दोन क्षण विरंगुळ्याचे - पानशेत

Primary tabs

मालविका's picture
मालविका in भटकंती
25 Apr 2022 - 1:14 pm

श्रीनिवास च्या भावाबहिणींच्या गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्ही सगळे भेटलो. पानशेतला त्याच्या बहिणीच फार्म हाऊस आहे. तिथे जमायच ठरलं. पानशेतला मी प्रथमच जात होते. शिवाय श्रीनिवास च्य भावाबहिणींना भेटायची उत्सुकता होती.

सलग सुट्टी आल्याने आम्ही आधी औरंगाबाद - शेगाव दौरा करून साधारण साडेतीन/ चारच्या दरम्यान पानशेतला पोहोचलो. पानशेतच धरण दिसल आणि नंतर दिसणार्या पाण्याने डोळ्यांचा बरं वाटलं. औरंगाबाद, नगर असे रखरखीत प्रदेश पार करून आल्याने या पाण्याच्या नुसत्या दर्शनाने डोळ्यांचा थकवा दूर गेला.गुगल मॅप प्रमाणे चाललो होतो . हळूहळू वस्ती विरळ होऊन डोंगर चढायला लागलो. अजूनही रिसॉर्ट लागत होती पण संख्या खूपच कमी झाली होती. दोन रिसॉर्ट मधील अंतरदेखील वाढलं होत. एका बाजूने डोंगर आणि एका बाजूने पानशेतचा जलाशय. भर उन्हात देखील तिथली शांतता मनाला भुरळ घालत होती. कुठेही न चुकता फार्म हाऊस वर येऊन दाखल झालो. सगळीकडे शांतता होती. त्यांच्या फार्म हाऊसचा आजूबाजूला देखील कुठेच आरडाओरडा किंवा गजबजाट नव्हता.
डोंगराच्या उतारावर त्यांचा बंगला बांधलेला आहे. उताराचा योग्य वापर करून बंगला बांधून त्याखाली पार्किंगची सोय खूपच छान आहे. बंगल्यासमोर छान गझीबो बांधलेला. त्यासमोर पानशेतचा विस्तीर्ण जलाशय पसरलेला. पहिल्याच दर्शनाने मन तृप्त झालं. घरी जाऊन सगळ्यांना भेटलो. जरा उन्हं उतरली तशी त्या बंगल्याच्या आवारात राउंड मारायला निघालो. अनिल काकांनी लावलेली विविध प्रकारची झाडं बघत, फोटो काढत त्या चढ उतारावर हिंडत होतो. शेवटी त्या गझीबोमध्ये आलो. ग्रुप फोटो, सिंगल फोटो वगैरे झाल्यावर निवांत गप्पा मारत बसलो. मूलं तर उंडारली होती.
तिथून दिसणारा जलाशयाचा देखावा खरंच अप्रतिम होता. सगळीजण आरामात होती. ना कुठे जायची घाई, ना काही करायची घाई. थोड्याच वेळात चहा आणि बरोबर केक, चकली असं काही बाही खायला आलं. सगळेजण गप्पांमध्ये रंगले होते. नवीन नवीन विषय, जुन्या आठवणी निघत होते. त्या दिवशी पौर्णिमा होती. सूर्यास्त झाला आणि थोड्याच वेळात पूर्वेकडून चंद्र आला. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र फारच मोहक दिसत होता. थोड्याच वेळात गप्पा आटोपत्या घेऊन सगळे घराकडे चाललो. तरीही आम्ही ४/५ जणी रेंगाळलो तिथेच आणि तेव्हढ्यात लाईट गेले. बरोबरीच्या बाकीच्या जणी पण घरी परतल्या. मी एकटीच तिथे थांबले. तो अप्रतिम नजर डोळ्यात साठवत होते. लाईट गेल्याने तर उलट त्या जागेच सौंदर्य आणखी वाढलं होत. फक्त चंद्राच्या प्रकाश सगळीकडे पसरला होता. त्या तेव्हढ्या प्रकाशातही आजूबाजूचा परिसर लख्ख दिसत होता. अगदी पुस्तकात वर्णन केलेलं असत ना तसा तो परिसर चंद्राच्या प्रकाशात उजळून निघाला होता. चंद्राचा शीतल प्रकाश, थंड हवेची येणारी सुखद झुळूक, निरव शांतता, समोर असणारं चित्रमय दृश्य आणि हवाहवासा एकांत एवढं मिळाल्यावर आणि काय हवं? श्रीनिवास तेव्हढ्यात आला, ५ मिन गप्पा मारून जाऊया म्हणून त्या देखाव्याचा निरोप घेऊन आम्ही घराकडे वळलो.

अगदी थोड्याच वेळात लाईट आले. रात्री परत एकीकडे खाणं आणि गप्पा चालू होत्या. मुलं कॅरम, पत्ते आणि मोबाईल अश्या एकामागून एक विविध खेळात रमली होती. अनिल काकांनी सगळ्यांसाठी भरपूर आईस क्रिम आणून ठेवलं होत. सगळयांनी त्यावर ताव मारला. पण शेवटी दिवसभराची दमलेली मुलं एक एक करत झोपली. आम्ही गप्पा मारत पत्त्यांचा डाव मांडला. नाही नाही करत २ वाजेपर्यंत पत्ते खेळून मग झोपायला गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. सकाळच्या चहा बरोबर परत गप्पांचा अड्डा जमला. आदल्या दिवशी पासून श्री ने पाण्यात जायचं म्हणून अनिल काकांना भंडावून सोडलं होत. समोर पाणी तर दिसत होत पण जायला त्यांच्या जमिनीतून वाट नव्हती. पण ऐकेल तर श्री कुठला. सगळ्या मुलांची टीम आणि काही मोठे जायला तयार झाले. तिथलाच माहितगार माणूस घेऊन आम्ही चालायला लागलो. जरा उतरलो कि पाण्याशी जाऊ असं वाटत होत. पण त्या माणसाच्या पाठून कितीतरी वेळ चालतोय पण पाणी येईना अशी अवस्था झाली. एकामागून एक ३ डोंगर पालथे घातले तेव्हा कुठे थोडं जवळ आल्यासारखा वाटलं. काही मोठी माणसं परत फिरली. दोन लहान मुली स्वरा आणि जुई दोघीनाही घरी जाण्याचा धाक दाखवून झाला पण पोरी ऐकेनात. मग काय मी, श्री, अतुल काका,ते वाट दाखवणारे दादा आणि ६ पोरं अशी वरात चालत होती. मध्येच मुलांना तहान लागली पण आम्हाला देखील एवढी कल्पना नसल्याने आम्ही पाणी घेतलं नव्हतं बरोबर. मुलांना म्हटलं चला आता खाली जाऊन तिथेच पाणी पिऊ. शेवटी साधारण तीनेक किमी चालल्यावर शेवट पाणी आलं. पाणी दिसल्यावर पोर हरखून गेली. कधी एकदा पाण्यात पाय बुडवतोय, खेळतोय असं झालं त्यांना. पण त्या दादांनी सांगितलं कि पाणी खोल आहे त्यामुळे पोहायला वगैरे जाऊ नका. फक्त पाय बुडवा. पाणी एकदम नितळ,स्वच्छ आणि थंड होत. थोडं कडे कडे ला जाऊन ओंजळीत भरून भरून पोटभर पाणी प्यायल. दोन्ही लहान मुली स्वरा (साधारण २रीत) आणि जुई (साधारण १लीत) यांनी आमचं न ऐकायचं ठरवलं होत. एकमेकींवर पाणी उडवीत, पाणी पीत मजा करत होत्या. मनसोक्त पाणी दर्शन झाल्यावर परतीला निघालो. आता एवढा वेळ उतरून आलेलो परत चढत जायचं होत. त्यात ऊन डोक्यावर आलेलं. १० वाजून गेलेले. ईशान,केदार, कस्तुरी आणि श्रेया मोठी असल्याने स्वतंत्रपणे चालत होती. श्री ने स्वरा तर मी जुई चा हात धरलेला. आता त्यांना कसही करत चढवून न्यायचं होत.

इथेही मगाशी पाण्याशी झाला तसाच खेळ. घर तर समोर दिसतंय पण काही केल्या येत नाही. येतानाच रस्ता फार वळसा मारून होता म्हणून घराशेजारचाच डोंगर चढायचा ठरलं. हळूहळू सुरवात केली. मध्येच थोडं अंतर चढल्यावर एक घर लागलं. तिथे मुलांना पाणी पाजलं. तिथेच नांगरणी चालू होती. मोठ्या मुलांनी लगेच नांगर हातात धरून चालवून बघितला. सावलीत थोडी विश्रांती झाली. आणि मग तो उभा डोंगर चढायला सुरवात झाली. दुर्दैवाने फार कमी दगड आणि जास्त माती असा तो डोंगर होता. इकडचा तिकडचा आधार घेत, जरा अति साहस करत, मुलांना चिअर अप करत कसाबसा डोंगर चढलो आणि घरात आल्यावर हुश्श केलं. मोठ्या मुलांचं कौतुक आहेच पण खरी कमाल केली ती स्वरा आणि जुईने. पूर्णवेळ चालणं आणि त्यात हा डोंगर चढून पार करण हे खरंच कसोटीच होत. दोघीनींही ते फारच छान पार पाडलं. १२ वाजून गेले होते. आता परतायची घाई होती. भरभर आवरून खाण खाऊन निघालो . सगळ्या नणंदा आणि वहिनींनी प्रेमाने आम्हाला गिफ्ट दिल.

हे दोन दिवस खरंच खूप छान आणि वेगळे गेले. माझ्यासाठी काही चेहरे, नाती नवीन होती. जागा तर प्रेमात पाडणारी होती. परत नक्की भेटायचं ठरवून निरोप घेतला. शामला ताईची कमाल. त्या घराजवळ काहीही म्हणजे काहीही नव्हतं. एकही दुकान नाही कि काही नाही. त्यामुळे तिने अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार करून सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. काही कमतरता पडली नाही. ईशान आणि केदारची तर जाम गट्टी जमली कि ईशान चा पाय निघेना तिथून. असे सोहळे आनंद देतात. मनाला उभारी देतात. आणि परत भेटण्याची ओढ लावतात. हीच तर नात्याची गम्मत असते.

धनश्रीनिवास

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

25 Apr 2022 - 7:19 pm | गोरगावलेकर

आवडली भटकंती. फोटोंची जोड हवी होती.
वाचून मलाही माझी सहा वर्षांपूर्वीची पानशेत भेट आठवली आणि दोन चार फोटो द्यायचा मोहही होतो आहे

मस्त,आवडले,आणि कोणाला आवडणार नाही?
मी असतो तर मस्त सूर मारला असता त्या पाण्यात. इतके उन्हात शिणून आल्यावर साहजिक होणार

मुक्त विहारि's picture

4 May 2022 - 6:22 pm | मुक्त विहारि

त्या घराजवळ काहीही म्हणजे काहीही नव्हतं. एकही दुकान नाही कि काही नाही...

-------

निवृत्ती नंतर फार्म हाउस बांधणार असाल तर, हा विचार पण नक्कीच केला पाहिजे ...