दिवाळी अंक २०२३ - पेठ (आंबेगाव) ते वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am

पेठ (आंबेगाव) हे सातगाव पठारमध्ये मोडणारे, मंचरजवळचे एक टुमदार गाव. मंचरच्या पुढे भीमाशंकरसाठी डोंगराळ भाग चढून गेले की पठार लागते. इथे सात गावे आहेत, म्हणून या भागाला सातगाव पठार असे म्हटले जाते. ही गावे शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. हा भाग म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण बटाट्याचे आगार समजले जाते. या बटाट्यापासून चकत्या/काचऱ्या (वेफर्स), कीस, पापड बनवतात, म्हणून भरपूर मागणी असते. या भागातील पेठेचे मुख्य गाव म्हणून पेठ! सुदाम अशाच एका शेतकरी घरातला मुलगा. वय १०-१२ वर्षे. पाचवी-सहावीत असेल. शाळेत जाणे, घरी आणि शेतीत मदत करणे, सवंगड्याबरोबर हुंदडणे असे बालपण चाललेले. त्याची नजर वेगळीच होती, त्याला नेहमी काही ना काही वेगळंच दिसत असायचं, जे इतरांना दिसायचं नाही. एक दिवस शाळेतून परतत असताना घराजवळच्या बांधावर एका दगडात अचानक काही तरी गवसलं. सुदाम नंतर तो दगड घरी घेऊन आला. आई सकाळीच पुण्याला नातेवाइकांकडे गेली होती. याला रान मोकळंच मिळालं. घरातच असलेली छिन्नी हातोडी घेतली आणि सुरू केले त्या दगडावर कोरायला.

STONE123
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://live.staticflickr.com/65535/53306497794_679312f156_c.jpg

त्याला त्या दगडात विठोबा गवसला होता. एक-दोन दिवस त्यावर कोरत राहिला, विठोबाची मूर्ती पूर्ण होत आली होती. एक दिवस आई पुण्याहून परतली. सुदाम अभ्यास सोडून हे असं दगडाशी खेळत बसलाय, घरभर दगडांच्या कातळा पडलेल्या. आई चिडली आणि त्याला ओरडली. सुदाम म्हणाला "आई मी विठोबाची मुर्ती कोरतोय" आईने काही एक ऐकले नाही. त्याच्या पाठीत धपाटे घालत बदडलं ! अर्धवट कोरलेली मूर्ती एका कोपऱ्यात ठेवायला लावली. बिचारा लहानगा सुदाम हिरमुसला होऊन बसला !

CARVING5768
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://live.staticflickr.com/65535/53306609960_65cd207824_z.jpg

. . . येता जाता आई तो दगड बघायची, हम्म म्हणत पुढच्या कामाला लागायची. आई महादेवाची भक्त. तिने सोळा सोमवार केले होते. एका रात्री तिला स्वप्न पडलं. स्वप्नात दृष्टांत झाला. त्या अर्धवट कोरलेल्या दगडात एकदा शंकर दिसायचा, एकदा विठोबा दिसायचा. शंकर आणि विठोबा ! हा तर साक्षात्कार झाला: शंकर आणि विठ्ठल काही वेगळा नाही ! सकाळी उठल्यावर अर्धवट कोरलेल्या मुर्तीच्या पाया पडली, त्याची पूजा केली. रोजच पूजा करायला लागली.

एक दिवस सुदामच्या वडिलांनी तो उरलेला वरचा भाग फोडून मोकळा केला, आणि मग विठोबाची मुर्ती पूर्ण झाली !

VITTHAL345
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://live.staticflickr.com/65535/53305268617_c1a1899ab9.jpg

आई रोज संध्याकाळी झाला स्वयंपाक की त्याला नैवेद्य दाखवायची, कधी त्याचा दोन नंबरचा भाऊ विष्णू पण नैवेद्य दाखवायचा. सुदाम तिथेच खेळत असायचा. नंतर सुदाम पण पूजा वगैरे करायला लागला. मगच सगळ्यांच जेवण ! मग सुदाम कधी चित्र काढ, कधी काहीतरी करून बघ, भिंतीवर रंगवून बघ असे उद्योग करत बसायचा. बालपणापासून चित्रकला, मूर्ती तयार करणे, कोरीव काम करणे याचा छंद जडला. लहानपणी हे पोर चित्र-बित्र काढते, काहीतरी मूर्ती तयार करते, दिवाळीत किल्ल्यावरची चित्रं बनवते, गणेशोत्सवात गणपती. आजूबाजूचे लोक बायका त्याच्याकडून गौराईच्या मुखवट्यासार रंगकाम करून घ्यायचे, त्याच्या कलेवर नजाकतीवर बेहद्द खूष व्हायचे आणि त्याला पैसे द्यायचे. घटस्थापनेच्या काळात घरोघरी भिंतीवर वेगवेगळी चित्र काढून घ्यायचे, त्याचे पैसे द्यायचे.

पुढे सुदाम मोठा झाल्यावर, कलाकार म्हणून प्रसिद्ध झाल्यावर एक दिवस सकाळी पंढरपूरला गेला. विठ्ठल रुक्मिणीच्या मोठ्या मूर्ती आणल्या. चौथरा बनवून घेतला आणि त्याच्यावर विठ्ठल रूख्माईची स्थापना केली आणि लहानपणी विठ्ठलाची जी छोटी मूर्ती बनवली होती, ती खालच्या देवळीत स्थानापन्न केली.

विठ्ठलाच्या देवाच्या कृपेने सुदामची कलाकारी वाढत गेली, बहरत केली ! आजही तुम्ही जर खडकी मध्ये मानाजी बाग इथे गेलात तर तिथे मोठे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, त्याने लहानपणी कोरलेली ती विठ्ठलाची मूर्ती आजही इथे बघायला मिळेल. दोन्ही मूर्तींची पूजा आजूबाजूच्या बायका, माणसं करू लागली. तेव्हापासून दरवर्षी काल्याचा मोठा उत्सव असतो आणि लोक सुदामला आवर्जून बोलावतात.

सुदाम मार्च १९७२ साली मॅट्रिक (जुनी अकरावी) झाला. 71 ते 74 मोठा दुष्काळाचा काळ होता. अतिशय कठीण परिस्थिती होती. वडीलही गावाहून पुण्यात येऊन खडकीच्या अ‍ॅम्युनेशन कारखान्यात नोकरीला लागले. कलेमध्ये गती असल्यामुळे सुदामने आर्ट फाउंडेशनच्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचे ठरवले. कर्वे रोडला पतंगराव कदम यांचे आर्ट कॉलेज नवीनच सुरू झाले होते. फाउंडेशन कोर्सची त्यावर्षी पहिली बॅच सुरू झाली. तिथं सुदामची निवड झाली. त्याला शिकवायला “पंढरीची वारी” सिनेमा फेम रमाकांत कवठेकर हे शिकवायला होते आणि सुदाम त्यांचा पहिल्या नंबरात असणारा लाडका विद्यार्थी !

PADHARICHIWARI
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://live.staticflickr.com/65535/53306468011_26c0cb2d44_z.jpg

त्यावेळी खडकीत राहत असताना सुदाम कलाकार आहे हे समजल्यावर त्याला डेकोरेशन वगैरे करायला आजूबाजूचे लोक बोलवायला लागले. तिथं चिंतलवार नावाचे भारदस्त व्यक्तिमत्व असलेले कार्यकर्ते होते मित्रमंडळी सुदामला त्यांच्याकडे घेऊन गेली. ते म्हणाले “ करशील का डेकोरेशन? " सुदाम आत्मविश्वासाने उत्तरला “ सर, मला संधी दिली तर मी खडकी, दापोडी, बोपोडी सगळ्या एरियात पहिल्या नंबरचे डेकोरेशन करीन, पहिला नंबर काढून देईन !”

१९७४ ला या पहिल्या डेकोरेशनसाठी “ सीता अग्नी प्रवेश” हा देखावा तयार केला. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान इ. आकृत्या प्लायवुडमध्ये आकार काढून कट केलेल्या होत्या आणि त्याच्यावर ऑइल पेंटिंग केलेलं. हे प्लायवूड कट करायचं तर पुण्यातल्या मंडईत जायला लागायचं. ते सगळे लांबडे प्लायवुडचे तुकडे टेम्पोत घालून तिकडं नेऊन ते कट करायचे. सीता रचलेल्या चितेवर बसलेली दाखवली होती. त्याच्यासाठी लाकडांच्या ओंडक्यांची उभी-आडवी अशी रचना वैशिष्ट्यपूर्ण केलेली होती. ती सीता अग्नी प्रवेशाची चिता खालून पोकळ केली होती. त्याच्याखाली जिलेटिनचे पिवळे केशरी आणि लाल अशा तीन कलरच्या पट्ट्या लावून त्याला आणि लाईट व फॅन्स लावूनखाल्लं लावून आगीचे ज्वाळा तयार केल्या होत्या. तिथेच जिलेटीनचे बोळे लावले होते ते विस्तवासारखे लाल बुंद दिसायचे, त्या ज्वाळा फडफड फडफड उडायच्या आणि तो प्रकार एवढा भन्नाट झाला होता की लांबून लोकांनी बघितलं. त्यांना खरंच गणपतीच्या मंडपाला आग लागली की काय असंच वाटलं .. आणि लोक आग विझवायला एकदम धावत पळत आले.. . आणि त्यांना कळले की हे गणपती डेकोरेशन आहे ! एवढं जबरदस्त डेकोरेशन बघून थक्क झाले. खरोखरं भासणार त्या देखाव्याचं, सुदामच्या कलाकारीचं प्रचंड कौतुक झालं !

SITAAGNIPRAVESH
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://live.staticflickr.com/65535/53305268647_69c4a3564a_c.jpg

त्यावर्षी गणपती सजावटीचं पहिलं पारितोषिक मंडळाला मिळाले आणि ते पारितोषिक सुदामला माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मिळालं ! आधुनिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते हा बहुमान स्वीकारणे ही मोठी अभिमानाची गोष्ट होती. तो फोटो वृत्तपत्रात सुद्धा छापून आला होता. सुदामच्या कलाकारीचा मोठा बोलबाला झाला. तेव्हा सुदामाचे वय होतं फक्त १९ वर्ष !

त्याच वर्षी एनसीएल म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी भेट देणार होत्या. त्या वेळेला नवीन तंत्रज्ञानावर एक मोठं प्रदर्शन भरवायचं होतं. काही कलाकृती आणि चार्ट बनवायचे होते. इंदिराजींच्या भेट समारंभासाठी सी. एच. पाटील म्हणून आर्टिस्ट संयोजक होते. ते ह्या आर्ट कॉलेजला आले आणि कॉलेजकडे “ दोन चांगले आर्टिस्ट हवेत “ अशी मागणी केली. मग अर्थातच सर्वप्रथम सुदामची आणि त्याचा सहकारी बुंदेल याची निवड झाली.

Image : https://www.ncl-india.org/images/AboutNCL/ProfileBanner.png
(प्रचि आंजावरून साभार)

Image : https://www.ncl-india.org/images/AboutNCL/ProfileBanner.png

रोज सकाळी सायकलवर एनसीएलला जायचं, तिथं दिवसभर कलाकृती चार्ट करत बसायचं, संध्याकाळी चार-पाचला परत सायकल काढायची, पाषाण रोड मार्गे चतु:शृंगीला यायचं. तिथून सेनापती बापट रोड न पुढे जायचं सिम्बॉयसिसचा तो अवघड घाट सायकल हापसत पार करायचं, कधी कधी सायकल वरून उतरून पायी चालायला लागायचं मग कर्वे रोडला आर्ट कॉलेजला पोहोचायचं आणि मुख्य म्हणजे कॉलेज संपायच्या आत पोहोचायचं आणि मग बाकीच्या मुलांना विचारायचं “आज काय काय शिकवलं ? काय असाइनमेंट दिली?” आणि मग खडकीला घरी परतून रात्री बारा एक वाजेपर्यंत जाऊन ती असाइनमेंट पूर्ण करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सायकलवर एलसीएलला पोहोचायचं आणि कामात रंगून जायचं ! अशी कसरत जवळजवळ तीन आठवडे केली ! तिथल्या सर्वांनीच त्या कलाकृतीचं तोंड भरून कौतुक केलं.

INDIRAGANDHI
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://live.staticflickr.com/65535/53305268697_f58a0ee62e_c.jpg

ठरलेल्या वेळापत्रकानुसार माननीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी एनसीएलला भेट दिली आणि आनंद, समाधान व्यक्त केलं. त्या काळी सिनेमा थिएटरला मुख्य सिनेमाच्या आधी इंडियन न्यूज रील दाखवायचे. आणि माननीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीला भेट दिली आणि शास्त्रज्ञांची कशी प्रगती चालली याची पाहणी केली, त्यावेळी सुरुवातीला नाव येतात तर त्यात मेन आर्टिस्ट सी. एच. पाटील आणि त्यांच्या खाली सहाय्यक म्हणून सुदामचं आणि बुंदेलचं नाव यायचं तेव्हा असं भारी वाटायचं. ऊर अभिमानाने भरून यायचा आणि मोठ्या पडद्यावर आपलं नाव येतंय याचा प्रचंड आनंद व्हायचा !

त्या दिवाळीला कला विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ग्रीटिंग कार्डसचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनाला झालं. त्यात सुद्धा सुदामने केलेल्या पिंपळावरच्या जाळीच्या पानाचा ग्रीटिंग कार्ड नावाजलं गेलं आणि त्या प्रदर्शनाचा वर्तमानपत्राच्या कव्हरेज म्हणून याच ग्रीटिंग कार्डचा फोटो छापून आला होता. अशा कलाकृतींनी कौतुक होत होते, श्रेयामुळे उत्साह वाढत होता ! प्रसिद्धीने दिवसेंदिवस सुदामची कला बहरत होती.

PIMPALPAN
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://live.staticflickr.com/65535/53306377148_21f823c757_z.jpg

सुदाम आर्ट फाउंडेशनचा कोर्स प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला !

पुढे १९७४ लाअभिनव कला महाविद्यालयात ए.टी.डी. कोर्सला ऍडमिशन मिळाली. चित्रकार दिवाकर डेंगळे सर त्याला शिकवायला होते. तिथेही सुदाम पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. पिंपरीतली जयहिंद हायस्कूल ही मोठी आणि नामवंत शाळा दर्जेदार कलाशिक्षकाच्या शोधात होतीच आणि एटीडी मध्ये पहिला आलेला विद्यार्थीच त्यांना शिक्षक म्हणून हवा होता. शोधत शोधत ते सुदाम पर्यंत पोहोचले. तिथल्या काटेकोर चाचणीत सुदामाची कलाशिक्षक म्हणून निवड झाली !

त्यावर्षी किर्लोस्कर कंपनी आयोजित “लकाकी क्लीन स्कूल” या महत्त्वाची स्पर्धेत अतिशय स्वच्छ शाळा असून सुद्धा जय हिंद हायस्कूलला पारितोषिक मिळू शकले नाही. कारण दुसऱ्या एका शाळेत त्यांच्या कलाशिक्षकाने गेटवे ऑफ इंडियाची खूप छान प्रतिकृती तयार करून शाळेत ठेवली होती. त्याचं विशेष इम्प्रेशन परीक्षकांवर पडलं आणि ते पहिलं पारितोषिक त्या शाळेला मिळाला मिळालं. हे पाहून जयहिंद हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी कलाशिक्षकांच्या मदतीने अशीच एखादी कलाकृती करायची असा घाट घातला. सुदाम नुकताच कलाशिक्षक म्हणून लागलेला. त्याने हे काम पुढे येऊन आव्हान म्हणून स्वीकारलं, आणि ते शिवधनुष्य पेललं ही ! थर्माकोल पासून ताजमहालाची प्रतिकृती करायला घेतली. स्वतः भोसरी एमआयडीसीत साऊंड थर्माकोलच्या कारखान्यात जाऊन थर्माकोल शीट्स आणि इतर साहित्य आणलं आणि कामाला लागला. मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून दिवसभर विद्यार्थ्यांना कला शिकवायचची आणि शाळा संपली की तिथल्याच हॉलमध्ये थांबून ती कलाकृती तयार करायची !

सुदामचे कष्ट आणि निश्चय पाहून मुख्याध्यापकांनी त्याला मोठा पाठिंबा दिला. त्याच्या जेवणा-खाण्याची, जाण्या येण्याची सर्व सोय लावून दिली ! आणि त्याच्या हातून ताजमहालाची अद्भुत कलाकृती निर्माण झाली ! त्यातलं विशेष करून घुमटाचं काम अतिशय अवघड होतं, पण सुदामनी त्याचं कौशल्य पणाला लावून शीट्स पासून तो घुमट तयार केला होता ( विशेष म्हणजे तो घुमट आत मधून पोकळ केला होता.) ताजमहाल इतका सुंदर बनवला होता की मुख्याध्यापकांची आणि इतर सर्वांची मोठी दाद मिळाली.

TAJMAHAL
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://live.staticflickr.com/65535/53305268717_e36cec4a1b_z.jpg

बालगंधर्वमध्ये शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन होते. त्यावेळी ही ताजमहालाची प्रतिकृती रंगमंचावर ठेवण्यात आली. मंचावर पूर्ण अंधार होता. प्रेक्षागृह खचाखच भरलेले होते. प्रतीकृतीच्या मागून डीमर लाईटचा प्रकाशझोत ताजमहालावर पडायला सुरुवात झाली. हळूहळू पहाटे सूर्य उगवतो तसा प्रकाशझोत वाढत वाढत जाऊन ताज महालाची प्रतिकृती प्रकाश झोताने उजळून गेली. टाळ्या कडकडाट आणि उत्स्फूर्त शिट्ट्यांचा आवाज प्रेक्षागृहात घुमून गेला. कलाकृतीला प्रचंड दाद मिळाली होती ! “शिंदे सर जिंदाबाद” अशा घोषणांनी प्रेक्षागृहा दणाणून गेले होते. शिंदे सरांच्या या अप्रतिम कलाकृतीला उपस्थित त्यांनी मनापासून सलाम केला. सुदाम आता “सुधाकर शिंदे सर” म्हणून लोकप्रिय झाला. या कलाकृतीची भरपूर तारीफ झाली. मास्तरकी करण्यापेक्षा मुंबईला जाऊन फिल्म इंडस्ट्रीत आर्ट डिरेक्टर म्हणून काम करण्याचा सल्ला वजा शिफारस अनेक लोकांनी केली, परंतु कुटुंबीयांसाठी आणि शिक्षणाच्या प्रेमापोटी त्यांनी पुणे न सोडण्याचा निर्णय घेतला.

हे '"सुदाम शिंदे" चा "सुधाकर शिंदे" कसा झाला याचीही एक गंमतच आहे. मॅट्रिकच्या परीक्षेनंतर जे प्रमाणपत्र बनवलं गेलं त्याच्यावर सुदामच्या ऐवजी चुकून "सुधाकर" असं शाळेकडून लिहिलं गेलं. त्यामुळे शिंदे सरांना ही दोन्ही नाव प्रचलित झाली. कुटुंबीय, मित्रमंडळी, विद्यार्थी हे सगळे त्यांना सुदाम म्हणतात, सुदाम सर याच नावाने ओळखतात, याच नावाने लोकप्रिय आहेत. पण कागदोपत्री मात्र सुधाकर शिंदे हेच नाव लावावं लागतं.

पुढच्या वर्षीच्या स्नेहसंमेलनापर्यंत पहिले मुख्याध्यापक रिटायर होऊन नवीन मुख्याध्यापक आले. त्यांच्यापुढे शाळेतील बैठकीत पी. टी. टीचरांनी येत्या स्नेहसंमेलनाला पाहुण्यांचे स्वागत पेशवे पार्क मधील हत्ती आणून करू असं सुचवलं. सर्व उपस्थित हसले. सुधाकर शिंदे सर पुढे येऊन म्हणाले " करुयात. तो हत्ती मी तयार करून देतो. हलता-बोलता-नाचणारा हत्ती !” शिंदे सरांनी आव्हान म्हणून तयार केला. बांबूच्या काड्या, कामट्या वापरून सांगाडा बनवला, सुपाचे कान बनवले. सायकलची ट्यूब वापरून वापरून लवचिक सोंड तयार केली. हत्ती घडताना बघून सहकारी आणि विद्यार्थी उत्साहीत झाले आणि त्यांनीही शिंदे सरांना मदत करण्यासाठी सुरुवात केली. सोंड पाय कान हलवण्यासाठी आत मध्ये बांबू आणि छोट्या पाईप टाकून हत्ती हलता-बोलता-नाचणारा, सोंड हलवणारा हत्ती तयार झाला. भरतनाट्यमला मंदिरला स्नेहसंमेलन झालं आणि ही हत्तीची कलाकृती पाहून उपस्थितांनी प्रचंड दाद दिली.

ELEPHANT789
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://img.freepik.com/free-photo/cute-elephant-studio_23-2150895507.jpg

पुढे १९८२ ला त्यांनी बनवलेली दिलवाडा जैन मंदिराची प्रतिकृती सर्वांची वाहवा मिळवून गेली. गणपती परशुराम युद्ध, नृत्य करणारा नटराज असे अनेक देखावे कलाकृती खडकी आणि पुणे परिसरात गणेश उत्सव मंडळात त्यांचे मोठे नाव झाले. सजावट म्हटलं की सुधाकर शिंदे सर हवेच अशी मागणी सुरू झाली. त्यांनी केलेल्या सजावटीला प्रचंड दाद मिळायची. त्यांच्या नावाची चर्चा व्हायची सजावटीचा त्यांच्या नावासह फोटो पेपरला छापून येणे हे सरावाचे होऊन गेले. मध्यंतरीच्या काळात कौटुंबिक आणि इतर अडीअडचणी सोसून, शाळेच्या कामांमधून वेळ काढून जमेल तसे गणपती बनवून विकणे सुरू होते. आणि हे गणपती बनवताना ते भान विसरून कामात झोकून द्यायचे. कधी मध्यरात्र होऊन जायची ते कळायचे नाही. अशा प्रकारे कलाक्षेत्रातली जोमदार वाटचाल सुरू होती. सुधाकर शिंदे सर आता कलेच्या क्षेत्रात मानाचे नाव झाले.

DILWADAMANDIR
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://live.staticflickr.com/65535/53306134956_67bd8d34a5_c.jpg

त्या काळात गणपती बनवले त्यातनं मिळालेले पैसे सत्कारणी लागले नाहीत. गणपती बनवायसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी पैसे गुंतून पडायचे. इकडून तिकडून आणून पैसे गुंतवायला लागायचे. ते पैसे नीट वसूल व्हायचे नाहीत. काही पैसे बुडायचे. त्याच दरम्यान त्यांच्या दोन नंबरच्या भावाचे अचानक डोळे गेले. मग त्याला तळेगावला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. कमवलेला सगळा पैसा त्या हॉस्पिटलला गेला. पण भाऊ बरा झाला. त्याच्या पुढच्या वर्षी वडील आजारी पडले. वडिलांच्या आजारपणाला हॉस्पिटलमध्ये पैसे गेले. मग गणपती बनवायचे नाही तसं ठरवलं आणि फक्त गणपती मंडळाच्या सजावटीसाठी काम करायचं असं ठरवून टाकलं. अष्टविनायक मंदिराची सजावट तयार करून ठेवली. पिंपरीतलं अशोक टॉकीज जवळचं प्रताप मित्र मंडळाला ते डेकोरेशन आवडलं. आणि त्यांनी ही सजावट विकत घेतली. पिंपरीतलाच एक मुस्लिम कलाकार गणपती सजावट करायचा त्यात तो ताबूतला वापरतात तसं सगळं झगमग मटरेल वापरायचा. टिकल्या, चमचम लेस, आरशांचे तुकडे असं चमचम करणारं मटेरियल वापरायचा, झगमट झगमगाठ करायचा झगमगाठ करायचा ते बघायला गर्दी व्हायची. त्याच्यापुढे सुदामाचे अष्टविनायक मंदिर म्हणजे बिन दागिन्याची नवरी होती ! पण हे मंदिर म्हणजे “अस्सल कोरीव काम” होतं. ते लोकांना प्रचंड आवडलं आणि बघायला लोकांची रांग लागायला लागली. अष्टविनायक मंदिराची सजावट खूप गाजली.

गणपती मंडळाच्या सजावटीचं काम करायला लागल्यावर काही मंडळांनी सजावट पूर्ण झाल्यावर उरलेले पैसे देण्याचे टाळाटाळ केली, काही लोकांनी पैसे द्यायला खूप उशीर केला पण याच्यावर शिंदे सरांनी त्यांच्या चतुराईने मार्ग काढला आणि आपले पैसे कसे व्यवस्थित मिळतील याची काळजी. घेतली एकंदरीत गणपतीच्या मूर्ती बनवण्यापेक्षा हे सजावटीचे काम चांगलंच पैसे मिळवून द्यायला लागलं आणि अशा सजावटींना मोठी मोठी बक्षीसं मिळू लागली. मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाले.

मधल्या काळात प्रदूषण आणि पर्यावरणाच्या रक्षणाची चर्चा चालूच होती. त्यात सजावटीच्या थर्माकोल वर बंदी घातली गेली. थर्माकोल सीड्स सहजासहजी मिळेनात. मग या चळवळीत सामील होऊन थर्माकोलची ऐवजी दुसरं काही मटेरियल वापरता येते का याचा विचार सुरू केला थर्माकोल वजनाला हलकं हाताळायला सोपं, किमतीला कमी, वाहतुकीला पण सोपं असे सगळे फायदे असल्यामुळे थर्माकोल सजावटीसाठी वापरणं खूपच फायदेशीर ठरत होतं. हे सगळं चालू असताना घरातल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावणे चालूच होतं. गावाकडची शेती, मुलांचे शिक्षण, संसारिक खर्च, अधून मधून कुटुंबियांची आजारपणं हे सगळं सुरू होतं. घरच्यांचे आजारपण याला भरपूर वेळ द्यायला लागायचा. नवीन घरासाठी पैसे बाजूला काढून ठेवणे सुरू होतं, त्याच्यात घरासाठी जागा बघणं चालू केलं. या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नीची म्हणजे सौ. शोभा यांची भक्कम साथ होती. तिच्या वर घर टाकून ते निर्धास्तपणे काम करायचे. कुठलीही समस्या उभी ठाकली तरी सौ. शोभा त्याची तोशीस शिंदे सरांपर्यंत पोहोचू द्यायची नाही ! मग ती अचानक उपटलेली आर्थिक विवंचना असो किंवा कुणाचे आजारपण असो. तिने काबाडकष्ट केले म्हणून मी असे यश मिळवू शकलो हे शिंदे सर आवर्जून सांगतात !

जय हिंद हायस्कूल मधली नोकरी चालूच होती. मुलांना झोकून देऊन शिकणे सुरूच होतं. हायस्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम 26 जानेवारी 15 ऑगस्ट सारखे महत्त्वाचे दिवस, स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात, त्यांचा मोठा सहभाग असायचा त्या कार्यक्रमांसाठीचे सजावट नेपथ्य ते करण्यासाठी ज्या कलाकृती सादर करता येतील अशा निवडण्याचा त्यांचा इतर शिक्षकांना आग्रह असायचा आणि. हे घडत असल्यामुळे शाळेमध्ये कलाविषयक वातावरण खूपच छान तयार झाला मुलांचा इतर शिक्षकांचा सहभाग वाढायला लागला.

अशाच एका कार्यक्रमासाठी त्यांनी केलेली रणगाडा तोफेची प्रतिकृती ज्यातून तोफगोळा प्रत्यक्ष उडवता येईल, ही प्रतिकृती बनवायची ठरवली. काम असताना भान विसरून, वेळ विसरून कारागिरी करायची असा खाक्या ! शिंदे सर या कामात इतके तल्लीन व्हायचे की बस ! एकदा तर रात्रीचे आठ-साडेआठ वाजले सगळी शाळा बंद झाली, ऑफिसला लॉक लावलं गेलं आणि कलेत तल्लीन झालेल्या शिंदे सरांना काही कळलंच नाही ! भानावर आल्यावर आता घरी कसं जायचं हा प्रश्न उपस्थित झाला त्यांनी शेजारच्या बांधकामाच्या वॉचमनला रिक्वेस्ट करून विनंती करून बांबू लावून त्याची शिडी करून कुंपणाच्या बाहेर गेले आणि घरी पोहोचले ! सतत दोन दिवस रात्र खपून ही प्रतिकृती बनवली ! याचं प्रचंड कौतुक झालं !

RANGADATOF
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://live.staticflickr.com/65535/53305268607_c74200bb75_z.jpg

एका वर्षी नरसिंह अवतार या विषयावर नाटक बसवले होते त्याच्यासाठीही शिंदे सरांनी खांबाचा सेट सादर केला. लाईट इफेक्ट सह खांबातून प्रकटणारा नरसिंह इतका अप्रतिम झाला होता की त्यावर्षी ज्याच्या त्याच्या तोंडी त्या सेटचीच चर्चा होती. त्याच्या पुढच्या एका वर्षी हलणारा, पंख हलवणारा, मान हलवणारा, डोळे फिरवणारा जिवंत भासणारा असा गरुड केला होता. ही कलाकृती सुद्धा डोक्यावर घेतली गेली.

2002 ला पिंपळे गुरवचे घर पूर्ण झालं. नवीन कॉलनीत राहायला आल्यावर तिथल्याच आजूबाजूच्या मुलांना मदतीला घेऊन नर्तन करणारा १६ फुटी नटराज ओपन ग्राउंड मध्ये सादर केला. आंब्याच्या पेट्यात पॅकिंगला येणारं साळवण (वाळलेले गवत) वासे, बांबू, कागद, पुठ्ठे , पोती, तरट, पीओपी लिंपण असं विविध मटेरियल वापरून हा साकार केला होता ! हा भव्य नटराज पहायला लोकांची मोठी गर्दी व्हायची.

NATRAJ456
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://live.staticflickr.com/65535/53305268612_848567f03b_z.jpg

सद्गुरु वामनराव पै यांच्या जीवन विद्यासाठी अमृत महोत्सव नावाचा कार्यक्रम झाला होता. यासाठी “अमृत मंथन” नावाचा एक मोठा घट बनवला होता. आणि त्या घटातून “जीवन विद्या” ची वेगवेगळी पुस्तके बाहेर पडतात असं दृश्य साकार केलं आणि अर्थातच याला मोठी दाद मिळाली. ‘‘पर्यावरण हाच नारायण’’ या सदगुरू वामनराव पै यांच्या विचाराने प्रेरित होऊन पुढील कलाकृतींसाठी आवर्जून पर्यावरण पूरक साहित्य वापरण्यास सुरुवात केली. विविध प्रकारच्या कलाकृती सादर करणे सुरूच होते.

एका वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी मुलींनी आग्रह केला की पप्पा यावर्षी घरी बनवलेला गणपती बसवायचा. आता ऐन वेळेला कसा काय बनवायचा ? ऐनवेळी साहित्य कुठून आणायचे ? शिंदे सरांची क्रिएटिव्हिटी कामी आली व अक्षरशः दोन तासात वर्तमानपत्रातल्या रद्दी कागदापासून अतिशय सुंदर असा गणपती आणि त्याच्याभोवती अष्टविनायकाच्या मूर्ती अशी कलाकृती त्यांनी बनवली. याचं वैशिष्ट्य असं होतं की वर्तमानपत्राच्या रद्दीचा चोळा-मोळा आत घालून वरून तशाच कागदाच्या पट्ट्या फेविकॉलने चिटकवून तो गणपती फिनिश केला.

पूर्णकृती असं वैशिष्ट्य असणारा हा रांजणगावचा महागणपती. या कलाकृतीचं वैशिष्ट्य असं होतं की जिवंत माणसाला दाबले, म्हणजे बोटाने चेपले तर ते आत जाते तसं ह्या गणपतीलाही दाबले तर बोट आत जायचे. लगदा बिगदा बनवायला वेळ लागतो, त्यामुळे रद्दी वर्तमानपत्राच्या कागदाच्या चुरगळा करून त्या आत मध्ये टाकून त्याच्या वरचे सगळे थर तयार केलेले आणि ते थर म्हणजे वर्तमानपत्राच्या कागदी पट्ट्या फेविकॉलने चिटकवल्या त्यामुळे आत मध्ये पोकळी तयार झाली आणि बोट लावले की ते बोट आत मध्ये जायचे. वरून ऍक्रेलिक कलर पेंटिंग केलं जेणे करून लवकर सुकेल आणि ही कलाकृती अक्षरशः दोन-तीन तासाच्या तयार झाली. म्हणजे लोक इकडे गणपती आणतायत आणि इकडे आमचा गणपती बाप्पा पूर्ण होते असा प्रकार ! अर्थातच हा महागणपती सर्वाना खुप आवडला.

शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा सुधाकर शिंदे सरांनी कलेचा वापर करून वेगवेगळे प्रयोग केले. कार्यानुभवाचा तास घेताना सर त्यात आरपार रंगून जायचे, दंग होऊन जायचे. आपल्याकडे ज्या काही वस्तू असतील किंवा कचऱ्यातल्या वस्तू असतील त्याचं काय तयार करायचं याचे विचार त्यांच्या मनात सतत चालू असायचे आणि क्रिएटिव्हिटीचा बेस असल्यामुळे त्यांच्या हातून सुंदर सुंदर कलाकृती घडायच्या. सध्याच्या काळात विद्यार्थी आणि मुलं ह्या अशा सगळ्या क्रिएटिव्हिटी पासून दूर राहिलेले आहेत कारण शिक्षणाची पद्धती बदललेली आहे आणि मुलांना खरंच जर क्रिएटिव्ह करायचं असेल तर आपल्या जुन्या पद्धतीकडे परत गेला पाहिजे आणि त्यातनं शिक्षण घेताना मिळणारा जो आनंद आहे तो आगळा आहे. नुसती घोकंपट्टी आणि मार्क्स याच्यामुळे मुलं कलेपासून तुटलेले आहेत आणि आनंदाला मुकलेले आहेत. पौगंडावस्थेतलं वय आणि टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, ऑनलाइन शिक्षण यामुळे मुलांचे लक्ष सारखं विचलित होत आहे आणि याचे खूप वाईट परिणाम होत आहेत असं सरांचं निरीक्षण असल्यामुळे जेवढ्या प्रॅक्टिकल आणि वेगळ्या पद्धतीने शिकवता येईल याचा विचार-प्रचार सर हिरीरीने करत.

FLYMAN234
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://images.indianexpress.com/2019/06/oped-1.jpg

शाळा मुलांच्या जडणघडणीतला महत्त्वाचा भाग आहे इथे जो पाया तयार होतो तो आयुष्यभरासाठी पुरतो. शाळा या फक्त शाळा नसून प्रयोगशाळा असतात. आपल्या मुलांमध्ये कोणते सुप्त गुण आहेत हे त्याच्या पालकांना, आई-वडिलांना सुद्धा माहीत नसतं. शाळेत आलं की नेहमीच्या विषयांबरोबर इतरही गोष्टी जशी चित्रकला, क्रीडा, वक्तृत्व नृत्य, विविध वस्तू बनवणे इतर विविध गुण याला शाळेमध्ये खूप मोठी संधी मिळते. मुलांना बक्षीस मिळाली की त्याचा आयुष्यात फार मोठा पॉझिटिव्ह परिणाम होऊन समाजात वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार तयार होतात ! म्हणून शाळेत होणारे संस्कार हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि असे संस्कार शिंदे सरांनी आवर्जून केले, आणि व्हावेत या साठी आग्रह धरला. त्यांच्या विद्यार्थ्याना उत्तम शिक्षक होण्यासाठी संस्कार केले !

सुदाम शिंदे सर अतिशय लोकप्रिय झाले, विद्यार्थीप्रिय झाले. त्यांची मार्गदर्शन करण्याची हातोटी बघून मनात आदर निर्माण व्हायचा. त्यांच्या आजूबाजूला नेहमी कलाकार लोक आणि कलाविषयक मार्गदर्शन घेणारे युवा कलाकार जमायला लागले. या सगळ्या प्रवासात सेवानिवृत्ती कधी आली ते कळलच नाही ! कौटुंबिक पार्श्वभूमीवर यश मिळून समाधानाची अवस्था होती. मुलं आता त्यांच्या नोकरीत स्थायिक झाली होती. प्रसंगानुरूप शिंदे सरांची कला आराधना सुरूच होती.

२०१९ हे नवीन वर्ष संपूर्ण जगाला भयभीत करणारा संसर्गजन्य कोरोना घेऊन आला ! सामाजिक आरोग्याच्या दारावर स्वप्नात सुद्धा कल्पना करता येणार नाही असे संकट येऊन ठेपले. सगळीकडे भयभीत अवस्था पसरली ! आता मानव जातीचं काय होणार ही चिंता सतावयाला लागली. भोंगे वाजवणाऱ्या ॲम्बुलन्स रस्तोरस्ती फिरत होत्या. स्मशानभूमी कडे धावणाऱ्या शववाहिन्याना उसंत नव्हती. गावं, शहरं ओस पडायला लागली. समाजमन अत्यवस्थ झाले होते. देशोदेशी लॉक-डाऊन वाढत होते. सगळं जग बंद पडते की काय अशी पोखरून काढणारी भीती माणसांना कोसळवून टाकत होती.

CORONAFIRE
(प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)
https://live.staticflickr.com/65535/53306683576_d41db6a4af_b.jpg

पण सुधाकर शिंदे सरांसारख्या कलाकारच्या मनात मात्र वेगळेच विश्व आकार घेत होते. गेली एक-दोन वर्ष त्यांच्या मनात काहीतरी भव्य दिव्य कलाकृती घडवावी असे विचार चालले होते. त्या दृष्टीने सगळा वेध घेणे; शोध घेणे हे सुरू होते आणि असाच शोध घेत असताना त्यांना भेटून गेला अप्रतिम वास्तुकलेचा नमुना असणारा कोलकत्ता जवळील बेलूर मठ,अनेक धर्मातील वास्तुकलेचा मिलाफ असलेली कलाकृती !

BELUR001
https://live.staticflickr.com/65535/53306636825_b031e9b073_k.jpg

सुधाकर शिंदे सरांना बेलूर मठ पाहायचा योग आतापर्यंत आला नव्हता आणि इकडे तर कोरोनाची भयाण परिस्थिती. लागोपाठ तीन लॉक डाऊन लागले. पुढे ठराविक ठिकाणी लागत गेले. शिंदे सरांनी पुस्तके, मासिके वाचत या वास्तूचा अभ्यास सुरू केला. इंटरनेटवर शेकडो फोटो पहिले. हे काम अतिशय आव्हानात्मक असल्याचे जाणवले. वेळ तर खुपच द्यावा लागणार होता. पण हे शिवधनुष्य पेलायचा त्यांनी ठाम निश्चय केला ! ही वास्तू प्रत्यक्ष वास्तु खुपच भव्य आहे असे मित्रांकडून समजले होतेच ! विशेषत: याचे घुमट वगैरे आपण तिथे प्रत्यक्ष भेट दिली तरी ते आपल्या डोळ्यात साठवता येत नाही ! त्याचं नक्षीकाम कोरीव काम पाहायला तर नजर अपुरी पडते. आणि म्हणूनच त्याची जर प्रतिकृती केली तर त्या कलाकृतीचा पूर्ण आनंद आपल्याला घेता येईल हा विचार करून ही वास्तू करायला घेतली. जी वास्तू त्यांनी प्रत्यक्षात पाहिली नाही त्यावर काम करताना त्यांची कसोटी लागत होती.

शिंदे सरांच्या दोन्ही मुली गुणवान ! लहानपणापासून कलाकार वडील आणि कष्टाळू आई यांच्या संस्काराने संपन्न आहेत. मोठी मुलगी धनश्री इंजिनिअर, १५ इंजिनियर्सची टीम लीडर आहे, तर धाकटी वृषाली एम.ए. असून एमआयटी कॉलेजला प्रोफेसर आहे, पीएचडी करत आहे, वृषाली उत्कृष्ट रांगोळी कलाकार असून तिने अनेक कलाकृती साकारलेल्या आहेत ! शिंदे सरांच्या विविध कलाकृती साकार करण्यासाठी वेळोवेळी दोघींचाही मोठा सहभाग राहिलेला आहे.

BELUR002
https://live.staticflickr.com/65535/53306161366_79572b13e0_k.jpg

त्यांच्या मोठ्या मुलीने विविध माध्यमातून या वास्तूचे फोटो/माहिती व बारीक-सारीक तपशील मिळवले आणि त्याच्या जवळ जवळ दीडशे प्रिंट्स या शिंदे सरांना उपलब्ध करून दिल्या. त्या तपशिलांचा काटेकोर अभ्यास करून शिंदे सरांनी कलाकृती साकारली. प्रतिकृती बनवण्यासाठी सुधाकर शिंदे यांनी विविध हत्यारांचा वापर केला. या मध्ये मुख्य इमारतीची दुमजली वास्तू, अनेक घुमट आणि त्यावरील शिखरे यावर कुशलतेने बारीक कोरीव काम केले. बेलूर मठावर असलेल्या नक्षीदार कठड्याचे सज्जे, खिडक्या, रोमनशैलीची आठवण करून देणारे छत बघताना भान विसरायला होते. या वास्तूतील त्यांनी कोरलेल्या मूर्ती या अतिशय लक्षवेधक आहेत. बेलूर मठाची प्रतिकृती सात फूट लांब, सव्वा तीन फूट रुंद, तसेच चार फूट उंच आहे. ही भव्य प्रतिकृती पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले नाही तर नवलच !

सहा आठ महिने नुसते कलाकृती कशी करायची ? कशी मापे कशी ठरवायची ? प्रत्येक भागाची, स्तंभाची, कमानीची उंची-रूंदी-जाडी याचा पूर्णपणे विचार करून मगच कलाकृती तयार करायला घेतली. घरात वरच्या मजल्यावर प्रशस्त जागा असल्यामुळे तीही अडचण नव्हती, विविध पॅकिंगचे उरलेले किंवा खराब झालेले देवदार लाकडाचे तुकडे. ते सगळे शहराच्या विविध भागातून जमा केले. त्याच्यासाठी लागणारी हत्यारे, पटाशी, घासण्या, लहान-मोठी करवत, इतर विविध प्रकारचे कटर्स, फेविकॉल, छिन्न्या, पॉलिश पेपर्स इत्यादि ह्या हाताशी होत्याच. ज्यांची गरज वाटली ती वेळोवेळी जमा केली. दिवसाचं काटेकोर नियोजन केलं आणि ही वास्तू तयार करण्यास सुरुवात केली.

BELUR003
https://live.staticflickr.com/65535/53306161386_44d012b5f7_k.jpg

कुटुंबीयांनी, विशेषत: धाकट्या वृषालीने त्यांना प्रचंड पाठिंबा दिला. त्यांचे वेळापत्रक सांभाळले, त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही याची काळजी घेतली आणि ह्या सगळ्या कष्टातून, प्रबळ इच्छाशक्ती, अथक मेहनतीतून कलाकारीतून ही प्रतिकृती आकारास येण्यास सुरुवात झाली ! पूर्ण करण्यासाठी जवळ जवळ दीड-दोन वर्षे लागली. प्रतिकृतीमध्ये अक्षरश: जीव ओतला ! एक स्वप्न साकार झाले ! निर्माण झालेली अप्रतिम कलाकृती बघताना सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फिटते.

BELUR004
https://live.staticflickr.com/65535/53305295442_1ce5b2d1cb_k.jpg

कलाकृती संपूर्ण साकार झाल्यानंतर स्वतः शिंदे सरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आनंद झाला. कॉलनीतले आजूबाजूचे लोक ही प्रतिकृती पाहण्यास येऊ लागले. या प्रतिकृतीची किर्ती पंचक्रोशीत व त्याच्या पाठोपाठ संपूर्ण शहरात पसरली. मीडियाच्या लोकांनी आवर्जून दखल घेतली. मराठी, इंग्रजी वर्तमानपत्राचे, टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी ही कलाकृती पाहून भारून गेले आणि वृत्तपत्रांमध्ये आणि टीव्ही चॅनेल्स मीडिया याच्यामध्ये या कलाकाराबद्दल आणि अप्रतिम प्रतिकृती बद्दल भरभरून लिहिले गेले व कव्हरेज झाले.

जेंव्हा कलाकृती पूर्णत्वास येत होती तसतसं दोन्ही मुलींना जाणवत होते की ही जागतिक पातळीवरची उच्च कलाकृती आहे. अशा प्रतिकृती यापूर्वी कोणी केलेल्या आहेत केलेल्या आहेत याचा त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हा त्यांना समजले की “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्” लंडन मधली संस्था अशा कामांची दखल घेते. आणि त्याचं काही वैशिष्ट्य असेल तर त्यांच्या “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्” या जागतिक पातळीवरच्या प्रकाशात त्याची नोंद करते. मग त्यांनी बेलूर मठाच्या प्रतिकृतीचे शिस्तबद्ध पद्धतीने डॉक्युमेंटेशन केले. त्याचे वेगवेगळ्या कोनातून फोटो, व्हिडिओज, त्याच्यासाठी वापरलेले टूल्स हे सगळे तपशील त्या संस्थेकडे दाखल केले! या सर्वांची छाननी करून “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्” ने त्यांच्या कलाकृतीची निवड केली आणि तसं पत्र त्यांना पाठवलं !

आणि बेलूर मठाच्या प्रतिकृतीची “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्” मध्ये नोंद झाली !

इंदूर येथील मोठ्या शानदार समारंभात प्रमाणपत्र, शिल्ड, मेडल इ. प्रदान करण्यात आले !

सर्व धर्मियांच्या स्थापत्यकलेचा सुरेख मिलाप असलेल्या या मठाच्या प्रतिकृतीची जागतिक दर्जावर दखल घेतली गेली. सुधाकर शिंदे सरांच्या कलाकारीच्या जादूची किर्ती जगभरात पोहोचली !

CERTI456
https://live.staticflickr.com/65535/53305843107_f1b2638e56_k.jpg

Booklet245
https://live.staticflickr.com/65535/53308743299_770a26c59d_k.jpg

Sir
https://live.staticflickr.com/65535/53306932750_65cd0cb68d_b.jpg

आता इथेच न थांबता आणखीन काहीतरी भव्य दिव्य घडवायचे स्वप्नं शिंदे सरांच्या डोळ्यात तरळत आहेत !

त्यांचे मूळ गाव पेठ (आंबेगाव) इथे सुधाकर शिंदे सरांच्या गौरवाचे बोर्डस झळकत आहेत. “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्” मध्ये चमकल्या मुळे गावकऱ्यांना खूप आनंद झालाय. आपल्या गावच्या या सुपुत्राचे नाव साता समुद्रापार गाजत आहे, म्हणून हे गाव शिंदे सरांचे नाव अभिमानाने मिरवत आहे !

या प्रतिकृतीचा थ्रीडी व्ह्यू आणि पुढे महाराष्ट्र टाइम्स आणि एबीपी माझा यांनी केलेल्या वार्तांकनाचा व्हिडिओ पाहायला विसरू नका !

म टा लिंक : https://www.youtube.com/watch?v=sx0Na3RxF7s

ए बी पी माझा लिंक: https://www.youtube.com/watch?v=cWb8gV12R2A

सुधाकर शिंदे सरांचा पेठ (आंबेगाव) ते "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्" हा प्रवास थक्क करणारा आहे !

(लेखातील काही प्रचि प्रतीकात्मक आणि आंजावरून साभार)


प्रतिक्रिया

मिपा मुळे शिंदे सरांचा हा थक्क करणारा प्रवास वाचायला आणि उत्तम सुयोग्य चित्रांमुळे काहीसा अनुभवायला मिळाला.. फारच प्रेरणादायी मस्त लेख.

स्नेहा.K.'s picture

16 Nov 2023 - 10:37 pm | स्नेहा.K.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व!

कर्नलतपस्वी's picture

13 Nov 2023 - 7:15 pm | कर्नलतपस्वी

सुधाकर शिंदे सर आमच्याच शिणेचे. गावा पासून सहा मैलावर असलेल्या पेठला सन चौसष्ट पासून नेहमीच जाणे येणे कधी कधी तर दर आठवड्यात. गाव एकदम छोटेसेच ,सरांची नक्कीच कधी भेट झाली असेल.

आवांतर.....

पेठ या गावाशी फार जुना संबध आहे. १९६४ मधे माझी मावशी पेठ मधे ग्रामसेवीका म्हणून नियुक्त झाली. तीने केलेल्या ग्रामसुधार व महिला सशक्तीकरणाची दखल घेऊन राज्य आणी राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला होता. तीचे शिंदे कुटुंबियांसमवेत संबध असावेत. पुर्ण आयुष्य पेठ गावात काढले. मृत्युनंतर गावकऱ्यांनी तीचा अंतीम संस्कार व सर्व विधी गावातच करण्याचा आग्रह धरला. हा तीच्या कार्याचा यथोचित सत्कार होता.

ही गोष्ट इथे लिहीण्याचा उद्देश गावाची व गावकऱ्यांची सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवणे आहे.

चौको भौ , तुम्हीं स्वतः एक कलाकार आहात तुमच्याच मनाच्या झरोक्यातून दुसर्‍या एका सिद्धहस्त कलाकाराची ओळख झाली. धन्यवाद.

वरती दोन मान्यवरांनी म्हंटल्या प्रमाणे छान प्रेरणादायी लेख 👍
'विश्वविक्रमवीर' शिंदे सरांसारख्या हाडाच्या कलाकारांबद्दल नेहमीच आदर वाटतो!

Ranapratap's picture

13 Nov 2023 - 10:13 pm | Ranapratap

गेली तीस वर्षे पेठ जवळ मंचर येथे रहात आहे. प्रथमच एका मोठ्या कलाकार विषयी ऐकले. त्यांची नक्की भेट घेईन.

कंजूस's picture

13 Nov 2023 - 11:51 pm | कंजूस

छान ओळख एका कलाकाराची.

बरीच आव्हानं पेलली आहेत या कलाकाराने.

बबन ताम्बे's picture

16 Nov 2023 - 12:50 pm | बबन ताम्बे

धन्यवाद चौथा कोनाडा एका विश्वविक्रमी कलाकारची ओळख करुन दिल्याबद्दल. मी पेठ वरुन आमच्या गावी नेहमी जातो, पण त्या मातीत एव्ह्ढा मोठा कलाकार घडला हे माहीत नव्हते. तुम्ही सुंदर शब्दांत आणि त्याबरोबर समर्पक छायाचित्रे देऊन या सिद्धस्त कलाकाराची कला आणि जीवन प्रवास रेखाटल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद. श्री. शिंदे सरांचा कलाप्रवास खूपच प्रेरणादायी . त्यांच्या हातून अशाच उत्तमोत्तम कलाकृती घडोत ही सदिच्छा !!

खुप छान लिहिले आहे.कलाकारांची जिद्द, सचोटी नेहमीच थक्क करते.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Nov 2023 - 11:41 am | अमरेंद्र बाहुबली

लेख आवडला.

नठ्यारा's picture

18 Nov 2023 - 12:54 am | नठ्यारा

शिंदे जबरदस्त कलाकार आहेत. हातात जादू दिसते आहे. त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. ओळख करवून दिल्याबद्दल धा.क.चे धन्यवाद!

कुमार१'s picture

21 Nov 2023 - 7:17 am | कुमार१

छान ओळख!

मुक्त विहारि's picture

21 Nov 2023 - 11:17 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

पाषाणभेद's picture

30 Nov 2023 - 4:16 pm | पाषाणभेद

एखाद्या व्यक्तीची, त्याच्या कार्याची ओळख फोटो असलेल्या एखाद्या लेखातून करून देणे हा वेगळाच प्रयोग तुम्ही केलात. अतिशय छान.

श्वेता व्यास's picture

28 Dec 2023 - 2:53 pm | श्वेता व्यास

शिंदे सरांचा जिद्दीचा प्रवास आवडला. अद्वितीय कलाकार आहेत सर.
पहिल्या चित्रापासूनच तुम्ही वर्णन केलेल्या प्रत्येक कलाकृतीची प्रत्यक्षात कसं असेल याची कल्पना करून पाहिली.
पण बेलूर मठाचा मात्र प्रत्यक्ष फोटो पाहायला मिळाला आणि तो खरंच अप्रतिम आहे.
हाडाच्या कलाकाराला साथ देणारे लोक भेटत गेले हे छान झालं.