ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
27 Feb 2023 - 8:03 pm

बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी

बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये

बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे

ऐहोळे हा आमच्या भटकंतीमधला दुसरा दिवस, आदल्या दिवशी बदामीच्या गुहा, अगस्ती तलाव आणि यल्लमा मंदिर पाहिलेले होते आणि आजचा संपूर्ण दिवस ऐहोळे आणि पट्टदकलसाठी राखून ठेवला होता जेणेकरुन तिसर्‍या दिवशी कमी दगदग व्हावी. मात्र त्या तिसर्‍या दिवशीच्या भटकंतीत अनपेक्षितपणे सिदला फडीची दमदार भटकंती झाली त्यामुळे त्या दिवशी अधिकच दगदग झाली, बदामीच्या निकट असल्याने लिखाणात सलगता राहावी म्हणून बदामी किल्ला आणि सिदलाफडीवर आधी लिहिले आणि आता ऐहोळेची सुरुवत करत आहे.

तर आजचा दिवस होता ऐहोळे आणि पट्ट्दकलसाठीच. बदामीपासून पट्ट्दकल आहे साधारण २२ किमी तर ऐहोळे त्याच रस्त्यावर पुढे अजून १३ किमी. ऐहोळे साठी खरे तर २ दिवस आणि पट्टदकलसाठी किमान एक दिवस संपूर्ण हवा तरच ही ठिकाणे बर्‍यापैकी बघता येतात. मात्र वेळेअभावी तसे करणे शक्य नसल्याने एकाच दिवसात दोन्ही करायचे ठरवले आणि सकाळी लवकर उठून साधारण सात वाजता बाहेर पडलो. बदामीत एसटी स्टॅण्डजवळच्या हॉटेल उदय विलास मध्ये नाष्टा करुन निघालो ते वाटेत पट्टदकल पार करुन ऐहोळेत साधारण साडेआठच्या आसपास पोहोचलो. रस्ता एकदम मख्खन आहे. ऐहोळे-पट्टदकल येथे फिरताना वैयक्तिक वाहन नसल्यास बदामीपासूनच एखादी रिक्षा दिवसभरासाठी ठरवणे आवश्यक आहे कारण येथे सार्वजनिक वाहतुकीची तुलनेने बोंबच आहे आणि संध्याकाळी ५/६ च्या पुढे परतीसाठी वाहन मिळणे दुरापास्त होते. शिवाय ल़क्षात घेण्याजोगी अजून एक गोष्ट म्हणजे स्वतःसोबत काही खाण्याच्या वस्तू आणि पिण्याचे पाणी विपुल असावे. ऐहोळेत फक्त दुर्गामंदिराच्या आसपास काही खाण्याची किरकोळ दुकाने आहेत, जेवण मात्र मिळत नाही. तिथल्या केटीडीसीच्या मयुरा विश्रामगृहात तयार काहीच नसते, तयार करुन देतात मात्र दिडेक तास थांबावे लागते. पट्टदकलला मात्र साधे कन्नड पद्धतीचे जेवण मंदिराबाहेरच्या टपर्‍यांवर मिळते, त्यादृष्टीने नियोजन करावे. तर चला आता ऐहोळेच सफर करावयास निघू.

ऐहोळे ही पश्चिमी चालुक्यांची पहिली राजधानी. मलप्रभेच्या काठावर वसलेल्या ऐहोळे नगराचे प्राचीन नाव आर्यपूर असे मानले जाते. बदामीपासून मलप्रभा थोडी दूर असली तरी ऐहोळे आणि पट्टदकलला अगदी लगटून जाते. ही नदी मोठी अवखळ, हिचे पूर्वीचे नाव मलप्रहारी होते असे काही जण मानतात, मलाचा नाश करणारी नितळ, निर्मळ अशी. मात्र मला स्वतःला ह्या नदीचे पात्र मातकट, गढूळ असल्याने मलप्रभा अर्थात गढूळलेल्या पाण्याची असेच वाटते. मलप्रभेच्या काठावर ऐहोळेतील मंदिरसंस्कृतीचा विकास होत गेला. मंदिर निर्मितीची सुरुवात ऐहोळेतून झाली, बदामीत मध्य झाला तर पट्टदकलला संपूर्ण विकसित स्वरूपात मंदिरे उभारली गेली. ज्यांना कुणाला शिल्पशास्त्राच्या दृष्टीकोनातून मंदिर निर्मितीतला होत गेलेला बदल पाहायचा असेल, स्थित्यंतर अनुभवायचे असेल तर ते ऐहोळे, बदामी, पट्टदकलशिवाय संपूर्ण होणारच नाही. चालुक्य स्थापत्यशैलीची सुरुवात ऐहोळेपासून झाली, साधारण पाचव्या सहाव्या शतकापासून येथे मंदिरे उभारण्यास सुरुवात झाली किंबहुना दक्षिण भारतातील सर्वात आद्य मंदिरे ऐहोळे येथेच आहेत. गजपृष्ठाकार, मंडप, उतरत्या छपराची, फांसना शैली, द्राविड शैली, उत्तर भारतीय नागर शैली, लेणी अशी विविध पद्धतीची आणि जैन, बौद्ध आणि हिंदू आदी तिन्ही धर्मांची लहानमोठी मंदिरे बघावयास मिळतात अर्थात ऐहोळेत हिंदू मंदिरांची संख्या खूपच जास्त आहे. आजमितीस ऐहोळेत सुमार १२५ मंदिरे असून मंदिराच्या मध्येमध्येच गाव वसले आहे, जिकडे जावे तिकडे येथे काही ना काही पाहावयास मिळते. दुर्गा मंदिर येथील सर्वात प्राचीन असे मानले जाते, ह्याच मंदिरसंकुलात जवळपास ९९% लोक जातात आणि इतर संकुले मात्र पर्यटकांची वाट बघत एकांतावस्थेत असतात. ह्या सव्वाशे मंदिरांपैकी काही मंदिरसंकुले आम्हास पाहावयास मिळाली त्याबद्द्ल आता एकेक करुन पाहू.

जैन बसादी (जैन लेणी)

ऐहोळे गावात प्रवेश करण्याच्या आधी उजव्या हाताला एक टेकडी दिसते. तीच ही मेगुती टेकडी. गावात न जाता उजवीकडे टेकडीच्या कडेने एका लहानश्या रस्त्याने मागे वळल्यास एक खडकात खोदलेली एक लहानशी लेणी दिसते. तीच ही जैन बसादी. येथे नजर मात्र उजवीकडेच हवी नाहीतर आपण ह्या लेणीदर्शनास मुकू शकतो. येथे एक सांगणे अगत्याचे आहे की ह्या लेणीच्या वरच्या भागात म्हणजेच मेगुती टेकडीच्या पठारावर अश्मयुगीन दफनभूमी आहे(मोनोलिथिक डोल्मेन्स). येथूनच टेकडीच्या वरच्या पठारावर गेल्यास येथील पाषाणी दफनस्तंभ जवळून पाहता येतात. मेगुती टेकडीच्या दुसर्‍या बाजूस असलेल्या पायर्‍यांच्या मार्गाने गेल्यास मात्र सर्व बाजूंनी तटबंदी असल्याने हे डोल्मेन्स पाहायला उतरणे तसे जिकिरीचेच आहे.

बसादीचे होणारे प्रथमदर्शन
a

बाहेरुन अगदी लहानसे वाटणारे हे जैन लेणे आतून मात्र अगदी प्रशस्त आहे. एक पाषाणात खोदलेले हे लेणे अगदी ऐहोळेला येणार्‍यांनी अगदी आवर्जून पाहावे असेच आहे. सातवे शतक हा ह्या लेणीनिर्मितीचा काळ मानला जातो.

a

व्हरांडा, सभागृह आणि सर्वात शेवटी गर्भगृह अशी ह्याची रचना. व्हरांड्याच्या उजव्या भागात एका नागाचे छत्र धारण केलेल्या ( हा नाग म्हणजेच धरणेंद्र यक्ष) तीर्थंकर भगवान पार्श्वनाथांची मूर्ती कोरलेली असून बाजूस सेवक, सेविका आहेत. तर त्यांच्या समोरील बाजूस ( व्हरांड्याच्या उजव्या भागात) बाहुबली त्याच्या दोन सेविकांसह उभा आहे. निरखून पाहिल्यास बाहुबालीच्या पायांच्या बाजूस दोन नाग दिसतात तर पायांना वेलींनी विळखा घातलेला आहे.

पार्श्वनाथ

a

बाहुबली

a

ऐहोळे, बदामी, पट्टदकल येथील मंदिरांत, लेण्यांत फिरताना छताकडे कायम लक्ष जाणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. येथील जैन बसादीही त्याला अपवाद नाही. येथील संपूर्ण छत सुरेख नक्षीकामाने कोरून काढलेले आहे. छताची उंची कमी असल्याने येथे सर्वच छत कोरून काढणे हे तुलनेने सोपे गेले असावे हे सहजच लक्षात येते. कमळे, स्वस्तिक, मकर, मकराने अर्धवट गिळलेले मानव अशा विविध कलाकृतींची येथे रेलचेल आहे.

फुलांची नक्षी

a

स्वस्तिक

a

नक्षीकाम

a

व्हरांड्याच्या पुढे सभागृह, ह्याच्या छतावर कमळ कोरलेले आहे.

a

a

तर गर्भगृहात ध्यानमुद्रेत बसलेल्या भगवान महावीरांची मूर्ती आहे.

a

ऐहोळेला आल्यावर हे लेणे अगदी चुकवू नयेच, जेमतेम १०.१५ मिनिटात पाहता येते आणि वेगळे काही पाहिल्याचे समाधान मिळते.

येथून परत फिरुन आम्ही गावाच्या दिशेने निघालो वाटेत डाव्या बाजूला पहिलाच लागतो तो हुच्चयप्पा मठ

हुच्चयप्पा मठ

ऐहोळे गावाच्या अगदी सुरुवातीसच असणारे हे मंदिर येथे येणार्‍यांनी न चुकता आवर्जून पाहावे असेच आहे. एका प्रशस्त्र प्रांगणात हे मंदिर उभारले आहे. ह्या मंदिराची रचना थोडी निराळी. येथे मुख्य शिवमंदिर आणि एक मठ असे दोन विभाग आहेत. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे एक प्रशस्त आयताकृती चर खणून त्यात ही दोन्ही मंदिरे स्थापित केली आहेत. मंदिरात शिरण्यासाठी आपल्याला काही पायर्‍या उतरुन खालचा प्रांगणात जावे लागते, तिथून एका अधिष्ठानावर हे मंदिर आहे. ह्या मंदिराची रचना मंडप शैलीची, चौकोनी आकारातली. गर्भगृहाच्या वर जो शिखर भाग आहे तो देखील चौकोनीच. साधारणतः सहाव्या शतकातले हे मंदिर त्यावरील युगुल मूर्तींमुळे प्रेक्षणीय झाले आहे.

हुच्चयप्पा मठ

a

प्रवेशद्वाराच्या समोरील दोन्ही बाजूस युग्मं शिल्पे आहेत तर आतील बाजूस गंगा, यमुना आहेत.

a

प्रेम आंधळं असतं असा आशय असणारे युगुल शिल्प यापैकी एक. येथे एक प्रेमात वेडा झालेला एक प्रियकर एका गर्दभमुखी तरुणीसोबत आहे. प्रेमात पडलेल्या माणसाला सारासार विचारबुद्धी काही राहत नाही असेच सांगणारे हे शिल्प.

a

प्रवेशद्वाराच्या दुसर्‍या बाजूवरील हे एक शिल्प, स्त्रीच्या हातात पूर्ण भरलेल्या बांगड्या असून कमरपट्टा, बाजूबंद इत्यादी दागिने पाहण्यासारखे आहेत.

a

ह्या युगुलातल्या तरुणाची केशरचना आणि कमरेला बांधलेले वस्त्र इजिप्शियन वस्त्रशैलीशी कमालीचे मिळतेजुळते आहे. मस्तकावर अरब लोक पांघरतात तसे उष्णीष असून कमरेचे वस्त्र चुणीदार आहे.

a

मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूच्या सुरुवातीसही मैथुन शिल्पे आहेत.

a--a

प्रवेशद्वारातून आत जाताना दोन्ही बाजूस गंगा यमुना आहेत. दोन्ही सरितादेवींनी आपला प्रवाह हळुवार व्हावा म्हणून आधारासाठी बटूच्या मस्तकावर हात ठेवला आहे. त्यांच्या तलम वस्त्रांतून त्यांची नितळता प्रतीत होते.

गंगा यमुना

a--a

प्रवेशद्वारातून सभागृहामधे आत जाताच येथील सर्वात महत्वाची आश्चर्ये लपलेली आहेत. येथील एक वैशिष्ट्य म्हणजे येथील नंदी हा स्वतंत्र मंडपात नसून सभागृहातच आहे. मी कित्येकदा आधी सांगितल्याप्रमाणे तुमची नजर छतावर गेलीच पाहिजे नाहीतर तुम्ही अगदी महत्वाच्या शिल्पांना मुकू शकता. येथील छतावर आहेत ते ब्रह्मा, विष्णू, महेशाचे तीन भव्य शिल्पपट, इतके सुंदर शिल्पपट मी याधी कुठेही पाहिले नाहीत. चला तर मग एकेक करुन हे शिल्पपट बघूयात.

विष्णू

पाच फण्यांच्या वेटोळे घातलेल्या शेषनागावर आरामात बसलेल्या विष्णूच्या हाती शंख आणि चक्र आहेत तर इतर दोन्ही हातांनी गुडघ्यांचा आधार घेतला आहे. शयनमुद्रेऐवजी वेटोळ्यावर बसलेली विष्णूमूर्ती हे चालुक्य शैलीचे एक खास वैशिष्ट्य. विष्णूच्या दोन्ही बाजूंना भूदेवी (पृथ्वी) आणि श्रीदेवी (लक्ष्मी) आहेत. एका बाजूस गरुड असून दुसर्‍या बाजूस एक सेवक आहे

a

शिव
हा येथील एक कमालीचा सुंदर शिल्पपट. नंदीवार स्वार शिवाने एका हाती नाग धरला असून दुसर्‍या हाती अक्षमाला आहे. शेजारी पार्वती बसली असून एका सेविकेने तिच्यावर छत्र धारण केले आहे. शिवाच्या बाजूस चामरधारी सेवक, शिवगण आणि अस्थिपंजर झालेला भृंगी आहे. पटाच्या बाजूस सुरेख नक्षीकाम असून कमळे आणि शिवगण कोरलेले आहेत.

a

ब्रह्मा

हंसावर आरुढ असलेल्या ब्रह्माची चार मस्तके ही चार वेदांची प्रतिके आहेत तर त्याने हातांमध्ये कमळ, पुस्तक, कमंडलू आणि अक्षमाला धारण केली आहे. उपासतापास, तपाने कृश झालेल्या सप्तर्षींनी त्याला वेढलेले आहे. ब्रह्मासोबत सप्तर्षी असलेले हे दुर्मिळ शिल्प. सप्तर्षींच्या वाढलेल्या जटा दाढ्या येथे कमालीच्या निगुतीने कोरलेल्या आहेत.

a

मंदिराच्या गर्भगृहात ग्रॅनाईटचे शिवलिंग आहे. हे देखील येथील मंदिरांचे एक वैशिष्ट्य. येथील मंदिरे बांधली आहेत ती पिवळ्या वालुकाश्मातून जो येथे विपुल आहे, मात्र शिवपिंडी आहेत त्या जवळपास सर्वच ग्रॅनाईटमधल्या जो इथे मिळत नाही. गर्भगृहाच्या बाजूच्या कोनाड्यात मात्र एक वालुकाश्मातली शिवपिंड आहे आणि त्यावर सप्तमातृकापट कोरलेला आहे.

शिवपिंडीवरील सप्तमातृकापट

a

आता बाहेर येऊन मंदिराभोवतील एक फेरी मारली. अगदी सुरुवातीची शिल्पे वगळता मंदिराच्या तिन्ही भिंती अगदी साध्या आहेत.

a

a

मुख्य मंदिराच्या मागील बाजूस असणारा मठ तर अगदी साधा. चौकोनी रचनेच्या ह्या मठात स्तंभ वगळता काहीही अवशेष नाहीत.

a

हे मंदिर बघून बाहेर आलो आणि ऐहोळेतील पुढची मंदिरे बघायला सुरुवात केली त्याबद्द्ल पुढच्या भागात.

महत्वाची टिप:
बदामी, ऐहोळे, पट्टदकल फिरताना दोन गोष्टी अत्यंत आवश्यक - पिण्याचे पाणी आणि एक उत्तम दर्जाचा टॉर्च. टॉर्चशिवाय येथील शिल्पे पाहताच येणार नाहीत इतक्या अंधारात आहेत. मी ह्या भ्रमंतीत सर्वच ठिकाणची छायाचित्रे मोबाईलवर काढली असल्याने शिल्पांवर फोकस करण्यासाठी मला टॉर्चचा चांगला उपयोग झाला. मी ह्यासाठी अ‍ॅमिसीव्हिजनचा टॉर्च वापरला. जो पुरेसा प्रकाश देणारा असून झूम कमी जास्त करता येणारा, शिवाय खिशात अगदी सहजी मावणारा असा आहे. ह्यासाठी १८६५० चे रिचार्जेबल सेल आणि चार्जरदेखील घेतला ज्याने प्रकाशाची तीव्रता अजून वाढते आणि जास्तवेळ बॅकअप मिळतो. ही ह्या टॉर्चची जाहिरात नसून येथे फिरण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त वस्तू म्हणूनच तिची माहिती येथे देत आहे. आपण आपल्याला हवा तो टॉर्च घ्या मात्र टॉर्चशिवाय येथे येऊ नका ही कळकळीची विनंती. मोबाईलच्या फ्लॅशलाईटचा प्रकाश येथे अजिबात पुरेसा नाही.

क्रमशः

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

27 Feb 2023 - 9:38 pm | चौथा कोनाडा

अतिशय सुंदर प्रचि आणि नितांत सुंदर वर्णन. तपशील खुप उपयुक्त आहेत.

हुच्चयप्पा मठाची माहिती रंजक आहे
गर्दभमुखी तरुणीसोबतचे शिल्प भारी आहे. शिल्पपट माहिती खुप छान आहे.

नेहमी प्रमाणेच जबरदस्त धागा !

चौथा कोनाडा's picture

27 Feb 2023 - 9:41 pm | चौथा कोनाडा

जैन लेण्यांच्या छतावरील शिल्पकाम अप्रतिम आहे !

कंजूस's picture

27 Feb 2023 - 9:43 pm | कंजूस

एकेक देऊळ आणि शिल्पे लक्ष देऊन पाहायची झाल्यास दोन दिवस ऐहोळे'साठी लागतील हे खरं आहे. ( इथे येणारे टुअरचे पर्यटक फक्त दुर्ग मंदिर पाहून अर्ध्या तासात पळतात. त्यामुळेच इथे खाण्यापिण्याच्या सोयी वाढल्या नाहीत.)
जैन बसदी आणि हुच्चयप्पा माझे हुकलेच होते ते आता फोटोंतून समजले. शिवाय शेवटी ठेवल्याने मोबाईलची बॅटरी अगोदरच्या फोटोंत संपली.

असे अंतर्भागातील फोटो काढायचे झाल्यास खरं म्हणजे सीसीडी सेन्सॉरचा डिजिटल डिएसएलआर आणि २८एमेम प्राईम लेन्स (कॅनन/निकॉर) हवे.

टॉर्च बद्दल सहमत. आपल्या मोबाईलचा कॅम्रा वापरला तर त्यातला फ्लॅश 3.7 voltsवर उजेड पाडतो शिवाय बहुतेक एलइडी असतो. झेनॉन नसतो. इतर रिचार्जेबल टॉर्चेसही असेच 3.7voltsवर चालतात. 12 volts चे टॉर्च हवेत. Laptop घ्या बॅटरी पॅकवर चालणारे.

Bhakti's picture

27 Feb 2023 - 10:44 pm | Bhakti

अद्भुत !
ब्रम्हा,विष्णू,शिव यान्चे शिल्प निराळेच आहे.इतर लेण्यापेक्षा या वेगळ्याच आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

28 Feb 2023 - 12:23 am | प्रसाद गोडबोले

उत्तम !

लिहित रहा वल्ली सर !

तुषार काळभोर's picture

28 Feb 2023 - 7:15 am | तुषार काळभोर

हा परिसर अतिशय निवांत (आणि स्वच्छ सुंदर) दिसतोय.
एकही फोटोत जिवंत मनुष्य नाही, हे छायाचित्रण कौशल्य आहे की एकांत?

एकही फोटोत जिवंत मनुष्य नाही, हे छायाचित्रण कौशल्य आहे की एकांत?

अर्थातच एकांत. इथे फारसे कुणीच येत नाही. किंबहुना ऐहोळेतील दुर्गा गुडी सोडून इतर सर्वच मंदिरसंकुलात कायमच शांतता अनुभवता येते.

सहल विषय काढला की कुठे जाणार?
सोलापूरला किंवा जवळ सांगायचे नाही. हुब्बळी सांगायचे. नाहीतर मी पण मी पण करत लोक जमा होतात आणि मग बदामी ऐहोळे विसरायचं. कारण इथे भरपूर चालावं लागतं. मग आपल्या पिकनिकचीही वाट लागतात. त्यांना चालायचं नसतंच.

आंद्रे वडापाव's picture

28 Feb 2023 - 8:04 am | आंद्रे वडापाव

मस्त फोटोज्, आणि मस्त माहिती....
मजा आला...

कर्नलतपस्वी's picture

28 Feb 2023 - 10:02 am | कर्नलतपस्वी

शिल्पांवरून असे कळते मैथून हा विषय त्याकाळी टॅबू नव्हता. खजुराहो मधे सुद्धा अशा बर्‍याच प्रतिमांमधून असेच प्रतित होते.

भटकंतीला गेल्यावर सामान्य प्रवासी स्थान विषेश वर आपली प्रतिमा सुपर इम्पोज करतो त्यामुळे मुळ कलाकृतीचे सौंदर्य कमी होते. माहीती बद्दल तर न बोललेच बरे.

खुप ठिकाणी फिरणे हे सुद्धा स्टेटस सिम्बॉल झाले आहे.

तुमचे लेख म्हणजे इतीहास प्रेमींना मेजवानीच असते.

मस्त.

तुमचे लेख म्हणजे इतीहास प्रेमींना मेजवानीच असते.

अत्यंत सहमत.

याहीपुढे जाऊन असे म्हणेन की इतिहासाची आवड नसलेल्यांना देखील हे वाचून ती उत्पन्न होऊ लागेल अशा ताकदीचे आहे हे प्रकरण. किमान इतिहास विषयाचा लोक एक रोचक विषय म्हणून विचार तरी नक्की करू लागतील असे लेखन असते.

कर्नल अन् गवि दोघांशी सहमत... छान लेख, उत्तम माहिती

शिवमंदिराची बांधकाम शैली आणि तिथली शिल्पं खूपच सुरेख आहेत 👍
दर्शनी भागावरच्या युगुल मूर्ती, डाव्या-उजव्या बाजूची मैथुन शिल्पे, गंगा यमुना आणि छतावरच्या विष्णू, शिव आणि ब्रह्माच्या शिल्पाकृतींचे डिटेलिंग जबरदस्त आहे.

"ह्या युगुलातल्या तरुणाची केशरचना आणि कमरेला बांधलेले वस्त्र इजिप्शियन वस्त्रशैलीशी कमालीचे मिळतेजुळते आहे."

+१०००
छातीचा तो वैशिष्ट्यपूर्ण 'V' शेप, खांद्यांची ठेवण आणि दंड, मांड्या-पोटऱ्यांचा आकार अगदी इजिप्शियन शिल्पकलेशी मिळता जुळता आहे! कदाचित ह्या मंदिराच्या निर्माणकार्यात इजिप्शियन आणि ग्रीको-रोमन शिल्पकारांचा सहभाग असावा.

बाकी हा भागही नेहमीप्रमाणेच झकास आणि फोटोजही नितांत सुंदर! हे सर्व वाचल्यावर आता ह्या परिसरातील भटकंतीला प्राधान्यक्रम द्यावाच लागणार 😀
पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

गोरगावलेकर's picture

2 Mar 2023 - 3:58 pm | गोरगावलेकर

माहिती आणि फोटो दोन्हीही आवडले,
मुख्य ठिकाणे सोडून बरेच काही आहे बदामी, ऐहोळे, पट्टडक्कल सहलीत पाहण्यासारखे हे आपले लेख वाचूनच कळते आहे.

अनिंद्य's picture

6 Mar 2023 - 1:02 pm | अनिंद्य

छानच, वाचतोय.

सौंदाळा's picture

6 Mar 2023 - 10:24 pm | सौंदाळा

कोरीव काम अप्रतिम आहे.
स्वस्तिक, फुलांची नक्षी आणि कमळ खूप आवडले.
पुभाप्र

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2023 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऐहोळेचा हा भागही सुरेख झाला आहे, सुंदर लेण्या, दगड, आंधळं प्रेमातलं शिल्प, मैथून शिल्पे,
ब्रम्ह, शिव, विष्णूची शिल्पे केवळ सुंदर. लेखन माहितीपूर्ण असल्यामुळे आपले लेखन कायम
एक नवी सफर घडवते. तहे दिलसे शुक्रीया वल्लीशेठ. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

सौंदाळा's picture

15 Mar 2023 - 4:56 pm | सौंदाळा

प्रचेतस : ही शिल्पकला, डोंगरात लेणी कोरणे हे जवळ जवळ भारतभर दिसते. हे कधीपासून चालू झाले ?(माहिती असलेले भारतातील) पहिले पौराणिक शिल्प कधीचे आहे?
ही शिल्पकला कशी आणि कुठे शिकवली जायची? पिढ्यान् पिढ्यांपासून येत पण असेल पण बर्‍याच लेण्यांचा, देवळांचा विस्तार बघून या कामात सतत नविन लोक लागत असतील त्यावेळचा तो रोजगारच असेल त्या अनुषंगाने त्याचे शिक्षण मिळत असावे असे वाटते. याबद्दल काही माहिती आहे का?

भारतातील सर्वात प्राचीन लेणी बिहारमधील बाराबर गुहा (लोमश आणि सुदाम) ही आहेत, ह्या लेणी इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात खोदल्या गेल्या, यानंतर अशोकाच्या धर्मप्रसारासोबतच भारतभर लेणी खोदण्याचे काम सुरू झाले, इसवी सन पूर्व 3 रे ते ख्रिस्तोत्तर दुसरे असा पहिला कालखंड, पाचवे ते सातवे शतक मध्य असा दुसरा कालखंड तर सातवे शतक उत्तरार्ध ते 10 वे शतक हा तिसरा असे तीन कालखंड ढोबळमानाने कल्पिले जातात. यात मग अशोक, सातवाहन, खारवेल अशांनी खोदलेल्या लेण्या, नंतर गुप्त, चालुक्य, कोकण मौर्य तर शेवटी राष्ट्रकूट कदंब अशा राजवटी येतात.

पहिल्या पौराणिक शिल्पाबद्दल सांगणे अत्यंत कठीण पण बौद्धांमध्ये ही सुरुवात झाली उदा. सांचीच्या तोरणावरील शिल्पे, अमरावतीच्या स्तुपावरील शिल्पपट. त्यानंतर गुप्तांच्या उदयानंतर हिंदू पौराणिक शिल्पपट कोरले गेले, त्यावर चालुक्यांनी कळस चढवला, नंतरचे अनुकरण बहुतांशी चालुक्यांच्या लेणी आणि मंदिरांवरील शिल्पांचे केलेले दिसते.

बाकी शिल्पशास्त्राच्या कलेविषयी शिल्पसार, रूपमंडन इत्यादी काही प्राचीन ग्रंथ आहेत, त्यात मूर्ती कशी असावी याचे सविस्तर विवेचन केले आहे. मूर्ती कोरणारे पाथरवट असत जे प्रमुख शिल्पकाराच्या हाताखाली काम करत, याचे वर्णनही एका शिलालेखात आलेले आहे, मिळाल्यास ते येथे देईनच. ह्याची दृश्य उदाहरणे देखील आहेत. अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाह्य भिंतींवर मंदिरासाठी दगड वगैरे आणण्याचे काम करत असलेल्या कामगारांचे शिल्प कोरलेले आहे. आणि ह्या शिल्पकारांना रोजगार तर नक्कीच मिळत असणार. धर्मादाय केल्याचे तर कित्येक शिलालेख आहेतच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Mar 2023 - 10:31 am | राजेंद्र मेहेंदळे

हा ही भाग वाचनीय आणि प्रेक्षणीय झाला आहे. पण एकुण परीस्थिती बघता उन्हाळा टाळुन जावे लागेल, आणि भरपूर चालायची तयारी ठेवावी लागेल असे दिसते. पुलेशु.