दिवाळी अंक २०२१ : पहिली रात्र!

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

पहिली रात्र!
अर्थात, लग्नानंतरची पहिली रात्र.
अशी रात्र, जिची अतिशयोक्त वर्णनं कथा-कादंबऱ्यांमधून, गीतांमधून वर्णिलेली असतात.
अर्थात हेही खऱं की दोन विजा लखलखणार असतात. एकमेकांना टक्करणार असतात.
अशा त्या रात्रीची वाट पाहण्यात रात्रीमागून रात्री लोटलेल्या असतात.
प्रत्येकाची रात्र वेगळी.
प्रत्येकाच्या मनातली रात्र वेगळी.
अन प्रत्येकाच्या आयुष्यातली?... रात्र वेगळी.
वेगळी?
अर्थातच वेगळी. जशी ती आता चंद्रकांतच्या आयुष्यात होती...
===
कांत आता हॉलमध्ये कोचावर पडला होता. भकास नजरेने. एकटाच! टक्क जागा.
गार वाऱ्याचा झोत आला. तो वैतागून उठला. त्याला खालच्या बहरलेल्या रातराणीचा वास आला. त्याला स्वतःला मिटून घ्यावंसं वाटत होतं. म्हणून त्यानं खिडकी लावून घेतली. बाहेर मंद प्रकाशणारा आकाशकंदील होता. त्याने रागाने जोरात बटन दाबलं. त्याचा दिवा त्याने मालवला. बाहेरचा अंधार आणखी गडद झाला.
बाहेर कुत्री भयाण भुंकत होती. डोकं उठवणारी. एक कुत्रं तर सालं रडत होतं.
तो पुन्हा अस्वस्थपणे कोचावर येऊन पडला.
आज त्याच्या आयुष्यातली ती ‘पहिली रात्र‘ होती.
अन मुलगीच त्याला बायकोजवळ झोपू नको म्हणाली होती. यापेक्षा दुर्दैव ते काय?
तो अस्वस्थपणे सतत कूस बदलत राहिला. झोप येणार नव्हतीच. त्याला एकेक आठवू लागलं.
===
चंद्रकांत एका छोट्याशा गावातून शहरात आलेला. नुकताच. एका छोट्या कंपनीत तो कामाला लागलेला.
तो एक साधासरळ तरुण होता. साध्या चेहऱ्याचा पण तब्येतदार गडी. त्यामुळे कंपनीतले लोक त्याला पहिलवान म्हणून चिडवत असत. त्याच्या गावंढळ उच्चारावरून त्याला खिजवत असत.
आपल्याला हे शहरी जीवन, ही नोकरी झेपणार नाही असं त्याला वाटत होतं. गावी परत जाऊन काय करायचं? हा प्रश्न होता. तो हताश झाला होता.
शहर म्हणजे शेणाचा पो आहे आणि आपण त्यामधले किडे, अशासारखी त्याच्या मनाची अवस्था झाली होती.
अशा वेळी त्याला उषाने मानसिक आधार दिला होता. तो मेहनती आहे, तो आयुष्यात पुढे जाऊ शकतो याचा विश्वास दिला होता.
उषा नाजूक बांध्याची. दिसायला चारचौघींसारखी. पण तिचे टपोरे, काळेभोर डोळे अतिशय बोलके. आकर्षून घेणारे. ती सुस्वभावी होती. बोलकी. दुसयांना मदत करणारी. उत्साहाचा अखंड झरा असलेली.
पुढे त्याने नोकरी बदलली.
पण - नोकरी बदलताना त्याला वाईट वाटलंच. कंपनी सोडण्याचं नाही, तर उषाचा सहवास मिळणार नसल्याचं.
त्याला अगदी पहिल्या दिवसापासून तिने आकर्षून घेतलं होतंच. पण पुढे ती त्याला जास्त जास्त आवडतच गेली.
आयुष्याची जोडीदार कशी असावी याचं चित्र तो कायम उषाच्या रूपात पहात होता.
पण - तिचं लग्न झालेलं होतं आणि तिला एक छोटीशी गोड मुलगीही होती.
===
एका अपघातात उषाचा नवरा, किरण एकाएकी गेला. ती तर खचूनच गेली होती. पण छोट्या टिनीकडे पाहून ती सावरली. ती आईवडिलांच्या घरी रहायला आली. कामाला जाऊ लागली.
कांत तिला भेटायला आला.
मग पुढे त्यांच्या भेटी होतच राहिल्या.
आता तो नोकरीमध्ये, शहरी जीवनामध्ये स्थिरावला होता. गावातून शहरात आलेला कांत अन आता असलेला रुबाबदार कांत यामध्ये खूपच फरक होता.
एके दिवशी त्याने त्याचं प्रेम तिच्याजवळ कबूल केलं. उषाला धक्का बसला. ती काहीच बोलली नाही.
ती विचारात पडली.
दुसरं लग्न करावं की नाही, याचा निर्णय तिला घेता येईना. केलंच तर टिनीचं काय? तिचं डोकं विचारांनी फुटून जाईलसं तिला वाटू लागलं. कांतशी लग्न योग्य ठरेल ? तो टिनीला स्विकारेल?
टिनी तिच्याबरोबर राहणार हे तर स्पष्टच होतं. म्हणजे त्याविषयी विचार करण्याचाही प्रश्न नव्हता. कांतही त्याच्याबद्दल काहीच बोलला नाही. म्हणजे टिनीबद्दल त्याचाही काही वेगळा विचार असण्याचं कारण नव्हतं .
त्याची आणि टिनीची अनेकदा भेट झाली होती. ती तर काय बिनधास्त पोरगी होती. छोटी, गोड आणि खोडकर. तो जेव्हा यायचा, तेव्हा टिनीशी बोलायचा, तिच्या खोड्या काढायचा. तिच्यासाठी न चुकता कॅडबरी आणायचा.
हे उषाच्या नजरेतून एकदाही सुटलेलं नव्हतंच.
आईवडिलांनी तिला धीर दिला. समजावलं .
आणि तिने कांतला होकार दिला.
===
कांतचं गाव पुण्यापासून दोन तासाच्या अंतरावर होतं. तो त्याच्या कारने गावी निघाला.
आज त्याला घरातून निघाल्यापासून सगळं वेगळंच भासत होतं. रस्ता, रस्त्यावरची दृश्य सारंच. तो महामार्ग सोडून आत त्याच्या गावाच्या रस्त्याला लागला. हिरवी शेतं वाऱ्यावर डोलत होती. त्याच्या मनासारखी. गाव, देऊळ, नदी सारंच वेगळं भासत होतं. एका झाडावर साळुंकीची जोडी प्रेमकूजन करत होती.
सगळ्या वातावरणात एक आनंद भरून राहिला होता. शरद ऋतू नुकताच संपलेला होता. दिवाळीपूर्वीची मस्त सुखद हवा होती. गारव्यावर स्वच्छ उन्हाची माया पसरलेली होती.
त्याला आईवडलांना सारं सांगायचं होतं. आत्तापर्यंत लपवलेलं.
तो गावात शिरला. त्यांचं छोटंसं टुमदार गाव होतं. जुनेपण प्रेमाने उराशी धरून बसलेलं.
त्याचं घर म्हणजे दुमजली माडी होती. पुढे मोठं अंगण. मागे शेत. अंगणात डेरेदार कडूनिंब. त्याखाली भरगच्च सावली. त्या शीतल छायेत, बाजेवर त्यांची मनी पडलेली होती. बिस्किटाच्या रंगाची.
तिला पाहताच त्याने लाडाने आवाज दिला. तो जवळ जाताच ती पळून गेली. ओळखीचा असला तरी. ती गर्भार होती.
चहापाणी झाल्यावर त्याने आई-वडिलांसमोर विषय काढला .
त्याचं बोलणं ऐकून वडील तर रागारागाने घरातून बाहेर निघून गेले.
विधवेशी लग्न? हा काय प्रकार? का अन कशासाठी?
आई आणि बहीण, दोघींनाही त्याच्या लग्नाची मोठीच हौस होती. आणि त्याला चांगली बायको मिळेल याचीही आस होती. पोरगा शिकला- सवरला याचं आईला कौतुक होतं. आणि तिला वरमाय म्हणून मिरवायचंही होतं.
दोघी बिचाऱ्या हिरमुसल्या.
पोराने सगळ्या बेतावर पाणी फिरवलं होतं.
===
शेवटी कांतने घरच्यांच्या निर्णयाविरुद्ध लग्न करायचं ठरवलं. नोंदणी पद्धतीने. इतर कुठलेही विधी, सोपस्कार न करता.
दिवाळी नुकतीच होऊन गेली होती.
लग्नाला त्याच्या घरचे कोणी नव्हतेच त्याचे काही मित्र, कंपनीमधले सहकारी, उषाचे काही जवळचे नातेवाईक, मैत्रिणी, आई-वडील आणि अर्थातच टिनी.
टिनीसाठी सारीच गंमत होती. आईचं लग्न!
ती पोपटी रंगाच्या फ्रॉकमध्ये गोड दिसत होती अन प्रत्येक फोटोमध्ये तिला घुसायचं होतंच.
लग्न लागलं. जेवण झालं आणि मग ते कांतच्या घरी निघाले.
टिनी चार वर्षांची गोड पोरगी होती. नवीन ठिकाणी चाललो आहोत, याची तिला काही चिंता नव्हती. आई बरोबर आहे, हे तिला पुरेसं होतं .
कांतच्या मित्राने त्यांना कारमधून घरी सोडलं. सामान वगैरे वर न्यायला मदत केली.
कांतचं घर आधी उषाने पाहिलेलं होतं. पण आता गृहस्वामिनी म्हणून ती पहिल्यांदाच येत होती.
तिच्या दोन मैत्रिणी, त्याचा एक खास मित्र अन तिचे आई-वडीलही आले होते.
उषाने माप ओलांडलं आणि घरात प्रवेश केला.
कांतचं घर छान होतं. सजवलेलं. टापटीप. रसिक होता खरा. पण तरी त्या घराला बाईचा स्पर्श नव्हता. त्या घरात बाईचा वावर नव्हता.... पण आता तो स्पर्श त्या वास्तूला लाभणार होता.
टिनी बाल्कनीमधून खाली पहात होती. तिला खाली फिरणारी भटकी कुत्री दिसली. तिच्या आजीकडे कुत्री क्वचितच दिसत. तिला एवढी कुत्री पाहून मजा वाटली. त्यात सगळी वेगवेगळी. काळी-पांढरी, विविध रंगांची. सोसायटी मध्यम आकाराची होती. मोजक्या घरांची. वॉचमन काही नव्हता.
चहापाणी घेऊन बाकीचे लोक गेले. मग तिचे आई-वडील निघाले. तिच्या आईच्या मनात उगा लकलकत होतं - सगळं नीट होईल ना? शेवटी आईचंच मन ते.
आता घर आपलं होतं. निवांतपणा होता. एकांत होता. पण पुरेसा?
टिनी सगळ्या घरभर फिरत होती. सगळं उचकत होती. शांत कशी ती बसत नव्हती. तिच्यामुळे कांतला उषाशी चार वाक्यं सलग बोलता येत नव्हती. मग जवळ येणं तर दूरच.
कांतने अनेकानेक शोभेच्या वस्तू जमवलेल्या होत्या. वेगवेगळ्या छोट्या मूर्ती, पिसं, दगड, कार्स अन काय काय.
त्याच्याकडे विणकराचं घरटं होतं. टिनीने ते घेतलं आणि त्यामधून पाणी निथळतं का हे पाहण्यासाठी पाण्यात बुचकळून काढलं.
कांतला ते आवडलं नाही. त्याच्या कपाळावर आठी चढली. पण तो काही बोलला नाही.
हळूहळू अंधार पडला. रात्र जवळ येऊ लागली. कांत अजून रात्र होण्याची वाट पाहू लागला. जवळ येण्यासाठी.
पहिली रात्र!
त्याचा विश्वासच बसत नव्हता साऱ्यावर. उषा चक्क आज त्याची बायको बनून त्याच्या घरी वावरत होती. जिने मनाचा कब्जा घेतला होता तिने आज त्याच्या घराचा कब्जा घेतला होता. अन थोड्या वेळाने ... स्वर्गाला हात टेकल्यासारखं वाटत होतं त्याला.
पण स्वर्गसुख?
तो आतुरला होता .
टिनी कशात रमली होती. त्याने उषाला मिठीत घेतलंं तेवढ्यात टिनी आली. तिला ते आवडलं नाही. तिने त्याला बाजूला ओढलं.
झोपण्याची वेळ आली. कांतचा वेळ जात नव्हता. बेडरूममध्ये डबल बेडवर, उषा टिनीला जवळ घेऊन झोपवत होती. तिला झोप काही येत नव्हती. उषा गोष्ट सांगत होती.
कांत बेडवर येऊन पडला, तशी टिनी उठली.
“काका, तुमी इतं नाही झोपायचं!"
“का?” त्याला आश्चर्यच वाटलं. हे वाक्य त्याला त्याच्या घरात अनपेक्षित होतं.
“इतं आमीच झोपणार. तुमी नाई झोपायचं!”
उषाने पडेल चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं.
तो गुपचूप बाहेर गेला हॉलमध्ये. तो कोचावर पडला, भकास मुद्रेने. मग त्याला मागचं सगळं आठवलं.
त्याला झोपायचं नव्हतं, पण गेल्या दोन दिवसांच्या धावपळीमुळे तो दमला होता.
केव्हातरी त्याला झोप लागून गेली. उषा उशिरा रात्री बाहेर आली. कांतची चिडचिड झाली होती, तर ती अवघड मनःस्थितीत होती. तिला त्याच्याशी बोलायचं होतं. काय बोलावं आणि कसं बोलावं? हा प्रश्न तर तिला पडला होताच.
तो झोपल्याचं तिने पाहिलं. मग त्याची झोपमोड न करता ती परत फिरली.
नाजूकपणे पैंजण वाजवत आलेली तरुण रात्र उगा पाय आपटत निघून गेली .
===
सकाळी तो लवकर उठला. रोजच्या सवयीप्रमाणे तो चहा करू लागला. त्या आवाजाने उषा उठली.
मग तिने चहा केला. तो तिथेच डायनिंग टेबलवर बसून काही बोलत राहिला. हातात आलेला आयता चहा! आलं घातलेला. त्याला आल्याचा चहा आवडायचा. पण तो ब्रह्मचारी कंटाळा करायचा. उषाने मात्र त्याची आवड लक्षात ठेवली होती.
सकाळच्या वेळी तो घेत उषाशी गप्पा मारताना त्याला भारी वाटत होतं. सकाळ आणखीच प्रसन्न वाटू लागली.
चहा झाला. ती सिंकपाशी गेली, कपबशा धुऊ लागली. त्याने तिच्या नकळत तिला मागून मिठीत घेतलं. तो तिच्या गालावर ओठ टेकवणार, तोच टिनीचा आवाज आला - ”आई...“ ती शहाणी उठली होती.
उषा पुन्हा बेडरूममध्ये गायब झाली. तो हॉलमध्ये येऊन पेपर वाचत बसला.
टिनी बाहेर आली. पुन्हा तिची मस्ती सुरु झाली. ती स्टूल घेऊन बाहेरच्या शोकेसमधील वस्तू उचकत होती. मध्येच तिने स्टूल ओढत खिडकीजवळ नेलं. तिथे असलेले विंड-शाईम्स तिने काठीने बडवायला सुरुवात केली. त्यांच्या टिंग टिंग अशा नाजूक आवाजाने तिला मजा वाटली. हसू आलं. परत परत ती फटके मारत होती, ते किणकिणत होते, ती हसत होती. न थांबता.
त्याने अगदी शोधून ते गोड किणकिणणारे शाईम्स आणले होते. ते तडाखे शाईम्सना बसत नसून ते त्याला स्वतःलाच बसत आहेत, असं त्याला वाटत होतं.
उषा तिला रागावली. ती नाश्ता तयार करण्यासाठी किचनकडे वळाली. आई रागावल्यावर टिनीने पुन्हा शोकेसकडे मोर्चा वळवला. त्यामध्ये तिला काचेच्या गोलाकार डबीतला ताजमहाल सापडला. तो ताजमहाल कांतने आणला होता, ज्या दिवशी उषा त्याला लग्नासाठी हो म्हणाली होती. एक आठवण म्हणून, प्रेमाची निशाणी म्हणून.
तो त्याच्यासाठी खास होता.
अन टिनीने तो पाडला. खळ्ळ आवाज करत काचा फुटल्या, विखुरल्या. ताजमहाल तुटला.
कांतला काही सुचलंच नाही. तो रागाने उठला आणि त्याने तिच्या पाठीत एक धबका दिला. ती रडू लागली.
तिच्या आवाजाने उषा किचनमधून बाहेर आली. समोरचं दृश्य पाहून तिला सगळं कळलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. टिनी रडत रडत तिला चिकटली.
कांत अवाक झाला.
===
आणि त्यांचा संसार सुरू झाला.
दुसऱ्या दिवशी तो उषापासून लांबच होता.
तीही त्याच्या जवळ येत नव्हती. त्याने रात्रीपर्यंत वाट पहिली. टिनी झोपली. तो जागाच होता.
मग तो उषाजवळ गेला, त्याने तिला जवळ घेतलं. तिच्या रेशमी मिठीची ऊब तो अनुभवत राहिला.
तिला एकदम रातराणीचा वास आला. ती शहारली. थरथरली. त्या वासाने तिचं मन एकदम माघारलं. ही रातराणी तर खाली कोणी लावलेली. पण किरणच्या घरची रातराणी मात्र त्याने स्वतः लावलेली. त्याला आवडते म्हणून.
त्याच्या मिठीत घट्टपणा होता... तिच्या मिठीत मात्र नाकारलेपण होतं.
काही सेकंद त्याला ते कळलं नाही. मग तो लांब झाला. त्याला आश्चर्य वाटलं. राग आला. त्याचा चेहरा प्रश्नार्थक झाला.
ती म्हणाली, “मी कसं सांगू तुला? मला थोडा वेळ दे रे,“
“पण का?”
तिने उत्तर दिलं नाही . तिचं मन तिलाच कळत नव्हतं.
तिला वाटत होतं की कांतला फक्त शरीर हवंय. खरं तर त्यालाही तिची काही हरकत नव्हती, पण तिला स्वतःला मात्र अपराधी वाटत होतं. तिला कळत होतंही अन नव्हतंही. तिला किरण आठवत होताच, पण ती तिच्या मनाला ते कळल्याचं भासवत नव्हती. त्या आठवणी ती कसोशीने दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती. भोवऱ्यात बुडणारा माणूस ज्या आकांताने पाणी ढकलतो, तसं.
तर कांतची अवस्था वेगळी होती. खरं म्हणजे, निसर्गाच्या भाषेत त्याला स्त्री हवी होती अन ती स्त्री म्हणजे उषा होती.
देहसुखाला तो अजूनही पारखा होता.
त्याच्या मनाची तडफड होत होती अन त्याचं काय चुकतंय? का नाही? हेच त्याला कळत नव्हतं.
पण - देहात कितीही आग पेटली, तरीही कांतला ओरबाडायचं नव्हतं.
मोठाच तिढा होऊन बसला होता.
===
कांत नोकरीला जाऊ लागला. त्यामुळे त्याचा बराच वेळ बाहेरच जाऊ लागला. उषाने सध्या नोकरी सोडली होती. अर्थात हे दोघांनी मिळूनच ठरवलं होतं.
पण आता त्यांचं बोलणं कामापुरतंच होऊ लागलं. प्रेम कुठे हरवून गेलं होतं.
नव्या संसाराचं नवेपण असतं. तेच नवेपण कोमेजलं होतं.
चेहऱ्यावर राहून राहून येणारं हसू, उत्तेजित होऊन मांडली जाणारी स्वप्नं, गप्पा-चर्चा, नजरेत नजर घालून बोलणं, साध्या वाक्यांचंही महत्त्व वाटणं, निरर्थक शब्दांनाही हसू फुटणं, एकमेकांची ओळख, पार मनापासून तनापर्यंत.. सारं बाजूला पडलं होतं. पूर येऊन गेल्यावर नदीकाठाच्या बाजूला अडकलेल्या प्लॅस्टिकसारखं.
तिचं मन नकळत तुलना करत होतं. आणि अशी तुलना होऊच नये असंही तिच्या मनाला प्रकर्षांने वाटत होतं. तिच्या मनाची त्रिशंकू अवस्था झाली होती.
पुढे पुढे तर दोघे अबोलच झाले.
आठवडा झाला होता फक्त. मेंदीचा रंग एवढ्यातच उतरला होता. मोठ्या माणसांचा अबोला टिनीच्या लक्षात येणार नव्हता. आई गप्प आहे हे त्या लेकराला जाणवलं नव्हतं. तिला खाऊ-खेळ सगळं मिळत होतं. आईचे लाड होते. नवीन घराचं अप्रूप होतं. त्यात आई दिवसभर घरी. मजा! आधी आई कामाला जायची. दिवसभर ती आजी-आजोबांबरोबर असायची. फक्त या नवीन बिल्डिंगमध्ये तिच्या वयाचं कोणी नव्हतं. पण टिनी खूश होती.
तर उषा नाखूश होती.
आपला विचार चुकलाय की काय असं तिला सतत वाटत होतं. किरणची तिला जास्त आठवण येत होती. लग्न झाल्यावर त्याच्याबरोबरचे सोनपंखी दिवस आठवत होते. तिला वाटत होतं की स्त्रीला आयुष्यभराचा जोडीदार पाहिजेच. स्त्रीला प्रेमाची, शरीराची गरज असतेच. पण सुरक्षितता? तीही महत्वाची. त्यात मूल असेल तर त्याला मिळणारं वातावरणही खूप महत्त्वाचं.
अन मनाला उभारी देणारी साथ .
कांत मात्र ढवळून निघालेला.
लग्नाचा नवेपणा नाही . हनिमूनला जायचं होतं ; पण उषा टिनीमुळे नाही म्हणाली होती. त्याची अनेक स्वप्नं होती-संसाराची. पण एकेक स्वप्नाला सुरुंग लागलाय असं त्याला वाटत होतं. अगदी पहिल्या टप्प्यापासून. पहिल्या रात्रीपासून.
उषाच्या एका साध्या मिठीसाठी तो आसुसला होता. आणि बरंच काही तनामनात साठलेलं . पण ती टिनी आणि टिनी! ...
===

रविवार होता.
कांत उठला. त्याला एकदम खायलाच उठलं. आज दिवसभर घरात करायचं काय? या विचाराने तो हबकलाच.
त्याने मुक्याने आवरलं व तो बाहेर पडला. काय करावं न सुचून तो गावी निघाला.
कार चालवताना त्याला मध्येच काय वाटलं, त्याने उषाला फोन केला.
“ मी गावी जाऊन येतो. संध्याकाळपर्यंत येईन पुन्हा “.
“ मग मी दिवसभर काय करू? “ तिने सहज विचारलं.
तो खेकसलाच, “ काय हवं ते कर! टिनीला घेऊन उड्या मार नाहीतर आणखी काही फोडूनतोडून ठेवा! ”
त्याचं मन रागाने जणू उकळत होतं.
गाडी चालवताना त्याचं लक्ष समोर असलं तरी त्याच्या नजरेसमोर गेल्या काही दिवसांतील घटना एकामागे एक येत होत्या. त्याला वाटत होतं -
आपण लग्न केलं ही चूकच झाली. उषाशी लग्न करायलाच नको होतं आपण. थांबायला पाहिजे होतं.
एखादी चांगली मुलगी मिळाली असती…नवी नवरी! घरच्यांचं ऐकायला पाहिजे होतं. काय मिळवलं आपण आई-दादांचं मन दुखवून?
आणि ही टिनी?... हे आपल्याला आधीच माहिती होतं.
पण याकडे आपण दुर्लक्ष केलं. का आणि कसं?
आपण प्रेमात आंधळे झालो होतो? नक्कीच. आपलीच चूक. उषाला काहीच वाटत नाही. कशाचंच काही वाटत नाही. लग्नाचं, प्रेमाचं, सहवासाचं अन शारीरिक सहवासाचंही! ... का?
आपलं पहिलं लग्न असलं तरी तिचं पहिलं नाही म्हणून?
पुढे रस्त्याचं काम चालू होतं. त्यामुळे एक मोठं डायव्हर्जन होतं. त्याच्या मनानेही तसंच एक वळण घेतलं.
बस झालं! आपण हे लग्न पुढे नको कंटिन्यू करायला.
===
कांतचा अबोला चालू होता. उषालाही प्रश्न पडला होता. सुट्टीच्या दिवशी तो घरी असताना करायचं काय? तर तो गावी गेला होता.
एक दिवसाचा प्रश्न सुटला होता. तात्पुरता! पण मुख्य प्रश्नाचं काय?
तिला कळेचना.
तिने स्वतःचं व टिनीचं आवरलं. ती आईकडे आली.
आईला तिचा चेहरा पाहताच सगळं कळालं. इतक्या दिवसांमध्ये तिचं अन आईचं बऱ्याच वेळा बोलणं झालं होतं. पण तिने त्यांच्यात काय तणाव निर्माण झालाय हे आईला सांगितलं नव्हतं.
टिनी खाली पळाली. बाबा पेपर वाचत बसले.
तेव्हा उषा आईच्या गळ्यात पडून रडली. तिने तिचं मन मोकळं केलं.
“आई, माझं नशीब असं का गं? हे लग्न केलं ही चूकच झाली. उगा घाई केली. का भुलले मी? मोहाचे क्षण माणसाला खड्ड्यात घालतात....” असं बरंच काही ती बोलत राहिली.
आईने तिला बोलू दिलं. उषा शांत झाल्यावर ती म्हणाली,“जरा विचार करून बघ. कांतचं पाहिलं लग्न आहे. त्याच्या काही अपेक्षा असतीलच ना. लग्न म्हणलं की नवरा बायको दोघांना कित्येक गोष्टी नवीन असतात. समजावून घ्याव्या लागतात. ॲडजस्ट कराव्या लागतात.
तुझं किरणशी लग्न झालं, तेव्हा सगळ्या गोष्टी पहिल्या दिवशीच सुरळीत झाल्या होत्या का?.... आठव बरं.
लग्न म्हणजे एका नवीन आयुष्याची सुरवातच ना गं. थोडा वेळ जाऊ दे. होईल सगळं नीट. आणि टिनी?... तो प्रश्न आहेच. पण निघेल काहीतरी मार्ग."
“का दाखवली त्याने मला सहानुभूती?" तरीही ती त्राग्याने म्हणाली.
“सहानुभूती? आणि का दाखवेल तो? अगं वेडाबाई, प्रेम आहे त्याचं तुझ्यावर! ... कांत चांगला मुलगा आहे.”
===
कांत गावात शिरला.
सुरुवातीलाच त्याला एक ट्रॅक्टर आडवा आला.
त्यामध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं बसलं होतं. मंडळी देवदर्शनाला निघाली असावीत. लग्न होऊन गेलं असलं तरी दोघेही लग्नाच्या पोशाखात होते. एकदम खुशीत होते. दोघे एकमेकांना धक्के मारत होते. खड्ड्यांमुळे, का उगा? कोणास ठाऊक.
त्यांना बघून त्याच्या काळजात उगा कळ आली.
ट्रॅक्टर सजवला होता. केशरी-पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या माळा, तोरणं अन काही काही. गुलाबाची सजावट अन झकपक कुठून असायला? परिस्थिती काही फार चांगली नसावी त्या माणसांची.
पण त्यांचे चेहरे पाहिले तर आनंद लाखाचा होता!
असणारच! पहिलंच लग्न असणार ना त्या नवरीचं... त्याला वाटलं.
गावात शिरताच हे आडवे आले. हा अपशकुन म्हणायचा का? त्याच्या मनाला वाटलं.
तो त्यांना वाट देण्यासाठी थांबला. पण त्याच्या मनातील विचारांना वाट मिळत नव्हती.
तो थांबला असताना, त्याची तगमग वाढतच चालली होती. त्याने ठरवलेला निर्णय, त्याचा निष्कर्ष पक्का होत चालला होता.
तो घरी पोहोचला.
अंगणात बाज एका कडेला ठेवलेली होती. त्याच्या खाली पोत्यावर त्यांची मनी होती. तीन छोट्या पिल्लांना घेऊन बसलेली. त्यांचे डोळे अजून उघडलेले नव्हते.
दारातून बाहेर आलेल्या त्याच्या बहिणीने त्याला पाहिलं. तिला आनंद झाला.
“आई, दादा आलाय.“
ते ऐकून आई बाहेर आली. गोल साडी नेसणारी त्याची आई सशक्त बांध्याची अन प्रेमळ मनाची होती.
आई खूप अपेक्षेने बाहेर आली. पोरगा सुनेला घेऊन आला असेल या आशेनं. पण तिची निराशा झाली. तिला वाटलं, वडलांच्या धाकामुळे पोरगं एकटंच आलं असेल.
वडील घरात नव्हते. ते आठवडी बाजारला गेले होते. तेही अंगाने मजबूत अन वागायला कडक.
चहापाणी झालं.
मग त्याने विषय काढला.
“आई, माझी चूक झाली. तुमचं ऐकायला पाहिजे होतं.”
“ का रे बाबा? आता आणि काय झालं एवड्यात? “
“आई, फरक पडतो गं. तिचं दुसरं लग्न आहे. त्यात ती छोटी. तिला जवळसुद्धा यावंसं वाटत नाही.”
“काय?”
“आता मी कसं सांगू? मला माफ कर. पण अजून एकदाही आम्ही जवळ आलो नाहीये.”
“काय?” आई विचारात पडली
तर हेमा चुळबुळायला लागली. तिला बाहेर जावंसं वाटलं. पण आईने तिला मुद्दाम थांबवलं. ती पोरही लग्नाला आली होतीच.
थोडा वेळ आई शांत बसली. मग ती बोलायला लागली.
"कांतू, तुला आता आठवण आली आमची, व्हय रं पोरा? परस्पर लग्न लावून मोकळा झालास ते? आता बाप घरात असता ना तुजा तर तुला धक्के मारून भायर काढला असता!"
"आई सॉरी! "
"ए, तुजं ते इंगलिश नको मला. चहापाणी झालं ना तुजं? मग निघ भायर! " ती ओरडली, ”आता घोळ झाल्यावर घरची आठवण आलीये... "
त्यावर कांतूला रडूच फुटलं. मागे अंधार अन आता पुढेपण?... त्याला काही सुचेना.
भावाला रडताना पाहून हेमा पुढे झाली. तिने त्याला जवळ घेतलं. ती आईला ओरडली, "कायतरी तुझं आई? दादाला हाकलतेस? माझं लग्न झाल्यावर एकटेच राहणार का तुम्ही?"
मग आई पाघळली, "बरं बरं, रडू नकोस."
मध्ये बराच वेळ शांततेत गेला. मग आई म्हणाली, "कांतू, त्याचं असं हाये बग. आदी आमचा इरोध व्हता. पर तू मानलं न्हाईस. आता केलं हायेस तर निभवायाला पायजेस ना पोरा. अन आता हे एवड्यात?
आता दुसरं लगीन जरी केलंय तरी - त्या पोरीला तुजं घर तर नवीनच हाये ना. येळ लागंल पर रूळंल हळूहळू. अन ती छोटी - आईजवळ रहाणार अन आईला चिकटूनबी रहाणार. तू म्हणालास पोरगी छोटी हाये, गोड हाये. तर तिला जीव लाव..”
हळूहळू त्याचं मन विचार करू लागलं होतं.
आई पुढे बोलतच होती.
“अन तो खाजगीपणा - आरं, आम्हाला कुटं व्हता खाजगीपणा. माजं लगीन झालं तवा आमी सासू-सासऱ्यांच्या धाकात. दिसभर नवरा दिसायचा मुश्कील.”
“पण रात्रीचा तर दिसत असेल ना.” तो म्हणाला.
आई हसली म्हणाली, ”दिसायचाना बाबा. पर किती दिस? पयले सात म्हैने. मी लगेच गरोदर राह्यले. मग माहेरी रवानगी. मग तुजा जन्म झाला. संपलं परत? मग कसला खाजगीपणा रे?”
भाऊ-बहीण दोघे हसले. वातावरण जरा हलकं झालं.
पण तो म्हणाला, “तुमच्या वेळी वेगळं होतं. आता तसं आहे का?”
आई म्हणाली, ”बराबर. परतेकाची परिस्थिती येगळी असते. समज जर तुजं लगीन झाल्यावर लगेचच ही पोरगी झाली असती तर? काय केलं असतं? तसं समज. पोरा जबाबदारी घेतलिया तर ती पार पाडाया पायजेच. अन पाण्यात पडल्याशिवाय कळतबी नाय रे.
तू ल्हान व्हतास. तुला पाटाला पाणी सोडायचं व्हतं. खेळ तुजा. पहिलीच येळ. मोटार चालू केली. ह्ये पाण्याचा फवारा आला. त्या फवाऱ्याने पाटात पडलास की बदकन. अन गेलास चार फूट व्हाऊन. कित्ती घाबरलास! कित्ती रडलास! पर पुन्हा गेलास ना पाटाला पाणी सोडायला.
तसंच ह्येबी. पाण्यात पडल्याशिवाय कळत नाय रे.
तू मोठा हायेस. शिकला-सवरलेला हायेस. मी अडाणी बाई. काय सांगणार तुला. पर तू सांगतोस म्हणजे पोरगी चांगलीच असणार. पुढल्या येळेला घेऊन ये."
“काय? तिला घेऊन?” त्याने विचारलं.
“मी सांगते ना समजावून दादांना. त्यांना त्यांच्या मार्गाने सांगते.”
त्याला स्वतःच्या अडाणी आईच्या बोलण्याचं, वडलांना समजावून सांगते या म्हणण्याचं कौतुक वाटलं.
त्यांच्या मार्गानं म्हणजे दादांना देवाधर्माची फार आवड होती. कीर्तनाला रोज जाणार म्हणजे जाणार. तर त्या पद्धतीनं आई त्यांना सांगणार होती.
तो बहिणीला म्हणाला, ”ए, थोडा चहा ठेव की परत.”
नंतर त्याला वाटलं की वडील कीर्तनाला जातात, पण तिथलं सगळं तत्त्वज्ञान तर आईच पचवून बसलीये. तेही, कीर्तनाला न जाता.
हेमाने चहा ठेवला. तेवढ्यात शेजारची पमी आली.
“ए ताई, मला दे की एक पिल्लू मांजरीचं. किती भाव खातेस? किती वेळा मागायचं तुला? “ पोरगी लहान असली तरी बोलायला मिरची होती.
“ए शहाणे, तुला किती वेळा सांगितलं, पिल्लं लहान आहेत. ती त्यांच्या आईला सोडून कशी राहतील. मोठी झाल्यावर देते म्हणलं ना. अन पमे, तू राहतेस का गं तुझ्या आईला सोडून? चल देते तुला पिल्लू. राहते का आईला सोडून? बोल.“
त्यावर ती छोटी मिरची पळूनच गेली.
कांत ते ऐकत होता. विचार करत होता त्यावर.
दुपारी जेवण झालं. तो थोडा पडला. वडील यायची वेळ झाली होती. तो निघाला.
आई म्हणाली, "नाय तर सोडूनच दे ना त्या पोरीला... मी आता जरा शांतपणे इचार केला."
"काय? " तो विचारात पडला, "नाही! "
"आता आलं ना खरं काय ते भायर! तुजं प्रेम हाय ना तिच्यावर?"
त्याच्यावर तो काही न बोलता आईच्या कुशीत शिरला. तिने त्याची पाठ थोपटली.
आईने त्याची दृष्ट काढली. म्हणाली, ”आणि पुढ्या वेळेला मी निरोप देईन. तवा सुनबाईला घेऊनच ये.”
गाडी काढली तेव्हा त्याचं मन शांत झालं होतं.
गाडीने गती घेतली तशी त्याच्या विचारांनीही गती घेतली. तो आईच्या बोलण्याचा विचार करत होता.
आईचं हे रूप त्याला नवीन होतं. गावात राहणारी, कमी शिकलेली, शेतात राबणारी आपली आई, हे तत्त्वज्ञान ती कुठून शिकली असेल?
आई म्हणाली होती, “तू तोडायचं म्हणतोस. तू तुझ्या मनाचा इचार केलास, अन त्या पोरीच्या मनाचा, तो केलास?
पुरुषाला बाई लागते. पर बाईला संसार लागतो. त्यामुळे पुरुषाने थोडा बाईच्या आयुष्याचाबी इचार केला पायजे.”
अन पुढचं वाक्य आठवून तर त्याने आईला मनोमन नमस्कारच केला. ”त्या छोटीला सोताची पोरगी समजून जवळ घे. समदं नीट होईल बग. ती जवळ आली ना तर तिची आईबी आपसूक तुज्या गळ्यात येऊन पडल बघ!“
===
आता त्याला मागे पडणाऱ्या गाड्या, खांब, खांबांवरचे पक्षी सारंच छान वाटत होतं. रस्ता रिकामा होता. पुढे महामार्ग लागणार होता. त्यामुळे तो आधीच थांबला.
त्याने उषाला फोन केला. ती आधीच घरी येऊन पोचली होती.
“ उषा - “
“ कांत सॉरी! मी... मी... “
“ ए वेडाबाई! सॉरी नाही अन बिरी नाही. ते जाऊ दे. मी घरी येतो. लगेच आपण बाहेर जाऊ, काही खरेदी करू. बाहेरच जेवू या.”
“पण... पण “
“ते काही नाही, ” तो म्हणाला.
त्याच्या स्वरातील ठामपणा आणि मधल्या दिवसातलं हरवलेलं प्रेम तिला पुन्हा जाणवलं.
त्याने फोन ठेवला तेव्हा तारेवर बसलेला एक बुलबुल सुरेल गुणगुणत होता.
त्याला कधी एकदा घरी पोहोचतोय असं झालं होतं.
त्याला आईचे शब्द आठवत होते, “राजा, लग्न करणं सोपं हाय, पर ते निभावणं कठीण! तुमच्या आत्ताच्या पिढीचा हाच तर घोळ हाय!”
===
ते तिघेही बाहेर गेले. एका मॉलमध्ये.
तिथे टिनीने एक गाणं म्हणणारी, नाचणारी बाहुली घेतली.
त्याने उषासाठी एक नाजूकशी नथ घेतली.
मग ते जेवायला गेले.
त्याला आज वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होती. पण टिनीला पावभाजीच खायची होती. मग त्याने तिघांसाठी पावभाजीच मागवली. जेवताना त्यांच्या गप्पा चालू होत्या.
“बरं का टिने, आमच्या घरी -” तो म्हणाला.
“तुमचं घर कुठंय?” लगेच तिने विचारलं.
“गावाला.“
“बरं. कुठल्या गावाला?“
“ते असू दे. तर आमच्या घरी मनीला तीन छोटुली पिल्लं झाली आहेत.”
“वॉव! मग आपण आणू या का त्यांना घरी?” बालसुलभ उत्सुकतेने तिने विचारलं.
“नक्की आणू या. पण अजून ती लहान आहेत ना, ती त्यांच्या आईला सोडतच नाहीत. टिनीसारखीच आहेत.”
हे वाक्य त्याने उषाकडे पहात म्हणलं.
वाक्य पूर्ण होईतो तो निर्विकार होता. पण उषाला हसू आलं अन तोही खळखळून हसला.
===
ते घरी आले. कांत गाडी लावत होता. उषा आणि टिनी दोघीही खाली उतरल्या. थोड्या पलीकडे गेल्या.
कांतने हाक मारली “टिनी.."
ती त्याच्या जवळ आली. तो गाडीतून काही काढत होता - एक मोठठं कॅडबरी. ते त्याने तिला दिलं. टिनी खूश!
तो गाडी लॉक करत होता. उषा पुढे गेली होती.
तेवढ्यात सोसायटीतली भटकी कुत्री आली. त्यांना टिनीच्या हातात काय आहे ते हवं होतं. त्यासाठी त्यांनी तिला घेरलं. ते भुंकू लागले. एवढ्यात त्यांची डेरिंग, त्यांचा उपद्रव फारच वाढला होता.
कांत मागे वळला.
कुत्री चांगली तगडी होती. टिनी त्या गावठी कुत्र्यांसमोर घाबरून थरथरत उभी होती. तिने छातीशी बाहुली घट्ट धरली होती.
कांतही त्या कुत्र्यांना बघून चांगलाच घाबरला. पण क्षणभरच.
तो मोठ्यानं ओरडला व त्याने पाय उचलला तर एका काळुंद्र्याने त्याचा पाय धरला. पण पायांऐवजी त्याची पँटच त्याच्या तोंडात आली. कांतने पाय सोडवला तर ती फाटली.
एक कुत्र्याला त्याने पेकाटात लाथ घातली. कुत्रं केकाटत पळालं. त्याला नशिबाने खाली पडलेला एक पाईप मिळाला. तो उगारताच बाकीची कुत्रीही पळाली.
टिनी घाबरून कांतला चिकटली. त्यानं तिला उचलून वर आणलं.उषाने हे घाबऱ्या जिवाने खिडकीतून पाहिलं होतं. तिने रडणाऱ्या टिनीला पोटाशी धरलं. तिचं रडं थांबतच नव्हतं.
“टिनी रडू नकोस. मी रडू का? बघ त्याने तर माझी पँटच फाडली आहे“ कांत म्हणाला.
उषा आणि टिनीने त्याची पँट पाहिली. पण ती रडायची काही थांबली नाही.
“तुला माहितीये? मी स्वतःच कुत्र्यांना घाबरतो.”
“काय? “ टिनी रडत, हसत म्हणाली.
“काय टिनीची गंमत करतोस?“ उषा म्हणाली.
“अगं, खरं. मी लहान असताना एकदा मला कुत्रं चावलं होतं, तेव्हापासून मला भीती वाटते कुत्र्यांची. इंजेक्शन्स घेतली आहेत मी .”
“मग आता?“ उषाने विचारलं.
“माझ्या टिनीवर चालून आलं होतं ते“ कांत म्हणाला.
उषाच्या डोळ्यात प्रेम दाटून आलं होतं, तर टिनीच्या डोळ्यांत खट्याळपणा!
“पण राक्षस किंवा भुतं आली तर?” टिनीनं विचारलं.
“तर एका गोड मुलीसाठी मी त्यांच्याशीही फायटिंग करीन." कांत तिचा गालगुच्चा घेत म्हणाला. तिचं रडं आता थांबलं होतं.
नंतर ती बाहुलीशी खेळण्यात रमली. तिने कॅडबरी काढलं. एक तुकडा स्वतः खाल्ला. एक उषा अन कांतला दिला. एक बाहुलीला दिला. ती शहाणी खातेय होय? पण ती आनंदाने नुसतीच नाचली.
उषा आवरत होती. तिने एक खास बदामी रंगाचा सिल्कचा नवीन गाऊन काढला. रात्रीसाठी.
टिनी कांतला म्हणाली," काका, तुम्ही मला गोष्ट सांगता? सांगितली तर मी तुम्हाला एक गिफ्ट देईन.”
कांतला मजा वाटली. ही चिमुरडी काय गिफ्ट देणार असेल?
तो मनात म्हणाला, गिफ्ट तर उषाकडून हवं आहे, ते कधी मिळतंय कोणास ठाऊक?
कांत टिनीजवळ आडवा झाला. त्याला खरं तर या क्षणाला लहान मुलांची एकही गोष्ट आठवत नव्हती. लहानपणी ऐकलेली, अशीच कुठलीतरी गोष्ट याने तिला सांगायला सुरुवात केली. गोष्टींमध्ये एक डेंजर राक्षस आला, तेव्हा ती त्याला बिलगली.
त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवायला सुरुवात केली. गोष्ट संपायच्या आतच टिनी झोपून गेली. कांतच्या अंगावर हात ठेवून. गाढ. निर्धास्त.
कांतने तिच्या डोक्याखालची उशी सारखी केली, तर त्याखाली काहीतरी होतं. ते एक कीचेन होतं. अगदी साधं. पण त्याच्या गोलामध्ये छोटा ताजमहाल होता. आईबरोबर दुकानात गेली असताना टिनीला तो दिसला होता अन उषाने तो घेतला होता. कांतसाठी गिफ्ट!
उषाचं आवरलं होतं.
कांतने ते कीचेन दाखवण्यासाठी तिच्याकडे पाहिलं. अन तो पाहतच राहिला. बदामी रंगाच्या गाउनमध्ये असलेल्या त्याच्या स्वप्नपरीला.
उषा पुढे आली. आता काही कळण्याची गरज नव्हती. त्याने तिला मिठीत घेतलं. ती मिठी पुरेशी बोलकी होती.
त्याने तिचा चेहरा जवळून न्याहाळला. ती रोमांचित झाली. लाजली. अन तिने मान वळवली.
तिच्या देहगंधाने तो नादावला.
तिच्या नाकात त्याने आत्ताच घेतलेली नथ होती.
“वा! काय छान दिसते आहे हो नथ तुम्हाला, मिसेस कांत.“
त्यावर तिच्या ओठांच्या पाकळ्या नाजूक थरथरल्या. तिच्या टपोऱ्या, काळ्याभोर डोळ्यांच्या डोहात प्रेमळ, लाजरे तरंग उमटले.
“पण आता ती छान दिसत असेल तरी काढावी लागेल ना?“ त्याने मिश्कील विचारलं, “माझीच नथ मलाच टोचली तर तुला बरं वाटणार नाही ना!” …
त्यावर पूर्ण लाजून, तिने स्वतःचा चेहरा ओंजळीत लपवून घेतला.
त्याच्या मनातला ताजमहाल उषाच्या प्रेमाच्या चांदणसरीत न्हाऊन निघाला होता.
बाहेरून वाऱ्याच्या झुळकेबरोबर रातराणीचा वास आला. रोजचाच तो वास आज त्यांना वेगळाच भासला. रातराणी फुलली होती, तिची रात्र आधीच झाली होती. इथं मात्र प्रेम आता फुलणार होतं. त्या प्रेमाची रात्र आताशी गिरकी घेऊन सुरु होत होती. त्या रात्रीची पळं हळूहळूच पुढे सरकणार होती. निवांत!
तिच्या मनात एकदम किरणचा आवाज आला.
शांत, स्पष्ट, ठाम.
जेव्हा त्यांच्या रातराणीला पहिल्यांदा फुलं आली होती, तो म्हणाला होता - 'रातराणीचा वास येतो, चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो; पण सुगंध धरून नाही ठेवता येत!'
रातराणी वाऱ्यावर तिचा सुगंध लुटत असते अन आपण ते गंधाळलेले क्षण लुटायचे असतात. त्या त्या क्षणाला. तिचा वास आत, खोलपर्यंत घेत, एका बेहोषीमध्ये. '
तिच्या मनातला तो विचित्र कोलाहल आता थांबला होता.
त्याच क्षणाला, ती तशीच, कांतच्या मिठीत शिरली. त्याच बेहोषीत! आसुसून!
रातराणीचा गंध वाऱ्याला वेटोळं घालत, भिनतच चालला होता.

=============================
समाप्त
===========================
बिपीन सांगळे

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

2 Nov 2021 - 3:42 pm | श्वेता२४

आवडली

सोत्रि's picture

2 Nov 2021 - 5:25 pm | सोत्रि

स्वीट & सिंपल!

- (पहिली रात्र आठवणारा) सोकाजी

पाषाणभेद's picture

2 Nov 2021 - 5:52 pm | पाषाणभेद

छान आहे कथा.

Jayant Naik's picture

3 Nov 2021 - 5:35 am | Jayant Naik

अतिशय सुरेख

सौंदाळा's picture

3 Nov 2021 - 9:49 am | सौंदाळा

सुंदर कथा
मांजर आणि तिची पिल्ले, रातराणीची फुले यांचा कल्पक वापर छानच.

बिपीन सुरेश सांगळे's picture

4 Nov 2021 - 6:33 am | बिपीन सुरेश सांगळे

सुप्रभात .

वाचक मंडळी, मनापासून आपला आभारी आहे .

शुभ दीपावली !

जेम्स वांड's picture

4 Nov 2021 - 7:11 am | जेम्स वांड

भावणापूर्ण साधी अन सुटसुटीत कथा आवडली सांगळे साहेब

अभिजीत अवलिया's picture

4 Nov 2021 - 7:58 am | अभिजीत अवलिया

छान कथा

चौथा कोनाडा's picture

4 Nov 2021 - 12:38 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुपच छान स्वीट अ‍ॅण्ड लव्हली !
💖
कांताचा मानसिक संघर्ष खुप छान रंगवलाय !
आई मदतीला आली, चार समजुतीचे शब्द ऐकवले आणि मळभ दुर व्हायला सुरुवात झाली !
भीतीच वाटायला लागली कांता उध्वस्तच होतो की काय, पण शेवट वाचला आणि जीव भांड्यात पडला !

बिपीन सुरेश सांगळे _/\_

टर्मीनेटर's picture

4 Nov 2021 - 1:32 pm | टर्मीनेटर

नाजूकपणे पैंजण वाजवत आलेली तरुण रात्र उगा पाय आपटत निघून गेली .

क्या बात!

सांगळे साहेब कथा खुप आवडली. छान फुलवली आहे ‘पहिली रात्र’ 👍

स्मिताके's picture

4 Nov 2021 - 4:12 pm | स्मिताके

छान जमली आहे. मांजरीची पिलं अगदी सुरेख वापरलीत.

कुमार१'s picture

6 Nov 2021 - 7:10 pm | कुमार१

छान आहे

रातराणी वाऱ्यावर तिचा सुगंध लुटत असते अन आपण ते गंधाळलेले क्षण लुटायचे असतात. त्या त्या क्षणाला.

>> प्रेमात हा क्षण महत्वाचा. एकदा क्षण गेला तर, तो काही करून परत येत नाही.

खूप छान कथा!

श्वेता व्यास's picture

9 Nov 2021 - 5:24 pm | श्वेता व्यास

कथा आवडली.

Nitin Palkar's picture

9 Nov 2021 - 8:10 pm | Nitin Palkar

सुरेख कथा. मानसिक आंदोलनांचे चांगले वर्णन.

प्राची अश्विनी's picture

10 Nov 2021 - 4:09 pm | प्राची अश्विनी

खूप आवडली कथा.

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 Nov 2021 - 9:46 pm | बिपीन सुरेश सांगळे

मंडळी , सगळ्यांचा खूप च आभारी आहे .
दरवेळी निवांत प्रतिसाद देईन अन योग्य , असं म्हणतो अन ते होत नाही . पण प्रयत्न करिन .

जुइ's picture

11 Nov 2021 - 1:06 am | जुइ

कथा आवडली

मित्रहो's picture

16 Nov 2021 - 10:08 pm | मित्रहो

स्वीट कथा आवडली छान आहे.

मस्तच खुलवली आहे कथा!तुमची कथा लेखन शैली खुप छान आहे.

फ्रुटी's picture

17 Nov 2021 - 10:28 pm | फ्रुटी

छान लिहिली आहे.

वाचायची राहून गेलेली ही कथा आत्ताच वाचली आणि खूप आवडली. साधी सरळ घरगुती, सौम्यसी शृंगारिक, कल्पक. अनेक आभार.

बिपीन सुरेश सांगळे's picture

8 Jan 2022 - 1:22 pm | बिपीन सुरेश सांगळे

जुई
मित्रहो
भक्ती
फ्रूटी
चित्रगुप्त
खूप आभारी आहे