एक मुलायम स्पर्शक (२)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Jun 2023 - 8:29 pm

पूर्वार्ध इथे.
…………………………………………..
उत्तरार्ध

पहिल्या रंजनप्रधान भागात आपण निरोधची इतिहासकालीन संकल्पना, त्याचा शोध आणि शास्त्रशुद्ध विकास या गोष्टींचा विचार केला. या भागात आपण त्याच्या खालील शास्त्रीय पैलूंचा विचार करणार आहोत:

१. गर्भनिरोधनातील यशापयश
२. गुप्तरोगांपासून संरक्षण
३. वापराचे दुष्परिणाम/ समस्या
४. विल्हेवाट आणि पर्यावरण

ok

गर्भनिरोधनातील यशापयश
जेव्हा एखादे स्त्री-पुरुष जोडपे तात्पुरत्या गर्भनिरोधनासाठी प्रथम निरोधचा वापर सुरू करते, त्या संपूर्ण पहिल्या वर्षातील अनुभवानुसार निरोधचे यशापयश मोजले जाते. हे अपयश टक्केवारीत मांडण्याची प्रथा आहे. त्या आकड्यांकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करतो.

निरोधच्या वापराबाबत दोन शास्त्रीय संज्ञा प्रचलित आहेत:
१. अचूक आणि सातत्यपूर्ण वापर
२. प्रातिनिधीक( टिपिकल) वापर
आता यांचा अर्थ पाहू.

१. अचूक : संबंधित जोडप्याने त्यांच्या प्रत्येक संभोगाचे वेळी निरोध वापरणे आणि प्रत्येक क्रियेदरम्यान तो अथ पासून इतिपर्यंत काळजीपूर्वक हाताळणे.

२. प्रातिनिधीक: इथे अर्थातच मवाळ धोरण स्वीकारलेले दिसते. मासिक ऋतूचक्राच्या “सुरक्षित” कालावधीत निरोध न वापरण्याकडे कल राहतो. प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत अ/सुरक्षित कालावधी नक्की किती दिवस आहे हे अचूक सांगणे अवघड असते; त्यात व्यक्तीभिन्नता असतेच.

याखेरीज अन्य काही चुका वापरकर्त्यांकडून होऊ शकतात:
१. Latex निरोधच्या जोडीने योनीमध्ये तेलयुक्त वंगणांचा वापर करणे.
२. निरोध परिधान करण्याची वेळ आणि संभोग समाप्तीनंतर विभक्त होताना घडणाऱ्या चुका.
३. निरोध फाटणे, सरकणे इत्यादी अकस्मात घडलेल्या घटना.

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता एखाद्या जोडप्याच्या निरोधच्या पहिल्या वर्षातील वापराचे अपयश अंदाजे असे असते:
* अचूक वापर : 3%
* प्रातिनिधीक वापर: 14%
( निरनिराळ्या संशोधनानुसार या टक्केवारीत थोडाफार फरक पडू शकतो).

गर्भनिरोधनासाठी फक्त निरोधचा वापर करणाऱ्या जोडप्यांनी वरील गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.

गुप्तरोगांपासून संरक्षण

ज्या रोगांचा प्रसार लैंगिक क्रियेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस होतो अशा काहींचा आता आढावा घेतो. या आजारांचे तीन मुख्य गटांमध्ये वर्गीकरण करता येईल:
१. विषाणूजन्य आजार
२. जिवाणूजन्य आजार
३. इतर

आता एक महत्त्वाचा मुद्दा. वरील आजारांपैकी काही आजार असे आहेत, की ज्यांचे रोगजंतू मूत्रमार्गातून बाहेर पडणाऱ्या स्रावांच्या मार्फत पसरतात. फक्त अशा आजारांच्या बाबतीतच निरोधच्या वापराने मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळते. पण काही आजारांच्या बाबतीत त्यांचा प्रसार, निरोधने झाकले न गेलेल्या शरीराच्या इतर भागांमधून सुद्धा होतो. त्यांच्या बाबतीत अर्थातच संरक्षण कमी राहते.

लैंगिक क्रियेद्वारे प्रसार होणारे काही महत्त्वाचे आजार आणि त्यांच्या बाबतीत निरोधने मिळणाऱ्या संरक्षणाचे अंदाजे प्रमाण असे:

१. विषाणूजन्य:
A. HIV, Hepatitis B: >90%
B. CMV: 50 - 90 %
C. HSV-2 (हर्पिस) : 10 - 50 %

D. HPV: लैंगिक क्रियेद्वारे पसरणाऱ्या रोगांमध्ये याचे स्थान सर्वोच्च आहे. याच्या बाबतीत मात्र निरोधने मिळणारे संरक्षण बरेच कमी आहे. या विषाणूच्या दीर्घकालीन संसर्गातून विविध अवयवांचे कर्करोग होऊ शकतात. त्यामध्ये गर्भाशयमुख, योनी, पुरुषलिंग, गुदद्वार आणि घसा यांचा समावेश आहे.

. जिवाणूजन्य:
a. गनोरिआ: >90%
b. सिफिलीस: 50 - 90 %

संभोगाचे अन्य प्रकार आणि रोगसंरक्षण
योनीसंभोगा व्यतिरिक्त गुद आणि मुखसंभोग हे अन्य पर्याय अस्तित्वात आहेत. त्यांच्या संदर्भात काही विशेष अभ्यास झालेले आहेत. त्यातील ठळक मुद्दे:

१. मुखसंभोग : या क्रियेमध्ये योनी संभोगाच्या तुलनेत सातत्याने निरोध वापरण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी राहते. या संभोगातून घशाचा गनोरिआ होण्याचा धोका बरेच पट अधिक असतो.

२. गुदसंभोग : पुरुष समलैंगिकांमध्ये भिन्नलैंगिक जनतेच्या तुलनेत एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण सुमारे 18पट अधिक आहे. अशा पुरुषांमध्ये जो पुरुष स्वीकारत्या (receptive) स्थितीत असतो त्याला सक्रीय पुरुषापेक्षा अधिक धोका असतो.
या क्रियेदरम्यान जर सातत्याने निरोधचा वापर केला तर मिळणारे संरक्षण 70 ते 87% असते.

दुष्परिणाम आणि वापरसमस्या
१. एलर्जी: Latex निरोधांच्या बाबतीत काही जणांना एलर्जी असू शकते. या समस्येचे सर्वसाधारण समाजातील प्रमाण 4 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान आहे. काहींच्या बाबतीत त्याची लक्षणे ताबडतोब दिसतात तर काहींच्या बाबतीत उशिराने.
विविध लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे, नाकाडोळ्यांना पाणी सुटणे, छातीत दडपणे आणि श्वसनरोध इत्यादींचा समावेश आहे. प्रत्येकाच्या शरीरधर्मानुसार ही लक्षणे कमीअधिक स्वरूपात दिसू शकतात.

काही वेळेस वापरकर्त्याबरोबरच त्याच्या जोडीदाराला देखील अशी लक्षणे येऊ शकतात. अजूनही काही निरोधांत शुक्रजंतूमारक रसायने वापरलेली आहेत. काही जणांना या रसायनांची देखील एलर्जी असू शकते. ज्या लोकांना Latexचा त्रास होतो त्यांच्यासाठी PU किंवा प्राणीजन्य नैसर्गिक निरोधांची शिफारस आहे.

, मानसिक समस्या: निरोधचा वापर करणे हे एखाद्या स्त्री-पुरुष जोडीतील जोडीदारांपैकी एकाला किंवा दोघांनाही पसंत नसते. अशा वेळेस तो बळजबरीने वापरताना मनात नाराजी राहते. त्यातून काही जणांना औदासिन्य वाटते तसेच चिडचिडही होते.

३. निरोधचा चुकीचा वापर : हा होण्यामागे काही परिस्थितीजन्य कारणे असतात. इच्छा नसताना तो मनाविरुद्ध चरफडत वापरावा लागणे किंवा मद्यधुंद अवस्थेत तो वापरणे ही काही महत्त्वाची कारणे. तसेच वेश्यागमन करणाऱ्या लोकांच्या बाबतीत संबंधित पुरुषाने वेश्येकडून स्वतःला निरोध घालून घेणे हे देखील एक दखलपात्र कारण आहे.

विल्हेवाट आणि पर्यावरणपूरकता
वापरुन झालेले निरोध कचऱ्यात कोणत्या पद्धतीने टाकावेत हा एक महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे. सर्वप्रथम निरोधच्या वेष्टणाचा मुद्दा. सध्या वापरल्या जाणाऱ्या बहुसंख्य निरोधांचे वेष्टण प्लास्टिकस्वरूप असल्याने ते कोरड्या कचऱ्यातच टाकले गेले पाहिजे.

प्रत्यक्ष वापरलेला निरोध व्यवस्थित कागदात (टिशू) गुंडाळून ओल्या कचऱ्यात टाकावा हे ठीक आहे. परंतु ओल्या कचऱ्यातील गोष्टी नैसर्गिकरित्या विघटित होणे अपेक्षित असते. निरोधच्या बाबतीतली परिस्थिती त्याच्या उत्पादन-प्रकारानुसार अशी आहे:

१. शुद्ध स्वरूपातील latex आणि प्राणीजन्य निरोध विघटनशील आहेत.
परंतु, बाजारात उपलब्ध असलेल्या बहुसंख्य latex निरोधांमध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम रबर अशा दोन्ही पर्यायांचे मिश्रण असते. तसेच बहुसंख्य निरोधांत वेगवेगळी वंगणे आणि रसायने घातलेली असतात; त्यांच्यामुळे विघटनात अडथळा येतो. अशा निरोधांचे नैसर्गिक विघटन अत्यंत मंद गतीने होते; त्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात.

२. PU आणि स्त्री-निरोध हे प्लास्टिकसदृश्य गोष्टीपासून तयार केलेले असल्याने ते विघटनशील नाहीत.

३. अलीकडे शुद्ध नैसर्गिक स्वरूपातील latex पासून तयार केलेले आणि रसायनविरहित काही निरोध अल्प प्रमाणात का होईना बाजारात आलेले आहेत. अशा निरोधांचे वेष्टण देखील एक प्रकारच्या विघटनशील कागदाचे केलेले आहे.

प्राचीन काळी संभोगादरम्यान गुप्तरोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी निरोध या संकल्पनेचा उगम झाला. कालांतराने आधुनिक जीवनशैलीत त्याला गर्भनिरोधनाचे स्थानही प्राप्त झाले. निरोधच्या उत्पादनात होत गेलेला तांत्रिक विकास आपण पाहिला. एकोणीसाव्या व विसाव्या शतकात निरोधचे समर्थन आणि त्याचा विरोध या दोन्ही गोष्टींनी हातात हात घालून प्रवास केला.

आजच्या घडीला विविध प्रकारचे आकर्षक निरोध वापरासाठी उपलब्ध आहेत. पुरुष निरोध हे वापरण्यास अत्यंत सुटसुटीत आहेत. या उलट स्त्री-निरोध योग्य प्रकारे बसवणे हे काहीसे कटकटीचे काम आहे आणि त्यामुळे ते फारसे वापरात नाहीत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध उंबरठ्यावर येऊन ठेपलेत. त्यातले काही कुतूहलजनक आहेत. भविष्यात पूर्णपणे पर्यावरणपूरक निरोधांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाची उत्सुकता आहे.

निरोधची ही कूळकथा वाचकांना उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे.
************************************************************************************
समाप्त.

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

मागील तेखाचा उत्तरार्ध यापेक्षा अधिक रंजक होऊच शत नाही
|अलीकडे शुद्ध नैसर्गिक स्वरूपातील latex पासून तयार केलेले आणि रसायनविरहित काही निरोध अल्प प्रमाणात का होईना बाजारात आलेले आहेत. अशा निरोधांचे वेष्टण देखील एक प्रकारच्या विघटनशील कागदाचे केलेले आहे.
भारतात आजकाल Durex त्यांच्या Real - Feel नावाच्या उत्पादनाची जाहिरात करते आहे. ते याच प्रकारातील आहे का ? आणि हे साधरण स्पर्शकापेक्षा महाग का असतात ?

कुमार१'s picture

12 Jun 2023 - 5:55 am | कुमार१

Durex Real - Feel

नाही, हे विघटनशील नसावेत. ज्यांना latex ची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी हा वेगळा पर्याय असून त्यात polyisoprene हे रसायन वापरलेले आहे.

इथे दिलेल्या माहितीनुसार Sustain Natural हा प्रकार पर्यावरणपूरक आहे.

हे जे सगळे आधुनिक प्रकार आले आहेत त्यांची माहिती सध्या आपल्याला जाहिरात माध्यमामध्येच मिळते आहे. त्याविषयी शास्त्रीय लेखन सहज उपलब्ध नाही.

कर्नलतपस्वी's picture

12 Jun 2023 - 6:44 am | कर्नलतपस्वी

तांबी हा सुद्धा एक गर्भनिरोधाचा प्रकार. सरकारने याचा खुप पाठपुरावा केला. गावागावात भित्तीचित्रे व यमक साधत चारोळ्या,दोनोळ्या नी सर्व सामान्य जनतेला याची माहीती पुरवली. तरीही हा प्रकार जनतेला फारसा आवडला नाही.

कुमार१'s picture

12 Jun 2023 - 7:36 am | कुमार१

तांबी हा सुद्धा... भित्तीचित्रे व यमक साधत

>>> “दोन मिनिटाचे काम आणि तीन वर्ष आराम” ही जाहिरात छानच होती.

गर्भनिरोधन आणि विविध कुटुंबकल्याण कार्यक्रमांमध्ये मला आलेले ग्रामीण भागातील काही अनुभव मी इथे लिहिले आहेत

वामन देशमुख's picture

12 Jun 2023 - 8:25 am | वामन देशमुख

तांबी बसवा, "पाळणा लांबवा" असे euphemism वापरायचे त्या काळात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jun 2023 - 11:32 am | राजेंद्र मेहेंदळे

असे विषय आम्हाला माहीत करुन देण्याबद्दल धन्यवाद कुमार सर!!

माझे २ पैसे
१. निरोध वापरताना कामसुखात (थेट स्पर्श न झाल्याने) कमतरता येते या समजावरुन त्याचा वापर टाळला जात असावा. पण आधुनिक संशोधनामुळे हे प्रमाण वाढेल असे लेखावरुन वाटत आहे.
२. जोडप्यापैकी एकाने संतती नियमनाची शस्त्रक्रिया (पुरुष किवा स्त्री) केली असल्याने निरोध वापरला नाही तरी चालेल (दोघे एकमेकांशी एकनिष्ठ आहेत हे गृहित धरुन). येथे डॉक्टरांनीच सांगितल्याप्रमाणे पुरुषांची शस्त्रक्रिया करणे सोपे पण उलट करणे अवघड तर स्त्रियांची शस्त्रक्रिया करणे अवघड पण उलटवणे सोपे.(यावर कृपया प्रकाश टाकावा)
३.तांबीसारख्या उपायात शरीराला ईजा होण्याची शक्यता असल्याने + कंबर दुखणे वगैरे होत असल्याने ती जास्त लोकप्रिय झाली नसावी असे वाटते.
४. गर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परीणाम हा वेगळा एक मुद्दा आहेच.

या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुरुषाने निरोध वापरणेच सुटसुटीत वाटते. (यात समलैंगिक वगैरे लक्षात घेतलेले नाहीत)

माहितीपुर्ण लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!!

कुमार१'s picture

14 Jun 2023 - 12:49 pm | कुमार१

चिकित्सक प्रतिसाद आवडला.

पुरुषांची शस्त्रक्रिया करणे सोपे पण उलट करणे अवघड तर स्त्रियांची शस्त्रक्रिया करणे अवघड पण उलटवणे सोपे.

चांगला मुद्दा. सर्वसाधारण विधान म्हणून हे बरोबर आहे.
पुरुष शस्त्रक्रियेमध्ये ज्या नलिकेचा (vas) संबंध येतो त्याची पुनर्जोडणी करण्यासाठी अत्यंत सूक्ष्म पद्धतीची शस्त्रक्रिया करावी लागते. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत कौशल्य आणि अनुभवाचा भाग मोठा असतो.

अर्थात पुरुष व स्त्रियांच्या शस्त्रक्रियांमध्ये दिवसेंदिवस आधुनिक सुधारणा होत आहेत. संबंधित शल्यचिकित्सकांच्या कौशल्यानुसार वरील सर्वसाधारण विधानात फरक पडू शकेल.

टर्मीनेटर's picture

14 Jun 2023 - 12:01 pm | टर्मीनेटर

हा भागही छान माहितीपुर्ण आहे 👍

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध उंबरठ्यावर येऊन ठेपलेत. त्यातले काही कुतूहलजनक आहेत.

पुढच्या भागात त्याबद्दल माहिती द्यावी अशी विनंती. मी ह्या उत्पादनाचा उपभोक्ता नसलो तरी अशी रंजक पद्धतीने दिलेली शास्त्रीय माहिती वाचायला नक्कीच आवडेल.

कुमार१'s picture

14 Jun 2023 - 12:55 pm | कुमार१

धन्यवाद !

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध उंबरठ्यावर येऊन ठेपलेत.

हे वाक्य दोन्ही भागांच्या समारोपाचे म्हणून होते :)
अत्याधुनिक निरोधांची थोडक्यात माहिती या लेखाच्या पूर्वार्धात दिलेली आहे.
आता ते जेव्हा प्रत्यक्ष भारतीय दुकानांमध्ये येतील तेव्हा त्याबद्दल अधिक काही माहिती इथल्या प्रतिसादांमध्ये लिहिता येईल.

टर्मीनेटर's picture

14 Jun 2023 - 1:03 pm | टर्मीनेटर

आता ते जेव्हा प्रत्यक्ष भारतीय दुकानांमध्ये येतील तेव्हा त्याबद्दल अधिक काही माहिती इथल्या प्रतिसादांमध्ये लिहिता येईल.

तसंही चालेल 😀

कुमार१'s picture

14 Jun 2023 - 12:55 pm | कुमार१

धन्यवाद !

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध उंबरठ्यावर येऊन ठेपलेत.

हे वाक्य दोन्ही भागांच्या समारोपाचे म्हणून होते :)
अत्याधुनिक निरोधांची थोडक्यात माहिती या लेखाच्या पूर्वार्धात दिलेली आहे.
आता ते जेव्हा प्रत्यक्ष भारतीय दुकानांमध्ये येतील तेव्हा त्याबद्दल अधिक काही माहिती इथल्या प्रतिसादांमध्ये लिहिता येईल.