काय आहे रे गोव्यात बिकनी, बिच आणि बीयर? हे वाक्य अनेकदा ऐकले होते. तसे बघायला गेले तर हे काही खोटे नव्हते. मी याआधी जेंव्हाही गोव्याला गेलो ते फक्त उत्तर गोवा, दक्षिण गोवा मधले समुद्र किनारे, दोन मोठी चर्च, शांता दुर्गा मंदिर आणि मंगेशीचे मंदिर येवढेच केले होते. या व्यतिरीक्त गोव्यात खरच काही आहे का हा प्रश्न मलाही पडला होता. मी तसा फार पूर्वी काही कामानिमित्त सांकलीच्या भागात गेलो होतो पण तेंव्हा सुद्धा मी काम झाल्यावर उत्तर गोवा दक्षिण गोवा असाच फिरलो होतो. त्यावेळी म्हापशाच्या मासेबाजारात मारलेला फेरफटका मात्र कायम लक्षात राहिला.
(दिवार )
गोव्यात बीच शिवाय काय आहे असा विचार करणारे एका महत्वाच्या मुद्दयाकडे दुर्लक्ष करतात तो म्हणजे गोवा हा त्याच सह्याद्रिचा किंवा पश्चिम घाटाचा भाग आहे जो भाग जगात त्याच्या जीवसृष्टीसाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम घाट जो त्याच्या विपुल Flora and Fauna साठी जगभरात प्रसिद्ध आहे ते गोव्यात देखील आहे. घाट म्हटला की धबधबे आले परंतु एक दूधसागर धबधबा सोडला तर इतर धबधब्यांची फारशी कुणाला माहिती नसते. दूधसागरला जाण्यात दिवस मोडतो म्हणून मंडळी तिथे जाण्याचे टाळतात आणि फक्त समुद्रकिनारे फिरुन परतात. त्याचमुळे जेंव्हा मी गोवा सायकलींग टूर विषयी वाचले तेंव्हा ठरविले हा वेगळा गोवा सायकल चालवित शांतपणे अनुभवायचा. टूर दिवार द्विपपासून सुरु होणार होता. बऱ्याचदा दक्षिण गोव्यात जाताना दिवार दुरुन बघितले होते, जुआरी नदीच्या पलीकडे दिसनाऱ्या त्या हिरव्या दाट झाडीच्या आड मानववस्ती आहे याचेच पूर्वी नवल वाटत होते. तेंव्हा तिकडे जाण्याचे सुद्धा आकर्षण होतेच.
मार्ग
गोवा या राज्यात पाच वन्यप्राणी अभयारण्य (Wildlife Sanctuary) आहेत. बोंडला, म्हादेई, भगवाण महावीर अभयारण्य किंवा मोलेम नॅशनल पार्क, नेत्रावली आणि कोटिगाव असे पाच अभयारण्य गोव्यात आहेत. यात बोंडला हा भाग फारच छोटा आहे, इथेल प्राणीसंग्रहालय बघायलाच पब्लीक जातात. नेत्रावली मधे ब्लॅक पँथर हि दुर्मिळ प्रजाती आढळते असे वाचले होते. अर्थात आम्हाला दौऱ्यात कोणत्याही प्राण्याचे दर्शन झाले नाही फक्त जागोजागी ब्लॅक पँथर आणि बिबट्याचे फोटो होते. सायकल दौऱ्याचा मार्गाची आखणी आयोजकांनी ट्रॅफिक आणि पर्यटकांची गर्दी टाळणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून केली होती. सायकल चालविताना याची सतत जाणीव होत होती. दौऱ्याचा मार्ग भगवान महावीर अभायरण्य़, नेत्रावली अभियारण्या मधून जाणारा होता तर कोटिगाव अभयारण्याच्या जवळून जाणारा होता. तीन दिवस घनदाट जंगलातून जाणारा निसर्गरम्य मार्ग होता तर शेवटल्या दिवशी पूर्वी कदंबांची राजधानी असनाऱ्या चांदोर या शहरातून जाणारा होता.
(दिवार वरुन निघताना फेरीत सायकील टाकल्या आणि निघालो)
दिवार द्विपावरुन फेरीमधे आमच्या सायकली टाकल्या आणि तेथून बिचोलीला आलो. तिथून बिचोली, सांकली या मार्गाने खाली दक्षिण गोव्याच्या दिशेने निघालो. काही अंतरातच होंडाच्या पुढे आम्ही मुख्य रस्ता सोडून आतल्या रस्त्याने मॉलेमच्या दिशेने निघालो. रस्ता सरळ नव्हता मधे बऱीच वळणे होती. जीपीएस आणि आयोजक या दोघांच्या मदतीने आम्ही चाललो होता. मागे भगवाण महावीर अभयारण्याविषयी भाटुपाचा एक विडियो बघितला होता. त्या विडियोत बघितलेले नेचर नेस्ट रिसोर्ट आले तेंव्हा आपण आता मोलेमच्या जंगलात आलो आहोत याचा अंदाज आला. पुढे कुळे हे रेल्वे स्थानक लागले. दूधसागर धबधबा बघायला जायचे असेल तर इथेच टॅक्सी सोडून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या गाडीने किंवा रेल्वे मार्गाने ट्रेक करीत जावे लागते. असेच जंगलातून जात असताना कधी आम्ही भगवाण महावीर अभायरण्य सोडले आणि नेत्रावलीत प्रवेश केला ते कळले नाही. पहिल्या दिवशीचा मुक्काम नेत्रावली अभयारण्याच्या जवळच होता.
(सावरी धबधबा)
दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला नेत्रावली ते पालोलीम, पालोलीम ते नेत्रावली आणि परत पालोलीम ते नेत्रावली असेच करायचे होते फक्त दुसरे दिवशी पालोलीमला पोहचण्याचा रस्ता वेगळा होता. सुरवातीला दहा किमी जंगलातून गेल्यावर आम्ही बाहेर आलो आणि सरळ शहरी सपाट रस्त्यांवरुन आमचा प्रवास सुरु झाला. नंतर मधेच शहरी रस्ता सोडून आम्ही परत टेकड्यांकडे वळलो आणि मग पुढे कोला, अगोंडा करीत आम्ही पालोलीम बिचला पोहचलो. तिसरे दिवशी आम्हाला नेत्रावलीत सावरी धबधबा किंवा नेत्रावली धबधबा बघायला जायचे होते पण आजचा रस्ता कालच्यापेक्षा वेगळा होता. आजचा रस्ता अंबेघाटातून जाणारा होता. असे म्हणतात की हे जंगल इतके घनदाट आहे की जमीनीवर सूर्यकिरणे पोहचत नाही. इतके नाही परंतु जंगले बऱ्यापैकी घनदाट होते. जागोजागी वन्यप्राण्यांविषयी बोर्ड होते, शिखरावर फॉरेस्टची चौकी होती. काणकोणवरुन पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला वळलो की अंबेघाटाचा रस्ता लागतो. वाटेत Bamanbudo waterfall लागला. नेत्रावली अभयारण्याच्या प्रवेश द्वारापासून ते सावरी धबधब्यापर्यंतचा रस्ता संपूर्ण दोऱ्यातला सर्वात सुंदर रस्ता होता. या रस्त्याला वेरळे चढ असेही म्हणतात. मधे सायकली ठेवून धबधब्यासाठी खाली उतरावे लागते. साधारण पंधरा मिनिटे उतरायला आणि पंचवीस मिनिटे चढायला लागतात. धबधबा बघितल्यावर वाटते की सारी मेहनत खरच कामास आली. आत कुठेतरी दडवून ठेवलेल्या हिऱ्यासारखा हा धबधबा आहे. वर रस्त्यावर धबधब्याचा आवाज देखील येत नाही. आम्ही गेलो नाही परंतु वाटेत मैनापी धबधबा देखील आहे. त्यासाठी जास्त चालत जावे लागते असे समजले. हा परिसर खूप सुंदर आहे आणि एकदा तरी बघायलाच हवा.
(पालोलीम चा समुद्रकिनारा)
शेवटल्या दिवशी चोवीस किमी दुसऱ्या दिवशी ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने परत जायचे होते. मधेच वेगळे वळण घेतले आणि रस्ता पूर्ण वेगळा झाला. मार्गात इतकी वळणे होती की जरा जरी जीपीएसवरुन नजर हटली तर तुम्ही चुकलाच म्हणून समजा. आम्ही चांदोरला आलो तिथे ब्रेगेंझा हाऊस ही सोळाव्या शतकातील पोर्तुगीझ पद्धतीने बांधलेली भव्य वास्तू बघितली. त्या वास्तूचा डायनिंग हॉल हा एखाद्या 2BHK प्लॅटपेक्षाही मोठा असेल. तिथल्या सोफ्याची कल्पना भयंकर आवडली. लायब्ररी सुद्धा भव्य होती. गोव्यातली पहिली प्रायव्हेट लायब्ररी होती असे म्हणतात. तिथून पुढे मडगावकडे न वळता आतल्या रस्त्याने जमेल तितका हायवे टाळून आम्ही माजोर्डाकडे निघालो. वाटेत Our Lady of Snows Rachol हे चर्च बघितले. शेवटी बेतालबाटीम बीचजवळ Beleza by beach या रिसॉर्टवर आमचा सायकल दौरा संपला.
(हेच ते ब्रेगेंझा हाऊस)
क्रमशः
(गोव्यात सायकलवर केलेली भ्रमंती दोन भागात लिहिण्याचा प्रयत्न करतोय. त्यातला हा पहिला भाग. तसेच मार्ग, सायकलींग, निवास अशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.)
मित्रहो
http://mitraho.wordpress.com/
प्रतिक्रिया
16 Dec 2021 - 5:02 pm | राजेंद्र मेहेंदळे
एव्हढ्या घाई गडबडीत लेख का उरकला? बरेच काही लिहिता आले असते.
१. माहिती कुठुन मिळाली
२. प्रवासाची तयारी
३. मार्ग कसा आखला
४. काय काय अडचणी आल्या किवा येउ शकतात
५. सायकल कुठली वापरली /वापरावी
६. शारीरिक /मानसिक दमसास कसा वाढवला
शिवाय दिवसागणिक लिहिले तरी ३-४ भागांची लेखमाला होईल.
अवांतर- फोटोची हाईट्/विड्थ सेट करु नका, ते ताणल्यासारखे दिसतात.
16 Dec 2021 - 5:27 pm | मुक्त विहारि
गोव्यात कितीही वेळा गेलो तरी समाधान होत नाही
16 Dec 2021 - 5:53 pm | चौथा कोनाडा
एक नंबर सायकल-भटकंती वृतांत !
💖
(वृतांत लवकर आटोपल्यासारखे वाटले, आणखी मोठे भाग हवेत !)
सुरेख प्रचि !
16 Dec 2021 - 6:03 pm | चंद्रसूर्यकुमार
सहमत. खरं तर लेखमालाच हवी.
16 Dec 2021 - 5:55 pm | चंद्रसूर्यकुमार
जबराट. आतापर्यंत आठ वेळा गोव्याला गेलो आहे. दरवर्षी अगदी वारी करावी त्याप्रमाणे तिथे जायला आवडते. कितीही वेळा जाणे झाले तरी परत परत जावेसे वाटतेच. आतापर्यंत प्रत्येकवेळेस वेगवेगळ्या समुद्रकिनार्यांजवळीत हॉटेलांमध्ये राहिलो आहे. गोव्याच्या समुद्रकिनार्याहून दूर असलेल्या भागात जायचे असे दरवेळी म्हणतो पण ते काही शक्य होत नाही इतकी ओढ तिकडचा समुद्र लावतो. साखळी, अल्डोना वगैरे समुद्रकिनार्यापासून दूर असलेले भागही खूप सुंदर आहेत असे ऐकले आहे. तिथे कधी जाणे होते बघायचे.
चांदोरचे ब्रिगान्झा हाऊस प्रसिध्द आहे. त्याप्रमाणेच लोटलीचे The Figueiredo Mansion हे पण तसेच जुने घर आहे आणि तसेच प्रसिध्द आहे. ते बघितले आहे.
16 Dec 2021 - 7:02 pm | मित्रहो
धन्यवाद राजेंद्र मेहंदळे, मुवि, चंद्रसूर्यकुमार, चौथा कोनाडा सर्वांना मनापासून धन्यवाद. मी लेखात लिहिल्याप्रमाणे दोन भाग लिहितो आहे. दोन भागात जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. लेखमाला लिहावी येवढ कौशल्य आणि पेशन्स नाही हो माझ्याकडे.
@राजेंद्र मेहंदळे सायकल दौरा हैदराबादच्या TBA या संस्थेने आयोजित केला होता. एक गंमत अशी गोव्यात ज्या स्थानिक व्यक्तीने आयोजन केले होते त्याने लॉकडाऊन मधे काहीतरी वेगळे म्हणून गोव्यातील प्रत्येक पोस्ट ऑफिसला भेट दिली होती. मार्गाची आखणी त्यांनीच केली होती. हा मार्ग बराच आतला होता त्यामुळे ज्याला माहिती आहे त्यानींच जावे. उत्तम मार्ग शोधणे हीच मोठी अडचण आहे. ट्रॅफिक, निसर्ग, खाण्याची सोय, राहण्याची सोय या साऱ्याचा विचार करुन मार्ग ठरवावा लागतो ते कठीण आहे. नेत्रावळीच्या जंगलात बिएसएनएल सोडले तर कुठलेच नेटर्क चालत नाही. सायकल कोणती असावी हे मार्गावर अवलंबून असते. हा मार्ग रोड बाईकसाठी योग्य होता. सरावाशिवाय पर्याय नाही मग त्रास होतो.
@मुवि गोव्याला मला सुद्धा गोव्याला किती वेळा भेट दिली तरी समाधान होत नाही. बियर पित नाही तरी. मला तर बायकोने गोवा इतके आवडते तर गोव्यात घर घे असा उपरोधिक सल्ला कितीतरी वेळा दिला.
@ चौथा कोनाडा धन्यवाद. काही माहिती पुढच्या भागात देतो.
@चंद्रसूर्यकुमार मी सुद्धा सहाव्यांदा गोव्यात गेलो होतो. मला सुद्धा वारी केल्यासारखे दरवर्षी जायला आवडते पण घरुन परवानगी मिळत नाही. साखळीच्या पुढे भाग सुंदर आहे. लोटलीचे The Figueiredo Mansion या बद्दल माहिती नव्हती पुढल्या वेळी गेलो की बघणार. गोवा प्रत्येक भेटीत वेगळा भासतो. वेगळ काहीतरी सापडते.
17 Dec 2021 - 9:55 pm | मुक्त विहारि
सुरूवातीला गोवा आणि दारू, असेच समीकरण माझ्या डोक्यात होते ...
पण, खरंतर, गोव्यात मी फारच कमी दारू प्यायली असेन ...
बायको बरोबर, निरूद्देश भटकंती आणि निसर्गाची साथ, ह्यापुढे दारूची ओढ कमीच लागली.. (जेमतेम एखादी बियर एका जेवणात..ते देखील, बायको म्हणाली म्हणून, तिचे लाॅजीक जरा वेगळे आहे, गोव्यात जाऊन फेणी न पिता परत येऊ नये ... पण, मला काही फेणी आवडली नाही, त्यामुळे बियर)
18 Dec 2021 - 8:19 am | मित्रहो
भटकंतीत मजा येते. मी एकदा एकटाच पणजी ते म्हापसा चालत गेलो होतो. वेळ घालवणे हाच उद्देश होता.
बियरच्या बाबतीत स्वस्ताई आहे. बीचवरील बर्यापैकी हॉटेल मध्ये ९० रुपयांत बियर बघून आश्चर्य वाटले. मला कळले की इथे ६० पर्यंत मिळेल. २००१ मधे मुंबईत किंमती त्यांच्या जवळपास होत्या
16 Dec 2021 - 8:05 pm | कंजूस
हल्ली सायकल टुअरस वाढत आहेत. सायकली तेच देतात. त्यामुळे तुमच्या शहरापासून पाचशे/आठशे किमी जाण्याचे श्रम वाचतात ते तिथे उपयोगी येतात.
स्वतंत्र गेल्यास अधिक मजा येईल पण ते सर्वांना जमणार नाही.
16 Dec 2021 - 8:44 pm | मित्रहो
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आम्ही आमच्या सायकली नेल्या होत्या. काही मंडळी कारने आले ते त्यांची सायकल घेऊन आले होते. आम्ही डिसीएम करुन सायकली नेल्या होत्या. तिथे जाऊन चार दिवसात ३४५ किमी सायकल चालवायची होती. नवीन सायकलवर जम बसायला कठीण गेले असते.
गोव्यात भाड्याने सायकली मिळतात. Blive या कंपनीच्या इलेक्ट्रिक सायकली सुद्धा उपलब्ध आहेत. ते टूर सुद्धा आयोजित करतात.
17 Dec 2021 - 3:05 pm | कुमार१
छानच !
17 Dec 2021 - 5:50 pm | मित्रहो
धन्यवाद डॉक्टर
17 Dec 2021 - 5:56 pm | प्रचेतस
मस्त एकदम.
गोवा आहेच भारी.
17 Dec 2021 - 8:03 pm | अभिजीत अवलिया
सहमत. गोव्याचे वातावरण वेगळेच. मला तर गोव्यात प्रवेश केला रे केला की एकदम प्रसन्न वाटते. ह्या वर्षी नोव्हेंबर मधेच जाऊन आलो आणि परत २५ डिसेंबरला गोव्यातच जाणार. गोव्याच्या प्रेमातच पडलोय मी.
17 Dec 2021 - 8:18 pm | चौकस२१२
गोव्याला जाऊन बरीच वर्षे झाली एकदा मुद्दामून गोवा टाळून पुढे असलेलया कारवार ला राह्यलं गेलो होतो " के टीडी सी "चे देवबाग म्हणून काली नदीतील छोटे रिसॉर्ट
गोव्याचा निसर्ग तर अजून असेलच पण आज देशंभरात तेच ब्रँड , त्याचच पद्धतीची उपहारगृहे आणि तेच फेल्क्स आणि सगळी कडे सारखीच घरे यात गोव्याचे गोवे पण टिकून आहे का?
नैनिताल चा रस्ता काय कि पणजीत काय वेगळी झाडे सोडलयास आणि हवेतील फरक ... तर बाकी दुकाने आणि घरे सारखीच असावीत .. असे का वाटते कोण जाणे ..
दिवसेंदिवस मूळ स्थापत्य टिकवून ठेवलेलं , मूळ खाणे पिणे मिळत असलेली अशी ठिकाणे सापडणे अवघड होतया का ...कि कोणाला काही फरक पडत नाही !
सगळी कडे "यहा तंदुरी चिकन मिलेगा " पाट्या बघण्यापेक्षा यथे "ओल्या काजूची उसळ मिळेल" .. अनवट अश्या माशाची आमटी मिळेल ( पापलेट आणि बागंडा वैगरे "नेहमीचेच सोडून" ) आशय जागा आहेत का ?
(उदासीन भटक्या )
17 Dec 2021 - 9:48 pm | मुक्त विहारि
मी आणि आमची सौ, एकदा असेच भटकता भटकता, एका हाॅटेल मध्ये गेलो होतो ....
नाव विसरलो ...
गोव्यात भटकायचे असेल तर, काहीही न ठरवता, गाडी भाडयाने घ्यायची, आणि सुटायचे... ज्या हाॅटल मधून खमंग वास येत असेल आणि गोवा पासिंगच्या गाड्या असतील, अशा हाॅटेलमध्ये जायचे...
18 Dec 2021 - 8:29 am | मित्रहो
परतताना आम्ही एअरपोर्ट जवळ शीला हॉटेलमध्ये जेवण केले होते तिथली फिश थाळी छान होती. तंदुरी चिकन ही पर्यटकांची मागणी असते. लोकांना कुठेही गेले तरी तंदुरी चिकन, आलु परांठा आणि हल्ली पिझ्झा हवा असतो. अहो गोव्यातील तांदूळाचा भात खायला सुद्धा पब्लिक तयार नसते
18 Dec 2021 - 9:48 am | अभिजीत अवलिया
सहमत. मी देखील तिथे एकदा गेलोय. गोव्यातील तांदूळ, फिशकरी व भाजलेला मासा. जेवण चवदार होते.
18 Dec 2021 - 9:28 am | चंद्रसूर्यकुमार
हो ओल्या काजूची उसळ मिळेल अशा पाट्या त्यामानाने कमी दिसतात. मला दक्षिण गोव्याचा अनुभव जास्त आहे तिथे जास्त पाट्या इंग्लिशमध्येच (आणि बीच शॅकवर मेन्यूकार्ड वगैरे रशियन भाषेत) असतात. त्यामुळे पाट्या दिसल्या नाहीत तरी ओल्या काजूची उसळ अगदीच मिळत नाही असे नाही. काही ठिकाणी ती उसळ खाल्याचे आठवते. आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एके ठिकाणी पॅकेज घेतले होते तिथे त्या दिवशी आचार्याला (शेफ) ओल्या काजूची उसळ बनवायला सांगितली होती. सोलकढीही घेतल्याचे आठवते. बर्याच हॉटेलमध्ये बेबिन्का हा गोव्याचा गोड पदार्थ मिळतो. डोडोल हा दुसरा गोड पदार्थ हॉटेल्समध्ये फार बघितला नाही पण बाहेर दुकानात मिळतो. माझ्यासारख्या केक/आईसक्रीममधील अंडे सोडल्यास इतर कोणताही मांसाहार न करणार्यालाही गोव्यात काहीही त्रास झाला नाही. वेताळभाटी (बेतालबातिम) ला मार्टिन्स कॉर्नर हे रेस्टॉरंट गोअन पदार्थांसाठी प्रसिध्द आहे. पण तिथे माझ्यासारख्यासाठी काही मिळत नाही असे कळल्याने जवळच्या हॉटेलात उतरूनही तिथे गेलो नव्हतो.
दुसर्या भागाची वाट बघत आहे. दुसर्या भागात कुठे काय चांगले मिळते याचा उल्लेख असेल असे वाटते. त्यात आपल्यासारखे गोवाप्रेमी आपल्या अनुभवातून भर टाकू शकतील.
18 Dec 2021 - 11:05 am | गवि
गोव्याला शाकाहाराचीही जुनी परंपरा आहे. अस्सल गोवन शाकाहारी पदार्थ खायचे असतील आणि गल्लीगल्लीतली अनवट / खानावळ टाईप ठिकाणे शोधायला वेळ नसेल तर पणजी मिरामार रस्त्यावर mums kitchen हे भारी रेस्टॉरंट आहे. त्यात व्यवस्थित महागडे पण निश्चित ओरिजिनल शाकाहारी पदार्थ मिळतात. हे प्युअर व्हेज होटेल नाहीये. पण शाकाहाराला समान महत्व दिलेले दिसते.
खालील नावे वाचून अंदाज येईल.
कंसात मूळ उच्चार चुभूदेघे.
खतखतेम (खतखतं)
अल्मीची आमोट तीक (अळिम्बीचे आंबट तिखट)- मश्रूम पदार्थ
सान्सव (सासव)
चोना रोस (चणा रस / रस्सा)
उड्डामेथी (उडदमेथी) बिंबलं घालून.
भरलेम केलेम (भरलं केळं)
बाकी आठवते ते म्हणजे अनसाफणसाची भाजी, काजू उसळ, भाज्यांची आणि मशरूमची सागुती. (होटेल भाषेत xacuti)
तसेच लाल भात आणि एकूण गोव्याची म्हणून अस्सल चव घ्यायची तर अजून एक ठिकाण नोंदवतो. जरा गल्लीत आहे पण आत पोचल्यावर खूष व्हाल. विवा पणजी (Viva Panjim).
18 Dec 2021 - 11:15 am | गवि
बाकी हे ज्या त्या गावाच्या आणि पदार्थाच्या नावापुढे त्या सानुनासिक उच्चाराचा 'म' जोडण्याची पद्धत ज्या कोणा पोर्तुगीज किंवा अन्य व्यक्तीने सुरु केली त्याला माझेम दंडवत देणेम.
चिंचणी, वायंगणी अशा आमच्या साध्या नावांचे चिनचीनीम, वाईनगुईनिम वगैरे भजेम करुन टाकलनीत. बरे मुंबै ठाणे पुणे इकडे फार टिकले नाहीत नाहीतर कासारवडवलिम, खोपोलीम, लोनावलेम, खांडलेम, पिम्परिम वगैरे करुन टाकलेम असतेम मेल्यानी.
18 Dec 2021 - 12:24 pm | चंद्रसूर्यकुमार
त्यातही काहीकाही गावांच्या नावांची पोर्तुगीजांनी केलेल्या चिरफाडीचे काहीही लॉजिक आपल्याला तरी समजत नाही. पाटणेचे पाटनेम, पालोळेचे पालोलेम वगैरे समजू शकतो. पण वेताळभाटीचे बेतालबातिम, साखळीचे सा़खळीम असे न करता Sanquelim वगैरे आपल्या तरी समजेपलीकडचे आहे.
18 Dec 2021 - 4:29 pm | मित्रहो
कान्होळे समुद्र किनारा आणि त्यांचे इंग्रजी नाव Candolim beach
22 Dec 2021 - 10:08 pm | गामा पैलवान
मित्रहो,
माझ्या मते सर्वात अतरंगी अपभ्रंश पेडणे चा आहे. पोर्तुगीजांनी pedane चं pernem केलं आणि आजच्या इंग्रजाळलेल्या भारतीयांनी त्याचा पर्नेम असा उच्चार केला. कुठे पेडणे आणि कुठे पर्नेम !
माझ्या मते हे अपभ्रंश अशिक्षित युरोपियनांचे प्रताप आहेत. पण युरोपीय ते प्रमाण मानायच्या भारतीयांच्या वासाहतिक दास्यवृत्तीमुळे ही अपभ्रष्ट रूपं आजही टिकून आहेत. भारतावर जर सुशिक्षित इंग्रजांनी ताबा मिळवला असता तर आज फार वेगळा भारत दिसला असता, असं मला राहून राहून वाटतं.
असो. विषयांतरापायी क्षमस्व.
आ.न.,
-गा.पै.
22 Dec 2021 - 11:40 pm | Trump
सुशिक्षित इंग्रज आणि अशिक्षित युरोपियन यांची उदाहरणे देता का?
मराठी आणि संस्कृत नावे तथाकथीत सुशिक्षित इंग्रजांना वाचायला देउन बघा.
24 Dec 2021 - 2:11 am | गामा पैलवान
Trump,
ही नावं तुम्ही का मागितली ते कळलं नाही. पण गुगलून बघता लगेच मिळवीत, असा अंदाज आहे. मला चटकन आठवलेली दोन नावं सांगतो.
१. अशिक्षित युरोपियन : कोलंबस
२. सुशिक्षित इंग्रज : माऊण्टस्ट्युअर्ट एल-फिन्स्टन
इथे शिक्षित म्हणजे भारतीय भाषा व संस्कृतींत रस असलेला असं गृहीत धरलं आहे.
आ.न.,
-गा.पै.
22 Dec 2021 - 11:42 pm | मित्रहो
हो पेडणे आणि पर्नेम पूर्ण वेगळे आहे.आज समस्या अशी आहे गोव्यातील कोकणी आणि मराठी माणसांनाच फक्त मूळ उच्चार माहिती आहे. इतर मंडळी फक्त इंग्रजी शब्दांवरून उच्चार करतात मला गोव्यात कोणत्याही गावाचे नाव वाचताना हि समस्या येते.
प्रतिसाद बद्दल धन्यवाद गा पै
25 Dec 2021 - 10:11 am | सुबोध खरे
हे काहीच नाही
MARCAIM हे मराठी /कोकणीत मडकई आहे.
ARAMBOL हे हरमळ आहे
ALDONA हे हळदण आहे
CORTALIM हे कुठ्ठाळी आहे.
CURTORIM हे कुडतरी आहे.
मडकईकर हळदणकर कुडतरकर हि आडनावे असलेले लोक या गावातून आलेले आहेत
17 Dec 2021 - 9:15 pm | मित्रहो
धन्यवाद प्रचेतस, अभिजीत अवलिया, चौकस२१२
मिपावर गोवाप्रेमी असतील याची खातरी होतीच आणि ती खरी ठरली.
@चौकस२१२ मी गोवा प्रेमी आहे . मला गोव्याला जायला आवडते. खूप आवडते वर म्हटल्याप्रमाणे हल्ली बियर पित नाही तरीही. तुमची उदासीनता समजण्यासारखी आहे. मला उत्तर गोव्याचा समुद्रकिनारा आवडत नाही तिथे जायला देखील आवडत नाही. खूप गर्दी असते. तेच तेच पदार्थ खायला मिळतात. तुलनेत मला दक्षिण गोव्यातील बीचेस जास्त आवडतात. उत्तर गोव्यात खूप गर्दी झाली आहे. या सायकल दौऱ्यात मी जिथे गेलो होतो त्यात फक्त बिचोली आणि साखळी सोडले तर इतर भागात कधीच गेलो नव्हतो. गोव्यात राष्ट्रीय अभयारण्य आहेत हेच माहित नव्हते. पुढील भागात येईल जेव्हा नेत्रावलीच्या जंगलात राइड करत होतो तेंव्हा डोक्यावरुन सात आठ हॉर्मबिलचा थवा उडत गेला. हे इतरत्रही होऊ शकते मला मात्र हा अनुभव गोव्यात आला. या दौऱ्यानंतर गोवा माझ्यासाठी आणखी खास बनले. जाहीरात नाही पण पुढचे भाग वाचा तुम्हाला खायच्या आणि राहायच्या नवीन जागा नक्कीच सापडतील.
18 Dec 2021 - 10:58 am | सोत्रि
नक्कीच, गोवा आहेच तसा!
माझ्या लाडक्या गोव्याविषयी इथेही चक्कर मारा!
(जाहिरात…)
- (गोवाप्रेमी) सोकाजी
18 Dec 2021 - 5:14 pm | मदनबाण
वा... कधी काळी गोव्याला गेलो होतो त्याची आठवण आली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Saami Saami Lyrical... :- Pushpa
18 Dec 2021 - 8:57 pm | धर्मराजमुटके
गोव्याला जायची खुप इच्छा आहे पण केवळ आणि केवळ शाकाहारी हॉटेल मिळेलच की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे जाणे होईलसे वाटत नाही. काही वर्षांपुर्वी तिकडे कामानिमित्त गेलो तेव्हा दोन दिवस बिस्कीट, शीतपेये आणि काजू खाऊन काढलेल्या दिवसाच्या आठवणी ताज्या झाल्या.
अजून एकदा एका मैत्रीणीच्या लग्नाला जायचा योग आला. तेव्हा एक दिवस शुद्ध शाकाहारी जेवणाचा योग आला पण ते घरी सोय झाल्यामुळे.
कोणाला केवळ आणि केवळ शाकाहारी हॉटेल माहित असतील तर ती इथे टाकावी ही विनंती.
18 Dec 2021 - 10:33 pm | मुक्त विहारि
त्यामुळे, कुठल्याही हाॅटेलात जा, शाकाहार नक्कीच मिळेल
अर्थात, खूप काही पदार्थ नसतील पण उदरभरण नक्कीच होईल
24 Dec 2021 - 3:06 am | कंजूस
एकदाच गेलोय. उत्तर / दक्षिण गोवा माहिती वाचली तरी रेल्वे 'टैम' टेबलने दाखवले की सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या मडगावास थांबतात ( उत्तर गोवा आणि पोंडा यासाठी करमळी स्टेशन जवळ पडते तिथे थांबत नाहीत आणि त्यामुळे कर्नाटक/केरळच्या गाड्यांची तिकीटे सहज मिळतात. ). तर रेल्वेने दक्षिण गोव्यालाच नेले. नंतर स्थानिक
बसेस प्रवास समजला. एकूण आवाक्यातले प्रकरण आहे. आता पुढे म्हातारपणी अधूनमधून जाण्यासाठी ठिकाण झाले.
रेंगाळण्यासाठी उत्तम जागा. उगाचच ठिकाणं बघण्याची धडपड नाही. चर्चेस आणि देवळे पाहायची नाहीत.
बाकी गोवा पर्यटनास पर्याय गोकर्ण, उडूपी, आणि दूरचे पुरी- भुबनेश्वर आहे हे माझे मत.
25 Dec 2021 - 9:10 am | मित्रहो
शाकाहारी गोवा ही धाग्याची कल्पना आवडली. पणजी, मडगाव, म्हापसा अशा मोठ्या शहरांमधे उत्तम शाकाहारी रेस्टॉरंट असतील. तसे गोव्यात फिरताना खूप प्युअर तर कधी प्योवऱ व्हेज रेस्टॉरंट अशा पाट्या दिसल्या आहेत. माझे एक नातेवाईक मुळचे कानडी होते पण काही वर्षे ते मडगावात राहत होते. ते सुद्धा फक्त शाकाहारी रेस्टॉरंट मधे जेवत होते. त्यांच्याकडे गेलो की ते शुद्ध शाकाहारी भोजनालयात घेऊन जायचे तिथे थाली व्यतिरीक्त नॉर्मल पंजाबी पदार्थ सुद्धा मिळायचे. आता नाव आठवत नाही.
25 Dec 2021 - 9:21 am | जेम्स वांड
गोव्यात कामत ग्रुपची भरपूर शुद्ध शाकाहारी उडपी रेस्टॉरंट्स आहेत, तसेच इतरही तुळू शेट्टी मंगलोरी शेट्टी लोकांची शाकाहारी हॉटेल्स सापडतात, हल्लीच झालेल्या गोवा व्यावसायिक ट्रिपमध्ये अगदी पुणे मुंबईत मिळेल इतके उत्तम डोसे, निर डोसे, इडली वडे इत्यादी नाश्ता ते कर्ड राईस, रसम राईस टिफिन मील्स वगैरे मिळाले होते मला तरी मिरामार बीचच्या अगदी जवळ अतिशय सुलभतेने.
25 Dec 2021 - 9:35 am | चंद्रसूर्यकुमार
अगोंडाला समुद्रकिनाऱ्याला समांतर एक अप्रतिम रस्ता आहे. गाव लहानच आहे त्यामुळे गावातला तोच मुख्य रस्ता आहे. तिथे लहानलहान बरीच रेस्टॉरंट आहेत. त्यात काही व्हेगन रेस्टॉरंट आहेत. त्यातील झेस्ट व्हेगन म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिथे एकदा आम्ही जेवलो होतो.चव आवडली होती. व्हेगन म्हणजे कोणतेच animal product न वापरणारे- म्हणजे दूधही नाही. तिथे चहा कॉफी पण बहुदा मिळत नसावी. सांगायचा मुद्दा म्हणजे गोव्यात अशीही रेस्टॉरंट आहेत :)
25 Dec 2021 - 10:03 am | जेम्स वांड
हे पटले, कारण गोव्यात बीच शॅक्सवर ताजी फडफडती तळलेली मच्छि नाही खाल्ली तर पाप लागते म्हणे, आणि आम्ही पडलो पापभिरू कॅटेगरीतले लोक्स
😉 😉 😉 😉
19 Dec 2021 - 10:49 am | मित्रहो
धन्यवाद गवि, सोत्रि, धर्मराजमुटके, मदनबाण
खास गोयं अशा पदार्थांविषयी सुंदर चर्चा झाली. बरीच माहिती मिळाली.
@सोत्रि तुमचा धागा बघितला. आवडला
@चंद्रसूर्यकुमार दुसरा भाग आज टाकतो. सायकलींग आणि तो करताना झालेला त्रास हे थोडे जास्त वाढल्याने खाण्यापिण्याविषयी तिसऱ्या भागात येणार. तसेच बिचच्या आसापास जिथे जेवलो, राहिलो ते फारसे लिहिण्यासारखे नाही. त्यामुळे जंगल परिसरातून फिरताना जिथे जेवलो राहिलो तो अनुभव वेगळा होता त्याविषयी लिहले आहे.
19 Dec 2021 - 12:23 pm | मनो
दिवार बेट म्हणलं की inquisition आणि त्यातील अत्याचार असं काहीबाही आठवून तिकडे जाणं नकोसं वाटतं. त्यामुळं तिकडे जाणं झाले नाही.
खाण्याच्या यादीत पणजीचा भाजीपाव राहिला आहे ...
19 Dec 2021 - 12:27 pm | गवि
पुरी पातळभाजी पण.
बाय द वे, गोव्याचा पाव ही एक जर्राशी ओव्हररेटेड वस्तू आहे. ठीक असतो.
25 Dec 2021 - 11:31 am | सुबोध खरे
गोव्यातील पावांचे विविध प्रकार
https://timesofindia.indiatimes.com/city/goa/pao-erful-love-affair/artic...
19 Dec 2021 - 12:58 pm | मित्रहो
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मनो
इतिहासातील कारणांबद्दल आता जाणे टाळू नका, बेट सुंदर आहे.फार मोठे नाही पण छान आहे. एका दिवसात बघण्यासारखे आहे.
inquisition या विषयावर दौऱ्यात काही मित्रांमधे खूप चर्चा झाली.