अशीही एक भटकंती -छोटेसे मालगुंड ........

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
12 Mar 2022 - 9:33 am

नुकतीच पुण्यात मेट्रो सुरू झाली. बाजीगर यांनी विडंबन काव्य मिपावर टाकले.

https://www.misalpav.com/node/49951/backlinks

"अजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु
अजि सोनियाचा दिनु
मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे..."

त्यात पाच रूपायाची भर आम्हीपण टाकली.

आनंदी आनंद गडे
मेट्रू धावे चोहीकडे
क्षणात पिपंरी,क्षणात चिंचवड
क्षणात पोहचे कोथुरुडे
आनंदी आनंद गडे

डोलत लतीका गधंवती
मेट्रु स्टाफ लगबगती
नटली संध्या प्रेमाने
कुमद ही हसते आहे
सनई चौघडे , हार तुरे
झगमग लगबग चोहीकडे
आनंदी आनंद गडे

नरमुंड रूंड पाहूनी
मनी चितंले,
प्राणनाथ धावले
भान हरले(पुणेकरांचे),
गान स्फुरले
आनंदी आनंद गडे

नरेंद्र बसला,देवेंद्र ही बसला
खुशीत हसला
उधो धावे खिडकी कडे (तिकीटाच्या)
आनंदी आनंद गडे

वाहति रस्ते संथगती,
विहरती दुचाकी तिव्रगती
द्विपाद,चतुष्पाद भ्रमती मोदभरे
कमल विकसले, कोण आकसले
डोलत वदती (पुणेकर)
इकडे,तिकडे, चोहिकडे
आनंदी आनंद गडे

आनंदी आनंद गडे
मेट्रू धावे चोहीकडे
क्षणात पिपंरी क्षणात.......

(बालकवी म्या पामरला क्षमा करा)

आसेच एक जाम भारी विडंबन काव्य नुकत्याच केलेल्या भटकंतीत समोर आले. म्हणतात ना,"जे न देखे रवी ते देखे कवी",त्याचीच गोष्ट इथे सादर करणार आहे.

भटकंती म्हटले की कुठे जायचे काय पहायचे हे प्रश्न सहाजिकच. एखाद्या प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळाला भेट देताना ह्या प्रश्नांची उत्तरे आपसूक मिळतात पण एखाद्या छोट्याश्या,अप्रसिद्ध ठिकाणाची भटकंती कधी कधी बरेच काही दाखवते,शिकवून जाते आणी अविस्मरणीय ठरते.

अशीच मालगुंड या कोकणातल्या छोट्या,टुमदार खेड्यातली भटकंती माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे. बोटवर मोजण्या इतक्याच ऊबंरठ्यांच गाव. उतरत्या छपराची कौलारू तर कुठे कुठे नारळाच्या झावळ्यांनी शाकारलेली घरं, बहूतेक घरे समुद्र किनार्‍याला चिटकून किवा डोंगराच्या पायथ्याशी वसलेली. डोंगरातून निघणारा व डोंगरातच गुप्त होणारा नागमोडी वळणाचा एकुलता एक, एकेरी रस्ता, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याशीं लपंडाव खेळतोय असेच वाटते. गणपतीपुळे,मालगुडं,वरवडे, जिदंल पाॅवर प्लाटं वरून जयगड बंदराला जाणारा आणी जेट्टी ने वेळणेश्वर,गुहागरला जोडणारा हा एकमात्र रस्ता भरपूर निसर्गाने नटलेला आहे. सुपारी,माडाच्या बागा,पिकलेल्या काजुच्या घमघमाटाने मदहोश करणारी काजुगरे. नुकताच मोहर गळून आंबोळ्या आपले अस्तित्व दाखवू लागल्या होत्या.रस्त्याच्या बाजूस घट्ट धरून बसलेल्या मोठ्या मोठ्या दगडांच्या भवताली लाजाळूची पसरलेली खुरटी रोपटी हात लावताच पाने मिटत होती.डोंगराच्या उतारावर करवंदीच्या जाळ्या,हिरवी छोटी करवंद लागलेली दिसत होती.अधूनमधून सगळीकडे लक्ष ठेवणारे लाल भडक फुलांनी बहरलेले पळस. परिसरातील सौंदर्य पाहून थक्क झालो.मालगुंड गायवाडी समुद्र किनारा स्वच्छ,व्यापारीक गतीविधी पासून दूर.फक्त शहाळी विकणारे दोन तीन मालगुंडकर.सोनेरी वाळूने चमचमणारा,खेकड्यानी काढलेल्या रागोळीने सुशोभित,मन:शांती देणारा आसा शांत सागर किनारा. मालगुंड गायवाडी व धनुषकोडीचा (रामेश्वरम्) समुद्र किनारा एक सारखाच वाटला.

mipa मालगुंड गायवाडी समुद्र किनाराmipa

mipa पन्चरन्गी सुर्य पक्षयाची शाळा mipa

mipa वरवडे बन्दर mipa पळस

mipa जिन्दल यानी बन्धलेले मन्दीर mipa पन्चधातूची मुर्ती

मालगुंड गायवाडी समुद्र किनारा आगदी केशवसुताच्या कवीते सारखा.

"संध्याकाळ असेः रवी उतरतो आहे समुद्रावरी,
त्याचे बिम्ब सुरेख चुम्बिल पहा लाटांस या लौकरी;
मातीला मिळुनी गळूनि पडलें तें पुष्प जाई जसे,
लोपाला लहरींत मंडलहि हें जाईल आतां तसें"

मालगुंड वास्तव्यातील एक दुपार आद्यकवी केशवसुतांच्या स्मारकावर घालवली.खुप छान वाटले. स्मारकाची आखणी विचारपूर्वक व साजेशीच आहे.देखरेखही उत्तम, नुकत्याच झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त केलेली सजावट, केशवसुतांचे कौलारू घर शेणाने सारवून पारंपरिक रांगोळी आणी पताकानीं सुशोभित केले होते.या सर्वाने मन प्रसन्न झाले. जुन्या काळातले लिहीण्याचे लाकडी डेस्क,देवाचा देव्हारा आणी नेहमीच्या वापरातल्या काही वस्तू जतन करून ठेवलेल्या दिसल्या. तेव्हाच केशवसुताचींच एक कवीता आठवली.

केशव्सुतान्चे स्मारक

mipa राहाते घर

mipa घराचि पडवी,ओसरी

mipa आधुनिक कवी दालन

mipa

रांगोळी घालताना पाहून

"होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली"

राम गणेश गडकरी ,गोविदाग्रज यांनी वरील कवीतेचे केशवसुतांचे नाव घेऊन ‘रांगोळी घातलेली पाहून’ या नावाने विडंबन काव्य रचले आहे.

आद्यकवीच्यां समकालीन व सन १९५० पर्यंतचे नामवंत निवडक कवींबद्दल ओळख,त्यांची बहुचर्चित कवीता आणी फोटो संकलन करून एक "अधुनिक मराठी काव्य संपदा", नावाचे दालन उभारले आहे.शेजारीच एक दुसरे दालन ज्यात "तुतारी,घड्याळ,आम्ही कोण,नव्या मनूचा शिपाई ",इ. केशवसुतांच्या कवीता काळ्या ग्रॅनाईटवर सोनेरी अक्षरात ओळीत मांडल्या आहेत. वाचताना वेळ कसा गेला कळले नाही. आठवणींचा पेटारा उघडला. मला पाचवीत "मन्वंतर वाचनमाला" या मराठी भाषेच्या पुस्तकात "आम्ही कोण", कवीता होती.

"आम्ही कोण म्हणूनि काय पुससी?आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्र्वी या प्रतिभावले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची द्रुष्टी पहाया शके"

त्याच पुस्तकात प्र के अत्र्यांनी केलेले या कवितेचे विडंबन पण होते.

'आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी?
'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?
किंवा 'गुच्छ' 'तरंग' 'अंजली' कसा अद्यापि न वाचला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?

दोन्ही कवीता गुरूजींनी एकत्रच शिकवल्या आणी विडंबन या साहित्य प्रकाराची ओळख झाली.दोन्ही केशवसुत, एक गंभीर तर दुसराअष्टपैलू.विडंबन,उपहास,उपरोध समजायचं वय नव्हत.

"अधुनिक मराठी काव्य संपदा", दालनात १८७० ते १९५० या कालावधीतील कवींबद्दल वाचताना आणखी काही केशवसुतांची ओळख झाली.एक धाडसी विडंबन काव्य समोर आले.कवीने चक्क श्रीमद् भगवद् गीतेच्या पहिल्या आध्यायाचे विडंबन केले होते. प्रतिगामी समाजा पुढे हे आसे विडंबन म्हणजे खरोखरच धाडस म्हणले पाहिजे.वाचताना पदोपदी वाटत होते की कवी काळाच्या खुपच पुढे आसावा.आज जर महाभारत झाले असते तर कदाचित कृष्णार्जून संवाद आसाच झाला आसता.कवी आहेत जयकृष्ण केशव उपाध्ये.लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे हे सुद्धा केशवसुत. जन्म १८८३ मृत्यू १९३७..यावर २००९ मधे "क्रांती" यांनी मिपावर धागा लिहीला आहे. आजच वाचनात आला.

mipa मराठी भाषा गौरौव दिन

"मराठी भाषा गौरौव दिन ",हे चित्र नव्हे रान्गोळी आहे. अप्रसिद्ध कलाकाराचे आभिनन्दन.

https://www.misalpav.com/node/6610/backlinks

चालचलाऊ भगवद्गीता

पार्थ म्हणे गा हृषीकेशी | या युद्घाची ऐशी तैशी
बेहेत्तर आहे मेलों उपाशी | पण लढणार नाहीं !
धोंडयात जावो ही लढाई | आपल्या बाच्यानें होणार नाही
समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके.
काखे झोळी, हातीं भोपळा | भीक मागून खाईन आपला
पण हा वाह्यातपणा कुठला | आपसांत लठ्ठालठ्ठी
या बेटयांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग
लेकांनो ! होऊनिया रोग | मराना कां !
लढाई का असते सोपी ? मारे चालते कापाकापी
कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.
मग बायका बोंबलती घरी | डोई बोडून करिती खापरी
चाल चाल कृष्णा ! माघारीं | सोड पिच्छा युद्घाचा.
अरे, आपण मेल्यावर | घरच्या करतील परद्बार
माजेल सारा वर्णसंकर | आहेस कोठे बाबा !
कृष्ण म्हणें रे अर्जुना ! | हा कोठला बे ! बायलेपणा ?
पहिल्यानें तर टणटणा | उडत होतास लढाया
मारे रथावरी बैसला | शंखध्वनि काय केला !
मग आतांच कोठें गेला | जोर तुझा मघांचा ?
तू बेटया | मुळचाच ढिला | पूर्वीपासून जाणतों तुला;
परि आतां तुझ्या बापाला | सोडणार नाही बच्चम्जी !
अहाहारे !भागूबाई !| म्हणे मी लढणार नाही;
बांगडया भरा कीं रडूबाई | आणि बसा दळत !
कशास जमfवले आपुले बाप ? नसता बिचार्‍यांसि दिला ताप;
घरी डारडुर झोंप | घेत पडलें असते !
नव्हते पाहिलें मैदान | तोवर उगाच करी टुणटुण;
म्हणें यँव करीन त्यँव करीन | आतांच जिरली कशानें ?
अरे तू क्षत्रिय की धेड ? | आहे की विकिली कुळाची चाड ?
लेका भीक मागावयाचें वेड | टाळक्यांत शिरलें कोठुनी ?
अर्जुन म्हणे ‘गा’ हरी !| आतां कटकट पुरे करी;
दहादां सांगितले तरी | हेका का तुझा असला ?
आपण काही लढत नाही | पाप कोण शिरीं घेई !
ढिला म्हण की भागूबाई | दे नांव वाटेल तें.
अैसे बोलोनि अर्जुन | दूर फेकूनी धनुष्यबाण
खेटरावाणी तोंड करुन | मटकन्‌ खाली बैसला
इति श्रीचालचलाऊ गीतायां प्रथमाsध्याय : |

याच दालनात पुढे आणखी काही "केशवसुत" वाचायला मिळाले ते म्हणजे सर्वश्री

माधव केशव काटदरे
शंकर केशव कानेटकर, (कवी गिरीश)
प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार)
मंगेश केशव पाडगावकर

असो, भेट सार्थकी लागली. स्मारकाच्या कार्यालयात काही पुस्तके विक्रीस उपलब्ध होती ती सर्व घेतली आणी केशवसुतांच्या स्मृतीस वदंन करुन व कर्मचाऱ्यांचे आभार मानत निरोप घेतला.पुढे हा धागा लिहीत आसताना अजुनही काही विडंबन काव्ये वाचनात आली. खुप हासलो. त्यापैकी काही नावे खाली देत आहे.

दासबोध आणि उदासबोध- मंगेश केशव पाडगावकर
‘विरामचिन्हे’ आणि कवीची ‘विरामचिन्हे’-प्रल्हाद केशव अत्रे
‘रांगोळी घालतांना पाहून’ आणि ‘रांगोळी घातलेली पाहून’- गोवीन्दाग्रज

छोटेसेच मालगुंड पण किती आठवणी........

आतरजालावरील सन्धर्भीत लेखकान्चे आभार.
चु भु दे घे
९-३-२०२२

प्रतिक्रिया

कंजूस's picture

12 Mar 2022 - 10:59 am | कंजूस

अगदी सुंदर आहे मालगुंड. शांत आणि रम्य. गणपतीपुळे ते मालगुंड तीन किमी चालत जाऊन पाहून आलो आहे. पक्षी भरपूर आणि विविध. हिरवा/पाचू कवडा,आणि गरूड ( मलबार हॉनबिल ) सुंदर.

स्मारक छान ठेवले आहे.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 11:33 am | मुक्त विहारि

फोटो मस्तच आले आहेत

गोरगावलेकर's picture

12 Mar 2022 - 11:54 am | गोरगावलेकर

फोटोही छानच. गणपतीपुळे, मालगुंडला जाऊन खूप वर्षे लोटली. परत जायला हवे आता

चौथा कोनाडा's picture

12 Mar 2022 - 12:42 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्तच !
मेट्रु विडंबन छान जमले आहे !

नरेंद्र बसला,देवेंद्र ही बसला
खुशीत हसला
उधो धावे खिडकी कडे (तिकीटाच्या)
आनंदी आनंद गडे

😄
हा हा हा .... भारी !

"क्षणात पिपंरी,क्षणात चिंचवड" असे आमच्या वाडीचे उल्लेख वाचून गहिईवरून आले !

केसु स्मारर्क आणि मालगुंड भटकंतीचे वर्णन सुंदरच ! डोळ्यापुढे कौलारू घरांचे कोकणी हिरवे गाव उभे राहिले !
फोटोही साजेशे.

किरकोळ कारणांमुळे मालगुंड बघायचे राहिले ही खंत आहेच !

कर्नलतपस्वी's picture

22 Mar 2022 - 9:58 am | कर्नलतपस्वी

आमची पण हाडं पुण्यातील हाड पसर मधे पसरलेली आहेत.

शेखरमोघे's picture

13 Mar 2022 - 8:45 am | शेखरमोघे

अप्रतीम चित्रे आणि यथायोग्य कविता - मालगुन्ड प्रत्यक्ष पाहिल्यासारखे वाटले.

रुस्तम's picture

13 Mar 2022 - 11:38 am | रुस्तम

ते पळसाचे झाड नाही. ती काटे सावर आहे.

बाकी फोटो मस्तच.

कर्नलतपस्वी's picture

13 Mar 2022 - 3:27 pm | कर्नलतपस्वी

काटे सावरीची आणी पळसाची फुलांचा रंग सारखाच असल्यामुळे फसगत झाली. तुम्ही बरोबर आहात. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

प्रचेतस's picture

15 Mar 2022 - 9:31 am | प्रचेतस

सुरेख लिहिलंय, छायाचित्रेदेखील आवडली.
केशवसुतांचे स्मारक उत्तम प्रकारे जतन केलेलं दिसतंय.

श्रीगणेशा's picture

19 Mar 2022 - 12:39 pm | श्रीगणेशा

छान लिहिलंय _/\_
मागील कोकण सहलीत मालगुंड राहून गेले.
पुढील वेळी नक्की.