दिवाळी अंक २०२३ - वर्ल्डकपच्या निमित्ताने...

तुषार काळभोर's picture
तुषार काळभोर in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am
काही क्षण मनावर कोरले गेलेले असतात. एखादा क्षण कॅमेऱ्यात असा टिपला जातो की त्याचा अर्थ, संदर्भ, पार्श्वभूमी सर्व काही तो फोटो पाहताच डोळ्यांपुढे तरळून जातं.

उदा., लॉर्ड्स मैदानात टीशर्ट काढून फिरवणारा गांगुली
Ganguly

ईडन गार्डनवर चौथ्या दिवशी नाबाद राहून परतणारी द्रविड-लक्ष्मण यांची जोडी.
Dravid lakshman

असे काही क्षण क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासातदेखील घडलेले आहेत. एका क्षणाने, एका छायाचित्राने त्या आठवणी जाग्या होतात.

काही क्षण असेच ऐतिहासिक असतात!

१. १९८३ इंग्लंड
या एका कॅचने कदाचित भारतीय क्रिकेट बदलून टाकलं, इतकं या कॅचचं महत्त्व आहे!
Kapil catch

साठ षटकांत १८४सारखं माफक लक्ष्य. मजबूत फलंदाजी. क्रिकेट जगतावर राज्य करणारा संघ. आताच्या तुलनेतही स्फोटक वाटेल असा स्टार फलंदाज. सलग तिसरा वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्व गोष्टी अनुकूल असताना, त्या दिशेने दमदार वाटचाल सुरू असताना, कुणाच्या ध्यानीमनी नसताना कपिल धावत जाऊन हा कॅच पकडतो...

२. १९९२ ऑस्ट्रेलिया
वाया गेलेल्या वेळेसाठी नवीन लक्ष्य ठरवण्याच्या नियमाचं सर्वात (कु)प्रसिद्ध उदाहरण!

1992 South Africa need 22 of 1

या वर्ल्डकपआधी जर पावसामुळे षटके कमी करावी लागली, तर पाठलाग करणाऱ्या संघाला नवे लक्ष्य देताना पहिल्या डावातील धावांची सरासरी विचारात घेतली जायची. पण पाठलाग करणाऱ्या संघाला (ध्येय समोर असल्याने) थोडा फायदा मिळतो, हा विचार करून रिची बेनॉ यांच्यासह आणखी काही तज्ज्ञांनी एक नवा नियम आखला. त्यानुसार जर पावसामुळे वेळ वाया गेला आणि पाठलाग करणाऱ्या संघाची षटकं कमी करावी लागली, तर आधी फलंदाजी केलेल्या संघाची सर्वात कमी धावा झालेली षटकं वजा केली जाणार होती. थोडक्यात, जर दहा षटकं वाया गेली आणि दुसऱ्या संघाला चाळीस षटकं मिळणार असतील, तर पहिल्यांदा फलंदाजी केलेल्या संघाची सर्वाधिक धावा झालेली षटकं ग्राह्य धरून दुसऱ्या संघाला तेवढं लक्ष्य मिळणार होतं.

या नियमात विचित्र काय आहे, त्याची झलक इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाहायला मिळाली होती. पाकिस्तान पहिल्यांदा फलंदाजी करताना ७४ धावांत आटोपला. पावसाने तीन तासांचा वेळ वाया गेला. इंग्लंडला सोळा षटकांत ६४ असं लक्ष्य दिलं. आठ चेंडूंत चाळीस धावा हव्या असताना पुन्हा पाऊस आला आणि सामना अनिर्णित राहिला. या विचित्र नियमामुळे जर इंग्लंड हा सामना हरला असता, तर ते कमनशिबी ठरले असते.

पुढे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र इंग्लंडचा संघ याच नियमाच्या दुसऱ्या बाजूला होता.
पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडने ४५ षटकांत ६ बाद २५२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने ठरलेल्या वेळेत कमी षटकं टाकल्याने त्यांना आर्थिक दंड झालाच, तसंच या वाया गेलेल्या वेळेचा फटका त्यांना नंतर बसला. दुसऱ्या डावात जॉन्टी ऱ्होड्सच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर शेवटच्या पाच षटकांत दक्षिण आफ्रिकेला ४७ धावा हव्या होत्या. हलका पाऊस सुरू होता, तो बऱ्यापैकी वाढला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेला तेरा चेंडूत २३ धावा हव्या होत्या. फलंदाज ब्रायन मॅकमिलन आणि डेव्ह रिचर्डसन यांना फलंदाजी सुरू ठेवायची होती. पण इंग्लिश कर्णधार ग्रॅहम गूचने विरोध केला. पंचांनी परिस्थिती खेळण्यासाठी अनुकूल नसल्याने खेळ थांबवला. आता वेळ वाया गेल्याने जितकी षटकं कमी होतील, तेवढी षटकं इंग्लंडच्या डावातून वजा केली जाणार होती. पण ज्यात सर्वात कमी धावा निघाल्या ती षटकं. २.१ षटकं शिल्लक होती. इंग्लंडच्या डावात दोन षटकं निर्धाव होती. म्हणजे आता वाया जाणाऱ्या वेळामुळे केवळ चेंडू कमी होणार, धावा कमी होणार नव्हत्या! लवकरच पाऊस थांबला. बारा मिनिटांचा खेळ वाया गेल्याने दक्षिण आफ्रिकेचं एक षटक कमी झालं, पण धावा तेवढ्याच करायच्या होत्या. आता सात चेंडूत तेवीस धावा असं नवं लक्ष्य मिळालं. अ‍ॅडलेडच्या ३५००० प्रेक्षकांना ही गोष्ट रुचली नाही. त्यांनी गोंधळ सुरू केला.
पण गोंधळ केवळ प्रेक्षकांनी घातला नव्हता. सहा चेंडू कमी झाल्याची घोषणा चॅनल नाइनच्या समलोचकांनी केली. पण दक्षिण आफ्रिकेचे व्यवस्थापक ॲलन जॉर्डन यांनी त्यांना ती माहिती दिली होती आणि ती चुकीची होती. इंग्लंडच्या डावातील त्या दोन निर्धाव षटकांत एक लेगबाय धाव असल्याने लक्ष्य २१ धावांचं केलं गेलं. पण प्रेक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज अनभिज्ञ असताना ते मैदानावर परत येईपर्यंत नव्या लक्ष्याची घोषणा झाली..

३. १९९२ ऑस्ट्रेलिया
Jonty Rhodes

हा फोटो (खरं तर व्हिडिओमधील एक फ्रेम) अस्पष्ट नाहीये. मध्ये ते काहीतरी धूसर हिरव्या रंगाचं दिसतंय ना, तो एक माणूस आहे. असा खेळाडू, ज्याने क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाच्या कल्पनाच बदलून टाकल्या.

१९७० साली आयसीसीने दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी वातावरणाविरुद्ध कारवाई म्हणून त्या संघावर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यावर बंदी घातली. त्यामुळे १९७५, ७९, ८३ आणि ८७ अशा चार एकदिवसीय वर्ल्डकपला ते मुकले. दक्षिण आफ्रिका जर त्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असता, तर पहिल्या चार वर्ल्डकपचं चित्र नक्कीच वेगळं दिसलं असतं. १९९१मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सरकारी वर्णद्वेषी वातावरण बदलल्याने आयसीसीने बंदी मागे घेतली आणि १९९२मध्ये दक्षिण आफ्रिकेला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय खेळण्यावर बंदी असली, तरी स्थानिक स्तरावर क्रिकेट जोरदार सुरू होतं. त्यामुळे गुणवान आणि दर्जेदार खेळाडू होतेच. त्या गुणांची आणि दर्जाची चुणूक या स्पर्धेत सर्व संघांना पाहायला मिळाली आणि क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळालं की हवेत झेपावत झेल पकडले जातात, स्टंपावर थेट फेक करून धावचीत करता येतं, जे बॉल आधी स्लिपच्या किंवा थर्ड मॅनच्या डोक्यावरून मारले जायचे, तेसुद्धा आता सुरक्षित नव्हते.

४. १९९६ भारत
Vinod kambli 1996

चेहरा दिसत नसला, तरी हा खेळाडू कोण आहे, तो काय करतोय, त्याच्या आधी आणि नंतर काय झालं, हे एक शब्दही न बोलता प्रत्येकाच्या मनात स्पष्ट माहीत आहे! समकालीन फलंदाजांमध्ये आकर्षक अशी शैली असणारा विनोद कांबळी आपल्या भावना आवरू शकला नाही. त्या वर्षी श्रीलंकेचा संघ विलक्षण वेगळ्या मूडमध्ये होता. पहिल्या पंधरा षटकांत असणाऱ्या क्षेत्ररक्षणाच्या मर्यादांचा पुरेपूर उपयोग करून घेणारी जयसूर्या-कालुवितरणा जोडी, स्थैर्य देऊन धावफलक हलता ठेवणारे डिसिल्वा-महानामा-रणतुंगा, अतिशय टाइट गोलंदाजी करणारे चामिंडा वास आणि जयसूर्या, फिरकीचा जादूगार मुरलीधरन असे प्रचंड गुणवंत खेळाडू असलेला श्रीलंकेचा संघ अतिशय शांतपणे उपांत्य फेरीत पोहोचला. मैदान लाखभर प्रेक्षकांनी भरलेलं ईडन गार्डन्स. समोर सिद्धू, अझरुद्दीन, कांबळी, जडेजा, मांजरेकर आणि अर्थातच ऐन भरात असलेला सचिन, अशा दमदार फलंदाजांनी सज्ज भारतीय संघ. सोबत प्रसाद-कुंबळे-श्रीनाथ असे शांतीत क्रांती करणारे गोलंदाज. सामना अटीतटीचा होणार यात शंका नव्हतीच. पण सचिनची फलंदाजी अशी की श्रीलंकेच्या २५३ धावांचे आव्हान अगदीच किरकोळ वाटू लागले. पण ते म्हणतात ना, पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त! चेंडू वळायला लागला. चांगला हातभर वळायला लागला! शेन वॉर्नच्या बॉल ऑफ द सेंच्युरीपेक्षा जास्त. पुढे सांगण्यासारखं काही नाही....

४ब. भारत
1996 Prasad and Sohail

भारत-पाकिस्तान सामना रोमांचक होण्याचे दिवस होते ते! पुढे सचिनने शोएब अख्तरला अपरकट करून भिरकावून टाकेपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूचा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील हा सर्वोत्तम स्वॅग होता!

५. २००३ दक्षिण आफ्रिका
Sachin 2003

या फोटोविषयी म्या पामर काय लिहिणार! फारएन्ड यांनी या सामन्याविषयी फार सुंदर आणि रोमांचक लिहिलंय!

६. २०११ भारत
Dhoni 2011 six

थोडा क्लोजअप पाहा!
Dhoni finishes in style

त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या डोळ्यांत काय दिसतंय?

तुमच्या आठवणीतले क्रिकेटमधील संस्मरणीय क्षण कोणते आहेत?

ता. क. : २०२३ भारत
Glenn Maxwell

पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ यंदा विजेतेपदाचे दावेदार नसले, तरी ते किरकोळ संघ नाहीत. इंग्लंड तर गतविजेता. या तीन संघांना हरवून अफगाण संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध उभा ठाकला. झदरानच्या नाबाद शतकाच्या जोरावर त्यांनी ऑस्ट्रेलियाला २९२ असं आव्हानात्मक लक्ष्य दिलं. पाठलाग करताना त्यांची अवस्था ९१/७ अशी झाली. हा या वर्ल्डकपमधील सर्वात धक्कादायक निकाल ठरला असता. पण चाळीस वर्षांपूर्वी झिम्बाब्वेविरुद्ध १७/५ स्थितीतून नाबाद १७५ धावांची खेळी करणारा कपिल आणि त्याला तितकीच महत्त्वाची साथ देणारा किरमाणी यांनी जे केलं, ते ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांनी केलं. मुंबईच्या उकाड्यात मॅक्सवेलच्या पायात गोळे येऊ लागले. बेचाळिसाव्या शतकात तर एक धाव घेऊन तो झोपला. असह्य वेदना होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. फिजिओ आला. नाक फुटलेलं असताना सोळा वर्षांचा पोरगा 'मैं खेलेगा अली, मैं खेलेगा' ज्या तडफेने म्हणाला, ती तडफ दाखवून मॅक्सवेलने खेळ सुरू ठेवला.
आणि घडली एक ऐतिहासिक खेळी. अद्भूत, अविस्मरणीय. सर्वकालिक सर्वोत्तम एकदिवसीय खेळी.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2023 - 1:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रिकेट इतिहासातील काही क्षण उत्तम टीपले आहेत. चांगल्या आठवणी.
एका चेंडुतलं २२ धावांचं लक्ष्य तर कोणीच विसरु शकणार नाही.
बाकी, उत्तम आठवणी. धन्यवाद.

सध्याच्या या विश्वचषकातला क्षण सांगायचा तर विलंबचीतचा क्षण.

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

13 Nov 2023 - 3:29 pm | कुमार१

क्षणचित्रे सुंदर !!

ग्लेन मॅक्सवेल चा पराक्रम अजून डोळ्यासमोर आहे. बाजी प्रभू ची आठवण करून देणारा! तो अजून भूत काळात नाही गेलेला. मग ह्या अंकात कसा आला?

अथांग आकाश's picture

14 Nov 2023 - 9:54 pm | अथांग आकाश

सौरव गांगुलीचा आणि विनोद कांबळीचा प्रसंग लक्षात आहे

प्रचेतस's picture

15 Nov 2023 - 5:07 am | प्रचेतस

खूपच सुरेख. हे सर्वच क्षण कायमचे लक्षात राहणारे आहेत.
असाच एक क्षण म्हणजे ९२ च्या वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान सामन्यातील मियाँदादच्या माकडउड्या

https://youtu.be/77qmX6_AHDI?si=AMcN1H-MDS3SlV9A

मुक्त विहारि's picture

15 Nov 2023 - 7:50 pm | मुक्त विहारि

लेख आवडला.

कर्नलतपस्वी's picture

17 Nov 2023 - 10:03 am | कर्नलतपस्वी

काही क्षण असे असतात जे कधीच जनमानसात कायमचे स्थाईक होतात. जणू ध्रुव तारा.

छान संकलन.

मस्त लेखन विषय 👍
आता क्रिकेट बघणे बंद केल्याने एक शेवटचा २०२३ चा सोडुन वरचे सर्वच प्रसंग आठवतात!

भारत-पाकिस्तान सामना रोमांचक होण्याचे दिवस होते ते! पुढे सचिनने शोएब अख्तरला अपरकट करून भिरकावून टाकेपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूचा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील हा सर्वोत्तम स्वॅग होता!

त्यातला हा प्रसंग माझा सगळ्यात आवडता आणि अविस्मरणिय 😍
सईद अन्वर आणि अमिर सोहैल ही पाकिस्तानची सलामीची यशस्वी जोडी क्रीजवर...
वेंकटेश प्रसादच्या चेंडुवर अमिरने चौकार लगावल्यावर प्रसादला खिजवण्यासाठी बॅटने सिमारेषेकडे केलेला इशारा...
मला वाटतं पुढच्या की त्याच्या पुढच्या चेंडुवर अमिरला त्रिफळाचीत केल्यावर प्रसादने त्याच्या खिजवण्याची परतफेड करत त्याला ड्रेसिंग रुमची दिशा दाखवणारा हाताने इशारा करताना दाखवलेला 'स्वॅग' हे सर्वकाही डोळ्यांसमोर अजुनही जसेच्या तसे येते!

पाषाणभेद's picture

30 Nov 2023 - 4:26 pm | पाषाणभेद

क्रिडा क्षेत्रावरील लेख त्यातील छायाचित्रांमुळे अधिक उठावदार झाला आहे.

श्वेता व्यास's picture

22 Dec 2023 - 1:57 pm | श्वेता व्यास

क्रिकेटमध्ये आता फार रस उरला नसला तरी लेख छान आहे.