हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा सहल : :भाग ४: धर्मशाळा ते पालमपूर प्रवास व पर्यटन स्थळे

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
30 Dec 2022 - 4:03 pm

भाग ३ येथे वाचा

आजही लवकरच जाग आली. काही जण लवकरच सूर्योदय पॉइंटला निघून गेले होते. आम्ही मात्र गच्चीत गरमागरम चहाचे घोट घेत सभोवतालच्या पर्वतरांगाचे विलोभनीय दृश्य नजरेत आणि कॅमेऱ्यात सामावून घेत बसलो.

आज धर्मशाळेची काही पर्यटन स्थळे व प्रवासातील काही ठिकाणे बघत पालमपूरला पोहचायचे होते. आज हॉटेल सोडायचे असल्याने रात्रीच सर्व आवराआवर करून बॅगा भरून ठेवल्या होत्या. रात्री सुटीवर गेलेला आमचा चालकही लवकरच हजर झाला होता. सकाळचा नाश्ता व हॉटेलचे बिल वगैरे चुकते करून दहाच्या सुमारास बाहेर पडलो.
दोन दिवसात जाता येता दल लेक दिसत होते पण आज गाडीतून उतरून बघायचे ठरवले होते. पाचच मिनिटात लेकला पोहचलो. दल लेक म्हटले की श्रीनगरचे विस्तीर्ण सरोवर, हाऊस बोट, शिकारा नजरेसमोर तरळते पण आता समोर दिसत होते ते याच नावाचे पण भिन्न असे सुंदर लांबट आकाराचे लहानसे सरोवर. सरोवराच्या एका बाजूस छोटेसे मंदिर आहे. सरोवराच्या पलीकडील बाजूने देवदार वृक्षांनी नटलेली चढत जाणारी सुंदर पर्वतरांग आहे.
छोटीशी पिकनिक व फोटोग्राफीसाठी एक छान ठिकाण.

१५-२० मिनिट येथे रेंगाळून धर्मशाळेकडे निघालो. धर्मशाळेपासुन साधारण पाच किमीवर खनियरा या छोट्याशा गावी रस्त्यालगतच असलेल्या 'अघांजर महादेव' मंदिराजवळ पोहचलो. गाडीतून उतरताच समोर मंदिर परिसराचे प्रवेश द्वार व मंदिराची रस्त्याकडे भिंत दिसत होती. समोरचे दृश्य बघून येथे थांबावे का सरळ पुढच्या ठिकाणी जावे असा विचार मनात येत होता. आलोच आहोत तर पाच-दहा मिनिट एक नजर टाकून पुढे जाऊ असा विचार करून आम्ही मंदिर परिसरात दाखल झालो. मंदिर साधारण ५०० वर्षांपूर्वीचे आहे असे सांगतात. काही दंतकथांनुसार महाभारत काळात अर्जुन कैलास पर्वताकडे जात असताना शंकरांनी या ठिकाणी त्याला दर्शन दिले होते व कौरवांवर विजय मिळवाल असा वरही दिला होता. अघांजरचा चा अर्थ पाप नाश करणारा असा आहे असे वाचल्याचे स्मरते. मंदिर सुरेख असून परिसर अतिशय शांत व निर्मळ आहे.

बाबा गंगा भरती यांनी प्रज्वलित केलेली धुनी येथे आहे. ५०० वर्षांपासून ती अखंड तेवत आहे असे सांगतात.

मंदिर धौलाधर (धवलधार) पर्वतरांगेच्या पायथ्याशी असून मागील बाजूस जंगल असून डोंरातून वाहत येणारी नदी आहे.
उतारावरील नदीपात्रात मोठं मोठे खडक आहेत. काही पायऱ्या उतरून तेथे पोहचता येते.

काठावर शंकराची पिंड आहे. दगड धोंड्यांमुळे खळाळत वाहणारे पाणी व त्यातून निर्माण झालेला छोटासा धबधबा खूप सुंदर आहे.

नदीपात्रात उतरून तसेच या खडकांवर बसून सगळ्यांनी खूप धमाल केली. निघावेसे वाटत नव्हते पण अजून पुढची ठिकाणे व प्रवासास वेळ कमी पडू नये म्हणून बाहेर पडलो. स्वत: आयोजित सहलीचा हा मोठा फायदा की जेथे फक्त ५-१० मिनिट वेळ देणार होतो तेथे आम्ही चक्क तासभर वेळ दिला होता.

पुढचे ठिकाण येथून फक्त २-३ किमीवर असलेले नॉर्बुलिन्गका इन्स्टिट्यूट. तिबेटमधे Norbulingka म्हणजे Treasure Garden किंवा समृद्धी बाग .
(ऐतिहासिक बागांसाठी Lingka हा शब्द तिबेटमधील ल्हासा किंवा इतर शहरांमध्ये वापरल्या जातो). तिबेटमधील ल्हासा येथील दलाई लामांचे उन्हाळी निवास्थान 'नॉर्बुलिन्गका' यावरून Norbulingka Institute हे नाव आले आहे.१९९५ मध्ये स्थापित या या संस्थेचा उद्देश तिबेटियन संस्कृतीचे जतन करणे असा आहे.


तिबेटियन कला शिकणाऱ्यांसाठी येथे वर्ग घेतले जातात. तिबेट संस्कृती विषयीचे तीन वर्षांचे उच्च शिक्षणही येथे दिले जाते. सुतारकाम, लाकूड कलाकृती व लाकूड रंगकाम, शिवणकाम, लाकूड व धातू शिल्प , थांका पेंटिंग (बुद्धाच्या जीवनावर आधारित प्रसंग कापडावर चितारने. यांना चौकट करीत नाहीत. वापर नसेल तेव्हा गुंडाळी करून ठेवले जातात) इ. अनेक कला येथे शिकविल्या जातात.

मुख्य मंदिराची इमारत एकमजली असून ती 'Seat of Happiness Temple' नावाने ओळखली जाते. आतमध्ये बुद्धाची चार मीटर उंचीची मूर्ती आहे जी येथले मुख्य शिल्पकार स्व. चेन्मो पेम्बा डोरजे यांनी साकारली आहे. भिंतींवर बुद्ध तसेच चौदावे दलाई लामा यांच्या जीवनावरील अनेक प्रसंग चितारले आहेत.
लॉसेल डॉल म्युझियम: तिबेटी बाहुल्यांचा वापर करून पारंपारिक तिबेटी देखावे सादर केले आहेत.
येथील कारागीर व प्रशिक्षणार्थी यांनी बनविल्या अनेक वस्तू येथील दुकानात विकल्या जातात. यातून होणारा नफा तिबेटी निर्वासितांसाठी मदतीसाठी वापरला जातो.

नॉर्बुलिन्गका संस्था पाहून पुढच्या प्रवासास सुरुवात केली. अकरा किमीवर (साधारण अर्धा तास) अजून एक धार्मिक स्थळ लागले ते म्हणजे 'चामुंडा देवी मंदिर'
मंदिर ७०० वर्ष जुने आहे असे सांगितले जाते असले तरी सध्याचे बांधकाम आधुनिक दिसते. मुख्य मंदिरात चामुंडा देवीची मूर्ती दिसते. (येथे फोटो घेण्यास मनाई आहे) देवीच्या बाजूला हनुमान आणि भैरवाच्या प्रतिमा आहेत.
मंदिराच्या बाजूला काही पायऱ्या उतरून गेल्यावर एक गुहा दिसते जेथे नैसर्गिक दगडी शिवलिंग आहे. लिंगाची नंदिकेश्वर म्हणून पूजा केली जाते,

दर्शन घेऊन बाहेर आलो. चहा, पाणी घेऊन पुढे निघालो. पंधरा मिनिटात (सात किमी) गोपालपूर येथील प्राणी संग्रहालय 'धौलाधर नेचर पार्क' येथे पोहचलो.
सन १९९२ मध्ये स्थापित हे लहानसे प्राणिसंग्रहालय आहे. उद्यान सोमवारी बंद असते. प्रवेश फी थोडी जास्त वाटली.

हिमालयीन काळे अस्वल, सांबर, चित्ते येथे पाहायला मिळतात. लांबपर्यंत जाणाऱ्या एकाच मुख्य रस्त्याचा बाजूला असलेल्या बंदिस्त कुंपणांमध्ये आपल्याला हे प्राणी दिसतात.

प्राकृतिक निसर्ग सौंदर्य वगळता संग्रहालय काही विशेष वाटले नाही. संग्रहालय पाहताना दोन्ही बाजूने दाट झाडी असलेल्या रस्त्याहून फिरतांना चांगले वाटत असले तरी सकाळपासून बरेच चालल्यामुळे कंटाळा यायला सुरुवात झाली होती त्यामुळे लवकरच बाहेर पडलो.

पालमपूर येथील आमचे मुक्कामाचे ठिकाण येथून फक्त १४-१५ किमी अंतरावर होते. अर्ध्या तासात पोहचलो. मॅक्लीऑडगंज ते पालमपूर अंतर फक्त ४५ किमी असले तरी थांबे घेत आल्याने आम्हाला सहा तास लागले होते. आज पाहिलेली सर्व ठिकाणे धर्मशाळेत राहूनही करता येणे शक्य आहे. तरीही एका वेगळ्या ठिकाणचे वास्तव्य, वेगळे वातावरण अनुभवता यावे म्हणून मुक्काम हलवला होता.
आमचे हॉटेल म्हणजे एक 'होम स्टे' असलेला स्वतंत्र बंगला होता. हॉटेलचे नांव 'रुपायन होम स्टे '. बंगल्यात पाच खोल्या असून बंगल्याच्या बाजूला अजून तीन कॉटेज आहेत.बंगल्यात १५-२० जण व इतर कॉटेजमध्ये १०-१२ जणांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. आम्ही फक्त १२ जण असल्याने बंगल्यात प्रत्येक खोलीत दोघे व एका फॅमिली कॉटेजमध्ये आम्ही दोघे अशी ऐसपैस व्यवस्था झाली.

सर्व सामान ज्याच्या त्याच्या रूमवर पोच झाल्यावर ताजेतवाने होऊन परत बाहेर पडलो. आजची संध्याकाळ पालमपूर पासून पाच किमीवरील 'सौरभ वनविहार' ला घालविण्याचे ठरवले. क्वाथ (Kwath) या छोट्याशा गावातील न्यूगल खडच्या किनारी असलेल्या या विहारला आम्ही १५-२० मिनिटात पोहचलो. (स्थानिक भाषेत नदीला खड म्हणतात). प्रवेश फी प्रत्येकी २०/- रु. आहे.

उद्यानात पांढऱ्या रंगाचे मोठे मोठे खडक असून फिरण्यासाठी छोटे छोटे दगड्गोटे वापरून केलेल्या पायवाटा आहेत.

हे उद्यान १९९९ च्या कारगिल युद्धात हुतात्मा झालेले कॅ. सौरभ कालिआ यांना समर्पित आहे. १९७६ ला जन्मलेल्या कॅ. सौरभ यांचे शिक्षण पालमपूर झाले. येथील शेतकी महाविद्यालयातून १९९७ मध्ये त्यांनी पदवी घेतली होती. त्यानंतर ते सैन्यात भरती झाले. कारगिल युद्धाच्या वेळी सीमा रेषेवर गस्त घालीत असतांना यांच्यासहित सहा सैनिक शत्रूच्या ताब्यात सापडले. २२ दिवस त्यांचा अतोनात छळ करण्यात आल. वयाच्या अवघ्या २३ वर्षी व्या वर्षी त्यांना वीर मरण आले त्यानंतर ९ जून १९९९ रोजी त्यांचे पार्थिव भारतीय लष्कराला सोपविण्यात आले.

पुढे आल्यावर एक तलाव आहे व त्यात बोटिंगची सुविधा आहे. तलावावर एक सुंदर पूल आहे. त्याच्या बाजूलाच कारगिल युद्धाचा देखावा साकारला आहे. मोठे मोठे खडक त्यामागे लपलेले भारतीय आणि पाकिस्तानी हत्यारी सैनिक, प्रत्यक्ष लढाई सुरु आहे असा प्रसंग बघून कोणालाही स्फुरण चढावे असा देखावा.

सर्व फिरून उद्यानाच्या बाहेर आलो. नदी पार करून ज्या नवीन पुलावरून आमची गाडी आली होती त्याला समांतरच तारेच्या दोरखंडांनी पेललेला जुना झुलता पूल आहे. अनेक वर्ष दोन तीरांवरील अनेक गावांना जोडणारा हा अतिशय महत्वाचा पूल होता. सध्या फक्त पादचारी पूल म्हणून याचा वापर होतो. पुलावरून नदी, धौलाधर पर्वत यांचे नयनरम्य दर्शन होते.

आजच्या दिवसातील आमचे हे शेवटचे ठिकाण होते त्यामुळे घाई नव्हती. नदी पात्रातील खडकांवर पाण्यात पाय सोडून बसलो. दिवसभराचा सर्व थकवा क्षणात विसरलो. हळूहळू सर्वजण वय विसरून बालपणात गेले. एकमेकांवर पाणी उडव, कुणाला पाण्यात ढकल असे खेळ सुरु झाले.

आज सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेला वाहत्या पाण्यात खेळायची मजा सर्वांनी अनुभवली. अंधार पडायला सुरुवात झाली आणि आम्ही हॉटेलवर जाण्यासाठी परत फिरलो.

क्रमश:

प्रतिक्रिया

खुप छान ठिकाणं आहेत.कलाकुसरीत रमलेले कलाकार आणि त्यांची कलाकृती मस्त फोटोज्!पहिला फोटो पाहून आता लगेच त्या घरी जावं वाटतंय :)

श्वेता२४'s picture

30 Dec 2022 - 8:31 pm | श्वेता२४

हॉटेलच्या मागे दिसणाऱ्या पर्वतरांगांचे फोटो ,पर्वतातून येणारी नदी व मध्ये असलेले शिवलिंग ,सर्वच ठिकाणे व त्यांचे केलेले विस्तृत वर्णन ,खूपच छान वाटला हा भाग.

प्रवास वर्णन छान लिहीत आहात. शेवटच्या भाग झाल्यावर पूर्ण प्रवासाची सूची द्या ही आग्रहाची मागणी... तुमच्या सूची चा वापर करून पुढची मंगळी प्रवासाचे नियोजन करतील.

कंजूस's picture

31 Dec 2022 - 10:03 am | कंजूस

वर्णन आणि फोटो आवडले.

कर्नलतपस्वी's picture

31 Dec 2022 - 2:02 pm | कर्नलतपस्वी

मस्त.

प्रचेतस's picture

2 Jan 2023 - 8:54 am | प्रचेतस

हा भागही मस्त.
तुमची राहण्याची ठिकाणं अफलातून आहेत. चामुंडा देवी मंदिर आवडले. हिमाचलच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी तिथे जायलाच हवे.

टर्मीनेटर's picture

9 Jan 2023 - 1:59 am | टर्मीनेटर

मस्त 👍
डलहौसी-धरमशाला ट्रिपच्या आठवणी ताज्या झाल्या ह्या भागाच्या निमित्ताने!
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत...

चित्रगुप्त's picture

15 Jan 2023 - 10:28 am | चित्रगुप्त

वर्णन आणि फोटो दोन्ही छान.
तळ्यातील शंकराची मूर्ती आणि उभा मारुती यांच्या फोटोंच्या मधल्या फोटोत डावीकडे एक पूल दिसतो आहे, त्याविषयी कुतूहल वाटले. हा पूल कश्याचा आणि केंव्हा बनलेला आहे ?त्याचे आणखी फोटो असल्यास टाकावेत.
.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2023 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन माहितीपूर्ण आहे. चित्रेही छान आहेत. आपलं लेखन आठवणीने वाचत आहे. पोच.
लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

गोरगावलेकर's picture

19 Jan 2023 - 10:55 pm | गोरगावलेकर

@Bhakti, श्वेता२४ : प्रतिसादाबद्दल धन्यवाद

@ सुखी:प्रवासाचा बहुतेक तपशील प्रत्येक भागात देतच आहे. मुक्कामाची ठिकाणे, रोज बघत असलेली पर्यटन स्थळे, वेळ, अंतर इ. सर्व अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री हॉटेलवर परत येईपर्यंतच्या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न निश्चितच आहे. तरीसुद्धा आपण सांगितल्याप्रमाणे संपूर्ण सहलीचा कार्यक्रम (Itinerary) शेवटच्या भागात निश्चित देईन.

@कंजूस, कर्नलतपस्वी:प्रतिसादाबद्दल धन्यवाद

गोरगावलेकर's picture

19 Jan 2023 - 10:57 pm | गोरगावलेकर

@प्रचेतस:अभिप्रायाबद्दल धन्यवाद

@टर्मीनेटर: पुढिल भागास काही कारणाने थोडा उशीर झाला आहे पण येतो आहे लवकरच

@चित्रगुप्त:मंदिर परिसरातीलच हा पादचारी पूल आहे. नदीपलीकडल्या धार्मिक विधी/अंत्यविधी ठिकाणास जाण्यासाठी याचा उपयोग होतो.

@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे: धन्यवाद सर.