दिवाळी अंक २०२१ : शाळेपल्याडची शाळा

उमेश तुपे's picture
उमेश तुपे in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

सूर्य मावळल्याने सर्वत्र लालसर प्रकाश पसरला होता. पाखरांचे थवे घरट्याकडे परतू लागले होते. वारा पाचोळ्यासह आकाशात उंच उडू पाहत होता. शेतातली माणसे आपल्या जनावरांसह परतीच्या वाटेवर होती. हे पाहून अनिकेतही आपल्या शेळ्यांची जमवाजमव करू लागला. सर्व शेळ्या असल्याची खातरी करताच त्याच्या लक्षात आले की, म्हातारी शेळी कुठे दिसत नाही. अनिकेतने भरभर आजूबाजूला नजर भिरकावली, पण म्हातारी शेळी त्याला कुठे दिसली नाही. अनिकेतच्या मनात धस्स झालं. त्याला काळजी वाटू लागली. वडिलांचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता. शेळी हरवली तर वडिलांचा मार खावा लागणार, या भीतीने त्याची पुरती गाळण उडाली होती. परंतु तिला रस्ता माहिती असल्याने ती घरी येईल असे त्याला वाटे, या एकाच आशेवर तो साऱ्या शेळ्यांना एकत्र करून झपाझप पावले टाकत घराकडे निघाला होता. शेळ्यांना हातातल्या लिबांच्या फोकाटीने हुसकावत ...हुसकावत...तोंडाने थिर्र ....थिर्र...र्र.. असा आवाज करत तो शेळ्यांना पळवत होता. म्हातारी शेळीच्या विचारांनी त्याच्या पावलांची गती आता अधिकच वाढली होती. तो घराच्या जवळ जवळ आला होता. एवढ्यात..

“आण्या, ये आण्या, अरे थांब ना, तुला एक गोष्ट सांगायची आहे.” हे शुभमचे शब्द ऐकताच अनिकेतची पावले मंदावली आणि शुभम आता काय सांगणार याचा विचार तो करू लागला. शुभमने आपली शेळी पाहिली तर नसेल ना? अनिकेतची आशा पल्लवित झाली. तोपर्यंत शुभमही पळत पळत अनिकेतपर्यंत येऊन पोहोचला होता. अनिकेतने मोठ्या उत्साहाने विचारले, "काय रे, तू माझी म्हातारी शेळी पाहिली का? कुठे आहे ती? बोल ना पटकन.." एका दमात सारे प्रश्न विचारून अनिकेत मोकळा झाला.

शुभम - "अरे नाही रे, तुझी शेळी मी पाहिली नाही. पण जाईल तरी कुठे, येईल घरी. नको टेन्शन घेऊ.” शुभमच्या या शब्दांनी अनिकेतचा हिरमोड झाला होता. पण येईल घरी या शब्दांनी त्याला धीरही आला होता.
अनिकेत - "अरे, मग तू काय सांगणार होतास, सांग पटकन. आई वाट पहात असेल घरी."
शुभम - "अरे, कोरोनामुळे आपली शाळा सुरू होणार नाही."
अनिकेत - "मग रे!"
शुभम - "गावातल्या पवार सरांनी सांगितलंय, आता मोबाइलवर ऑनलाइन शिकवणार आहेत. म्हणून मारवाड्याच्या रित्यानी आणि बोबड्या राजाने पाच हजार रुपयांना अँड्रॉइड मोबाईलपण घेतले त्यासाठी."
अनिकेत - "म्हणजे आपल्याला पण अँड्रॉइड मोबाईल घ्यावा लागेल तर.... पण माझी आई तर मला दहावी पास झाल्यावर मोबाईल घेणार आहे, आता तर कुठे आपण सातवीत आहोत."
शुभम - “माझ्याकडे पण मोबाईल नाही, मी कालपासून माझ्या आईच्या मागे लागलो होतो तर आज वैतागून तिने एक चिपाट माझ्या पाठीत बसवले.”

अनिकेत आपल्याच विचारात असल्याने शुभमचे हे शब्द ऐकूनही काहीही न बोलता शेळ्यांना हुसकावत आपल्या वाटेला लागला होता. हरवलेल्या शेळीचा विसर पडून तो आता शाळा, ऑनलाइन शिक्षण आणि त्यासाठी लागणारा अँड्रॉइड मोबाइल याच विचारात गुंतला होता.

शाळा हा अनिकेतचा खूप जिव्हाळ्याचा विषय होता. काय ती शाळेत असतानाच त्याला उसंत मिळायची. खेळायचं, मित्रांशी गप्पा मारायच्या, शिक्षकांची शाब्बासकी आणि खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या. तल्लख बुद्धी, हुशार व खेळाडू वृत्तीचा अनिकेत शाळेचा लाडका विद्यार्थी होता. झपाझप चालणारी त्याची पावले आता हळूहळू मंदावली होती. शेळ्या आणि अनिकेत यांतील अंतर आता हळूहळू वाढू लागले होते. आई-बाबा अँड्रॉइड मोबाइल घेतील का? त्यांच्याकडे पैसे असतील का? नाही घेणार ते.. नाही घेणार.. असे तो स्वतःशीच पुटपुटत चालला होता.

अनिकेतला सारा भूतकाळ दिसू लागला होता. मोठ्या कष्टाने पैशांची जुळवाजुळव करून सोयाबीनची केलेली पेरणी, सोयाबीन उगवले नाही म्हणून पुन्हा करावी लागणारी पेरणी, पैसे नसल्याने काकांच्या शेतात कामाला जाणारी आई. हे सर्व एका बाजूला आणि एका बाजूला अनिकेतच्या जिव्हाळ्याची शाळा, त्याचे मित्र आणि या सर्वांसाठी लागणारा अँड्रॉइड मोबाइल.. हे सारे विचारचक्र त्याच्या मनात सुरू असतानाच त्याला कोणतरी समोरून मोठ्याने ओरडून आवाज देत असल्याचे जाणवले. शेळ्या कधीच घरी पोहोचल्या होत्या व त्या बांधण्यासाठी आई आवाज देत होती. आईचा आवाज ऐकताच अनिकेत विचारातून बाहेर आला आणि शेळ्यांच्या गोठ्याकडे धावत सुटला. सैरभैर होऊन म्हतारी शेळी आहे का हे पाहू लागला, तर म्हातारी शेळी तिच्या नेहमीच्या जागेवर शांत बसलेली होती. हरवलेल्या शेळीला गोठ्यात पाहून अनिकेतचा जीव भांड्यात पडला. आई व अनिकेतने मिळून सार्‍या शेळ्या बांधल्या.

अनिकेतचे बाबा सकाळीच एक शेळीची पाठ घेऊन बाजारात विकायला गेले होते. बाबांच्या फटफटीचा आवाज ऐकून आईने चहाचे पातेले चुलीवर ठेवले अन अनिकेतला बांड्या शेळीचे कपभर दूध काढून आणायला सांगितले. अनिकेतच्या डोक्यातून अँड्रॉइड मोबाइल काही केल्या जात नव्हता. त्याला वाटायचे आपण आईला सांगावे, पण त्याची हिंमत होत नव्हती. शेवटी तो हिम्मत करून आईकडे गेला, तेव्हाच बाबा आईला शेळीची पाठ पाच हजार रुपयांना विकल्याचे व मामांकडून पाच हजार रुपये आणले असून लगेच उद्या सोयाबीनची दुबार पेरणी करणार असल्याचे सांगत होते, हे ऐकून अनिकेतचे तोंडात आलेले शब्द तोंडातच जिरून गेले.

नेहमी नऊ वाजताच झोपणारा अनिकेत आज घड्याळात दहा वाजले तरी झोपला नव्हता, हे पाहून आईने अनिकेतला विचारले, “काय रे आण्या, अजून झोपला का नाही? तुला बरं वाटत नाहीये का?” अनिकेतचे काम आता सोपे झाले होते. आईनेच स्वतःहोऊन विचारल्यामुळे अनिकेतने आईला सर्व काही सांगून टाकले आणि मोबाइलची मागणी केली. अँड्रॉइड मोबाइल मिळवण्यासाठी हा अनिकेतचा पहिला प्रयत्न होता. अनिकेतच्या शिक्षणाची आईला काळजी होती, पण पाच हजार रुपयांचा मोबाइल घेण्याची आपली परिस्थिती नसल्याची जाणीवही तिला होती. परंतु आईने अनिकेतच्या समाधानासाठी बाबांशी बोलण्याचे अनिकेतला आश्वासन दिले आणि झोपी लावले.

दुसऱ्या दिवशी तांबडे फुटते न फुटते, तेच अनिकेतचे आई-बाबा भल्या सकाळीच सोयाबीनची पेरणी करण्याकरिता रानात गेले. अनिकेतही नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून आपल्या कामाला लागला. त्याच्या लाडक्या हनम्या वासराला चारा टाकत टाकत तो त्याच्याशी लडिवाळपणे गप्पा मारू लागला, “हनम्या!. ये .. हनम्या. सांग ना रे, मला बाबा मोबाइल घेतील का? ...सांग ना रे, ...हनमु” इतक्यात अनिकेतच्या आजीने आवाज दिला. “आण्या.. ये आण्या...आरे खेळत काय बसलाय, त्या शेळ्या बाहेर बांध, झाडून घे पटकन अन मला चूल पेटायला तेवढं वाळलं खोड आणून दे.” आजीने सांगितलेली कामे अनिकेतने पटपट उरकली, पण आज अनिकेतच्या मनात दिवसभर मोबाइलचाच विचार सुरू होता. त्याचे कामात लक्ष नव्हते. तो आपल्याच विचारात होता. आई आता बाबांशी बोलली असेल ..काय म्हणले असतील बाबा? हाच विचार तो संध्याकाळ झाली तरी करत होता. आई आल्यापासून अनिकेत आईच्या मागेमागे लुडबुड करत फिरत होता आणि आईला सारखा विचारत होता, “सांग ना आई, काय म्हणाले बाबा?” शेवटी आईने वैतागून बाबांकडे पैसे नसल्याने तुला मोबाइल मिळणार नाही, असे ठणकावून अनिकेतला एकदाचे सांगितले. आईचे हे कठोर शब्द ऐकून अनिकेतचे डोळे भरून आले, त्याचा गोरागोमटा चेहरा लालबुंद झाला आणि तो कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडू लागला. आईने अनिकेतला खूप समजावले व आपण पैसे आल्यानंतर मोबाइल घेऊ या असेही सांगितले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

रडून रडून शांत झालेला अनिकेत समोरच्या माठातून पाझरून खाली पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाकडे एकटक पाहत बसला होता. आईचा स्वयंपाक झाला, पण तरीही अनिकेत तेथेच ठाण मांडून बसला होता. माठातून पाझरून पडणाऱ्या एका एका थेंबाने आता माठाखालची वाटी अर्ध्यापेक्षा जास्त भरली होती. पाण्याच्या एका एका थेंबान भरलेल्या वाटीला पाहून अनिकेतला त्याचा मार्ग मिळाला. त्याच्या चेहर्‍यावरील भाव आता बदलले, तो काहीसा आनंदी झाला होता. 'थेंबे थेंबे तळे साचे' या सरांनी शिकवलेल्या म्हणीचा खरा अर्थ अनिकेतला आज समजला होता. अनिकेतच्या लक्षात आले होते - जर आपण एक एक रुपया जोडला, तर मोबाइलसाठी लागणारे पाच हजार रुपये नक्की एकत्र करू शकतो. याच विचाराने अनिकेतने स्वतः पैसे जमा करायचे, काम करायचे आणि मोबाइल घ्यायचा असा मनाशी पक्का निर्धार केला आणि येथूनच अनिकेतच्या ध्येयवेड्या प्रवासाची सुरुवात झाली.

घरासमोर टाकलेल्या बाजेवर पडून अनिकेत आकाशातल्या लूकलुकणारे तारे न्याहाळत न्याहाळत ऑनलाइन शाळा, मोबाइल अन पैसे याचाच विचार करत झोपी गेला. आज भल्या सकाळीच उठून अनिकेतने आपली नित्याची कामे पटपट उरकली आणि घरातील जुन्या वह्या, फुटलेले प्लास्टिक आणि काही गंजलेले लोखंडाचे तुकडे कुणालाही मागमूस न लागता एकत्र करून ठेवले. सकाळच्या जेवणानंतर आईला सांगून अनिकेत घराबाहेर पडला. सुभ्या, नित्या, लाल्या आणि गण्या या मित्रांना त्याने गोळा केले अन त्या सर्वांनी मिळून एक मोहीम हाती घेतली सर्व मित्रांनी अनिकेतला मदत करायचे ठरवले. मग ठरल्याप्रमाणे सर्वांनी मिळून अख्खे गाव पालथे घातले आणि जवळजवळ अर्धी गोणी दारूच्या बाटल्या गोळा केल्या. आई-बाबांना कळू न देता अनिकेतचा चाललेला हा उद्योग होता. सकाळची एकत्र केलेली रद्दी आणि या बाटल्या अनिकेतने वरच्या पेठेतील भंगारवाल्याला विकून आज दोनशे रुपये मिळवले. मिळालेली दोनशे रुपयांची नोट पाहून अनिकेत आज भलताच खूश होता. अनिकेतची ही पहिली कमाई होती. मिळालेली दोनशे रुपयांची नोट अनिकेतने चार वेळा घडी करून खालच्या पँटीच्या खिशात दुमडून ठेवली आणि शुभ्याकडे पाहून “दोस्त रुपये बहुत बडी चीज होती है” असा डायलॉग मारत एक हात खिशावर ठेवून आनंदाने घराकडे धूम ठोकली. पण अनिकेतचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही, अनिकेतचा सारा प्रताप बाबांना समजल्याने अनिकेतची यथेच्छ धुलाई झाली. तरीही.. अनिकेत आज खूश होता.

रात्रीचे जेवण झाल्यावर अनिकेतने दुसऱ्या मोहिमेची तयारी केली. खूप दिवसा़पासून खाऊचे पैसे जमा करत असलेला आईकडील डबा त्याने रात्री फोडला. त्यात एकशे पन्नास रुपये मिळाले. सकाळी ही गोष्ट आईच्या लक्षात आली. पण अनिकेतने रात्रीच बाबांचा खाल्लेला मार आणि मोबाइलसाठी त्याची चाललेली धडपड पाहून तिने बाबांना नाव सांगितले नाही. तर उलट अनिकेतला मदत करण्याचे ठरवले. आई सोबत आल्याने अनिकेतचे हात आता आणखीच मजबूत झाले होते. पहिल्याच दिवशी अनिकेतने तीनशे पन्नास रुपये जमा केले.

दुसऱ्या दिवशी अनिकेतची आई नेहमीप्रमाणे कामाला निघाली असता अनिकेतनेही सोबत येण्याचा हट्ट धरला. शेवटी आईने त्याला सोबत घेतले. अनिकेतने आईसोबत दिवसभर भर उन्हात कुलकर्णी काकांच्या शेतात डाळिंब तोडण्यास मदत केली. अनिकेतचे काम पाहून कुलकर्णी काकाही थक्क झाले. त्यांनी अनिकेतला पन्नास रुपये आणि चार डाळिंबे खायला दिली. आज अनिकेत खूप दमला होता, पण तरीही तो खूश होता. असा दिनक्रम सतत तीन दिवस सुरू राहिला, पण कुलकर्णी काकांचे काम संपल्याने आणि दोन दिवसांपासून नवीन कामही न मिळाल्याने अनिकेत जरासा चिंतेत होता. तो सतत विचारात गुंतलेला असायचा, आपल्याला काय करता येईल याचाच तो बहुधा विचार करायचा. आपल्या बाळाला मदत व्हावी म्हणून अनिकेतच्या आईने रेहमान चाचाकडून दोन चिंचांची पोती घेतली होती. दिवसभर काम करून आल्यानंतर संध्याकाळच्या जेवणानंतर रोज दोन तास अनिकेतची आई चिंचा फोडत असे आणि रेहमान चाचा शंभर रुपये पायली चिंचुक्याप्रमाणे आईला पैसे देत.

अनिकेत पवार सरांचा लाडका विद्यार्थी होता. सर अनिकेतला जवळून ओळखत असल्याने सरांना त्याचे खूप कुतूहल वाटायचे. सरांनी अनिकेतला कुलकर्णी काकांच्या शेतात डाळिंब तोडताना पाहिले होते. त्यांचचे अनिकेतवर खूप बारीक लक्ष असे. एक दिवस त्यांनी अनिकेतला बोलावून त्याची विचारपूस केली होती. मोबाइल घेण्यासाठी अनिकेत स्वतः मेहनत करत आहे हे त्यांना माहीत होते. त्यामुळेच शहरातून मोबाइल आणून देण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली होती.

अनिकेत आता मिळेल ते काम करू लागला होता. एक दिवस त्याला माळीबाबांच्या शेतात फुले तोडण्याचे काम मिळाले. चार दिवसांनंतर काम मिळाल्याने व माळीबाबांच्या फुलांच्या आधुनिक शेतीबद्दल तो ऐकून असल्याने गावापासून २ मैल दूर असलेल्या शेतावर जाण्याचे धाडस केले. काम मिळाल्याच्या आनंदात अनिकेत आज लवकरच झोपी गेला. सकाळी लवकर पायवाट तुडवत तुडवत अनिकेतने माळीबाबांचा मळा गाठला. माळीबाबांच्याही अगोदर शेतावर पोहोचल्याने अनिकेत खूश होता. थोड्याच वेळात माळीबाबाही तेथे आले. छोटासा अनिकेत तल्लीन होऊन अत्यंत प्रामाणिकपणे आपले काम करत आहे हे पाहून त्यांना खूप छान वाटले. त्यांनी वेगवेगळ्या फुलांचे उत्पादन घेतले होते. गावाबद्दल प्रेम व आस्था असल्याने ते गावी आले होते. अनिकेतबरोअर दिवसभर काम केल्याने त्यांना अनिकेतचा मनमिळाऊ आणि बोलका स्वभाव खूप आवडला होता. दोघांनीही आज एकमेकांशी खूप सार्‍या गप्पा मारल्या होत्या. ते आता रोजच अनिकेतला बोलवत आणि अनिकेतलाही छान वाटे. दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. अनिकेत त्यांच्या घरचा एक सदस्यच होऊन गेला होता. माळीबाबांच्या बोलण्यातून अनिकेतला एक कल्पना सुचली आणि अनिकेतने ती पूर्ण करण्याचे ठरवले.

अनिकेतने माळीबाबांचे मन जिंकले होते. त्याने माळीबाबांकडून फुलांचे हार बनवण्याची कला शिकून घेतली आणि लवकरच तो त्यात परिपूर्ण झाला. माळीबाबा अनिकेतला वेळोवेळी मार्गदर्शनही करत. एक दिवस अनिकेत आपल्या पैशातून दोनशे रुपयांचे फुले त्यांच्याकडून विकत घेतली व घरी जाऊन ती ओल्या कापडात गुंडाळून ठेवली. सकाळी भल्या पहाटे उठून अनिकेतने रंगीबेरंगी फुलांचे आकर्षक हार बनवले. सकाळी लवकर अंघोळ करून सर्व हार एका काठीत अडकवून ती काठी सायकलला लावून गावात हार विकण्यासाठी गेला. गावातील दुकानदार, गाडी ड्रायव्हर तसेच इतर काही ठिकाणी अनिकेतचे सर्व हार विकले गेले. त्याला फुलांचे पैसे वगळता ४० रुपयांचा नफा मिळाला. तो खूप आनंदी झाला. या आनंदाच्या भरातच तो थेट माळीबाबांच्या मळ्यात गेला. त्यांना हे सारे ऐकून अनिकेतचा खूप अभिमान वाटला.

अनिकेत आता नित्यनेमाने आपल्या सायकलवरून रोज माळीबाबांच्या मळ्यात जाऊन फुले आणत होता. सकाळी लवकर उठून फुलांचे छान रंगबेरंगी हार बनवून विकत असे. दिवसेंदिवस अनिकेतच्या हारांची मागणी वाढू लागली होती. गाव व पंचक्रोशीतून लोक थेट अनिकेतच्या घरी येत. पंचक्रोशीत होणार्‍या लग्न समारंभात व सप्ताहालाही अनिकेतच हार पुरवत. अनिकेतला आता कोठे काम शोधण्याची गरज नव्हती. त्याचा स्वतःचाच व्यवसाय सुरू झाला होता. अनिकेतच्या आई-बाबांना त्याचे खूप कौतुक वाटायचे. गावातले लोकही अनिकेतचे तोंडभरून कौतुक करायचे. एका महिन्यामध्येच अनिकेतने आपल्या व्यवसातून जवळपास चार हजार रुपये कमावले होते. आईनेही रेहमान चाचाच्या चिंचा फोडून आलेले एक हजार रुपये अनिकेतला दिले होते. अनिकेतजवळ आता ५००० रुपये जमले. एका खडतर प्रवासानंतर आता त्याचे स्वप्न पूर्ण होणार होते, या कल्पनेनच अनिकेत सुखावला होता. त्याच्या जिव्हाळ्याच्या शाळेत तो पुन्हा परतणार होता, आवडीचे मित्र अन सरांची शाब्बासकी मिळणार होती.

पवार सरांनी आपले अश्वासन पूर्ण केले आणि एक छानसा अँड्रॉइड मोबाइल घेऊन अनिकेतच्या घरी पोहोचले. सरांच्या हातातील अँड्रॉइड मोबाइल पाहून अनिकेतच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गेल्या महिनाभरापासूनचा सारा प्रवास त्याला आठवला, त्याचे मन भरून आले आणि आपल्या आईच्या गळ्यात पडून तो रडू लागला. आपल्या बाळाचे कष्ट पाहिलेली आईही आता तिचे अश्रू रोखू शकली नाही. आपल्या पिल्लाला कवेत घेऊन तीही रडू लागली होती. सगळा परिसर या विलक्षण मातृप्रेमात न्हाऊन निघाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यात अश्रू होते. अनिकेतच्या बाबांनाही आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता.

पवार सरांनी वातावरण जास्त भावनिक होऊ न देता अनिकेतला विचारले, “काय अनिकेत, तुझ्या मोबाइलमध्ये आमचा एक सेल्फी घेणार का?” आणि अनिकेत, आईबाबा, माळीबाबा आणि हनम्या यांच्यासह एक सेल्फी घेतला. सेल्फीत पवार सरांनी अनिकेतच्या लाडक्या हनम्या वासरालाही घेतल्याने सगळेच हसू लागले. हा सेल्फी मग कायमस्वरूपी अनिकेतचा डीपी बनला.

@ उमेश तुपे , नाशिक
( मो. ७३८७३४८१७२ )

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

3 Nov 2021 - 3:56 am | पाषाणभेद

छान आहे कथा.

प्राची अश्विनी's picture

15 Nov 2021 - 8:48 am | प्राची अश्विनी

छान आहे गोष्ट.

बोलघेवडा's picture

15 Nov 2021 - 9:36 am | बोलघेवडा

वाह, छान आहे कथा

तुषार काळभोर's picture

15 Nov 2021 - 9:43 am | तुषार काळभोर

हसरा शेवट असणार्‍या कथा आवडतात :)

मुक्त विहारि's picture

15 Nov 2021 - 10:21 am | मुक्त विहारि

हिंमत केली की अशक्य ते शक्य होते

रुपी's picture

25 Nov 2021 - 6:21 am | रुपी

मस्तच. कथा आवडली

श्रीरंग_जोशी's picture

11 Dec 2021 - 1:08 am | श्रीरंग_जोशी

प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचे प्रमाण दाखवणारी ही कथा खूप आवडली.