श्री गणेश लेखमाला २०२३

1

नगर - पुणे रस्ता : मृत्यूचा सापळा

उगा काहितरीच's picture
उगा काहितरीच in काथ्याकूट
16 Aug 2022 - 8:29 am
गाभा: 

काल नगर ते पुणे असा प्रवास झाला. अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागेल अशी परिस्थिती आहे. या आधी पण बरेच वेळा हा प्रवास केलेला आहे, प्रत्येक वेळी परिस्थिति अजूनच गंभीर होत आहे असं वाटत आहे. प्रत्येक वेळी १-२ नुकतेच झालेले अपघात दिसतातच. यावेळी पण अपवाद नव्हताच. जेमतेम ११०-१२० किमी अंतर असलेला हा रस्ता पण इतका असुरक्षित का असावा? माझ्या थोड्याशा अनुभवातून मला काही कारणं दिसली.

१. खूप जास्त रहदारी : पुण्यापासून इतर ठिकाणी जाण्यासाठी जितके रस्ते आहेत त्यात निदान मलातरी नगर - पुणे इथेच सगळ्यात जास्त वाहतूक वाटली. पुणे - सोलापूर, पुणे - बेंगलोर ,पुणे - ताम्हिणी अशी तुलना केली तर हे प्रकर्षाने जाणवेल. पुणे - मुंबई कदाचित जास्त वाहतूक असेल पण जुना महामार्ग व एक्स्प्रेस हायवे असे पर्यायी मार्ग आहेत. मला तरी या मार्गाचा जास्त अनुभव नाही आहे.

२. खूप जास्त फाटे : नगर वरून पुण्याला येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप जास्त फाटे लागतात. कोण कुठून कसं येईल किंवा कोण कुठून कसं जाईल याचा अंदाज लावणे जवळजवळ अशक्य आहे. समोरच्या वाहनाने इंडिकेटर मारला तरी आपली लेन बदलता येणे शक्य होईल का नाही हे नशिबावरच अवलंबून आहे.

३. पूल नसणे : सगळी वाहतूक एकच मुख्य रस्त्यावरून जाते कुणाला कुठेही जायचं असो पूल अजिबातच नाही आहेत. सर्व्हिस रोड वगैरे तर आनंदच आहे. U टर्न मारायचा तरी मुख्य रस्त्यावरूनच पुलाच्या खालून / वरून असा काहीच प्रकार नाहीये.

४. बाईक/ ऑटो : या रोड वर बाईक वाल्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. आणि ८० % बाईक वाले हेल्मेट वापरत नाहीत. (माझा observation आहे विदा नाहीये माझ्याकडे) हेल्मेट शिवाय बॅग/ लहान मूल घेऊन २-३ जण एकाच बाईक वर जण्याइतका कॉन्फिडन्स असा येतो हे निदान मला तरी उमगले नाही. पुणे जवळ जवळ आले की ६ सिटर / ऑटो यांचे प्रमाण खूप जास्त वाढते. एक तर हे कुठेही थांबणार त्यात कुठूनही घुसू पाहणार आणि वर कुठंही वळणार.

५. जड वाहतूक : जड वाहतूक रात्री १० नंतर वगैरे नियम या रस्त्या साठी आहेत का नाहीत अशी शंका यावी एवढी जास्त जड वाहतूक या रस्त्यावर असते. २०-३० चाकी लांब लांब ट्रक बाईक वाल्यांमुळे उजव्या मर्गिकेतून जात असतात. ओव्हरटेक करायचं तर १०-१५ मिनिटं तर लागणारच लागणार.

६. पाऊस : पावसाचे पाणी कधी उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला साचलेले असते. उजव्या मार्गिकेतून जाताना समोरून येणाऱ्या वाहनांमुळे कधी पाणी उडून आपल्या गाडीचा अभिषेक होईल काही सांगता येत नाही. असे पाणी उडाले की १-२ मिनिटांसाठी तरी काहीच दिसू शकत नाही.

७. डीव्हायडर : रस्त्याच्या मधोमध जे डीव्हायडर आहेत ते कधी संपतात आणि कधी चालू होतात ते कळणे खूप अवघड आहे. मी स्वतः ३-४ अपघात बघितले त्यात वाहन या डीव्हायडरला धडकले होते.

अजूनही बरेच करणे असतील. माझ्या मर्यादित अनुभवावरून मला हे कारणे सुचले. लवकरात लवकर हा रस्ता मोठा व सुरक्षित व्हावा हीच अशा करून आवरते घेतो.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

16 Aug 2022 - 9:50 am | चौथा कोनाडा

नगर हे पुण्याचे उपनगर आहे यात सर्व काही आलेच !

विजुभाऊ's picture

17 Aug 2022 - 9:53 am | विजुभाऊ

अ. नगर हे जिल्ह्याचे ठिकाण पुण्याचे उपनगर कधीपासून झाले?

चौथा कोनाडा's picture

17 Aug 2022 - 5:48 pm | चौथा कोनाडा

आम्ही गंमतीने असे म्हणतो ...
&#128512 &#128512 &#128512
पुण्यातले उद्योग, उपउद्योग शिक्रापुर-रांजणगाव-कारेगाव इथं पर्यंत तर पसरलेले आहेत, (शिरुर पर्यंत विरळ होतात) इथले आणि नगरचे लोक पुण्यात भरपुर येजा करत असतात !

सहमत. माझ्या मते मुद्दा २ आणि ७ हे अपघात होण्याच्या सर्वाधिक कारणांमधे असेल.

चौथा कोनाडा's picture

16 Aug 2022 - 10:06 pm | चौथा कोनाडा

बरोबर मु क्र ७.

डिव्हायडर कुठे सुरू होतो किंवा संपतो हे कळण्यासाठी मोठी खूण खुपच आवश्यक आहे. ही खूण तज्ज्ञांशी चर्चा करून प्रमाणित करणे गरजेचे आहे. गडकरी साहेब इकडे लक्ष देतील का ?

सर टोबी's picture

16 Aug 2022 - 12:25 pm | सर टोबी

नगर रस्त्यापेक्षा बंगळुरू महामार्गावर कितीतरी जास्त प्रमाणात वाहतूक असते. तो महामार्ग अगदी शास्त्रशुद्ध पध्धतीने बांधला आहे. गावाच्या जवळ महामार्ग आणि गाव याच्या दरम्यान लोखंडी कठडे, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस जाण्यासाठी पुलाखालून रस्ता अशा चांगल्या सुविधा आहेत. किरकोळ बेशिस्ती सोडली तर लोकं देखील या सुविधा चांगल्या प्रकारे वापरतात असा अनुभव आहे. फक्त गावाच्या जवळ दिव्यांचा प्रकाश अतिशय कमी असतो. त्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या गावकऱ्यांना अपघात होण्याची शक्यता असते.

नगर रस्त्यावर अशा सुविधा नाहीत हे कबुल केले तरी गावकऱ्यांचा बेशिस्तपणा डोळ्याआड करता येणार नाही. लोकं मैलोन मैल उलट्या बाजूने प्रवास करतात, रस्त्यालगत बाजार भरतो, लग्नाची मिरवणूक चालते आणि याचा सर्वाधिक त्रास तेथे कायम राहणाऱ्या लोकांनाच होतो हे तेथील स्थानिकांना कळत नाही असे दिसते.

सातारा रस्त्यावर रांजणगावच्या तुलनेत प्रचंड मोठी अशी औद्योगिक वसाहत आहे. तिथे कधी खंडणीखोरी होण्याच्या तक्रारी आल्या नाहीत पण रांजणगाव आणि परिसरात तशा तक्रारी येतात. आता हा रस्ताच वाघोली पासून शिरूर पर्यंत उन्नत करण्याच्या बातम्या आहेत. बघूया त्याने काय फरक पडतो ते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Aug 2022 - 1:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

आठवडे बाजार, रस्त्यावर होणारी लग्ने, स्थानिकांची प्रचंड मग्रुरी, टोलनाक्यावर होणारी लुटमार आणि भांडणे इत्यादी कारणांमुळे हा रस्ता वहातुकी साठी प्रचंड असुरक्षीत आहे.

प्रतिसादातील फक्त खालील वाक्या बद्दल साशंक आहे.

सातारा रस्त्यावर रांजणगावच्या तुलनेत प्रचंड मोठी अशी औद्योगिक वसाहत आहे

रांजणगाव येथेच अनेक दिग्गज कंपन्यांचे मोठमोठाले कारखाने आहेत. बाकी वाघोली, केसनंद, कोंढापुरी इत्यादी ठिकाणी असलेली गुंतवणूक लक्षात घेतली नाही तरी रांजणगावातली औद्योगीक वसाहत सातारा रस्त्या पेक्षा फारच जास्त मोठी आहे असे वाटते.

संध्याकाळी जनरल शिफ्ट सुटायच्या वेळेला नुसत्या रांजणगावातुन किमान १५० ते २०० बसेस बाहेर पडत असाव्या. बाकी शिफट मधे पण थोड्या फार फरकाने अशीच कामगारांची वहातुक सुरु असते.

जसे हिंजवडी मेट्रो मार्गावर आणली जात आहे तसेच रांजणगाव औद्योगीक वसाहत जर मेट्रोच्या टप्प्यात आली तर रस्त्यावररील वहातुकीचा बराचसा बोजा कमी होईल

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

25 Aug 2022 - 9:21 am | तुषार काळभोर

मागील दहा वर्षांचा नगर रस्त्यावरील रोजच्या प्रवासाचा असाच अनुभव आहे. याच आठवड्यात आमची जनरल शिफ्ट ८:३०-१७:४५ वरून ०८:००-१७:१५ अशी केलीय. १७:३०-१८:०० या दरम्यानची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी. लोणीकंद, मरकळ , शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर सगळीकडे मिळून काहीशे कंपन्या आणि काही लाख नोकरदार येजा करतात.
दर मंगळवारी वाघोलीचा आठवडी बाजार, लग्नाच्या हंगामात रोजच्या वराती, लग्नातील पाहुण्यांच्या गाड्या, फेब्रुवारीच्या शिवजयंती पासून डिसेंबर मधील महापरिनिर्वाणदिनापर्यंत निघणाऱ्या मिरवणुका हे सगळं सोबतीला असतंच.

बाकी खराडी बायपास ते वाघोली या गर्दीला खराडी- कल्याणीनगर - विमाननगर येथील आयटी कंपन्या देखील कारणीभूत आहेत. रोज तेथील लाखभर कर्मचारी संध्याकाळी सहा ते आठ वेळेत नगर रस्त्यावर असतात.
शुक्रवारी बहुतेक सर्व आयटी कंपन्याना सुट्टी होती. आमची बस ४० मिनिटात हडपसरला पोहचली! एरवी ८०-१०० मिनिटे लागतात.

चौथा कोनाडा's picture

25 Aug 2022 - 5:52 pm | चौथा कोनाडा

मी एक दीड वर्षे मोशी, आळंदी, मरकळ, फुलगाव, लोणीकंद मार्गे रांजणगावला जात असे ... आळंदीतील नविन रस्ते बनवण्याचे काम आणि मरकळ घाटातील काही ठिकाणाचे रुंदीकरण यामुळे ड्रायव्हिंग करताना कंटाळायचो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Aug 2022 - 1:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप जास्त फाटे लागतात. कोण कुठून कसं येईल किंवा कोण कुठून कसं जाईल याचा अंदाज लावणे जवळजवळ अशक्य आहे. समोरच्या वाहनाने इंडिकेटर मारला तरी आपली लेन बदलता येणे शक्य होईल का नाही हे नशिबावरच अवलंबून आहे.

आता महाराष्ट्रभर मोठ्या शहरांकडे येणा-या रस्त्यावर हीच अवस्था आहे. एक तर रस्ते गुळगुळीत झाली आहेत आणि वाहनांची संख्याही वाढतच चालली आहे. चारचाकी वाहने शंभरच्या आत वेगाने अशा रस्त्यावर चालतच नाहीत. ऐंशी नव्वदवर दुरच्या प्रवासात कंटाळा येतो. शंभर सव्वाशेच्या स्पीडला, एकाच रस्त्याने उलट येणारे, कोणत्याही बाजुला वळणारे टू व्हीलरवाले, अ‍ॅटोरिक्षावाले (आमच्या औरंगाबादेत तर लैच डोकेदुखी) इंडिकेटर कोणत्याही बाजुला मारणारे आणि कुठेही गरकन वळणारे. चारचाकीला घासून जाणारे, कोपरे ठोकणारे, आपण कितीही शहाण्या माणसासारखी गाडी चालवा. नुसते समोरच नव्हे तर, चोहीबाजुला लक्ष ठेवून आजकाल गाडी चालवावी लागते. कोण कुठून येऊन तुमच्या गाडीच्या ढुंगाला धडकेल हे सांगताच येत नाही.

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

16 Aug 2022 - 4:35 pm | धर्मराजमुटके

विषयाशी सहमत. विशेषतः मुंबईसारखे मोठे शहर सोडून इतरत्र कुठेही गाडी नियमात चालवायची म्हटली तर नियम पाळणाराच मुर्ख ठरतो.

सौंदाळा's picture

17 Aug 2022 - 10:09 am | सौंदाळा

आजचीच बातमी, नगर रस्त्यावर टेंपोच्या अपघातात तिघे ठार

हो, वाचली होती ती बातमी आधी. अतिशय वाईट वाटले त्या कमनशिबी जीवाबद्दल. :(

शाम भागवत's picture

17 Aug 2022 - 2:45 pm | शाम भागवत

आता हा रस्ताच वाघोली पासून शिरूर पर्यंत उन्नत करण्याच्या बातम्या आहेत.

हे होणार होणार असं अनेक वर्षे चालू होतं. पण त्यामुळे चौकातले फ्लाय ओवर्स या रस्त्यावर बांधले गेले नाहीत व चौका चौकात गर्दी तुंबून राहत राहिली. आता मात्र उन्नत मार्ग व्हायचं लक्षण दिसत आहे. दुसरं म्हणजे रिंगरोड पू्र्णत्वास जाईल असही वाटायला लागलंय.

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Aug 2022 - 11:09 am | चेतन सुभाष गुगळे

पुणे शहरातून अहमदनगरकडे जाण्यास एकच मार्ग आहे.

विमान नगर - वाघोली - लोणीकंद - कोरेगाव भीमा - सणसवाडी - शिक्रापूर - शिरूर

पिंपरी चिंचवडकरांना जरा अधिक पर्याय उपलब्ध आहेत.

आळंदी - लोणीकंद मार्गे शिक्रापूर

किंवा चाकण मार्गे थेट शिक्रापूर

अर्थात यापैकी कोणताही पर्याय अवलंबला तरी शिक्रापूरच्या कोपर्‍यावर वाहतूक कोंडी होतेच. नेहमी जाणार्‍यांना साधारणपणे ही कोंडी केव्हा होते याचा अंदाज येत असतो. त्यांनी शिक्रापूर टाळले तर अधिक चांगले.

मी निगडीहून राजगुरुनगर - शिरूर मार्गे अहमदनगर आणि आळेफाटा - टाकळी - अहमदनगर असे पर्यायी मार्ग वापरुन पाहिले आहेत. २० ते २५ किमी जास्त अंतर होते पण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नसल्याने इंधन व वेळेची बचतच झाल्याचा अनुभव आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Aug 2022 - 11:20 am | चेतन सुभाष गुगळे

फक्त ६ च किमी जास्त अंतर घेणारा

https://goo.gl/maps/eM2VirFF7vjfYYt26

हा मार्गदेखील शिक्रापूर (व परिणामी वाहतूक कोंडीदेखील) टाळत थेट शिरूर मार्गे अहमदनगरला पोचवतो.

चौथा कोनाडा's picture

24 Aug 2022 - 12:41 pm | चौथा कोनाडा

उत्तम पर्याय !

सातारा रस्त्याशी तुलना करता नगर रस्ता जवळजवळ सपाट मैदानी भागात आहे. या रस्त्यावर घाट रस्ते /डोंगर नाहीत, त्यामुळे वस्तीच्या वाढीला नैसर्गिक अडथळा असा काहीच नाही. शिवाय वाघोलीला अनेक खाणी आहेत, त्यातून खडी वाह्तुक सतत चालू असते. विमानतळ याच भागात आहे त्यामुळे विमानाने जाउ/येउ बघणार्या सगळ्यांना नगर रस्त्यावर यावंच लागतं. आणि सरतेशेवटी औरंगाबाद, नागपूर वगैरे कडून पुण्यात येणारी वाहतुक नगर रस्त्यानेच येते.

जवळपास दोन महिने बंद असलेला सक्कर चौक रस्ता,नगर(नगर-पुणे हायवे) आज पुन्हा सुरळीत सुरू झाला त्यामुळे इच्छित स्थळी २५ मि.ऐवजी १५मि.पोहचले.नवसाचा एकुलता एक फ्लायओव्हर पुर्ण झाल्यावर बरीच वाहतूक कोंडी कमी होणार आहे,नाहीतर विनाकारण शुक्रवारी, शनिवारी, रविवारी ट्रॅफिक भयानक व्हायचे.
आणि केडगाव(नगर) अलीकडे फाट्यावर औरंगाबादकडे एक रस्ता जातो ,एक रस्ता सोलापूर कडे जातो आणि एक नगर शहरात येतो त्यामुळे शहरातील वाहतूक ताण कमी होत आहे.
मोठा प्रश्न शिरूर पुढे वाघोलीला आहे तिथेही मोठा फ्लाय ओव्हर व्हावा.
तरीही रात्री या रोड त्याची अवस्था पाहता, गर्दी वाहतुकीसाठी धोकादायकच आहे.