काणकोण, दक्षिण गोवा येथे येत्या १५-२० दिवसात किमान २-३ दिवस घालवण्याचा विचार आहे... दक्षिण गोव्यात प्रथमच जात आहे. तरी जाणकारांनी काय काय करू शकतो ( कुठल्या स्थळांना भेटी दयाव्यात, खाण्याची उत्तम ठिकाणे, तिकडे घ्यावयाची काळजी वैगरे वैगरे) या बद्दल सल्ला द्यावा.
प्रतिक्रिया
5 May 2022 - 6:59 am | कंजूस
किंवा गोव्यातच प्रथमच जात आहे. तरीही काही मंत्र न ठेवता जायचं आणि आपलं आपण अनुभवायचं. मग पुढेही प्रथमच गेल्यासारखं जायचं. परवडेल/झेपेल ते ते सर्व करायचं.
( आगावू सल्ला)
5 May 2022 - 9:41 am | मुक्त विहारि
+1
9 May 2022 - 3:07 pm | शैलेश लांजेकर
धन्यवाद!! "मस्त मौला" फिरण्याचा गुरु "मंत्र" दिलात !!
5 May 2022 - 9:48 am | विजुभाऊ
झेपत असेल तरच फेणी हा प्रकाराच्या वाटेला जावे.
मात्र "उराक" नक्की चाखावी
9 May 2022 - 3:10 pm | शैलेश लांजेकर
"अल्कोहोल" वर्ज्य केले आहे काही वैयक्तिक कारणांनीं.. पण नवीन नावे कळली :-)
5 May 2022 - 9:55 am | मुक्त विहारि
हाॅटेल मध्ये सामान टाका
टु व्हीलर भाड्याने घ्या
मॅप घ्या
आणि फिरा
गोवा हे कॅलिडोस्कोपिक राज्य आहे
त्यामुळे, कसेही आणि कुठेही भटका, दरवेळी वेगवेगळे पैलू दाखवेल
आणि अजून एक, गावातील लोकंच उत्तम हाॅटेल (खानावळ) सुचवतात
कधी कधी ऐनवेळी, कुठल्या तरी हाॅटेल मधून, खमंग वास येतो, तिथेच जेवा...
बियर आणि मासे, आवडीने खात असाल तर, गोवा म्हणजे स्वर्ग आहे....
9 May 2022 - 3:20 pm | शैलेश लांजेकर
मॅप कोणता आणि कुठून घेऊ? प्रिंटेड म्हणताय कि मोबाइल वरचा ऑनलाईन मॅप?
आणि खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर तुमचा सल्ला पटला... स्थानिक मंडळी जास्त मदत करू शकतील..
25 May 2022 - 6:49 pm | मुक्त विहारि
किंवा, एखाद्या जनरल स्टोअर मध्ये देखील मॅप मिळू शकतो..
मी कलंगूट बीच वरच्या एका जनरल स्टोअर मधून घेतला होता..
नंतर तो मॅप चोरीला गेला..
(पेन, पुस्तक कुणालाच देऊ नयेत, तसेच मॅप देखील देऊ नये...)
25 May 2022 - 7:58 pm | कंजूस
गोवा tourist map
pdf file drive link size18" x 28" माझ्याकडे आहे.pdf Zoom करून पाहा.
5 May 2022 - 9:59 am | कंजूस
कारवार आणि गोकर्ण धरा. जवळ आहे. कारण कारवार'ला सर्व ट्रेन्स थांबतात. गोव्यात टु विलर भाड्याने / taxi पर्याय आहेच.
9 May 2022 - 6:47 pm | शैलेश लांजेकर
कारवार आणि गोकर्ण मध्ये एक दिवसात जाऊन येऊन पाहण्या सारखी काही ठिकाणे आहेत का? तुम्हाला काही माहिती असल्यास सांगा..
9 May 2022 - 10:40 pm | कंजूस
https://youtu.be/tQdgiqORwF0
(कानडी, इंग्रजी सबटाइटल्स ,कारवार)
लहान मुलांसाठी काही activity लागते. ती हाताशी असावी. समुद्र किनारा आणि वाटर स्पोर्टस आहेतच पण इतर गोष्टी लागतात. कधी एक जागा सक्सेस नाही झाली तर दुसरी माहिती असावी.
मडगाव आणि कारवार या दोन मोठ्या स्टेशनांच्या मध्ये असल्याने वाहनांचे पर्याय आहेत.
5 May 2022 - 10:20 am | चंद्रसूर्यकुमार
काणकोणमध्ये अगोंडा आणि पालोलेमचे समुद्रकिनारे खूप सुंदर आहेत. ते बघाच. मी अगोंडा आणि पालोलेमच्या दक्षिणेला असलेल्या पाटणेच्या समुद्रकिनार्याजवळ राहिलो आहे. पालोलेमच्या समुद्रकिनार्यावर त्यामानाने गर्दी असते- त्या मानाने म्हणजे बागा किंवा कळंगूटसारखी गर्दी तिथे नक्कीच नसते पण दक्षिण गोव्याच्या मानाने कोलवा आणि पालोलेमला जास्त गर्दी असते. त्यामुळे पालोलेमला राहिलो नाही तर नुसताच तो समुद्रकिनारा बघितला. पालोलेमच्या समुद्रकिनार्यावर द्रौपदी म्हणून एक रेस्टॉरंट-बीच शॅक आहे. तिकडचे खाणे आवडले.
अगोंड्याचा समुद्रकिनारा अगदीच दृष्ट लागावा असा आहे. त्या समुद्रकिनार्याला समांतर असलेला रस्ता एखाद्या चित्रात दाखवलेला असतो तसा आखीव रेखीव आणि देखणा आहे. त्या रस्त्यावर अनेक कॅफे आणि रेस्टॉरंट्स आहेत. मी तिथे ५ वर्षांपूर्वी गेलो होतो. त्यावेळी अगोंड्यात व्होडाफोन आणि एअरटेलचे नेटवर्क अजिबात येत नव्हते. त्यामुळे मोबाईल डेटासाठी त्या कॅफे आणि रेस्टॉरंट्सच्या वायफायचा उपयोग व्हायचा. फोनवर एकदा वायफाय पकडले असेल तर नंतर आपोआप ते वायफाय पकडले जाते त्यामुळे त्या कॅफे आणि रेस्टॉरंट्सच्या वायफायचा वापर करता यावा म्हणून त्यांच्या बाहेर लोक थांबले आहेत आणि फोनवर कायप्पा किंवा अन्य काही बघत आहेत हे चित्र अनेकदा दिसले होते. अगोंड्यात व्होल्टेज कमीजास्त व्हायचा प्रकार खूप होतो. त्यामुळे फोन चार्ज करताना बॅटरीवर परिणाम होऊ शकेल. म्हणून तिथे राहायचे असल्यास पॉवर बँक चार्ज करून त्याद्वारे फोन चार्ज केलेला चांगला. अर्थात ही ५ वर्षांपूर्वीची स्थिती आहे. सध्याचे माहित नाही.
काणकोणपासून जवळ असलेले नेत्रावळीचे अभयारण्य चांगले आहे असे ऐकले आहे. मला ते बघायला मिळाले नाही. दूधसागर धबधबा काणकोणपासून जवळ नाही तरी अगदी अगोंडा-पालोलेमला उतरलेले लोकही तो बघायला जातात असे ऐकले आहे. तो धबधबा बघायचा तर त्यासाठी जाणे-येणे, तिकडच्या वेळा वगैरे धरून बराच वेळ जातो. तितका वेळ त्या धबधब्यासाठी घालविण्याइतका काही तो नायगारा नाही.
गोव्यात पहिल्यांदाच जात असाल तर सावधानतेचा इशारा. कधीकधी समुद्रकिनार्यावर 'आम्ही नवीन रिसॉर्ट उघडले आहे ते चेक करायला या आम्ही गाडी पाठवतो' असे सांगत कोणी आले तर त्या माणसाचा किमान शब्दात कमाल अपमान करून त्याला हाकलून द्या. असे कुठेतरी जाणे म्हणजे अर्धा दिवस बरबाद करणे आणि कदाचित लुटालुटीलाही आमंत्रण देण्यासारखे आहे.
5 May 2022 - 12:45 pm | गवि
चंसूकुच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. बाकी लोलये गावात शेकडो वर्षे विना देऊळ विना छप्पर उन्हा पावसात रानात एकटाच उभा असलेला नागडो वेताळ अवश्य बघून या. किंबहुना त्याला भेटून या. शक्यतो संध्याकाळी जा. अतिशय गूढ रम्य अनुभव येऊ शकतो. माहिती वाचून जा. इथेच मिपावर कोणी कोणी लिहीले आहे. साहना, प्रचेतस यांनी. लिन्का आत्ता हाताशी नाहीत.
काणकोणहून लोलये जवळ आहे.
अर्थात पसंत अपनी अपनी.
5 May 2022 - 1:26 pm | प्रचेतस
लोलये आणि पैंगिणच्या वेताळाबद्द्ल दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात ह्या धाग्यात लिहिले होते.
शिवाय गोव्यातील चर्चेसबद्द्ल गोवा - भाग १: जुन्या गोव्यातील चर्चेस ह्या धाग्यात लिहिले होते.
बाकी गोवा म्हटले की तुमचा उत्साह अगदी फसफसून वाहू लागतो असे निरिक्षण आहे.
5 May 2022 - 1:44 pm | गवि
आपल्या लेखांबद्दल धन्यवाद.
बाकी आपण सदैव इकडे
पडीकउपस्थित राहून निरीक्षणे नोंदवीत असता असे निरिक्षण आहे.5 May 2022 - 4:20 pm | प्रचेतस
एक कट्टर मिपाकर या नात्याने (तुमच्यासारखाच) इथेच पडिक असल्याने निरीक्षणे नोंदवता येतात बाकी कै नै :)
5 May 2022 - 12:48 pm | गवि
बाकी चंसूकु, एकेकाळच्या अतीव रम्य आणि शांत अगोन्ड्याचेही बागाकरण सुरु झाले आहे. बदल झपाट्याने होत आहेत असे कळते.
5 May 2022 - 1:36 pm | चंद्रसूर्यकुमार
अरे अरे. वाचूनच कसेतरी व्हायला लागले. तरी त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे अगोंडा त्यामानाने लांब असल्याने हा परिणाम व्हायचा वेग थोडा कमी असेल ही अपेक्षा.
5 May 2022 - 1:43 pm | कंजूस
अर्धा भाग गोव्याकडचा आहे ( अर्धा उगमाचा कर्नाटकात) त्याचे प्रत्येकी आठशे रुपये लागतात. पण यापेक्षा चांगले धबधबे कर्नाटकात आहेत. काही चकटफू.
5 May 2022 - 10:48 am | डेविल८३
आज सकाळिच दक्षिण गोव्यातुन परत आलो आहे. पालोलेमला राहिलेलो, गर्दि फारशी नाही आहे.
जेवनात सीओना, सिन्ग धाबा, रायन, साई प्रसाद हे सर्व पालोलेमला, अगोन्दामध्ये बान्देकरच बेस्ट आहे
5 May 2022 - 2:38 pm | मित्रहो
दक्षिण गोव्यात पाळोळे बीच किंवा पालोलीम बीच सुंदर आहे. आम्ही तिथे राहिलो होतो. मी आमच्या सायकल दौऱ्याविषयी लिहिताना राहण्याच्या जागेविषयी इथे लिहिले होते.
गोवा एका वेगळ्या रुपात अंतिम भाग
नेत्रावळी जंगल आणि तिथला धबधबा सुंदर आहे. काणकोण पासून फक्त ३५ किमी अंतरावर आहे. साधारण तीन ते चार तासात पाहून परत येता येईल. अगोंडा बीच जवळ आहे आणि सुंदर आहे. कदंबाची पूर्वीची राजधानी असणारे चांदोर शहर देखील जवळ आहे. तिथे ब्रेगेंझा हाऊस हे जुन्या पोर्तुगीझ पद्धतीचे घर आहे. दूधसागर मात्र लांब पडेल. एका दिवसात बघता येईल पण पूर्ण दिवस जाईल.
तसेच प्रचेतस यांनी सांगितल्याप्रमाणे वेताळाचे मंदिर देखील जवळच आहे.
5 May 2022 - 3:44 pm | हणमंतअण्णा शंकर...
या नावांची खरी भाषांतरे गुगल मॅप्समध्ये कोकणी राज्यभाषेत दाखवली जात नाहीत. त्यामुळे सर्व भारतीय, विशेषतः मराठी, हिंदी लोक त्यांचे पालोलेम, कुलेम असे लेम उच्चार करताहेत. त्यात गोवा हे पोर्तुगीजी असल्याने मूळ नावं, आणि आत्ताही कोकणीत प्रचलित असलेली नावं अशी लेमच आहेत असे गैरसमज सगळीकडे आहेत. मडगाव निदान हिंदीत रेल्वेवर लिहिले असते. तरीही काही माझ्या ऑफिसातले काही मराठी लोक सुद्धा लिस्बनवरून आल्यासारखे मार्गावो मार्गावो करत. हेच अडीचशहाणे दिल्लीला डेहली देखील म्हणतात. काही दिवसांनी कोल्हापूर चे कोलापुरा केले नाही म्हणजे मिळवले.
5 May 2022 - 5:31 pm | चंद्रसूर्यकुमार
मुद्दा मान्य. अगोंडाचे मूळ नाव अगोंद आणि पालोलेमचे मूळ नाव पालोळे आहे. या नावांची तितक्या प्रमाणावर मोडतोड झालेली नाही पण बाणावली, पैंगणी, हलदोणे वगैरे नावांची खूपच जास्त वाट लावली आहे. काणकोणला पण कॅनकोना, लोळयेला लोलीएम वगैरे म्हणातात तसे म्हणू नये असे फार वाटते.
25 May 2022 - 12:00 pm | साहना
पाळोळे, लोलये, पैंगीण असे उच्चार आहेत.
काणकोण हा शब्द कण्व ऋषी वरून आला आहे आणि लोलीये हा शब्द "लोलयती" (विलोभनीय) ह्या संस्कृत शब्दावरून आला आहे असे ह्या भागांतील इतिहासकार श्री वि बा प्रभुदेसाई ह्यांनी लिहिलेले वाचले होते.
कदाचित पोर्तुगीज कारकून मंडळींनी जसे ऐकले तसे शब्द लिहिले म्हणून ह्यांच्या इंग्रजी नावांची पार वाट लागली आहे. प्रभू हा शब्द पोर्तुगीज दस्तऐवजांत पौरोबो असा लिहिला जातो तर शेणवी चा सीनाय होतो. रामचंद्र, विनायक, दामोदर, नरसिंह इत्यादी नावांची स्पेलिंग्स तर भयंकर आहेत.
5 May 2022 - 3:57 pm | कंजूस
मार्मगावो?
10 May 2022 - 9:06 pm | कपिलमुनी
पाळोले शेजारी पाटणे बीच आहे , तो अजून निवांत आणि सुंदर आहे
28 May 2022 - 6:50 pm | सोत्रि
पाटणे बीच बद्दल ह्या धाग्यात लिहिले होते - गोंय (गोवा) - पाटणें बीच - १
- (भटक्या) सोकाजी
28 May 2022 - 6:59 pm | कंजूस
भारतीय पर्यटक समुद्राची मजा कशी घेतात?
25 May 2022 - 11:53 am | साहना
काणकोण मध्ये आमचे एक मित्र होते त्यामुळे बराच काळ तिथे मी जाऊन राहिले आहे. काणकोण मध्ये अनेक वेताळ मंदिरे/भग्नावशेष आहेत पाहू शकता. मोठे वेताळ मंदिर पैगीण मध्ये आहे. जवळच कारवार हे कर्नाटकी बंदर आहे तिथे जावे तिथे टागोर समुद्रकिनारा आहे, रॉक गार्डन आहे ते पाहावे, अमृत हॉटेल मध्ये मासे खावे. त्यानंतर गोव्यांत पोळे मध्ये काही मासे वाली बार आणि रेस्टोरंट आहेत तिथे मासे खावेत. गाल्जीबाग चा समुद्रकिनारा अत्यंत निरव आणि शांत आहे. अजिबात गर्दी नसते. तिथे कासवांचे कॉन्सर्व्हेशन आहे पण मी कधी कासव पहिले नाहीत. पैगीण मध्ये छोटी छोटी चहाची दुकाने आहेत तिथे चहा ढोसावा. बेकरी मधून गरम गरम पाव आणि उंडे घ्यावेत. गोव्याची केळी सुद्धा जास्त स्वादिष्ट असतात.
अगोंडा, काबा दे राम (काणकोण जवळ आहे) आणि पाळोळे हे बीच मस्त आहेत. पाळोळे हा मोठा गजबजलेला बीच आहे कलंगुट प्रमाणे. इथे शक्यतो पैसे खर्च करूच नयेत. बामणबुडी हा धबधबा थोडा अत्यंत ग्रामीण भागांत आहे पण तुम्हाला तिथे जाणे शक्य झाल्यास जा.
आपले वाहन असल्यास आणि दिवसाला १ तास कम्युट शक्य असल्यास कारवार मध्ये राहा आणि सकाळी उठून काणकोण मध्ये प्रवेश करा. कारवार मध्ये जास्त चांगली हॉटेल्स असतात आणि फार स्वस्त असतात असा अनुभव आहे.
बाकी
१. वाहने जपून चालावा. वाहनातून कचरा बाहेर फेकू नका.
२. दारू पिऊन नका गाडी चालवू. (फेणी माझ्या मते अत्यंत ओव्हर रेटेड आहे)
३. काजू घेताना फक्त झांट्ये चे सफेद वाले बिन मिठाचे घ्या. सर्वांत महाग असले तरी अत्यंत उच्च दर्जाचे असतात.
४. टॅक्सी वाले एक नंबरचे लबाड आहेत.
५. शक्यतो सौम्य कपडे घाला. लक्षवेधी काही करू नका.
६. बहुतेक बेकायदेशीर वाटणाऱ्या गोष्ट पूर्णता ट्रॅप्स असतात. सापडू नका.
७. गोव्यांत जागो जागी ATMs आहेत त्यामुळे जास्त कॅश ठेवण्याची गरज नाही.
25 May 2022 - 4:11 pm | कंजूस
काय काय खजिना सापडला कळेलच.
25 May 2022 - 5:28 pm | चौथा कोनाडा
करमाळा, सोलापुर जिल्हा येथे येत्या १५-२० दिवसात किमान २-३ दिवस घालवण्याचा विचार आहे... सोलापुर जिल्ह्यात प्रथमच जात आहे. तरी जाणकारांनी काय काय करू शकतो ( कुठल्या स्थळांना भेटी दयाव्यात, खाण्याची उत्तम ठिकाणे, तिकडे घ्यावयाची काळजी वैगरे वैगरे) या बद्दल सल्ला द्यावा.
25 May 2022 - 7:08 pm | कानडाऊ योगेशु
इतक्या उन्हाळ्यात तिकडे का जाताय भौ!
बाकी सैराट मधली काही लोकेशन्स करमाळ्यामधलीच आहेत असे ऐकले/वाचले आहे.
25 May 2022 - 7:31 pm | मुक्त विहारि
कधीही आणि कसाही ...
आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, डाॅन, शोले, त्रिशूल, जंजीर आणि अमर अकबर अॅथनी बघायला काळवेळ बघायची नसते, तसेच गोव्या बाबतीत आहे.....
27 May 2022 - 5:55 pm | चौथा कोनाडा
काम निघालंय त्या बाजूला, हे पण उरकता येतंय का ते बघतो !
हो राव, लक्षातच आलं नव्हतं !
धन्यू का.यो.
27 May 2022 - 1:01 pm | असंका
मिपावरचा एक धागा-
27 May 2022 - 5:51 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, असंका !
छान माहिती आहे या धाग्यावर !
28 May 2022 - 6:35 pm | सिरुसेरि
पंढरपुर , भिगवण , अकलुज , उजनी आणी बॅक वॉटर हि ठिकाणे करमाळ्यापासुन जवळ आहेत .