स्त्री-पुरुषांच्या कामक्रीडेतील सुखाची सर्वोच्च पातळी म्हणजे संभोग. ही क्रिया संबंधित जोडप्याला सुख देण्याबरोबरच मानवी पुनरुत्पादनाशीही जोडलेली आहे. सुयोग्य काळात केलेल्या संभोगातून स्त्री-बीजांडाचे फलन होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. जेव्हा एखाद्या जोडप्याला नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती नको असते त्या काळात विविध गर्भनिरोधक साधनांचा वापर केला जातो. या प्रकारची साधने पुरुष आणि स्त्री या दोघांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत.
तात्पुरत्या गर्भनिरोधनासाठी पुरुषाने संभोगसमयी वापरायचे साधन हे तुलनेने सोपे असते. निरोध हे या दृष्टीने खूप सुटसुटीत व लोकप्रिय माध्यम आहे. त्याचा काळजीपूर्वक वापर केल्यास त्याची गर्भनिरोधक म्हणून उपयुक्तता बऱ्यापैकी चांगली आहे. याव्यतिरिक्त, निरोधच्या वापरामुळे वापरकर्त्यांना काही गुप्तरोगांपासून काही प्रमाणात संरक्षण देखील मिळते. आज बाजारात लॅटेक्स आणि अन्य अत्याधुनिक साधनांपासून बनवलेले निरोध मुबलक उपलब्ध आहेत. त्यांचा वापरही जगभरात मोठ्या प्रमाणावर होतो. निरोधची मूळ संकल्पना, त्याचा शोध आणि कालांतराने होत गेलेला विकास हा सर्व इतिहास खूप रंजक आहे. तो या लेखाद्वारे सादर करतो.
इतिहासात डोकावता निरोधच्या वापराबाबत एक गोष्ट लक्षणीय आहे. प्राचीन काळी निरोध म्हणून जे काही वापरले गेले, त्याचा उद्देश संबंधित स्त्री-पुरुषांच्या संपर्कातून गुप्तरोगाचा प्रसार होऊ नये, हा होता. (गर्भनिरोधन हा विचार कालांतराने पुढे आला).
निरोधच्या वापराची पहिली ऐतिहासिक नोंद ख्रिस्तपूर्व 3,000 वर्षांपूर्वी झालेली आढळते. तत्कालीन Knossos या राज्याचा Minos हा राजा होता. त्याच्या संदर्भातील दंतकथा विचित्र आहे. त्याच्या वीर्यात म्हणे “साप आणि विंचू” (= विष) असायचे ! त्यामुळे त्याने संभोगलेली एक दासी मरण पावली. या धोक्यापासून त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी एक ‘निरोध’ तयार करण्यात आला. हा निरोध बकऱ्याच्या मूत्राशयापासून तयार केलेला एक पडदा होता. राजाराणीच्या संभोगादरम्यान हा पडदा राणीच्या योनीमध्ये बसवण्यात आलेला होता. म्हणजेच तेव्हा निरोध हे मुख्यत्वे पुरुषाचे साधन असते ही संकल्पना अजून आलेली नव्हती. थोडक्यात, स्त्री-पुरुष संभोगादरम्यानचा हा एक आंतरपाट अर्थात अडथळा !
या राजाराणीने संभोगसमयी या प्रकारचा प्राणीजन्य निरोध नियमित वापरूनही त्यांना तब्बल आठ अपत्ये झाली !
यानंतर जशी सामाजिक प्रगती होत गेली तसे जगातील विविध संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निरोध वापरले गेले. प्राचीन इजिप्तच्या लोकांनी प्रथमच लिननच्या आवरणाचा निरोध म्हणून वापर केला. रोमन लोकांमध्ये लिनन तसेच प्राण्यांच्या मूत्राशयापासून बनवलेले निरोध वापरात होते. न्यू गिनीतील टोळ्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण स्त्री-निरोध बनविला होता. तो 6 इंच लांब असून त्याला कपासारखा आकार होता. योनीच्या दाबाने तो योनीत घट्ट बसत असे.
यानंतर चिनी व जपानी संस्कृतीत वापरले गेलेले निरोध अजून वैशिष्ट्यपूर्ण होते. चीनमध्ये ते रेशमी कागदापासून बनवले गेले आणि त्यात वंगणाचा देखील वापर केला गेला. जपानी निरोध कासवाचे कवच किंवा वेळप्रसंगी चामड्यापासून देखील बनवलेले असायचे. काही आशियाई संस्कृतींमध्ये छोट्या आकाराचे शिस्न-निरोध देखील वापरात होते.
इसवी सनाच्या 15 ते 18 व्या शतकांदरम्यान युरोपीय वैज्ञानिकांनी निरोधच्या विकासामध्ये मोठा हातभार
लावला. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने Gabriele Falloppio या इटालिय शरीररचनाशास्त्रज्ञाचे नाव घ्यावे लागेल (त्यांनी स्त्रीच्या गर्भाशयापासून निघालेली fallopian ही नलिका शोधलेली आहे). त्या काळी सिफिलिस हा गुप्तरोग खूप जोरात होता. म्हणून Falloppioनी असे सुचवले, की संभोगादरम्यान पुरुषाने निरोध चढवल्यानंतर मागच्या बाजूस तो रिबिनीने बांधावा.
17 व्या शतकात निरोधचा गर्भनिरोधक म्हणून देखील महत्त्वाचा उपयोग आहे हा विचार प्रबळ झाला. इंग्लंडमध्ये निरोध मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले. परिणामी तिथल्या जन्मदरात लक्षणीय घट झाली. तत्कालीन लष्करात सिफिलसचे प्रमाण बऱ्यापैकी असायचे. त्यावर उपाय म्हणून लष्करात मोठ्या प्रमाणावर निरोधचे वाटप होऊ लागले. ते निरोध मासे, गुरे व मेंढ्या यांच्या आतड्यांपासून तयार केलेले होते.
यानंतरच्या काळात प्रचलित असलेली इंग्लंडमधील एक दंतकथा मोठी रंजक आहे.
इंग्लंडचा राजा चार्ल्स (दुसरा) एका समस्येने त्रस्त झाला होता. अनेक स्त्रियांनी असा दावा केला होता की त्यांना झालेली मुले या राजापासून झालेली आहेत. त्यामुळे राजाची औरस आणि अनौरस मुले कुठली यासंदर्भात बराच गोंधळ निर्माण झाला होता. हे सगळे पाहिल्यानंतर राजाचे डॉक्टर असलेले “कर्नल कंडोम” (Quondam) यांनी त्याला लैंगिक क्रियेदरम्यान नियमित निरोध वापरण्याचा सल्ला दिला. त्यांनी सुचविलेला निरोध हा कोकराच्या आतड्यांपासून तयार केलेला होता. कर्नल कंडोम यांनी ही गोष्ट सुचवल्यामुळे त्या साधनाला condom हे अपभ्रंशित नाव पडले अशी एक व्युत्पत्ती आहे. ही व्युत्पत्ती जरी सर्वाधिक लोकप्रिय असली तरी डॉ. कंडोम यांच्या अस्तित्वाचे ऐतिहासिक पुरावे काही मिळालेले नाहीत.
म्हणून या व्यतिरिक्तही अन्य काही व्युत्पत्ती असल्याचे मानले जाते:
१. Condus या लॅटिन शब्दाचा अर्थ साठवण्याचे भांडे किंवा पात्र..
२. kemdu या पर्शियाई शब्दाचा अर्थ आतड्यांपासून तयार केलेले साठवण्याचे साधन.
३. Guantone या इटालीय शब्दाचा अर्थ ‘मोजा’.
सन 1785 मध्ये कंडोम हा शब्द इंग्लिश शब्दकोशामध्ये समाविष्ट करण्यात आला. विविध प्रांतातील इंग्लिश बोलीभाषेनुसार त्याला wetsuit, the rubber, jimmy आणि nightcap अशी अनेक मजेदार नावे आहेत.
अखेर आधुनिक शब्दकोशांनी condom या शब्दाची व्युत्पत्ती 'अज्ञात' आहे अशी नोंद करून या प्रकरणावर तूर्त पडदा टाकलेला आहे !
मराठीत देखील निरोधसाठी फुगा आणि टोपी ही सोपी नावे प्रचलित आहेत.
अठरावे शतक संपण्याच्या सुमारास निरोधची घाऊक प्रमाणात विक्री सुरू झाली. परंतु तेव्हा जास्ती करून समाजातील सधन वर्गच त्यांचा वापर करीत होता. समाजातील सर्व स्तरांमध्ये लैंगिक शिक्षणाचा तेवढा प्रसारही झालेला नव्हता.
हळूहळू निरोधचा प्रसार समाजाच्या सर्व स्तरांमध्ये होऊ लागला त्यातून त्याचा वापर वाढला. परंतु समाजातील काही वर्गाकडून निरोधच्या वापराला विरोध देखील होऊ लागला या विरोधाची सर्वसाधारण कारणे अशी होती:
१. मुळातच गर्भनिरोधन करणे ही निसर्गविरोधी कृती आहे.
२. निरोधच्या वापरामुळे संभोगादरम्यानचे स्पर्शसुख बरेच कमी होते .
३. समाजात जर निरोधचा वापर खूप प्रमाणात होऊ लागला तर एकंदरीतच पुरुषांचा बाहेरख्यालीपणा वाढेल.
४. काही ‘संस्कृतीरक्षकांनी’ गुप्तरोग प्रतिबंधासाठी निरोधचा वापर या संकल्पनेला कडाडून विरोध केला. त्यांच्या मते बाहेरख्यालीपणा/ वेश्यागमन यासाठी गुप्तरोग ही निसर्गानेच दिलेली एक मोठी शिक्षा होती !
अशा तऱ्हेने निरोधचे समर्थन आणि विरोध हे दोन्ही हातात घालून वाटचाल करीत होते. दरम्यान निरोध कारखान्यांत तयार करताना त्यासाठी लिननचा वापर बऱ्यापैकी होऊ लागला आणि त्या लिननला विविध रसायनांनी अजून मऊ केले गेले. निरोध बनवून तयार झाल्यानंतर त्याची तंदुरुस्ती तो प्रत्यक्ष फुगवून बघून देखील केली जात असे.
जसजसे समाजातील लैंगिक शिक्षण वाढू लागले तशी निरोधची विक्री अनेक ठिकाणी होऊ लागली. त्यामध्ये औषधांच्या दुकानांव्यतिरिक्त केशकर्तनालये, मद्याचे गुत्ते आणि अन्य काही खुल्या बाजारांचाही समावेश होता. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत निरोध समाजातील गरीब वर्गापर्यंत देखील पोचलेला होता. साधारण सन 1920 च्या दरम्यान इंग्लंडमधील बिशप मंडळींनी, सार्वजनिक ठिकाणी लोकांनी वापरुन फेकून दिलेल्या निरोधांबद्दल जाहीर नापसंती व्यक्त केली होती.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निरोधचा वापर या विषयाला एक नवा आयाम मिळाला. तेव्हा पाश्चात्य जगतात स्त्रीमुक्ती चळवळींचा उदय झालेला होता. त्यातील स्त्रियांनी,
“गर्भनिरोधनाचे साधन पुरुषांच्या हातात एकवटता कामा नये”
असा विचार समाजात सोडून दिला. त्यातून पुरुष-निरोधा ऐवजी स्त्री निरोध वापरण्याची संकल्पना विकसित झाली. संभोगादरम्यान स्त्रीने विशिष्ट प्रकारचा पडदा (diaphragm) वापरावा आणि संभोगसमाप्ती नंतर योनी शुक्रजंतूविरोधी द्रावणांनी धुवून काढावी असे सल्ले दिले गेले.
1960 च्या दशकात गर्भनिरोधनासाठी स्त्रियांनी खायच्या हॉर्मोनल गोळ्यांचा शोध हा एक क्रांतिकारक टप्पा होता. या शोधानंतर निरोधच्या वापरात काही प्रमाणात घट झाली. बघता बघता पुढील काही वर्षांत स्त्रियांच्या या गोळ्या जगभरात गर्भनिरोधनाचे प्रमुख आणि लोकप्रिय साधन बनल्या. पण पुढे कालांतराने पुन्हा एकदा निरोधच्या वापरांमध्ये लक्षणीय वाढ झाली.
जसजसा समाजात निरोधचा खप वाढत गेला तसे उत्पादकांनी त्याच्या दर्जात विविध सुधारणा केल्या.. अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा निरोध बनवले गेले तेव्हा ते सायकलच्या रबर ट्यूब इतक्या जाडीचे असायचे. हे निरोध उत्पादनानंतर जेमतेम तीन महिने टिकत असत. संशोधनातील पुढील प्रगतीनुसार रबरा ऐवजी latex चा वापर प्रचलित झाला. यांची टिकण्याची क्षमता तब्बल पाच वर्षांपर्यंत असायची. साधारणपणे सन 1990 च्या दरम्यान प्लॅस्टिकचा एक प्रकार असलेला Polyurethane हाही एक पर्याय उपलब्ध झाला. आधुनिक निरोध हे जास्तीत जास्त पातळ आणि तरीही मजबूत असतात. तसेच तयार झालेल्या निरोधमध्ये अतिसूक्ष्म छिद्रे नाहीत ना, हे इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमार्फत तपासले जाते. विविध उत्पादकांमध्ये निरोधच्या पातळपणाबाबत स्पर्धा चालू असते.
“आमचा निरोध इतका तलम व मुलायम आहे, की तुम्हाला दोघांना मध्ये ‘तिसरा’ असल्याचे जाणवणार देखील नाही”
या प्रकाराच्या त्याच्या जाहिरातींनी ग्राहकांना आकर्षून घेतले जाते.
पारंपरिक निरोध पूर्ण ताणल्यानंतर बाहेरून गुळगुळीत असतात. त्यामध्येही काही वैशिष्ट्यपूर्ण सुधारणा पुढे केल्या गेल्या. अशा सुधारित निरोधांचा पृष्ठभाग खवल्यांचा (ribbed) बनवलेला असतो. या प्रकारच्या निरोध वापरामुळे संभोगादरम्यान पुरुष व स्त्री अशा दोघांनाही अधिक सुख मिळते असा दावा केला जातो. परंतु या बाबतीत जोडप्यांमध्ये बरीच अनुभवभिन्नता आढळते. निरोधच्या अंतर्गत भागात शुक्रजंतूमारक रसायन घालायचे किंवा नाही हा अत्यंत वादग्रस्त विषय आहे. काही उत्पादकांनी अजूनही त्याचा वापर चालू ठेवलाय परंतु बऱ्याच उत्पादकांनी आता त्याचा वापर थांबवलेला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध येत्या भविष्यकाळात बाजारात येतील. त्यामध्ये प्रामुख्याने खालील तंत्रांचा समावेश आहे:
१. Graphene निरोध: यामध्ये कार्बन स्फटिकांचा वापर केलेला असल्याने ते अत्यंत तलम आणि तितकेच मजबूत असतात.
२. nano-वंगणयुक्त : यामध्ये पाण्याच्या रेणूंचा अतिसूक्ष्म थर वापरलेला असतो.
३. ‘अदृश्य’ निरोध: यामध्ये पुरुषाने प्रत्यक्ष परिधान करण्याचे साधन एक gel असते. संभोगादरम्यान त्याचा योनीशी संपर्क आल्यानंतर तिथल्या तापमानामुळे ते कडक होते.
४. ORIGAMI निरोध : हे सिलिकॉनचे असून त्यांच्या वापरतून 'नैसर्गिक स्पर्शसुख' जास्तीत जास्त मिळते असा उत्पादकांचा दावा आहे. तसेच ते गुदसंभोगासाठी विशेष उपयुक्त असल्याचे म्हटले जाते.
निरोधचे उत्पादन केल्यानंतर त्याचे आकर्षक वेष्टण बनवण्यात देखील बरीच कलात्मकता दिसून येते.
आज बाजारात पुरुष-निरोधांचाच वाटा मोठा आहे. त्यानुसार त्याच्या विक्री पाकिटांवरील चित्रांत स्त्रीदेहाचा मुक्त वापर केलेला आढळतो. आजच्या घडीला संपूर्ण जगात मिळून होत असलेली निरोधची व्यापारी उलाढाल कित्येक दशअब्ज रुपयांमध्ये आहे.
निरोध हे तात्पुरत्या गर्भनिरोधनाचे आणि ‘सुरक्षित’ संभोगाचे एक महत्त्वाचे साधन असल्यामुळे त्याचा सरकारी आणि खाजगी पातळीवरून भरपूर प्रचार केला जातो. त्याच्या विविध माध्यमांतील जाहिराती हा विषय देखील गेल्या शंभर वर्षांपासून वादग्रस्त ठरलाय. अनेक देशांत गेल्या शतकात त्याच्या जाहिरातींवर बंदी असायची; कालांतराने ती उठवली गेली. अजूनही निरोधच्या जाहिराती टीव्हीसारख्या माध्यमातून कोणत्या वेळेस दाखवायच्या यावर चर्चा झडताना दिसतात.
आजपासून सुमारे पाच ते सहा हजार वर्षांपूर्वी, संभोगादरम्यान निरोधचा वापर ही संकल्पना उगम पावली. त्याचा शास्त्रशुद्ध विकास गेल्या काही शतकांत झाला. या लेखात आपण निरोधची जन्म आणि कर्मकथा पाहीली. आरोग्याच्या दृष्टीकोनातून निरोधची उपयुक्तता, मर्यादा (यशापयश) आणि त्याच्या काही वापरसमस्या यासंबंधीचे विवेचन सवडीने नंतर कधीतरी स्वतंत्र लेखात करेन.
*****************************************************************************
चित्रसौजन्य: ‘विकी’.
प्रतिक्रिया
28 May 2023 - 5:40 pm | टर्मीनेटर
रंजक माहिती ठासून भरलेला जबरदस्त लेख 👍
आत्ता रुमाल टाकून ठेवतोय, पुढील प्रतिसादांतून अधिक चर्चा करायला मजा येईल 😀
1 Jun 2023 - 10:41 pm | चौथा कोनाडा
+१
हेच म्हणतो.
28 May 2023 - 6:12 pm | कर्नलतपस्वी
सॅल्युट.
गरज ही शोधाची जननी त्यामुळेच शोधाचा इतीहास रंजक असतो .तो जेव्हा सिद्ध हस्त लेखणीतून उतरतो त्याच्याबद्दल काय बोलावे.
धन्यवाद.
28 May 2023 - 6:31 pm | टर्मीनेटर
हे वाचून 'विषकन्या' (बुढ्ढा मर गया मधली राखी सावंत) आठवली एकदम 😀
चला... राणीला “साप आणि विंचू”ची विषबाधा झाली नाही हेही नसे थोडके! म्हणजे हा 'पडदा' वापरण्याचा मुळ उद्देश सफल झाला म्हणायचा 😂
पण ह्यावरून एक जुना चावट विनोद आठवला...
एक कुटुंब नियोजन विभागाचा अधिकारी कुठल्याशा खेडेगावात सरपंचाकरवी ग्रामसभा बोलावून गावकऱ्यांना संतती नियमनासाठी निरोधच्या वापराचे महत्व पटवून देत असतो.
बराचवेळ त्याची बडबड ऐकून वैतागलेला सरपंच शेवटी त्याला विचारतो "काय हो साहेब, तुम्ही स्वतः वापरता का निरोध?"
त्यावर तो अधिकारी आत्मविश्वासाने छाती फुगवून सांगतो "होय तर, चांगला गेल्या दहा-बारा वर्षांपासून वापरतोय, त्यामुळेच तर आम्हाला फक्त आठ मुले झाली!"
28 May 2023 - 6:55 pm | कॉमी
उत्तम लेख.
28 May 2023 - 6:59 pm | कुमार१
उद्घाटनाबद्दल धन्यवाद !
..
🙂
असाच एक विनोद पूर्वी इथे लिहीलाय.
(“डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!”)
28 May 2023 - 11:57 pm | चित्रगुप्त
रोचक, माहितीपूर्ण लेख. वाचून एक प्रश्न उद्भवला.वात्स्यायनाच्या कामसूत्रात किंवा अन्य काही ग्रंथ, उदा. दामोदरगुप्ताचा 'कुट्टनीमत, बाराव्या शतकापूर्वी लिहिलेला रतिरहस्य ऊर्फ कोकशास्त्र हा ग्रंथ, कल्याणमल्लाचा सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धातील अनंगरंग (रतिशास्त्र) हा ग्रंथ, अहिताग्नी राजवाडे यांचा ग्रंथ (आता नाव आठवत नाहीये) व्यासजनार्दनकृत कामप्रबोध, महाराज देवराजकृत रतिरत्नप्रदीपिका, दंडीविरचित नर्मकेलिकौतुकसंवाद इत्यादि प्राचीन भारतीय साहित्यात (तसेच उदाहरणार्थ खजुराहोच्या रतिशिल्पात) असे काही साधन वर्णिलेले आहे का, यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. (सन्माननीय मिपाकर प्रचेतस यांना खास विनंती)
मराठी विश्वकोषातील एक-दोन उतारे:
--- कामशास्त्राच्या उत्पत्तीविषयी वात्स्यायनाने ग्रंथारंभी एक आख्यायिका सांगितली आहे. ब्रह्मदेवाने त्रिवर्गविषयक विशालकाय शास्त्र निर्माण केले. या शास्त्रातून महादेवाचा सेवक नंदी याने १००० अध्यायांचे ‘कामसूत्र’ निराळे काढले. त्याचा संक्षेप उद्दालकपुत्र श्वेतकेतूने ५०० अध्यायांत केला. या संक्षेपाचाही संक्षेप पांचालदेशवासी बाभ्रव्याने सात अधिकरणांत व १५० अध्यायांत केला. यांतील वैशिक नावाचे अधिकरण पाटलिपुत्र नगरात राहणाऱ्या गणिकांच्या आज्ञेला अनुसरून दत्तकाचार्याने निराळष करून स्वतंत्रपणे रचले. तसेच चारायण, सुवर्णनाभ, घोटकमुख, गोनर्दीय, गोणिकापुत्र आणि कुचुमार या सहा आचार्यांनी क्रमश: साधारण, सांप्रयोगिक, कन्यासंप्रयुक्तक, भार्याधिकारिक, पारदारिक व औपनिषदिक ही सहा अधिकरणे स्वमतप्रदर्शनार्थ स्वतंत्रपणेच रचली. कामशास्त्राचे असे वेगवेगळे विभाग झाल्याने हे शास्त्र अध्ययन-अध्यापनास गैरसौयीचे ठरून लुप्तप्राय झाले. नंदीचे ‘कामसूत्र’ फारच विशाल व म्हणून अजिबातच लुप्त झाले. बाभ्रव्याचा ग्रंथ विशाल आणि अध्ययनास कठीण होता, तसेच दत्तकादी आचार्यांनी कामशास्त्राच्या केवळ उपांगांवरच आपापले ग्रंथ लिहिलेले होते, म्हणून वात्स्यायनाने या शास्त्रातील सर्व विषयांचा अभ्यास करून व ते संक्षेपाने संकलित करून कामसूत्र या नावाने लोकांपुढे ठेविले.
--- श्वेतकेतून समाजस्थैर्याच्या उद्देशाने सर्वप्रथम स्त्रीपुरुषसंबंधावर निर्बंध घातला, ही गोष्ट महाभारताच्या आदिपर्वात आली आहे (१२२.१०).
(मिपाचे सन्माननीय सदस्य प्रचेतस यांना खास विनंती)
29 May 2023 - 5:35 am | कुमार१
चांगला मुद्दा. मलाही जाणून घ्यायला आवडेल.
..
अगदी अलिकडे, म्हणजे र.धों. कर्वे यांच्या काळात (१९२७ ते १९५३) त्यांनी महिलांना योनीत तैलचिंधी वापरण्याचा सल्ला दिला होता.
29 May 2023 - 7:43 pm | प्रचेतस
धन्यवाद चित्रगुप्तकाका,
महाभारत आणि रामायण वगळता इतर ग्रंथ फारसे अभ्यासलेले नाहीत, आपण वर उल्लेखलेले कोणतेच ग्रंथ वाचलेले नाहीत मात्र अहिताग्नी राजवाडेंच्या ' नासदीयसूक्त भाष्य' ह्या महान ग्रंथाची दुर्मिळ प्रत मिपाकर बॅटमॅन ह्याच्या घरी प्रत्यक्ष पाहिली आहे मात्र वाचली नाही.
आदिपर्वातील श्वेतकेतूने स्त्रियांना घालून दिलेल्या मर्यादेची कथा तर माहिती आहेच, शिवाय शांतिपर्वातील भीष्माच्या तोंडी आलेला विवाहसंस्थेविषयक श्लोक याबाबतीत रोचक आहे.
न चैषां मैथुनो धर्मो बभूव भरतर्षभ |
सङ्कल्पादेव चैतेषामपत्यमुदपद्यत ||
तत्र त्रेतायुगे काले सङ्कल्पाज्जायते प्रजा |
न ह्यभून्मैथुनो धर्मस्तेषामपि जनाधिप ||
द्वापरे मैथुनो धर्मः प्रजानामभवन्नृप |
तथा कलियुगे राजन्द्वंद्वमापेदिरे जनाः ||
कृतयुगात स्त्री पुरुषांच्या मनात येईल तेव्हा मैथुनक्रिया होत असे, त्रेतायुगात स्त्री पुरुषांनी एकमेकांस विषयभावनेने स्पर्श केला असता समाजजन त्यांस मैथुनाची अनुमती देत असत, द्वापरयुगात मैथुन झाला असता स्त्रीपुरुष एकत्र राहात असत आणि कलियुगात द्वंद्वावस्था म्हणजेच विवाहसंस्था निर्माण झाली
मात्र येथे कोठेही संततीविषयक नियमनाचे उल्लेख माझ्या नजरेस तरी आलेले नाहीत, तशी येथे जागरूकताच नव्हती म्हणा ना.
अर्थात आर्ष महाकाव्यात उर्ध्वरेत्यांचे वर्णन काही ठिकाणी येते मात्र ते संभोगाच्या दृष्टीने नव्हे. आकाशाच्या शिश्न उठावलेल्या लकुलिशाचे शिल्प याबाबतीत रोचक आहेच. शिवाय संततीनियमांची साधने नव्हती किंवा त्यांची माहिती नव्हती म्हणूनही गंगेने नदीत बुडवलेल्या शांतनु व तिच्या सात पुत्रांची कहाणी तसेच कुंतीने नदीत सोडलेल्या कर्णाची कहाणी त्यादृष्टीने महत्वाची ठरते.
29 May 2023 - 8:12 pm | कुमार१
चांगला आणि रंजक मुद्दा !
29 May 2023 - 8:12 pm | कुमार१
चांगला आणि रंजक मुद्दा !
29 May 2023 - 8:42 pm | कर्नलतपस्वी
तीन वेळा बघीतली. सरकारी वाटाड्याने किंवा शिल्पांमधे ह्या विषयावर प्रकाश टाकणारी कुठलीच मुर्ती बघण्यात/ऐकण्यात आली नाही. उलट मैथुनाचे विविध प्रकार दिसले.
धृतराष्ट्रपुत्र कौरव,गांधार नरेशाची मुलांची संख्या एवढी नसती जर संतती नियमनाची साधने उपलब्ध असती. कदाचीत लोकसंख्या कमी व संसाधने भरपुर यामुळे सुद्धा संतती नियमनाची गरज भासली नसावी.
आमच्या मागच्या पिढीचा इतीहास बघीतला तर बारा,पंधरा बाळंतपणे सर्रास होत. तसेच मृत्यूदर पण भरपुर हे ही कारण असावे.
प्रजापतीला म्हणे बासष्ट मुली होत्या.
29 May 2023 - 9:06 pm | कुमार१
1960 आणि त्यापूर्वीच्या दशकांमध्ये आपल्या पूर्वजांची भली मोठी कुटुंबे
हे सर्वसाधारण चित्र होतेच.
माझ्या आजीच्या पिढीच्या एक बाई एकदा बोलताना म्हणाल्या होत्या,
.
म्हणूनच,
त्याकाळी ज्या समाज धुरीणांनी कुटुंब नियोजनाचा प्रचार व प्रसार केला, त्यांचे कार्य खरोखरच महत्त्वाचे आहे.
30 May 2023 - 2:44 am | चित्रगुप्त
पौराणिक काळात मुळात 'कुटुंबनियोजन' आवश्यक वाटत होते का ? बहुधा नसावे. याउलट येक केन प्रकारेण गर्भधारणा व्हावी, जास्तीत जास्त संतती व्हावी, यासाठीच नियोग इत्यादि मार्ग अवलंबिले जात. त्यामुळे शंभर कौरव, किंवा कर्णाचा जन्म या गोष्टी 'त्या काळी अशी साधने उपलब्ध नव्हती' याचा पुरावा म्हणून ग्राह्य मानता येणार नाहीत असे वाटते. मुळात सगळे 'कौरव' फक्त गांधारीचेच मुलगे होते की अनेक स्त्रियांचे मिळून 'शंभर कौरव' होते ? तसेच कर्णजन्माच्या वेळी कुंतीचे वय किती होते, आणि 'सूर्यापासून जन्म' हे काय गौडबंगाल आहे ? हल्लीच्या भाषेत तो एक बलात्कार होता असे म्हणावे, तर बलात्कारकर्त्याला त्यातून होऊ शकणार्या (संभावित) गर्भाशी काय घेणेदेणे ?
मुळात 'गर्भधारणा होऊ नये' ही गरज मनुष्याला केंव्हापासून वाटू लागली, याबद्दल काय माहिती उपलब्ध आहे ?
(अवांतरः वरील आकृती ही अमेरिकनांच्या 'प्रत्येक बाबतीत जगात आम्हीच श्रेष्ठ' अशी बढाई मारण्याच्या सवयीचे द्योतक म्हणावे काय ? इ.स. १८०० मधे जगातल्या प्रत्येक देशात जन्मदर काय आहे, हे माहीत करून घेण्याची सोय तरी होती का ? --- Story of US का कुठल्याश्या माहितीपटात दर पाच मिनिटांनंतर कुठल्यातरी घटनेचा उल्लेख "जागतिक इतिहासाला कायमचे नवे वळण लावणारी घटना' असा केलेला बघितले आहे)
१९१० मधे जन्मलेल्या माझ्या आईला झालेल्या अपत्यांपैकी मी सर्वात लहान असून आम्ही सात भावंडे होतो, त्याखेरीज काहींचा अगदी लहानपणीच मृत्यू झाला होता. (त्या काळी काही अपवाद वगळता घरोघरी हीच परिस्थिती असायची) आमच्या वडिलांचे औषधाचे दुकान होते. लहानपणी मला एकदा दुकानात 'थ्री नाईट्स' लिहीलेल्या रिकाम्या डब्या मिळाल्या, त्यात काय असायचे ते मला समजले नाही, पण पेन्सिल तासायला लागणार्या ब्लेडा ठेवायला मी त्या वापरू लागलो.
सदर रिकामी डबी सध्या ईबे वर ११७ डॉलरला मिळते आहे.या डबीवर 'PROTECTION AGAIST DISEASE' असे लिहीलेले आहे हेही लक्षात घेण्याजोगे आहे. (आपण लहानपणापासून साठवलेल्या वस्तू फेकून दिल्या, तसे करायला नको होते.... ही पश्चातबुद्धी)
एवढ्या वर्षांनंतर आज या लेखाच्या निमित्ताने ही आठवण जागी झाली याचे फार अप्रूप वाटत आहे.
जालावर सापडलेला एक लेखः
15,000 Years Of Condoms: A Feel-Good History Lesson
https://www.mtv.com/news/8uperu/history-of-condoms#:~:text=In%20the%2015....
30 May 2023 - 5:43 am | कुमार१
अगदी उत्सुकता वाढवणारा विषय आहे !!
दुसरा दुवाही सावकाश वाचतो.
प्रतिसाद आवडला.
30 May 2023 - 5:43 am | चौकस२१२
पौराणिक काळात मुळात 'कुटुंबनियोजन' आवश्यक वाटत होते का ?
कुटुंबनियोजन नाही पण गर्भवती राहण्यासाठी इतर पुरुषाचे वीर्य घेणं आणि ते करताना एक विशिष्ट नियम पाळणे याला काही पद्धती होती असे एका कादंबरीत वाचले आहे ( पांडवानवर लिहिलेली भैरप्पा नामक कन्नड भाषिक लेखक यांची कादंबरी .. नाव आता आठवत नाही )
त्यात असे होते कि ज्याचे कडून वीर्य घ्यायचे त्याच्याशी अतिशय व्यापारिक दृषीने सहर्ष संबंध घडव्याचाच पण त्यात कोणतीही भावना गुंतली नाही पाहिजे अशी गुंतली तर तो व्यभिचार ठरेल, मग असा सभोग करताना त्या व्यक्तीने/ पुरुषाने अंगभर जुने तूप फसल्याचे ( वास येणारे ) कि ज्यामुळे स्त्रीला त्या पर पुरुषाबद्दल कोणतीही शारीरिक आकर्षण वाटणार नये .. आता हे कादंबिरीतील आहे खरे खोटे कोण जाणे
30 May 2023 - 7:59 am | कानडाऊ योगेशु
त्या कादंबरीचे नाव पर्व असे आहे.
30 May 2023 - 12:20 pm | चौकस२१२
पर्व बरोबर .. कादंबरीची संकल्पना फारच मस्त होती
https://www.amazon.in/parv-Marathi-Dr-S-BHYRAPPA-ebook/dp/B0716HP7Y8
30 May 2023 - 12:35 pm | कुमार१
होय, बरोबर.
मी वाचलेले नाही. परंतु काही दर्दी पुस्तक वाचकांकडून त्यासंबंधी ऐकले आहे
30 May 2023 - 2:24 pm | अनामिक सदस्य
@ चित्रगुप्त
बलात्कार?
कुन्तीने मन्त्राच्या साहायान्ने सूर्यावर केलेला का?
30 May 2023 - 3:57 pm | चित्रगुप्त
@ अनामिक सदस्य: 'कुंतीने मंत्राद्वारे सूर्याला आवाहन करण्यामुळे सूर्यदेव प्रकट होऊन त्याने कुंतीच्या ठायी गर्भस्थापना केली' म्हणजे नेमके काय आणि कसे घडले, हे आजच्या माणसाला कळेल, पटेल अशा पद्धतीने सांगितल्यास बरे होईल.
मुळात 'पृथा' ही राजा शूरसेन याची मुलगी. त्याने तिला कुंतीभोज राजाला 'देऊन टाकले' त्यामुळे तिचे 'कुंती' हे नाव पडले. कुंतीभोजाने तिला वर्षभर 'सेवेसाठी' म्हणून अतिशय तापट असलेल्या दुर्वास ऋषीला 'दिले'. तिने उत्तम सेवा केल्याचे बक्षिस म्हणून दुर्वासाने तिला 'मंत्र' दिला. महाभारतात हा मंत्र आणि त्याचे अनुष्ठान याला 'अभिचार' (अभिचाराभिसंयुक्तम) असे म्हटले आहे. वेदातील 'अभिचार मंत्रा'ची योजना ही कुणाचा नाश, पराजय करण्यासाठी, किंवा कुणाला अंकित, वश करण्यासाठी केला जात असे. बालसुलभ कुतुहलापायी कुंतीने सूर्यावर या मंत्राचा प्रयोग करून बघितला त्यातून कर्णाचा जन्म झाला म्हणे. 'सूर्यदेव' म्हणुन जे कुणी होते, त्याला गर्भस्थापना करणे बंधनकारक होते का ? असल्यास त्याचे कारण काय ?
सगळेच अकलनीय. हल्लीच्या एकाद्या मुलीने गर्भ राहिल्यावर असे काही स्पष्टीकरण दिले तर कुणाला पटेल का ? असो. तुम्हाला काही समजले असेल तर जरूर सांगावे.
'पर्व' (भैरप्पा) 'व्यासपर्व'(दुर्गा भागवत) 'युगान्त' (इरावती कर्वे) 'महासमर (नरेन्द्र कोहली) वा अन्य पुस्तकातून याचे काही स्पष्टीकरण दिलेले असेल तर कळवावे ( पूर्वी मी वाचलेली असूनही आता विसारलो आहे)
30 May 2023 - 4:07 pm | कुमार१
>>>
नियोग = प्राचीनकाळीं वंश खुंटू नये म्हणून स्त्रीच्या ठिकाणीं परपुरुषाकडून करविलेली प्रजोत्पत्ति.
या विषयावर आधारित
अमोल पालेकर दिग्दर्शित अनाहत हा मराठी चित्रपट जरूर पाहा.
मल्ल देशाच्या राजाला त्याच्यातील दोषामुळे मूल होत नसल्यामुळे त्या राणीला धर्मशास्त्रानुसार नियोग या विधीची परवानगी दिलेली असते.
30 May 2023 - 3:54 am | चित्रगुप्त
@प्रचेतस -
फार वर्षांपूर्वी या अद्वितीय ग्रंथाचा दुसरा भाग वाचला होता. अर्थात फार क्लिष्ट, तांत्रिक विषय असल्याने पूर्ण वाचणे जमले नव्हते. अहिताग्नी राजवाडे (शंकर रामचंद्र राजवाडे - २३ ऑक्टोबर १८७९‒२७ नोव्हेंबर १९५२) यांचे नाव देखिल हल्ली फार कमी वाचकांना ठाऊक असेल. त्यांचेविषयी डॉ. सदानंद मोरे यांचा लेख इथे वाचता येईल.
30 May 2023 - 6:22 am | कर्नलतपस्वी
हायला भारीच की. माझे लग्न अहिताग्नी राजवाडे मंगल कार्यालयात झाले होते.
कुठल्या का कारणाने होईना पण या मोठ्या माणसाच्या नावाशी आपण जोडले गेलो आहोत ही कल्पनाच....
लई भारी वाटलं.
29 May 2023 - 11:01 am | रंगीला रतन
कुमार सर जाम भारी लेख!
रच्याक- तैलचिंधी म्हंजे काय?
30 May 2023 - 2:34 pm | कुमार१
र. धों. कर्वे यांच्या सर्व लेखनाचे तपशील या संकेतस्थळावर आहेत:
तिथे तैलचिंधीबद्दल मूळ लेख वाचता येईल.
परंतु गेले ३-४ दिवस ते संकेतस्थळ खूप ‘मंद’ झालेले दिसते. मला काही त्यातील संततीनियमन हा विषय उघडण्यात यश आलेले नाही.
बघा कोणी प्रयत्न करून…
5G असल्यास फरक पडतो का ?
30 May 2023 - 5:04 pm | धर्मराजमुटके
तुमचा लेख वाचून तिकडे बरेच लोक तेलचिंधी शोधायला गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित संस्थळ धीमे झाले असेल.
29 May 2023 - 11:16 am | कुमार१
चांगला प्रश्न.
काही प्रकारच्या तेलांना शुक्रजंतूमारक गुणधर्म आहे. त्या उद्देशाने कर्वे यांनी त्या काळात संभोगसमयी योनीत तेलचिंधी ठेवण्याचा सोपा घरगुती उपाय सांगितला होता.
त्यांनी सांगितलेल्या या उपायात कदाचित घरात जे उपलब्ध असते ते गोडतेल / खोबरेल तेल सुद्धा असण्याची शक्यता आहे.
अर्थात त्याचे यशापयश (टक्केवारी इत्यादी) याचा अभ्यास झाला होता का, याची कल्पना नाही.
29 May 2023 - 9:27 pm | अनिंद्य
फार छान आढावा घेतला आहे डॉक्टर तुम्ही. जुना नवा, कल - आज और कल चा.
ते फुगे फुगवणारे चित्र तर फारच धमाल आहे :-)
चित्रगुप्त सरांच्या प्रतिसादामुळे वात्सायनापलीकडच्या प्राचीन साहित्याचा अंदाज आला आणि प्रचेतस यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाचा पुनःप्रत्यय !
30 May 2023 - 5:46 am | कुमार१
हा शब्दप्रयोग फार आवडला !
भविष्यात येऊ घातलेले अत्याधुनिक प्रकार उत्सुकता वाढवणारे आहेत खरे.
30 May 2023 - 6:02 am | चौकस२१२
विनोदी जाहिरातीन पैकी एक जाहिरात निरोधची बघितलेली आठवते, त्यात असे होते कि मिट्ट काळोखात स्त्री पुरुष संबंध चालू असावेत असे आवाज येत असतात तेवढ्यात दाराशी आवाज होते . " सरप्राईझ हनी आय आम होम".. अर्थातच नवरा "अ वेळी" घरी आलेलला असतो .. आपल्याला दिसत काय कि एक फ्लुरोसन्ट रंगाचा फुगा हवेत तरंगत ( जादूगारांचे फ्लुरोसंट उडणारा हाडाचा सापळा वैगरे खेळ खेळ आठवा !) उड्या मारत येतो .. आणि अचानक सगळी कडे धडपड झाल्याचे आवाज येतात आणि हवेत उरलेलया ६ रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे फुगे धडपडत हेंदकाळात "पळून " जात आहेत "
30 May 2023 - 6:16 am | कुमार१
हे फुगे भारीच. आवडले. 🙂
..
अशीच एक Durex ची ही कल्पक जाहिरात ( "मीम" ):
31 May 2023 - 8:07 am | Bhakti
अतिशय क्लिष्ट विषय रोचक पद्धतीने लिहिण्यात कुमारजींची विशेषता आहे.
रचक्याने विविध फ्लेवरच्या कंडोमच्या उत्पत्तीचा इतिहासही थोडा समाविष्ट व्हावा.
31 May 2023 - 8:52 am | कुमार१
चांगला मुद्दा. धन्यवाद.
मुळात या प्रकारचे निरोध मुखमैथुनासाठी तयार केले गेले. आज वापरल्या जाणाऱ्या निरोधांमध्ये latex चा वाटा सर्वाधिक आहे. त्याची अंगभूत चव किंवा वास विचित्र असतात. ते झाकण्यासाठी म्हणून त्यावर गोड पदार्थ आणि अन्य काही रसायने वापरून हे नवे निरोध तयार केले गेले.
एक गोष्ट महत्त्वाची आहे.
या प्रकारचे निरोध चुकूनही योनीसंभोगासाठी वापरू नयेत. त्यातील रसायनांमुळे दाह किंवा जंतूसंसर्ग होण्याचा धोका संभवतो.
मुळात हा विषय जाहिरात माध्यमांमध्येच जास्त चर्चिला गेलेला आहे. या संबंधातील शास्त्रीय विवेचन किंवा अधिकृत संदर्भ सहज उपलब्ध नाहीत.
31 May 2023 - 12:32 pm | टर्मीनेटर
Flavoured असो कि Ribbed असो कि Dotted...
आमचे मत तेच (जे मागे राजेंद्र मेहेंदळे साहेबांच्या 'चावट' लेखावर दिलेल्या प्रतिसादात लिहिले होते 😂)
"जिभेवर प्लॅस्टिकची पिशवी लावून वाटीतले श्रीखंड चाटले, तर त्या श्रीखंडाचा काय कप्पाळ आस्वाद घेता येणार"
😂 😂 😂
2 Jun 2023 - 11:06 am | Bhakti
मुळात हा विषय जाहिरात माध्यमांमध्येच जास्त चर्चिला गेलेला आहे. या संबंधातील शास्त्रीय विवेचन किंवा अधिकृत संदर्भ सहज उपलब्ध नाहीत.
Latex -handgloves,काही शास्त्रीय किट्स मध्येही वापरला जातो.वैद्यकीय क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवणारा latex.
7 Jun 2023 - 2:23 pm | कुमार१
वरील स्वादिष्ट निरोधची चर्चा आठवायचे कारण म्हणजे नुकताच प्राईम व्हिडिओवर आलेला “कहानी रबर बँड की’ हा हिंदी चित्रपट.
आता पाहायला सुरुवात केली आहे. त्याने अर्ध्या तासात तरी काही पकड घेतलेली नाही. परंतु एक दृश्य मात्र मजेदार वाटले.
लहान गावातील किराणा विक्रीचे दुकान. त्यात निरोध देखील विक्रीला ठेवलेले. दारात मुली उभ्या असताना एक तरुण निरोध विकत घ्यायला आलेला आहे. पण तो दुकानदाराला ते विचारायला खूप लाजतो आहे. अखेर तो ओशाळून म्हणतो,
“ बरं .. नाही, एक चॉकलेट द्या”. त्यावर दुकानदार म्हणतो,
“चॉकलेट की चॉकलेट फ्लेवर?”
हा प्रसंग मजेशीर आहे.
7 Jun 2023 - 2:23 pm | कुमार१
वरील स्वादिष्ट निरोधची चर्चा आठवायचे कारण म्हणजे नुकताच प्राईम व्हिडिओवर आलेला “कहानी रबर बँड की’ हा हिंदी चित्रपट.
आता पाहायला सुरुवात केली आहे. त्याने अर्ध्या तासात तरी काही पकड घेतलेली नाही. परंतु एक दृश्य मात्र मजेदार वाटले.
लहान गावातील किराणा विक्रीचे दुकान. त्यात निरोध देखील विक्रीला ठेवलेले. दारात मुली उभ्या असताना एक तरुण निरोध विकत घ्यायला आलेला आहे. पण तो दुकानदाराला ते विचारायला खूप लाजतो आहे. अखेर तो ओशाळून म्हणतो,
“ बरं .. नाही, एक चॉकलेट द्या”. त्यावर दुकानदार म्हणतो,
“चॉकलेट की चॉकलेट फ्लेवर?”
हा प्रसंग मजेशीर आहे.
31 May 2023 - 9:41 am | अथांग आकाश
वा! मस्तच लेख!! आवडला!!!
31 May 2023 - 9:57 am | कुमार१
छान हो !
तुमच्या 3C- युक्त सुंदर चलतचित्रामुळे चर्चेला परिपूर्णता आली.
2 Jun 2023 - 6:33 am | राजेंद्र मेहेंदळे
अवघड विषय सोपा करुन सांगण्यात कुमार सरांचा हातखंडा आहेच, पण वैद्यकीय संदर्भात ईतके विविध विषय त्यांना कसे काय सुचत असावेत बुवा?
असो, माझ्या ज्ञानात बरीच भर पडली लेख आणि त्यावरचे भन्नाट प्रतिसाद वाचुन
2 Jun 2023 - 8:33 am | कुमार१
चांगला मुद्दा.
यासंदर्भात आपली या धाग्यावर पूर्वी काही चर्चाही झाली होती.
काही वेळेस एखाद्या विषयाची डोक्यात अचानक ठिणगी पडते तेव्हा आपले आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटते. हा विषय असाच अचानक सुचला, पण त्याला एक पार्श्वभूमी आहे.
आमचे वैद्यकीय शिक्षण झाले त्या काळात आंतरजाल अस्तित्वात सुद्धा नव्हते. तेव्हा असेच एकमेकांच्या चर्चांमधून असे समजले होते की कंडोम हा शब्द डॉक्टर कंडोम या त्याच्या संशोधकाच्या नावावरून आलेला आहे. तेव्हा सगळ्यांनी त्यावर माना डोलवल्या होत्या.
आज जेव्हा आंतरजालावर अनेक संदर्भ धुंडाळले तेव्हा त्यातील सत्याचा उलगडा झाला !
2 Jun 2023 - 10:57 am | सुधीर कांदळकर
छान परंतु सहसा नाक मुरडण्याचा विषय. सहसा या विषयावर अतिशहाणे अशिक्षितच आपण पीएचडी केल्यासारखे बोलतात. या पार्श्वभूमीवर आपल्यासारख्या अर्हताप्राप्त व्यक्तीचे लेखन वाचून छान वाटले. आपण शास्त्रीय बाजू छानच हाताळली आहे.
या विषयाला सामाजिक पैलूही आहे. कै. र. धों कर्वे यांचे अमोल कार्य आपण विसरू शकत नाही. ध्यासपर्व हा अमोल पालेकरांचा चित्रपट सुंदर आहे. कर्व्यांना तत्कालीन समाजाने वाळीत टाकले होते. त्यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी खांदा द्यायला अक्षरश: चार देखील माणसे हजर नव्हती. त्यांचा एकच जिवलग मित्र आणि ते अशा दोघांनी सरकारी हातगाडीवरून मृतदेह वाहून नेऊन अंत्यसंस्कार उरकला होता.
या विषयावरील दुसरे महत्त्वाचे कार्य फारच मोठ्या प्रमाणावर झाले आहे. एके काळी कोणत्याही बांधकामाच्या जागेवर गेले की कामगार स्त्रियांचा पोरवडा दिसे. एकेका बाईला चरपाच मुले सहज असत. आता असे दिसत नाही. कुटुंब नियोजनासाठी ट्रान्झिस्टर रेडिओ वगैरे बक्षिसे दिली गेली. नर्सेस, सुईणी, एवढेच काय अशिक्षित लोकांमधून लूप, तांबी बसवणार्या स्त्रिया प्रशिक्षित केल्या गेल्या. पुरुषांच्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया करणारे अल्पशिक्षित लोक तयार झाले. असा एक प्राणी ७०च्या दशकात आमच्या मित्रवर्गाच्या ओळखीचा होता. त्याला आम्ही डॊक्टर म्हणून चिडवत असू.
त्यांच्या राजकीय मतांचे विरोधक मानणार नाहींत, हडेलहप्पीपणाने का होईना पण हे महाविशाल कार्य संजय गांधी यांनी केले. मी काही कॊन्ग्रेसचा वा संजय गांधीचा समर्थक नाही, पण सत्य आहे म्हणून लिहिले.
आता तर अनेक जाचक धार्मिक बंधने असतांना देखील अनेक स्त्रिया लपूनछपून का होईना संतती नियमनाची साधने वापरतांना दिसतात.
असो. वेगळ्या, कांहीशा भृकुटी उंचावल्या नजरेने पाहिल्या गेलेल्या विषयावरील ले ख आवडला, धन्यवाद.
2 Jun 2023 - 11:35 am | कुमार१
धन्यवाद ! तुमचा अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला आणि त्यातील काही मुद्द्यांची विशेष दखल घ्यावी वाटते.
होय, मी पाहिला आहे. खूप चांगला आहे; अगदी प्रभावी.
बरोबर. कुटुंबनियोजन प्रसारात अनेक माध्यमातून चांगले समाजप्रबोधन झालेले आहे. या संदर्भात “नको हे चौथं मूल “ हे तेव्हाचे गाणे सुद्धा चांगले आहे. अधूनमधून ते जाल रेडिओवर लागते.
कित्येक वर्षांनी हा सुंदर शब्दप्रयोग ऐकला आणि आवडलाच !
11 Jun 2023 - 10:40 pm | फाटक्यात पाय
उत्तम लेख!
असेच आमच्या ज्ञानात भर टाकत रहा
12 Jun 2023 - 6:03 am | कुमार१
या लेखाचा उत्तर अर्थ इथे प्रकाशित केलेला आहे.
12 Jun 2023 - 6:04 am | कुमार१
'उत्तरार्ध' असे वाचावे
12 Jun 2023 - 6:35 am | फाटक्यात पाय
काल रात्रीच वाचून काढला.
माझ्या अभिप्रायाची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.
14 Oct 2023 - 8:03 pm | कुमार१
जगातील सर्वात प्राचीन आणि सुस्थितीत असलेला निरोध ऑस्ट्रिया येथील संग्रहालयात ठेवला आहे. तो स्वीडनमधील उत्खननातून मिळालेला आहे. तो डुकराच्या आतड्यांपासून बनवलेला आहे
त्याच्याबरोबरच्या माहितीपत्रकात एक मजेदार माहिती आहे. हा निरोध वापरण्यापूर्वी गरम दुधात बुडवून घेण्याची शिफारस आहे, ज्यामुळे गुप्तरोगांपासून संरक्षण मिळते !
14 Oct 2023 - 8:03 pm | कुमार१
जगातील सर्वात प्राचीन आणि सुस्थितीत असलेला निरोध ऑस्ट्रिया येथील संग्रहालयात ठेवला आहे. तो स्वीडनमधील उत्खननातून मिळालेला आहे. तो डुकराच्या आतड्यांपासून बनवलेला आहे
त्याच्याबरोबरच्या माहितीपत्रकात एक मजेदार माहिती आहे. हा निरोध वापरण्यापूर्वी गरम दुधात बुडवून घेण्याची शिफारस आहे, ज्यामुळे गुप्तरोगांपासून संरक्षण मिळते !