२०२२ च्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्वत:चे वजन केले आणि ते ६८ किलो भरले. माझ्या साडे पाच फूट उंचीसाठी योग्य BMI range १८.५ ते २४.९ अशी आहे. थोडक्यात म्हणजे, मी स्थूलपणाकडे वाटचाल करीत असल्याची ती पहिली चाहुल होती. पुढील वर्षाच्या (२०२३) फेब्रुवारीत होणार्या लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा असल्याने मला वजन कमी करणे भागच होते. तेव्हा ६० किलो हे माझे ध्येय ठरवले आणि लवकरात लवकर ते कसे साध्य करता येईल याचा शोध घेण्यास प्रारंभ केला.
तसे पाहीले तर इंटरनेटवर अक्षरश: हजारो उपाय उपलब्ध आहेत. परंतु मला सोपा, खात्रीशीर, स्वस्त आणि सर्वात मुख्य म्हणजे लॉजिकली पटणारा असा उपाय हवा होता. दोन प्रकार सापडले -
१) डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा. जे म्हणतात दिवसातून फक्त दोन वेळाच खा.
२) काही विदेशी तज्ञांचा (डॉ. जेसन फुंग, डॉ. स्टर्न एकबर्ग, डॉ. अनवीन इत्यादी). जे म्हणतात दिवसाचे दोन भाग करा. एक १६ तासांचा ज्यात पाण्याव्यतिरिक्त काहीही न घेणे. आणि दुसरा ८ तासांचा, ज्यात दिवसभराचे खाऊन घेणे.
वरील दोन्ही उपायांत एक गोष्ट समान होती ती म्हणजे साखर पूर्णपणे वर्ज्य करणे आणि पिष्टमय पदार्थांचे (कार्बोहायड्रेट) चे प्रमाण कमी करणे. म्हणजेच सोप्या भाषेत धान्ये (गहू, तांदूळ), बटाटे इत्यादी कमी खाणे.
दोन्ही पद्धती लॉजिकली पटल्या असल्यामुळे मी त्यांचे मिश्रण करायचे ठरवले. आणि ८ तासांत दोन जेवणे करणे आणि उर्वरित काळात काहीही न खाणे, असे सुरू केले. अर्थात दोन जेवणांच्या मध्ये विना साखरेचा आणि कमी दुधाचा चहा किंवा कॉफी घेता येत होतीच. परंतु मला त्यात काहीतरी नाविन्य असावे वाटल्यामुळे पुन्हा शोधाशोध सुरू केली. आणि मला गवसली - बुलेटप्रूफ कॉफी.
मूळ पाश्चिमात्य पाककृतीत, फिल्टर कॉफीत क्रीम घालून पिणे असे आहे. मी त्यातील सारांश घेऊन स्वत:ची पाकृ बनवली. फिल्टर कॉफीऐवजी इन्स्टंट कॉफी वापरणे. आणि क्रीमऐवजी खोबरेल तेल वापरणे (शेवटी दोन्हीत १००% फॅट्च).
तर ही आहे सोपी, चटकन होणारी आणि पौष्टिक भारतीय पद्धतीची बुलेटप्रूफ कॉफी.
साहित्य -
इन्स्टंट कॉफी - १ चमचा
खोबरेल तेल - आवडीनुसार १-२ चमचे
गरम पाणी - १ कपभर
(वर सांगितलेल्या उपायांनी माझे वजन अवघ्या दोन महिन्यात ६० किलोंवर आले. मधल्या काळात ४-५ लग्न इत्यादी कौटुंबिक समारंभात भाग घ्यावा लागल्याने तेवढे दिवस ढील द्यावी लागली. ते जमेस धरूनही दोन महिन्यात ८ किलो कमी ही चांगलीच उपलब्धी म्हणायला हवी!)
https://drive.google.com/file/d/1cz5cNbB78f05I-eoaNnFFNLVkYn3p83Q/view?u...
प्रतिक्रिया
15 Feb 2023 - 7:01 pm | कंजूस
वजन कमी होण्याचे कारण काय समजू शकले नाही.
16 Feb 2023 - 8:42 am | सुनील
एखादी हायब्रीड गाडी ज्याप्रमाणे दोन इंधनांवर चालते (समजा सीएनजी आणि पेट्रोल) त्याचप्रमाणे आपले शरीरदेखिल दोन इंधनांवर चालते - ग्लुकोज आणि चरबी (फॅट्स).
परंतु होते काय की आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे (दर ३-४ तासांनी काहीतरी खाणे वा चहा-कॉफी घेणे) रक्तातील ग्लुकोजची पातळी दिवसभर कायम चढीच राहते. इंधन म्हणून शरीरातील फॅट्स वापरले जातच नाहीत. रात्रीच्या ८ तासांच्या झोपेमुळेच काय तेव्हा ग्लुकोजची पातळी कमी होते. पण लगेचच आपण १-२ चमचे साखर घातलेला चहा पितो आणि ग्लुकोजची पातळी पुन्हा वाढवतो!
तर, जर शरीरातील चरबी जाळायची असेल तर सर्वप्रथम रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी राखणे जरुरीचे आहे. आणि हे साध्य होते दोन प्रकारे -
१) कमी वेळा खाणे.
२) जेव्हा कधी खाणे होईल तेव्हा असे पदार्थ खाणे जेणेकरून ग्लुकोज फारसे वाढणार नाही.
ग्लुकोज वाढवणारे पदार्थ म्हणजे - साखर-गूळ वा अन्य गोड पदार्थ, गहू-तांदूळ वा अन्य धान्यांपासून बनवलेले पदार्थ, बटाटे-रताळी आदि स्टार्च असलेले कंद.
याच्या जोडीने जर थोडाफार व्यायम केला तर फॅट्स जाळायला अधिकच मदत होते.
दोन जेवणांच्या दरम्यान ब्लॅक वा ग्रीन टी वा ब्लॅक कॉफी घेतलीत तरी चालते कारण या पेयांमुळे ग्लुकोजची पातळी वाढत नाही. वर उल्लेखलेली बुलेटप्रूफ कॉफी हादेखिल एक ग्लुकोज न वाढवणारा विरंगुळा! कारण शुद्ध फॅट्समुळे ग्लुकोज वाढत तर नाहीच शिवाय एक प्रकारची संपृक्तता (satiety) येते. त्यामुळे भुकेची भावना चटकन लागत नाही.
16 Feb 2023 - 11:19 am | Bhakti
छान माहिती, मीही हेच डाएट करते.बुलेटप्रुफ काफी विषयी मलाही सल्ला मिळाला होता.लवकरच अमलात आणिल.याविषयक आणखी अभ्यास सुरू केला होता पण इतर कामात तो राहिला.या मुळे शरीरातील ग्लायकोजन आधी वापरले जाते मग चरबी fat,keton इतर क्रमाक्रमाने वापरले जाते.दोनवेळा खा सुखी रहा.
काही अपूर्ण नोट्स.
16 Feb 2023 - 12:41 pm | सुनील
धन्यवाद!
16 Feb 2023 - 6:33 pm | सौंदाळा
चांगली माहिती मिळाली.
असेच काहीतरी करायचा विचार आहे.
गहु आणि तांदळाऐवजी काय वापरले?
16 Feb 2023 - 7:33 pm | सुनील
धन्यवाद!
काहीही नाही.
पोळ्या कमी करून भाजीचे प्रमाण वाढवले. तसेच भात कमी करून डाळ्/आमटीचे प्रमाण वाढवले. एकंदरीत पोट तेवढेच भरेल हे पाहणे महत्त्वाचे. उपाशी राहायचे नाही!
16 Feb 2023 - 10:57 pm | सौंदाळा
जमेल असं वाटतंय, प्रयत्न लवकरच सुरू करतो.
धन्यवाद
17 Feb 2023 - 9:08 am | सुनील
शुभेच्छा!
आपले अनुभव नक्की लिहा.
17 Feb 2023 - 8:00 am | आंद्रे वडापाव
खोबरेल तेल ऐवजी कधी कधी
गायीचे तूप (बिलोना तूप ) वापरून पाहिलं तर ??
17 Feb 2023 - 9:07 am | सुनील
चालतय की!
कुठलाही आपल्या आवडीचा, १००% फॅट असणारा पदार्थ घालून पहावा. तृप्ततेची भावना तर येईलच आणि रक्तातील ग्लुकोजही वाढणार नाही.
17 Feb 2023 - 10:27 am | Bhakti
आज बुलेटप्रुफ काफी प्यायले.मस्त एकदम.अजुन काही intermediate fasting द्र व इतर पदार्थ पर्याय असतील तर नक्की सांगा.
17 Feb 2023 - 11:38 am | सुनील
धन्यवाद! मीदेखिल अशा काही द्रव पदार्थांच्या शोधात आहेच. मिळाल्यास इथे लिहिनच.
17 Feb 2023 - 1:08 pm | कर्नलतपस्वी
सुदैवाने आजपर्यंत असला कुठलाही प्रयोग केला नाही. वजन वाढीची समस्या समोर आली नाही. शिस्तबद्ध व वेळेवर जेवण एवढेच केले. जसे वय वाढले तसे पिष्टमय पदार्थ मात्र कमी करत गेलो. आता एक पोळी व एक डाव भात बाकी भाज्या,फळे व सलाद बरोबर भुक भागवतो. अधूनमधून पिझ्झा,चायनीज सुद्धा चालते पण आयुष्यभर शाकाहारी भोजन घेतले.
सेवानिवृत्तीनंतर मात्र वजन वाढले आहे काहीतरी करायला हवे.
17 Feb 2023 - 1:15 pm | आनन्दा
चामुंडराय यांचा अन्न प्या आणि पाणी खा असा धागा आहे, तो देखील वाचून बघा एकदा.
1 Mar 2023 - 9:13 am | अत्रुप्त आत्मा