशय देखणी आहे, सुंदर अशी ही छत्री पाहिल्यावर या अस्वच्छ गावात आल्याचं सार्थक होतं. छत्रीला भलंमोठं असं दगडी प्रवेशद्वार आहे, आणि ह्या दाराला तितकाच भरभक्कम असा लाकडी दरवाजा बसवलेला आहे. उंच असं दगडी जोतं आणि त्यावर दगडी खांब अशी ह्या भागात आढळणा-या मंदिरांसारखीच ह्या छत्रीची रचना आहे. किंबहुना माहीत नसेल तर कुणीही मंदिर समजावं इतकं ह्या छत्रीत आणि मंदिरात साधर्म्य आहे. मध्यभागी असलेल्या छत्रीला रुंद अशा सज्ज्यांचे कुंपण आहे. छत्रीभोवती असलेल्या ह्या सज्ज्यांमध्येच, आजूबाजूच्या परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्ती ठेवून पुरातत्व खात्यानं एक छोटेखानी वस्तुसंग्रहालय बनवलं आहे. ह्यातल्या काही मूर्ती अगदी पाहण्यासारख्या आहेत.







मंदिरातला सुरक्षारक्षक आमच्या आजूबाजूला घुटमळत होता. थोड्या वेळानं तो आमच्याजवळ आला आणि 'मला पन्नास रुपये द्या, कुणीही जात नाही अशी ह्या छत्रीतली एक गुपित जागा तुम्हाला दाखवतो' अशी योजना त्यानं आमच्यापुढे ठेवली. आम्ही पन्नास रुपये देताच तो आम्हाला मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या कोप-यात घेऊन गेला. इथं दगडी जीना उतरून छत्रीच्या बांधकामाचाच एक भाग असलेली पाण्याची विहीर त्यानं आम्हाला दाखवली. विहिरीत अगदी पुरुषभर पाणी होतं. पाणी इतकं स्फटिकासारखं स्वच्छ आणि शांत(एकही तरंग नसलेलं) होतं की बारकाईनं पाहिल्यावरच तिथं पाणी असल्याचं लक्षात येत होतं.

छत्री पाहून आम्ही निघालो. आजची रात्र आम्हाला ह्या भयानक गावातच काढायची होती. गावात जेमतेम दोन हॉटेलं होती. बाहेरून साधारण ठीक वाटणा-या एका हॉटेलात आम्ही शिरलो. मोठ्या शहरांत रेल्वे स्टेशनपरिसरात असणा-या हॉटेलांसारखी ह्या हॉटेलची रचना होती. अरूंद जिने, लांबलचक, अंधारे पॅसेजेस् आणि लहान, खिडक्या नसलेल्या कळकट खोल्या. शेवटी दोन ब-या दिसणा-या खोल्या निवडून आम्ही आत शिरलो. खोल्या भयानक होत्या, पण काय करणार, नाईलाज होता. आम्ही खोल्यांमध्ये शिरलो आणि बाहेर भयानक पाऊस सुरू झाला.

दीडेक तासांनी आम्ही जेवणासाठी खाली आलो तेव्हा पाऊस पूर्णपणे थांबला नसला तरी ब-यापैकी कमी झालेला होता. जेवण कुठे चांगलं मिळेल अशी चौकशी करताच मालकानं आम्हाला दूरवरच्या एका हॉटेलाचा पत्ता दिला. ४/५ किलोमीटरवरच्या ह्या ढाब्यात जेवण मात्र छान मिळालं. रात्री चांगलं जेवण मिळालं की एक फायदा होतो, झोप छान लागते. दिवसभर बरंच चाललोही होतो, तेव्हा अंथरूणावर पडताच आम्ही काही वेळातच झोपेच्या अधीन झालो.

०८ जुलै २०२२

सकाळी उठून हॉटेलातल्या पाणी साठून रहात असलेल्या बाथरूमात आम्ही कशातरी आंघोळी उरकल्या आणि घाईघाईत तिथून आपला गाशा गुंडाळला. नाश्त्याची सोय शोधत शोधत आम्ही बाजारपेठेत आल्यावर, एका गाड्यावर पोहे आणि जिलेबी विकणारा एक जण दिसला. पोहे गरम होते आणि त्यावर रतलामी शेव, किंचित कांदा आणि कसलातरी मसाला टाकून दिले जात होते. किंमत? फक्त दहा रूपये. आम्ही ते चविष्ठ पोहे दोनदोन प्लेटी हादडले. जिलेबीही अगदी ताजी बनवून गरम दिली जात होती आणि तिची किंमतही दहाच रुपये होती.

समोरच भानपु-याचं बस स्थानक होतं. आजूबाजूला भयंकर अस्वच्छता होतीच पण त्याबरोबर इथं कमालीची बेशिस्तही दिसत होती. रस्त्यावर अनेक वाहने अस्ताव्यस्त उभी केलेली होती. काही वाहनं मध्येच थांबत होती आणि मग मागची वाहनं हॉर्न वाजवून सगळा परिसर दणानून सोडत होती. मध्येच कुठं बेवारशी वाहनं बसून रस्ता अडवत होती. एक उनाड गाय असंच फिरतफिरत आली आणि पोहे ज्यांवर दिले जात होते ते कागद आणि प्लास्टिकचे चमचे खाऊ लागली. पोट फुगलेल्या त्या गाईला तसं ते कागद आणि प्लास्टिक खाताना पाहून वाईट वाटलं. आम्ही तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकेना. शेवटी पोहेवाल्यानं काठी हातात घेतल्यावर ती तिथून निघाली खरी, पण दुसरीकडे जाऊनही ती कचरा खातच होती. नंतर वाटलं, आख्ख्या भारतात अशा लाखो गाई आणि बैल रोज प्लास्टिक खात असतील, बेवारशी जनावरांच्या ह्या प्रश्नावर आपण कायमस्वरूपी उत्तर कधी शोधणार?

नाश्ता करून आम्ही निघालो अंदाजे ३० किमी दूर चतुर्भुज नाला या ठिकाणाकडे. चतुर्भुज नाला हे ठिकाण प्रसिद्ध आहे हजारो वर्षांपुर्वी आदिमानवानं बनवलेल्या गुहाचित्रांसाठी. दाट जंगलात असलेलं हे ठिकाण अगदी निर्मनुष्य असं आहे. मध्य प्रदेश पर्यंटन महामंडळानं लावलेला एक बोर्ड पाहून आम्ही मुख्य रस्ता सोडून उजवीकडे आत वळलो. अंदाजानं आत आत जात आम्ही पोहोचलो ते एका मंदिराजवळ. इथे एक पुजारी एकटेच रहात असावेत. आम्ही त्यांना हाक मारून बोलावलं आणि गुहाचित्रांचा पत्ता विचारला. ते आम्हाला पत्ता सांगत आहेत तोवरच एक गुराखी तिथे प्रकट झाला. तो बराच बडबड्या होता. बोलताबोलता त्यानं "तुम्ही आत जाऊन दर्शन घेऊन या आणि मग जा गुहाचित्रं पहायला." असं दोनतीनदा म्हटल्यावर पुजारीबुवा चिडले. "अरे त्यांना नाही यायचं आत. तू का पुन्हापुन्हा म्हणतोयस आत जाऊन दर्शन घ्या म्हणून?" आम्ही आत जाऊन देवदर्शन घेतलं नाही ही गोष्ट त्यांना फारशी रुचली नसावी! त्या दोघांच्या बोलण्याचा मतितार्थ असा होता की इथून त्या गुहाचित्रांकडे जाता आला असतं पण रस्ता नदीच्या काठानं जाणारा आणि अवघड होता. त्यापेक्षा आलो त्या रस्त्याने मागे जाऊन आत एक फाटा फुटत होता त्या रस्त्याने आम्ही गुहाचित्रांच्या अगदी जवळ पोहोचलो असतो. आम्ही गाडी वळवली आणि तो फाटा शोधून त्यानं आत शिरलो. काही वेळातच आम्ही योग्य जागी पोहोचलो. एका ओढ्याच्या काठावर असलेल्या दगडांवर ही गुहाचित्रे काढली आहेत. ओढा एका घळीत असल्यानं साधारण पंचवीस तीस फूट खाली उतरून चित्रांपर्यंत पोहोचावं लागतं.

आम्ही साधारण नऊ वाजता इथं पोहोचलो होतो. आम्ही सोडलो तर इथं कुणीच नव्हतं. चतुर्भुज नाला या ठिकाणाविषयी मी इंटरनेटवर थोडं वाचलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र ही जागा त्याहून कैक पटीनं सुंदर निघाली. ती गुहाचित्रं इथं नसती तरीही फक्त इथला निसर्ग अनुभवायला इथं यावं एवढी. दाट जंगलात लपलेल्या एका ओढ्याच्या काठावर ही गुहाचित्रं आहेत. ओढ्याला अगदी खेटून असलेली ही दगडांची भिंत सुरुवातीला जवळपास पंधरा एक फूट उंच आहे. जसजसे आपण पुढे जातो तसतशी ह्या भिंतीची उंची कमी होत जाते आणि एका किलोमीटरनंतर ही भिंत जमिनीला टेकते. एक किलोमीटरच्या ह्या भिंतीवर अक्षरश: शेकड्यांनी चित्रे आहेत. ह्या चित्रांचा कालखंड आहे सुमारे ५००० ते ३५००० वर्षांपूर्वीचा. बहुतेक चित्रे लाल रंगात बनवलेली असली तरी काही ठिकाणी काळा रंगही वापरलेला दिसतो.










पावसाळा असल्यानं ओढा अगदी खळाळून वहात होता. नदीच्या काठाने हळूहळू चालत आम्ही पुढे गेलो. थोडं पुढे गेल्यावर रस्ता अधिक अरूंद आणि धोकादायक झाला, तेव्हा आईबाबांना मागे ठेवून मी आणि भाऊच पुढे गेलो. मी मागे सांगितल्याप्रमाणे एका किलोमीटरनंतर हा कडा जमिनीच्या समपातळीत येतो आणि तिथेच इतका वेळ कड्याला खेटून वाहणारा तो ओढा उजवीकडे वळतो. कड्याच्या वरच्या भागावर गवत आणि शेवाळ उगवलं होतं आणि त्यातून पाण्याचे थेंब खाली पडत होते. अर्थात कड्याच्या आतल्या बाजूला असल्यामुळे पाणी आणि ऊन चित्रांपर्यंत पोहोचत नव्हतं. ती हजारो वर्षे टिकून राहण्यामागचं रहस्य कदाचित हेच होतं.

चित्रे पाहत आम्ही पुढे निघालो. बहुतेक सगळ्यात चित्रांचा आकार लहानसा (चार इंच गुणिले चार इंच) आहे. बहुतेक चित्रांमध्ये माणूस आणि त्याकाळी दिसणारे पाळीव आणि जंगली प्राणी (गाय, बैल, ससा, कासव, मगर, गवा, रानडुक्कर, हरीण) यांचं चित्रण असलं तरी काही चित्रांत सारीपाटाचा खेळ, नांगर, बैलगाडी, प्राणी पकडण्याचे सापळे अशा गोष्टीही चित्रित केलेल्या आहेत.





















आपलं जगणं सोपं बनवावं हे एकच उद्दिष्ट समोर ठेवून लावलेल्या अनेक शोधांमुळे मानवाचं जगणं आज सुखकर आणि अधिक आरामदायी झालं आहे. हजारो वर्षांपुर्वी मात्र असं नव्हतं. अन्न मिळवण्यासाठीचा रोजचा संघर्ष, जंगली श्वापदांचं भय, साथीचे रोग व इतर आजार, टोळ्याटोळ्यांमधला संघर्ष अशा अनेक अडचणी आदिमानवासमोर होत्या. आपलं जीवन खडतर आणि कष्टप्रद असतानाही त्यानं ही सुंदर चित्रं काढली. कला ही मानवासाठी जीवनावश्यक गोष्ट आहे हे सिद्ध करण्यासाठी याहून चांगला पुरावा दुसरा काय असू शकतो?

ह्या सुंदर जागेत दीडेक तास घालवून आम्ही निघालो. ही जागा पाहून परत जात असताना ह्या जागेच्या देखरेखीसाठी तैनात करण्यात आलेले काही कर्मचारी तिथं आले. त्यांच्याशी गप्पा मारताना 'ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांच्या एका गटानं काही दिवस राहून ह्या गुहाचित्रांचा शास्त्रीय अभ्यास केला आणि कार्बन डेटिंग पद्धतीचा वापर करून ह्या चित्रांचा कालावधी साधारण २३००० वर्षांपुर्वीचा आहे हे सिद्ध केलं' अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली. ह्या गुहाचित्रांच्या वयाचा आकडा मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा मला तर हसायलाच आलं होतं. एखाद्या ठिकाणाला जशा अनेक दंतकथा चिकटवल्या जातात तसाच हा आकडा कुणीतरी असाच ठोकून दिला असावा असं मला वाटलं होतं, पण त्या कर्मचा-यांनी दिलेल्या [खात्रीशीर] माहितीनंतर मात्र मला मोठाच धक्का बसला. हजारो वर्षांपुर्वी काढलेली ही चित्रे अगदी कालपरवा काढल्यासारखी दिसतात; ह्या गोष्टीला चमत्कार नव्हे तर दुसरं काय म्हणणार? भारलेल्या मनाने आणि निवलेल्या डोळ्यांनी आम्ही निघालो.

आमचा पुढचा थांबा होता हिंगलाजगढ. पाऊण एक तासात आम्ही किल्ल्याजवळ पोहोचलो. गाडी पार अगदी किल्ल्याच्या आतपर्यंत जाते. महाराष्ट्रात आहेत तशा उंच पर्वतांचा अभाव मध्य प्रदेशात असल्यानं मोठ्या उंचीचे किल्ले ह्या राज्यात दिसत नाहीत. हिंगलाजगढ हा किल्लाही तसा भुईकोटच. अर्थात बांधणा-यांनी तो जिथे आहे त्या जागेच्या भौगोलिक रचनेचा असा खुबीने वापर करून घेतला आहे की तो फारच थोड्या ठिकाणी जमिनीच्या समपातळीत असलेला दिसतो. किल्ल्याची प्रवेशदाराकडची बाजू जमिनीच्या समपातळीत असली तरी दुस-या बाजूला बरीच खोल दरी दिसते.

आत हिंगलाजदेवीचे देऊळ आहे. कुठलीतरी महत्वाची तिथी असावी. अनेक मंडळी चूल वगैरे पेटवून जेवण बनवताना दिसत होती. जेवण तिथेच बनवून देवीला नैवेद्य दाखवायची पद्धत असावी. एक दोन जणांनी आम्हाला जेवायचाही आग्रह केला.

देवीचे मंदिर अगदी आधुनिक (मंदिराच्या आत टाईल्स, बाहेर आवारात लोखंडी पत्रे वगैरे वगैरे) दिसत होते, तेव्हा आम्ही बाहेरूनच नमस्कार करून निघालो. किल्ल्याचा विस्तार बराच मोठा आहे, तेव्हा गडाच्या तटबंदीवरून चालून गडाला एक फेरी मारावी असे ठरले. तटबंदी तगडी, रुंद आणि आजही अगदी मजबूत अवस्थेत आहे. गडाच्या अवतीभोवती घनदाट असे जंगल आहे. एवढे घनदाट, की घनदाट म्हणजे नेमके काय हे कुणी विचारले तर ह्या किल्ल्यावर घेऊन यावे इतके! असे जंगल मी महाराष्ट्रातही कुठल्या किल्ल्यावरून पाहिल्याचे मला आठवत नाही. किल्ल्यावर अनेक वास्तू असल्या तरी आज त्यातली एकही चांगल्या स्थितीत नाही.









दोनेक वाजता आम्ही निघालो. गुनापर्यंतचे २६० किलोमीटरचे विशाल अंतर आम्हाला अजून काटायचे होते. वाटेत एके ठिकाणी जेवण केले आणि (एक प्रचंड कंटाळवाणा, थकवणारा प्रवास करून) जवळपास साडेआठ वाजता गुनाला पोहोचलो. तिथे आमचे बंधुराज आधीच येऊन पोहोचले होते. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे गुनाचे आमचे हॉटेल होते अतिशय देखणे. मस्त आंघोळी उरकल्या, जवळच्याच एका छोट्या हॉटेलात एक साधी, सात्विक पण चवदार अशी थाळी (गरमागरम पोळ्या!) खाल्ली आणि रात्री पार झोप अनावर होईपर्यंत गप्पा मारून मग ब-याच उशिरा झोपी गेलो.

०९ जुलै २०२२

दुस-या दिवशी सकाळी आरामात उठून हॉटेलातला मोफत नाश्ता हादडला, गाड्यांची (आणि आतल्या सामानाची) अदलाबदल केली आणि भावाचा निरोप घेऊन निघालो. मागचे दोन दिवस जात्यात असलेला भाऊ आता सुपात होता आणि आम्ही जात्यात. सुख एवढेच की इंदोरपर्यंतचा सगळा प्रवास उत्तम स्थितीत असलेल्या महामार्गाने होता. नॅनो असल्याने आमचा प्रवास फारच हळू आणि कूर्मगतीने होईल असे वाटत होते खरे, पण ह्या चिमुकल्या गाडीने असा काही वेग पकडला की चार वाजता आम्ही इंदोरात आमच्या हॉटेलात होतो. इंदोरात सराफा बाजारला भेट देऊ असे आम्ही ठरवले होते खरे, पण भावाची तब्येत बरी नसल्यानं त्यानं नकार दिला, आईवडिलांची इच्छा नव्हती, तेव्हा उरलो मी एकटाच. मागे एकदा सराफा बाजाराला भेट दिली असल्याने आणि तिथे एकट्यानं जाऊन खादाडी करण्याचा उत्साह माझ्याजवळ नसल्यानं जवळच्याच एका हॉटेलात जेवायला जायचा निर्णय झाला. तिथं जेवण उरकून आम्ही त्या दिवशी लवकर झोपी गेलो.

१० जुलै २०२२

आजचा दिवस आमच्या सहलीतला सगळ्यात खडतर आणि परीक्षा पाहणारा दिवस होता. इंग्रजीत डी-डे म्हणतात, तसा काहीसा. सकाळी लवकर उठून झटपट आवरून आम्ही तयार झालो. नशिबानं भावाची तब्येत आता बरी होती. काल हॉटेल इंटरनेटवर आरक्षित करताना 'मोफत नाश्ता' भाड्यात समाविष्ट आहे असं दिसत होतं, पण एवढ्या कमी भाड्यात हे नाश्ता काय आणि कसा देणार हा एक प्रश्नही मनात होता. चौकशी केल्यावर पोह्याचा नाश्ता मिळेल असे कळले. हॉटेलमधून जितक्या लवकर निघू तेवढे बरे हे कळत असले तरी इंदोरी पोह्यांचा मोहही आवरत नव्हता. थोड्याच वेळात पोहे आणि चहा आले. मध्य प्रदेशात पोह्यांवर टाकला जाणारा नेहमीचा मसाला नसला तरी पोहे खरोखरीच चविष्ठ लागत होते. पोहे संपवून आम्ही हॉटेलातून बाहेर पडलो आणि काही वेळातच महामार्गावर पोहोचलो. येताना आम्ही नाशिकमार्गे आलो असलो तरी जाताना आम्ही मालेगाव-मनमाड-शिर्डी-अहमदनगर-पुणे असा मार्ग निवडला होता. महाराष्ट्रातल्या राज्य महामार्गांचं एक वैशिष्ट्य आहे, कुठलाही महामार्ग निवडा, त्यावर कायम कामे चालू असतात. मी अगदी खात्रीनं सांगतो - कुठलाही महामार्ग निवडा आणि त्याचा १०० वर्षांचा इतिहास पहा - तो 'बनून तयार' ह्या अवस्थेपेक्षा 'बनतो आहे' ह्या अवस्थेत जास्त दिवस राहिलेला दिसेल! मालेगावला राष्ट्रीय महामार्ग सोडताच आम्हाला ह्या गोष्टीची प्रचिती आली. मनमाड आल्यावर मात्र रस्ता चारपदरी झाला आणि परिस्थिती काहीशी सुधारली. राज्य महामार्गावर लागल्यापासून रस्त्याच्या डाव्या बाजूला अनेक दिंड्या पायी चाललेल्या दिसत होत्या - बारकाईने पाहिल्यावर त्या साईबाबांच्या पादुका घेऊन शिर्डीला निघाल्याचे दिसले. बहुधा साईबाबांची जयंती किंवा पुण्यतिथी असावी. आपल्याकडे नाक खाजवायला वेळ नसताना फक्त कुणा बाबांच्या दर्शनासाठी आपला सगळा कामधंदा सोडून दहा-पंधरा दिवस वाया घालवणारी ही माणसे पाहिली की माझ्या मनात त्यांच्याविषयी एक अपार आदरयुक्त कौतुकाची भावना दाटून येते.

आम्ही नगरला पोहोचेपर्यंत सात वाजून गेले असावेत. प्रत्येक काळ्या ढगाला एक सोनेरी किनार असते अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे, इथेही असेच काहीस घडले. आधीचे रस्ते खराब असल्याचा एक फायदा असा झाला की पुणे-नगर रस्त्यावर वाघोलीतली ती प्रसिद्ध वाहतूक कोंडी आम्हाला अनुभवायला मिळाली नाही. हाडे खिळखिळी झाली आहेत, अंगाचा कोपरा नि कोपरा ठणकतो आहे आणि डोळे तारवटले आहेत अशा अवस्थेत आम्ही घरी पोहोचलो तेव्हा साडेनऊ दहा झाले असावेत. सोळाशे किलोमीटर्सचा विशाल प्रवास चार दिवसात पूर्ण करून नॅनो शेवटी स्वगृही परतली होती!

प्रतिक्रिया

अथांग आकाश's picture

13 Nov 2023 - 11:32 am | अथांग आकाश

अनवट ठिकाणांची भटकंती आवडली!

टीपीके's picture

17 Nov 2023 - 12:53 pm | टीपीके

सुं द र

मस्त अनवट जागा आणि प्रवास

इंदोर सोडले तर मध्यप्रदेश मधील अस्वच्छेतेबद्दल सहमत आणि खाण्याच्या स्वस्ताईबद्दलही :)

एक आणखी जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या भित्तिचित्रात फक्त प्राणी नसून इतरही अनेक गोष्टी दिसतात जसे बैल गाडी, स्वस्तिक, आणि अजूनही काही चिन्हे ज्यांचे नाव मला माहित नाही जसे वर्तुळात अधिक चे चिन्ह. मी युवाल नोहारीची पुस्तके वाचली नाहीत पण असे ऐकले आहे कि त्याचा दावा आहे की शेती ८-१० हजार वर्षांपूर्वी आणि त्याच आजूबाजूला एकूण मानवी संस्कृतीची सुरवात झाली. पण जर हि चित्रे २३००० वर्षांपूर्वीची असतील तर (बैलगाडी, स्वस्तिक (धार्मिक प्रतीके) इत्यादींचा विचार करून) मानवी संस्कृतीची मुळे अजून निदान १०-१५ वर्ष मागे जातात.

खरंच छान प्रवास

कर्नलतपस्वी's picture

13 Nov 2023 - 12:50 pm | कर्नलतपस्वी

मंदिराचे फोटो अप्रतिम आहेत. चतुर्भुज नाला चित्रेही छान. भोपाळ जवळच्या भिमबेटकाची आठवण करून देतात.

मी पण आधीच पुणे लखनौ एकट्यानेच कुटुंबासह गाडी घेऊन गेलो होतो.

भरपुर फोटोजनी सजलेला उत्तम लेख 👍
वर म्हंट्ल्या प्रमाणे अनवट स्थळांची भटकंती आवडली!

मंदिर फारसे प्रसिद्ध नसावे. आम्ही एक तासभर तरी मंदिरात होतो, ह्या वेळात मंदिर पहायला आलेली फक्त ७/८ माणसेच आम्हाला दिसली.

कमाल आहे!
इतके सुंदर कोरिवकाम असलेले प्राचिन मंदिर असे अप्रसिद्ध कसे काय राहिले असावे हा प्रश्न पडला.

तुषार काळभोर's picture

13 Nov 2023 - 7:31 pm | तुषार काळभोर

मध्यप्रदेश तसं सामान्य पर्यटकांच्या बकेट लिस्ट मध्ये अपवादानेच असतं.
हा लेख याला तडा देणारा आहे. भरपूर फोटोंमुळे लेख वाचायला मजा आली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Nov 2023 - 8:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

भित्तीचित्रे बघुन भीमबेटका आठवले.

धर्मराजेश्वर मंदीरही सुंदर दिसत आहे. कळसावर आमलक आहे , पण त्याखाली कळसाचा उतार फांसना शैलीतील आहे किवा कसे? कॉलिंग प्रचेतस.

हिंगलाज गढ किल्ल्यावरुन दिसणारे जंगल महाबळेश्वरच्या कुठल्यातरी पॉईंटवरुन सेम टू सेम दिसते. नाव विसरलो.

गोरगावलेकर's picture

17 Nov 2023 - 1:56 pm | गोरगावलेकर

सुंदर प्रवास वर्णन आणि सुरेख फोटो.
त्यात मध्यप्रदेश हे राज्य असं आहे की कितीही भेटी दिल्यात तरी त्या कमीच पडाव्यात.
खरंच. दोन छोट्या सहली झाल्या आहेत मध्यप्रदेशच्या (कान्हा आणि पंचमढी) तरी अजून काहीच पहिले नाही असे वाटते.

सुंदर आणि तपशीलवार प्रवास वर्णन !

मित्रहो's picture

22 Nov 2023 - 1:14 pm | मित्रहो

अनवट जागा मस्त वर्णन तेही खरे उगाचच सर्व चांगले आहे असे नाही तर इथे आता फार काही उरले नाही ही टिपण्णी आवडली.

कुठलाही महामार्ग निवडा आणि त्याचा १०० वर्षांचा इतिहास पहा - तो 'बनून तयार' ह्या अवस्थेपेक्षा 'बनतो आहे' ह्या अवस्थेत जास्त दिवस राहिलेला दिसेल

हे खरे आहे कदाचित साऱ्या भारताला लागू होईल. आपण विकसनशील आहोत विकसित नाही याचीच जाणीव करुन देत असते.

प्रचेतस's picture

24 Nov 2023 - 10:10 am | प्रचेतस

वर्णन आणि फोटो आवडले.
धर्मराजेश्वर मंदिर उत्तर भारतीय नागर शैलीची दिसताहेत. चतुर्भुज नाला खूप आवडला. आमच्या बदामीजवळच्या सिदला फडीच्या सफरीची आठवण झाली. खूप सुंदर.
होळकर छत्रीतल्या वस्तुसंग्रहालयातल्या अंबिका, महावीर, पार्श्वनाथ मूर्ती नजाकतीने कोरलेल्या आहेत.

चौथा कोनाडा's picture

19 Dec 2023 - 5:56 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम सुंदर आणि तपशीलवार प्रवास वर्णन !
234NCL456
या ठिकाणांबद्दल प्रथमच वाचण्यात आले त्यामुळे तुमची भटकंती विशेष वाटली मला.
दाल बाटी, लेणी, शिखरे, गुहा, पाषाण, मार्ग, गुहा चित्रकला, निसर्ग इत्यादि फोटो जबरदस्त !

एक नंबर धागा !

श्वेता व्यास's picture

20 Dec 2023 - 4:22 pm | श्वेता व्यास

वेगळ्या माहिती नसलेल्या ठिकाणांची ओळख आवडली.
रॉक पेंटिंग खरोखर छान दिसत आहेत.

एक_वात्रट's picture

21 Dec 2023 - 7:49 pm | एक_वात्रट

प्रतिसाद देणा-या सगळ्यांना धन्यवाद.

टर्मीनेटर: ही मंदिरे भारत सोडा, मध्यप्रदेश सोडा, ज्या जिल्ह्यात ही मंदिरे आहेत त्या जिल्ह्यातील लोकांनातरी माहीत असतील की नाही, मला शंका वाटते! अशी अजून किती गुपिते ह्या देशाने आपल्या पोटात दडवून ठेवली आहेत काय माहीत!