विश्वचषकाला गवसणी घालताना ....

kvponkshe's picture
kvponkshe in काथ्याकूट
6 Nov 2023 - 10:43 am
गाभा: 

हा मोठा का तो मोठा हा प्रश्न सध्या गौण आहे.

या विश्व चषकात सलग आठ धडाकेबाज विजयानंतर आपण सगळे भारतीय जोशात आहोत. सगळ्या मॅचेस भारताने जवळपास एकतर्फी जिंकल्या आहेत. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सगळ्यात भारतीय संघ कामगिरी उत्तम करतोय. सेमी फायनल मध्ये भारताचे स्थान निश्चित आहे.

आणि हीच वेळ आहे विश्वचषकाच्या गगनाला गवसणी घालताना आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवायची.

कदाचित माझ म्हणणं नकारात्मक वाटेल. पण हे सगळं इथे सांगायचे कारण म्हणजे विजयांपेक्षा आपल्याला पराभव खूप काही शिकवून जातात हे आहे.

२०१९ चा वर्ल्ड कप आठवतोय ?
तेव्हाही भारतीय संघ आजच्या सारखाच फॉर्मात होता. विजया मागून विजय मिळवत तो सेमी फायनल ला आला. आणि ९ जुलै २०१९ ला सेमी फायनल मध्ये न्यूझीलंड ला भारतीय गोलंदाजांनी २३८ धावात रोखले. त्याकाळचा फलंदाजीचा फॉर्म बघता हे आव्हान भारत सहज पार करेल असा सगळ्यांचा कयास होता. पण न्यूझीलंड ची फलंदाजी झाली आणि पाऊस सुरु झाला. परिणामी सामना दुसऱ्या दिवसावर ढकलला पण आहे त्याच स्थितीतून.

जडेजा, धोनि, पंड्या आणि पंत हेच फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकले. बाकीची भक्कम फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली आणि आपण स्पर्धेतून बाहेर झालो. मला नक्की ठाऊक नाही पण विकेट पडलेली असताना नो बॉल मुले ती फलद्रुप झाली नाही तो हाच सामना असावा.

२००३ चा वर्ल्ड कप आठवतोय ?

या वेळीही भारतीय संघ बऱ्यापैकी फॉर्मात होता. सचिन तर खूपच बहरात होता. फायनल ला गाठ बलाढ्य ऑस्ट्रेलिया शी होती. सचिन असताना चषक जिंकायचाच या ध्येयाने झहीर खान , श्रीनाथ यांनी पिसाटल्यासारखी गोलंदाजी सुरु केली. पण पण ऑसी फलंदाज गिलख्रिस्ट, हेडन आणि यानंतर मग पॉईंटिंग आणि मार्टिन यांनी भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. ३५९ धावांचा पाठलाग सोपा नव्हता, आणि करोडो भारतीयांची मने मोडून, हृदयाला अक्षरशः अपमानास्पद पराभवाची भोके पाडून तो कटू दिवस संपला.

१९९६ चा कप आठवतोय?

श्रीलंकेचे जयसूर्या आणि कालुवितरण यांच्या फलंदाजीच्या एका नवीनच शैलीचा उगम बहुदा या विश्वचषकात झाला. वेस्ट इंडिज, पाकिस्तान यांचा पराभव करून भारत सेमी फायनल मध्ये कसाबसा पोहोचला. पण पाक विरुद्धच्या विजयाने संघात एक वेगळाच जोश आला होता. चषक आता लांब नाही असं माझ्या सहित सगळ्यांनाच वाटत होत. सामना सुरु झाला आणि जयसूर्या , कालुवितरण आणि गुरुसिंघे हे फलंदाज १ आणि ० धावात परतले. लंकेला भारताने २५१ धावांत रोखले. लंकेचा त्यावेळचा फॉर्म बघता ही धावसंख्या बरीच कमी होती.

भारताचा डाव सुरु झाल्यावर हे २५१ रन्स भारत सहज काढेल असा सगळ्यांना विश्वास होता. पण ८ धावांवर सिद्धू आउट झाला. पुढे मांजरेकर आणि सचिन ने डाव सुरु केला आणि १ बाद ८ वरून १ बाद ९८ अशा अत्यंत समाधानकारक स्थितीत संघाला आणून ठेवले.

पण २३व्या षटकाच्या ३ऱ्या चेंडूवर भूकंप व्हावा आणि भक्कम इमारती पत्त्यासारख्या कोसळाव्यात तसे घडले. सचिन धावचीत झाला. आणि बघता बघता फलंदाजांची आउट होण्याची जणू स्पर्धा लागली. पुढील १ बाद ९८ वरून ८ बाद १२० अशी लांडगेतोड भारतीय फलंदाजीची झाली. असा एकतर्फी पराभव कोलकाता मधील ईडन गार्डन च्या प्रेक्षकांना सहन झाला नाही. त्यांनी गोंधळ सुरु केला आणि शेवटी सामना लंकेला बहाल केला गेला. भारताचे स्वप्न चक्काचूर झाले. विनोद कांबळी रडत रडत पॅव्हेलियन मध्ये जाताना पाहून माझ्या सारख्या अनेकांना तेव्हा अश्रू अनावर झाले.

असो. पराभवाची कहाणी आता बास करू.

२०१९ ला आपल्याला हरवणाऱ्या न्यूझीलंड ला आपण गेल्या २२ ऑक्टॉबर ला धूळ चारलीये.

२००३ ला हरवणाऱ्या ऑसिना आपण २०११ आणि २००३ ला लीलया लोळवलंय.

१९९६ मध्ये आपल्याला हरवणाऱ्या लंकेच्या आपण परवाच चिंधड्या चिंधड्या केल्यात.

२०११ मध्ये तर आपण चषक जिंकलाय.

आता फक्त गरज आहे ती,

१. ऐनवेळी अवसानघात आणि हाराकिरी न करण्याची.
२. विजगीषु वृत्ती कायम ठेवण्याची.
३. भावनेच्या भरात आततायी पणा न करता शांत आणि क्रूर डोक्याने प्रतिस्पर्ध्याचा खातमा करण्याची.
४. संघातील प्रत्येकानी अष्टपैलू आणि सर्वोत्तम खेळ करण्याची.
५. आणि कोणत्याही परिस्थितीत विजय खेचून आणण्याची.

चला तर मग तयारी करू १९ नोव्हेंबर ला पुन्हा दिवाळी साजरी करण्याची !

कौस्तुभ पोंक्षे