नारळ पुराण

मालविका's picture
मालविका in पाककृती
3 Nov 2021 - 10:40 pm

ही कोणतीही पाककृती नाही पण अनेक पाककृतींमधला एक महत्वाचा घटक असलेल्या नारळाचं हे वर्णन म्हणून या सदराखाली लिहिते आहे.

माहेर नि सासर दोन्ही कडून कोकणस्थ आणि कोकणातच रहात असल्याने नारळावर जरा जास्तच प्रेम. कधी कधी हे प्रेम इतकं उतू जात की नवरा वैतागून म्हणतो," आता नाश्त्याला नारळाची भजी, जेवायला नारळाची पोळी नि भाजी,प्यायला नारळाचं सरबत केलंस की पुण्य मिळेल"

पण खरंच , ज्यात त्यात नारळ अर्थात ओलं खोबर घातल्याशिवाय मला समाधानच मिळत नाही. कुठलीही उसळ ही ओल्या खोबर्याशिवाय अपूर्ण. पलेभाजीत नारळ हवा. चटणी खोबर्याचीच. आमटीत खोबरं हवंच. याच मुळे दर दोन दिवशी घरात नारळ फुटतो. आता दाराशी नारळाची झाडं असल्याने जर सढळ हातानेच तो वापरला जातो.( तरी मी समुद्रकिनारी नाही राहत. नाहीतर विचारायलाच नको. स्वतःची वाडी असती तर हे 2 दिवसच प्रमाण रोज वर आलं असत) माझी आई आणि वहिनी या माझ्या ट्रेनर. यांच्याकडून मी सगळं शिकले नि एक पाऊल पुढे जाऊन जास्तच नारळ खवत बसले. साबुदाण्याची खिचडी करा, पोहे करा, तिखट मिठाचा सांजा करा, दपडे पोहे करा काहीही नाश्त्याला केलं की आधी त्यात ओलं खोबरं हवंच. नाहीतर घशात घास अडकतो. अगदी खवलेलं खोबरं नसेल तर नारळ फोडून खरवडून मगच नाश्त्याच्या डिश भरते. मुगातांदुळाची खिचडी खोबरं कोशिंबिरी शिवाय काय चांगली लागतेय? सुरळीच्या वड्यांवर पेरायला सुखं खोबरं नाही तर ओलं खोबरच हवं. अगदी मला थालिपीठ करताना त्यातही खोबरं आवडत. खोबऱ्याची किंचितशी गोडसर चव येते त्याने.

नारळ फोडणे आणि खवणे हे कौशल्याचं काम. कौशल्य यासाठी की कोयतीचा घाव नीट शिरेवर बसला तरच नारळ नीट दोन भागात फुटतो नाहीतर वेडावाकडा कसाही आकार येतो. मग त्यातलं पाणी पिऊन त्याची चव ठरवायची. वास घेऊन बघायचा. तोवर जर घरातले जागेवर असतील तर आबा नाहीतर माझा मुलगा आवाज ऐकून येतात नि कडेच खोबरं सुरीने काढून घेतात. गुळाबरोबर किंवा साखरेबरोबर किंवा तसचं खायला दोघांना आवडत. आता यात थोडा नारळ संपतो. मग तो खवायला बसायचं. नारळ खरं तर कडेने आधी नीट खाऊन मग आतील भाग खवायचा म्हणजे तुकडे खूप कमी पडतात असं आई सांगते. पण मी अगदी मधला भाग आधी खवते. दोन तीनदा खरवडून झाला की पाण्याचा अंश असलेलं सुंदर चवीचं खोबर खाली ताटलीत जमा होत. हे मला खूप आवडतं. त्यामुळे दोन्ही वाट्यांमधल ते रसयुक्त खोबरं खाऊन होत. आता उरलासुरला नारळ मग नियमाप्रमाणे मी आधी कडेने छान खरवडून घेते आणि मग मधला भाग खरवडते. त्यातसुद्धा ताटलीच्या एक भागात सुरुवातीचं पांढर शुभ्र खोबरं तर जरा ताटली फिरवून दुसऱ्या भागात खोबऱ्याचा काळसर भाग असे भाग करते. एकाच डब्यात जरी भरून ठेवलं तरी त्यातही एका बाजूला पांढरं खोबरं नि दुसऱ्या बाजूला काळसर खोबरं असं काढून ठेवते. पोहे, उपमा थोडक्यात वरून पेरायला लागत त्यासाठी हे पांढरीशुभ्र खोबरं तर भाजीत, चटणीत घालायला किंचित काळसर खोबरं अश्या त्याच्या वाटण्या असतात.

एखादा गोटा नारळ निघाला की लगेच उन्हात वाळत पडतो. फुकट म्हणून घालवायचा नाही. नारळाला वास येत असेल तर त्याच दूध काढून केसांना लावतात म्हणे. आता एव्हढं पण नाही सहन होत मला. पण आमची मदतनीस स्वातीताई लावते ते म्हणून मग तिला देऊन टाकते.
माझ्या ताईच घर समुद्रकिनारी. दाराशी छान नारळी पोफळीची वाडी. त्यांच्याकडचे नारळ एकेक मोठ्ठे. खवताना कंटाळा येईल एवढे.पण चव काय मिठास! तिच्याकडे गेलं की हमखास खाऊ म्हणून 8 10 नारळ तिच्या घरातून मिळणार. शिवाय ती माझ्याकडे येते तेव्हा नारळाच्या चविष्ट वड्या आणते. नाहीतर रवा नारळाचे लाडू. खूप आवडत्या गोष्टी या.

असो , आता नारळ पुराण आवरते घेते नि दिवाळीच्या निमित्ताने ओल्या नारळाच्या करंज्या खायला यायचं आमंत्रण देते.

प्रतिक्रिया

सुक्या's picture

4 Nov 2021 - 12:26 am | सुक्या

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ . . ओल्या नारळाच्या करंज्या खायला यायचं आमंत्रण दिलं पण यायचं कुठे ते नाही सांगीतले .. . हे हे हे . .
पत्ता द्या . . .

आवांतर : "पत्ता द्या" हा वाक्यप्रयोग मिपा वर एके काळी खुप गाजला होता असे अंधुक आठवते . . . :-)

सुक्या's picture

16 Nov 2021 - 12:12 am | सुक्या

मुवी . . मानलं तुम्हाला ...
:-)

काय ते दिवस होते ... हा हा हा . . .

मुक्त विहारि's picture

4 Nov 2021 - 8:38 pm | मुक्त विहारि

नारळ घरात नसेल तर, घराला घरपण येत नाही...

आग्या१९९०'s picture

4 Nov 2021 - 9:31 pm | आग्या१९९०

साबुदाण्याची खिचडी करा, पोहे करा, तिखट मिठाचा सांजा करा, दपडे पोहे करा काहीही नाश्त्याला केलं की आधी त्यात ओलं खोबरं हवंच.
अगदी खरंय. ओले नारळ हा चवीतला चमत्कार आहे.

मुक्त विहारि's picture

4 Nov 2021 - 9:43 pm | मुक्त विहारि

+1

संक्षिप्त नारळ पुराण आवडले !

[ शहाळ्याच्या पाण्याचा प्रेमी ]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।

सुखीमाणूस's picture

7 Nov 2021 - 10:16 pm | सुखीमाणूस

सगळे लिखाण तन्तोतन्त पटले.
अमेरिकेत सुके खोबरे पुड, नारळ दुध, तेल वगैरे सगळे मोठाल्या दुकानातुन मिळायला लागले आहे. आहेच नारळाची महती अशी....

चौकस२१२'s picture

22 Nov 2021 - 5:57 am | चौकस२१२

ताजा ओला खवलेला नारळ आणि त्याचा काढलेलं ताज दूध ( सोलकढी किंवा माशाच्या आमटी साठी) आणि टिन मधील दूध ( कि जे बहुतेक थायलंड/ व्हिएतनाम मधील मिळते येथे)
यात चवीत आणि पोत यात खूप फरक असतो असे का? ( जरी टिन मधील थोडे वेगळे लागणार हे गृहीत धरले तरी )
त्यात सुद्धा कोकनट क्रीम आणि कोकोनट मिल्क असे दोन प्रकार असतात
मलेशियन आणि थाई जेवणात नारळ दूध भरपूर वापरतात पण ते नेहमी असे टिन मधील असते कदाचित प्रत्यक्ष मलेशियात आणि थायलंड मध्ये ताजे नारळाचे दूध वापरात असतील .. ते मग कदाचित भारतातातील ताज दुधासारखेच लागत असेल... !

पिंगू's picture

22 Dec 2022 - 4:06 pm | पिंगू

नारळ पुराण आवडले.
बाकी नारळाचा किस काढणे हे कष्टप्रद काम कमी करायचे असेल तर मला संपर्क करा. उच्च प्रतिचा ओल्या नारळाचा सुकवलेला किस मी विकतो.