रॅट रेस

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in काथ्याकूट
5 Apr 2022 - 6:50 pm
गाभा: 

नेहमी प्रमाणेच सर्व नैमित्तिक आटोपून प्रभात फेरी करता खाली आलो,बघतो तर काय सोसायटीच्या आगंणाचे गोकुळात रूपांतर झालेले दिसले.शाळेत जाणारी लहान मोठी मुले व त्यांना सोडवायला आलेले पालक बसची वाट बघत होते.दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या.बरेचसे मित्र आता शाळेत भेटणार याचा आनंद सर्वाच्याच तोंडावर स्पष्ट दिसत होता.काही पालक चिंतातूर दिसत होते.सहाजिकच आहे तब्बल दोन वर्षानंतर शाळा उघडत होत्या.

"हाय,नानू,गुडमॉर्निंग अकंल, नमस्कार काका" आशी संमिश्र अभिवादने कानावर पडली.आमची सोसायटी म्हणजे एक छोटेसे गाव. सुरूवाती पासून सांस्कृतिक,धार्मिक राष्ट्रीय उत्सव एकत्र साजरे करत आल्यामुळेच बर्‍यापैकी एकोपा व माणूसकी टिकून आहे. मोठ्यांबद्दल आदर आहे, लहानांबद्दल प्रेम आहे. एका चिमुकली च्या शस्त्रक्रिये साठी काही लाखाची रक्कम थोड्याच दिवसात जमा झाली.

मुलांचा उत्साह बघताना खरोखरच आनंद झाला.नवीन पोशाख (युनिफार्म,प्रत्येक शाळेचा वेगळा)पाण्याची बाटली,पाठीवरची बॅग आणी गळ्यात टांगलेले शाळेचे ओळखपत्र आसा सर्व तामझाम.

आता विसाव्याचे क्षण,तसे बघायला गेले तर एकदम साधी गोष्ट.या आगोदर पण मुले शाळेत जात होती,स्कूल बस येत होती पण माहामारीच्या पार्श्वभूमीवर हिच गोष्ट अनन्य साधारण,महत्वाची ठरली.

मन भूतकाळात गेले. बालपणचे,शाळेचे दिवस आठवू लागले.योगेश्वर अभ्यंकर यांचे एक गीत,"शाळा सुटली पाटी फुटली", आठवले.लहापणी आकाशवाणी वर कुंदा बोकील यांच्या स्वर्गीय आवाजात बरेच वेळा ऐकले होते.

https://youtu.be/X9eP5bzHNhs

"शाळा सुटली पाटी फुटली".या रचनेचे कोणत्या वात्रट मुलानी विडंबन केले माहीत नाही पण हे विडंबन पैतृक संपत्ती प्रमाणे पिढी दर पिढी हस्तांतरित होत गेले. कोणता छंद कोणते वृत्त माहीत नाही पण प्रत्येक मुलाच्या तोंडी आसायचे.

विडंबन

"शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भग्यानी मारलं
त्याच्या काय बापाच खाल्लं"

कुंदा बोकील आताच्या पिढीला माहीत असतील नसतील पण त्यांनी गायलेली ती सुमधूर गाणी आजुनही रसिकाच्या कानात व मनात रेगांळत आहेत.

निळा सावळा नाथ
अशी ही निळी सावळी रात..

अभिमानाने मीरा वदते,
हरिचरणांशी माझे नाते..

वैकुंठीचा राणा तूची नारायणा..

शाळा सुटली पाटी फुटली..

या चिमण्यानों परत फिरा रे
घरा कडे आपुल्या.....

सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागूती तुला कधी फिरायचे....

गीतकार योगेश्वर अभ्यंकर प्रतिभाशाली,प्रसिद्ध गीतकार.

"ज्योत दिव्याची मंद तेवते",
"विजय पताका श्रीरामाची",
"रुसला मजवरती ग कान्हा"
या सारखी अजरामर गाण्यांचे निर्माते. विषयांतर बाजुला ठेवू.

आमच्या लहानपणी मुलांची आणी मुलींची शाळा वेगळी, मराठी शाळा वेगळी,(इयत्ता पहिली ते सातवी) इंग्रजी शाळा वेगळी,(इयत्ता आठवी ते आकरावी). मराठी शाळेचे एखाद्या धनिकांच्या वाड्यातील खोल्यांत काही वर्ग भरायचे.दोन तीन वेगवेगळ्या वाड्यात वेगवेगळे वर्ग मीळून आमची शाळा.कुणाची माळावर,कुणाची तेली आळीत तर कुणाची कुंभार वाड्यात.शाळेतले वर्ग म्हणजे पिवळ्या मातीच्या रंगात रंगवलेल्या भिंती,निळ्या रंगात लिहीलेले सुविचार,सारवलेली जमीन आशी ऐसपैस खोली,एक फळा व एक गुरूजी.पुढे जिल्हापरिषदने एकत्रीत नवी इमारत शाळे करता बनवली. शाळेचे नाव जीवन शिक्षण मंदिर पण सर्वजण तीला नवी शाळाच म्हणायचे. प्ले ग्राऊंड म्हणजे संपुर्ण गाव.
चौथी टकळीने पेळू बनवणे ,पाचवी सूतकताई,सहावी चरखा,सूतकताई आणी सातवीत हातमागावर "कापड धंद्याचे " शिक्षण.

सात जूनला शाळा उघडायच्या. पाटी दप्तर,बसकर(खाली बसण्या साठी).सहा वर्षाचा घोडा झाला की शाळेत जायचं आसा दडंक. "मालगुडी डेज",मधे स्वामी व त्याच्या कुटुंबीयांचे मस्त वर्णन दाखवले आहे.

"वह्या पुस्तकांच ओझ नव्हतं
पायात बुटमोज नव्हतं
आकरा नंबरची गाडी होती
गुढग्यापोत्तूर चड्डीची नाडी होती

पुस्तका शिवाय धडा होता
पंतोजीचा आवाज चढा होता
हातात चिंचेचा आकडा
ओठावर एकोणतीसचा पाढा होता

शाळा म्हणजे टशन होतं
मित्रां सोबतच जशन होतं
गणित,इतिहस भूगोल शास्त्र
सगळ्याचं गुर्जी मात्र एकच होतं

डब्यात पिझ्झा बर्गर अन
बिसलेरीच ओझं नव्हतं
कांदा भाकरी अन नळाचं पाणी
पण शरीर दगडा वाणी होतं

परीक्षेचा धाक नव्हता
टक्केवारीच भ्या नव्हतं
पुढच्या वर्गात घातला
एवढच आईबापाला पुरे होतं"


आताच्या व त्यावेळच्या शिक्षण पद्धतीत फरक आहे का? आता पालक, शिक्षक आणी विद्यार्थ्यांवर जबरदस्त तणाव, "रॅट रेस",च्या युगात बालपण कोमेजून जातयं, आपेक्षांच ओझे मानसिक संतुलन बिघडवतयं, सारे काही अवघड होऊन बसलयं आसे वाटते.
अर्थात आमची चांगली तुमची वाईट आसा विचार नाही. पहिली मध्ये संगणका सारखे जटील विषय, शाळेनंतर हा क्लास तो क्लास यात बालपण भरडून तर निघत नाही ना? एका बाजूस गरीब तबक्यातला विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत अव्वल येत आहेत तर सुखवस्तू मानसिक रोगाचे शिकार होताना दिसतात. कारण शोधणे आवश्यक वाटते.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

5 Apr 2022 - 7:15 pm | कंजूस

१) हल्ली लहान मुलं व्यवहाराचे गणित लवकर शिकतात. चिंचेच्या फोकाने बदडून शिकवले ते खोटे हे त्यांना माहिती आहे.
२) रेस कशी जिंकायची त्यांना समजते.
३) जुन्या पिढीने पुन्हा डोळे उघडून उघडी शाळा पाहायला शिकले पाहिजे.

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2022 - 12:23 pm | चौथा कोनाडा

सहमत !

कर्नलतपस्वी's picture

6 Apr 2022 - 2:17 pm | कर्नलतपस्वी

अवास्तव आपेक्षांच ओझं लहान मुलांवर टाकली जात आहे. त्याला परफेक्ट व आऊटस्टॅडिग बनवण्याच्या नादात त्याचे बालपण हिरावून घेतल जातयं का?
पहिलीच्या मुलाला शिकवणी,कराटे,संगीत,कन्टेट रायटिंग
आरे बच्चे की जान लोगे क्या

सायकल शिकवा,पोहणे शिकवा,किल्ले ट्रेकिंग करा,त्याच्या बरोबर वेळ घालवा.
त्याला मित्रांबरोबर उंडारू द्या.

मुद्दा हा आहे.

पहिलीच्या मुलाला शिकवणी,कराटे,संगीत,कन्टेट रायटिंग
आरे बच्चे की जान लोगे क्या

सायकल शिकवा,पोहणे शिकवा,किल्ले ट्रेकिंग करा,त्याच्या बरोबर वेळ घालवा.
त्याला मित्रांबरोबर उंडारू द्या.

.
सायकल, पोहोणे, किल्ले, ट्रेकिंग तरी कशाला?
नुसतेच उंडारु द्या. त्यांना वाटले तर स्वतःहून शिकतील, नाहीतर नाही.
.
मुख्य मुद्दा त्यांचे आयुष्यातील अपयश पालक म्हणून तुम्ही तुमचे अपयश मानता का हा आहे. त्यांच्या यशापयाशाला पालक म्हणून पूर्ण जबाबदारी घ्यायची तयारी असेल तर तशी सगळीच घ्यावी का? त्यात मुलाचा स्टँड काय असावा? किंवा तो कितपत ग्राह्य असावा?
.
रेस वाईट नसते, निवांत बसून राहण्याची पण स्पर्धा होऊ शकते. ;) रॅटच आहोत तर रॅट रेस ही वाईट नाही. पण चॅम्पियन पण रॅट मधीलच व्हाल इतकेच.

कर्नलतपस्वी's picture

6 Apr 2022 - 4:40 pm | कर्नलतपस्वी

नुसतेच उंडारु द्या. त्यांना वाटले तर स्वतःहून शिकतील, नाहीतर नाही.

सहमत,
नाहीतर म्हणायची पाळी येईल " कोई लाटा दे मेरे बिते हुये दिन"

कर्नलतपस्वी's picture

6 Apr 2022 - 4:40 pm | कर्नलतपस्वी

लौटा

कर्नलतपस्वी's picture

5 Apr 2022 - 7:51 pm | कर्नलतपस्वी

जुनी चागंली नवी वाईट,कींवा छडी लागे छम छम विद्या येई घम घम आसेही म्हणायचे नाही.

अर्थात काळाची गरज हा मुख्य मुद्दा. जुन्या नव्याचा वादच नाही फक्त खंडीभर डिग्रया घेऊन डिप्रेशन मधे कुणी जाऊ नये.आसपास तसे दिसते म्हणून लिहीले.

पण जाणारच.
खंडीभर डिग्ऱ्यांनी कै होत नाही म्हटल्यावर.

कुमार१'s picture

5 Apr 2022 - 8:07 pm | कुमार१

कांदा भाकरी अन नळाचं पाणी
पण शरीर दगडा वाणी होतं

>>> हे पटेश ..

कर्नलतपस्वी's picture

6 Apr 2022 - 2:05 pm | कर्नलतपस्वी

लहानपणी उंडारायचा फायदा मोठेपणी झाला. प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

भागो's picture

5 Apr 2022 - 10:00 pm | भागो

जुने दिवस आठवले.
पण
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
ही कविता आठवली.
ही रॅॅट रेसच आहे. त्यातून रॅॅट च पुढे येणार!
Robots understand everything but feel nothing!

भागो's picture

6 Apr 2022 - 12:44 pm | भागो

कर्नलतपस्वी +१
ह्या असल्या शिक्षणाने काय होणार? मुले IIT, IIM, मध्य जातील. नंतर अमेरिकेत जातील आणि नांगर टाकून तिथलेच नागरिक होण्यासाठी जीव टाकतील. नाहीतरू उंदीर दुसरे काय करणार.
आता थोडी स्वतःची टिमकी वाजवतो.
वाचा https://www.misalpav.com/node/49256
आपण त्यांचे बालपण हिरावून घेत आहोत.

कर्नलतपस्वी's picture

6 Apr 2022 - 2:01 pm | कर्नलतपस्वी

आशाच वहिनीसाहेब आणी कुमार सर आजुबाजुला भरपुर आहेत. किती सांगीतल तरी मुलाला उसाच्या रसा सारखे पिळतायत. शाळेच्या व्यतिरिक्त, कराटे, स्केटीगं, डान्स,कीबोर्ड आसे विवीध प्कारचे अतिरिक्त शिक्षण ,खेळायचे कधी, साने गुरूजी कधी वाचायचे.
आता बायजाबाई (Byju) यांच्या जोडीला भर टाकतायत.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Apr 2022 - 2:55 pm | अमरेंद्र बाहुबली

सानेगुरूजी नकच वाचायला.

प्रश्न काय आहे कि मुलाला कुठल्या गोष्टीत रस आहे आणि आई बाप त्याला काय करायला भाग पडतात. बहुतांशी बाप जे साध्य करू शकला नाही ते मुलाला proxy करून त्याला, त्याच्यावर जबरदस्ती करून त्याच्या कडून करून घ्यायचे.
किंवा
शेजाऱ्याचा वा कुणा नातलगाचा मुलगा/मुलगी ह्यांनी काहीतरी साध्य केले मग इकडे आई बापांची तडफड सुरु.
दहावी/ बारावी चे निकाल जाहीर झाल्यावर किती विद्यार्थी आत्महत्या करतात ते वाचले असेलच.एव्हढेच काय आय आय टी गेलेल्या् मुलांनी पण आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत.
मी एकदा माझ्या मित्राच्या --मंग्याच्या घरी गेलो होतो. (मंग्या म्हणजे गणितातला जिनिअस ) त्याचे बाबा न्यायाधीश होते.त्यांनी विचारले ," मंगेशने पुढे काय करावे?"
मी (मूूर्खासारखे) बोलून गेलो कि त्याने आय ए एस व्हावे. त्याचे बाबा गडगडती हसून बोलले , "बस एव्हढेच ?!"
त्यातच सर्व काही आले.

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2022 - 5:58 pm | चौथा कोनाडा

आज दुपारी अभिनेत्री- नृत्यांगना प्राजक्ता माळी हिची मुलाखत "दिल के करीब" या कार्यक्रमात पहात होतो.
तिच्या आईला नृत्यात पारंगत व्हायचे होते, पण शक्य झाले नाही म्हणून तिने प्राजक्ताला लहानपणीच नृत्यवर्गात घातले.
आपल्या यशाचे श्रेय प्राजक्ताने नि:संदिग्धपणे आईला दिले !

अशी ही उदाहरणे असतात !

Bhakti's picture

6 Apr 2022 - 6:11 pm | Bhakti

ही पिढी मुळातच खुपच हुशार आहे.त्यांना लहानपणापासून
आईवडीलांचे योग्य मार्गदर्शन आहे.ओएमजी कार्यक्रमामध्ये १७ वर्षाचा कलवरी कलाकार दाखवला त्याने सूरुवात खुप लहानपणी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केली.त्याचे वडिलपण कलाकार होते म्हणून त्याला हा हटके वारसा मिळाला.रेस तर अटळ आहे.लहानपणापासूनच अभ्यास सोडून इतर कला,खेळ शिकवले तर ते तरूणपणा पर्यंत पारंगत होतील त्याचा आनंद फायदा त्यांनाच होणार आहे.

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2022 - 12:54 pm | चौथा कोनाडा

अगदी !

सुबोध खरे's picture

6 Apr 2022 - 7:00 pm | सुबोध खरे

ही २००२ सालची गोष्ट आहे.

मी नौदलाच्या सार्वजनिक प्रशालेच्या( NAVAL PUBLIC SCHOOL) व्यवस्थापक मंडळावर सदस्य होतो.

प्राथमिक विभागाच्या पालक शिक्षक मेळाव्यात अनेक पालकांनी मुलांच्या चाचणी परीक्षा शुक्रवारच्या ऐवजी सोमवारी घ्या कारण त्यामुळे मुलांना अभ्यासाला दोन पूर्ण दिवस वेळ मिळेल असा आग्रह धरला होता.

पहिली दुसरीत मुलांना शनिवार रविवार सुटीचे दिवस अभ्यासाच्या वेठीस का धरावे हेंच मला समजत नव्हते.

यामुळे मी त्या सभेत पालकांशी संवाद करताना हा किस्सा सांगितलं होता

मी डॉ जयंत नारळीकर यांची मुलाखत पाहिली होती.

त्यात त्यांना प्रश्न विचारला होता कि "आपण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ आहात तर आपल्या मुलांना आपण बोर्डात यावं किंवा दैदिप्य मान यश मिळवावं असा वाटत नाही का?"

त्यावर डॉ जयंत नारळीकर शांतपणे म्हणाले कि

शर्यतीत धावून पहिले यावे अशी कोणत्याही घोड्याची इच्छा नसते ती त्याच्यावर बसलेल्या स्वाराची इच्छा असते.

तुमच्या इच्छा मुलांवर लादून त्यांना शर्यतीत उरी फुटेस्तोवर धावडवू नका.

हे ऐकले तरी असा आग्रह धरणारे अनेक पालक ऐकायलाच तयार नव्हते.

आज २० वर्षानंतर स्थिती कदाचित अजूनच बिघडली आहे

भागो's picture

6 Apr 2022 - 7:08 pm | भागो

सुबोध खरे+१११११११

कर्नलतपस्वी's picture

6 Apr 2022 - 8:10 pm | कर्नलतपस्वी

डाॅ सुबोध खरे,भागो,भक्ती,चौको प्राजंळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अर्धवटराव's picture

6 Apr 2022 - 10:29 pm | अर्धवटराव

मुलांवर उंदरांची शर्यत लादायला नको हे बरोबर. पण मग त्यांना माणुस म्हणुन डेव्हलप करायला सजगतेने नक्कीच प्रयत्न करायला हवेत.

इतर प्राण्यांप्रमाणे माणसाचे स्किल्स साचेबद्ध नाहित. मानवी मेंदुच्या क्षमतेला तर मर्यादाच नाहि. मग या क्षमता शक्य तेव्हढय जास्त विकसीत करणे हे पालकांचे कर्तव्य नाहि काय?
आपण ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टिव्ही पासुन सुरुवात केली. आज ९० इंची क्युलेड, ओलेड टिव्ही नोर्मल झालेत. पद्मिनी कार भंगारात गेली आहे आणि टेस्ला इव्ही दरवर्षी रुपडं बदलतेय. कागदी पत्र व्यवहार जाऊन इमेल व्य्वहार होतात. मोबाईल सर्वीस ने जग व्यापुन टाकलय.
मग मानवी क्षमतांच्या विकासाच्या बाबतीतच उदासीनता का? शालेय शिक्षण तर फार काहि दिवे लावत नाहि. भरमसाठ सो कॉल्ड एक्स्ट्रॉ करिक्युलर अ‍ॅक्टीव्हिटीचं बंबार्डींग करणे म्हणजे शेकड्याने मल्टी-व्हिटॅमीन गोळ्या देण्यासारखं आहे... एखादी तरी काम करेलच हा तुक्का.

शिक्षणात विज्ञान विषय समाविष्ट केलाय, पण शिक्षणाचं वैज्ञानीकरण झालेलं नाहि.. मला वाटतं हाच बेसीक प्रॉब्लेम आहे.

वयाच्या १८ वर्षापर्यंत माणसाचा विकास होतो म्हणतात (जे काहि + / - असेल ते). शारीरीक, बौद्धीक, आध्यात्मीक विकासाला प्राथमीक प्राधान्य, त्या बेसीस वर आणि त्या खालोखाल करीअर आणि आर्थीक विकासाला प्राधान्य, सोबतच जी ले अपनी जिंदगी टाईप स्वतःच आपलं आयुष्य एक्स्प्लोर करायचा स्कोप... अशी काहि सिस्टीम डेव्हलप झाली तर मजा येईल :)

छान पोस्ट. पण अशी शिक्षण पद्धती कोण विकसित करणार? ओरिजिनल विचार करणे हे उंदीरमामाला कोणी शिकवलेले नाही.

संपूर्ण शिक्षण पद्धती बदल कसा आणि कधी घडेल माहित नाहि. पण वैयक्तीक पातळीवर बरेच लोक वेगळ्या धाटणीचे प्रयत्न करत आहेत.
उंदीरमामा बिचारा अजुनही धापा टाकेल, आणि बर्‍याच उंदरांना इतकी धावपळ करुन शेवटी काय मिळालं याचा हिशोबच लागणार नाहि :(

कर्नलतपस्वी's picture

7 Apr 2022 - 8:00 am | कर्नलतपस्वी

एक जवळचेच उदाहरण, नात्यातला चार वर्षाचा मुलगा पटांगणावर खेळायला जायचा. त्याचा खेळ बघून तिथल्याच एका शिक्षकाने जिम्नॅस्टिक्स चे धडे द्यायला सुरवात केली.मुलाला पण त्यात विशेष रूची, पुढे पालकांना बोलावून समजावून, सांगीतले. दहा बारा वर्ष सलग शिकला. लोकांनी नावे ठेवली,सल्ले दिले पण पालकांनी लक्ष दिले नाही आज इंटरनॅशनल रेफ्री आहे,खंडी भर बक्षीसे आणी शिवछत्रपती पदकाचा मानकरी आहे.सुरूवातीला शिक्षणात मागे होता पण पुढे खुपच प्रगती झाली.
मुलाचे गुण ओळखा,त्याला काय आवडते बघा उगाच दुसर्‍याचे बघून ठरवू नका आसे मला म्हणायचेय.
ही पिढी मुळात हुशार व संसाधने व संधी भरपूर ,सोन्याचे सोने कसे होईल त्या कडे लक्ष द्या. आमच्या वेळी या गोष्टींचा आभाव माझ्यासारख्या खेडेगावातल्या मुलांना होता.

मुक्त विहारि's picture

7 Apr 2022 - 7:01 pm | मुक्त विहारि

हे ज्या दिवशी पालकांना पटेल, त्या दिवसा पासून, उंदीराचे रुपांतर वाघात व्हायला , सुरूवात होईल....

कर्नलतपस्वी's picture

7 Apr 2022 - 8:28 pm | कर्नलतपस्वी

धन्यवाद.

शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल व्हायला हवा असे आवर्जून वाटते. त्या बरोबरच जीवन पद्धतीमध्येही (Life Style) बदल व्हावेत.

कर्नलतपस्वी's picture

7 Apr 2022 - 8:35 pm | कर्नलतपस्वी

जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला तर जीवन पद्धती अपसूकच बदलेल.

मेरी कमीज से तेरी कमीज ज्यादा सफेद क्यू है,ही मानसिकता काही प्रमाणात बदलली पाहीजे.

मुक्त विहारि's picture

8 Apr 2022 - 8:06 am | मुक्त विहारि

पालक, शिक्षक, नातेवाईक आणि समाज ह्या पाटीवर लिहीत जातात ...

पालकांना आपले मुल हे सुपर हवे असते ...

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, हत्तीला पंख नसतात आणि गरूड पोहू शकत नाही...

Life Style पण बदलते...

कारकुनी शिक्षण पद्धत असल्याने, निबंध देखील साचेबद्ध हवा असतो ...

सौन्दर्य's picture

8 Apr 2022 - 11:26 pm | सौन्दर्य

ही रॅट रेस कशासाठी आहे ? प्रत्येक आई-वडिलांना वाटतं की माझा मुलगा/मुलगी जीवनाच्या झगड्यात टिकून राहावी आणि नुसती टिकूनच रहावी असे नसून ती पुढे देखील असावी. आता जीवनाच्या झगड्यात टिकून राहण्यासाठी काय करावे लागते ? तर निदान आसपासच्या मुलांइतके शिक्षण, काही कौशल्य आत्मसात करावी लागतात. जर ती नाही केली तर पुढे चांगली नोकरी (व पर्यायाने मुलांसाठी चांगली छोकरी) मिळणे कठीण जाऊ शकते. चांगली नोकरी नसली तर पुढील जीवन खडतर जाऊ शकते. कोणत्याही आई-वडिलांना आपल्या मुलाला संसार चालवायला त्रास होतोय, त्याची ओढग्रस्त होतेय हे पाहणे आवडणार नाही त्यामुळे लहानपणापासूनच चांगले शिक्षण, चांगली कौशल्य त्याने आत्मसात करावी जेणेकरून पुढील जीवन सुखकर होईल ही त्यांची अपेक्षा असते.

आपल्या देशाला लोकसंख्या वाढीचा शाप आहे, वर ही लोकसंख्या मोठ-मोठ्या शहरात एकवटली आहे ज्यामुळे स्पर्धा कमालीची वाढली आहे. बाळ अगदी तीन-चार वर्षाचे असल्यापासून मॉन्टेसरींत प्रवेश मिळवायला इंटरव्ह्यू द्यावा लागतो मग त्यासाठी त्या बाळाला ए बी सी डी शिकावे लागते. पुढे प्रत्येक इयत्तेत तेच घडते, पुढील वर्गात जाण्यासाठी पास व्हावे लागते, अनेक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. पूर्ण शिकून सवरून झाल्यावर चांगल्या नोकरीसाठी हजारो स्पर्धकातून टिकावा धरावा लागतो, तेव्हा कोठे मनासारखी नोकरी मिळते. आपली संपूर्ण रॅट रेस ह्या नोकरी भोवती गुंफली गेली आहे, त्यामुळे एखादा मुलगा शाळेत म्हणाला की मला कविता करण्यात इंटरेस्ट आहे तर मला कविता लिहू द्या, अभ्यास-बिभ्यास काही नको. पालकांना हे चालेल काय ? नक्कीच नाही, कारण त्यांना त्यांच्या मुलांना जीवनाच्या झगड्यात मागे पडायला नको असते.

आई-वडिलांच्या इच्छा मुलांवर न लादणे हे नक्कीच चांगले, पण एखाद्या मुलाला अमुक एका गोष्टीतच गती आहे हे कसे ओळखायचे ? बरं ती गोष्ट त्याला रोटी, कपडा, मकान द्यायला सक्षम आहे का ? नसल्यास आई-वडील त्या मुलाला त्याच्या मनाप्रमाणे वागायला मुभा देतील का ? नक्कीच नाही.

शेवटी माणूस काय किंवा उंदीर काय, 'अन्न-वस्त्र-निवारा' ह्या मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठीच ही स्पर्धा आहे.

सतत लक्ष ठेवावे....

कुणाला, कधी, कुठले ध्येय मिळेल ते सांगता येत नाही ...

माझ्या मोठ्या मुलाला, दहावी नंतर ध्येय मिळाले तर धाकटा अद्याप तरी (वय वर्षे 25) ध्येय शोधत आहे ...

अर्थात, माझ्या मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा देखील नाहीत...

1. भरपूर व्यायाम

2. भरपूर खाणे

आणि

3. कुठल्याही प्रकारचे व्यसन नको

ह्याचा तीन अपेक्षा आहेत आणि दोन्ही मुले त्या अपेक्षा पुर्ण करत आहेत ...

बाय द वे,

द फाउंडर, हा सिनेमा बघीतला आहे का?

https://en.m.wikipedia.org/wiki/The_Founder

सौन्दर्य's picture

11 Apr 2022 - 11:06 pm | सौन्दर्य

माझ्या माहितीतल्या एका मुलीचा पालकांनी ती पाच वर्षांची होती तेव्हापासून कथक शिकवायला घातले. क्लासेस दुपारचे असायचे. ती मुलगी त्या वयात कथक शिकायला अगदी नाखूष असायची, तिने कितीही आकांडतांडव केले तरी तिची आई तिला स्वतः क्लासला घेऊन जायची. आज ती मुलगी १५ वर्षांची आहे व एक उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे. आता तिला विचारले असता तिला कथ्थक नृत्य येत असल्याचा अभिमान आनंद आनंद आहे.

आपल्या मुलाला एखाद तरी कला यायला हवी व त्यादृष्टीने पालकांनी प्रयत्न करणे अगदी स्वाभाविक आहे. नेहेमीच त्याला 'आपली इच्छा मुलांकरवी पुरी करून देण्याचा प्रयत्न' समजू नये. शालेय वयातील मुले ही लहानच असतात त्यांना काय चांगले काय वाईट हे सांगण्याची आणि तसे समजावण्याची जबाबदारी आई-वडिलांवर असते मग तसे करताना काहीवेळा जबरदस्ती देखील करावी लागते आणि त्यात वाईट काहीच नाही.

नाहीतर हीच मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांना दोष देऊ शकतील.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2022 - 8:42 pm | मुक्त विहारि

दुनिया रंगरंगिली बाबा ...

कर्नलतपस्वी's picture

9 Apr 2022 - 4:55 pm | कर्नलतपस्वी

सर्व प्रतीसादकांचे मनापासून धन्यवाद.

हा धागा लिहीण्याचे कारण मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांवर आपल्या आपेक्षांच ओझे आगदी लहानपणापासून टाकताना दिसत आहे.
अंगभूत कला गुणांना बाहेर येण्यास वेळ द्या.आणी त्या ओळखण्यासाठी पालकांनाच प्रयत्न करावे लागतील. मुलांवर आसे संस्कार केले पाहिजेत जेणेकरून तो शारीरिक व मानसिक स्तरावर बळकट झाला पाहीजे.

सौन्दर्य's picture

11 Apr 2022 - 10:58 pm | सौन्दर्य

हल्लीच्या युगात आर्थिक बाजू ही बळकट असलीच पाहिजे.

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2022 - 5:44 pm | चौथा कोनाडा

हल्लीच्या युगात आर्थिक बाजू ही बळकट असलीच पाहिजे.

अगदी बरोबर. बहुतांशी पालक आपला पाल्य भविष्यात स्थिरस्थावर असावा या विचारापोटी ते काही गोष्टींची सक्ती करतात, त्यामुळे रॅटरेसमध्ये सहभाग अपरिहार्य असतो.

कर्नलतपस्वी's picture

12 Apr 2022 - 10:33 am | कर्नलतपस्वी

सौंदर्य जी आपले मत सुद्धा बरोबरआहे. पालकांनावर खुप काही अवलंबून आहे.

जोपर्यंत शासन व्यावसायिक शिक्षणाबद्दल गंभीरपणे धोरण राबवत नही तोपर्यंत उंदीर पळतच राहणार...

उपयोजक's picture

3 May 2022 - 10:35 pm | उपयोजक

कधी कधी वाटतं, मी जर २००० साली किंवा त्यानंतर जन्माला आले असते तर माझं आयुष्य कसं असलं असतं?माझ्या यथा-तथाच असणाऱ्या चित्रकलेचं माझ्या आई-वडिलांना जाम टेन्शन आलं असतं.

माझं गणित हा तर उठता-बसता चर्चेचा विषय झाला असता.
मी खेळाडू असून माझ्या मुलीचे ग्रॉस मोटर स्किल्स अगदीच undeveloped आहेत ह्याचं माझ्या आईला सॉलीडच वाईट वाटलं असतं.
'पोरगी चार लोकांसमोर उभी राहून तशी बरी बोलते, पण पळताना तिचे पाय काहीतरी विचित्र होतात. पायात पाय अडकून पडतेच..' हि चिंतेची बाब असली असती.

'अक्षर चांगलं आहे, वह्या पूर्ण असतात; पण अहो जेवढं सांगितलं ना ते कमीत कमी शब्दात बसवते. मार्क्स कमी होतात मग..' अशी गोड तक्रार माझ्या आईने केली असती.

मी सगळ्यांचं सगळं ऐकूनच घेते, म्हणून लेबल लावलं असतं.

'एकदा वाचायला बसली कि हलतच नाही जागची, आणि वहीत काहीबाही मनातलंच खरडत असते. लक्ष मुळी नसतंच कुठे, day dreaming चालू असतं.' अशा असंख्य तक्रारींची मालिका माझ्या आई-वडिलांनी रचली असती. मग मला न आवडणाऱ्या खेळाच्या कोचिंगसाठी मला पाठवलं असतं. चित्रकला शिकवली असती.माझा अलर्टनेस वाढविण्यासाठी प्रयत्न केले असते. माझा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आईने रात्रीचा दिवस केला असता.

पण मी लहान असताना असं काहीही झालं नाही. काही गोष्टी मला जमत नाहीत म्हटल्यावर, "ठीक आहे, नसेल जमत', एवढंच म्हटलं गेलं. मला ज्या गोष्टी शिकणं, शिकवणं गरजेचं होतं त्या झाल्याच.प्रसंगी रागावले असतील, मारलं असेल; पण मला all rounder बनविण्याचा प्रयत्न केला गेला नाही.विनाकारण त्यांनी (माझ्या आई-वडिलांनी) त्यांची आणि माझी झोप खराब केली नाही.

मला आजही drawing जमत नाही. कोणताच मैदानी खेळ खेळता येत नाही. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या पलीकडे गणित जमत नाही. मी अजूनही दिवास्वप्न पाहते, वाचते, त्यांत रमते, काहीबाही खरडत असते. ते माझं वेगळेपण होतं आणि आजही आहे, ते त्यांनी जपलं.

माझं हळू आवाजात बोलणं, कुणाशीही न भांडता ऐकून घेणं हा माझा स्वभाव आहे आणि तो योग्य बाजूने वळविला पाहिजे एवढंच त्यांनी ओळखलं.
माझं व्यक्तिमत्व ज्यात आधीच काही गुण-दोष होते. ते विकसित करताना ते जर एक ना एक दोष दूर करत बसले असते तर आज मी आहे तशी न राहता मशीन झाले असते. आनंदी असले असते कि नाही, देव जाणे!

माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांचेच, माझ्या मित्र-मैत्रिणींचे आई-वडीलही थोड्या फार फरकाने असेच होते. खरं सांगू, त्यामुळे कुणाचंच फारसं काहीच बिघडलं नाही.

मग आपल्या मुलांना एखादी गोष्ट जमत नसेल, स्वभावात नसेल तर खरंच काही बिघडणार आहे का?
आई-बाबा येतात, सांगतात, 'अहो भांडतच नाही ही. खूप शांत आहे.' ' अहो खूप खेळतो हा, पण वाच म्हटलं तर लगेच कंटाळतो.' 'छान dance करते पण चित्र काढ म्हटलं कि पळून जाते','चित्र छान काढते, रंग आवडतात पण गणित म्हटलं कि संपलं सगळं!'

सगळ्यांना सगळं यायलाच हवं का? त्याचा स्वत:चा गुण, स्पेशालिटी नसेल का? नाही आली एखादी गोष्ट तर आभाळ कोसळणार आहे का?

शांता शेळकेंच्या ओळी आहेत,
सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास
अधिक काही मिळविण्याचा करू नये अट्टहास.
सुवास, पाकळ्या, पराग, देठ, फूल इतकीच देते ग्वाही,
अलग अलग करू जाता हाती काही उरत नाही.

* Let the flower bloom by own,
Fragrance will float itself.....

Why be adamant to get more ?

Fragrance, petals, pollen, stalk, flower

Proclaim you get nothing
When you try developing each separately !*

(जुनी पोस्ट)
-वसुधा देशपांडे-कोरडे
M.A. (Clinical Psychology), M.Sc. (Psychology)(UK)MBA(HR)(UK)
माइंड मास्टर कौन्सेलर्स, पुणे.

मुक्त विहारि's picture

3 May 2022 - 11:04 pm | मुक्त विहारि

कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले गोविंदः, प्रभाते कर दर्शनं...

थोडक्यात सांगायचे तर, प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीकडे किमान एक तरी, वैयक्तिक कौशल्य असतेच, मग ते लोहारकाम असो की चप्पल बांधणे असो किंवा सुतार काम

ते कौशल्य ओळखणे हीच तुमची आर्थिक दृष्टीने योग्य

त्या कौशल्याला खतपाणी घालणारा गुरू मिळणे, म्हणजे सरस्वती

आणि ह्या दोन गोष्टींमुळे जे मानसिक स्वास्थ्य लाभते, तोच खरा स्वर्ग

आणि वेळोवेळी आपले गूण बदलत देखील असतात, त्यामुळे सतत आपल्या मना बरोबर संपर्क करत राहणे, हे उत्तम