या १४ जानेवारी २०२२ ला २६० वर्षे होतील !
गेली २६० वर्षे ही भळभळती जखम घेऊन प्रत्येक मराठा जगतोय. आणि या जखमेच्या वेदना मराठयांच्या पुढील पिढीत वारसा म्हणून आपोआपच येतात.
मराठ्यांचा इतिहास जेव्हा पासून लिहिला जात आहे तेव्हा पासून पानिपतच्या रणसंग्रामावर अनेक पोवाडे लिहिले गेलेत, कादंबऱ्या लिहिल्या गेल्यात, अभ्यास लेख लिहिले गेलेत, अगदी अलीकडे मराठ्यांच्या इतिहासाकडे लक्ष देऊन त्यावर चित्रपट काढणाऱ्या बॉलिवूड ने तर एक चित्रपट ही काढलाय. चित्रपट हे कोणतीही घटना प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी करण्याचे अतिशय सक्षम माध्यम आहे. हल्ली तंत्र इतके पुढारलंय की लढाया अक्षरशः जिंवत होऊन डोळ्यापुढे उभ्या राहतात.
नाटकाचे म्हणाल तर त्याला अनेक मर्यादा असतात. मर्यादित जागा, मर्यादित कलाकार, मर्यादित तंत्र आणि महत्वाचे म्हणजे मर्यादित पैसा. या सर्व आव्हानांच्या काटेरी रंगमंचावर नाट्य उभे करावे लागते. त्यातून युद्धनाट्य सादर करायचे म्हणजे शिवधनुष्श्यच !
चंद्रलेखा संस्थेने हे शिवधनुष्य रणांगण या नाटकाद्वारे पेलले आहे. दिग्दर्शक वामन केंद्रे , प्रकाश, नेपथ्य आणि इतर तंत्रे मोहन वाघ यांनी सांभाळली आहेत.
पानिपत हे एका दिवसात घडलेली घटना नक्कीच नाही, तिचा उगम किमान १० वर्षाचा , किंवा अधिक अचूक पणे बोलायचं तर मराठा साम्र्याज्यात वतनदारी सुरु झाली तिथवर नेता येईल. ३ तासाच्या आणि काही फूट बाय काही फूट या आकाराच्या आयताकृती जागेत हे युद्ध नाट्य सादर करणे किती अवघड गोष्ट आहे हे समजायला नाटकाचे जाणकार असण्याची जरुरी नक्कीच नाही. मुळात युद्धपटाप्रमाणे युद्धनाट्य ही संकल्पना भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आहे की नाही हे माहित नाही कारण मी नाट्य अभ्यासक नाही, पण मज अल्पज्ञानाप्रमाणे संगीत रणधुंधुमी , किंवा सीमेवरून परत जा हे काही अपवाद वगळता रणांगण हेच युद्धनाट्य मला तरी माहित आहे. असो.
पानिपत हा विषय काढला की त्यात दत्ताजी , नानासाहेब , सदाशिवराव , विश्वासराव, मल्हारराव, जनकोजी समशेर बहाद्दर, अब्दाली , नजीब या आणि अशा असंख्य व्यक्तिरेखा आहेत. या प्रत्येक व्यक्तिरेखेची एक विशिष्ठ विचारसरणी आहे, काही पूर्व ग्रह, किंवा मते आहेत. पानिपत मध्ये मराठ्यांच्या मधेच अनेक मतभेद आहेत. उदा: मल्हारराव वि इब्राहिमखान किंवा राघोबा वि सदाशिवराव, किंवा शिंदे वि होळकर .... ही यादी बरीच मोठी आहे. या सगळ्या व्यक्तिरेखांचे सादरीकरण रणांगण मध्ये उत्तमरीत्या दिसते.
रणांगण थोड्याश्या फँटसी स्टाईल ने सुरु होते, मग मल्हारराव नजीब संबंध, दत्ताजी नजीब संघर्ष , उदगीरचा विजय , सदाशिव राव भाऊ यांची पानिपत मोहिमेसाठी निवड , कुंजपुरा, नानासाहेब यांचे लग्न अशा विषयांना योग्यतो स्पर्श करीत प्रत्यक्ष पानिपत चा रणसंग्राम येथे येऊन पोहोचते.
गोलाची लढाई की गनिमी कावा या वरून इब्राहिम खान आणि सुभेदार यांचे मतभेद ही छान उतरले आहेत. रंगमंचावर गोलाची लढाई दाखवणे हे जवळपास अशक्य वाटू शकते. पण प्रत्यक्ष नाटकात गोलाची लढाई, मध्ये बाया बापड्या आणि बुणगे , विंचूरकर गायकवाड यांचे गोल मोडून पुढे जाणे आणि मग सर्वनाश हे सर्व नाटकात प्रभावी रित्या सादर होऊन, प्रेक्षकांच्या काळजास हात घालते. यात प्रकाश योजना आणि पार्श्वसंगीत यांचा खूप मोलाचा वाटा आहे. अविनाश नारकर यांनी साकारलेला भाऊ म्हणजे अभिनयाचे उत्तमोत्तम उदाहरण ! बाकीचे कलाकार अक्षरशः भूमिका जगतात, विशेषता सुभेदार होलकर यांची भूमिका करणारा अभिनेता. मला सगळ्यांची नवे ठाऊक नाहीत म्हणून इथे उल्लेख करत नाहीये.
पानिपतात सगळ्यात मोठे संवेदनशील प्रसंग म्हणजे नानासाहेबांचे लग्न आणि सुभेदार होळकर यांचे युध्यातील योगदान! हे दोन्ही प्रसंगानिमित्ताने गेली कैक दशके दोन्ही बाजू तावातावाने मांडून वाद घातले जात आहेत. मी या वादात पडणे केव्हाच सोडलय आणि तो या लेखाचा भाग नाही. हा लेख रणांगण चे परीक्षण यापुरताच मर्यादित मला ठेवायचा आहे.
लिहिण्यासारखे अजून काही काही आहे , पण मी इथे थांबतो. तुनळीवर नाटक सहज उपलब्ध आहे.
मुळात या युध्यानाट्याचं यश हेच की नाटक पाहून जेव्हा मराठा प्रेक्षक बाहेर पडतो, किंवा हल्लीच्या काळानुसार तुनळीची खिडकी माउस क्लिक वर बंद करतो तेव्हा त्याच्या मनातील पानिपतच्या लष्करी पराभवाच्या वैषम्याची आणि अपमानाची भावना पूर्णपणे गेलेली असते .......
आणि त्या प्रत्येक मराठ्याचा उर आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या अभिमानाने भरून आलेला असतो !
कौस्तुभ पोंक्षे
प्रतिक्रिया
10 Jan 2022 - 10:22 pm | खेडूत
छान ओळख.
चंद्रलेखा म्हणजे उत्तम निर्मिती आणि मार्केटिंग.
रणांगण साठी संगीत अनंत अमेंबल यांचं, गीते मंगेश पाडगावकर, वेशभूषा साक्षात भानू अथैया यांची, आणि नृत्ये अश्विनी जोगळेकर अशी प्रत्येक बाजू उत्तम होती. कलाकार अविनाश नारकर, अशोक समर्थ, प्रसाद ओक, सचित पाटील, सौरभ पारखे, राजन जोशी यांच्यासह केवळ १८ नटांमध्ये सगळे नाटक बसवले होते.
हे नाटक ऐन भरात असताना नोकरीसाठी होणाऱ्या प्रवासामुळे नेहेमी मिस केले.
नाटक खरं म्हणजे प्रेक्षागृहात पाहायला खरी मजा येते, पण तो योग आता कधी यावा. तसेच मूळ संचात पाहणे वेगळे आणि पुनरुज्जीवन झालेल्या संचात ते वेगळे वाटते. अश्रूंची झाली फुले, ती फुलराणी यांच्या बाबतीत असं झालं होतं, की मूळ कलाकारांचे पाहिल्यावर नंतरचे आवडले नाही. वऱ्हाड पहायचं धाडस होत नाही, संदीप आवडता कलाकार असूनही.
.
11 Jan 2022 - 12:02 pm | चौथा कोनाडा
सुंदर लेखन.
तुनळीवर उपलब्ध आहे हे सांगितले बरे केले.
वेळ काढून बघण्यात येईल.
12 Jan 2022 - 6:18 pm | साबु
अप्रतिम कलाक्रुती ....खुपच भारी.