दिवाळी अंक २०२३ - ग बाई माझी करंगळी दुखावली

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am
करंगळी

वाहनांशी तसा माझा संबंध केवळ ती चालवण्यापुरता मर्यादित आहे. असे असताना गेल्या काही वर्षांपासून त्या वाहनांची कामगिरी, कारागिरी, त्यातील लहान-मोठे दोष, उणिवा समजून घेणे, त्यावर चर्चा करणे आवडते. रस्त्यावरील वाहतुकीचे नियम या विषयाला वाहिलेल्या आमच्या एका व्हॉट्सअ‍ॅपवरील ग्रूपमधल्या चर्चांमध्ये मी नेहमी सहभागी होत असतो. त्यात जास्त लक्ष देण्यामुळे रस्त्यावरील चालणार्‍या वाहनांकडे आपसूक लक्ष जात राहते. त्यातून आपल्या वाहनातील दोष, तसेच देखभालीकडेही लक्ष जाते. इतर वाहनांमधील तुलना मनात होऊन काय योग्य अयोग्य आहे याबाबत मत पक्के होत जाते, हादेखील एक फायदाच आहे.

असे करताना आपसूक चारचाकी वाहनांमधील एसीची तुलना करण्याची सवय लागली. ज्या ज्या चारचाकीमध्ये बसलो, त्यातील एसी कसा काम करतो, हवा थंड आहे का? ती कितपत थंड आहे? इत्यादी बाबी लक्षात येऊ लागल्या. एकदा माझ्या मामेभावाच्या चारचाकीत एका गावाला सायंकाळी जाणे झाले. गाडीत आम्ही दोघेच असल्याने मी पुढच्याच सीटवर बसलो होतो. त्या गावी पोहोचेपर्यंत गाडीत मला विशेष त्रास जाणवला नाही. परतताना रात्र झाली होती. येताना मला गाडीत चक्कर आल्यासारखे वाटू लागले. त्यानंतर मळमळ किंवा उलटीचीही भावना होऊ लागली. समोरील काच वायपरने घासली गेली होती. काचेवरील अर्धवर्तुळाकार ओरखड्यांमुळे समोरील वाहनांचा येणारा प्रकाश मला त्रासदायक ठरू लागला होता. काचेतून पाहून त्रास अधिक वाटत असल्याने माझी नजर मी इतरत्र वळवली. परतत असताना थोडा पाऊस लागला. खिडक्यांतून पाऊस लागू नये, म्हणून खिडक्या बंद केल्या व गाडीतील एसी सुरू केला. एसीच्या कोंदट हवेमुळे मला होणार्‍या त्रासात अधिकच भर पडली.

मला माझ्या स्वत:च्या गाडीतील एसीची सवय असल्याने इतरांच्या एसीच्या हवेतील फरक लगेचच जाणवतो. काही एसी देखभाल न केल्याने एक वेगळाच दर्प असलेली हवा बाहेर टाकतात. हवेतील नैसर्गिक ताजेपणा, उल्हासितपणा त्या एसीच्या हवेत नसतो. त्यातच काही वाहनचालक नशा आणणारे तंबाखूयुक्त पदार्थ, सुगंधित पदार्थ, गुटका इत्यादी खात असतात, किंवा त्या वाहनात तसे पदार्थ सेवन करणारे प्रवासी प्रवास करतात किंवा या आधी तसले प्रवासी त्या वाहनात बसलेले असतात. त्यामुळेदेखील गाडीत तो वास भारलेला असतो. गाडीचे इंटेरिअर, कुशन, कारमधले पायपुसणे इत्यादींनी तो वास शोषलेला असतो. गाडीच्या काचा बंद केल्या व एसी सुरू केला की गाडीच्या आतील हवा थंड होऊन गाडीत तीच हवा पसरली जाते. माझासारखे या दर्पाला जास्त सजग असणार्‍यांना या वासाचा त्रास होतो.

वर उल्लेखलेल्या प्रवासात आमच्या परतीचे ठिकाण लवकर आल्याने मला उलटी वगैरे काही झाली नाही. मामेभावाला त्याच्या गाडीच्या एसीबद्दल तक्रार केली तर तो थोडा नाराज झाला.
माझ्या जवळच्या एका नातेवाइकांच्या वाहनातून प्रवास करताना मला असल्याच प्रकारचा त्रास नेहमी होतो. अगदी जवळचे नाते असल्याने मला त्यांच्याच वाहनातून एकत्र प्रवास टाळणे शक्य नसते, तरीदेखील दोन-तीन वेळा मला त्यांचा चारचाकीत असल्याच एसीच्या वासाने हैराण केले आहे. एकतर त्यांना सुगंधित पान खाण्याची सवय आहे. उद्या पहाटे जर प्रवासाला निघायचे असल्यास रात्रीच त्या ठरलेल्या पानवाल्याकडून ते पानांचा साठा तयार करून घेतात, इतकी वाहन चालवताना पान खाण्याची सवय आहे. एकदा तर त्यांच्या वाहनात ते नातेवाईक नव्हते, तर बदली ड्रायव्हर होता. तो काही खाणारा नव्हता, तरीदेखील मला त्या वाहनात उलटीची भावना, मळमळ होणे असा त्रास झाला तो झालाच. सुदैवाने प्रवासाचे ठिकाण जवळच असल्याने इतर काही प्रकार झाला नाही.

एका नातेवाइकांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या मोठ्या ट्रकमधून नाही, पण त्यांच्या खाजगी चारचाकीत एक-दोन वेळा मला गावातल्या गावात प्रवास घडला. त्या वाहनांत उलटी, मळमळ असे काही झाले नाही, पण ते गाडीतला एसी अयोग्य पद्धतीने वापरत असल्याचे पाहून मी आश्चर्यचकित झालो. त्यांच्या गाडीत बसल्यावर त्यांनी एसी सुरू केला, तेव्हा नैसर्गिक थंड हवेचा झोत काही जाणवला नाही. मी काही बोललो नाही, पण लक्ष आपसूक एसी कंट्रोल पॅनलवर गेले. तेथला एअर सर्क्युलेटिंगचा लिव्हर बाहेरील हवा आत घेण्याच्या बाजूला होता. मी तो बंद केला व त्यांना तो लिव्हर मी सेट केला तसाच योग्य आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी मीच कसा अयोग्य आहे हे सांगितले, पण मी त्यांना त्या लिव्हरची तांत्रिक बाजू, त्याचा वापर समजावून दिले. मग त्यांना थोडे पटल्यासारखे झाले. नंतर त्यांनी त्याचा कितपत वापर केला, हे काही समजले नाही कारण नंतर त्यांच्या गाडीत कधी बसण्याचा योग आला नाही.

माझे एक नातेवाईक असे आहेत की ते स्व:त वाहन कधीही चालवत नाहीत. चारचाकी वाहन चालवण्याचा त्यांनी क्लास वगैरे लावूनही त्यांच्यात वाहन चालवण्याचे धैर्य काही आले नाही. बाहेरगावी जाण्यासाठी ते ड्रायव्हर घेऊन जातात. आपले वाहन इतरांच्या ताब्यात दिल्यावर जे व्हायचे ते होते. बाहेरून किंवा आतून त्यांचे वाहन चांगले जरी असले, तरी मला त्यांच्या वाहनात कोंदट वास जाणवतोच. बहुधा त्यांचे निरनिराळे ड्रायव्हर्स पान-तंबाखूचे शौकीन असावेत.

इतरांच्या वाहनांतील वास व त्याचा एसी हवेशी, एसीच्या देखभालीच्या स्थितीबाबत जाणून घेण्याची व त्याचा त्या वाहनधारक किंवा वाहनचालक यांची मन:स्थिती ताडून पाहण्याची माझी सवय एकदा माझ्या अंगाशी आली होती. झाले असे की गेल्या महिन्यात मी मोटरसायकलने हायवेने शहरात प्रवेश करत होतो. बाजूलाच सर्व्हिस रोड समांतर जात होता. एका चौफुलीवर स्पीड ब्रेकर असल्याने माझी मोटरसायकल मी अगदी हळू करून त्या स्पीड ब्रेकरच्या अगदी डाव्या हाताला ठेवली, जेणेकरून तेथे त्या ब्रेकरचा उंचसखलपणा कमी असावा. त्याच वेळी एक पॅसेंजर कार माझ्या उजव्या बाजूने जात होती. त्या कारमधून प्रवाशाला त्या चौफुलीवर उतरायचे असल्याने तिचा वेग काही जास्त नव्हता. त्या कारच्या खिडक्यांच्या काचा खालीच होत्या. ज्या वेळी ती कार माझ्या जवळून गेली, त्या वेळी त्या कारमधून मला त्रासदायक ठरणारा गुटकामिश्रित वास माझ्या नाकाला झोंबला. एवीतेवी कार हळू झालेली होतीच, त्यातून ती थांबण्याच्या बेतात होती. मी त्या कारच्या डावीकडे थोडे अंतर राखून स्पीडब्रेकरवर होतो. तो वास नक्की त्याच कारमधून व त्या गुटख्याच्याच कारणामुळे येतो आहे, हे मला ताडून पाहण्याची ऊर्मी मला स्वस्थ बसू देत नव्हती. स्पीड ब्रेकर संपल्या संपल्या मी त्या कारच्या डाव्या बाजूच्या मागच्या दरवाजाजवळ थांबलो. त्या वाहनधारकाला प्रवासी उतरवून देऊन चौफुलीवरून सरळ न जाता डाव्या रस्त्याला जायचे असल्याने त्याने त्याची कार त्याच दिशेने वळवून माझ्या मोटरसायकलच्या अगदी जवळ आणून ठेवली. माझ्या डाव्या बाजूने सर्व्हिस रोडचा ट्रॅफिक वेगात जात असल्याने मला त्या कारपासून जास्त अंतरही थांबता येत नव्हते. तेवढ्यात कारमधून मागील दरवाजा उघडून एक महिला प्रवासी त्यातून उतरली. त्या कारचा दरवाजा माझ्या मोटरसायकलच्या अ‍ॅक्सिलरेटरच्या लिव्हरला लागला व त्या दरम्यान माझ्या उजव्या हाताच्या करंगळीला इजा पोहोचली. दरवाजा हळू आदळल्याने काही गंभीर दुखापत न होता केवळ खरचटले व दोन दिवस करंगळी सरळ करता येत नव्हती. त्या कारचालकाने व त्या महिला प्रवाशाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तेवढ्या वेळेत मला कारच्या उघड्या काचेतून मला त्रासदायक ठरणारा तंबाखू-गुटखामिश्रित वास आला व माझ्या मनात जे होते, त्याला एक प्रकारे पुष्टी मिळाली.

प्रतिक्रिया

रामचंद्र's picture

13 Nov 2023 - 12:13 pm | रामचंद्र

आपल्या 'मिपा'नावाशी विसंगत अशी आपली संवेदनशीलता आहे. त्या त्या वेळी जाणवणारा पण तितकीशी दखल घेतली न जाणारा हा मुद्दा चांगला मांडलाय.

तुषार काळभोर's picture

13 Nov 2023 - 1:03 pm | तुषार काळभोर

तुमच्या भावनांशी १००% सहमत.
विमल/आरेमडी, सिट्रसवर्गीय सुगंधी द्रव, काही दिवस रस्त्यावर उभी राहून तापलेल्या गाडीतील कुबट वास, बाहेरील हवा खेचण्याचा एसीचा कंट्रोल कधीच न वापरणे, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी प्रचंड तापदायक, त्रासदायक आहेत.

बेशिस्त सामाजिक जीवनशैलीचे यथार्थ दर्शन घडवणारा लेख 👍

मुक्त विहारि's picture

14 Nov 2023 - 8:08 pm | मुक्त विहारि

+१

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2023 - 5:49 pm | चौथा कोनाडा

गाडीतले वास या वेगळ्याच विषयावरील लेख वाचनीय झालाय !
गुटकामिश्रित वास किंवा तत्सम वास कायमच डोक्यात जातात ... तसल्या वासाने कधी कधी मळमळ / उलटी सुद्धा झालेली आहे.
नेहमी असल्या वासापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करतो पण नाईलाज असतो !

सरिता बांदेकर's picture

4 Dec 2023 - 6:14 pm | सरिता बांदेकर

मस्त लिहीलं आहे, मला पण असे वास आले कि त्याचा माग काढायची सवय आहे. आणि माझ्या या वास सहन न होण्याच्या सवयीमुळे नवरोबा वैतागलेले असतात. दुसऱयांनी चालवलेल्या कारमध्ये कधी प्रवास केला नाही पण ट्रेनमध्ये लोक घरून जेवण येतात आणि मग तो संमिश्र वास सहन नाही.
एकदा रस्त्यावरून चालत असताना जवळून मोटारसायकलवाला जोरांत गेला आणि मिस्टरांच्या करंगळीच्या हाडाचे तुकडे तुकडे झाले होते.वायर टाकून खूप महिन्यांनी ते भरून निघाले.तीन वर्षांनी वायर काढली.मला वाटलं तसा काही किस्सा आहे. पण तुम्ही छान लिहीलं आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Dec 2023 - 9:59 pm | राजेंद्र मेहेंदळे

कोणकोणत्या गाड्यांमध्ये धूळ किवा उदबत्ती किवा तत्सम वास असे पसरलेले असले की अगदी बसवत नाही. त्यात ए सी लावला की तेच वास सर्वत्र पसरतात, त्यापेक्षा खिडकी उघडुन बसणे परवडते. एस टी च्या दारात बहुतेकदा जाणवणारा वास म्हणजे उलटीचा, उलटी करणार्‍यांची हक्काची जागाच असते ती चालत्या गाडीत. आणि गुट्खे खाउन थुंकणार्‍या चालकांबद्दल तर काय सांगावे? हे राम!

जाता जाता- मला गाडी चालवताना सतत ए सी चालु बंद करायची खोड आहे, कशी लागली माहीत नाही, पण जरा चढ आला किवा पिक अप मिळत नसेल की कर बंद, पाच मिनिटात पुन्हा कर चालु. त्यामुळे क्लिनर साईडला बसलेली व्यक्ती (म्हणजे कोण ओळखा) वैतागते. :)

सौंदाळा's picture

8 Dec 2023 - 5:22 pm | सौंदाळा

नविन कार असताना चकट्फु मिळालेल्या अँबी प्योर चा वास, नविन गाडी असताना सीट कव्हरचा वास, एअर फिल्टर साफ नसेल तर एसी चालू केल्या केल्या येणारा धुळीचा भपकारा, लांबच्या प्रवासात गाडीतच वरचे खाणे खाल्ल्यावर राहणारा वास, पहिल्यांदा पुण्यात गणेश पेठेतून मासे घेऊन आलो होतो आणि पिशवी डिकीत ठेवली होती - त्याचे पाणी डीकिच्या रबर मॅट्वर झिरपले होते नंतर रबर मॅट साफ केली तरी वास होता, नंतर तर चक्क काढून ठेवली तरी विशेष फरक नाही, खुप दिवस लागले तो वास गाडीतून जायला. त्यापेक्षा पण वाईट दुधाच्या टेंपोचा आणि कोंबड्या नेत असलेल्या टेंपोचा वास - कचरा गाडी बरी म्हणायची वेळ येते.
या लेखाच्या निमित्ताने आपण खरच प्रवासातील विविध वासांशी किती जोडले गेलो आहोत ते लक्षात आले. लेख नेहमीप्रमाणे छानच.

श्वेता व्यास's picture

20 Dec 2023 - 5:51 pm | श्वेता व्यास

खरंच काही वेळा प्रवासात प्रवासाचा कमी आणि वासांचाच त्रास जास्त होतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Dec 2023 - 5:10 pm | अमरेंद्र बाहुबली

एसटीत येणारा डीसेल चा वास, दारं खिडक्यांच्या लोखंडाचा वास, सिट गरम होऊन त्याचा येणारा वास ह्यानुळे एसटीत घुसताच मला मळमळ सुरू होऊन ऊलटी व्हायची, अजूनही होते. त्यामुळे मी एस टी नामक प्रकारापासून दूर राहतो. त्याऐवजी मी ट्रक, टमटम, डंपर, टॅकर,ट्रॅक्टर, बैलगाडी, घोडागाडी, हत्ती, घोडा, शेळ्या, मेंढ्या जे मिळेल त्याने प्रवास केलाय. पण एस टी नाही म्हणजे नाही. अगदी गुणरत्न सदावर्ते येऊन मला भेटले तरी नाही.