चर्चबेल –लेखक ग्रेस
(लघुलेखसंग्रह)
शब्दयात्री असल्याने शब्द कधी अलगद कुशीत येतात तर कधी दूर दूर वाळवांटामध्ये तप्त होत असतात.अलगद कुशीत येण्याचे दोर म्हणजे ग्रेस यांच्या कविता रसग्रहण!
सांजवेळा,थरथरती कातर संध्याकाळ,सूर्याच्या सांज रंगवेली,पापणीचा ओलसर वाळवंट,ह्रुदयाचा आर्त कावळा,मधेच ज्ञानेश्वर यांचा लख्ख प्रकाश ,पाउसाच्या थेंबओळी,गर्द झाडी- सूर्याचे किरणांचे खेळ,झाडांच्या पानांच्या –पक्ष्यांच्या गळाभेटी,माणसाच्या आत्म्याच्या संवेदना, अनुभूतीची हाक आणि आणखिन व्यापक सर्व लाभत राहते ग्रेस काव्यात!
बालपणात “भय इथले संपत नाही” या गीताने आत्मा इंद्रियाची गाठ करून दिली.आत्म्याच्या पृष्ठभागावर तरंगणारे शब्द अलगद गाभ्यात घुसून घर करतात. “ती गेली तेव्हा रिमझिम ,पाऊस निनादत होता” या गाण्याची पार्श्वभूभी समजल्यावर डोळ्यांच्या कडा ओलावतात.हृदयनाथ मंगेशकर यांच्या बरोबरीचे त्यांची गाणी “घर थकले संन्यासाचे”,”तुला पहिले नदीच्या किनारी”,”वार्याने हलते रान” कर्णमाधुर्याच्या निळाईत आत्मसुख देते. माझ्याकडे सांध्यपर्वातील वैष्णवी’ हा काव्य संग्रह आहे जो मनोमन पुजला आहे.
तर ग्रेस यांचा पहिला ललितलेख संग्रह “चर्चबेल” कवितेतून मोहक दुर्बोध वाटणारे शब्द गद्यात कसे सजले हे वाचण्याची अनुभवण्याची उत्सुकता होती.सर्व लेख लहू स्वरूपाचे आहेत.पण कमालीचे ओढ लावणारे आहेत.त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तीच्या जीवनकळा अधिकतर वेदानाच्या रूपकातून साकारताना एक मूर्त रूप डोळ्यासमोर नक्क्कीच उभे राहते.
चिमण्या कथेतील त्यांच्या वरचा राग नंतर त्या ण येण्याने वाटणारी हुरहूर आहे.नेपाली,पल्लवीचे पक्षी तारायंत्राचा खांब, हे विशेष व्यक्तीमत्व चंद्रकलेसारखा रेखाटताना मृत्युच्या वेदनेने कधी लाटा ,कधी झाडं त्यावरचे पक्षी यांच्याशी मान्खेलाचे संबंध दाखवतो.
गुलमोहर,टेकडीवरचा पाऊस ,रोशनची गाणी,उरलेला चंद्र ,नूरजहा आणि रिल्के या लेखातून सृजनाचे दान वाचकांना ,रसिकांना मिळते.w.s ,प्रो सम्युल यातून इंग्रजी साहित्यिकांच्या साहित्याप्रती संपूर्ण समर्पण ग्रेस त्यांच्या लेखन शैलीतून घडवतात.
हात ,त्वचा –तंतू,यात्रा शिबानी या कथेतून इंद्रियांचा आत्मा उलगडतो.,माई,उन्हातील आई ,वाळूचे घर हे लेख एका गर्द हिरव्या प्रांतात नेतात.
शेवटचा लेख आहे ‘चर्चबेल’ सुंदर कथा आहे.एका प्रेक्षकाने ग्रेस यांना विचारले,”वाय आर यु रीन्गिंग चर्चबेल?”
ते उत्तरले “आय रीन्गिंग ड चर्चबेल टू आव्हाईड फरदर क्रुसीफीकेशन ईन माय लिटल अराउंड”
“माझ्या आजूबाजूला कोणी अजून ख्रिस्त सुळावर चढत नाही ,ते होऊही नये म्हणून मी चर्चबेल वाजवतोय”
साहित्यिकाने कायमच समाजाचे हितमर्म मांडताना एक सृजन जपले आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ काळ्या पांढऱ्या खिडकीतून घुमणारी चर्चबेल आहे जी एक नाद मनावर उमटवते.
-भक्ती
२६ मार्च –कवी ग्रेस स्मृतीदिन
प्रतिक्रिया
27 Mar 2023 - 7:53 am | कुमार१
आवडलेच...
27 Mar 2023 - 5:28 pm | Bhakti
प्रतिसादासाठी धन्यवाद!
27 Mar 2023 - 2:43 pm | कर्नलतपस्वी
वृद्ध देखणा चेहरा माझा
बिगुल मुखातून वाजे
पराभवाच्या पर्वा मध्ये
जसे उजळती राजे
अर्थात, सेवानिवृत्त झाल्यानंतर मराठी साहित्य संग लाभला व कवीवर्य ग्रेस यांच्या काही कविता वाचायला मिळाल्या.
माणीक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस हे कवी बा. सी. मर्ढेकरां नंतरचे एक कलंदर कवी. यांची कवीता समजून घ्यायला दुर्बोध. सहसा कुणी वाटेला जात नाही पण एकदा वाटेला गेला की मग दुसरी वाट चोखाळत नाही.
एक दिवस कवी ग्रेस यांची ‘आई’,अतिशय गाजलेली कविता बघीतली,वाचली.
*ती गेली तेव्हा*
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा,कंदील एकटा होता
हे रक्त वाढतानाही
मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदीच्याही
तो कृष्ण नागडा होता
युट्यूबवर या कवितेचे रसग्रहण ऐकले. पैकी निमीश उमराणी यांनी केलेले रसग्रहण आवडले.
अशीच कवी ग्रेस यांची *मन* , एक दुर्बोध कवीता बरेच वेळा वाचली, अंतरजालावर संदर्भ शोधले तेंव्हा थोडीफार लक्षात आली असा मी माझा गोड गैरसमज करून घेतला.
*मन कशात लागत नाही
अदमास कशाचा घ्यावा ?
अज्ञात झर्यावर रात्री
मज ऐकू येतो पावा
श्वासांचे तोडून बंधन
हे हृदय फुलांचे होई
शिशिरात कसे झाडांचे
मग वैभव निघून जाई
सळसळते पिंपळपान
वार्यात भुताची गाणी
भिंतीवर नक्षत्रांचे
आभाळ खचविले कोणी ?
मन बहर गुणांचे लोभी
समईवर पदर कशाला ?
हे गीत तडकले जेथे
तो एकच दगड उशाला
चल जाऊ दूर कुठेही
हातात जरा दे हात
भर रस्त्यामध्ये माझा
होणार कधीतरी घात
मन कशात लागत नाही !
वर वर साधे सोपे दिसणारे शब्द वाचताना, स्वतःला चक्रव्यूहात सापडल्याचा अनुभव करतो. दुर्बोध कवी असा शिक्कामोर्तब झाल्याचे कविलाही ज्ञात होते.त्यांनी आपली खंत खालील कवीतेत अशा प्रकारे व्यक्त केली आहे. शब्दरचना असबंध वाटते. कवीच्या मनात काय विचार असतील याची सहज कल्पना येत नाही. मी वाचलेली कवीता व समजून घेतलेला अर्थ खालील प्रमाणे.
कावळ्यांचा रंग
कुणी आपले म्हणेना
कुणी बिलगेना गळा
कंठ दाटताना झाला
रंग कावळ्यांचा काळा....
नसानसांतून वाहे
फणा उगारून साप,
दूर सावल्यांचा घोळ
माझे नाचवितो पाप...
कुणी आढ्याला बांधली?
रात्र आंधळ्या कौलांची
चंद्र पडला मरून
इथे पहाडाच्या खाली...
ही कविता ग्रेस यांनी बहुतेक त्यांच्या कवितांच्या आलोचनेला त्रस्त होऊन लिहिली असावी. जसे कावळ्याला कोणी आपले म्हणत नाही त्याचा तिरस्कार करतात तसेच त्यांच्या प्रत्येक कविते वर दुर्बोधतेचा आरोप केला. कवीवर्य म्हणतात लोकांना माझ्या कवितांबद्दल सांगून सांगून माझा कंठ दाटून येतो आणि शेवटी माझा रंगही कावळ्याच्या रंगाप्रमाणे काळा पडतो.
त्यांचे काही कवितासंग्रह वाचतोय. कविता समजून घेण्यात खुप आनंद होतो.
बरेच काही लिहीता येईल पण आपण थोडक्यात पुस्तक परिचय दिला आहे त्याने उत्सुकता वाढली आहे. पुढच्या फेरीत नक्कीच घेणार व वाचणार.
आपण नेहमीच छान लिहीता.
कविवर्य ग्रेस यांना सादर अभिवादन.
27 Mar 2023 - 5:24 pm | Bhakti
धन्यवाद!
खुप छानच वेध घेतला आहे.
दुर्बोध काव्य.... याबाबत ग्रेस म्हणतात "माझी कविता वाचून , जेव्हा त्यातल्या भावना तुम्हाला खरं तर बोचल्या असतात तेव्हा तुम्ही स्वतः वरच चिडतात, आणि ते काव्य दुर्बोध म्हणता"
मला तर त्या सृजनात्मक वाटतात.जे कोणालाही उमगले नाही ते त्यांनी शब्दमाधुर्याने सजवले.
28 Mar 2023 - 4:36 pm | सुधीर कांदळकर
वसईच्या सिसिलिया कार्व्हालो यांचा चर्चबेल नावाचा एक कथासंग्रह आहे. त्याचे शीर्षक याच कवितेवरून घेतले असावे. कधी भेट झालीच तर विचारायला हवे. असो.
छान, सुरेख लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.
28 Mar 2023 - 7:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
"भय ईथले संपत नाही " माझेही आवडते. ग्रेस यांची काही गाणी ईथे पहा/ऐका
https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Grace
30 Mar 2023 - 8:29 am | प्रचेतस
परिचय छान, ग्रेस यांचे लेखन कधीच वाचले नाही
30 Mar 2023 - 9:30 am | Bhakti
सर्वांना धन्यवाद!
30 Mar 2023 - 10:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान लिहिलंय आवडलं. अजून सविस्तर लिहायला पाहिजे.
ग्रेस म्हणजे दुर्बोध, कळत नाही वगैरे वाचण्यापूर्वीच असा भडीमार झालेले आपण सुरुवात केली की सगळं आवडीने वाचतो.
गेले उकरुन घर
नाही भिंतींना ओलावा
भर ओंजळी चांदणे
करु पाचूचा गिलावा.
-दिलीप बिरुटे