----
संदर्भ
ही लेखमाला "The Art of Living" या पुस्तकाचा परिचय/भाषांतर म्हणून लिहिली आहे.
ते इंग्रजी भाषेतील पुस्तक इथे PDF स्वरूपात वाचता येईल:
The Art of Living
----
पूर्वचित्र (flashback)
कॉलेजचे दिवस. रविवार संध्याकाळ. मेसला सुट्टी. जे एम रोडला कामत किंवा तत्सम हॉटेलमध्ये जेवण उरकून, आमच्या होस्टेलसमोरच्या असोसिएशन फॉर मेकॅनिकल इंजिनिअर्स (AME) च्या इमारतीत, दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये, पुस्तक प्रदर्शन पाहण्यात, पुढचा एक दोन तास वेळ कसा जायचा, ते कळायचं नाही.
अशाच एका रविवारी संध्याकाळी "The Art of Living", मूळच्या "Un art de vivre" या फ्रेंच पुस्तकाचं (लेखक Andre Maurois) इंग्रजी भाषांतर (अनुवादक James Whitall) असलेलं पुस्तक सापडलं. १९४० मधे मूळ फ्रेंच मधील पुस्तक आणि १९४४ मधे इंग्रजी भाषांतराची पहिली भारतीय आवृत्ती. प्रदर्शनात सापडलेलं ते पुस्तक, त्याकडे लक्ष जावं, इतकं जुनं वाटत होतं. शिवाय सवयीप्रमाणे पुस्तक वरवर वाचून उत्सुकताही निर्माण झाली होती.
सुरुवातीला पुस्तक थोडंसं वाचलं गेलं, बरीच वर्षे ते फक्त जपलं गेलं, मात्र पूर्ण कधीच वाचलं गेलं नाही, आणि गेल्या काही वर्षांपूर्वी ते घरातूनच हरवलं. सौं नी आवराआवरीत ते रद्दी समजून निकालात काढलं असावं, अशी माझी दाट शंका.
मधल्या काळात त्या पुस्तकाचं नावही विसरलो. त्यामुळे इंटरनेटवर शोधण्याचा प्रश्नच नव्हता. पण काही दिवसांपूर्वी अचानक साक्षात्कार झाला आणि "The Art of Living" हे पुस्तकाचं शीर्षक आठवलं. लगेच इंटरनेटवरून शोधून काढलं. आणि उजळणी करत हा पुस्तक परिचय (खरं तर भाषांतर) लेख लिहायला घेतला.
----
लेखकाने हे पुस्तक निबंध संग्रह स्वरूपात लिहिताना जगण्याच्या कलेचा विविध बाजूंनी विचार केला आहे.. प्रेम, लग्न, कौटुंबिक जीवन, मैत्री, विचार, काम, नेतृत्व, म्हातारपण, आनंद.
गंमतीशीरही वाटेल आणि विचारही करायला लावेल अशी गोष्ट म्हणजे, लेखकाने आनंद पुस्तकाच्या सर्वात शेवटी नेऊन ठेवला आहे, आणि प्रेम अगदी सुरुवातीला.
सर्व नऊ विषयांवर लेखकाने त्या त्या विषयाची व्याख्या, विवेचन, साहित्यिक दाखले अशा स्वरूपात लिखाण केलं आहे.
पुस्तकातील मर्म एका साध्या लेखात मांडणं अशक्य, आणि प्रत्येक वाचकाचं आकलनही अद्वितीय. तरीही इथे पुस्तकातील निवडक विचार थोडक्यात लिहिण्याचा (खरं तर, भाषांतराचा) प्रयत्न केला आहे.
----
प्रेम
"मी प्रेमात पडलं पाहिजे का?" हा प्रश्न कधीच विचारू नये, त्याचं उत्तर स्वतःच्या मनातच जाणवायला हवं. कारण प्रेम ही एक सहज, नैसर्गिक अनुभूती आहे.
समोरच्या व्यक्तीचं समोर नसणं हे प्रेमाला पूरक असतं.तत्वज्ञ Alain म्हणतो की:
स्त्रीची खरी शक्ती तिच्या उशीरा येण्यात किंवा अनुपस्थितीत असण्यातच असते
माणूस समोर आलं की त्याच्या कमकुवत बाजू लपून राहू शकत नाही. पण समोर नसल्यावर मात्र आपण एक काल्पनिक, हवीहवीशी अशी प्रतिमा तयार करतो. Stendhal याला crystallization म्हणतो. (नेमका हाच शब्द का, याचीही एक वेगळीच कथा आहे, ती इथे वाचता येईल: crystallization)
आपण वास्तवातल्या माणसापेक्षा त्याच्या प्रतिमेच्याच अधिक प्रेमात पडतो. समोर नसताना एखादी व्यक्ती आवडणं खूप सोपं असतं, सोबत राहत असलेल्या व्यक्तीपेक्षा. कदाचित त्यामुळेच Byron म्हणतो की:
स्त्रीच्या प्रेमात मरणं एकवेळ सोपं आहे, तिच्यासोबत राहण्यापेक्षा!
मैत्रीत, प्रेमात आपल्याला अशा व्यक्तीच्या सहवासात राहायला आवडतं, जिच्यासमोर आपल्याला कुठलाही आव आणण्याची गरज पडत नाही, किंवा आपल्या कमीपणाची लाज वाटत नाही, किंवा जिच्यासमोर आपले मनातले विचार अगदी सहजतेने व्यक्त करू शकतो.
स्त्रीचा स्वभाव समुद्राच्या लाटांसारखा लहरी असतो पण सुज्ञ पुरूष वादळात सापडलेल्या जहाजाच्या खलाशाप्रमाणे जहाजाचे शीड सैल सोडून देतो, वाट पाहतो, आशा सोडत नाही आणि महत्वाचं म्हणजे या वादळातही समुद्रावरचं त्याचं प्रेम तो जपून ठेवतो.
शेवटी महान संगीतकार Mozart च्या शब्दात:
संगीत मैफिलीला जा; आणि ते शुद्ध स्वर आणि ती मोहक सुरांची गुंफण ऐका. आणि जर त्यानंतरही ती संगीतरचना तुम्हाला गोंधळलेली, कठोर आणि विसंवादी भासली, तर तुम्ही अजूनही प्रेम अनुभवलंच नाही!
परंतु, जर तुमच्या भावनांमध्ये, तुम्हाला सौंदर्याच्या हळूहळू प्राप्तीची; अद्भुत सामंजस्याची; विरोध आणि संघर्ष स्वरांची, सर्व विसंगती पार असणारी, एक उदात्त तडजोड जाणवत असेल, तर तुम्ही आयुष्यातील काही मोजक्या साहसी प्रवासांपैकी एक, अशा प्रवासास सुरुवात केली आहे, तो प्रवास म्हणजे, प्रेम!
----
प्रतिक्रिया
1 Dec 2022 - 10:55 am | कुमार१
+11
1 Dec 2022 - 11:25 am | श्वेता२४
आपण वास्तवातल्या माणसापेक्षा त्याच्या प्रतिमेच्याच अधिक प्रेमात पडतो. समोर नसताना एखादी व्यक्ती आवडणं खूप सोपं असतं, सोबत राहत असलेल्या व्यक्तीपेक्षा. कदाचित त्यामुळेच Byron म्हणतो की:
स्त्रीच्या प्रेमात मरणं एकवेळ सोपं आहे, तिच्यासोबत राहण्यापेक्षा!
हे खूप आवडलं. मला नेहमी वाटतं प्रेमात पडणं खूप सोपं आहे. परंतू प्रेम निभावणं खूप कठीण. त्यामुळे जो व्याक्ती प्रेम निभावतो म्हणजेच त्या व्यक्तीच्या दोषांसहीतही त्याच्यावर प्रेम करत राहतो त्यालाच मी प्रेम केलं म्हणण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं.
पुस्तक परिचय छान करुन दिलात. कधितरी नक्की वाचेन. वा.खू. साठविली आहे.
6 Mar 2023 - 12:57 am | श्रीगणेशा
धन्यवाद श्वेता२४ _/\_
आठ दशकांपूर्वी लिहिलेलं हे पुस्तक, पण त्यातील बऱ्याच गोष्टी कालातीत आहेत!
26 Feb 2023 - 8:05 am | कर्नलतपस्वी
गणेशा, मुळ भावनांना धक्का न लावता इतर भाषेत अनुवाद करणे सुद्धा एक कला आहे. मुळ भाषेतील भाव व त्यांना जसेच्या तसे अनुवादित करण्यासाठी अनुवादित भाषेचे नेमकेच शब्द शोधून वाचकांपर्यंत पोहोचवणे अतीशय अवघड आणी यातच अनुवादकाचे कौशल्य आहे. ते वाचकाला प्रतित झाले की अनुवाद मुळ पुस्तका इतकाच प्रसिद्ध होतो. नेमकी हिच गोष्ट इथे दिसून आली.
स्त्रीचा स्वभाव समुद्राच्या लाटांसारखा लहरी असतो पण सुज्ञ पुरूष वादळात सापडलेल्या जहाजाच्या खलाशाप्रमाणे जहाजाचे शीड सैल सोडून देतो, वाट पाहतो, आशा सोडत नाही आणि महत्वाचं म्हणजे या वादळातही समुद्रावरचं त्याचं प्रेम तो जपून ठेवतो
6 Mar 2023 - 1:12 am | श्रीगणेशा
धन्यवाद कर्नल साहेब _/\_
खरं तर, पुस्तक परिचय, एवढी माफक अपेक्षा ठेवून सुरुवात केली होती. पण जगण्याच्या कलेवरील एवढं चांगलं लिखाण, मराठीत विचार करताना अजूनच चांगलं वाटलं.
पण अनुवाद करताना मागे राहिलेले, शब्दांच्या यांत्रिकतेचे काही खड्डे बुजवणं अवघड!
26 Feb 2023 - 10:29 pm | चित्रगुप्त
या भागापासून लेखमाला वाचायला घेतली आहे. जसजसे काही शंका वा मुद्दे उपस्थित होत जातील, तसतसे व्यक्त करत जाईनः
१. शीर्षकात The Art of Living हे शब्द आल्याने ही लेखमाला श्री श्री रविशंकर प्रणित कार्पोरेट अध्यात्माचा प्रचार करणारी असावी असे वाटून वाचायला घेत नव्हतो (मी त्या महागड्या कार्पोरेट कार्यक्रमात दोनदा सहभागी झालेलो असूनही/असल्यामुळेच) तेंव्हा माझ्यासारखाच इतरांचाही असा समज होऊ नये म्हणून शीर्षकात आवश्यक बदल करता आल्यास उत्तम.
२. मोझार्ट (१७५६-९१) च्या काळापर्यंत जे संगीत युरोपीयन रसिकांना उपलब्ध होते, त्याच्या संदर्भात हे विधान उचित असले, तरी अलिकडल्या काळात जगभरात संगीताची अवनती होऊन जो घणाघाती कर्कश्यपणा, निरर्थकता, गोंधळ, विसंवाद, सवंग बाजारूपणा वगैरे ज्या गोष्टी रूढ झालेल्या आहेत, त्या बघता मोझार्टचे हे विधान कालबाह्य झालेले असल्याचे खेदाने म्हणावे लागेल.
३. शेवटल्या परिच्छेदातील 'एक उदात्त तडजोड' हा शब्दप्रयोग अगदी आंग्ल वळणाचा वाटला, आणि त्यातून काही अर्थबोध मलातरी झाला नाही. 'एक दैवी अनुभूति' किंवा 'निखळ सौदर्यानुभूति' असे काही म्हणायचे आहे का ?
बाकी लेखमाला वाचनीय आणि उद्बोधक होईल, याची खात्री वाटते.
Amadeus या मोझार्टच्या जीवनावरील अद्भुत चित्रपटातील एक दृष्य.
(Mozart and Salieri हे नाटक प्राख्यात रशियन लेखक Alexander Pushkin याने १८३२ मधे प्रसिद्ध केले होते. त्यावरून प्रेरणा घेऊन Peter Shaffer याने 1979 साली 'Amadeus' नामक नाटक लिहीले, आणि 1984 साली चित्रपट निर्माण करण्यात आला. या चित्रपटाला ८ ऑस्कर आणि अन्य अनेक महत्वाची पारितोषेके लाभली आहेत.
संगीतप्रेमी आणि सिनेरसिकांनी Amadeus हा चित्रपट अवश्य बघावा.
6 Mar 2023 - 1:58 am | श्रीगणेशा
धन्यवाद _/\_
6 Mar 2023 - 1:52 am | श्रीगणेशा
धन्यवाद चित्रगुप्त सर _/\_
१) The Art Of Living म्हटलं की साहजिकच अध्यात्माची जाहिरात समजून दुर्लक्ष केलं जाईल ही शक्यता गृहीत धरली होती.
पुढील लेखात शीर्षक नक्की बदलेल. धन्यवाद सुचनेबद्दल.
३) "एक उदात्त तडजोड" हा "sublime reconciliation" साठी केलेला अनुवादाचा प्रयत्न: