पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अळुच्या वड्या बनवायलाच पाहिजेत. या वेळेस मी गुजराती पद्धतीचा अळूच्या पत्र्या असे त्याला म्हणतात अशा ही करायच्या ठरवल्या.
या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेता येईल की इतके दिवस जो माझा पदार्थ चुकत होता, ज्या प्रकारे त्याला लेयर पडत नव्हते .लक्षात आले की जे बेसन पीठ आहे ते घट्ट मळायचे आहे मळायचे म्हणण्यापेक्षा ते त्याचं जे बेसन पीठ आहे ते त्याचा घोळ जो आहे तो घट्ट करायला पाहिजे.
चला तर करूया मग अळूच्या पानाच्या वड्या
पहिल्यांदा अळूची दहा-बारा पाने घ्यायची पाणी स्वच्छ करून घ्यायची आणि त्याची देठे काढून घ्यायची अळुच्या पानांना आता तेल लावून घ्यायचे.
आता बेसन पीठ साधारणतः तीन वाट्या घ्यायचे.
त्यात दोन चमचे मिरची आलं लसूण पेस्ट ,ओवा, तीळ, हळद ,हिंग ,मीठ असे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी टाकत घट्टसर मळून घ्यायचे.
आळूची पानं घशाला खवखवणे म्हणून ती त्रिकोणी असतील असलेली हवी याकडे लक्ष द्यायचे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये चिंच गुळाचा एक छोटी वाटी कोळ घालायचा आहे .
आता आता आळूचे एक पान घेऊन त्यावर हे बेसन पिठाचे घोळ पसरवायचा आहे हातानेच आणि त्यावर दुसरे पान ठेवून तो देखील घोळ त्याच्यावरती पसरवायचा आहे तुम्हाला जेवढे जास्त लेअर्स हवे तेवढे जास्त पाने एकावर एक ठेवत जायच आहे. मी इथे साधारणता तीन पाने एकत्र घेतलेली आहेत.
त्यानंतर याची गुंडाळी करायची आहे .
ह्या अळूच्या पानांची केलेले गुंडाळी आता डायरेक्ट बारीक चिरून तळू शकतो म्हणजे न उकडता ही पहिली पद्धत.
दुसर्या पद्धतीमध्ये आळूची ही रोल केलेली पाने उकडून घ्यायचे. अर्थात शिट्टी न लावता ते भांड्यात किंवा इडली पात्र मध्ये उकडून घ्यायचे.
आता उकडलेली पाने गोलसर चिरून ती खमंग खुसखुशीत डीप फ्राय करून घ्यायचे.
अशा पद्धतीने दोन पद्धतीने अळूच्या वड्या झटपट तयार होऊ शकतात.
अळूच्या देठांची कोशिंबीर
आता आता अशी एक गंमत की अळूच्या देठांचं करायचं काय ?
तर शोधता शोधता एक पारंपरिक रेसिपी सापडली.
यामध्ये पहिल्यांदा आळूच्या देठाचे ज्या शिरा आहेत वरच्या त्या काढून घ्यायच्या, वरचा आवरण काढून घ्यायचे.
ते आवरण काढून घेतल्यानंतर त्याचे एक ते दोन सेंटीमीटर चे तुकडे करून घ्यायचे.
या देठांपासून ही दोन रेसिपीज तयार करू शकतो.
१. ज्या पद्धतीने इतर भाज्या करतो त्या पद्धतीने परतवून हे देठ हलकेसे भाजून परतवून शेंगदाण्याचा कूट घालून भाजी करू शकतो.
२. किंवा याची आपण कोशिंबीर किंवा रायता करू शकतो.
तर मी कोशिंबीर केली यामध्ये ही देठ पाण्यामध्ये उकळून घ्यायची .
उकळलेल्या देठांमध्ये दोन किंवा एक चमचा दही घालायचे आहे.
दोन चमचे दाण्याचा कूट ,मीठ ,साखर (कधीही कोणत्याही लिंबू किंवा दह्याचा वापर केल्यावर एक चमचा साखर घालावी जेणेकरून ती चव जी आहे ती अतिशय आंबट न होता बॅलन्स होते )
आता फोडणीसाठी तेल गरम करायचे.
गरम तेलामध्ये जिरे, हिंग आणि तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि गॅस बंद केल्यावर कोथिंबीर टाकायची चिरलेली कोथिंबीर टाकायची.
ही फोडणी तयार केलेल्या रायत्याला/कोशिम्बीरला द्यायची.
करता करता आणखी एक आठवलं की फ्रिजमध्ये एक वाटी सोललेले डाळिंब आहे आणि मग अचूकच त्याच्यामध्ये मी डाळिंब दाणे टाकले.
अशी ही आळूच्या देठांची अधिक डाळिंबाची कोशिंबीर तयार तुमच्याकडे पेरू, सफरचंद जे फळ असेल ते बारीक चिरून ही तुम्ही ते टाकून ही कोशिंबीर तयार करू शकता.
परंतु ही कोशिंबीर फळांमुळे जास्त वेळ न ठेवता लगेच खावी लागते
अळू वड्या,अळू देठ डाळिंब दाणे कोशिंबीर,घरी बनवलेली पनीर चिली मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
-भक्ती
प्रतिक्रिया
7 Aug 2022 - 3:35 pm | गवि
अळू वड्या उत्तम झालेल्या दिसतात. याचे तयार उन्डे काही दुकानांत मिळतात.
परंतु खरी दुर्मिळ गोष्ट म्हणजे ती देठाची कोशिंबीर. हा पदार्थ लहानपणी अत्यंत आवडीचा. पण तो आता अगदीच विस्मरणात गेला होता. बरे, बनवण्यास फार क्लिष्ट आहे असेही नाही. तेव्हा त्याची आठवण करुन दिल्याबद्दल खास आभार.
यावरुन आठवलेला असाच एक अत्यंत आवडता "बायप्रॉडक्ट" पदार्थ म्हणजे दोडक्याच्या शिरांची चटणी. कटाची आमटीही होते, पण त्याला अगदीच बायप्रॉडक्ट नाही म्हणता येणार.
7 Aug 2022 - 3:44 pm | Bhakti
धन्यवाद गवि!
अगदीच सोपी आहे कोशिंबीर, आतापासूनच नेहमीच करणारं.
दोडक्याच्या शिरांची चटणी सुद्धा खुप सोपी तरीही लोक का करत नाही काय माहिती.
माझ्या लेकीला त्या चटणीचा पोळीवर रोल करून डब्यात देत असते :)
7 Aug 2022 - 4:08 pm | वामन देशमुख
अहो, आमच्या लेखी तर ते बाय-प्रॉडक्ट नव्हे तर मेन-प्रॉडक्ट ऍरेचाच एक भागच असतात!
दोडक्याच्या शिरा, कद्दूची साल, टरबुजाची साल... हे फेकून देणं म्हणजे अन्नदेवतेचा अपमान नाही का?
दोडक्याच्या शिरांचे किंवा कद्दूच्या सालींंचे बारीक तुकडे करून तव्यावर तेलात परतून तीळ, मीठ टाकून तोंडी लावणे म्हणजे स्वर्ग!
टरबूज चिरताना पांढरा सालीच्या भागातून हिरवा भाग काढून टाकून पांढऱ्या भागाचे लहान चौकोनी तुकडे करून चना डाळ घालून किंवा बेसन घालून भाजी केलेली मस्त लागते.
8 Aug 2022 - 11:52 am | टर्मीनेटर
+१०००
आमच्याकडेही आई भोपळ्याच्या सालिंची ह्याच पद्धतीने चटणी बनवते, खूप छान लागते 👍
8 Aug 2022 - 12:10 pm | जेम्स वांड
दोडक्याच्या शिरा, दुधीच्या साली, लाल भोपळ्याच्या साली ह्यांची तीळ अन् हिरव्या मिर्च्या घालून केलेली फ्राय चटणी बेस्ट वाटते खायला.
आमच्याकडे कलिंगडाच्या सालींचा पांढरा भाग चौकोनी तुकडे करून भरपूर लसूण घालून रस्सा भाजी करतात.
7 Aug 2022 - 3:54 pm | वामन देशमुख
अळूच्या वड्या (आणि पातळ भाजी शेंगदाणे गुळ घातलेली भाजी वगैरे) नेहमीच करतो पण अळू देठांची कोशिंबीर माहित नव्हती. पाककृती आवडली करून पाहीन.
---
मराठवाड्यात अळूला चमकोरा म्हणतात, तेलंगणात चामकुरा म्हणतात.
7 Aug 2022 - 3:57 pm | गवि
अळूची पातळभाजी हा अनेकदा पुणेरी लग्नात मेन्यू असतो. ही भाजी म्हणजे एक अफलातून प्रकार आहे. त्यात केळीही चिरुन घालतात सालासकट. आणि आंबटचुकाही.
7 Aug 2022 - 4:00 pm | Bhakti
हेच लिहायला आले होते ;) अळूची भाजी खावी तर पुणेरी लग्नातच !!
7 Aug 2022 - 4:42 pm | वामन देशमुख
मराठवाड्यातील लग्नांमध्ये पारंपरिकरित्या फोडींची भाजी आणि पातळ भाजी हे मानक असते.
सध्या प्रमाण कमी झालंय, पण पातळ भाजी म्हणजे शेंगदाणे, चणाडाळ, गूळ, बेसन वगैरे युक्त चमकोऱ्याची भाजी असेच गृहीत असते; आचाऱ्यांना वेगळे काही सांगायची गरज भासत नाही.
अर्थात केटरिंगच्या पंजाबीकरणामुळे की काय पण हे प्रकार काहीसे मागे पडत चाललेत हे आहेच.
मराठवाड्यात तर लग्नातही आणि अनेकदा घरीही.
😜अवांतर: पालकाच्या (उत्पादनाची सुलभता, वर्षभर एकसारखा पुरवठा, बाजारातील सतत मागणी, कदाचित ग्राहकांची बदलत असलेली मानसिकता इ. कारणे) सतत उपलब्धतेमुळे कदाचित - इतर अनेक भाज्या मागे पडत चालल्या आहेत का?
शेवगा, राजगिरा, चमकोरा, शेपू, करडी, काटेमाट, तांदुळगा, तरवंटा, बारीक घोळ, मोठा घोळ, हादग्याची फुले या पालेभाज्या, वीस वर्षांपूर्वी ज्या प्रमाणात बाजारात विकायला यायच्या / इतरत्र उपलब्ध असायच्या, त्या प्रमाणात आज येतात का? पस्तिशीपर्यंतचे ग्राहक त्या भाज्या (पालक, चुका, अंबाडीच्या तुलनेत) त्या प्रमाणात विकत घेतात का?
7 Aug 2022 - 5:22 pm | Bhakti
मराठवाड्यात तर लग्नातही आणि अनेकदा घरीही.
+१ मराठवाड्यात पातळ भाज्यांमध्ये बेसनाचा मुक्त हस्ते वापर होतो.मलातर त्या भाजीच्या फ्लेवरचे पिठलच वाटतं ;)
होय काहीसं पश्चिम महाराष्ट्रात तरी वाटतयं,पण पालकांचे धपाटे,वडे,भजी,पनीर इत्यादी इत्यादी अनंत प्रकार गृहिणींचा आज काय भाजी करू प्रश्न सोडवतो.
8 Aug 2022 - 1:01 pm | वामन देशमुख
हो, ह्यावर आमच्या घरी अनेकदा मनमोकळी 😉 चर्चा होते!
म्हणजे, पालेभाजीत (किंवा फळभाज्या किसून घातलेल्या भाजीत) किती बेसन घालेपर्यंत ती भाजी राहते आणि मग त्यानंतर ते पिठले बनते?
तीच मूगडाळ / चणाडाळ घातलेल्या पालेभाजीची किंवा फोडभाजीची कथा - डाळ किती घालेपर्यंत ती भाजी राहते आणि मग त्याची डाळ बनते?
---
अवांतर: किचनमध्ये काहीबाही करणारा नवरा हा बायकोची डोकेदुखी असतो का? 🤔
8 Aug 2022 - 8:07 pm | Bhakti
किती बेसन घालेपर्यंत ती भाजी राहते
हल्ली बेसनला पर्याय म्हणून ओट्स पावडर वापरली जाते.डायटही मोडत नाही.
8 Aug 2022 - 8:31 pm | धर्मराजमुटके
दु:ख म्हातारी मेल्याचं नसतं हो ! काळ सोकावतो त्याचा त्रास होतो.
आपण अवाजवी मसाले, इतर पदार्थ वापरुन मुळ पदार्थाची चव हरवून बसतो त्याबद्ल वाईट वाटते.
8 Aug 2022 - 8:34 pm | गवि
बेसनाऐवजी ओट्स पावडर? काय हो हे.
यांचे खाते गोठवा रे.
;-)
7 Aug 2022 - 5:48 pm | कर्नलतपस्वी
शेवगा, राजगिरा, चमकोरा, शेपू, करडी, काटेमाट, तांदुळगा, तरवंटा, बारीक घोळ, मोठा घोळ, हादग्याची
पिझ्झा बर्गर के जमाने मे मेथी पालक ला कोण विचारतो.
लहानपणीच्या भाज्याही नाही आणी बनवणारे सुद्धा.
8 Aug 2022 - 12:01 am | धर्मराजमुटके
हेच म्हणतो. भाज्या तर सोडा अजून ५-१० वर्षात बाजरी / ज्वारी / नाचणी ची भाकरी बनविता येणारी स्त्री देखील जाहिरात देऊन शोधावी लागेल.
7 Aug 2022 - 4:01 pm | Bhakti
चमकोरा +१
धन्यवाद वा दे.
7 Aug 2022 - 5:52 pm | कर्नलतपस्वी
उत्तर भारतात आळूला अरबी म्हणतात. याच्या कंदाची भाजी करतात. नव्या बटाट्या सारखी लागते. याची तवा सब्जी भारीच लागते.
आळू वडी,भाजी,फदफदं ऑल टाईम फेव्हरेट.
7 Aug 2022 - 5:57 pm | Bhakti
+१ आता अळूचा कंद मिळवणं आलं :)
7 Aug 2022 - 6:33 pm | तुषार काळभोर
अळूच्या वड्या आणि फतफतं दोन्ही अगदीच आवडते!
आम्ही उकडलेले अळूच्या पानांचे रोल्स पण आवडीने खातो.
सेम कोथिंबीर वड्यांचे देखील. तळून कुरकुरीत वड्या खायच्याच. पण त्याआधी उकडलेले रोल्स पण बाजूला ठेवायचे. तेसुद्धा सगळे आवडीने खातात.
7 Aug 2022 - 11:46 pm | धर्मराजमुटके
मी पण अळुच्या आणी कोथींबिरीच्या न तळलेल्या वड्या आवडीने खातो. मुंबई पुणे हायवेवर श्री दत्त मधे मिळणारी कोथींबिर वडी पण पुर्वी छान असायची पण ती कोथींबीर वडी म्हणजे कोथींबिर कमी आणि बेसन पीठ जास्त असे प्रमाण असते. घरी होणार्या वड्यांत बेसन पीठ नावालाच असते त्यामुळे कोथिंबीरीचा अस्स्ल स्वाद जाणवतो.
अवांतर : अळूच्या पत्र्या ? मी अजून तरी "पात्रा" हेच नाव ऐकले आहे.
अळूच्या देठाची कोशींबीर बायकोला करायला लावून खाऊन बघावी लागेल :)
कसयं कामे वाटून घेतलेली बरी. ती बनवायचे काम करील. मी खायचे काम करतो. अगदीच बायकोवर उपकार करायचे ठरल्यास थोडीफार भांडी घासून देता येतील. :)
8 Aug 2022 - 8:37 am | Bhakti
भाजी चिरलेला चौपर,बेसन भाजी भिजवलेले भांडे,वड्या थापायचे भांडे, वाफवायचे पात्र,वड्या कापायचे ताट, तयालची कढई झाऱ्या, खायच्या पाच सहा ताट , वाट्या बस!
महत्वाचे काम ;)
7 Aug 2022 - 6:43 pm | सतिश गावडे
मी शिक्षण संपवून घर सोडून नोकरीला मुंबईला जाईपर्यंत "अळूची भाजी" कधी खाल्ली नव्हती. जेव्हा मी "अळूची भाजी" असे ऐकत असे तेव्हा मला ती अळूच्या कच्च्या फळांची भाजी वाटायची. (होय, अळू नावाचे एक खडबडीत लिंबाच्या आकाराचे फळ असते जे पिकल्यावर चवीला तुरट लागते).
जेव्हा मी ही भाजीची पाने पाहीले तेव्हा लक्षात आले की हे वेगळे अळू आहे. आणि या अळूचे आमच्या गावी पावसाळ्यात शेणकीच्या बाजूला किंवा गवंडात उगवणार्या "तेरीशी" प्रचंड साम्य आहे. फकत अळूची पाने गडद हिरव्या काळपट रंगाची तर तेरीची पाने पोपटी रंगाची असतात. तेरीची भाजी घशाला खवखवते आणि खाल्ल्यानंतर सर्दी होण्याची शक्यता असते. मात्र आमच्याकडे जन्माष्टमीच्या आणि गणपतीच्या नैवेद्याच्या जेवणात तेरीची भाजी हमखास असते.
थोडी अधिक माहिती काढल्यावर कळले की भाजीवाली अळू आणि तेरी या एकाच वर्गातील वनस्पती असून तेरीला काही भागात तेर अळू म्हणतात.
या लेखात दिली आहे तशी रेसिपी वापरुन आमच्याकडे पावसाळ्यात "पातवड्या" केल्या जायच्या. आजही करत असतील. मात्र पाने अळूची न घेता "वड्यांची पाने" असतात. ही एका पावसाळ्यात उगवणार्या वेलीची पाने असतात. पावसाळ्यात ही वेल माळरानांच्या टेपर्याच्या कुंपणांवर सर्रास दिसते. या वेलीचे मात्र मूळ शोधण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. :)
शेणकी - गोठ्याजवळ किंवा गावाबाहेर मोकळ्या जागेत गुरांचे शेण साठवण्यासाठी खणलेला साधारण पुरुषभर उंचीचा आणि चार पाच फुट व्यासाचा खड्डा. हे शेण नंतर शेतासाठी शेणखत म्हणून बैलगाडीत भौन शेतात नेले जाते
गवंड - गावातून गावालगतच्या डोंगरावर किंवा शेतीकडे जाणारी चिंचोळी वाट.
टेपरा - एक निवडुंग सदृष्य वनस्पती जी कोकणात नैसर्गिक कुंपण म्हणून पूर्वी लावली जायची.
7 Aug 2022 - 6:57 pm | Bhakti
वाह! कोकणचा देखील अळूचा,तेरीशीचा स्वाद संदर्भ आवडला.नवीनच भारी!
7 Aug 2022 - 8:21 pm | तुषार काळभोर
इकडेही अळूची पाने बऱ्याचदा सांडपाण्यावरच वाढलेली असतात.
8 Aug 2022 - 9:43 am | जेम्स वांड
तुम्ही या वरील फळांबद्दल बोलता आहात काय ? आमच्या गावी एकदा शेणखताच्या ढिगाऱ्याजवळ हा वेल उगवला होता, आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात त्याला असली फळे आली होती, ही फळे सोलता आतमध्ये हिरवट गर अन् बटाटा असावा तसं कडकपण जाणवलं, सुरुवातीला प्रयोग म्हणून मीच एकट्याने भाजी करून खाल्ली, ती बरी लागली जरा, अन् मुख्य म्हणजे जिवंत राहिलो, मग दुसऱ्यांदा घरातील मोठ्या लोकांनी खाल्ली आणि नंतर नंतर पूर्ण घरच्या मंडळींनी खाल्ली आवडली सगळ्यांना, सेम बटाटा टाईप सुकी किंवा रस्सा भाजी होते, नंतर गावातील एका शहाण्या माणसाने ह्या फळाला मटाळू म्हणतात आणि हे फळ iron ने भरपूर असल्यामुळे गर्भार स्त्रिया, लहान मुले, इत्यादींना द्यायची शिफारस खास केली होती.
8 Aug 2022 - 12:57 pm | यश राज
खान्देशात या फळांना पेंड्या असे म्हणतात. आता बाजारात मिळतात की नाही ही कल्पना नाही पण माझ्या लहानपणी हिवाळ्याच्या सुमारास ही फळे बाजारात यायची. फार कमी प्रमाणात या फळाचे उत्पन्न व्हायचे. आणि मुख्यत्वे बाजारात येण्याअगोदर या फळांना अढी मध्ये उकडून मग विक्रेते बाजारात विकायला आणायचे .
बाहेर खरबरीत साल व आत मध्ये उकडलेल्या बटाट्या सारखा मऊ गर. चव गोडसर बटाट्या सारखी पण अप्रतिम ..
नॉस्टॅल्जिया जागृत झाला
8 Aug 2022 - 1:35 pm | प्रसाद_१९८२
अळूचे नाही. अळूचे फळ वेलीवर लागत नसून ते अळीवच्या झाडावर लागते.
इथे खालील दुव्यावर 2:30 नंतर तुम्हाला पाहायला मिळेल.
--
8 Aug 2022 - 6:19 pm | सतिश गावडे
मी उल्लेख केलेले अळूचे फळ हेच आहे. कुणी आवर्जून नाही खात तसे हे फळ.
8 Aug 2022 - 6:16 pm | सतिश गावडे
हे अळूचे फळ नाही, करांदा/करांदे आहे. याचा वेल खूप वाढतो आणि वेलीला भरपूर करांदे लागतात. कोकणात पावसाळ्यात याची मुद्दाम लागवड केली जाते, वेल जरा मोठा झाला की बाजूला उंच बांबू रोवून त्या बांबूवर वेल चढवला जातो. दिवाळीच्या आसापास याची काढणी केली जाते, बाजारातही विकायला असतात.
कोकणात करांदे उपवासाच्या दिवशी रताळ्याला पर्याय म्हणून खातात. थोडेसे मीठ टाकून उकडून शिजलेले करांदे छान लागतात. गोड रताळ्याला हा थोडासा असा चांगला पर्याय असतो.
8 Aug 2022 - 7:19 pm | जेम्स वांड
मी दिलेला फोटो - करांदे
का
प्रसाद ह्यांनी दिलेला फोटो - अळू ?
8 Aug 2022 - 7:42 pm | सतिश गावडे
प्रतिसाद अनाथ झाल्यामुळे तुमचा गोंधळ उडाला असावा.
दोन्ही बरोबर आहे, तुम्ही फोटो दिलेला करांदा आहे आणि प्रसाद यांच्या व्हिडीओत असणारे फळ अळू आहे.
7 Aug 2022 - 6:47 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
7 Aug 2022 - 7:12 pm | यश राज
छान आणि सुंदर रेसिपी.
फोटो छान आणि कोशिंबिर ची पाककृती पण आवडली.
आता अळू मिळवणं आलं आणि बनवणं पण.
7 Aug 2022 - 9:08 pm | वामन देशमुख
बाकी, फोटो आवडले हे सांगायचं राहिलंच.
---
मैत्र जिवांचे मैत्र जेवणाचे...
7 Aug 2022 - 11:57 pm | धर्मराजमुटके
मोठया प्रमाणात नाही मात्र बाजारात भाज्या असतात. थोड्या शोधाव्या लागतात.
शेवग्याच्या शेंगा खाल्यात पण त्याचा पाला अजून तरी माझ्या आला नाही. शोधावा लागेल.
बाकी मेथी, शेपू, पालक, करडई, चाकवत, हरभर्याच्या पाल्याची भाजी, लाल माठ, हिरवा माठ, चवळी, अंबाडी ह्या भाज्यांवर विशेष प्रेम. नुकतीच मायबोलीवर वाचताना "भारंगी" नावाची भाजी माहित पडली. सुदैवाने वाचन केल्यावरच दोन तीन दिवसात बाजारात दिसली. आता आहारात समाविष्ट केली आहे.
नुकतीच "टाकळयाची भाजी" माहित पडली आहे. एकदा चव घेऊन बघावी लागेल.
8 Aug 2022 - 12:13 pm | टर्मीनेटर
वर उल्लेख केलेल्या सगळ्याच पालेभाज्या आवडतात 👍
पावसाळा सुरु झाला की आमच्या फार्मवर 'टाकळा' आणि 'कर्डू' ह्या दोन पावसाळी पालेभाज्या दर वर्षी आपोआप उगवतात. जुलै - ऑगस्ट महिन्या पर्यंतच त्या खाता येतात नंतर रोपटी मोठी झाल्यावर पानेही मोठी मोठी आणि जून होतात, मग खाववत नाहीत.
टाकळ्या प्रमाणेच कर्डूची पालेभाजी मिळाली तर खाऊन बघा, फार चविष्ट लागते 😋 उद्या परवाकडे माझी फार्मवर फेरी होणार आहे, कर्डू आली असेलच! त्या भाजीची रेसिपी टाकतो लवकरच.
8 Aug 2022 - 6:28 pm | सतिश गावडे
मी ही मायबोलीवर जेव्हा भारंगीच्या भाजीबद्दल लेख वाचला तेव्हा कित्येक वर्षांपूर्वी घरी खाल्लेल्या भारंगीच्या भाजीच्या नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले. अप्रतिम लागते भारंगीची भाजी.
टाकळ्याच्या कोवळ्या पानांचीही भाजी मस्त लागते.
8 Aug 2022 - 7:00 am | प्रचेतस
मस्तच झाल्यात की अळू वड्या आणि देठांची कोशिंबीर
8 Aug 2022 - 8:37 am | Bhakti
सर्वांनी नक्की पाकृ बनवा !_/\_
8 Aug 2022 - 9:45 am | जेम्स वांड
रेसिपी आवडली, फारच उत्तम दिसतायत दोन्ही पदार्थ, ते डाळिंब दाणे वगैरे तर लैच जबरी सजावट वगैरे केलेली दिसते.
8 Aug 2022 - 9:49 am | जेम्स वांड
माफ करा पण आपल्या स्मरणरंजनाशी मी सहमत नाही,
जुन्या भाज्या नाहीत अन् त्या बनवणारे पण नाहीत असे काहीच नाही, प्रमाणे थोडी कमी झाली असतील पण अजूनही हे बनवतात सगळे लोक, किमान गावाकडे.
जुन्या भाज्या शहरात बनवत नाहीत म्हणत असाल तरीही त्याबद्दल मी शहरी स्त्रियांना (किंवा पुरुषांनाही) दोष देणार नाही. नोकरी धंदे सांभाळून इतके सायास होत नसतात, पण चान्स मिळाला तर कुठल्याही पिढीची माणसे असो अनवट पाककृती बनवायला कायम तयार असतात असेच मला वाटते.
8 Aug 2022 - 10:14 am | उगा काहितरीच
अळू /चमकुरा चा एक चवदार पदार्थ म्हणजे भजी ! योगायोगाने कालच खाण्यात आली. लिंबाच्या / चिंचेच्या पाण्यात अळूची पाने बुडवून ठेवायची. पातळसर बेसनाच्या पिठात घोळवून तेलात सोडायची. पान फोल्ड नाही झालं पाहिजे म्हणजे एकदम कुरकुरीत राहतं. बाकी वड्या / वड्याची भाजी/ वरण /पातळ भाजी अधूनमधून होतंच असतं. कंद मात्र जास्त कधी खाल्लं नाही. हॉस्टेल ला असताना बहुतेक याच कंदाची भाजी करत असावेत⁹ असं वाटते. पण कधी आवडली नाही भाजी.
8 Aug 2022 - 11:46 am | टर्मीनेटर
अळूवडी हा अत्यंत आवडता पदार्थ! पण मला अळूवडी आणि सुरणाची भाजी कुठल्याही पद्धतीने बनवली तरी खाजते 😒 त्यामुळे कितीही आवडत असली तरी २-३ पेक्षा जास्ती नाही खाता येत!
'अळूच्या देठांची कोशिंबीर' हा पदार्थ मात्र आईने गेल्या कित्येक वर्षात बनवला नसल्याने माझ्या विस्मृतीत गेला होता, तो पुन्हा आठवला. पूर्वी मामा आणि दोन मावशांचे जुने वाडे होते तेव्हा त्यांच्याकडून घरच्या अळूची पाने मिळायची पण आता वाडे पाडून बिल्डिंगी उभ्या राहिल्या आणि हा पदार्थ घरी बनणे बंद झाले.
8 Aug 2022 - 12:14 pm | अनन्त्_यात्री
अळूच्या देठांच्या कोशिंबिरीला आजोळी देठी म्हणायचे आणि आम्हा भाचरांचा तो अतिशय आवडता पदार्थ होता हे (बर्याच वर्षांनी) आठवले. फोटो छान आलाय,
8 Aug 2022 - 6:24 pm | सतिश गावडे
अळूच्या भाजीची बहीण असलेल्या तेरीच्या देठांच्या भाजीला आमच्याकडे "देठी" म्हणतात. :)
8 Aug 2022 - 2:01 pm | गवि
वर टाकळा कुर्डू आणि तत्सम रानभाज्यांचा उल्लेख वाचून जागुताईने मिपावर पूर्वी लिहिलेल्या रानभाज्या मालिकेची आठवण झाली. जवळपास सर्व पावसाळी रानभाज्या त्यात आल्या होत्या, फोटो अन रेसिपीसकट.
8 Aug 2022 - 2:09 pm | Bhakti
गणपा यांची नारळाच्या दुधातील अळूवडी रेसिपी
अळू वड्या
8 Aug 2022 - 4:00 pm | श्वेता व्यास
अळू वड्या आणि कोशिंबीर मस्तच! देठांची नेहमी भाजीच केली आहे, आता कोशिंबीर करून बघणार.
8 Aug 2022 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अळुवड्या आवडतात, याही आवडल्या. देठाची कोशिंबीरी आवडली. आमच्याकडे देठ परतुन् घेऊन कांदा शेंगदाने कूट लसुन मिर्ची तिखट टाकून भाजी बनवतात.
-दिलीप बिरुटे
10 Aug 2022 - 1:15 am | पर्णिका
मेन्यू आवडला, भक्ती!
अळूच्या वड्या फार आवडतात. माझी आजी ही कोशिंबीर,आणि देठांची भाजी करायची, छान लागते.
संध्याकाळी फ्रिझरमधील Deep Patra करावाच लागेल. :)
12 Aug 2022 - 5:43 pm | मदनबाण
मागच्याच आठवड्यात चापल्या होत्या [ घरी उंडे आणुन ], हा धागा बघण्यात आल्या नंतर परत भूक चाळवली ! तिर्थरुप बाहेर जाणार होते तेव्हा त्यांना सांगुन परत तयार केलेल्या मागवल्या आणि चापल्या. बाजारात मिळणार्या शॅलो फ्राय असतात, मला उंडे डीप फ्राय करुन केलेलेच अधिक चवीला आवडतात.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022
12 Aug 2022 - 6:13 pm | Bhakti
सर्वांचे धन्यवाद! सुंदर धागा गुंफला गेला.