ग्रॅण्ड शो

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
5 Jun 2023 - 11:47 am

नवं शैक्षणिक वर्षं उजाडलं, आम्ही नोटीस बोर्डासमोर जमलो. बघतो तर लोचा! आम्हाला दिलेला वर्ग साक्षात जुन्या इमारतीत आणि नवे विद्यार्थी (नी) मात्र नव्या इमारतीत. ही फाळणी कुणालाच मंजूर नव्हती. काही लडीवाळ शब्दांची देवाण घेवाण झाली आणि सर्वांची पाऊले हॉलिवुड कडे वळली. हॉलिवुड म्हणजे आमच्या कॉलेजची मागची बाजू. मोठा नयनरम्य परिसर. ईमारतीच्या भिंतीलगत हिरवळ आणि काही शोभिवंत झाडं. अशोक, गुलमोहर आणि नारळाचे उंच वृक्ष. दुसर्‍या म्हणजे खाडीलगतच्या बाजूला सलग बांबूची बेटं. मधे पायवाट. टोकाला खाडी, डावीकडे वळलं की आमच्या नव्या इमारतीला वळसा घालून कला, वाणिज्य च्या इमारती आणि पुढे कँटीन. बांबूच्या दोन बेटांमधल्या मोकळ्या जागेत बैठक जमली. सर्वांच्या डोक्यात एकच विचारः "असं लुख्ख्यासारखं राहायचं ?". शेवटी उपाय सापडला. संप!!!

सगळी निरोपानिरोपी झाली. दुसर्‍या दिवशी बंद पुकारायचा. घासू पोरं आणि पुस्तकांचा भार वाहणार्‍या मुलींना साम दाम दंड भेद काय आणि कसं वापरुन वर्गात जाण्यापासून परावृत्त करायचं यावर चर्चा झाली . बहुसंख्य मुलं वर्गापेक्षा बाहेर अधिक वेळ घालवत असल्यामुळे पाठिंबा मिळायला तसा प्रॉब्लेम नव्हता. दुसर्‍या दिवशी सकाळी संपाला सुरूवात झाली. मुलामुलींना वर्गात न जाण्याचे आवाहन करण्यात आले. कुठे प्रेमाने तर कुठे उपहासाने म्हणजे "अगं एक दिवस वर्गात गेली नाहीस तर काही तुझी कलेक्टरी जाणार नाही". काही उपद्व्यापी मुलांनी "हा संप तुमच्यासाठी आहे, आपण वेळेवर जागे झालो नाही तर कॉलेज भरमसाठ फीवाढ करणार आहे"असं परस्पर ठोकून दिलं. जुनी इमारत आणि नवी इमारत यामध्ये असलेल्या फरसबंद वाटेवर मुलांनी ठिय्या दिला. काहीतरी कोलाहल माजला आहे मुलांची घोषणबाजी चालू आहे हे लक्षात येताच काही प्राध्यापक मंडळी घटनास्थळी दाखल झाली. आमचे ज्येष्ठ प्राध्यापक पुढे आले आणि त्यांनी काय प्रकार आहे, कसली गडबड चालली आहे अशी विचारणा केली. कुणीतरी कारण सांगितलं, "सर काय करणार नव्या वर्षात वर्गांचं वाटप अंदाधुंद पद्धतिने करण्यात आले आहे, आम्हाला लहान वर्ग मिळाला आहे." असं होय, असं म्हणत सर हसायला लागले. आम्ही अवाक! या या, जरा असे समोर या असं म्हणत सरांनी आम्हा दहा पंधरा जणांना बोटांनी खुणावत पुढे बोलावलं. एव्हाना उपप्राचार्यही दाखल झाले होते. सरं हसत हसत म्हणाले, अरे तुम्हाला वर्गात तर कधी पाहिल्याचं आठवत नाही, आणि आता म्हणताय वर्गं लहान आहे? जमलेले समस्त प्राध्यापक/ प्राध्यापिका खदखदून हासले. आमची चलबिचल सुरू झाली. आता उपप्राचार्य पुढे आले. गंभीर चेहरा करत ते सरांना म्हणाले, सर या मुलांना कदाचित उपरती झाली असेल, त्यांनी वर्गात नियमितपणे बसायचं, मन लावून अभ्यास करायचा असं ठरवलं असेल. मग आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. असं म्हणत त्यांनी मागे असलेल्या शिपायाला पुढे बोलावला आणि म्हणाले, अरे यांना सगळे वर्ग दाखव आणि कुठला वर्गं पसंत पडतो ते मला येऊन सांग म्हणजे मी ताबडतोब तो वर्ग यांना द्यायची व्यवस्था करतो. मग आमच्याकडे पाहत म्हणाले, बघा मुलांनो, सांगाल तो वर्ग मिळेल पण उद्यापासून मला सगळे वर्गात दिसायला हवेत. हाय रे दुर्दैवा! सगळच मुसळ केरात. बिमशर्त माघार

एके दिवशी सकाळी आम्ही केमिस्ट्री लॅब मध्ये शिरलो. वेळापत्रकानुसार आज प्रॅक्टिकल होतं. हजेरीच्या दृष्टीने प्रॅक्टिकल बुडवुन चालणार नव्हतं. प्राध्यापक मंडळी आपल्या विद्यार्थ्यांना पूर्ण ओळखून होती. आमच्या कॉलेजमधील पहिल्यावहिल्या प्रॅक्टिकलला आत शिरलो तेव्हाच आम्हाला समजावण्यात आलं होतं की इथे बाटलीत दिसणारं इथिल अल्कोहोल हे औद्योगिक दर्जाचं आहे, पिण्यास योग्य नाही, उगाच स्वतःच्या आणि आमच्या गळ्याला पास लागेल असं काही करु नका. बर्नर म्ह़णजे ऑलिंपिक ज्योत नाही, पेटता बर्नर हातात घेऊन इकडे तिकडे फिरायचं नाही आणि तो हातात धरुन फुलबाजीसारखाही फिरवायचा नाही. इथे असलेला बर्फ अशुद्ध असू शकतो, तो टाकून थंड पाणी पिण्याचा उपद्व्याप करू नका. कितीही सांगितलं तरी पोरं काय उचापती थांबवणार आहेत का? एखाद्याचं लक्ष नसताना बेंट पाईपची फुंकायची बाजू तापवून तो अलगद जागेवर आणून ठेवणं, काडेपेट्या गायब करणं, असे उद्योग चालायचेच, एकदा कण्डेन्सरचा वापर हुक्क्या सारखा करुन झाला होता. तर त्या दिवशी आम्ही हसत खेळंत प्रॅक्टिकल करत असताना एक छोटा अपघात घडला. आमच्यातल्या एकानं बेसावधपणे फ्युजन ट्युब न बघता सिंकमध्ये टाकली. सिंक फिल्टर पेपरच्या बोळ्यामुळे जरा तुंबलं होतं. दोनेक क्षण भिरभिरत ट्युब फाडकन फुटली आणि सोडियमचे कण असलेले काचेचे सूक्ष्म तुकडे उडाले. पैकी एक तुकडा एकाच्या नाकावर अगदी वर दोन डोळ्यांच्या मधोमध बसला. त्याचा डोळा थोडक्यात वाचला. क्षणात सगळे सावरले आणि ट्युब कशी फुरफुरत गेली यावर गप्पा सुरु झाल्या. लवकरच एक नवीन करामत जन्माला येणार होती.

पद्धतशिर आखणी झाली. कुणी काय आणायचं, कुणी काय करायचं, टेहळणी कुणी करायची, गर्दी कुणी व कशी जमवायची हे ठरलं. मग योग्य संधी साधून एकदा छोट्या प्रमाणावर रंगीत तालिमही झाली. आणि कार्यक्रमाचा दिवस ठरला. तिकडे हॉलिवुडवर जय्यत तयारी करण्यात आली. चला रे लवकर हॉलिवुडवर चला, धमाल आहे लवकर या असा प्रचार सुरु झाला काही उत्साही पोरं तिकडे आर्ट्स कॉमर्स वाल्यांना बोलवायला गेली, कॅण्टिनमध्ये बसलेल्यांना सांगण्यात आलं. अनेक जण चला पाहुया काय आहे असं म्हणंत निघाले. जरा बर्‍यापैकी गर्दी जमताच कार्यक्रम सुरू झाला. आमच्यातल्या एकाने सूत्रधाराची भूमिका धारण केली. हॉलिवुडच्या मागे असलेल्या खाडीच्या पाण्याकडे बोट दाखवत त्यानं विचारलें, की बच्चे लोक हे काय आहे? एका दोघांनी सांगितलं की पाणी आहे. सुत्रधार म्हणाला बरोब्बर. मुलांनो , आग लागली तर पाणी ओतुन विझवतात, बरोबर? मुलांनी माना डोलावल्या. मगे तो म्हणाला, पण पाण्यालाच आग लागली तर? पब्लिक जरा चक्रावलं. आता जमलेल्या गर्दीचं कुतुहल जागं होत होतं. सूत्रधाराने जोशात विचारलं, कधी पाण्याला आग लागलेली पाहिली आहे का? काहीजणांकडून नाही असं अपेक्षित उत्तर येताच सूत्रधारानं विचारलं, तुम्हाला पाण्याला आग लागलेली बघायची आहे? आता उत्सुकता शिगेला पोचली होती. बर्‍यापैकी मोठ्या आवाजात हो असं ऐकायला येताच सूत्रधार म्हणाला, चला तर मग. मी एक ते तीन आकडे म्हणतो. तीन म्हटलं की जोरदार टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजताच पाणी पेटणार! पण जर टाळ्या जोरदार झाल्या तरंच. एक दोन आणि तीन! तीन ऐकताच पब्ल्किनं जोरदार टाळ्या वाजवल्या आणि काही क्षणातच पाणी धडधडून पेटलं! पब्लिक अवाक! सगळे ते दृश्य पाहायला पुढे धावले. आमचा ग्रॅण्ड शो एकदम हीट.

एकदा प्रयोग यशस्वी होताच महिन्या दोन महिन्यात एखादा शो व्हायला लागला. पब्लिकला तेवढाच टाईमपास. यामागची संकल्पना सोपी होती. ओहोटी लागली की खाडीचं पाणी ओसरतं अणि विस्तिर्ण पसरलेल्या दगडांच्या खोलगट पृष्ठभागात पाणी साचतं , त्यामुळे इवलेसे जलाशय तयार होतात. या पाण्यावर पाण्यात न मिसळणारा किंवा अगदी अल्प प्रमाणात मिसळणारा आणि ज्वालाग्रही असा द्रव ओतायचा . या पाण्यात जर सोडीयमचा तुकडा टाकला तर तो भडकतो आणि छोटासा स्फोट होतो. अर्थातच तवंग पेट घेतो आणि द्रव संपेपर्यंत ज्वाला नाचतात. जेव्हा शो करायचा असेल तेव्हा तेव्हा प्रथम पाण्याची पातळी व साचलेले जलाशय सोयीचे हवेत. मग परिसराची टेहळणी करायची. कुणी चुकुन इकडे राऊंडवर तर येत नाही ना याची खातरजमा करुन घ्यायची. उगाच मुला मुलींचे घोळके दिसत नाहीत ना ते पाहायचं. सगळी तयारी करायची - म्हणजे केमिस्ट्री लॅब मधून ज्यांचं कुणाचंतरी प्रॅक्टिकल चाले आहे त्यापैकी कुठल्यातरी जरा ओळखिच्याला पटवुन त्याला सोडियमचा तुकडा तयार ठेवायला सांगायचा. क्लोरोफॉर्म किंवा कार्बन टेट्रा क्लोराईड आधीच बाहेर काढलेलं असायचं. परिस्थिती अनुकुल आहे म्हणताना शो जाहीर करायचा. एकिकडे गर्दी जमा करायची आणि प्रेक्षक जमले की लॅबमधून फिल्टरपेपरच्या जाड गठ्ठ्यात गुंडाळून सोडियमचा तुकडा आणायचा. क्लोरोफॉर्म किंवा कार्बन टेट्रा क्लोराईड अलगद पाण्यावर ओतायचं. वेळ साधून पाण्यात फेकण्यासाठी एकजण अचूक जागी लपायचा. सूत्रधाराने डायलॉग सुरु केले आणि टाळ्यांचा आवाज आला रे आला की लपलेल्याने सोडियमचा तुकडा वेष्टणासकट पाण्यात भिरकावायचा. प्फुर्र प्फुस्स करत सोडियम फुटायचा आणि पाण्यावर आगीच्या ज्वाळा पसरायच्या.

आणि अचानक एक दिवस मोठा लोचा झाला. ज्यानं द्रव आणायचा त्यानं क्लोरोफॉर्म किंवा कार्बन टेट्रा क्लोराईड न सापडल्याने म्हणा किंवा निष्काळजीपणाने बेंझीन आणलं. आग लागेपर्यंत सगळं ठिक झालं पण आगीवर काजळी मोठ्या प्रमाणात आली आणि ज्वालाही अंमळ मोठ्या भडकल्या, कदाचित आक्खी बाटली ओतली गेली असेल. मोठ्या ज्वाळा आणि काजळीमुळे बोंबाबोंब झाली. अनेक प्रध्यापक, प्राचार्य घटनास्थळी दाखल झाले. आम्हाला खबर लागल्यामुळे आम्ही आणि आमच्यामुळे प्रेक्षक पलिकडच्या बाजुने पळाले. सुदैवाने कोणीही सपडलं नाही. प्राध्यापक मंडळींना काय झालं असावं याची कल्पना आली आणि केमिस्ट्री लॅबवर कडक निर्बंध घातले गेले.

आमचा ग्रॅण्ड शो मात्र कायमचा बंद पडला.

जीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

5 Jun 2023 - 12:03 pm | आग्या१९९०

ठाणा जोशी बेडेकर कॉलेज ना?
सोडियम रॉकेल मध्ये ठेवायला लागते, तुम्ही फिल्टर पेपर मधून कसा आणला? पेपरने पेट घेतला नाही का?
हॉलिवूडचा योग्य वापर केला की नाही कॉलेज जीवनात?

सर्वसाक्षी's picture

5 Jun 2023 - 2:14 pm | सर्वसाक्षी

सोडियम रॉकेल मध्ये बुडवून ठेवलेला असतो. आम्ही तो अगदी ऐनवेळी न्यायचो. रॉकेल मध्ये ठेवलेल्या तुकड्यांना रॉकेल लडबडलेलं असायचं, जे फिल्टर पेपर मध्ये शोषलं जायचं. फिल्टर पेपर चा गठ्ठा वापरल्याने इतक्या कमी वेळात ऑक्सिजन बरोबर संपर्क यायचा नाही सबब वाहतूक सुरक्षित पार पडायची

Bhakti's picture

5 Jun 2023 - 12:23 pm | Bhakti

मस्तच शो!
आमच्या प्रयोगशाळेत इ.अल्कोहोलची लपवलपवी व्हायला कारण लिमिटेड इश्यु व्हायचं.बिसलेरी बाटलीत इ.अल्कोहोल लपवलं होतं.वरतीच राहिलं.एक मैत्रिण चुकून ते प्यायली.आम्ही पळत जाऊन ma'am ती अल्कोहोल प्यायली.त्यांना वाटलं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतेय का?त्यापण हैराण :)

कंजूस's picture

5 Jun 2023 - 12:44 pm | कंजूस

काही प्रयोग झालेत. पण आमच्या खालसा कॉलेजात ( माटुंगा) 'त्या' मुलांना अजिबात यात इंटरेस्ट नसे.. चार वर्षं काढणे आणि घरचा धंदा सांभाळणे एवढेच काम असे.

बारक्या बारक्या नळ्यांमध्ये सोडियमचे तुकडे भरून, त्या बोटाच्या बेचक्यांत पकडून त्यात अन्य प्रोसेस करायला जाताना वाटेत बेसिनमध्ये मोठ्या परीक्षानळीत पाणी भरून घेणे असे एकात एक उरकण्याच्या नादात नळाचे पाणी सर्व नळ्यांत एकत्र शिरून बोटांच्या मध्येच फाड फाड फूड करत फटाके फुटल्याची आठवण आली. अंमळ हळवा झालो. त्याही पूर्वी, म्हणजे अगदी शाळेत नववी दहावीत का कोण जाणे पण मी सोडियम, शिसे, जस्त, पारा आणि अशा अनेक गोष्टी गोळा करून संग्रही ठेवायचो. विचित्र छंद. त्यात सर्वात खतरनाक म्हणजे सोरा. तो शाळेतील सरांशी चांगले संबंध असल्याने एका पुडीत बांधून मिळाला होता. पारा एका दुकानातून विकत घेत असे, शिसे हे मासे पकडण्याचा गळ असतो त्यात वजन म्हणून लावायला गोळीच्या रुपात मिळे.. कथिल त्याच पारावाल्या काकांकडे मिळत असे. हार्डवेअर दुकानच होते. हल्ली तसले पदार्थ असे सुट्टे विकणारी दुकानं बहुधा गायब झाली असावीत.

जे काही पैसे हाती असत (पाच दहा रुपये) त्यात हेच सर्व घेत असे . जस्त लोकांच्या घरी किंवा आमच्या मागच्या अंगणात जे शेडचे पत्रे होते त्यावरील कोटिंग तोडून तोडून कुरतडून मिळवत असे. हे सर्व वितळवून प्रयोग चालायचे (तिन्ही साध्या घरगुती गॅसवर वितळतात). सोडियम घरी बनवता यावा म्हणून केलेला प्रयोग डेडली होता. असो. तर गेले ते दिवस. तुम्ही आठवणी जाग्या केल्यात.

खेडूत's picture

9 Jun 2023 - 1:23 pm | खेडूत

अरे वा!
म्हणजे लहानपणा पासूनच शास्त्रज्ञ म्हणा की तुम्ही..
:)

वामन देशमुख's picture

6 Jun 2023 - 12:39 pm | वामन देशमुख

लै भारी ग्रॅण्ड शो!

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Jun 2023 - 4:29 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्तच की. आमच्या केमिस्ट्री लॅबमध्ये पिपेटमधुन अ‍ॅसिड वर ओढताना तोंडात जाणे नॉर्मल असे. अकरावीत बहुतेक मुले ही चूक करत. प्रेसिपिटेट करताना सेंट्रिफ्युगल मशीन्मधुन टेस्ट ट्युब उडवणे आणि फोडणे हा अजुन एक छंद आठवला. एकुणच लॅबमधले ते चित्र विचित्र वास्,रंग्,चवी आणि त्यावरताण केमिकल रिअ‍ॅक्शन पाठ करण्याने भणभणणारे डोके यामुळेच मी लवकरच केमिस्ट्री सोडले.

सुबोध खरे's picture

9 Jun 2023 - 11:31 am | सुबोध खरे

आमच्या फार्माकॉलॉजी च्या प्राध्यापकांनी आपल्या संशोधनात अल्कोहोलचा वापर करत असताना त्यांना अपेक्षित निकाल मिळत नव्हते.

त्यांना असा संशय आला कि त्यांचा चपराशी अल्कोहोल पिऊन त्यात पाणी मिसळून ठेवत असावा. त्यामुळे काष्ठऔषधी मधून त्यांना अपेक्षित अशी अल्कलॉइडची मात्र मिळत नव्हती.

त्यामुळे त्यांनी त्यात आपण नेहमी वापरतो तो इंडिकेटर "फिनोल्फथॅलीन" मिसळून ठेवले. फिनोल्फथॅलीन हे रंग हीन वास हीन असे "रेचक" आहे.

यामुळे चोरून अल्कोहोल पिणाऱ्या चपराशाला "हगवण" लागली. त्याने दोन तीन दिवसांनी सरांना पोट बिघडल्याचे तक्रार केली.

तेंव्हा सरानी त्याला विचारले असताना त्याने नाखुशीने कबुली दिली कि मी त्या बाटलीतील अल्कोहोल पितो आहे.

सरानी त्याला सांगितले कि असे "औषधी अल्कोहोल" पिऊ नये त्याचा उलट परिणाम होउ शकतो.

यानंतर त्याने तेथिल अल्कोहोल पिणे बंद केले आणि सराना सुद्धा काष्ठऔषधी मधून त्यांना अपेक्षित अशी अल्कलॉइडची मात्रा मिळू लागली.

अर्थात सरांनी त्याला कधीही सांगितले नाही कि मी त्यात फिनोल्फथॅलीन मिसळून ठेवले होते.