निसर्ग आपल्याला जन्मताच एक अमूल्य शरीर देतो. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे शरीर कधी ना कधी कुठल्या तरी रोगाची शिकार बनते. रोग म्हटला की उपचार करणे आले. उपचारांमध्ये घरगुती उपायांपासून अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. आधुनिक वैद्यकात रुग्णास औषध देण्याचे अनेक मार्ग(routes)आहेत. त्यातले सर्वपरिचित मार्ग म्हणजे औषध तोंडाने घेणे, औषधाचा वाफारा नाका/तोंडाद्वारे घेणे, स्नायू अथवा रक्तवाहिनीतून इंजेक्शन्स घेणे आणि त्वचेवर मलम लावणे. पण शरीरात औषध पोचवण्याचे याव्यतिरिक्तही अनेक मार्ग आहेत. वरील चार परिचित प्रकारांचेही अनेक उपप्रकार आहेत. या सर्वांचा सोदाहरण आढावा या लेखद्वयात घ्यायचा आहे. काही ठराविक औषधे शरीराच्या एखाद्याच छोट्या भागात काम करण्यापुरती वापरली जातात. उदाहरणार्थ, डोळ्यात टाकायचे थेंब. परंतु बरीच औषधे शरीरात गेल्यानंतर रक्तप्रवाहाद्वारे संपूर्ण शरीरभर पसरतात. अशा औषध-प्रवासाचा विस्तृत आढावा आता (२ भागांत) घेतो.
• तोंडाद्वारे घेतलेली औषधे
अशी औषधे गोळी, कॅप्सूल, चुरा किंवा द्रव स्वरूपात असतात. तोंडाद्वारे घ्यायच्या मार्गात दोन पद्धती आहेत :
1. औषध जिभेवर ठेवून गिळणे
2. औषध जिभेखाली ठेवून विरघळवू देणे
हे दोन्ही मार्ग जरी एकाच पोकळीत जवळपास असले तरी त्यांच्याद्वारे होणाऱ्या परिणामांमध्ये लक्षणीय फरक आहे ! तो आता समजून घेऊ.
१. जे औषध जिभेवर ठेवून पाण्याच्या मदतीने गिळले जाते त्याचा पुढील प्रवास संपूर्ण पचनसंस्थेतून होतो. बहुतेक औषधांचे सर्वाधिक शोषण लहान आतड्याद्वारा होते. असे शोषण झाल्यानंतर ते पचनसंस्थेच्या स्थानिक रक्तप्रवाहात (portal) जाते. तिथून पुढे यकृतात आणि पुढे मजल दरमजल करीत शरीराच्या मुख्य रक्तप्रवाहात (systemic)पोचते. तोंडातून अशा प्रकारे घेतलेल्या औषधाच्या शोषणावर पचनसंस्थेतील अनेक घटकांचा परिणाम होतो. जसे की, आहाराचे स्वरूप, विविध हॉर्मोन्स व चेतातंतूंचे परिणाम, पचनाचे आजार, इत्यादी. तसेच एखादे औषध हे गोळी, कॅप्सूल की द्रव स्वरूपात आहे यावरही त्याचे शोषण अवलंबून असते.
कॅप्सूलचे विशिष्ट फायदे :
कॅप्सूल म्हणजे जिलेटिनचे (किंवा अन्य पर्यायाचे) एक कवच असते. त्याच्यात औषध व पूरक रसायने एकत्र घातलेली असतात. आपण कॅप्सूल गिळल्यानंतर ती पचनमार्गात ओली होऊन फुगते आणि मग त्यातले औषध बाहेर पडते. कॅप्सूलमधील औषध द्रव स्वरूपात असल्यास त्याचे शोषण तुलनेने लवकर होते. काही औषधे सामान्य गोळीच्या स्वरूपात थेट जठरात जाणे इष्ट नसते. तिथल्या तीव्र आम्लतेमुळे त्यांचा नाश होऊ शकतो. म्हणून ती कॅप्सूलमध्ये भरून पुन्हा तिच्यावर एक विशिष्ट प्रकारचे वेस्टण चढवले जाते. हे वेस्टण आम्लतारोधक असते. अशी कॅप्सूल जेव्हा जठरात येते तेव्हा तिथल्या आम्लतेचा तिच्यावर परिणाम होत नाही आणि ती मूळ स्वरूपात लहान आतड्यात पोचते. तेथील कमी आम्लता असलेल्या वातावरणात वेस्टण विरघळते आणि मग औषध बाहेर पडते. या प्रकारच्या वेस्टणाला enteric coating असे म्हणतात.
जठरातील अन्न आणि तोंडाने घेतलेल्या औषधाचे शोषण हे दोन्ही घटक एकमेकांशी चांगलेच निगडीत आहेत. औषधाच्या रासायनिक स्वरूपानुसार ते उपाशीपोटी, मुख्य जेवणापूर्वी का जेवणानंतर लगेच घ्यायचे, याचे नियम ठरलेले असतात. बहुतेक रसायनयुक्त औषधे जठराच्या आतील आवरणाचा दाह करणारी असल्यामुळे ती जेवणानंतर घेणे इष्ट असते. मात्र, ज्या औषधांचे शोषण अन्नामुळे बरेच कमी होते अशी औषधे निक्षून सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी घ्यावी लागतात; याचे सध्याचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे थायरॉक्सिनची गोळी. रेचक प्रकारची औषधे रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी घ्यावी लागतात.
२. औषध जिभेखाली ठेवणे : तोंडातील अन्य भागांशी तुलना करता जिभेखालच्या भागातील म्युकस आवरण विशिष्ट प्रकारचे आहे. त्यामुळे इथे ठेवलेल्या औषधाचे शोषण तुलनेने चांगले व सहज होते. या भागातला रक्तपुरवठाही भरपूर असतो. इथल्या औषधाचे शोषण झाल्यावर ते लगेचच शरीराच्या मुख्य रक्तप्रवाहात जाते. त्यामुळे वरील १ मध्ये असलेला संपूर्ण पचनसंस्था आणि यकृत हा लांबचा प्रवास पूर्णपणे वाचतो. अशा प्रकारे घेतलेल्या औषधाचा परिणाम त्वरित आणि अधिक प्रमाणात दिसून येतो. जी औषधे तोंडाने गिळून घेतली असता जठरात गेल्यावर त्यांचा नाश होण्याची शक्यता असते, अशी औषधे या प्रकारे देता येतात. तसेच गिळण्याच्या व पचनसंस्थेच्या आजारांमध्ये या औषधमार्गाचा उपयोग केला जातो.
अर्थात या औषधमार्गाची एक मर्यादाही आहे. इथे औषधाच्या शोषणासाठी उपलब्ध असलेली जागा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शक्तिमान (potent) प्रकारचीच औषधे इथून देणे सयुक्तिक ठरते. तसेच जिभेखाली ठेवलेले औषध पूर्ण विरघळून जाईपर्यंत संबंधित रुग्णाने बोलणे, पाणी पिणे आणि गिळणे या सर्व क्रिया निक्षून टाळायच्या असतात. तसे न केल्यास औषधाचा काही भाग अन्ननलिकेतून पुढे जठरात जाईल आणि मग या प्रकारे औषध देण्याच्या प्रकारालाच बाधा पोचेल. या प्रकारे दिलेल्या औषधाचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे nitroglycerin. हृदयविकारातील अंजायना या स्थितीमध्ये हे औषध रुग्ण स्वतःच पटकन जिभेखाली ठेवू शकतो.
• गुदद्वारातून दिलेली औषधे
बद्धकोष्ठतेसाठी देण्यात येणारा ‘एनिमा’ सर्वपरिचित आहे. या प्रसंगात संबंधित औषध हे फक्त स्थानिक काम करते. मात्र काही प्रसंगी या मार्गाने दिलेले औषध रक्तप्रवाहात शोषले जाऊन सर्व शरीरभर पोचू शकते. या मार्गातून औषध देणे अर्थातच सुखावह प्रकार नाही ! त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितीतच त्याचा अवलंब केला जातो, जसे की :
• रुग्णास प्रचंड उलट्या होत असताना किंवा गिळण्याचे त्रास असताना
• बेशुद्धावस्थेतील रुग्ण
• लहान मुलांमध्ये एखादे कडूजहर औषध देण्यासाठी
Lidocaine हे या प्रकारातील एक उदाहरण. ते भूलकारक असून हृदयतालबिघाडही दुरुस्त करते.
………….
• श्वसनमार्गातून घेतलेले औषधी फवारे
अशा औषधांचा (श्वासनलिका रुंदावणारी आणि स्टिरॉइड्स) मुख्य उपयोग विविध श्वसनरोगांसाठी केला जातो. उदा. दमा व तत्सम आजार. या प्रकारे तोंडाने ओढून घेतलेले औषध त्वरित शोषले जाते आणि काही सेकंदात त्याचा प्रभाव दाखवते. एकेकाळी दम्याची नियमित औषधे गोळीरूपात पोटातून दिली जात. त्यामुळे त्यांचा प्रभाव दिसण्यास तर वेळ लागेच, परंतु ती संपूर्ण शरीरभर पसरल्याने त्यांचे दुष्परिणामही बऱ्यापैकी दिसून येत. ते टाळण्यासाठी या प्रकारच्या औषधमार्गाचा शोध लावण्यात आला. इथून दिलेल्या औषधाचा प्रभाव (कमी मात्रेत) जास्तीत जास्त आणि दुष्परिणाम अत्यंत कमी स्वरूपात दिसून येतात.
असे औषध ३ प्रकारच्या उपकरणांमधून देता येते :
१. Inhaler : यात वायुरूप औषध विशिष्ट दाबाखाली साठवलेले असते. जेव्हा आपण ते श्वासातून आत ओढतो तेव्हा एका झडपेच्या माध्यमातून ते बाहेर पडते.
२. (कोरड्या) पावडरचे इन्हेलर्स
एका इन्हेलर उपकरणात साधारणपणे एक ते दोन महिने पुरेल इतके औषध साठवलेले असते. त्यामुळे रुग्णास ते बरोबर बाळगणे अतिशय सोयीचे असते.
अशा प्रकारे औषध घेण्याचे तंत्र नीट आत्मसात करावे लागते. औषध तोंडाने श्वासाबरोबर आत ओढल्यानंतर १० सेकंद श्वास रोखून ठेवायचा असतो. तसेच श्वास सोडल्यानंतर पाण्याने खळखळून गुळण्या करणे आवश्यक.
३. Nebulizer : यात औषध द्रवरुपात साठवलेले असते आणि अल्ट्रासोनिक तंत्राच्या मदतीने त्याचे फवाऱ्यात रूपांतर होते. औषध सलग बराच काळ द्यायचे असल्यास याचा वापर करतात.
………
• नाकपुडीद्वारा दिलेली औषधे
या मार्गाने औषध देण्याचा हेतू ते फुप्फुसात पोचणे हा नसतो. याचे हेतू दोन प्रकारचे असतात :
१. औषधाची नाकापुरतीच मर्यादित क्रिया
२. नाकाद्वारे रक्तप्रवाहात शोषले जाणे.
१. अशी औषधे थेंब किंवा फवारा या स्वरूपात दिली जातात. कुठल्या प्रकारची औषधे इथून दिली जाऊ शकतात त्याला खूप मर्यादा आहेत. तसेच दिल्या जाणाऱ्या औषधाची मात्राही खूप कमी प्रमाणात(काही मायक्रोलिटर्समध्ये) असते. या प्रकारे देण्यात येणाऱ्या औषधांची ठळक उदाहरणे म्हणजे ऍलर्जिक सर्दीसाठी दिलेली काही औषधे आणि स्टिरॉइड्सचे फवारे.
2. श्वसनमार्गातून घेतलेले औषध तेथील रक्तप्रवाहामार्फत संपूर्ण शरीरभर पसरू शकते का, हा रोचक प्रश्न आहे. या प्रकारे औषध शोषले जाऊ शकते हे बरोबर. काही औषधांच्या बाबतीत असे प्रयोग झालेले आहेत- उदा. इन्सुलिनचा फवारा. काही वर्षांपूर्वी या औषधाला मान्यता मिळून ते वापरात होते. परंतु नंतर त्याच्या मर्यादा (खूप जास्त मात्रा लागणे) आणि अन्य काही दुष्परिणाम लक्षात आल्याने सध्या ते फारसे वापरात नाही. नेहमीच्या इन्सुलिन इंजेक्शनला जोड उपचार म्हणून त्याचा काही ठिकाणी वापर होतो. नाकातून घेतलेल्या इन्सुलिनचा स्मृतिभ्रंशासारख्या काही मेंदूविकारांमध्ये उपयोग होऊ शकेल का, या विषयावर गेली काही वर्षे संशोधन चालू आहे.
३. काही रोगप्रतिबंधक लसी देखील या मार्गाने देण्यात येतात. इन्फ्लूएंजाची लस बऱ्याच वर्षांपासून वापरात आहे. आता लवकरच अशी कोविडविरोधी लस विकसित होत आहे.
आतापर्यंत आपण पचनसंस्था आणि श्वसनमार्गे देण्यात येणाऱ्या औषधमार्गांचा आढावा घेतला. रोगोपचारांचे हे दोन महत्वाचे ‘नैसर्गिक’ मार्ग आहेत. याव्यतिरिक्त औषध देण्याचे जे अन्य शरीरमार्ग आहेत त्यांचे विवेचन पुढील भागात करेन.
...................................................
क्रमशः
चित्रे जालावरून साभार !
प्रतिक्रिया
17 May 2022 - 12:40 pm | Nitin Palkar
नेहमी प्रमाणेच खूप माहितीपूर्ण लेख. एनिमा हा फक्त पोट साफ होण्यासाठी देतात असे वाटत होते. एनिमाद्वारे औषधही दिले जाते हे पहिल्यांदाच समजले. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत.
17 May 2022 - 2:34 pm | कुमार१
धन्यवाद.
एनिमा >>
याचा अजून एक उपयोग हा मोठ्या आतड्याच्या तपासणीसाठी होतो.
एनिमाद्वारे बेरियम आत सोडले जाते आणि मग एक्स-रे च्या साह्याने पाहणी केली जाते.
एकेकाळी याचा वापर बराच होत होता.
परंतु आता नवी प्रतिमातंत्रे उपलब्ध झाली असल्याने हे मागे पडले आहे.
17 May 2022 - 1:53 pm | Bhakti
वाह! नेहमी प्रमाणे खुप माहिती पूर्ण विवेचन.वाखू साठवली.
महाविद्यालयात असताना एडिबल वक्सिन (Edible Vaccine)अशी संकल्पना थोडी शिकवली जायची.एक दिवस आपणही सफरचंद किंवा इतर फळातून वक्सिन मिळेल तयार करु अशी स्वप्ने मला पडायची :).
दुसर्या भागात एडिबल औषधांची माहिती वाचायला आवडेल.
17 May 2022 - 2:37 pm | कुमार१
>>>
ही संकल्पना रोचक आहे. परंतु त्यामध्ये वनस्पतिशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान यांची सांगड घालावी लागते.
ही शास्त्रे माझ्या अभ्यासाचा भाग नसल्यामुळे त्याबाबत माझा विशेष अभ्यास नाही.
योग्य त्या तज्ञाने आपणा सर्वांनाच माहिती दिल्यास उत्तम होईल.
17 May 2022 - 2:46 pm | श्वेता२४
पु.भा.प्र.
17 May 2022 - 4:07 pm | सविता००१
माहिती दिली आहे. तीही सुलभतेने. पु.भा.प्र.
17 May 2022 - 4:17 pm | अनिंद्य
छान लेख
17 May 2022 - 5:12 pm | कुमार१
वरील सर्व नियमित वाचकांचे प्रतिसादाबद्दल आभार !
17 May 2022 - 7:40 pm | कर्नलतपस्वी
आणखीनही काही मार्ग आहेत ते नक्कीच पुढील भागात येतील.
धागा आवडला.
18 May 2022 - 7:56 am | तुषार काळभोर
पुढील भागात बहुधा शीरेतून दिल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश असेल. Diclofenac औषध suppository स्वरूपात वेदनाशामक म्हणून वापरलेले पाहिले आहे.
18 May 2022 - 9:58 am | ज्ञानोबाचे पैजार
नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण आणि वाचनिय लेख आवडला
चघळून खायच्या गोळ्यां पैकी सगळ्यात आवडते औषध म्हणजे सी व्हिटॅमिनच्या गोळ्या, आमचे डॉक्टर म्हणायचे कितीही खा, तसेच खोकला झाला की कंठसुधारक वटी, व्हिक्स किंवा कॉफसीलच्या गोळ्या खायला मजा येते.
दात दुखत असला तर दाताखली धरायला लवंग देतात त्यानेही बराच आराम मिळतो.
पैजारबुवा,
18 May 2022 - 10:01 am | कुमार१
अभिप्राय आणि पूरक रंजक माहितीबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
दुसरा भाग हा 'इंजेक्शन्स महोत्सव' असणार आहे.
:)
18 May 2022 - 2:53 pm | नगरी
माझा प्रश्न बाळबोध असू शकेल कदाचित कारण तो मला लहानपणापासूनच पडलाय पण तुम्हालाही विचारून टाकतो.औषध कोणतेही असो अलोपॅथिक मग ते कोणत्याही स्वरुपात असो,आयुर्वेदिक किंवा होमियोपॅथिक ते योग्य जाऊन तिथेच कसे काम करते?
18 May 2022 - 4:47 pm | कुमार१
खूप चांगला व रंजक आहे !
त्याचे सविस्तर उत्तर म्हणजे लघुलेख होईल.
मी उद्या सकाळपर्यंत याचे उत्तर दोन टप्प्यांत देईन- फक्त आधुनिक वैद्यकाच्या दृष्टिकोनातून.
अन्य शास्त्रांच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात
18 May 2022 - 8:07 pm | कुमार१
औषधांच्या रासायनिक गुणधर्मानुसार ती तीन प्रकारची असतात :
१. अत्यंत निवडक कृती करणारी
२.मध्यम निवडक
३.विशिष्ट पेशी निवड नसणारी
म्हणजेच,
पहिल्या गटातील औषधे शरीरातील अत्यंत निवडक प्रकारच्या पेशींवरच काम करतील. तर तिसऱ्या गटातील औषधे एकदा का रक्तप्रवाहातून सर्वत्र पोहोचली की शरीरभर परिणाम दाखवू शकतील.
आता हे असे का होते ?
औषध जेव्हा रक्तप्रवाहमार्फत एखाद्या वैयक्तिक पेशीच्या आवरणापर्यंत पोचते, तिथे त्याचे स्वागत करण्यासाठी काही विशिष्ट प्रथिने असतात (Receptors). या प्रथिनांचे वेगवेगळे प्रकार असतात.
काही औषधांच्या बाबतीत, ते औषध फक्त एकाच प्रकारच्या R शी सलगी करू शकते आणि मगच त्याला पेशीच्या आत घेतले जाते.
( एक कुलूप ; एकच किल्ली).
परंतु, काही औषधांच्या बाबतीत परिस्थिती एकदम उलट आहे. ती औषधे कुठल्याही प्रकारच्या Rs शी संयोग करू शकतात. त्यामुळे त्यांचा प्रवेश अनेक प्रकारच्या पेशींमध्ये होऊ शकतो.
( येथे मास्टर की ची उपमा द्यावी लागेल!)
18 May 2022 - 8:29 pm | कुमार१
आता वरील प्रत्येक गटाचे एकेक उदाहरण :
1.digoxin : मुख्यतः हृदयपेशीशी सलगी करते.
2. aspirin : शरीरात जिथे जिथे दाह झाला असेल तिथे काम करते
3. atropine : पचनसंस्था, डोळ्यांचे स्नायू आणि श्वसनसंस्था अशा विविध ठिकाणी काम करू शकते.
18 May 2022 - 10:01 pm | सुक्या
सुंदर माहीती.
इंजेक्शन्स महोत्सवाची वाट पाहतोय :-)
18 May 2022 - 11:06 pm | वामन देशमुख
नेहमीप्रमाणे माहितीरंजन करणारं लेखन!
+१
20 May 2022 - 5:50 am | कुमार१
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
20 May 2022 - 8:14 am | जेम्स वांड
नेहमीप्रमाणे झक्कास लेख,
डोकं दुखतंय म्हणून जेव्हा आपण डिस्प्रिन गोळी घेतो ती पाण्यात घालून तिच्यात सोड्यासारखे बुडबुडे येऊन ती पूर्ण विरघळली की घेण्यामागे काय योजना असेल ?
बाकी ती एक गोळी शरीरात पोचवण्यामागचे अफाट विज्ञान सुलभ दृष्टीकोनातून मांडल्याबद्दल आपले असंख्य आभार सर.
ह्याच निमित्ताने २००१ सालची अमेरिकन एनिमेटेड सिरीज ओझी अँड ड्रीक्स आठवली, ओझी नावाची एक श्वेत रक्तपेशी आणि ड्रीक्स नावाची एक कोल्ड कॅप्सूल ह्यांच्या "हेक्टर क्रूझ" नावाच्या मुलाच्या अंगात/ शरीरातील मुशाफिरी आणि मलेरिया/ स्कारलेट फिव्हर वगैरे रोगांशी लढाई त्यात दाखवली आहे, अंतर्गत अवयव आणि शरीर हे एक शहर आहे असे रूपक वापरून ओझी अन ड्रीक्स ते "शहर" रोगरूपी व्हीलन्सपासून कसे वाचवतात हे तुफान चित्रण त्यात आहे.
20 May 2022 - 8:48 am | कुमार१
*डिस्प्रिन गोळी घेतो ती पाण्यात घालून>>>
चांगला प्रश्न.
जी गोळी घट्ट स्वरूपात असते ती पचनसंस्थेत गेल्यानंतर विरघळणार आणि मग शोषली जाणार. यात बराच वेळ जातो.
डिस्प्रिनसारखी पाण्यात विरघळणारी गोळी आहे तिचा हेतू गोळीने त्वरित काम करावे असा असतो.
तसेच त्यामुळे तिची परिणामकारकता वाढते.
.......
*
>>>
छान चित्रफीत सुचवली आहे सवडीने पाहतो.
20 May 2022 - 8:48 am | कुमार१
*डिस्प्रिन गोळी घेतो ती पाण्यात घालून>>>
चांगला प्रश्न.
जी गोळी घट्ट स्वरूपात असते ती पचनसंस्थेत गेल्यानंतर विरघळणार आणि मग शोषली जाणार. यात बराच वेळ जातो.
डिस्प्रिनसारखी पाण्यात विरघळणारी गोळी आहे तिचा हेतू गोळीने त्वरित काम करावे असा असतो.
तसेच त्यामुळे तिची परिणामकारकता वाढते.
.......
*
>>>
छान चित्रफीत सुचवली आहे सवडीने पाहतो.
21 May 2022 - 7:50 pm | मदनबाण
उत्तम माहिती मिळते आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Anjathey Jeeva Official Video | Full HD | Jodi | A.R.Rahman | Prashanth | Simran | Vairamuthu
22 May 2022 - 11:36 am | मुक्त विहारि
धन्यवाद
वाखूसा
22 May 2022 - 12:00 pm | कुमार१
तोंडातून घ्यायच्या गोळ्यांच्याबद्दल थोडी भर घालतो.
चघळायच्या व गिळायच्या गोळ्या
गोळीच्या रासायनिक गुणधर्मानुसार काही औषधे चघळायच्या स्वरूपात करता येतात. विशेषता मुलांमध्ये अशा गोळ्यांचा फायदा होतो. तसेच ज्या वृद्धांना गोळी किंवा कॅप्सूल गिळण्याची नेहमी भीती वाटते त्यांनाही अशा गोळ्यांचा फायदा होतो.
चघळायच्या गोळ्यांचे अन्य काही फायदे असे:
१. प्रवासात बरोबर पाणी नसेल तरी त्या पटकन घेता येतात
२.गिळण्याच्या गोळीला तयार करताना ठराविक वजनाची मर्यादा असते (एक ग्रॅमपेक्षा कमी).चघळायच्या गोळ्या अधिक वजनाच्या बनवता येतात.
३. अशा गोळ्यांचा परिणाम लवकर व अधिक दिसतो.
23 May 2022 - 5:10 am | कुमार१
इथे:
https://www.misalpav.com/node/50258
...
सर्वांना धन्यवाद !
26 May 2022 - 2:22 pm | स्वधर्म
लेखाबद्द्ल धन्यवाद
22 Jun 2022 - 11:42 am | Trump
हा लेख तुम्हीच लिहीला आहे का?
खुप साधर्म आहे.
-----------
विश्लेषण : औषधांना कसं समजतं शरीरात कोठे जायचं? जाणून घ्या
https://www.loksatta.com/explained/explained-how-medicine-know-where-you...
22 Jun 2022 - 11:58 am | कुमार१
दुवा दिल्याबद्दल धन्यवाद !
तो लेख मी लिहिलेला नाही.
लोकसत्तेतील लेखावर कालची तारीख आहे. (21 जून).
तो गोळाबेरीज करून लिहिल्या सारखा वाटतो खरा.
माझा मिपावरील लेख १६ मे २०२२ चा आहे
अधिक काय बोलणे ?
:)
असे अनुभव अधून-मधून येत आहेत....