दिवाळी अंक २०२३ - अकाली

सरिता बांदेकर's picture
सरिता बांदेकर in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am
1

पार्कमध्ये फिरत होतो. आज वातावरण आल्हाददायक होतं. मंद हवा वाहत होती.मी पण जरा रमत गमतच चाललो होतो. रोज एव्हढ्यात माझ्या चार फेऱ्या होत,पण आज पहिलीच फेरी चालू होती. एवढ्या आल्हाददायी वातावरणात मला काही उत्साहच वाटत नव्हता.

एवढ्यात कुठल्यातरी झाडावरून एक पान भिरभिरत येऊन पडलं.खरं तर विंटर संपून समर सुरू झाल्यावर पानं सुकून पडतातच.त्यात नवीन असं काहीच नव्हतं.

मी कुतूहलाने बघितलं तर पान रंगीबेरंगी झालं होतं आणि गळून पडलं होतं. असं विंटर सुरू व्हायच्या आधी होतं, मग आता हे पान असं अकाली म्हातारं का झालं? अकाली का गळलं असेल?

मी विचार करत होतोच,पण आता घरी परत जायचा निर्णय घेतला. घरी जायच्या आधी जरा मेसेज बघू या म्हणून फोन बघितला तर भरपूर मेसेज होते.

मेसेज वाचायला सुरुवात केली आणि डोकं गरगरायला लागलं.
‘ गण्या गेला .’
गण्या गेला म्हणजे? कुठे गेला? कसा गेला आणि गेला तर त्यात सगळे एव्हढे का अपसेट का झालेत ?

लगेच रम्याला फोन लावला ,
“ हॅलो,…..”
“अरे बरंच झालं तू फोन केलास. तुला आता फोन करणारच होतो. गण्या गेला रे. ”रमेश रडवेल्या आवाजात बोलत होता.
“अरे गेला म्हणजे? आणि गेला तर हॅप्पी जर्नी करायचं सोडून तू एव्हढा रडवेला का झालायस?”
“अरे गेला म्हणजे,देवाघरी गेला. आत्ताच कळलं आम्हाला. आम्ही आता तिकडे पोचताच आहोत.”
“अरे पण असं काय झालं त्याला? असा कसा गेला?”
“ परवा भेटला तेव्हा म्हणाला, मला जरा धाप लागल्यासारखं वाटतंय. काल आमचे कुणाचेच मेसेज झाले नाहीत आणि सकाळी त्याच्या बहिणीचा फोन आला तेव्हा कळलं तो गेला.”

मी सुन्न होऊन ऐकत होतो. माझं लक्ष हातातल्या पानाकडे होतं.
त्या पानाचा रंग इतका आकर्षक झाला होता.सगळे रंग त्या पानांत होते.

हिरवा,लाल,पिवळा,भगवा मध्ये मध्ये काळपट किरमिजी.
कदाचित एवढ्या आकर्षक रंगांनी रंगल्यामुळे त्या पानाला इतर पानांची नजर लागली असेल.

गण्याचं पण तसंच होतं. तो लहान थोर सर्वांना हवाहवासा वाटायचा. मी तंद्रीत घरी आलो. बॅासला फोन लावला आणि सुट्टीबद्दल विचारलं. आता माझं लक्ष कामात लागणार नव्हतं. एजंटला फोन लावून तिकिटाबद्दल विचारलं. करोनाचा काळ असल्यामुळे तिकिटाचे दर चढे होते. जायला मिळेल याची शाश्वती नव्हती. तरी पण मी प्रयत्न करणारच होतो.

गण्या हा आमच्या ग्रुपचा कुटुंबप्रमुख होता. आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र केल्या होत्या. एखादी मुलगी कुणाला आवडली तर बाकीच्यांना दम देऊन ‘ती तुमची वहिनी आहे.’ असं गण्याने बजावलं की त्यावर कुणीही उलट उत्तर किंवा आर्ग्युमेंट करत नव्हतं. तो विषय तिथेच संपायचा.

आमच्या ग्रुपवर पहिली बीपी बघितली ती पण गण्याने आणलेल्या लॅपटॅापवर. त्याला त्या सीडी कुठून मिळायच्या त्यालाच माहीत.

त्या बघण्याआधी त्याने बायलॅाजीचा क्लास लावला होता. म्हणजे तो प्रोफेसर होता आणि आम्ही स्टुडंट होतो.
सगळं व्यवस्थित समजावून सांगितल्यावर त्याने आम्हाला बजावलं होतं, "हे नुसतं बघायचं. प्रॅक्टिकल करायचा विचारसुद्धा करू नका."

डोक्यात आठवणींचा सगळा गुंता झाला होता.
आमच्या आई,बापाच्या मते गण्या एक आदर्श, संस्कारी मुलगा होता.

“घे काही तरी शिकून घे त्याच्याकडून. बघ कसा मोठ्यांचा आदर करतो,कधी उलटून बोलत नाही. आणि मला माहीत आहे, तू सिगरेटी फुंकतोस ते. तुला काय वाटलं आम्हाला वास येत नाही?”

च्यायला,सिगरेट फुंकल्यावर च्युईंगम चघळायचं गण्यानेच शिकवलं होतं, तरी तो आदर्श मुलगा. गण्याने आम्हाला काय काय शिकवलं होतं ते बापाला कळलं असतं तर झीट आली असती.

पण आम्ही एकमेकांच्या बापाच्या नावांनी हाक मारायला लागलो की गण्या आम्हाला ओरडायचा.

“अरे साल्यांनो, आदर दाखवा. बाप म्हणत होतात ते ठीक होतं पण नावांनी हाक मारणं म्हणजे जरा अती होतंय.”
असं म्हणून डोळा मारायचा.
आमची पहिली बिअर..!!
“बिअर म्हणजे दारू नव्हे रे", हे बोलताना गण्याचे डोळे चकाकायचे.
आपण नेहमी डॅाक्टर्स ब्रॅण्डी प्यावी म्हणजे बापाला सांगता येतं की "काही नाही जरा सर्दी झाल्यासारखी वाटत होती म्हणून उगा आपलं एक चमचा ब्रॅण्डी घेतली ग्लासभर पाण्यातून.”

जरा डोळे मोठ्ठाले केले की घरचे पण विश्वास ठेवतात.

मुलींच्या बाबतीत तर गण्याकडे सर्व डेटा असायचा. मग कुठची मुलगी पटकन पटेल. कुठची मुलगी काकूबाई सारखी दिसत असली तरी जाम मॅाडर्न आहे वगैरे माहिती पुरवताना गण्याचा उत्साह ओसंडून जायचा.

एकदा गल्लीतील भरपूर तेल लावून चापूनचोपून केस विंचरलेली, बंद गळ्याचा, लांब बाह्यांचा पंजाबी घातलेली शेवंती माझ्याकडे सारखी बघत राहते म्हणून मी गण्याला सांगितलं.
अशा मुलींना कसं कटवायचं हे त्याला चांगलंच माहीत होतं. पण ऐकल्यावर गण्या जोरजोरांत हसायला लागला.
“ वेडा आहेस. अरे घेऊन जा तिला इरॅासला. इंग्लिश सिनेमा दाखव,पैसे वसूल होतील.”
“अरे पण सगळे हसतील ना मला? काय चॅाईस आहे तुझा म्हणतील?”
तेव्हा गण्याने माझ्या पाठीवर थोपटत मला सांगितलं,
“ अजून बच्चा आहेस तू. तुला काय वाटलं ? ती फक्त तुलाच भाव देतेय? अरे सगळ्यांबरोबर सगळे सिनेमे बघून झालेत तिचे. म्हणून कधी कुणी तिच्याबद्दल बोलत नाही. तेरी भी चूप मेरी भी चूप. दिसतं तसं नसतं, हे कळेलच तुला.”
पण माझी काही हिंमत झाली नाही तिला कुठे घेऊन जाण्याची किंवा तिच्याशी बोलण्याची. गण्याने पण माझ्या घाबरटपणाबद्दल कधी कुणाला सांगितलं नाही.
एव्हढे सगळे उद्योग करून गण्या नेहमी चांगल्या मार्कांनी पास होत असे.आणि कुणाचे मार्क कमी झाले तर लगेच कान उघाडणी पण करत असे.

गण्याला नोकरी चांगली लागली आणि घरून त्याच्यासाठी मुली बघायला सुरुवात झाली. आम्हा सर्वांना पण चांगल्या नोकऱ्या लागल्या. मला काही कामासाठी लंडनला यावं लागलं आणि थोडे दिवस म्हणता म्हणता माझं जाणं लांबणीवर पडत गेलं. वेळेचा फरक बघता फोनवर बोलणं कमी होई. पण ग्रुपमध्ये मेसेज चालू असायचे त्यावरून थोडं फार कळायचं.
विचारात असताना मध्येच मला त्या सकाळच्या पानाची आठवण आली. मी ते पान खिशात ठेवलं होतं.
गण्याचं आयुष्य पण या पानासारखं रंगीबेरंगी होतं. या पानाने पण कदाचित आयुष्यातले सगळे रंग अनुभवले होते.आणि आयुष्यातल्या सगळ्या रंगांनी रंगून गेल्यामुळे ते अकाली गळून गेलं असेल.

रमेशचा परत फोन आला.
“आम्ही सगळे गण्याच्या घरी पोचलो आहोत. तुझं काय? तुला जमतंय का यायला?”
“अरे मी प्रयत्न करतोय पण या कोविडच्या काळात सगळं जरा कठीण दिसतंय. कितीही महाग तिकीट असू देत मी लवकरात लवकर तुम्हा सगळ्यांना भेटायला येणारच. पण आधी हे सांग, गण्याला नेमकं झालं काय?”

“अरे गण्या कोविडमुळे गेलाय. आम्हाला शेवटचं भेटणं काय. शेवटचं दर्शन पण नाही मिळणार. एक निळी प्लॅस्टिकची बॅग दाखवली घरच्यांना आणि सांगितलं, बॅाडीचे अंत्यसंस्कार आम्हीच करणार. नशीब त्याच्या घरच्यांची टेस्ट निगेटीव्ह आलीय. नाहीतर पूर्ण बिल्डिंग सील करतात.”

रमेश कापऱ्या आवाजात बोलत होता.
“ गण्याचे आई, बाबा तर मधून मधून बेशुद्ध होतायत. आम्ही थांबणार आहोत इकडे. लॅाकडाऊन आहेच पण आम्ही निक्षून सांगितलंय, काका,काकू सावरल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. मंगेशनी कुठून तरी ओळख काढलीय. यांना हॅास्पिटलला पण नेता येत नाही.”

दिवसच असे होते की कुणी कुणाला सावरायचं हेच कळत नव्हतं. गण्या पण सवयीप्रमाणे कुणाला तरी बरोबर घेऊन ती टेस्ट करायला गेला होता. त्या माणसाची टेस्ट निगेटीव्ह आली पण व्हायरसने गण्याला पकडलं. व्हायरसला पण गण्या आवडला. आमचा गण्या होताच तसा सगळ्यांना आवडणारा.
एक आठवडा सरला. मी यांत्रिकपणे वावरत होतो. कामं करत होतो. मित्रांना भेटल्याशिवाय चैन पडणार नव्हती.

शेवटी कुणीतरी सुचवलं.

“तिकीट काढ मग तू उतरल्यावर पुढचं बघू या. आम्ही काहीतरी मॅनेज करतो. तुला क्वारंटाईन व्हावं लागणार नाही असं बघतो.”

शेवटी बॅासला निकराचं सांगितलं आणि सुदैवाने तिकीट मिळालं. त्यावेळी सगळ्यांच्या नोकऱ्या जात होत्या, त्यामुळे बॅासनी मनाची तयारी ठेवायला सांगितलं.

मी लगेच हो म्हटलं, असं पण गण्याने ढकललं म्हणून इकडे आलो होतो. नाहीतर मला कुठे यायचं होतं.

त्यामुळे म्हटलं गेली नोकरी तर जाऊ देत पण मित्रात जायलाच पाहिजे.

विमान प्रवास सुरू झाला. एकंदरीत २२ तासांचा प्रवास होता.
कोविडमुळे विमानात जेवण वगैरे बंद होतं.

सर्व वेळ मास्क अनिवार्य, मित्र भेटणार या कल्पनेने तहान, भूक जाणवत नव्हती. पण त्यात गण्या नाही म्हटल्यावर खिन्न व्हायला होत होतं.

शेवटी एकदाचा विमानाबाहेर पडलो, पण विमानतळाबाहेर पडायला देत नव्हते.

पम्याने काही तरी सूत्र फिरवली आणि मला बाहेर पडायला मिळालं. प्रवासाचे २२ तास विमानतळावरचे १२ तास,
एक युग सरल्यासारखं वाटत होतं.

पम्याने घरी नेलं. मी आई,बाबांना सांगितलं ,“तुम्हीच क्वारंटाईन व्हा. तुम्हाला त्रास नको. मी फक्त ४८ तास इकडे आहे. लगेच परतणार आहे.”

सगळे आमच्याच घराच्या दिवाणखान्यात जमले. सर्व गप्प होते. आणि एकदम हुंदक्यांचा आवाज आला.

रम्या हुंदके दाबायचा प्रयत्न करत होता.

“अरे मीच होतो त्याच्या बरोबर शेवटी चांगला हसत होता. घाबरता काय मरणाला. आपण आपलं आयुष्य मस्त जगलोय. काहीही इच्छा राहिली नाहीये. असं म्हणत होता."

“त्याला कदाचित कळलं होतं, आपला शेवट आलाय. पण ती भानू बघितलीस? बघवत नाही तिच्याकडे. पांढरे कपडे घालून फिरतेय. गण्याने तिला किती वेळा सांगितलं होतं. मी फ्री बर्ड आहे, माझी वाट बघू नकोस. मला वाटलं की मी अशी एक्झिट घेईन, की कुणाला कळणार पण नाही. त्याने स्वत:चे शब्द खरे केले.”

पम्या कसं तरी बोलत होता. परत सगळे शांत बसले होते.
आतून आईचा आवाज आला,” नुसत्या गप्पा मारू नका. काही तरी खाऊन घ्या.”
“हो काकू.” सगळे ओरडले.

“गण्यानी कधी कुठच्या मुलीला खोटी आश्वासनं दिली नाहीत, पण तरी सगळ्या जणी त्याच्या बरोबर जाण्यासाठी धडपडायच्या. अरे ते जोशी काका आहेत ना, त्यांना एकदा बोलताना ऐकलं होतं, साला लव्ह मशीन आहे. कायम पोरी भोवती घुटमळत असतात.”

मी एक नि:श्वास सोडला.

“आयला कधी कधी तर वाटायचं आपली गर्ल फ्रेंड पण त्याच्याकडे जाऊन आलीय की काय. पण गण्याने कधी कुणा मुलीबद्दल चर्चा केली नाही. किंवा आपल्याला पण सांगितलं नाही कुणापासून दूर राहा. सगळ्यांची प्रायव्हसी राखली.”

दोन दिवस आणि रात्र आम्ही सर्व मित्र गण्याच्या आठवणीत रमलो होतो.माझी जायची वेळ झाली तेव्हा आई,बाबांना बाहेर बोलावलं. सामान काही नव्हतंच, मग काय मोटार सायकलवरून विमानतळावर जायचं ठरलं.

डोळे पाणावत होते जड मनाने निघालो होतो. एवढ्यात एका बिल्डिंग जवळ लोकं जमलेली दिसली.म्हणून पम्याने स्पीड कमी केला
“अरे, ही तर भानूची बिल्डिंग….”

एवढ्यात पिवळी साडी आणि नटलेली भानू बाहेर पडली.
मोजकेच लोक होते बरोबर.

भानू आणि नवरीच्या वेषात ?
“अरे तुम्ही तर म्हणत होतात ती खूप खचली आहे. ही तर इकडे लग्न करतेय.”, मी पम्याला म्हणालो.

“अरे थांब. बरं झालं तिचं तरी आयुष्य मार्गी लागलं. सांगूया आपण तिला चल.”, असं म्हणून पम्या चालायला लागला.

भानूच्या जवळ गेल्यावर तिचं माझ्याकडे लक्ष गेलं.
"तू कधी आलास?"
"झाले दोन दिवस.आता परत निघालोय."
“गण्यासाठी आलास?, ती उपहासाने म्हणाली.

“होय सगळ्या मित्रांना भेटल्याशिवाय चैन पडत नव्हती, मग आलो दोन दिवसांसाठी. तू गण्याला विसरून पुढे निघालीस ते फार बरं झालं. तुला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. खरं तर हे फार आधीच करायला पाहिजे होतेस.”

मी जरा समजावणीच्या सुरांत म्हटलं.

भानू मंद हसली.

“तुम्हा सगळ्यांचा तो हिरो होता, रोल मॅाडेल. तुम्हाला नेहमी त्याच्या सारखं व्हावंस वाटायचं ना?”

“होय. आमचा फार मोठा आधार गेलाय. आम्हीच पोरके झालोय. त्याच्या आई वडिलांना आम्ही कसा आधार देणार आहोत? आम्हीच मोडून गेलोय. तू लवकर सावरलीस ते बरं झालं. लग्नानंतर जमलं तर गण्याच्या आईवडिलांना मधून मधून भेटत जा.” पम्याने हात जोडत भानूला विनंती केली.

पम्याचं बोलणं ऐकल्यावर भानू जोरजोरात हसू लागली.

आम्ही सगळे तिच्याकडे वेड्यासारखे बघायला लागले.

अरे ही गण्याच्या दु:खातून सावरली आहे ना मग हे काय? हिच्या नवऱ्याचं काही खरं नाही.

आमच्या चेहऱ्यावरचे भाव बघून शेवटी एकदाची भानू हसायची थांबली.

“अरे,अरे थांबा.असे भांबावून जाऊ नका. सांगते तुम्हाला थोडक्यात नाही तर माझ्या लग्नाचा मुहूर्त टळायचा आणि माझा होणारा नवरा कावराबावरा व्हायचा.”

एव्हढं बोलून तिने पम्याकडे पाणी आहे का असं खुणेने विचारलं.
दोन घोट पाणी प्यायल्यावर ती बोलू लागली, “तुम्हाला मी प्रथम हे सांगते, मी या लग्नाला तयार झाले ती गण्याच्या आई, बाबांची इच्छा आहे म्हणून. त्यामुळे त्यांची काळजी तुम्ही सोडा. ते कणखर आहेत. आयुष्यभर जे गुपित त्यांनी जपलं, ते जपायच्या जबाबदारीतून त्यांना मोकळीक मिळाली म्हणून त्यांना उलट आता मोकळं वाटतंय. त्यातून माझ्या जबाबदारीचं ओझं नको म्हणून त्यांनीच हे लग्न ठरवलंय. माझं कन्यादान पण तेच करणार आहेत.”
भानू थोडा वेळ शांत झाली.
“तुम्हाला एक सांगते, गावाकडे शाळेमध्ये प्रयोगशाळा नसते. मग मास्तर काय करतात? मुलांना प्रयोगाची कृती पाठ करायला सांगतात. शब्द न शब्द पाठ करायचा. मग प्रयोगाची वेळ आली की मास्तर समोर पोपटपंची करायची. एखादा अडखळला की त्याचे मार्क कमी व्हायचे. पण शब्द न शब्द कृती आणि त्याचे परिणाम बरोबर सांगणाऱ्याला मात्र पैकीच्या पैकी मार्क मिळायचे. आणि त्याचा पहिला नंबर यायचा. सगळी शाळा त्याचं कौतुक करायची.”

भानू परत थांबली. घटाघटा पाणी प्यायली.
“ तसंच गण्याचं होतं. ते त्याचं आणि त्याच्या आई, बाबांचं सीक्रेट होतं. गण्या 'प्रॅक्टिकल' करण्यासाठी असमर्थ होता. मग त्याचं हे न्यून झाकण्यासाठी सगळ्या गोष्टींचा रट्ट्या मारून ठेवायचा ही त्याच्या बाबांची आयडिया होती. त्यामुळे तो तुम्हा सर्वांसमोर आपलं ज्ञान पाजळायचा. आणि तुमचा गुरू म्हणून मिरवायचा.”

“बस्स भानू बस्स झालं आधीच आमचा मित्र आम्हाला पोरकं करून गेलाय. आता तो स्वत:ची सफाई देऊ शकणार नाही. कशाला त्याची बदनामी करतेस?”, पम्याने भानू बोलत असताना कानावर हात ठेवले होते. तो संतापाने ओरडला.

आम्ही सगळेच संतापलो होतो.

“अरे वेड्यांनो गण्या हे माझं पहिलं प्रेम आहे आणि होतं, आणि ते कधीच कमी होणार नाही. म्हणून जेव्हा काकांनी मला गण्याचं डेथ सर्टिफिकेटवर लिंगाच्या जागी काय लिहिले आहे ते दाखवलं तरी माझा विश्वास बसत नव्हता. पण आहे हे खरं आहे. मी खरं तर हे कुणालाच कधी सांगितलं नसतं. पण या अशा वेळी तू एवढ्या लांब आलास, मित्राबद्दल खरं काय ते तुम्हाला समजलंय, आता सगळ्यांनी आपापल्या आयुष्यात. पुढे जावा. मधूनमधून गण्याची आठवण काढा ती तो लव्ह गुरू होता म्हणून नाही, तर तो किती धैर्यवान होता. त्याने आपलं दु:ख कधी कुणाला दाखवलं नाही. आपलं हे गुपित फार काळ आपल्याला ठेवता येईल का, असं त्याला वाटलं असेल.म्हणून त्याने अकाली जाणं पसंत केलं असेल. जाऊ देत त्याला शांतपणे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप सुखी व्हा. गण्याने दिलेले मंत्र मात्र विसरू नका. येते मी. परत नको भेटू या.”

आम्ही सगळे भानू गेली त्या दिशेला बघत राहिलो. तिला "सुखी हो" म्हणण्याचं भानसुद्धा आम्हाला राहिलं नव्हतं.

भानूने गण्यावर मनापासून प्रेम केलं, म्हणून तिने लग्न करून काका, काकूंना त्यांच्या दु:खातून सावरायचा प्रयत्न केला.
आणि जाता जाता गण्याच्या जीवश्च कंठश्च मित्रपरिवाराला पण दु:खातून बाहेर काढायचा प्रयत्न केला.

गण्या आमचा हिरो होता आणि तो कायम राहील. त्याचं गुपित त्याने ज्या पद्धतीने आयुष्यभर जपलं ते त्यामुळे तर त्याच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला.

परतीच्या प्रवासात मनाशी एकच घोकत होतो.

"माझ्या हिरोला माझा अभिमान वाटावा असाच मी वागेन. आयुष्यभर मी खंबीर राहून इतरांचा आदर्श बनेन. हीच माझी गण्याला श्रद्धांजली."

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2023 - 1:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथा वाचली पण 'सिक्रेट' फारच सिक्रेट राहीलंय, असं वाटलं.
पोरी फिरवायचा आणि सिक्रेट तसंच राहीलं ?
कथा अजून फुलवता असती असेही वाटले.

छान. लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे

टर्मीनेटर's picture

13 Nov 2023 - 9:21 pm | टर्मीनेटर

पोरी फिरवायचा आणि सिक्रेट तसंच राहीलं ?

सर,
चार-चार वर्षं पोरगी फिरवताना तीच्या गालांवर, गालावर पडणाऱ्या खळीवर, ओठांवर, केसांवर आणि आणखिन कशा कशावर कविता करुन त्या पोरीला आणि इतरांना ऐकवणारे, हातात हात घालुन किंवा फार तर खांद्यावर हात टाकुन फिरणे ह्या पलिकडे वर्षानुवर्षे ज्यांची मजल जात नाही असे, त्या पोरीला ह्याच्या बरोबर फिरण्यात काही अर्थ नाही' असा साक्षात्कार होउन ती सोडुन गेल्यानंतर 'इतक्या वर्षांत तीचे साधे चुंबनही घेतले नाही' म्हणुन हळहळत बसणारे त्या बाबतीत 'गण्या सारखे' नसलेले महाभागही पाहिले आहेत 😂
इथे गण्याची तर केसच 'वेगळी' आहे त्यामुळे पोरींना काहीपण 'राग' देउन आपले 'सिक्रेट' लपवुन ठेवणे 'बोलबच्चन' गण्याला फार अवघड गेले नसावे असा तर्क लावता येउ शकतो 😉

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2023 - 9:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या काळातल्या शाळा साल्या सगळ्या प्रेम विरोधी होत्या असे वाटते. म्हणजे आमची शाळा दुपारची बारा ते पाच आणि पोरींची सात ते बारा. त्यामुळे सालं प्रेम वगैरे काही स्कोप नव्हता, नसायचा. स्नेहमिलन नाटक वगैरे निमिताने पोरं-पोरी एकमेकांना भेटायचे तितकंच. आणि आम्ही मित्रांनी आपापल्या साईडने आपली लफ्रं फिक्स करुन टाकली. समोरच्याला त्याचा गंध नसला तरी हरकत नव्हती. एवढाच तो काय प्रेमाचा अर्थ. आमची पोरांची पिढी साली लाजाळु पिढी होती. पोरी त्या मानाने जरा धीटच होत्या. म्हणजे त्या बोलायच्या इतकंच. आम्ही एक दोघेही धीट. पण नाटक आणि हे दे, ते दे, इतकंच. पण,पुढे काही ष्टो-या घडल्या नाहीत, हे नम्रपणे नमुद करतो.

आजकालच्या पिढ्या म्हणे पहिल्या दोन-पाच भेटीत चुंबनावर येत असतांना करोना काळात इतकं गप्प राहावं हे अजिबात पटलेले नाही. अशा केसेस पाहण्यात ऐकण्यात नाही. रेष्ट माय केस.

-दिलीप बिरुटे

टर्मीनेटर's picture

13 Nov 2023 - 10:01 pm | टर्मीनेटर

आम्ही एक दोघेही धीट. पण नाटक आणि हे दे, ते दे, इतकंच. पण,पुढे काही ष्टो-या घडल्या नाहीत, हे नम्रपणे नमुद करतो.

हा प्रांजळपणा आवडला 👍

तुम्ही तेव्हा लाजाळू असाल असे तुमच्याकडे बघून वाटले नव्हते पण तरीही प्रेम केलंत हे भारीच. तुमच्या कॉलेजजीवनातले किस्सेही येऊ द्यात

प्राध्यापक साहेब म्हणतात ते १०० टक्के सत्य आहे. आमच्या कॉलेजात पोरीशी बोलले तर षोलिड एक रुपया दंड होता.
मी भरला आहे आहे. मी फक्त एका मुलीला तिचा जमिनीवर पडलेला रुमाल उचलून दिला हो. एक शब्द पण बोललो नाही. पण आता जमाना बदलला आहे. गर्ल फ्रेंड नसेल किंवा मित्रांबरोबर जास्त वेळ घालवला तर लोकांचा "गैरसमज" होत असणार.

सरिता बांदेकर's picture

13 Nov 2023 - 8:28 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद बिरूटे सर,
सिक्रेट सांगितलं आहे.
आई,वडिलांनी आणि गण्याने राखलेले सिक्रेट थोडं तसंच लिहीलं आहे.
‘ गण्या 'प्रॅक्टिकल' करण्यासाठी असमर्थ होता. मग त्याचं हे न्यून झाकण्यासाठी सगळ्या गोष्टींचा रट्ट्या मारून ठेवायचा ही त्याच्या बाबांची आयडिया होती. ’

टर्मीनेटर's picture

13 Nov 2023 - 8:43 pm | टर्मीनेटर

छान आहे कथा 👍
झालेल्या/होउ घातलेल्या अघटीताची लागलेली चाहुल सुचीत करण्यासाठी अकाली गळून पडलेल्या पानाचा प्रतिकात्मक वापर करण्याची कल्पना आवडली.
('तसे' नसलेले 😀) गण्या सारखे जिंदादिल मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावेत!

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2023 - 11:44 am | सरिता बांदेकर

माझ्यासारख्या लहानपणी खूप मस्ती केलेल्या लोकांना नक्की हे पटेल.
सगळे ऊद्योग केले पण मुलांना नाही फिरवलं,
कारण मीच टॅाम बॅाय होते.

प्रचेतस's picture

14 Nov 2023 - 10:14 am | प्रचेतस

कथा आवडली.
मिपावर हल्ली कथालेखनाचा दुष्काळ असताना ज्या सातत्यपूर्ण पद्धतीने तुम्ही लिहीत आहात त्याचे कौतुक वाटते.

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2023 - 11:42 am | सरिता बांदेकर

धन्यवाद. ऊशीरा दिलेल्या प्रतिसादाबद्दल क्शमस्व.
हो खरं तर नियमित यायला पाहिजेत कथा पण कुणी देत नाहीत म्हणून मला वाटलं लोकांना कथा वाचायला आवडत नाहीत. पण मी पोस्च करेन विविध विषयांवरचा कथा.

स्नेहा.K.'s picture

14 Nov 2023 - 11:22 am | स्नेहा.K.

छान आहे कथा !

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2023 - 11:40 am | सरिता बांदेकर

धन्यवाद. ऊशीरा दिलेल्या प्रतिसादाबद्दल क्शमस्व

मुक्त विहारि's picture

14 Nov 2023 - 8:36 pm | मुक्त विहारि

लेख आवडला.

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2023 - 11:45 am | सरिता बांदेकर

धन्यवाद. ऊशीरा दिलेल्या प्रतिसादाबद्दल क्शमस्व

चौथा कोनाडा's picture

16 Nov 2023 - 1:19 pm | चौथा कोनाडा

सुंदर कथा !

- अ - प्र - ति - म - !

सुंदर रित्या उलगडत नेलीय ! लेखनशैली साधी असली तरी बांधून ठेवणारी आहे.
कथा वाचायला सुरुवात केली आणि शेवटालाच येऊन थांबलो !

हॅट्स ऑफ !

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2023 - 11:39 am | सरिता बांदेकर

धन्यवाद. ऊशीरा दिलेल्या प्रतिसादाबद्दल क्शमस्व.

तुषार काळभोर's picture

16 Nov 2023 - 2:10 pm | तुषार काळभोर

कथावस्तू अजून फुलवून याची दीर्घकथा करता येईल का?

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2023 - 11:49 am | सरिता बांदेकर

मला माहित नाही तुम्ही माझी कैदी नं ४१७ वाचली आहे का?
ती पण १९५५ च्या गाण्यावर आधारित आहे.
ती दीर्घ कथा खूप मोठी म्हणून कुणी घ्यायला तयार नव्हतं.
पण ती २०२२ च्या वसूधामध्ये आल्यावर, मला खूप लोकांनी फोन करू, मेल करून आणि पत्र पाठवून विचारलं तुमच्या बाकीच्या कथा कुठे वाचायला मिळतील.

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2023 - 11:37 am | सरिता बांदेकर

खरं तर धन्यवाद द्यायला आणि प्रतिसाद द्यायला उशीर झाला त्याबद्दल क्शमस्व.
ही कथा मला एका इंग्लिश गाण्यावरून सुचली आहे.१९६१ साली ‘द डाईंग मॅन‘ म्हणून कंट्री सॅांग आलं ते १९६३ साली एका अमेरिकन कविने इंग्लिशमध्ये काही सुधारणा करून लिहीलं. आणि वेस्टलाईफ या बॅंडनी १९९९ मध्ये गायलं.
मी हे गाणं प्रथम १९९५ साली ऐकलं होतं नायजेरियात एका लोकल रेडिओ चॅनेलवर.
आपल्या ल्युकेमियाग्रस्त मित्राला ते गुडबाय म्हणतात.
आपला मित्र, ज्यच्याबरोबर सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे पोरी फिरवल्या,दारू प्यायली, जुगार खेळला तो मित्र असा अचानक सोडून जातोय. असा एकंदरीत त्या गाण्याचा अर्थ मी लावला. मग कोरोनामध्ये जेव्हा आपण जवळची माणसं गमावली. तेव्हा हे गाणं मी परत परत ऐकायची.
पण कथा कशी लिहायची हे कळत नव्हतं आणि अमेरिकेत पार्कमध्ये फिरत असताना एक पान असंच कुठून तरी भिरभिरत पायाशी येऊन पडलं आणि झपाटल्यासारखं लिहायला घेतलं.
मी नायजेरियात असताना अशी खूप गाणी ऐकली आणि त्यावर कथा लिहील्या आहेत.
कधी दीर्घ कथा पण लिहील्या पण दीर्घ कथा वाचायला लोक कंटाळतात त्यामुळे जास्त लिहीत नाही.
पण काळभोर सरांनी सुचवल्याप्रमाणे नक्कीच मला विचार करायला आवडेल.
आणि बिरूटे सर,त्यानी मैत्रीणीबरोबर काय केलं काय नाही हे माझ्या डोक्यात कधी आलं नाही ओ.ज्या ज्या वेळी मी ते गाणं ऐकते तेव्हा त्या मित्रांच्या भावना मी अनुभवते.मित्र गेल्याचं दु:ख मी अनुभवते त्यामुळे मी तुमच्या प्रश्नाचं ऊत्तर नाही देऊ शकत.
मी गाण्याची लिंक देते.साधं सोपं गाणं आहे. जरूर ऐका.
https://youtu.be/Xdv83MFJd7U?si=_BKiWb6tlb9-8Adh

श्वेता व्यास's picture

27 Nov 2023 - 3:43 pm | श्वेता व्यास

कथा आवडली. छान सुरुवात ते शेवट केलात.

सरिता बांदेकर's picture

29 Nov 2023 - 4:36 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद, श्वेताजी.

अरे बापरे ,वेगळीच छान कथा लिहिली आहे.

सरिता बांदेकर's picture

1 Dec 2023 - 7:00 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद भक्तीजी.