प्रथमतः सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
नमस्कार मंडळी
'भटकंती' ही या वर्षी मिपा दिवाळी अंकाची थीम असणार, हे वाचले आणि लगेच लेख टंकायला घेतला. दर वर्षी सहसा माझी कोकणात फेरी होतेच. दर वेळेस मी एका अनामिक ओढीने कोकणात जातो आणि काहीतरी नवेच गवसते. बऱ्याचदा ही फेरी कुलदैवताला जाण्याच्या निमित्ताने होते. गम्मत म्हणा किंवा योगायोग - माझे आणि बायकोचे कुलदैवत गणपतीपुळ्याच्या ३-४ कि.मी. अलीकडे (ढोकमळे) आणि पलीकडे (मालगुंड ) आहे. सासर- माहेरही तसेच - कल्याण-डोंबिवली आणि मूळ गावही खाडीच्या अलीकडे (हिंदळे)/पलीकडे (मिठबाव). हे कसे काय झाले असेल? असा एक विचार नेहमी माझ्या मनात येतो.
दर वर्षी आमची ही फेरी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये सुट्ट्या बघून होते, पण या वेळी मात्र वर्षअखेरीपर्यंत न थांबता ऑगस्टमध्येच ही फेरी करायचे निश्चित झाले. मध्ये जोडून सुट्ट्याही मिळाल्या. घरची गाडी आणि ड्रायव्हर असल्याने तिकिटे वगैरे काढण्याची झंझट नव्हती. मनात आले की निघालो. कोकणात राहायची/खायची सोय कुठे ना कुठे होतेच आणि त्यात सध्या सीझन नसल्याने तसे निवांत होतो. गाडीत इंधन-हवा भरली, फास्टॅगमध्ये पैसे भरले. थोडे पैसे जवळ ठेवले आणि जुजबी कपडे घेऊन सकाळी निघालो. रत्नागिरीला उतरायला सगळ्यात सोयीस्कर म्हणजे आंबा घाट. त्यामुळे पुणे-सातारा-कराड-कोकरूडमार्गे आंब्यात उतरलो. कराडला रस्त्याची वाट लागली आहे, तेवढी वगळता प्रवास चांगला चालू होता. हायवे सोडला आणि वाटेत मस्त ऊन-सावलीचा खेळ सुरू झाला. कोकरुडजवळ घाटात रस्त्याला एकदम लागून पवनचक्क्या आहेत, तिथे थांबून थोडे फोटो काढले आणि पुढे झालो.
हळूहळू भूकेची जाणीव होऊ लागली. पण रस्त्यात चांगली हॉटेल्स दिसेनात. एखादे दिसलेच तर गाडी तोवर पुढे गेलेली असे. पुन्हा मागे वाळवायला कंटाळा येई. असे करत करत बरेच पुढे आलो.आंबा घाट ४-५ कि.मी. राहिला असताना मात्र पोटात कावळे कोकलायला लागले आणि आधी एकदा जिथे थांबलो होतो, त्या 'डोसा पॉइंट' नावाच्या हॉटेलात थांबलो.
निसर्गरम्य ठिकाणी हॉटेल आहे. त्यात अध्येमध्ये पाऊस पडत असल्याने हिरवेगार वातावरण होते.
पण गिर्हाइक कोणीच दिसले नाही. नाइलाज म्हणून डोश्याची ऑर्डर दिली आणि फ्रेश होऊन टेबलावर येऊन बसलो.
थोड्या वेळात डोसा आला. पण वाटले होते त्याप्रमाणे चव यथातथाच होती. जेमतेम जेवण उरकले आणि निघालो. पण हातात निदान पोट भरलेले असल्याने बरे वाटत होते. काही मिनिटांतच आंबा घाट सुरू झाला.आधी एक-दोन वेळा इथे राहून गेलो असल्याने तो परिसर ओळखीचा होता. मात्र अंधारून आले होते आणि पाऊस मध्ये मध्ये बरसत होता. त्यामुळे फारसे न थांबता तसेच पुढे निघालो. अंधार लवकर पडायची चिन्हे दिसत होती आणि शक्यतो अंधार पडायच्या आत मुक्कामी पोहोचण्याचा माझा प्रयत्न होता.
लवकरच आंबा घाटाची वळणे सुरू झाली आणि धुक्याने स्वागत केले. अपर लाइट लावूनसुद्धा फारसा फायदा होत नव्हता. सगळ्या गाड्या ब्लिंकरसुद्धा चालू ठेवून जात-येत होत्या. निसर्गापुढे माणूस शेवटी दुबळाच, याची सतत जाणीव होत होती. त्याच वेळी घाटातले सुंदर देखावे मात्र नजरेला वेड लावत होते. हळूहळू घाटाची उतरण सुरू झाली आणि धुके संपले. पाऊसही निवळला आणि जरा सूर्यप्रकाश दिसू लागला. बराच वेळ गेला असेल, चहाला थांबायची गरज वाटत होती, पण पुन्हा एकही हॉटेल दिसेना. नाणीज वगैरे पाठी पडले , बर्याच ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे चालू होती आणि त्यासाठी कडेची मोठमोठी झाडे एकतर तोडली होती किंवा तोडायचे काम चालू होते. वर्षानुवर्षे वाढलेली झाडे यांत्रिक करवतीने काही मिनिटांत जमीनदोस्त होत होती. ते बघून मनात कालवाकालव होत होती, पण सरकारी कामाला कोण अडवणार? मग बाजारवाडी का कायतरी आले आणि चहाला एक थांबा घेतला.
पाऊस पूर्ण थांबला होता आणि चांगला सूर्यप्रकाश होता, त्यामुळे बरे वाटत होते. अंधार पडायच्या आत मुक्काम गाठता येईल अशी खातरी वाटत होती. पण पुढे एक घोळ झाला - बायकोशी गपा मारता मारता निवळी फाट्याला डावीकडे आत जायचे सोडून सरळ पुढे गेलो. १० कि.मी. पुढे आल्यावर रस्ता चुकल्याचे लक्षात आले. एक-दोन स्थानिक लोकांना विचारले, तर ते म्हणाले, "इथून असेच पुढे गेलात तरी मालगुंडचा रस्ता मिळेल, पण रस्ता जरा खराब आहे." मग रिस्क घेण्यापेक्षा परत उलट फिरून निवळी फाट्याला आलो आणि बरोबर रस्ता पकडला.
थोडा वेळ गेला आणि अचानक रस्त्यात बराच ट्रॅफिक दिसू लागला. मोठमोठी वाहने एका रांगेत उभी होती. छोटी वाहने मात्र जात होती. काय झाले असावे याचा विचार करतच पूढे जात राहिलो, तर पुढे चाफे येथे दोन ट्रकची हेड ऑन धडक होऊन रस्ता अडला होता. सुदैवाने स्थानिक पोलीस पोहोचले होते आणि वाहतूक सुरळीत करायच्या प्रयत्नात होते. त्यामुळे फार वेळ न जाता तिथून लवकर सुटका झाली.
आता चाफ्यावरून डावीकडे वळून गणपतीपुळ्याची वाट धरली. साधारणपणे संध्याकाळचे ६ वाजले होते आणि अंधार पडायला अजून अवकाश होता. काय करावे? थेट मुक्कामाला जावे की पहिले देवदर्शन करावे अशी चर्चा चालू झाली. पण या वेळी फक्त २ दिवसात सगळे देवदर्शन पूर्ण करायचे असल्याने हाताशी वेळ कमी होता. त्यामुळे हाताशी असलेल्या वेळेचा सदुपयोग करावा, यावर एकमत झाले आणि गाडी नेवरे फाट्याला वळवली. खूप वेळाने आतल्या बिनाट्रॅफिकच्या रस्त्याला गाडी चालवायला बरे वाटत होते. थोड्याच वेळात बायकोचे कुलदैवत असलेल्या बंडिजाई देवीला पोहोचलो. छोटेखानी रस्ते, कौलारू घरे, संध्याकाळची उतरती उन्हे, गणपतीपुळ्यापासून जवळच पण पर्यटकांचा ओघ नसलेले सुशेगाद गाव. मंदिराची देखरेख करणाऱ्या केळकर गुरुजींच्या घरी पोहोचलो, रस्त्याकडेला गेट, तिथून साधारण २५-३० फूट खाली उतरणारा दगडी मार्ग आणि खाली ऐसपैस घर, आजूबाजूला फूलझाडे, पडवीत झोपाळा असे मस्त निवांत आयुष्य जगणे कोणाला नाही आवडणार? पण घरात काहीच चाहूल लागेना. कडी वाजवूनही उपयोग झाला नाही. अखेर बाजूच्या गोठ्यात झाडण्याचा आवाज येत होता तिकडे डोकावलो, तर एक गडीमाणूस दिसला. त्याने सांगितले की "बसा जरा, गुरुजी किंवा त्यांची पत्नी येतीलच इतक्यात." त्याप्रमाणे जरा झोपाळ्यावर टेकलो आणि पाणी प्यायलो. तोवर गुरुजी आलेच, देवळात दिवाबत्तीसाठीच गेले होते. देऊळ थोडे लांब आणि पुन्हा चिरेबंदी पायऱ्या उतरून जायला लागते. त्यामुळे आमच्याबरोबर पुन्हा न येता त्यांनी फक्त किल्ली दिली आणि "दर्शन घेऊन ओटी भरून परत द्या" म्हणाले.
किल्ली घेऊन आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत चिऱ्याच्या पायऱ्या उतरून खाली गेलो. देवळात चिटपाखरूही नाही. स्वच्छ परिसर, चारही बाजूंनी बांधलेला कट्टा , आसपास अनेक प्रकारची झाडे, वातावरणात पक्ष्यांची किलबिल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पानाफुलांची भरून राहिलेले सुवास असा एक मस्त माहौल तिकडे तयार झाला होता. कुलूप उघडून गाभाऱ्यात गेलो. तिथे पूर्ण अंधार, चाचपडत कसेतरी दिव्याची बटणे शोधून काढली आणि दिवा लावला. आत एक प्रकारचे गूढ वातावरण भरून राहिले होते. नुकत्याच लावलेल्या निरंजनाचा प्रकाश आणि उदबत्तीचा सुवास पसरला होता. त्यात श्रीदेव लक्ष्मीकांताची आणि बंदीजाईची मूर्ती सुंदर दिसत होती.
काही वेळ तिथे नि:शब्द बसून राहिलो. मग भानावर येऊन ओटी वगैरे भरली, दर्शन घेतले आणि पुन्हा कुलूप लावून बाहेर पडलो. मनात अनेक विचारांची दाटी झाली होती. आपल्याला इथे यावेसे का वाटते? इथे आल्यावर जिवाला शांतता का मिळते? आपली कुलदैवते म्हणजे आपले पूर्वजच असतील काय? कधीतरी त्यांच्यापासूनच आपला वंश सुरू झाला असेल काय? आपल्या पूर्वसुरीनी इतक्या अवघड ठिकाणी वस्ती का केली असेल? इथे काही शे वर्षांपुर्वी ते जेव्हा आले असतील, तेव्हा इथला परिसर कसा असेल? दाट जंगल, श्वापदे, भुतेखेते या सर्वांशी झगडून ते इथे कसे वसले असतील? अशा अडचणींमध्ये मनाचा धीर टिकून राहावा, म्हणून त्यांनी इथे ही दैवते स्थापली आणि सांभाळली असतील किंवा कसे? कशी त्यांनी आपले आचारविचार, यमनियम, उपासना सांभाळले असतील? एक न अनेक. विचारांच्या ओघातच चिरे चढून वरती आलो आणि पुन्हा किल्ली गुरुजींना नेऊन दिली.
आता पुढचा टप्पा होता मालगुंड. ढोकमळे फाट्याला बाहेर पडून उजवीकडे आरेवारे किनार्याच्या बाजूबाजूने रस्ता जात होता. थोड्याच वेळात घाट सुरू झाला आणि चढण लागली. उजवीकडे डोंगर आणि डावीकडे नजर जाईल तोवर अथांग पसरलेला चमचमणारा सागर , त्यात दूरवर पसरलेल्या मासेमारी करणाऱ्या होड्या असा सुंदर नजारा होता. शेवटी एक खिंड लागली आणि उतरण सुरू झाली. पाचच मिनिटांत गाडी गणपतीपुळ्यास पोहोचली. नेहमीसारखा आत शिरलो असतो, तर रात्री जेवायला भाऊ जोश्यांकडे नंबर लावला असता. पण आमचा मुक्काम पुढे असल्याने आत न शिरता पुढे निघालो आणि गावाला वळसा घालून खाडी ओलांडून मालगुंडमध्ये पोहोचलो. अजूनही पूर्ण अंधार झाला नव्हता, त्यामुळे मुक्कामी जाण्यापुर्वी आणखी एक देवदर्शन पूर्ण करावे, अशा विचाराने गाडी पुढे घेतली. पुढचे दर्शन होते मुसळादेवीचे. त्याची किल्ली घेण्यासाठी स्वाद डायनिंगवाल्या अमित मेहेंदळ्यांकडे पोहोचलो. डायनिंग हॉल उघडण्यास थोडा अवकाश होता, त्यामुळे तेही जरा निवांत होते. मग काही वेळ गप्पा झाल्या, कॉफी झाली आणि किल्ली घेऊन निघालो. देवीचे देऊळ गावात जरा आतल्या बाजूला आहे. रस्ता लहान आहे, पण बरेच ठिकाणी नवीन बंगल्यांची बांधकामे चालू असलेली दिसली. मालगुंड अजूनही तसे कमर्शियल झाले नाहीये, कदाचित गणपतीपुळ्यापासून जवळ आणि तरी जागेची किंमत कमी हे एक कारण असावे. मुसळादेवीचे मूळ स्थान अज्ञात आहे. त्यामुळे सगळ्या मेहेंदळ्यांनी एकत्र येऊन इथे देवीची स्थापना केली आहे.
देवीचे दर्शन घेऊन आणि ओटी भरून बाहेर पडलो. मेहेंदळ्यांकडे गप्पा मारत असतानाच "राहायची काही सोय झालीये का?" असा प्रश्न आला होता. नाही म्हणालो. मग मुक्कामासाठी त्यांनीच बापट होम स्टे म्हणून एक नाव सुचवले. स्वतःहोऊन त्यांना फोन करून आम्ही राहायला येत असल्याचे कळवूनही टाकले. त्यामुळे गाडी पुन्हा गणपतीपुळ्याकडे वळवली. खाडी पार करून लगेच हे ठिकाण आहे.
आवारात एका बाजूला त्यांचा बंगला आणि दुसऱ्या बाजूला दोन मजली इमारतीत पर्यटक निवास अशी सुटसुटीत व्यवस्था आहे. खोल्याही नवीन बांधलेल्या आणि स्वच्छ आहेत. भाडे १२०० ते १३००. त्यामुळे राहायची छान सोय झाली. रात्री पुन्हा घरगुती स्वादिष्ट जेवणासाठी स्वाद डायनिंग हॉलला भेट दिली आणि भरल्या पोटाने मुक्कामी परतलो.
रात्री २-३ वेळा वीज गेली आणि जनरेटरच्या आवाजाने जाग आली. पण तेवढे वगळता एकूण झोप छान लागली.
सकाळी लवकर आवरले आणि बाहेर पडलो. अंगणात प्राजक्ताचा सडा पडला होता.
मस्त सुगंधी सकाळ, वाफाळता चहाचा कप घेऊन गॅलरीत आलो, तर दूरवर समुद्राची गाज आणि अंगणात पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. सोनेरी उन्हे पसरली होती.
तयार होऊन निघालो आणि पहिले गणपतीपुळ्यात येऊन गरमागरम नाश्ता केला, मग चालतच देवळात गेलो. गर्दी अजिबात नसल्याने छान दर्शन झाले. प्रसाद घेतला आणि बाहेर पडलो, तोच रिमझिम पाऊस सुरू झाला. जरा आडोशाला उभे राहिलो, तोवर झरझर धारा कोसळू लागल्या आणि लोकांची धावपळ उडाली.
मागच्या बाजूला समुद्राला भरती आली होती आणि इकडे पावसाचे तांडव चालू होते. सुदैवाने १० मिनिटांत आभाळ फाकले आणि पुन्हा सूर्यदर्शन झाले. मग मात्र वेळ न घालवता बाहेर पडलो आणि गाडी काढून पुढच्या दिशेने कूच केले. पुन्हा चाफ्याला येऊन गाडी डावीकडे घातली आणि कोळिसरेचा रस्ता पकडला. वाटेत ठिकठिकाणी दिसणाऱ्या पाट्या आणि जोडीला गूगल असल्याने रस्ता कुठेही ना चुकता कोळिसरे फाट्यावरून उजवीकडे वळलो आणि छोटासा घाट उतरून मंदिरापाशी दाखल झालो. ईथे हा बोर्ड दिसला
गाडी लावून पुन्हा काही चिऱ्याच्या पायऱ्या उतरलो, तोवर मंदिराचे कळस दिसू लागले.
अतिशय शांत अनगड ठिकाणी हे देऊळ आहे. वाटेत हा ओहोळ ओलांडायला पूल आहे
पुर्वी मागच्या बाजूचा हा रस्ता नव्हता. वरती मराठे नावाचे पुजारी राहतात, त्यांच्या घराजवळून जवळपास ३०० पायऱ्या उतरून खाली दरीत यावे लागे. राहायची सोयही त्यांच्याकडेच होत असे. मी १९९५-२००० दरम्यान इथे काही वेळा येऊन गेलो असल्याने पूर्वी आणि आत्ताचा फरक नक्कीच जाणवतो.
इथे पोहोचलो, तेव्हा पूजेची तयारी चालू होती. अनायासे गुरुजींनी विचारले की अभिषेला बसणार का? त्यामुळे सोवळे नेसले आणि बसलो. लक्ष्मीकेशवाची पुरुषभर उंच मूर्ती गंडकी शिळेतून घडवली आहे, पण अभिषेकाची मूर्ती धातूची आहे. मुख्य मूर्तीला कमान आहे आणि त्यावर प्रभावळ फार सुंदर कोरली आहे.
विष्णूच्या हातातील शंख्, पद्म्, गदा आणि चक्र यांच्या क्रमानुसार जी नावे घेतली जातात, ती अशी -
त्याबद्दल सर्व माहिती देवळातील फलकावर आहे. यथावकाश विष्णुसहस्रनामासहित अभिषेक पार पडला.
आरती आणि तीर्थप्रसाद घेतला आणि बाहेर पडलो. मंदिराच्या आसपास अतिशय रम्य परिसर आहे. एका बाजूस दरीत उतरायला पायऱ्या आहेत. तिथे खाली एक स्वच्छ पाण्याचा झरा वाहत येतो. तो देवाच्या पायाखालून येतो, म्हणून त्याला अतिशय महत्त्व आहे. पावसचे श्री स्वरूपानंद स्वामी यांच्यासाठी पिण्याचे पाणी नेहमी इथून नेले जात असे.
आवारातील एक पुरातन वृक्ष
तिथे थोडा वेळ घोटाळलो. पोटभर पाणी पिऊन घेतले आणि बाटल्या भरून घेतल्या. आवारात रत्नेश्वर महादेव, मारुती अशी देवळे आहेत. तिथे दर्शन घेतले. वाटेत एका ठिकाणी या माऊने अशी पोझ दिली
गुरुजींना जेवणाचे विचारले. पण जेवणाला अजून वेळ होता आणि आम्हाला वेळेत पुण्याला परतायचे होते. ६-७ तासांचा रस्ता होता. त्यामुळे फार वेळ थांबणे शक्य नव्हते. अखेर भरल्या मनाने आणि जड पायांनी तिथून निघालो. येताना वाटेत चाफ्याला थांबून काजूगर आणि कोकम आगळ घेतले, थंडगार ताक प्यायलो आणि परतीचा प्रवास सुरू केला ते पुढच्या वर्षी यायचा संकल्प सोडूनच.
प्रतिक्रिया
12 Nov 2023 - 12:46 pm | कर्नलतपस्वी
अतीशय सुदंर असा परीसर. 'माडाच्या बनात ' हे आवडते रहाण्याचे ठिकाण. कोकण म्हणले की मनात येणारी तीन ठिकाणं. पाळंदे,मालगुंड आणी तार्कर्ली. वर्षातून एकदा जातोच.
12 Nov 2023 - 1:00 pm | गवि
अतिशय जिव्हाळ्याचा परिसर दाखवलात. धन्यवाद.
रत्नागिरी स्टँडवर खूप खूप पूर्वी, एक स्थानिक बसेसचा विभाग उर्फ उपस्टँड होता. त्यावर आसपासच्या यच्चयावत गावांची नावे असत. म्हणजे बुवा या या गावी जाणारी बस इथे लागेल.
त्यात कोकरुड, आरे, वारे, नेवरे, बसणी, पोमेंडी, टेंबेपूल, कोतवडे, सैतवडे, पूर्णगड, चाफे, हातखंबा, निवळी, चिंचखरी, पूर्णगड, पावस, कसोप, फणसोप, ....
हं.
12 Nov 2023 - 2:03 pm | भागो
सुंदर लेख. फोटू पाहून डोळे निवाले. माझे मूळ कोकणातले. गोव्यात देवी. तिकडे बर्याच वेळा जाणे झाले पण राजापूरच्या जवळ गावी जाणे अजून झाले नाही. हे असे लेख वाचले कि अस्वस्थ व्हायला होते. वाटते एकदा जायला पाहिजे. तिकडे आमचे पडके घर आहे असे भावकीतले सांगतात. तेथे जाऊन एकदा एक तरी पाणती स्वहस्ते लावायला पाहीजे.
12 Nov 2023 - 6:03 pm | गोरगावलेकर
खूप छान वर्णन केले आहे. गणपतीपुळे, मालगुंडला खूप वर्षांपूर्वी ओझरती भेट दिली आहे त्या आठवणी ताज्या झाल्या. मंदिरांची माहिती वगैरे गोष्टी नव्यानेच कळल्या.
12 Nov 2023 - 10:29 pm | अथांग आकाश
सुंदर लेख आणि छायाचित्रे!
13 Nov 2023 - 9:43 am | प्रचेतस
सुंदर लेखन, कोकण आहेच अतिशय सुंदर.
लक्ष्मीकेशवाची मूर्ती अतिशय सुरेख आणि निःसंशय प्राचीन आहे. बहुधा शिलाहारकालीन असावी, दाक्षिणात्य शैली आहे.
13 Nov 2023 - 7:10 pm | टर्मीनेटर
छान वर्णन आणि झकास फोटोज 👍
क्या बात! हे वातवरण अनुभवणे ही एक पर्वणी असते...
13 Nov 2023 - 7:33 pm | राजेंद्र मेहेंदळे
"मुख्य मूर्तीला कमान आहे आणि त्यावर प्रभावळ फार सुंदर कोरली आहे." ईथे कॉलिंग प्रचेतस असे टंकले होते.
लक्ष्मी केशवाच्या मूर्ती बद्दल अजुन जाणुन घ्यायला आवडेल.
13 Nov 2023 - 8:32 pm | अनन्त्_यात्री
प्रचि. विष्णूची चोवीस नावे व शं/च/ग/प यांचा combinatorial sequence यातील संबंधाबाबत नवी माहिती समजली.
11 Dec 2023 - 8:18 pm | श्वेता व्यास
+१
14 Nov 2023 - 9:32 pm | मुक्त विहारि
सेम... गोव्या बाबतीत...
गाडी घ्या आणि मनसोक्त फिरा...
15 Nov 2023 - 8:57 am | कुमार१
सुंदर लेख व प्रचि !
17 Nov 2023 - 12:24 am | अमरेंद्र बाहुबली
मस्त प्रवास. तुमच्यासोबत आमचाही.
3 Dec 2023 - 5:49 pm | चौथा कोनाडा
अतिशय सुंदर भटकंती वर्णन आणि प्रचि सुद्धा !
अहाहा ,,,,,
मुसळादेवीची पितळी मूर्ती सुंदर आहे !
लक्ष्मीकेशवाची मूर्ती तर अप्रतिमच !
विष्णूची चोवीस नावे : हे असं पहिल्यांदाच वाचण्यात आलं !
मजा आली वाचताना,
... आता लवकरच इथली सहल ठरवावी लागेल !
11 Dec 2023 - 8:20 pm | श्वेता व्यास
छान सुटसुटीत प्रवास आणि सहल झाली आहे.
देवदर्शन वाचतानादेखील मनाला प्रसन्नता लाभली.
बाकी आम्ही गणपतीपुळे सहलीत ३ दिवस रात्रीचं जेवण स्वाद मध्येच केलं होतं, उत्तम चव आहे.
17 Dec 2023 - 6:52 am | पर्णिका
A serene and peaceful journey!
लक्ष्मीकेशव आणि मुसळादेवी या मूर्ती किती सुरेख आहेत!
लेख फारच सुंदर ... परत परत वाचणार.