पुणे पंढरपूर पुणे सायकल राईड ३ आणि ४ जुन २०२३...एक विलक्षण अनुभव (परतीचा प्रवास)

Abhay Khatavkar's picture
Abhay Khatavkar in भटकंती
13 Jun 2023 - 9:43 pm

Indo Atheletic Society तर्फे यावेळी पंढरपूर राईड ची घोषणा करण्यात आली त्याचवेळेस मी (दोन्ही बाजुचे) आणि बायकोचे (एकेरी) रजिस्ट्रेशन केले आणि निवांत झालो कारण अजुन ३-४ महिने बाकी होते. यंदा उन्हाचा तडाखा जास्त असल्याने एप्रिल आणि मे मध्ये सायकलिंग फार कमी झाले (७०० आणि ६०० किमी) जे इतर महिन्याच्या मानाने निम्मेच होते. तरीही रोज ऑफिसला ये जा सुरूच होते. बायकोने वारीच्या एक महिना आधी सरावाला सुरुवात केली, तिची सगळ्यात जास्त लांब पल्ल्याची आणि २३० किमी राईड असल्याने ती पूर्ण करणार याची शाश्वती होती.

आणि तो दिवस आला...३ जुन ला पहाटे ३ वाजता दोघांनी घर सोडले आणि नाशिकफाटा येथे फ्लॅगऑफ साठी पोचलो, सोबत हंपी सायकल राईडर बालाजी जगताप आणि कंपनीतील सहकारी मयुरेश व्हनखंडे, तुषार देशमुख हे पण जॉईन झाले.. तेथून हडपसर.. उरळीकांचन करत यवत..चौफुला.. कुरकुंभ अशी १५०० सायकलस्वारांची ( वय वर्षे ७ ते ७५) सायकल वारी सुरू झाली. काही लहान मुलांचा सहभाग आणि उत्साह (व्हिडिओ पाहिल्यावर कळेल) हा आळशी लोकांना लाजवण्यासारखा होता, त्यांना पाहून मला खुप आनंद होत होता आणि त्यांचा अभिमान वाटत होता. यात बायकोचा उत्साह वाखणण्याजोगा होता.. कितीतरी वेळा माझ्यापेक्षा पुढे असायची आणि Hydration पॉइंटला आधीच पोचायची, आम्ही मात्र उशिरा पोहचायचो. दुपारच्या जेवणाच्या वेळेस तर ती आधीच पोचली, आम्ही पोचलो त्यावेळेस तिचे जेवण झाले होते....म्हणले वढ तु... हयगय करू नकोस.. रस्त्यात IAS ने प्रत्येक २० किमी वर Hydration Point ठेवल्याने फार फार उपयोग झाला, त्यामुळे सक्तीचे त्या पॉइंटला थांबणे आणि पाणी... लिंबू सरबत...कोकम सरबत.... फळे याचा सतत मारा सुरु होता त्यामुळे शरीर थकत न्हवते. पळसदेवच्या इथे तर चक्क गाड्या धुऊन काढतात त्या पाईपने शॉवर दिला जात होता ( व्हिडिओ दिलेला आहे) त्यामुळे अंगाची लाही लाही कमी झाली.

ह्या राईड मध्ये आते बहिणीचे मालक दीनानाथ दंडवते हे साध्या (नॉन गिअर) सायकल वर आले होते...... धन्य धन्य त्यांना आणि आडनाव प्रमाणे दंडवत (मात्रा फक्त नाही) दुपारी जेवण केल्यावर थोडा आराम करुन (झोप नाही) २ वाजता निघालो..आता उन्हाचा तडाखा जास्त असल्याने हळुहळू अंतर कापत होतो. शेवटी टेंभुर्णी येथे ३.३० ला पोचलो. तेथुन पंढरपूर ४० किमी आहे आणि हाच तो शेवटचा पॅच परीक्षा पाहण्यासारखा आहे. रस्ता अरुंद असल्याने लवकर संपतच नाही ( कितीही कसलेला cyclists असू दे). ऊन पण जास्त असल्याने पाठ भाजली जात होती आणि डोके गरम होत होते..मग कडुलिंबाच्या काही फांद्या पाल्यासकट तोडून हेल्मेट मध्ये अडकवल्या, जेणेकरून डोक्याला थंडावा मिळेल. शेवटचे काही किमी तर अगदी प्रत्येक किमी दगड कधी येतोय आणि दिसल्यावर अंतर कमी होत आहे याचा आनंद होत होता. सरते शेवटी संध्याकाळी ७ वाजता ज्या क्षणाची वाट पाहत होतो त्या भक्त निवासात पोचलो... यावेळेस बायको मात्र सोबत होती..आधी पोचली नाही

रीतसर मेडल आणि बॅग घेऊन रूम वर जाऊन आंघोळ करून जेवण करुन झोपी गेलो ते दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासासाठी.... परतीच्या प्रवासात मी.. मयुरेश आणि बालाजी असणार होतो, बायकोला येणार का विचारले ती नाही म्हणाली , पण तिने पुणे पंढरपूर प्रवास (२२५ किमी) केला याचा अभिमान आहे... कसलीही कुरकुर नाही की थकवा नाही. धन्यवाद तिच्या ईच्छाशक्तीला आणि महत्त्वकांक्षेला

परतीचा प्रवास हा खरा Cyclists चा खडतर प्रवास असतो, जेवढे अंतर आलेलो असतो तेवढेच परत जायचे असते सोबत उलट्या वाऱ्याचा सामना करतच.... पण ते उत्साहात नाही तर मन आणि शरीर यावर ताबा ठेऊन आणि जास्त ताण न घेता... कारण शरीर थोडे क्षीण झालेले असते, पण मन मात्र खंबीर असते आणि ईच्छशक्ती पण... म्हणूनच ते शरीरासोबत सांगड घालून एकत्र प्रवास करते, कोठेही अतिरीक्त त्रास न घेता. हीच खरी cyclist ची दैवी देणगी असते. जो तरला तो पोचला नाहीतर....

ठरल्याप्रमाणे आम्ही तिघे (मी, बालाजी आणि मयुरेश) इतर सायकलस्वारांबरोबर पहाटे ३.४५ ला निघालो...परत तोच ४० किमी टप्पा आता सुरू झाला..पण तो उलट्या वाऱ्याचा सामना करतच.... उलट्या वाऱ्याची सुरुवातीपासूनच तयारी होती आम्हाला मागे रेटण्याची...आणि माघार घेण्यासाठी, पण आम्ही हार मानू ते कसले cyclists... त्याला अंगावर घेत.. त्याचा मान राखून आणि त्याला सलाम करून ( मान खाली घालुन ) शेवटी टेंभुर्णी फाटा येथे सकाळीं ७ वाजता पोचलो... तिथेच नाश्त्याची सोय असल्याने तो करून तिघे निघालो..आता खरा प्रवास सुरू झाला. हायवे असल्याने रस्ता मोठा होता आणि रस्त्याच्या कडेने साईड पट्टया मोठ्या असल्याने आम्ही जात होतो पण थोड्या थोड्या वेळाने सीटवरून उठून सीट ला आराम देत होतो, त्यात उलटा वारा अडेलतट्टू प्रमाणे सारखा पुढून येत होता. आम्हीं तिघे समान अंतराने सायकलिंग करत करत hydration पॉइंटला थांबत शरीराचे तापमान आणि संतुलन समतोल राखत होतो. परतीच्या प्रवासात पण Hydration Point उत्तम असल्याने शरीर कुठेही Dehydrated होत न्हवते, त्यामुळे आमचा प्रवास सतत सुर होता, फक्त सीटवरून उठत बसत

दुपारी १२ वाजता भिगवण येथे जेवणासाठी पोचलो, नेहमीप्रमाणे IAS चे Volunteers कुठेही कमी पडू देत न्हवते, जेवणाची सोय उत्तम असल्याने जेवण करून थोडा आराम करून दुपारी २.३० वाजता निघु असे ठरले, त्याप्रमाणे जेवण करून आराम केला (झोप नाही) तोच बालाजीने १ वाजता फोन करून निघायचे का विचारले. मी मयुरेशला विचारून हो सांगितले, मग आवरून पाणी भरून दुपारी १.३० वाजता निघालो, दुपारची वेळ आणि उन्हाचा कडक तडाखा व सोबत उलटा वारा त्यामुळे वेग कमी झाला होता, पावसाची सुतराम शक्यता नव्हती निदान ढगाळ वातावरण तरी होऊ दे अशी विट्ठल चरणीत प्रार्थना करत होतो. रस्त्याने पाण्याची बाटली पण गरम होत होती आणि ते पाणी पिता येत नसल्याने अंगावर घेत होतो (व्हिडिओ पहा)एका ठिकाणी पेट्रोलपंप वर गार पाणी घेऊन पूर्ण अंगावर ओतले आणि निघलो पण ५ -१० मिनिटांत परत कपडे सुकत होते, तसेच दुपारी १.३० ते ३ पर्यंत फक्त १६ किमी अंतर कापले होते आणि आता मनात विचार चालु होता..काही तरी कृपा होऊ दे आणि ढगाळ वातावरण होऊ दे.. या विचारात परत एका ठिकाणी पाण्यासाठी Hydrayion Point आणि Shower Point दिसला, मग तिथे पाणी भरून पुर्ण Shower ने अंगावर पाणी घेतले आणि कपड्यासकट भिजलो (व्हिडिओ) .....आणि काय पाचच मिनिटात वातावरण एकदम ३६० डिग्री मधे बदलून गेले, जे आधी कडक ऊन ते आता ढगाळ वातावरण झाले होते...मन खुश झाले आणि सुरू झाले धुळीचे वादळ आणि चक्री वादळ आणि त्यात फुफाट्याचा वारा. त्या वाऱ्यात सायकली खाली पडल्या...त्या वाऱ्यामुळे पुढें जायचे टाळले ( व्हिडिओ मधे दिसेल) कारण वाऱ्याच्या हेलकाव्याने सायकल फेकली जाईल याची भीती होती, म्हणून Hydration पॉइंटला असलेल्या ट्रकच्या आडोशाला थांबलो, पण सुसाट वारा आणि वादळ काही थांबेना आणि पाऊस येईना ( आम्ही होतो त्या ठिकाणी) त्यामुळे आम्हाला थांबणे भागच होते. शेवटी ४ च्या सुमारास वादळ थांबले आणि आम्हीं निघालो. आता वातावरण पूर्ण ढगाळ झाले होते, आमच्या पुढें कुरकुंभला पाउस पडत आहे आणि मागे भिगवणला पण पाऊस आहे असे समजले, त्यामुळे वातावरणात एक गारवा निर्माण झाला होता, शरीर आपोआप शांत झाले होते आणि त्या गारव्यामुळे सायकल वेग घेत होती. कुरकुंभ संध्याकाळी ५ वाजता Hydration पॉइंटला पोचल्यावर असे समजले की भिगवण खूप मोठा पाऊस झाल्याने काही Cyclists तिथे अडकले होते, पण आम्ही लवकर निघाल्याने त्यातुन सही सलामत सुटलो होतो.

तेथुन निघुन कुरकुंभच्या उतारावरून आम्ही तिघे सुसाट निघालो आणि उरळी कांचन येथे संध्याकाळी ७ वाजता Hydration पॉइंटला भाताची खिचडी खाण्यासाठी थांबलो, अजुन ४० किमी अंतर बाकी होते. संध्याकाळी ७.३० ला निघुन सायकली सुसाट दामटल्या, उरळी ते हडपसर गर्दीचा रस्ता असुन पण सायकली वेगात जात होत्या... थेऊर येथे माझ्या सायकल चे पुढचे चाक रुसले (पंक्चर)... बहुतेक त्याला वेग पचला नाही मग ट्युब बदलुन शेवटी हडपसर ते पिंपळेगुरव च्या गर्दीतून वाट काढत कसलाही त्रास न होतो एकूण ४५६ किमी अंतर पार करत रात्री ११ वाजता सुखरुप घरी पोचलो

ह्या संपूर्ण सायकल प्रवासात जाताना पत्नीची साथ... दीनानाथ बरोबर काही काळ सायकल प्रवास आणि मयुरेश व बालाजी यांची जाता आणि येता साथ लाभली, तसेच इतर काही सायकलमित्र (कन्याकुमारी आणि हंपी सोबत असलेले) आणि Strava वर असलेले प्रत्यक्ष भेटले त्याबद्दल त्यांचे खुप खूप आभार समस्त मित्र परीवार... नातेवाईक आणि घरच्यांचे आशीर्वाद आणि पाठिंबा त्याबद्दल धन्यवाद

सरतेशेवटी IAS चे प्रमुख ३ शिलेदार गजू सर, अजित सर आणि भुजबळ साहेब यांचे त्रिवार अभिनंदन....तसेच Volunteers प्रमोद चिंचवडे श्रेयस पाटील, रमेश माने, गिरिराज, मारुती विधाते, संतोष नखाते, प्रदीप टाके, मदन शिंदे, कपिल पाटील, अविनाश चौगुले, प्रशांत तायडे, श्रीकांत चौधरी, अजित गोरे आणि बरेच Volunteers ह्या सगळ्यांना माझा सलाम आपणा सर्वांमध्ये एक देवी शक्ती आहे जे एवढे मोठे सामर्थ्य पेलू शकते आणि सायकलस्वारांची काळजी सुखरूप पणे पार पाडते.... पुन्हा एकदा तुम्हां सर्वांना माझा आणि माझ्या बायकोकडून सलाम आणि आशा करतो की तुमच्या सारखीच सेवा माझ्याकडून इथून पुढें घडावी हीच विट्ठल चरणी प्रार्थना

प्रतिक्रिया

Bhakti's picture

13 Jun 2023 - 10:26 pm | Bhakti

वाह! मस्तच!दोघांचे अभिनंदन!
स्ट्रावावर सध्या सुंदर रनर,सायकलवीर यांचे आनंदवारी चे अपडेट पाहून मस्त उत्साह वाढतो..

इतक्या उष्म्यात ही राईड येऊन जाऊन पूर्ण करणे म्हणजे खरोखर फिटनेसची आणि चिकाटीची कसोटी.

मिपा चालक प्रशांत यांचा उल्लेख वाचून आनंद झाला.

कर्नलतपस्वी's picture

14 Jun 2023 - 4:46 pm | कर्नलतपस्वी

विठ्ठल रखमाईचा एकच छंद असे फार कमी ठिकाणी दिसते, छान.

सर्वांचेच अभिनंदन.

कंजूस's picture

14 Jun 2023 - 5:07 pm | कंजूस

साहसी सहल.
उन्हाळ्यात ठेवण्याचं कारण?
व्हिडिओ दिलेला आहे -कुठे?

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Jun 2023 - 1:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्तच राईड झाली की!! तरीही एव्ह्ढ्या उन्हात सायकल चालवणे म्हणजे शारीरीक क्षमतेची कसोटीच आहे. अणि उभयतांनी केलीत हे अजुनच भारी!!
पुप्रशु आणि पुलेशु!!

मार्गी's picture

18 Jun 2023 - 8:50 pm | मार्गी

जबरदस्त!!!!! दोघांनी केली हे फारच भारी. तुमचे व ताईंचेही अभिनंदन! प्रेरणादायी आहे हे.

सिरुसेरि's picture

20 Jun 2023 - 3:37 pm | सिरुसेरि

अचंबित करणारे सायकल प्रवास वर्णन . या निमित्ताने पुणे - भिगवण - इंदापुर - टेंभुर्णी - पंढरपुर हा रस्ता व वाटेतील देशपांडे व्हेज , चतुर्थी हि ठिकाणे आठवली .

Avinash Anushe's picture

21 Jun 2023 - 6:59 pm | Avinash Anushe

जबरदस्त!!!!! दोघांनी केली हे फारच भारी. तुमचे व ताईंचेही अभिनंदन!

मुक्त विहारि's picture

21 Jun 2023 - 8:32 pm | मुक्त विहारि

सलाम

चौथा कोनाडा's picture

24 Jun 2023 - 1:38 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुपच भारी .... तुमच्या बरोबरच करतोय वारी असं वाटलं
खुप छान आणी ओघवतं लिहिलंय !

💖

छानच लिहीले आहे. खर तर असले अनुभव इतरांना इतरांना स्फुर्ती देतात.
फोटो असते तर अजुन वर्णन सजीव झाले असते.
तुम्ही तयारी कशी केली, रस्त्यात काळजी (मुक्काम, जेवण, सुरक्षा, वाहतुकीपासुन बचाव, प्रथमोपचार, आणिबाणीची व्यवस्था इ.) ह्याबद्दल माहिती लिहा. होतकरुंना उपयोगी पडेल.

बाजीगर's picture

24 Jun 2023 - 6:43 pm | बाजीगर

खूप भारी हो.
आपण आणि वहीनी दोघांचेही अभिनंदन.

व्हिडीओ लिंक खाली दिलीय
https://youtu.be/k-ojRZVDEGA

चौथा कोनाडा's picture

26 Jun 2023 - 5:24 pm | चौथा कोनाडा

भारी ... एक नंबर, म्हंजे काय जबरदस्तच ! !

कीप इट अप !