मे महिना सुरु झाला आहे, ग्रीष्मातला सूर्य आग ओकतोय, बाहेर पाहिलं तर फक्त रखरखीत वातावरण, टळटळीत ऊन, असह्य उकाडा, जीवाची काहिली होतेय. अशा वातावरणात एक थंड हवेची झुळूक यावी, पावसाचा शिडकावा होऊन आसमंत मातीच्या सुगंधाने दरवळू लागावा, असं वाटत राहतं. अशीच उन्हाळ्यातून थोडी सुटका करून घेण्यासाठी मिपा आयोजित करत आहे - मिपा शतशब्दकथा स्पर्धा - २०२२
शतशब्दकथा हा विशेष लेखनप्रकार आहे.
केवळ सरळधोपट कथा सांगणे हा या लेखनप्रकाराचा मूलभूत उद्देश नसतो.
• बरोब्बर १०० शब्दांमध्ये कथा सांगणे आणि
• शेवटच्या शब्दात / वाक्यात वाचकाला अनपेक्षित धक्का बसेल असा कथेचा शेवट करणे,
ही या कथाप्रकाराची दोन कळीची लक्षणे आहेत.
स्पर्धेसाठी विषयाचे कोणतेही बंधन नाहीये, पण लेखनासाठी काही नियम आणि अटी आहेत -
१) धागा प्रकाशित झाल्यानंतर स्पर्धा लगेचच सुरू होईल आणि २५ मे २०२२ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल.
२) स्पर्धकांनी आपली कथा साहित्य संपादक या आयडीला व्यनिने पाठवायची आहे.
साहित्य संपादकांना व्यनि पाठवण्यासाठी क्लिक करा.
कोणत्याही साहित्य संपादकाला वैयक्तिक व्यनि किंवा मिसळपावच्या अथवा सासंच्या ईमेल आयडीवर किंवा अन्य कोणत्याही दुसऱ्या मार्गाने कथा पाठवू नये.
३) प्रत्येक सदस्य जास्तीत जास्त २ (अक्षरी दोन फक्त) शशक पाठवू शकतात. मतदान दोन्ही कथांना होईल, मात्र जर दोन्ही कथांची मते विजयी क्रमांकाच्या यादीत आली, तर दोन्हींपैकी ज्या कथेला जास्त मते मिळालेली असतील, ती एकच कथा विजेती धरली जाईल.
४) ०३ मे २०२२ ते २५ मे २०२२ या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कथा स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ लेखकाचे नाव जाहीर होणार नाही. ('कथा बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात' हा आक्षेप घेतला जाऊ नये, म्हणून हे करण्यात आले आहे.). स्पर्धा संपल्यावर सर्व लेखकांची आणि त्यांच्या कथांची ओळख जाहीर करण्यात येईल.
५) मूळ लेखकाने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कथेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाउंटवर आपली ओळख कथालेखक म्हणून जाहीर केल्याचे निदर्शनास आल्यास ती कथा रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल.
६) साहित्य संपादक कथा प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या शतशब्दकथेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधन वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल.
७) लेखकाने कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Wordमध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.
८) तसेच, कथेत कोणतीही चित्रे, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कथा प्रकाशित केली जाईल.
९) जातिधर्माला दुखावणारे वा अश्लील लेखन आल्यास कथा स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर लेखक नियमबाह्य कथा स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात.
१०) कथेला आपण देऊ इच्छित असणारे नाव व्यनिच्या विषयामध्ये लिहिलेले असावे.
११) कुठेही पूर्वप्रकाशित कथा स्वीकारली जाणार नाही.
१२) कथा आधारित असल्यास, कथेच्या शेवटी तसा स्पष्ट उल्लेख करावा. हे शब्द १००मध्ये मोजले जाणार नाहीत.
कथा प्रकाशित झाल्यावर लगेच मतदान सुरू होईल आणि दि. ३० मे २०२२ रोजी २३.५९ भाप्रवेपर्यंत करता येईल.
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.
निकाल दिनांक १ जून २०२२ रोजी घोषित केला जाईल.
लेखन करण्याविषयी / व्यनिविषयी / स्पर्धेविषयी कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास प्रतिसादांमध्ये विचारू शकता.
एक मार्गदर्शिका -
कथा मराठीमध्ये असावी. एखादे हिंदी-इंग्लिश वाक्य कथेची गरज म्हणून चालेल, पण कथा मराठीत हवी. प्रमाण मराठी, झाडीबोली, वऱ्हाडी, खान्देशी, माणदेशी, सातारी, पुणेरी, आगरी, मालवणी... कोणतीही पण मराठीत हवी..
प्रतिक्रिया
3 May 2022 - 2:24 pm | ज्ञानोबाचे पैजार
भारी,
पाठवणार शशक
पैजारबुवा,
3 May 2022 - 4:52 pm | विश्वनिर्माता
धन्यवाद 😀
पाठवणार.
3 May 2022 - 8:54 pm | चांदणे संदीप
मिपाच्या शब्दसागरात खूप दिवसांनी पुन्हा एकदा शशकची भरती येणार.
अनेक चांगल्या चांगल्या शशकांच्या प्रतिक्षेत,
सं - दी - प
3 May 2022 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वाह ! आपलं धोरण प्रोत्साहनाचं. लेखकांना लिहिते करू.
-दिलीप बिरुटे
4 May 2022 - 12:17 pm | तुषार काळभोर
"लढ" म्हणणारा हात पाठीवर हवाच!
5 May 2022 - 3:42 pm | अनन्त्_यात्री
एकही शशक प्रकाशित नाही?
7 May 2022 - 4:45 pm | सिरुसेरि
धन्यवाद . १०० शब्द मोजण्यासाठी एखादी खात्रीशीर वेबसाईट असल्यास सुचवावी .
8 May 2022 - 12:07 am | तर्कवादी
बोट लावून मोजायचं की हो सरळ...
8 May 2022 - 1:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो हो.....! कोण पाहतंय आपल्याला आपण काय कुटाने करतोय म्हणून. :))
-दिलीप बिरुटे
8 May 2022 - 1:15 pm | भागो
शब्द शंभरपेक्षा थोsssssडे जास्त किंवा थोssssssडे कमी असतील तर काय होईल?
8 May 2022 - 3:37 pm | साहित्य संपादक
ती शशक राहणार नाही:)
9 May 2022 - 6:33 am | सुरसंगम
कथा पाठवुनही प्रसिद्ध झाली नाही. तर काय कारणाने रद्द झाली हे लेखकांना कळवलं जातं का?.
12 May 2022 - 5:52 am | कर्नलतपस्वी
कथा वाचतोय,लेखक खरोखर छान लिहीत आहे. सुरवातीला कळले नाही पण आता प्रत्येक शशक लक्षात येत आहे.
छान उपक्रम.
12 May 2022 - 6:44 am | कुमार१
काही प्रतिसादक कथेच्या धाग्यावर + १ लिहिताना ते उपप्रतिसादात पण लिहीत आहेत
असे मत हे कथेला दिलेले असते की वरच्या एखाद्या अन्य वाचकाच्या प्रतिसादाला ?
आपले धोरण स्पष्ट व्हावे
आभार !
स्पर्धा उत्तम !
12 May 2022 - 8:03 am | साहित्य संपादक
उपप्रतिसादात +१ असेल तर तो त्या प्रतिसादाला आहे, असं गृहित धरले जाईल.
केवळ मूळ कथेला आलेले +१ प्रतिसाद मतदान म्हणून मोजले जातील.
(अपवाद - उपप्रतिसादात जर स्पष्ट निर्देश असेल, तर तो मतदानात मोजला जाईल. उदा '+१ कथा आवडली.')
12 May 2022 - 6:29 pm | तर्कवादी
काही कथा "जनातलं मनातलं" विभागात प्रसिद्ध होत आहेत आणि त्यांच्या शीर्षकात "शशक २०२२" पण वगळलं गेलंय. या कथा स्पर्धेत आहेत काय ?
12 May 2022 - 8:10 pm | कासव
व्यनि करता येत नहिय.
Access denied
You are not authorized to access this page.
असा संदेश दिसत अहे.
12 May 2022 - 10:44 pm | तर्कवादी
दुसरी टॅब ओपन होते तेव्हा तुमचे लॉगिन झालेले नसते .. पुन्हा लॉगिन करा किंवा मग वरील लिंकवर क्लिक न करता सरळ व्यक्तिगत संदेश मध्ये जावून नवीन संदेश बनवा व साहित्य संपादक आयडीला पाठवा
स्पर्धेकरिता शुभेच्छा
13 May 2022 - 11:49 am | कासव
संपादकअना मेल केला आहे बघु
13 May 2022 - 11:50 am | कासव
संपादकअना मेल केला आहे बघु
13 May 2022 - 11:50 am | कासव
संपादकअना मेल केला आहे बघु
13 May 2022 - 4:14 pm | सिरुसेरि
एक निरिक्षण . मिसळपाव साईटवर पीसी / लॅपटॉप द्वारे लॉगिन होते . पण तेच मोबाईलद्वारे करताना सेम एरर मेसेज येतो .
Access denied
You are not authorized to access this page.
13 May 2022 - 8:34 pm | Bhakti
होय,
मला वाटतं या धाग्यावरच
साहित्य संपादकांना व्यनि पाठवण्यासाठी क्लिक करा.
हे वाक्य एकतर काढून टाकावे किंवा समस्या दूर करावी.ही लिंक उपलब्ध नाहीये.
13 May 2022 - 5:48 pm | चष्मेबद्दूर
मा. सा. सं.,
मी श श क पाठवू शकत नाहीये. अॅक्सेस denied असा निरोप येत आहे. काय करावे?
13 May 2022 - 8:00 pm | कुमार१
गेले पंधरा दिवस मिपाचे कुठलेही पान उघडायला खूप वेळ लागत आहे. वाय-फाय असो नाहीतर मोबाईल डेटा - दोन्हीकडे तोच अनुभव येतो आहे.
बहुतेक कथा स्पर्धेमुळे यंत्रणेवर ताण असावा काय ?
13 May 2022 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फारच स्लो झालंय मिपा. स्पर्धेमुळे तो तान नसावा असे वाटते.
रहदारी वाढलीय हे खरे आहे. पण त्यामुळे होतंय असे वाटत नाही.
-दिलीप बिरुटे
16 May 2022 - 1:14 pm | प्रसाद गोडबोले
उत्तम संकल्पना !
ह्या शतशब्दकथा स्पर्धेमुळे मिपाच्या मुखपृष्ठावरील राजकारण अन तस्तम विषय विषय मागे पडुन काहीतरी नवीन क्रियेटीव्ह वाचायला मिळाले !
अशाच स्पर्धा दर ऋतुत भरवता येईल जेणे करुन कहीतरी भारी वाचायला मिळेल , जसे की ग्रीष्म - शशक स्पर्धा , वर्षा - प्रवासवर्णन/ भटकंती स्पर्धा , शरद - काव्य स्पर्धा वगैरे वगैरे !!
बाकी शशक ला मिळालेला प्रतिसाद पाहुन भारी वाटले आहे !! संयोजकांचे / साहित्य संपादकांचे जोरदार अभिनंदन आणि आभार !
16 May 2022 - 1:55 pm | Bhakti
+१
मोजले नाही.कथांचेही शशक व्हावे.
24 May 2022 - 11:50 am | ज्ञानोबाचे पैजार
उद्या स्पर्धेसाठी कथा पाठवायचा लाष्ट डे आहे.
ज्यांनी अजून कथा पाठवल्या नाहीत त्यांना आता घाई करायला हवी.
पैजारबुवा,
24 May 2022 - 1:30 pm | प्रमोद देर्देकर
स्पर्धेत कथा आली तर तिला फक्त अधिकारी उणे गुण देता यावेत दिले पाहिजेत.
उगाच असं लिहलं असतं तर असं अपेक्षित होतं प्रतिसादने बाकी वाचणारे गुण न देता पहिल्या सभासदांच्या प्रतिसादचीच री ओढतात.
ह्याने गुण कमी होतात वा इतर वाचक तिकडे फिरकत नाहीत.
इतर वेळी लेखक प्रत्युतर करू शकतो/ बदल करू शकतो इथे ती सोय नाहीये.
24 May 2022 - 4:40 pm | VRINDA MOGHE
शक्यतो फक्त गुण द्यावेत. कथा समजली नसेल तर तसं मत व्यक्त करावं.
24 May 2022 - 2:34 pm | भागो
वरील प्रतिसादास पूर्ण अनुमोदन. बऱ्याच वेळी तर प्रतीसादकास शशकाचे मर्म समजले कि नाही असा संशय येतो.
24 May 2022 - 4:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
एखादा छोटासा आशय असलेली कथा शंभर शब्दात वाचायला मजा येते.
पण जर लेखकाने दिर्घकथेचे किंवा कादंबरीचे मटेरीयल शशक मधे भरायचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न नक्कीच फसणार. कारण लेखकाला अपेक्षित आशय वाचकांपर्यंत पोहोचणारच नाही आणि मग उलटसूलट प्रतिसाद येणार.
यात वाचकांचा / प्रतिसादकांचा काही दोश आहे असे वाटत नाही.
पैजारबुवा,
24 May 2022 - 5:39 pm | भागो
पैजारबुवा,
इतर वेळी लेखक प्रत्युतर करू शकतो/ बदल करू शकतो इथे ती सोय नाहीये.
हा मुद्दा महत्वाचा नाही काय?
25 May 2022 - 10:25 am | ज्ञानोबाचे पैजार
एखादे लेखन प्रकाशित करणे हे गोलंदाजी करण्यासारखे असते.
एकदा गोलंदाजाने चेंडू टाकला की तो कसा फटकवायचा हे सर्वस्वी फलंदाजाच्या हाती असते. जर गोलंदाजीत काही सुधारणा करायच्या असतील तर त्या पुढचा चेंडु टाकतानाच करायच्या असतात.
तसेच लेखाचे आहे. एकदा लेखन प्रकाशित झाले की त्यावर वाचकांनी काय प्रतिक्रिया द्यायची हा सर्वस्वी वाचकांचा प्रश्ण आहे.
फलंदाजाला झेल द्यायला भाग पाडणे हे जसे गोलंदाजाचे कसब आहे, तसेच चांगले लेखन करुन वाचकांना खिळवून ठेवून त्यांना चांगल्या प्रतिक्रिया द्यायला भाग पाडण्याचे कसब लेखकाकडे असले पाहिजे.
लेखकाला आपल्या लेखना विषयी अधिकचा खुलासा करावा लागतो याचाच अर्थ मुळ लेख वाचकांपर्यंत योग्य रितीने पोचवण्यात लेखक अयशस्वी झाला आहे असाच होतो.
लेखकाने लेख प्रसिध्द करायच्या आधी चहूबाजूंनी विचार करुनच लिहिला पाहिजे, तसे करण्यात तो कमी पडला तर नाउमेद न होता पुढच्या वेळी अधिक काळजी घेउन त्याने लेखन केले पाहिजे.
आपले प्रत्येक लेखन हे वाचकांनी डोक्यावरच घेतले पाहिजे हा आग्रह नसावा. किंबहुना लेखन हे स्वांतसुखाय असेल तर त्याचा आनंद लेखकाला अधिक घेता येतो
लेख प्रकाशित करतानाच "गंगार्पणमस्तु" असे म्हणून प्रकाशित करावा आणि पुढच्या लेखाची तयारी करायला घ्यावी हे सगळ्यात उत्तम.
याने डोकेही शांत रहाते आणि झोपही चांगली लागते. :)
पैजारबुवा,
25 May 2022 - 10:50 am | कुमार१
साहित्य-क्रिकेट आवडले !
25 May 2022 - 11:01 am | तर्कवादी
पुर्णतः सहमत
शिवाय फक्त स्पर्धा जिंकणे हे एकमेव उद्दिष्ट असू नये. आलेल्या प्रतिक्रियांवर विचार करुन भविष्यात लेखनात आणखी सुधारणा करता येतील.
25 May 2022 - 11:16 am | तुषार काळभोर
बहुमोल मार्गदर्शन..
लेखकांना आणि वाचकांनाही!!
26 May 2022 - 4:24 am | कर्नलतपस्वी
माऊली,प्रतीसाद खुपच समर्पक, आवडला.
प्रकाशित झालेले शशक म्हणजे अश्वत्थाम्याने सोडलेले ब्रम्हास्त्र मागे घेणे ,दिशा बदलणे लेखकाच्या हातात नाही.
लेखकाने प्रतीसादकांना स्पष्टीकरण देण्याने स्पर्धेचा मुळ उद्देश साध्य होणार नाही.वाचकांनी सुद्धा फक्त +१ टंकावे. -१,आवडली नाही,कळली नाही किवां स्पष्टीकरण देण्याचे टाळावे. लेखका सोबत वाचकांची सुद्धा स्पर्धा आहे. माझे मत.
संपादक मंडळाचे अभिनंदन.उपक्रम खुपच आवडला.
25 May 2022 - 11:24 am | भागो
पैजारबुवा
माझाच चुकलंं. माफ करा. पुन्हा नाही अशी चूक करणार.
25 May 2022 - 12:37 pm | ज्ञानोबाचे पैजार
तुम्हाला दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. तसे तुम्हाला जर वाटले असेल तर मला क्षमा करा.
तुम्हाला होत असलेल्या त्रासातुन कधी काळी मी सुध्दा गेलेलो आहे, तेव्हा चार युक्तीच्या गोष्टी सांगून तुमचा त्रास कमी करावा इतकाच उद्देश त्या प्रतिसादामागे होता.
एकदा शांतपणे नक्की विचार करुन बघा त्यावर माझे म्हणणे नक्की पटेल तुम्हाला.
पैजारबुवा,
25 May 2022 - 1:33 pm | भागो
मला कोणताही त्रास नाही. पाच महिन्यापूर्वी खूप सिरिअस प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा दीनानाथमध्ये जाऊन ऑपरेशन करून टाकले.
पण आपण शशक आणि त्यावरील प्रतिसादांबद्दल बोलत होतो. मी माझी चूक मानली न. वाद संपला. कान पकडलेला भावला.
माझ्या बद्दल बोलत असाल तर मी सर भवभूतींचा फालोवर आहे.
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः ।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥
Those who deride or ignore my work —
let them know: my efforts are not for them.
There will come along someone who shares my spirit:
the world is vast, and time endless.
28 May 2022 - 1:56 pm | साहित्य संपादक
प्रवेशिका पाठवण्याची मुदत काल रात्रीपर्यंत होती. काल रात्री आलेल्या प्रवेशिका आज प्रकाशित केल्या आहेत.
शंभर शब्दात गोष्ट सांगण्याचे कसब पणाला लावून सदस्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. साठ+ कथा या स्पर्धेत आहेत.
आता वाचकांची जबाबदारी. निर्णय वाचकांनी घ्यायचाय.
आपल्याला आवडलेल्या कथांवर मतदान करा. +१ लिहायला विसरू नका!
सर्व स्पर्धक सदस्यांचे मनःपूर्वक आभार!
मतदान दि. ३० मे २०२२ रोजी २३.५९ भाप्रवेपर्यंत करता येईल.
26 May 2022 - 8:04 am | सुरसंगम
बुवांचा असे प्रतिसाद मीपवार बरेच वेळा आलेत.
पारायणे झालीत.
मुळात तुम्हाला मुद्दा समजला नाहीये.
एकदा लेखन प्रसिद्ध झालं की लेखकाच्या हाती काहीच उरत नाही हे खरंच आहे.
पण ही शशक स्पर्धा आहे. नियमानुसार त्यात निकाल लागे पर्यंत बदल होऊ शकत नाही.
आणि म्हणूनच जे लोक.....
असं लिहलं असतं तर, असं अपेक्षित होतं, जरा वेगळा शेवट व्हायला हवा होता वगैरे लिहतात त्यांनी खरं तर तिथेच त्यांना काय अपेक्षित आहे हे लिहलं पाहिजे. म्हणजे पुढील वेळी नवोदित लेखकांना त्या कोनातून विचार करता येईल. इतर वाचकांनाही तो शेवट कसा असू शकतो हे समजेल.
एखाद्या गाण्याला जश्या अनेक चाली असतात तसें कथेलही अनेक शेवट असू शकतात हे मान्यच आहे पण ते जाहीर करायला काहीच हरकत नाही. करणं कथेत बदल अशक्य आहे. त्यामुळे बाकीच्या लेखकांना घाबरण्याचं करणं नाही.
26 May 2022 - 8:56 am | भागो
पन्नास कथा या स्पर्धेत आहेत.
???
फक्त पन्नासच?
26 May 2022 - 9:04 am | चेतन सुभाष गुगळे
मी मोजल्यात तर त्या ६४ भरल्या. संपादकांनी १४ बाद केल्यात की काय? किंवा ६४ कथा लिहिणारे स्पर्धक मात्र ५० च असू शकतील.
26 May 2022 - 9:11 am | ज्ञानोबाचे पैजार
पण १४ बाद केल्या नसाव्या, कारण सगळ्याच्या सगळ्या ६४ धाग्यांवर प्रतिसाद / मतदान करता येते आहे.
त्या पैकी काही बाद असते तर ते धागे किमान वाचन मात्र तरी झाले असते.
बहुतेक त्यांना "स्पर्धेत ५० पेक्षा जास्त कथा आहेत" असे म्हणायचे असावे.
पैजारबुवा,
31 May 2022 - 6:33 pm | तर्कवादी
संपादक महोदय,
आता लावून टाका निकाल .. आणि सर्व लेखकांची नावेही जाहीर करा..
31 May 2022 - 7:45 pm | अमरेंद्र बाहुबली
बक्षीसे काय आहेत पण स्पर्धेत??