पावसाळ्यामधील कोकणाचं सौंदर्य आजवर अनेकांच्या लेखातून, कवितेतून फोटोंमधून व्यक्त झालेलं आहे. त्यामुळे त्यात जरी नावीन्य नसलं, तरी मला मात्र ते अगदी पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं. गेल्या फेब्रुवारीतच खरं तर जाणार होतो. पण काही कारणास्तव नाही जाता आलं. त्यामुळे यावेळी उत्साह अजूनच वाढला होता. नुकताच गणेशोत्सव होऊन गेला असल्यामुळे गर्दी फारशी नसेल हा अंदाज जरी खरा ठरला तरी पावसाचा अंदाज मात्र साफ चुकला. पनवेल वरून रात्रीची गाडी पकडून आम्ही सकाळी सहा वाजता कुडाळ स्टेशनवर पोहोचलो. गाडी बाहेर पडल्यावर पावसाने मनसोक्त भिजवत स्वागत केले. कुडाळ स्टेशन वरून रिक्षा पकडून आम्ही मालवण येथील ओझर तिठा येथे पोहोचलो. बॅगा टाकून, आंघोळ नाश्ता वगैरे उरकून आम्ही पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. पहिला पडाव होता तो मालवणच्या उत्तरेला चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले आणि गड नदीच्या मार्गात वसलेले पाणखोल जुवा हे गाव. तिथे अर्थातच बोटीतून जावे लागते. बोटीतून जाताना पाऊस पडत असल्यामुळे थोडी भीती जाणवत होती. समोरच्या तीरावर सुखरूपपणे उतरल्यानंतर आणि बेटावर पाऊल टाकल्यावर त्या जागेचा वेगळेपणा जाणवला. चोहो बाजूंनी वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, आसपासची गर्द हिरवी झाडी, त्या झाडांवर पावसापासून आसरा घेणाऱ्या असंख्य पक्षांची चाललेली गुंजारव ऐकत, गर्द झाडांमधूनच गावाकडे गेलेली अरुंद निसरड्या पायवाटेवरुन, चालताना खूप प्रसन्न वाटत होते. आकाशात ढगांची एवढी दाटी झाली होती दिवसाढवळ्या एक हिरवट अंधार पसरला होता. बेटावर फिरताना तिथल्या गावकऱ्यांनी अनेकदा निसरड्या वाटेवरून सांभाळून चालण्याचा सल्ला दिला. तासभर बेटावर मनसोक्त फिरल्यावर आम्ही परतलो. तिथून पुढे तळाशील बीचवर जाताना वाटेत मसुरे गावात थांबलो आणि गड नदीच्या काठावर बसून पडणाऱ्या पावसाला बघत थोडा वेळ विसावा घेतला. तळाशील बीचवर जेव्हा पोहोचलो तेव्हा पाऊसही जोरात पडायला लागला होता. तसेच पावसात भिजत बीचवर छान फेरफटका मारण्यात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही.
दुसऱ्या दिवशी निवतीला जायचं होतं. सकाळी ओझर तिठ्याजवळ असलेल्या एका गुहेत स्थित असणाऱ्या ब्रह्मानंद स्वामी महाराजांची समाधी बघायला गेलो. पाऊस अजूनही पडतच होता. त्या समाधीला जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मोठाले वृक्ष आहेत. वातावरणात चांगलीच थंडी पसरली होती. असे असले तरीही तिथे एक पाण्याचे कुंड होते ज्यामधले पाणी चक्क गरम लागत होते. काय आश्चर्य! निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे समाधी स्थान अतिशय सुंदर आणि मन उल्हसित करणारे आहे.
निवतीला जाण्याअगोदर सर्जेकोट बंदरावर जायचं ठरवलं. बंदरावर पोहोचलो तेव्हा वाऱ्याने एवढा जोर धरला होता की बंदरालगत उभ्या असलेल्या होड्या अक्षरशः गदागदा हलत होत्या. आपापल्या नौकांना स्थिर करण्यासाठी नावाड्यांची चाललेली धडपड बघून त्यांचं खूप कौतुक वाटलं. जवळ असलेल्या पठारावर थोडं चढून गेल्यावर समुद्राचं खवळलेलं रौद्रभीषण रूप बघून मनात धडकी बसल्याशिवाय राहिली नाही.
मालवण वरून निवतीला जाताना आधी धामापूर आणि वालावल येथील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थळांना भेट द्यायचं ठरवलं. जसा पाऊस कधी तीव्र कधी मध्यम स्वरूपात पडत होता, तसा रस्ता सुद्धा कधी तीव्र उताराचा कधी डोंगराळ भागातून तर कधी रानामधून आणि कधी कधी समुद्राच्या अगदी जवळून जाऊन कोकणाच्या निसर्गाची विविध रूपं दाखवत होता. धामापूरचा तळ्याच्या काठी वसलेलं भगवती मंदिर आणि तसेच वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिर बघितल्यावर खरंच स्वप्नातल्या गावात आल्यासारखं वाटलं. वालावलच्या लक्ष्मी नारायण मंदिराच्या जवळच तळ्याच्या काठाशी एक औदुंबराचे झाड आहे. त्याच्या पारावार बसून मंदिराच्या आसपासच्या परिसराचा आणि तिथल्या प्रसन्न वातावरणाचा घेतलेला अनुभव हा भाग्याचा क्षण म्हणावा लागेल.
वालावलवरून आम्ही निवती बीचवर जाणार होतो. त्याआधी किल्ले निवतीवर चढून गेलो. तिथे किल्ल्यावर पोहोचल्यावर वारा एवढा जोराचा वाहत होता की वाऱ्याबरोबर उडून जातोय की काय अशी भीती सतत जाणवत होती. किल्ल्यावरून निवती बीच, खोल समुद्रात उभ असलेलं निवती दीपगृह, आणि निवती गोल्डन रॉक्स यांचे विहंगम दृश्य दिसतं. दूर समुद्रात सूर्याच्या उन्हाचे कवडसे अधूनमधून खालच्या पाण्यावर पडत होते. ढगांबरोबर आणि वाऱ्याबरोबर ते कवडसे सुद्धा किनाऱ्याकडे सरकत होते. किनाऱ्यालगत समुद्री घार आणि इतर शिकारी पक्षी वाऱ्यासोबत उडण्याची कसरत करून खाली भक्ष्याचा वेध घेत होते. किल्ले निवती वरून खाली पोहोचेपर्यंत संध्याकाळ होत आली होती.
निवती बीचवरच्या एका बीच रिसॉर्टवर आम्ही राहणार होतो. या बीच रिसॉर्टवर राहायला उत्तम टेंट्स उपलब्ध आहेत. ही जागा थोडीशी दुर्गम असल्याकारणाने तारकर्ली, आचरा किंवा देवबाग बीचवर होते तशी गर्दी नव्हती. बॅग्स वगैरे टाकून आणि फ्रेश होऊन फिकट होत चाललेला संधी प्रकाश बघत बसलो. रात्री गावातच जेवणाचा फक्कड बेत होता. रात्रीच्या पावसात आणि अंधारात मोबाईलचा टॉर्च लावून आणि थोडं ट्रेकिंग करून आम्ही गावात एका घरी जेवणासाठी गेलो. संध्याकाळी गावातल्याच पारंपरिक मच्छिमार बांधवांनी पकडलेल्या माशाचं कालवण, तळलेले मासे, आणि गरम गरम भात जेवताना बोरकरांच्या कवितेतल्या या ओळी आठवल्या शिवाय राहिल्या नाहीत.
दिवसभरी श्रम करीत राहावे
तिखट कढीने जेवून घ्यावे
मासोळीचा सेवित स्वाद दुणा II
दुसऱ्या दिवशी सकाळी जवळच असलेल्या कोंडुरा बीचवर भटकंतीसाठी गेलो. आज आकाश मोकळं दिसत होतं. इतके दिवस ढगांच्या आड लपलेल्या सूर्यनारायणाने आज दर्शन दिलं होतं. त्यामुळे वातावरणात एक नवा उत्साह निर्माण झाला होता. गेले काही दिवस थांबलेली मासेमारी सुद्धा आज काहीशी चालू झालेली दिसली. कोंडुरा बीचवर समुद्रकिनारी असलेल्या काळ्या कातळावर धडकणार्या लाटा बघताना गंमत वाटली. या आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेऊन आम्ही दुपारपर्यंत निवतीला परत आलो याचं कारण आता पारंपारिक पद्धतीने करण्यात येणारी मासेमारी, म्हणजेच "रापण" बघायला जायचं होतं. जेवण आटपून आम्ही चार वाजेपर्यंत बीचवर पोहोचलो तेव्हा रापणासाठी कोळी बांधव सज्ज झाले होते. हा अनुभव घ्यायला प्रत्यक्षात तिथे जाऊनच एकदा बघायला हवं. संध्याकाळी जवळच्या प्रसिद्ध अशा "निवती रॉक्स" किंवा "निवती गोल्डन रॉक्स" वर चढून एका जागी थांबून रापण बघत बसलो. मोठं विलोभनीय असं दृश्य. खूप दिवसांनी असा अविस्मरणीय अनुभव मिळाला.
चौथ्या व शेवटच्या दिवशी निवती बीचवरून चेक आउट करून वेंगुर्ल्याला जायला निघालो. सर्वप्रथम, वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसला जायचं ठरवलं. मनात थोडी शंका होती की लाईट हाऊस बघायला आज सोडतील की नाही. पण तिथे गेल्यावर नशिबाने आम्हाला प्रवेश मिळाला. समुद्राच्या लागून असलेल्या एका पठारावरच्या टोकावर लाईट हाऊस उभारण्यात आलेलं आहे. जीने चढून वर गेल्यावर आम्हाला एक भारावून टाकणार दृश्य दिसलं. विस्तीर्ण पसरलेला अथांग समुद्र, पश्चिमेकडून वाऱ्याशी स्पर्धा करत येणारे ढग, निळसर आकाश आणि त्या आकाशाचा निळा रंग पळवून निळं झालेलं समुद्राचे पाणी मोठ्या दिमाखात सूर्याचं ऊन पडून चमकत होतं. या अद्भुत देखाव्याचा आस्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो.
वेंगुर्लाच्या आसपास फिरता येण्यासारखं बरंच काही आहे. परंतु आज शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही मोजक्या जागांना भेट द्यायचं ठरवलं. वेंगुर्ले शहरात स्थित असलेल्या डच वखार या स्थळाकडे गेलो. १६६५ साली बांधलेल्या या वखारीचे आता फक्त भग्नावस्थेतले अवशेष शिल्लक आहेत. या परिसरातले मोठ मोठाले वृक्ष, आजूबाजूला वाढलेली झाडं झुडपं आणि त्यातून चाललेली असंख्य कीटकांची किर्र ... किर्र...... , यातून एक गूढ वातावरण तयार झालं होतं. वखारीच्या प्रवेशाजवळच एक मोठाला वृक्ष दिसला. त्याच्या विस्तीर्ण पसरलेल्या फांद्या आणि खालपर्यंत आलेल्या पारंब्या त्याच्या प्राचीन अस्तित्वाच्या खुणा सांगत होत्या. न जाणो भूतकाळाच्या कित्येक घटनांचा तो प्राचीन वृक्ष साक्षीदार असेल.
दुपारचं जेवण आम्ही वेंगुर्ल्याच्याच प्रसिद्ध रेडकर बंधू भोजनालयात जेवून अगदी तृप्त होऊन बाहेर पडलो. संध्याकाळी रेडीच्या किल्ल्यावर जायचं ठरवलं. वेंगुर्ल्यावरून रेडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच श्री वेतोबा देवस्थान आहे. भुताखेतांपासून आणि इतर वाईट शक्तींपासून गावाची आणि गावकऱ्यांची राखण करणाऱ्या या क्षेत्रपाल देवाबद्दल मनात उत्सुकता होती. त्याचं दर्शन घेण्याचा योग एकदाचा या सहलीनिमित्त घडून आला. आरवली गावात स्थित हे वेतोबाचं मंदिर खूप देखणे आहे.
वेतोबाचं दर्शन घेऊन पुढे रेडी गावातल्या रेडीच्या किल्ल्यावर गेलो. या किल्ल्याचे अधिकृत नाव यशवंतगड हे आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी पार्क करून किल्ल्यावर पायी जाता येतं. किल्ल्याची तटबंदी आणि मुख्य किल्ला यामध्ये एक खोल खंदक बांधण्यात आलेला पाहायला मिळतो. किल्ल्यावर पोहोचल्यावर आपल्याला त्या काळात बांधण्यात आलेल्या खोल्यांचे अवशेष बघायला मिळतात. या खोल्यांच्या भिंतीवर आता मोठाले वृक्ष आणि वेली वाढलेल्या दिसतात. या वृक्षांची मुळे अगदी भिंतीमधून आरपार खोलवर गेलेली आहेत. एकंदरीत किल्ल्याचे बांधकाम अजूनही भक्कम अवस्थेत आहे. किल्ल्याच्या रचनेमध्ये संरक्षणाला मुख्यत्वे प्राधान्य दिले गेले असल्याचे जाणवते. किल्ल्यावर आल्यावर एका पायवाटेने बुरुजावरून चालत किल्ल्याच्या टोकाशी पोहोचल्यावर आपल्याला रेडीची खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमाचे एक विहंगम दृश्य पाहायला मिळते. सूर्य आता पश्चिमेला झुकला होता. सूर्यास्त बघायला आम्ही जवळच असलेल्या तेरेखोल किल्ल्यावर गेलो. हा किल्ला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे सुस्थितीत आहे. किल्ल्यावर हेरिटेज हॉटेल सुद्धा बांधण्यात आलेले असल्यामुळे राहण्याची उत्तम सोय आहे. येथे एक रेस्टॉरंटही आहे. तिथेच बसून थंड पेय पित समोरच्या सूर्यास्ताचा देखावा बघत राहिलो. समोर गोव्याच्या भूमीचे सुद्धा दर्शन घडत होते. तेरेखोल किल्ला हा तेरेखोल नदीच्या एका बाजूला स्थित आहे. पलीकडे गोव्याचा क्वेरीम बीच दिसतो. अस्ताला चाललेल्या सूर्याची किरणे समोरच्या किनाऱ्यावरील वाळूला सोनेरी मुलामा दिल्यासारखी भासत होती.
हे सगळे प्रत्यक्षात अनुभवताना आणि घरी आल्यावर पुन्हा पुन्हा आठवताना परत एकदा बोरकरांच्याच एका कवितेतल्या या ओळी डोळ्यासमोर आल्या.
भेटी जे जे त्यात भरे
अशी लावण्याची जत्रा |
भाग्य केवढे आपुले,
आपुली चाले यातूनच यात्रा ||
आपुली चाले यातूनच यात्रा ||
प्रतिक्रिया
12 Nov 2023 - 6:14 pm | कर्नलतपस्वी
पावसाळ्यात कोकण दर्शन एक वेगळाच अनुभव असतो.
भन्नाट भटकंती.
12 Nov 2023 - 9:01 pm | गोरगावलेकर
सुंदर भटकंती आणि प्रवास वर्णन.
माझ्या तळकोंकन भेटीतील निवती, वेंगुर्ला, रेडीचा गणपती, वेतोबा,तेरेखोल किल्ला नजरेसमोर उभा राहिला. बाकी ठिकानांकरिता परत जावे लागणार असे दिसते
13 Nov 2023 - 11:06 am | अथांग आकाश
आनंदयात्रा आवडली!
13 Nov 2023 - 1:42 pm | तुषार काळभोर
आपण जोपर्यंत कोकण प्रवासाविषयी फक्त ऐकतो, तेव्हा विशेष असं काही वाटत नाही. पण एकदा कोकणात गेलो, की कोकण आपल्याला प्रेमात पाडतो. पुन्हा पुन्हा जाऊन अनुभवावा असा प्रदेश आहे!
13 Nov 2023 - 6:37 pm | टर्मीनेटर
छान लेख आणि फोटोज 👍
कोकण, तळ कोकणात फिरण्याची मजाच वेगळी...
16 Nov 2023 - 7:55 pm | राजेंद्र मेहेंदळे
प्रवास वर्णन अणि फोटोज दोन्ही मस्त. चांदण्यातील तंबूचा फोटो विशेष आवडला.
कोकण भटकंतीमधील माझे एक स्वप्न आहे. अशा हॉटेलात रहायचे जिथे बेडवर पडल्या पडल्या समुद्र दिसत रहायला हवा. माहितेय का कोणाला असे ठिकाण?
16 Nov 2023 - 8:06 pm | गवि
०. क्युबा अगोंद, अगोंद, गोवा
१. बोगमालो बीच रिसॉर्ट, बोगमालो, गोवा
२. फोर्ट तेरेखोल हॉटेल (रूम टाइप निवडून घ्यावा लागेल)
३. हॉटेल गजाली वेंगुर्ला. (पॉश नाही पण लोकेशन आणि व्ह्यू.
समुद्रात सूर्योदय पाहणे शक्य )
४. कोहिनूर रिसॉर्ट, रत्नागिरी
५. अभिषेक रिसॉर्ट, भंडारपुळे
६. यू टॅन रिसॉर्ट, उत्तन
७. सिदाद दि दमण, देवका बीच रोड, नानी दमण.
हे सर्व अगदी बेडमधून समुद्र थेट.
बाकी नुसते कोणत्या तरी एका कोपऱ्यातून सी व्यू बरेच असतात.
17 Nov 2023 - 8:19 am | राजेंद्र मेहेंदळे
ईतकी सगळी ठिकाणे सुचविल्याबद्दल!!
एक शंका- आपण पश्चिम किनार्पट्टीवर असताना समुद्रात सुर्योदय कसा पाहणार?
17 Nov 2023 - 8:26 am | गवि
तीच तर मज्ज्या आहे त्या जागेची. :-)
17 Nov 2023 - 9:43 am | कर्नलतपस्वी
कन्याकुमारी इतका सुंदर कुठेच अनुभवला नाही.
16 Nov 2023 - 8:34 pm | Bhakti
क्या बात ! मस्तच.वाखू साठवले.कोकण भटकंतीत नक्कीच हा धागा उपयोगी होणार.
3 Dec 2023 - 11:47 am | प्रचेतस
कोंकण सुंदरच आहे आणि त्यात तळकोकण अधिकच सुरेख. कितीहीवेळा इथं फिरलं तरी तृप्ती कशी ती होत नाही.
10 Dec 2023 - 10:36 pm | चौथा कोनाडा
एकदम भारी प्रवास वर्णन आणि फोटो !
अगदी ओघवती माहिती !
छोटे छोटे तपशील दिल्याने तुमच्या बरोबरच प्रवास करत आहे असे वाटले !
मालवण, निवती, वेंगुर्ले सहल करायची असेल तर हाच धागा पाहणार !
मालवण, निवती, वेंगुर्लेची भन्नाट ट्रिप घडवल्याबद्दल धन्यवाद, क्षितिज जयकर
19 Dec 2023 - 1:31 pm | श्वेता व्यास
मालवण, निवती, वेंगुर्ले भटकंतीचा तुमचा अनुभव वाचताना मजा आली.
कधीतरी पावसातही जायला पाहिजे असं वाटतंय.