रक्तदानाची नाबाद शतकी खेळी... रक्तदान १०० पूर्ण

Abhay Khatavkar's picture
Abhay Khatavkar in जनातलं, मनातलं
16 Jun 2023 - 9:24 am

१४ मार्च २०२३....एक सुवर्णक्षण...

नाबाद शतकी रक्तदान खेळी

रक्तदान....एक शंभरी.... शतक... एक शुन्य शुन्य

सोबत रक्तदान केलेल्याची तारखेनुसार सविस्तर माहिती PDF स्वरूपात जोडली आहे.

आज सकाळी ११ वाजता इनलक्स बुधराणी हॉस्पिटल मधून प्लेटलेट साठी फोन आला की एका पेशंटसाठी प्लेटलेट पाहिजेत, लगेच या... मी त्यांना दुपारी २ पर्यंत येतो म्हणून सांगितले आणि जेवण करून ऑफिस मधुन दुपारी १ वाजता निघुन २ वाजता पोचलो. थोडा वेळ थांबुन काही चाचण्या करून सरतेशेवटी त्या क्षणास सुरुवात झाली आणि डोळ्यासमोरून २५ वर्षाचा प्रवास सुरू झाला व नकळत डोळ्यातुन आनंदाचे अश्रू यायला सुरुवात झाली व शेवटी १०० वे रक्तदान इतिहासात कोरले गेले.

आज रक्तदानाचा १०० आकडा पूर्ण झाला आणि मन भुतकाळात गेले, पहिले रक्तदान कधी केले होते ते.......

दिवस २१ मे १९९६... भारताचे माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची पुण्यतिथी आणि आमच्या कॉलेजचे S. Y. B.com परीक्षेचे दिवस. मी आणि माझा मित्र सचिन लोहार दुपारी माझ्या घरी अभ्यास करत होतो, वेळ दुपारची आणि बाहेर रिक्षा गल्लीत फिरत होती आणि रिक्षातील एक जण माईक वर ओरडत होता.... रक्तदान करा... पिंपळे गुरव येथे स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आणि रक्तदात्याला अल्पोपहार ( केळी, कॉफी, बिस्किटे) मिळेल, सोबत प्रमाणपत्र मिळेल. त्याकाळी प्रमाणपत्र मिळणे फार मोठे काम केल्याचे फळ होते. मग काय आम्ही अभ्यास सोडुन चला जाऊया विचार केला आणि गेलो. गेल्या नंतर रीतसर दोघांच्या आवश्यक त्या चाचण्या झाल्या रक्तदानानंतर कॉफी, बिस्किटे, केळी मिळाली त्यावर ताव मारला आणि खुश झालो आणि अशा प्रकारे अधिकृतपणे पहिल्या रक्तदानाची नोंद झाली.

खरेतर याआधी एकदा रक्तदान झाले होते, ते पण मित्राच्या आजोबांना पुना हॉस्पिटल येथे रक्ताची गरज होती आणि आम्ही ३-४ मित्रांनी रक्तदान केले होते पण त्याची काही नोंद नाही वा पुरावा नाही...नाहीतर १०० कधीच झाले असते...असो...

त्यानंतर जवळपास २.५ वर्षानंतर वाढदिवसानिमित्त (८.११.१९९८) पुन्हा रक्तदानाचा योग आला आणि मग १९९९ आणि २००० मध्ये दर सहा महिन्याने रक्तदान झाले.
वर्ष २००१ ते वर्ष २०१८ पर्यंत दर ३ महिन्याने (फेब्रुवारी, मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबर) रक्तदान करत गेलो. वर्ष २००१ ते २००२ मध्ये पुणे येथील एका Chartered Accountants च्या ऑफिस मध्ये असताना तेथुन लोकल ने चिंचवड ला यायचे, लोकमान्य हॉस्पिटल मध्ये रक्तदान करायचे आणि परत लोकल ने चिंचवड ते पुणे करून ऑफिस गाठायचे असा क्रम बरेच वेळा झाला. सुरुवातीला नियमित रक्तदान म्हणुन करत गेलो आणि जस जशी रक्तदानाची संख्या वाढत गेली तस तसे १०० पूर्ण करायची ही सुप्त इच्छा जागृत झाली.

वर्ष २०१९ मध्ये कंपनी कामानिमित्त (Enpro Saudi Arabia Ltd) सौदी अरेबिया जाण्याचा योग आला आणि नेमका फेब्रुवारी महिना सुरू झाला होता आणि भारतात मी मार्च मध्ये येणार होतो, मला रक्तदान करायचे होते, पण परदेशात कसं शक्य आहे? होईल का? नियम व अटी काय ? परदेशी पर्यटकांचे (मी) घेतील का? कोठे करायचे ? ब्लड बँक कुठे आहे आणि घेऊन जाणार कोण? असे आणि बरेच काही प्रश्न आणि विचार मनात घोळत होते. मग कंपनीतील जनरल मॅनेजर सचिन गुरव यांच्याजवळ मी माझा प्रश्न मांडला, त्यांनी लगेच तेथील HR manager मिशेलला (Saudi Employee) माझी अडचण सांगितली आणि तो तयार झाला. त्याला पण रक्तदान करायचे होते आणि त्याने या आधीही रक्तदान केले होते. शेवटी आम्ही दोघे दमाम शहर येथील एका हॉस्पिटल मध्ये गेलो, तिथे गेल्यावर त्यांना आधी माझी सगळी माहिती सांगितली आणि रितसर चाचण्या करुन सरतेशेवटी १९.०२.२०१९ रोजी परदेशातील पहिले रक्तदान पार पडले आणि आंतरराष्ट्रीय रक्तदाता अशी ओळख आपोआप मिळाली त्याचा तो आनंद काही वेगळाच होता, भारतात दिलीले रक्त आपल्या भारतातील नागरिकाला उपयुक्त पडत होते आणि इथे तर आपण एका आंतरराष्ट्रीय व्यक्तीच्या गरजेस कामी आलो याचा आनंद खरचं शब्दात मावणारा होता. माझ्या सोबत HR manager मिशेल ने पण रक्तदान केले. त्यानंतर परत एकदा ८ ऑगस्ट २०१९ मध्ये सौदी अरेबियात असताना दुसरे आंतरराष्ट्रीय रक्तदान पार पडले, सोबतीला मिशेल पण रक्तदानाला होता. अशा प्रकारे एकुण २ वेळा आंतरराष्ट्रीय रक्तदान करण्याचा योग आला.

२०१९ पर्यंत रक्तदान नियमितपणे चालु होते, पण मार्च २०२० मध्ये कोरोना आला आणि माझे रक्तदानाचे चक्र बिघडले, बाहेर पडणे शक्य नाही आणि जायचे असेल तर आधी हॉस्पिटलची तशी परवानगी घ्या, पोलिसांची कारवाई, भीती त्यामुळे त्यात काही महीने गेले आणि रक्तदानाचे महिने बदलत गेले ते आजतागायत.

नोव्हेंबर २०१७ मध्ये नियमित आदित्य बिर्ला चिंचवड येथे रक्तदान करण्यास गेलो असता तेथील डॉक्टरांनी प्लेटलेट करणार का विचारले? हा काय प्रकार आहे ? ते काय असते ? किती वेळ लागतो? याची सगळी व्यवस्थित माहिती त्यांनी सांगितली. आतापर्यंत ७० वेळा फक्त रक्तदान केले होते आणि हे पहिल्यांदाच करत होतो. रक्तदानास साधारणत: ३०-३५ मिनिटे लागतात आणि रक्तदाता त्याच्या रोजच्या कामाला लागू शकतो पण ह्यासाठी २ ते २.३० तास लागतात (आता ही वेळ १ ते १.३० तास अशी आली आहे). ह्या मध्ये सुई एकच असते पण सिरिंज दोन असतात. एका नळीतून रक्त काढले जाते आणि ते मशीनमध्ये जमा होऊन त्यावर प्रक्रिया होऊन platelets वेगळ्या एका पिशवी मध्ये जमा होतात आणि परत उर्वरीत रक्त शरीरात ढकलले जाते. अशी एकूण ७ वेळा त्याची प्रकिया सुरू असते. साधारणत: ३० ते ३५ हजार platelets काढल्या जातात आणि कॅन्सर, डेंग्यू अशा गरजूस दिल्या जातात आणि मग तेथुन पुढे प्लेटलेटला सुरुवात झाली, आणि आतापर्यंत १३ वेळा प्लेटलेट करण्यात आले आहे आणि ८७ वेळा रक्तदान.

आतापर्यंत रुबी हॉल पुणे येथे सगळ्यात जास्त वेळा (३६) रक्तदान झाले आहे, त्यानंतर आदित्य बिर्ला चिंचवड येथे, लोकमान्य हॉस्पिटल, तालेरा हॉस्पिटल चिंचवड. या मध्ये रुबी हॉल पुणे येथील सुनिल पाटील, श्री. राकेश, तालेरा मधील श्री.थोरात, YCM हॉस्पिटल मधील डॉ शंकर मोसलगी,आदित्य बिर्ला येथील शत्रुघ्न पवार यांचे खुप खुप आभार, प्लेटलेट साठी इनलक्स बुधराणी हॉस्पिटल मधील डॉ रामनाथ, डॉ जया कुलकर्णी, डॉ प्रकाश, ओम ब्लड सेंटर मंगळवार पेठ येथील शिवा तुप्पड ह्या सगळ्याचे खुप खुप आभार आणि धन्यवाद, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे अशक्यच आहे, तुम्ही सर्वांनी केलेल्या मदतीचा मी अत्यंत ऋणी राहीन.

तालेरा हॉस्पिटल मधील एक आठवण...एकदा संध्याकाळी रक्तदानासाठी लोकमान्य हॉस्पिटल मध्ये गेलो असता, तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते, मग YCM Blood बँक येथे गेलो तिथे रक्तसाठा शिल्लक होता, मग तालेरा मध्ये गेलो तिथे श्री. थोरात कामावर हजर होते त्यांना मी मला रक्तदान करायचे आहे असे सांगितले तर ते म्हणाले की त्यांना एक बाळंतपणासाठी आलेली महिला तिला रक्त पाहिजे आहे आणि त्यात ते खुप व्यस्त आहेत, ते म्हणाले अजुन १ ते १.३० तास तरी लागेल, त्यातुन रिकामे होण्यात... मला रक्तदान करायचे होते मग मी त्यांना हो म्हणालो आणि रात्री ८.३० वाजता तिथे गेलो आणि शेवटी रक्तदान झाले... त्याबद्दल त्यांचे खुप खुप आभार....असेच काही चांगले अनुभव आले, त्यात अजुन एक म्हणजे एकदा स्वेच्छेने रक्तदान करण्यास गेलो असता तेथील कर्मचारी यांनी विचारले की तुमच्या घेतलेल्या रक्ताच्या बदल्यात तुमचे सवलत पत्र एका नवीन जन्मलेल्या बाळास देणार का? मी लगेच होकार दिला आणि त्यांना ते सवलत पत्र दिले, असे बरेच चांगले अनुभव आहेत, ज्यात डेंग्यू झालेले रुग्ण, कर्करोग पीडित रुग्ण, नवीन बाळासाठी, अपघात ग्रस्त रुग्ण, आणि गरजु रुग्णासाठी रक्ताच्या बदल्यात रक्त अशी विचारणा होत होती आणि मी नकार देऊ शकत नव्हतो.

एक वाईट अनुभव म्हणजे एकदा स्वतःहून रक्तदानास गेलो असता, तिथे काही रुग्णाचे नातेवाईक होते आणि त्यांच्या रुग्णाला ६-७ रक्ताच्या पिशव्यांची गरज होती त्यासाठी ते त्यांच्या मित्रांना आणि जवळच्या लोकांना येण्याचा आग्रह करत होते, मी तिथे गेल्यावर तेथील कर्मचारी यांनी विचारले की तुमच्या घेतलेल्या रक्ताची पिशवी त्यांना बदल्यात दिली तर चालेल का? मी लगेच हो म्हणालो, कारण रक्तच माणसाला जीवनदान देऊ शकते. मी होकार दिल्यावर त्यांनी गरजु रुग्णाच्या मुख्य व्यक्तीला सांगितले की तुमची एक रक्ताच्या पिशवीची गरज पूर्ण झाली (मी दिलेले रक्त) आहे त्यामुळे तुम्ही उर्वरित रक्तदाते उपलब्ध करा, परंतु लगेच ती व्यक्ती माझ्यासमोर ब्लड बँकच्या त्या कर्मचाऱ्यास म्हणाली की नाही.... बाहेरच्या माणसाचे रक्त आम्हास नको, आम्हांस फक्त आमचे मित्र आणि नातेवाईक वा आम्ही आणलेल्या माणसाचेच रक्त चालेल, हे ऐकून मी आणि तेथील कर्मचारी अवाक् झालो आणि जास्त काही वाद वा न बोलता आम्ही गप्प बसलो...किती मी पणा होता त्यांच्यात आणि गर्विष्ठपणा. त्याला वाटले असणार की मी आणलेले दाते अथवा माझ्या ओळखीचे दाते यांचे रक्त घेतले की लगेच त्याच्या रुग्णाला मिळणार.....पण त्या अजाण आणि गर्विष्ठ माणसाला हे माहीत नाही की कोणतेही रक्त घेतले की सरळ गरजुला देत नाही तर त्या घेतलेल्या रक्ताच्या बदल्यात त्याला दुसरे रक्त मिळत असते आणि सगळ्या चाचण्या केलेले असेल तरच, ते पण दुसऱ्याचे जुळत असेल तर.....असेही काही अनुभव येत असतात. ज्या वेळेस रक्ताची गरज लागते त्यावेळेस त्यासाठी धावपळ करणारे नातलग आणि मित्र परिवार यांचे हाल बघवत नाहीत, म्हणुनच स्वतः हुन रक्तदान करण्यास बाहेर पडा.. माझी एक कळकळीची विनंती आहे की गरजेला रक्त मिळविण्यासाठी धावपळ करणारे गरज संपली की तुम्ही थांबु नका.... तुम्ही अजून १० रक्तदाते तयार करा आणि १० मधील प्रत्येकाला १० जण तयार करायला सांगा, एक प्रकारे साखळी होईल तरच ही धावपळ कमी होईल. घेतलेले रक्त हे सगळ्या चाचण्या करूनच देण्यात येते. त्यातही दिलेले रक्त हे चाचणी केल्यावर ४० दिवसापर्यंत टिकते त्यानंतर ते फेकून द्यावे लागते अथवा त्याआधी गरजुला द्यावे लागते, त्यातही जमा झालेले रक्त १० टक्के वाया जाते कारण चाचण्या केल्यावर काही रक्त दूषित (दारू, सिगारेट, मधुमेह, एड्स आदी) असल्याने फेकून द्यावे लागते.

मी आतापर्यंत जे रक्तदान केले आहे (platelets सोडुन) ते स्वतः हुन / स्वेच्छेने केले आहे आणि ब्लड बँक मध्ये जाऊनच...अपवाद २-३ वेळा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याठिकाणी, म्हणजेच रक्तदान शिबिर असेल तर रक्तदान करायचे असा जर कोणी निर्धार केला असेल तर तो काढून टाका... स्वतः हुन ब्लड बँक मध्ये जा... रक्तदान करा..एक वेगळाच अनुभव येतो....कोणी म्हटले म्हणुन... रक्तदान शिबिरात शक्यतो टाळा. लक्षात ठेवा जर स्वतः हुन रक्तदाते ब्लड बँक मध्ये गेले तर रक्तदान शिबिर घेण्याची गरज पडणार नाही, रक्ताची खुप गरज आहे आणि रक्त हे कोणत्या कारखान्यात तयार होत नाही तर ते मानवी शरीरात असते आणि तिथेच तयार होते, तेच रक्त दुसऱ्याला उपयोगी पडते, आपल्या शरीरात ५ ते ७ लिटर रक्त असते आणि त्यांपैकी फक्त ३५० मिली रक्त काढले जाते की जे २४ तासात परत भरून निघते, फक्त रक्तातील घटक परत भरून येण्यास काही महिने लागतात.
तसेच एका व्यक्तीस दर ३ महिन्यातून रक्तदान करता येते, आणि जमा झालेली एका रक्ताच्या पिशवीतुन ४ रुग्णांचे प्राण वाचु शकतात अशा प्रकारे पुर्ण आयुष्यात ६०० ते ८०० रूग्णांना नवजीवन मिळू शकते.

ज्या प्रमाणे एखादया डबक्यात पाणी साचुन साचून ते खराब होते वा दूषित होते, तेच पाणी जर वाहते असेल तर स्वच्छ आणि निर्मळ राहते, रक्ताचे पण तसेच आहे... एकाच ठिकाणी राहुन ते नवीन तयार होत नाही अथवा त्यातुन उर्जा मिळत नाही, तर रक्तदान केल्यावर जे रक्त भरून निघते, त्यातुन रक्तात नवीन प्रतिजैविके तयार होतात, रक्त शुद्ध होते, रक्ताच्या गाठी होत नाहीत आणि शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते, असे अजुन बरेच रक्तदानाचे फायदे आहेत.

माझ्या बाबत सांगायचे झाले तर मी रक्तदानामुळे कायम उत्साहीत असतो त्यामुळे थकवा कधीच आला नाही. अजुनही मला आठवते, खरेतर मी शेवटचा आजारी हा जुलै १९९६ साली कॉलेजमध्ये असताना बार्सिलोना ऑलिम्पिक स्पर्धा चालु होत्या त्यावेळेस पडलो होतो, त्यानंतर अजुन एकदाही नाही, तसेच आजारी पडून ऑफिसला सुट्टी घेतली हे अजुन एकदाही (२४ वर्षात) घडलेले नाही आणि त्याचे सगळे श्रेय ह्या रक्तदानालाच.. ज्यामुळे नवीन रक्त भरून शुध्दीकरण होऊन नवीन ऊर्जा मिळते आणि उत्साहीतपण.
रक्तदानामुळे अशक्तपणा, हाताला वेदना किंवा सुई टोचली ती जागा काळी पडणे हा प्रकार अजुन एकदाही नाही
तसेच अजुन एकदाही ह्या रक्तदानाचा काही वाईट परिणाम झालेला नाही (चक्कर येणे, हात सुजणे, ई.) रक्तदान करून मी माझी नेहमीची नियमित कामे करत गेलो.

ह्या रक्तदान मध्ये माझ्या बायकोचा मोलाचा वाटा आहे जी कायम पाठिंबा देत असते, तिच्या सहकार्याशिवाय हा प्रवास अपूर्ण आहे, शब्दही कमी पडतील एवढे तिचे आभार..आणि आता पर्यंत तिनेही १०-१२ वेळा रक्तदान केले आहे, काही कारणास्तव महिलांना रक्तदान करता येत नाही, हे निसर्गाचे नियम... त्याला आपण काय करणार....पण ती तरीपण रक्तदान करत आहे त्याबद्दल तिचे मनापासून अभिनंदन आणि असेच कार्य घडत राहो ही प्रार्थना. ह्या प्रवासात आई वडिलांचा पाठिंबा, मुले, मित्र परिवार, नातेवाईक,ऑफिस मधील आजी माजी सहकारी, वरिष्ठ, समस्त सायकल मित्र, प्रत्येक ब्लड बँक मधील सहकारी कर्मचारी आणि वरिष्ठ डॉक्टर्स यांचे खुप खुप आभार.

खरेतर माझ्या पेक्षाही जास्त रक्तदान करणारे असंख्य रक्तदाते आहेत त्यांना माझा सलाम आणि हात जोडून नमस्कार, त्यांच्या पर्यंत मला पोचणे शक्य नाही पण त्यांची समाजाप्रती असलेली जागरूकता आणि समाजाचे देणे याचा मी ऋणी राहीन.

१०० रक्तदान करायचे तो क्षण आज पूर्ण झाला आता अजुन किती पूर्ण होतील हे निसर्ग आणि शरीराची साथ (व्याधी) यावरच अवलंबून आहे, पण तो पर्यंत मात्र हे चक्र थांबणार नाही... कदापि नाही.... त्रिवार सत्य नाही... अशक्यच............

जीवनमान

प्रतिक्रिया

कंजूस's picture

16 Jun 2023 - 11:36 am | कंजूस

माझी रक्तदानाची सुरुवात झाली ती ऑफिसमधल्या कुणाला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये रक्त हवे होते. कंपनीने त्या रक्तगटवाल्यांना विचारले जाणार का. तसे आम्ही चौघे गेलो आणि दिले. त्यानंतर दरवर्षी एकदा कुठल्यातरी शिबिरात रक्त देत असे. पंधरा वर्षे दिले. त्यानंतर मात्र मी तिकडे गेलो की ते स्वयंसेवक लगेच सांगत की "हे रक्तदान शिबिर आहे, इकडे बीपी, डाइबेटिस चेक करत नाही." मग मी माझ्याकडची कार्डच दाखवत असे. ते लगेच फॉर्म भरून रक्त घेत. असे दोनदा झाल्यावर मी जाणे बंद केले.

वामन देशमुख's picture

16 Jun 2023 - 12:40 pm | वामन देशमुख

शतकी खेळीसाठी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

---

माझे एक मित्र महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेत अधिकारी आहेत. त्यांनी पन्नासहून अधिक वेळा रक्तदान केलेले आहे आणि अजूनही करत असतात. (ओ+)

मीही अनेक वेळा रक्तदान केले आहे. करतो. गरज पडल्यास मला मिपाकर व्यनि करू शकतात. (ए+)

---

मतभिन्नतेच्या आदरासहीत अवांतर: शिबिरांत रक्तदान करू नये. जेंव्हा एखाद्याला गरज असते तेंव्हा रक्तदानाला तयार राहावे.

---

सोबत रक्तदान केलेल्याची तारखेनुसार सविस्तर माहिती PDF स्वरूपात जोडली आहे.

कुठे आहे?

कर्नलतपस्वी's picture

16 Jun 2023 - 12:51 pm | कर्नलतपस्वी

B-

गरज पडेल त्यावेळेस रक्तदान करण्यापेक्षा स्वेच्छेने केल्यास ऐनवेळेस होणारी धावपळ टाळता येते आणि रक्त साठा असल्याने रक्तपेढ्याना शिबीरे कमी भरवावी लागतील.

त्यांना असे म्हणायचे आहे की समजा तुम्ही आज रक्तदान केले तर पुढच्या रक्तदानासाठी किमान ३महिने थांबावे लागते, त्या दरम्यान कुणाला रक्त लागले तर तुम्ही इच्छा असुनही रक्त देऊ शकत नाही. म्हणून शक्यतो शिबिरात रक्तदान करू नये.

मला हा विचार पटतो.

कर्नलतपस्वी's picture

16 Jun 2023 - 12:50 pm | कर्नलतपस्वी

आई वडिलांनी दिलेले नाव सार्थक केलेत. रक्तदानाने कितीतरी रुग्णांना अभय,जीवनदान दिलेत.

सॅल्युट.

आम्ही जन्मजात निगेटिव्ह.

आमचे एक वरीष्ठ ,अंत्यत कडक,वाटेल तसे तोंडसुख घेणारे. कुणी त्यांच्या थाऱ्यावर उभे रहात नसे. १९७६ साली त्यांच्या बायकोला रक्त हवे होते. संपुर्ण युनिट मधे तीच्या रक्तास जुळणारा रक्तगट मिळाला नाही. अंत्यत क्रिटीकल अवस्था. एवढा कडक माणूस कोलमडून पडला व हमसा हमशी रडत होता. मी नवीनच होतो. त्याला विचारले सर कुठला ग्रुप हवाय?

माझा रक्तगट तोच असल्याने तो अक्षरशः माझ्या पायावर पडला.
हा माझा रक्तदानाचा पहीला अनुभव.

तेंव्हापासून काही वेळा इमर्जन्सी मधे रक्तदान केले. मोजले नाही.

माझा रक्तगट तोच असल्याने तो अक्षरशः माझ्या पायावर पडला

.
खरंय असे प्रसंग पाहिले आहेत आणि स्वतः बाबतीत अनुभवही घेतलाय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Jun 2023 - 1:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुमचा उपक्रम असाच चालु राहो!!

वाह!आदर्श आहात.रक्तदात्यांची खरच निकड आहे.निरोगी लोकांनी नक्की पुढाकार घ्यावा.
-कायमच हिमोग्लोबिन कमी असल्याने कधीही रक्तदान करू न शकलेली :(

एकूण प्रवाही रक्त कमी असले तर अनियमिया म्हणतात. तो नसावा.

सामाजिक जाणीवा वाढवणारा सुंदर लेख . +१

धर्मराजमुटके's picture

17 Jun 2023 - 8:09 pm | धर्मराजमुटके

हार्दिक अभिनंदन ! आईच्या आजारपणात रक्ताचे महत्व आणि त्याच्यामुळे होणारी ससेहोलपट जवळून अनुभवली. सुदैवाने अनेक मित्र नियमित रक्तदाते असल्यामुळे कमी त्रास झाला.
रक्तदाते म्हणजे भुतलावरचे देवदूतच आहेत. आपल्याला जनसेवा करण्यासाठी उत्तम आणि दीर्धायुष्य लाभॉ हीच शुभेच्छा !

अनन्त्_यात्री's picture

17 Jun 2023 - 9:47 pm | अनन्त्_यात्री

अभिनंदन!

प्राची अश्विनी's picture

19 Jun 2023 - 8:49 am | प्राची अश्विनी

कौतुक आणि अभिनंदन!

नि३सोलपुरकर's picture

21 Jun 2023 - 12:31 pm | नि३सोलपुरकर

__/\__

मुक्त विहारि's picture

21 Jun 2023 - 8:42 pm | मुक्त विहारि

मी, अनियमित रक्तदान करतो

O +ve

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2023 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शतकी रक्तदानाबद्दल अभिनंदन. अनुभव कथन आवडले. आम्हीही महाविद्यालयात रक्तदान शिबीरे आयोजित असले की विद्यार्थ्यांमधली भिती कमी व्हावी आणि रक्तदात्यांची संख्या वाढावी म्हणून रक्तदान करायचो, दहा-पंधरा वेळी केले असावे.

बाकी, प्रेरणादायी लेख.

-दिलीप बिरुटे

मोदक's picture

22 Jun 2023 - 11:59 am | मोदक

अभिनंदन!!!

-- मोदक B+