प्रतिसादाच्या निमीताने प्रती प्रतिसाद

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in काथ्याकूट
2 Jul 2023 - 12:13 pm
गाभा: 

प्रतिसादांच्या निमित्ताने

विजूभौ नीं प्रतिसाद हा महत्वाचा मुद्दा उचलला आहे. मिपावर याची वाण दिसते.शेकड्यांनी वाचक लेख वाचतात,बघतात पण प्रतिसाद मात्र नगण्य.काही वाचक बहुतेक लेखकाचे नाव बघून लेख उघडून बघत असावेत.अर्थात हे लेखकाचे गुडविल म्हणावे लागेल.इतक्या दिवसांच्या मिपाच्या प्रवासात मला अशा लेखक,कवी,कवयत्रींची ओळख झाली आहे.नवोदित लेखक मात्र यामुळे हतोत्साहीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या सारख्या आनंदयात्री ला फारसा फरक पडत नाही. कारण,

आता विसाव्याचे क्षण
माझे सोनियाचे मणी
सुखे ओवीत ओवीत
त्याची करतो स्मरणी

अर्थात दुसरे कोण,बाकीबाब....

काहीसे, मिपा You scratch my back या syndrome ने ग्रस्त झाल्या सारखे दिसत असले तरी नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणारे पण भरपुर सदस्य आहेत.माझ्या सारखा इथे टिकून आहे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

लेख,कवितेवर प्रतिसाद देणे न देणे हा वाचकाचा हक्क आहे. प्रतीसाद आलाच नाही तर लेखकाला कसे कळणार त्याची रचना आवडली, चांगली आहे ते.पुढील वाटचाली साठी त्याला प्रोत्साहन तरी कसे मिळणार.

सादाला प्रतिसाद दिला तर शब्दांचे जगंल धगधगत राहील. प्रत्येक जण आपल्या भावना,विचार,अनुभव लिहीतो पण....

शब्दांना शब्द भेटतीलच असे नाही,
शब्दांनी शब्द पेटतीलच असेही नाही
-शांताबाई शेळके

काही प्रथितयश लेखकांचे यावरचे विचार.

शब्दांच्या आकाशात, शब्दांचे मेघ फिरावे
शब्दांच्या क्षितिजावरती, शब्दांनी बिंब धरावे

-सुधीर मोघे

शब्दा मुळे दंगल। शब्दा मुळे मंगल।

शब्दांचे हे जंगल। जागृत राहावे॥

– संत तुकाराम

सुधीर मोघे पुढे म्हणतात,

शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते.
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते

लेखक आणी वाचकांच्या मधे या गोड ओझ्याची देवाण घेवाण व्हायला हवी तेव्हांच हा संबध वाढत जाईल,नाते घट्ट होईल.

लेखकाची सुद्धा एक जबाबदारी आहे. काय लिहावे कसे लिहावे. उगाचच अंटशंट,चोरी करून, अर्थहीन बाष्कळ बडबड करू नये. लक्षात घ्यावे,हाडाचा वाचकअभ्यासू बहुश्रुत असतो. त वरून ताकभात तो लगेच ओळखतो.लेखकासाठी वाचक हाच जोहरी.

तुकाराम महाराज सांगतात कसे लिहावे,

शब्दामध्ये झळकावी। ज्ञान, कर्म, भक्ती।
स्वानुभवातून। जन्मावा प्रत्येक शब्द॥
बोलावे मोजके।नेमके खमंग, खमके।
ठेवावे भान। देश,काळ,पात्राचे।
बोलावे बरे। बोलावे खरे।
कोणाच्याही मनावर। पाडू नये चरे।
कोणाचेही वर्म। व्यंग आणि बिंग।
जातपात धर्म। काढूच नये॥

महाराज पुढे म्हणतात,

करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥

वैचारिक अधिष्ठान हवे,अभ्यास हवा
वाचन हवे,शब्द तोलून वापरावा. शब्द, विचारांची शुद्धता तर सुवर्णा समान असावी.समर्थ रामदास सांगतात,

आभ्यासोनी प्रगटावे।
प्रगटोनी नासावे
हे विहीत नव्हे।।

मग एक दिवस असा येईल जसे,

कैरी, कैरी पत्ते के अंदर छुपेगी कीतनी देर,
एक दिन तो आयेगी बाजार में
गर असल है....
ना करेंगे लोग मोल भाव,
देखते ही भर लेंगे अपने खोल में....

चिं त्र्य खानोलकर,आरती प्रभू या टोपणनावाने कवीता लिहायचे. अवध्य या नाटकामुळे त्यांना भेटण्याचा योग आला.मराठी साहित्यातील हा मैलाचा दगड. लवकर गेले. त्यांनी आपल्या कवितेत काय खंत दर्शवली आहे ते बघा.

साद प्रतिसाद

ही निकामी आढ्यता का ? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरतो का ? चोरिता का वाहवा

मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी

दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट

नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयु हो करावा संग हा

चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही
आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही

ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा

: आरती प्रभू

महा दुःखाचा कवी ज्याला नेहमीच दुर्बोध म्हणले गेले त्यांनी आपली खंत,राग "कावळ्यांचा रंग",या कवितेतून प्रगट केली आहे.

कावळ्यांचा रंग

कुणी आपले म्हणेना
कुणी बिलगेना गळा
कंठ दाटताना झाला
रंग कावळ्यांचा काळा....

नसानसांतून वाहे
फणा उगारून साप,
दूर सावल्यांचा घोळ
माझे नाचवितो पाप...

कुणी आढ्याला बांधली?
रात्र आंधळ्या कौलांची
चंद्र पडला मरून
इथे पहाडाच्या खाली...

ही कविता ग्रेस यांनी बहुतेक त्यांच्या कवितांच्या आलोचनेला त्रस्त होऊन लिहिली असावी.जसे कावळ्याला कोणी आपले म्हणत नाही त्याचा तिरस्कार करतात तसेच त्यांच्या प्रत्येक कविते वर दुर्बोधतेचा आरोप केला. कवीवर्य म्हणतात लोकांना माझ्या कवितांबद्दल सांगून सांगून माझा कंठ दाटून येतो आणि शेवटी माझा रंगही कावळ्याच्या रंगाप्रमाणे काळा पडतो.

सर्वच सोशल मिडीयावर प्रतिसाद देण्याचे प्रमाण कमीच आहे. टंकाळायचा कंटाळा. तंत्रज्ञ्यान्यांनी या करता एक कारगर उपाय शोधला आहे.तो म्हणजे इमोजी, स्मायली.या इमोजी भावनांशी इमान राखून समोरच्याला थोडक्यात लेखकाची भावना पोहोचवतात. अर्थात ढकलपत्रे ढकलणारे पोस्टमन जास्त त्यामुळेच प्रतिसाद मिळाला काय किंवा नाही, फारसे मनावर घेत नाहीत.

मिपावर वेगळी परिस्थिती आहे.इथे प्रत्येक सदस्य स्वतःचे विचार, भावना,अनुभव,भावना व्यक्त करत असतो. संकलीत लेख लिहीण्या साठी मोठ्या परिश्रमाची गरज असते.इथे लेखक प्रतिसादाबद्दल उत्सुक असतो.न मिळाल्यास त्याचा हिरमोड होतो.

आसो....

वाचकांच्या उपेक्षेने नवोदित लेखक, कवि निराशेपोटी कदाचित लिहीणे बंद करेल किंवा दुसरे ठिकाण शोधेल. मिपा एका चांगल्या लेखकाला मुकेल.वाचकांनी लक्षात घ्यावे....

प्यार का पहला ख़त लिखने में वक़्त तो लगता है
नए परिंदों को उड़ने में वक़्त तो लगता है।

-जगजीतसिंह सिहं

तेंव्हा प्रतिसाद द्या आणी मोकळेव्हा.
गाड्या बरोबर नळ्याची यात्रा प्रमाणे कवी कसरत सुद्धा असेच म्हणतो..

साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव

ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही.
प्रतीसाद भावनांना जीथे मिळणार नाही
तीथे मी उपेक्षितांचा धनी होणार नाही....

https://www.misalpav.com/user/34339

" मी कशी दिसतेय? " हा प्रत्येक नवऱ्याच्या आयुष्यातील रोजमर्राचा पण जिवन मरणाचा प्रश्न.असे अनेक छोटे छोटे प्रश्नांना"अपेक्षित प्रतिसाद " न दिल्यास आंतरराष्ट्रीय प्रश्नां पेक्षाही भयंकर रूप धारण करू शकतात.

माझ्या मताशी बहुतेक सदस्य सहमत असतील.

आसो.....

अ. क्र-१

बेतुक्या,ठार वेडा,अविचारी |
बडबड फार करी,जनामाजी l१l

हा नोहे माझ्या बुद्धीचा प्रकार l
मांडला, निरा शब्दांचा व्यापार l l२ ll

लावी ट ला ट, ते माझे कवित्व l
शोधतो देवत्व, काजव्यातळी||३|l
फुटले धुमारे, झाली उपरती l
मांडला प्रपंच सांजवेळी || ४ ||

सर्वप्रिय पु. ल. याबद्दल काय म्हणतात ते नमूद केल्याशिवाय लेखाची सांगता करणे संयुक्तिक होणार नाही.

"जीवनातील आपले अनुभवाचे संचित दुसऱ्यापुढे मांडावे, दुसऱ्याचे आपण पाहावे, अशी जी आपली इच्छा असते त्यातच माणसाचे माणूसपण आहे. हे सांगणे व ऐकणे जिथे संपते तिथेच त्या माणसातला माणूसही स्वतःला पूर्णपणे हरवून बसतो."

- पु. ल. देशपांडे

प्रतिक्रिया

तुमची लेखणी जोरदार चालते. वाचनही दांडगंच आहे.
बाहेर छान हवाहवासा पाऊस पडतो आहे आणि समोर कवितांच्या ओळी. सुंदर.

कर्नलतपस्वी's picture

2 Jul 2023 - 1:35 pm | कर्नलतपस्वी

समजले नाही.

बाकी प्रतिसादाबद्दल म्हणाल तर जे लेख...

विचाराला चालना देतात, जास्त वादविवाद होऊ शकतो.

विषयाचे ज्ञान असणारे मुळ लेखात भर टाकतात. इतर सदस्य शंकानिरसन करून घेतात.

माहितीपूर्ण लेखन,प्रवास वर्णन,पाककृती,कविता यावर मर्यादित प्रतिसाद देता येतात.

रचना चांगली असेल तर प्रतिसाद मिळेलच. पण नाही मिळाला म्हणून निराश होण्याची गरज नाही कारण इथे स्वानंदा करता आपण लिहीत असतो.

कंजूस's picture

3 Jul 2023 - 3:12 am | कंजूस

म्हणतो आहे.

उत्तम लेख. तुमची लेखन-वाचनाविषयीची तळमळ, क्षमता आणि हातोटी कौतुकासपद आहे.
'ललित' आणि 'सत्यकथा' विषयी थोडेसे (चोप्य्पस्ते) :
१. 'ललित' ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने १९६४ साली ‘ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह’ या विषयांना वाहिलेल्या ‘ललित’ या वाङ्मयीन मासिकाची सुरुवात झाली. ग्रंथप्रसाराच्या दृष्टीने ‘ललित’ने अनेक उपक्रम राबविले.दिवाळी अंकांनी आम्हांला काय दिले?’, ‘दिवाळी अंकांकडून काय अपेक्षा’, ‘वाचन आणि स्मरण’ यांसारख्या अनेक स्पर्धा ‘ललित’ने घेतल्या. ‘ललित शिफारस’, ‘मानाचे पान’, ‘लक्षवेधी पुस्तके’, ‘वाचन आणि स्मरण’ यांसारखी ‘ग्रंथप्रसारा’च्या दृष्टीने अनेक सदरे ‘ललित’मधून सुरू केली. ‘लेखकाचे घर’, ‘दशकातील साहित्यिक’, ‘स्वागत’, ‘ठणठणपाळ’, ‘काय लिहिताय?, काय वाचताय?’, ‘गोमा गणेश’, ‘अलाणे-फलाणे’, 'आनंदीआनंद', 'टप्पू सुलतानी', ‘चोखंदळ वाचकांची निवड’, ‘सप्रेम नमस्कार’, ‘दृष्टिक्षेप’, ‘निर्मितिरंग’, ‘गप्पा-टप्पा’, ‘सौरभ’, ‘ग्रंथगप्पा’, ‘शहाणं पुस्तकवेड’ 'पुस्तक गजाली', 'पन्नाशीपूर्वीची पुस्तके' यांसारखी अनेक वाचकप्रिय सदरे ‘ललित’मधून प्रसिद्ध झाली/होत असतात. ‘वि. स. खांडेकर’, ‘पु. ल. देशपांडे’, ‘व्यंकटेश माडगूळकर’, ‘वसंत सरवटे’, ‘जी. ए. कुलकर्णी’, ‘केशवराव कोठावळे’, ‘गो. नी. दाण्डेकर’, ‘जयवंत दळवी’, ‘ठणठणपाळ’, ‘विंदा करंदीकर’, 'दुर्गा भागवत', 'भालचंद्र नेमाडे', 'मंगेश पाडगावकर', ‘कुसुमाग्रज’, यांसारखे संग्राह्य विशेषांक प्रसिद्ध केले. ‘ललित दिवाळी अंकां’ची मुखपृष्ठे सलग ५० वर्षे श्री. वसंत सरवटे यांनी केली.

२. 'सत्यकथा' हे १९३३ ते १९८२ या काळात प्रसिद्ध झालेले हे दर्जेदार मासिक मराठी साहित्यातील मानदंड मानला जातो. श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन हे दोन दिग्गज सत्यकथेचे संपादक. ‘सत्यकथा’ने नवकथा, नवकविता, नवसमीक्षा आणि ललितगद्य यांच्याबाबतीत मराठी साहित्यात भरीव असं काम केलं. साठच्या दशकातली मराठीमधली नवकथेची चळवळ ‘सत्यकथा’मधूनच सुरू झाली. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर हे नवकथेचे प्रवर्तक. त्यांचे सर्वाधिक लेखन ‘सत्यकथा’मधून प्रकाशित झाले. भागवत-पटवर्धन यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या लेखकांचा शोध आपल्यापरीने घेतला. त्यांच्या साहित्याला ‘सत्यकथा’मध्ये जागा दिली. त्यांना प्रोत्साहन दिलं. ‘सत्यकथा’ हे केवळ मासिक नव्हतं, ती वाङ्मयीन चळवळ होती. साहित्य, चित्रकला, रंगभूमी, चित्रपट, संगीत असा विविध क्षेत्रातील मंडळी ‘सत्यकथा’शी जोडली गेलेली होती. भागवत-पटवर्धन या संपादकद्वयींनी ते जाणीपर्वूक केलं होतं. केवळ मजकुराचं संपादन हे संपादकाचं काम नसतं तर माणसांचंही संपादन त्याने निगुतीने आणि चाणाक्षपणे करायचं असतं. भागवत-पटवर्धन या जोडगोळीने तेही मोठ्या प्रमाणावर केलं. आणि हेच ‘सत्यकथा’चे सर्वात मोठं बलस्थान होतं. जीएंच्या कथा हा 'सत्यकथा' चा मानाचा बिंदु.

चौकस२१२'s picture

5 Jul 2023 - 5:00 am | चौकस२१२

खानोलकर ( आरती प्रभू ) पण सत्यकथेतून प्रसिद्धीस आले बहुतेक
पुढे सत्यकथा का बंद पडले कोण जाणे , मौज प्रकाशन (श्री. पु. भागवत) तर चांगले चालू आहे
मौज, राजहंस , आणि अजून २ बहुतेक नाव आठवत नाही हे दर्जेदार प्रकाशक

Bhakti's picture

2 Jul 2023 - 3:07 pm | Bhakti

खुप छान सकारात्मक लिहिले आहे.
छान छान कविता,अभंग,विचार वाचायला मिळाल्या.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2023 - 9:57 pm | मुक्त विहारि

मुक्तक आवडले

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jul 2023 - 8:34 am | राजेंद्र मेहेंदळे

सुंदर लेख!! चोफेर फटकेबाजी. सकाळी सकाळी बाहेर पाउस आणि मनात या कवितांनी भिजलो. शेवटची ओळ एकदम खरी.

विजुभाऊ's picture

3 Jul 2023 - 10:34 am | विजुभाऊ

झकास लिहीले आहे कर्नलसाहेब

प्रचेतस's picture

3 Jul 2023 - 7:20 pm | प्रचेतस

तुम्ही लिहिताना ज्या काव्यपंक्ती पेरता त्या एकदम भारी वाटतात आणि लेखात चपखल बसतात.

सुंदर आणि विद्वत्तापूर्ण लेखन

चलत मुसाफिर's picture

4 Jul 2023 - 5:16 pm | चलत मुसाफिर

मी विश्वातला सर्वोत्तम लेखक आहे असा माझा नितांत विश्वास आहे. प्रतिसाद नाही आले तर काय फरक पडतो? किंबहुना मी महिनोन्महिने लिहिलेच नाही तरी काय झाले? श्रेष्ठ ते श्रेष्ठ :) :)

कर्नलतपस्वी's picture

5 Jul 2023 - 12:06 pm | कर्नलतपस्वी

मध्ये राहण्यास भाडे लागत नाही.

कर्नलतपस्वी's picture

5 Jul 2023 - 12:07 pm | कर्नलतपस्वी

आभारी आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jul 2023 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा

बरं वाटलं वाचून .http://www.sherv.net/cm/emoticons/smile/cute-3d-smiling-smiley-emoticon.gif

सतिश गावडे's picture

6 Jul 2023 - 7:13 am | सतिश गावडे

विषयाला धरून केलेलं लेखन आणि त्याला साजेशी काव्याची जोड, आवडले.