दिवाळी अंक २०२१ : परदेशातील मंदिरे (आणि तेथील चविष्ट जेवण!)

aschinch's picture
aschinch in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

परदेशातील मंदिरे (आणि तेथील चविष्ट जेवण!)

अविनाश चिंचवडकर
बंगळुरू

भारतात असताना मंदिराची पायरीही न चढणारे लोक परदेशात गेल्यावर मात्र नियमितपणे मंदिरात जाण्याइतके भाविक का होतात, हे मला पडलेले कोडेच होते. पण परदेशात गेल्यावर मात्र हे कोडे सुटले. मंदिराचे खरे महत्त्व मला तेव्हाच कळले.

सर्वप्रथम परदेशातील भारतीय मंदिराची ओळख झाली ती स्वीडनमध्ये. अतिशय थंड देश, त्यात भारतीय पद्धतीचे जेवण मिळण्याची खूपच बोंब होती. आपले खाद्यपदार्थही फक्त एकाच दुकानात मिळायचे. तेथील कडाक्याच्या थंडीत, सामान घरी आणून जेवण बनवायचे हे खूपच कठीण काम होते. मी असा त्रस्त झालेलो असतानाच कुणीतरी मित्राने सांगितले की "स्टॉकहोममध्ये सोलनटूना या भागात एक हिंदू मंदिर आहे आणि तेथे रविवारी आरतीनंतर स्वादिष्ट जेवण मिळते." मग काय, आम्ही ऑफिसच्या भारतीय सहकाऱ्यांनी पुढच्याच रविवारी तेथे जाण्याचा बेत ठरवला.

रविवारी सकाळी आम्ही घाईघाईने लवकर उठलो, कधी नव्हे ते लवकर अंघोळ केली आणि मंदिरात जाण्यासाठी ट्रेन पकडली. स्टॉकहोम हे अतिशय सुंदर आणि नीटनेटके शहर! कुठेही जाण्यासाठी लोकल ट्रेन असतात. पण लोकल ट्रेन आपल्यासारख्या भरगच्च नसतात आणि रविवारी सकाळी तर ट्रेन अगदी रिकामीच होती. मंदिर असलेल्या भागात पोहोचलो आणि आम्ही मंदिराकडे चालू लागलो. आखीव-रेखीव घरांच्या ओळीतच एका मोठ्या प्लॉटवर मंदिर बांधलेले होते.

1

मंदिरात बरीच गर्दी होती. काही कुटुंबवत्सल लोकही दिसत होते. पण बहुतेक मंडळी आमच्यासारखीच - भारतात कुटुंब असलेली किंवा अविवाहित होती. सगळ्यांनी मिळून देवांची आरती केली. परदेशातील मंदिरे बहुधा मल्टिपर्पज असतात; म्हणजे एकाच देवळात राम, शंकर, विष्णू, गणपती, हनुमान असे सगळे देव असतात. हे पंजाबी हिंदूंचे मंदिर असल्याने सगळे हिंदू देवच होते. एवढ्या सगळ्या देवांच्या आरत्या म्हणेपर्यंत कडकडून भूक लागली होती. आरतीचे ताट फिरवीत असतानाच काही जाणकार मंडळी लगबगीने तळमजल्याकडे जाताना दिसली. आम्हीसुद्धा आरती घेऊन त्यांच्या मागे गेलो आणि या घाईचा उलगडा झाला.

तळमजल्यावर ओळीने लोक जेवायला बसले होते. आम्ही लगबगीने जागा पकडल्या. थोड्या वेळात ताटे वाढण्यात आली आणि सुंदर दाल माखनी, आलू सब्जी, पुरी आणि पुलाव वाढण्यात आला. सोबत खीरही होती. सगळे अन्न स्वच्छ आणि घरगुती पद्धतीने बनवलेले होते. त्याचा सुगंध येत होता. ते अन्न पाहूनच आमच्या तोंडाला पाणी सुटले. कितीतरी दिवसांनी असे शुद्ध भारतीय, घरगुती जेवण दिसत होते. आम्ही त्यावर अक्षरशः तुटून पडलो. वाढणारेही कुठेच काटकसर करीत नव्हते. सगळ्यांनी अगदी पोट भरून जेवण केले आणि मंदिराला खरोखर मनापासून धन्यवाद दिले.

नंतर कळले की तेथे काम करणारे स्वयंसेवक अनेक वर्षांपासून किंवा पिढ्यांपासून तेथे स्थायिक झालेले होते. प्रत्येकाचा स्वतःचा व्यवसाय, घरदार असा जम बसलेला होता. परंतु भारतापासून हजारो किलोमीटर दूर असूनही त्यांनी आपली हिंदू संस्कृती तेथे जपली होती. 'अतिथी देवो भव' हा मूलमंत्र खरा ठरवून ते स्वतःच्या खर्चाने अनेक भारतीयांना अन्नदान करत होते, तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता! अगदी तृप्त होऊनच आम्ही त्यांचा निरोप घेतला. घरापासून हजारो मैल दूर, त्या थंड बर्फाळ प्रदेशात मिळालेल्या साध्याच पण घरगुती जेवणाची किंमत केवळ अनमोल होती. ते जेवण नेहमीसाठी लक्षात राहिले!

त्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिथे दर रविवारी जाण्याचा निश्चय केला, पण काहीतरी कारणाने ते शक्य झाले नाही. दोन-तीन वेळा आम्ही तेथे गेलो असू. माझी पत्नी आणि मुलगा स्वीडनला काही काळासाठी आले असताना त्यांनाही मी तिथे आवर्जून घेऊन गेलो होतो. त्यांनाही ते मंदिर आणि अर्थात जेवण खूप आवडले.
मग अचानक मला स्टॉकहोम सोडावे लागले आणि मंदिरात शेवटचे जाताही आले नाही. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ते पंजाबी हिंदू मंदिर कुठेतरी घट्ट बसले आहे!

*

त्यानंतर पुन्हा परदेशातील मंदिरात गेलो ते इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये. बर्मिंगहॅम हे जणू मिनी पाकिस्तानच! सगळीकडे पाकिस्तानी दुकाने आणि पाकिस्तानी वंशाचे लोक. भारतीय शाकाहारी हॉटेल्स कमीच होती. पण इंग्लंडमध्ये इतर युरोपियन देशांपेक्षा परिस्थिती थोडी बरी आहे. तेथे अनेक भारतीय आहेत, त्यामुळे खाण्याचे एवढे वांधे होत नाहीत.

मग एक दिवस माहिती मिळाली की बर्मिंगहॅममध्ये डडली रोड येथे एक बालाजीचे विशाल मंदिर आहे. मुख्य म्हणजे तेथे शनिवार-रविवारी चविष्ट भारतीय जेवण मिळते. मग काय, आम्ही तेथे जाण्याचा बेत ठरवला. तेथेही मी ऑफिसमधील सहकाऱ्यांसह गेलो होतो.

पुढच्याच रविवारी ट्रेनने-बसने प्रवास करून बालाजीचे मंदिर गाठले. हे मंदिर खूपच विस्तीर्ण होते. स्वीडनच्या मंदिराच्या तुलनेत हे खूपच मोठे होते. आजूबाजूला प्रशस्त मोकळी जागाही आहे. कार पार्किंगमध्ये धनवान ब्रिटिश भारतीयांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या लावल्या होत्या. हे मंदिर ब्रिटनमधील श्रीमंत तेलगू लोकांनी बांधले आहे. त्यांना जगभरातील धनवान तेलगू लोकांनी भरभरून देणग्या दिल्या आहेत. त्यामुळे प्रति-तिरुपती म्हणावे असेच हे मंदिर आहे.

2

या मंदिरातील गाभाराही प्रशस्त आहे, त्यामुळे पन्नास ते शंभर लोक आरतीसाठी आरामात उभे राहू शकतात. आम्हीही सगळ्या लोकांबरोबर उभे राहून आरती केली. आरतीचे ताट समोरून फिरवले गेले. सगळे जण बिनधास्तपणे पौंडच्या नोटा टाकत होते. त्यात स्वतःजवळच्या मर्यादित रकमेपैकी एक पौंड टाकताना मन थोडे हेलावले.

आरती संपल्यावर मग नेहमीप्रमाणे सगळ्यांची लगबग सुरू झाली ती प्रसादासाठी. आम्हीसुद्धा घाईघाईने सगळ्यांबरोबर चालू लागलो. या मंदिराचे प्रशस्त आवार होते, त्यामुळे त्यांनी प्रसादासाठी एक वेगळे दालनच ठेवले होते. तेथे व्यवस्थित टेबल-खुर्च्या मांडून जवळजवळ शंभर लोक एकावेळी बसतील अशी व्यवस्था होती. येथील प्रसादही दाक्षिणात्य पद्धतीचा होता. सांबार, भात, सागू (भाजी) आणि शिरा खणाच्या ताटलीत व्यवस्थितपणे वाढला जातो. तेथील गरम गरम सांबार आणि भात खाऊन मन तृप्त झाले. पुन्हा तुम्ही कितीही वेळा ताट भरून घेऊ शकता. कपाळावर आठ्या न पडता प्रसन्न चेहऱ्याने तेथील स्वयंसेवक तुम्हाला वाढतात. परदेशातील मंदिरे आणि तेथील जेवणाची व्यवस्था अगदी स्वच्छ असते. त्या त्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिबिंब त्यात दिसते. लोकही अगदी रांगेत उभे राहून आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. कुठेही गडबड नाही. अन्न वाया जाणार नाही याचीही दक्षता घेतली जात होती.

3

अशा वेळी प्रकर्षाने आपल्याकडील (काही अपवाद वगळता) मंदिरांची आठवण येते. अशी स्वच्छता आणि सुव्यवस्था शेगावसारखे अपवाद वगळता कमीच ठिकाणी दिसते. बालाजी मंदिरातील प्रसादाने मन अगदी तृप्त झाले. परदेशात घरापासून दूर असलेल्या लोकांचा देवावरील विश्वास अशा प्रकारच्या मंदिरांमुळे अधिकच दृढ होतो. हे मंदिर तसे बर्मिंगहॅम शहरापासून बरेच लांब होते, त्यामुळे पुन्हा काही तेथे जाणे झाले नाही. पण तिथला विस्तीर्ण परिसर, सुंदर, स्वच्छ मंदिर आणि चविष्ट प्रसाद आजही स्मरणात आहे!

*
आणि मग मला पुन्हा एकदा लंडनला जाण्याची संधी मिळाली, तेव्हा मी तेथील मंदिरांची माहिती काढू लागलो. परदेशात कामाचे दिवस तर सहज निघून जातात, पण वीकेंडला काय करायचे हाच मोठा प्रश्न असतो. अशा वेळी इतर प्रेक्षणीय स्थळांप्रमाणेच मंदिरांचाही आधार वाटतो.

तर मग शोध घेता घेता लंडनमधील निस्डन या भागात स्वामीनारायण मंदिराचा शोध लागला आणि मी तिथे एका मित्रासह जाऊन धडकलो. अतिशय सुरेख आणि भव्य मंदिर! फुलांचे ताटवे सगळीकडे पसरलेले. ते पाहूनच मन प्रसन्न झाले. इंग्लंडमधील गुजराती समाज खूपच धनाढ्य आहे. त्यामुळे त्यांनी या देवस्थानाला सढळ हाताने देणगी दिली आहे. त्यामुळे सगळीकडे त्याच्या वैभवशाली खुणा दिसत होत्या. पण प्रसादाच्या बाबतीत मात्र येथे निराशा झाली, कारण येथे प्रसाद मोफत दिला जात नाही.

4

5

रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला गेले की मंदिराच्या परिसरातच एक उपाहारगृह आहे. तेथे पैसे मोजून मग जेवण घ्यावे लागते. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात. जेवण सुंदर होते, पण थोडे महाग वाटले. काही भारतीय वस्तूसुद्धा विक्रीला ठेवल्या होत्या. या मंदिरात प्रसादाच्या बाबतीत निराशा झाली असली, तरी एकंदरीत तेथे खूप प्रसन्न वाटले. भारतीय माणसाला परदेशात मंदिरांचा खूप आधार वाटतो हे मात्र खरे!

*

त्यानंतर काही वर्षांपूर्वी मी ऑस्ट्रेलियात सिडनीला गेलो, तेव्हा गुरुद्वारात जाण्याचा योग आला. गुरुद्वारा हे एक वेगळेच प्रकरण असते. तेथे थोडीशी कडक नियमावली असते. पण अतिशय शिस्तबद्ध, स्वयंशासन पूर्ण असा कारभार! तसाही शीख समुदाय हा अतिशय मेहनती आणि प्रामाणिक असतो, तसेच त्यांची वृत्ती सेवाभावी असते, त्यांच्या गुरुद्वारातही त्याची प्रचिती येते.

शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही रांगेत उभे राहून गुरूंचे दर्शन घेतले आणि मग लंगरमध्ये प्रसादासाठी गेलो. या वेळी माझ्याबरोबर कुटुंबीय मंडळी होती. जेवण आणि वाढण्याची पद्धत एकदम शिस्तबद्ध होती. खाली बसून जेवायचे, अपवाद फक्त अतिशय वृद्ध आणि अपंग लोकांसाठी.

सर्वप्रथम त्यांनी शाळेप्रमाणे लांब सतरंज्या टाकल्या. त्यावर सगळे बसले. मग एका माणसाने सगळ्यांच्या समोर ताट-वाट्या आणून ठेवल्या. एक माणूस फक्त सगळ्या पेल्यांमध्ये पाणी घालायचे काम करत होता. मग प्रत्येक जण एक एक पदार्थ आणून वाढू लागला. दाल, रोटी, छोले, शिरा असे चविष्ट जेवण होते. वाढताना त्यात एक प्रकारचा भक्तिभाव होता. मध्येच "वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतह” अशा प्रार्थनाही ते म्हणतात. त्यामुळे आपण केवळ अन्नभक्षण करत नसून तो प्रसाद आहे याची जाणीवही होते. संपूर्ण जेवण अतिशय स्वच्छ होते. मला तरी वाटते वाटते की स्वच्छता ही मंदिराचे पावित्र्य आणखीनच वाढवते. अस्वच्छ वातावरणात मनातील भक्तिभावही जागृत होत नाही.

अशा प्रकारे लंगरमधील प्रसादाचे मनःपूर्वक सेवन करून आम्ही जेवण आटोपले. इथे प्रत्येकाला आपले ताट-वाटी स्वतःला स्वच्छ करावी लागते. त्यासाठीसुद्धा वेगळी रांग होती. ताट धुताना आत बघितले तर अनेक चांगल्या घरातील शीख स्त्री-पुरुष भांडी घासत होती. काही लोक भाज्या चिरत होते. सगळे जण आपल्या घरातील काम असावे, अशा प्रकारे वाहेगुरूंची सेवा करीत होते.

परदेशातील गुरुद्वारा आणि लंगर अनेक लोकांना संकटाच्या वेळी मदत करतात, असे ऐकले. गुरुद्वारात आलेल्या कुणालाही उपाशी रहावे लागणार नाही, चार घास तरी नक्कीच खायला मिळतील, याची हा समाज दक्षता घेतो. त्या वेळी मग तो माणूस शीख समाजाचा आहे की इतर समाजाचा, असा भेदभाव करण्यात येत नाही.
शीख समाजही परदेशात बहुधा श्रीमंत असतो. त्यामुळे तो केवळ पैशानेच नव्हे, तर श्रमानेही या गुरुद्वारास मदत करतो. आपण भारतात असताना गुरुद्वारात अभावानेच जातो. पण परदेशातील गुरुद्वारे पाहून मात्र आपुलकी आणि अभिमान वाटतो.

*

तर अशा प्रकारे मी भेट दिलेल्या आणि मला आवडलेल्या परदेशातील मंदिरांची ही मुशाफिरी! तेथे जाण्याचे आकर्षण अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास जेवण हे असले, तरी ही मंदिरे आपल्या देशाची, संस्कृतीची नाळ तुटू देत नाहीत हे मात्र खरे! उलट परदेशातील अतिशय वेगळ्या वातावरणात ही मंदिरे आपल्याला खूपच दिलासा देतात, घराची उणीव भासू देत नाहीत.

म्हणतात ना की देवाला स्थळकाळाचे कुठलेही बंधन नाही. त्याला कुठल्याही देशाच्या सीमारेषा, चौकटी लागू होत नाहीत. त्यामुळे तो जसा भारतात असतो तसाच परदेशातही रमतो आणि आपल्याला एक प्रकारची शांतता मिळवून देतो.

परदेशातील जीवनात एकाकीपणा जीवघेणा असतो. कधीकधी आपल्याला घराची आठवण येऊन नैराश्य येते. अशा वेळी ही मंदिरे आपल्याला दिलासा देतात, धीर देतात. जणू काही ती आपल्याला सांगतात -

सबका है ऊपरवाला
सबको उसी ने सम्भाला
जब भी घिरा ग़म का अंधेरा
उसने किया उजियाला
राही तू रुक मत जाना

****************
अविनाश चिंचवडकर
बंगळुरू
avinashsc@yahoo.com
9986196940

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

3 Nov 2021 - 1:20 am | श्रीरंग_जोशी

विविध देशांमधल्या देवळांची विशेषकरून तिथे मिळणार्‍या प्रसादाची वर्णने भावली. देवळातल्या अस्वच्छतेबाबत लेखात मांडलेल्या विचाराशी सहमत आहे.

मी अमेरिकेतल्या बर्‍याच देवळांमधे गेलो आहे अन जेवलोही आहे. कुठे सहलीला गेलो तरी तिथल्या भारतीय देवळात जाण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या शहरातल्या साईबाबांच्या देवळाखेरीज फुकट जेवण कुठेच नसले तरी सगळीकडे रुचकर जेवण मिळाले.

आमच्या शहरात जे मोठे देऊळ आहे तिथे दर शनिवार रविवारी स्वयंसेवकांचे गट स्वतः जिन्नस आणून किमान २०० लोकांचे जेवण बनवतात. खाणार्‍यांनी प्रत्येकी ५ डॉलर्स द्यायचे असतात जे देवळाला दान केले जातात. गणेशोत्सवाच्या वेळी मराठी मंडळाच्या माध्यमातून मलाही स्वयंपाकात सहभागी होण्याची संधी मिळाली. ८००~१००० लोकांच्या जेवणासाठी भाज्या चिरणे, पुर्‍या तळणे हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता.

विविध सणांच्या वेळेला वेगवेगळ्या भारतीय पद्धतींचे जेवण खायला मिळत असल्याने आम्ही लक्ष ठेवून असतो. लोहडीला पंजाबी, जन्माष्टमीला गुजराती, दक्षिण भारतीयांचेही पोंगल वगैरे चवदार असते. गणेशोत्सवाच्या वेळी मराठी पद्धतीचे जेवण इतर भारतीय आवडीने खातात व कौतुकही करतात.

सेवाभावाने बनवलेलं जेवण जेवण्याचे समाधान वेगळेच असते.

aschinch's picture

10 Nov 2021 - 5:42 pm | aschinch

Community Kitchen ही कल्पनाच खूप छान आहे. आपला अनुभव शेअर केल्याबद्दल आभारी आहे.

माझ्या गावातल्या मंदिरात रोज रात्री आरती नंतर प्रसाद म्हणुन जेवण असते. सारा कारभार स्वयंसेवक करतात. भाजी कापणे ते वाढ्णे .. भांडी घासणे सारे काही ... सारा खर्च दान पेटीतुन येतो किंवा कुणीतरी स्पॉंसर करतो ... गेले कित्येक वर्षे हा नेम चालु आहे.

कोवीड काळात तर मंदिराने पार्किंग लॉट मधे येईल त्याला जेवण दिले होते .. कित्येक गरीब ज्यांचे हाल होत होते ते येउन जेवण करुन जात होते.

aschinch's picture

10 Nov 2021 - 5:42 pm | aschinch

मंदिरे ही खऱ्या अर्थाने आपल्याला एकत्र आणतात.

चौकस२१२'s picture

3 Nov 2021 - 5:52 am | चौकस२१२

एक श्रीलंकेच्या हिंदूंनी चालविले मंदिर आहे तिथे मस्त दाक्षिणात्य पदार्थ मिळतात ..( विकत आणि वाजवी दराने )
मस्त गावाबाहेर शांत , देवळात मोर, गायी इत्यादी
मस्त विकांताला फिरणे होते + पेटपूजा ( त्यातून आर्थिक मदत )
ऐडलेड शहरात जुने चर्च विकत घेऊन त्याचे रूपांतर मंदिरात केले आहे ( दुप्पट पुण्य ! हाहाहाहा )
सिडनीत मराठी मंडळ गणपतीला देवळात गणपती बसवते

मी शक्यतो अश्या समाजाने निर्माण केलेलया मंदिरात जातो ( इस्कॉन किंवा स्वामी नारायण सारख्या मंदिरात गेल्यावर नेहमी प्रश्न नक्की हिंदू आहेत कि काहीतरी "पंथ " आहेत ..फक्त एकाच सनकुचीत भारावलेले - कृष्णचा म्हणजे सर्व काही - स्वामी नारायण या व्यक्तीची पूजा, इत्यादी )

aschinch's picture

10 Nov 2021 - 5:44 pm | aschinch

प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. सिडनी ला मंदिरात जाऊ शकलो नाही. पुढच्या वेळेस नक्की जाईन.

राघवेंद्र's picture

3 Nov 2021 - 8:35 am | राघवेंद्र

माझ्या कडे ईस्ट कोस्ट मधील प्रत्येक सहलीच्या ठिकाणांसोबत त्याच्या जवळील मंदिराची यादी आहे.
आई वडिलांना सहलीच्या ठिकाणांपेक्षा मंदिरे आवडायची कारण तेच मोठी स्वच्छ मंदिरे आणि रुचकर प्रसाद.

aschinch's picture

10 Nov 2021 - 5:45 pm | aschinch

मंदिरातील जेवण हे बहुधा स्वच्छ आणि घरगुती असते.

कंजूस's picture

3 Nov 2021 - 6:03 pm | कंजूस

लेख आवडला. पोटभर .
मीही लहानपणी भाविक होतो. याचं कारण हेच. पुढेही राहण्याचा प्रयत्न करणार.

मंदीरं फार छान बांधली आहेत.

aschinch's picture

10 Nov 2021 - 5:46 pm | aschinch

पोटभर. :) प्रतिक्रिया पण आवडली

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 6:57 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे

aschinch's picture

10 Nov 2021 - 6:58 pm | aschinch

धन्यवाद

वाह... देवळांच्या भेटींचा आणि तेथील प्रसाद / जेवण ग्रहण करण्याचा मनमोकळा अनुभव आवडला. :)
असाच काहीसा अनुभव मी देखील घेतलेला आहे.

मदनबाण.....

प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Nov 2021 - 9:28 pm | अमरेंद्र बाहुबली

लेख आवडला

aschinch's picture

10 Nov 2021 - 6:59 pm | aschinch

धन्यवाद

जुइ's picture

8 Nov 2021 - 12:15 am | जुइ

परदेशातील मंदिरे आणि तेथे मिळणारे रुचकर जेवण यांचे एक अतूट नाते आहे. शिकागो येथील औरोरा येथील मंदिर देखिल अतिशय भव्य आहे. तेथे मिळणारे दक्षिण भारतीय पदार्थ खूप रुचकर असतात. तेथे खाल्लेल्या सांज्याची चव अजूनही लक्षात आहे. तसेच शिकागोपासून जवळच ग्रेजलेक, इलिनॉय येथील मंदिर आतून खूप सुंदर आहे. विशेषकरुन येथील रेखीव मुर्त्या खूप भावतात. शनिवार, रविवार इथेही रुचकर जेवण मिळते. फ्लोरिडातल्या ऑरल्यांडो येथील मंदिरातही चविष्ट जेवण मिळते.

औरोरा येथील मंदिर
Aurora Temple

aschinch's picture

10 Nov 2021 - 5:39 pm | aschinch

अप्रतिम मंदिर आहे.

तुषार काळभोर's picture

8 Nov 2021 - 7:52 am | तुषार काळभोर

पण फोटो अजून हवे होते. भटकंती/प्रवास वर्णन भरपूर फोटो असल्याशिवाय अपूर्ण वाटते.

aschinch's picture

8 Nov 2021 - 5:26 pm | aschinch

पण माझ्याजवळ यापेक्षा जास्त फोटो नव्हते.

प्राची अश्विनी's picture

10 Nov 2021 - 2:12 am | प्राची अश्विनी

लेख आवडला.

aschinch's picture

10 Nov 2021 - 7:00 pm | aschinch

धन्यवाद

जेम्स वांड's picture

10 Nov 2021 - 7:46 am | जेम्स वांड

स्वामी नारायण मंदिरात काहीच फुकट नसते अन न जाणे कसले पण एक स्तोम जाणवत राहते, मला तरी मुख्य मंदिर (अक्षरधाम, गांधीनगर) पण खास आवडले नाही.

सुंदर मंदिरे आणि उत्तम जेवण हे आता हळूहळू भारतात पण नीट रुजते आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे

१. शेगाव - इथं मला अवाढव्य कारभार असूनही देवाचा धंदा जाणवला नाही, जेवण झकास, हल्ली मेनू बदलला आहे पण लहानपणी आईवडील दर दिवाळीच्या सुट्टीत घेऊन जात तिकडे तेव्हा तिखट वांगी बटाटा भाजी (ही म्हणे विदर्भ स्पेशल असते) किंवा तितकीच झणझणीत कोहळ्याची भाजी, जाडसर पिठाची जाड चपाती, मोकळा फडफडीत भात अन बुंदीचा लाडू असा मेनू असे.

२. सज्जनगड - इथं जेवायला फक्त आमटी भात, गव्हाची खीर (हुग्गी पण म्हणतात बहुतेक हिला) इतकेच असते पण चव असली का भयानक विलक्षण. इथे अजून एक गंमत म्हणजे जेवल्यावर वाटीत नाही तर थेट ओंजळीत ताक देत असत (आजकालचे ठाऊक नाही बरीच वर्षे जाणे झालेले नाही)

३. कारंजा-लाड - श्री नरसिंहसरस्वती महाराजांचे जन्मस्थान, इथे पण दुपारी बाराला कवाडे बंद करून आरती आणि नैवेद्य झाल्यावर जेवणावळी सुरू होतात, बेसन घोळून तयार केलेली पालकाची पातळभाजी, जाडसर चपाती, भात, साधेवरण आणि शिरा/ बेसनवडी असा येथील फर्मास मेनू असतो.

४. गोंदवले - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिराचा मेनू पण बव्हंशी रामदास स्वामींच्या सज्जनगडासारखाच असतो, आमटी भात , एक गोड काहीतरी अन ताक, गोंदवल्याची आमटी मला पर्सनली जास्त आवडते :D

५. बनारसला काशी विश्वेश्वराच्या मंदिराला लागूनच कुठल्यातरी दाक्षिणात्य मंदिराचे अन्नछत्र आहे, तिथं दहा रुपयांचे कूपन घेऊन टेबल खुर्चीवर जेवायला बसवले जाते, सांभार भात ताक इतकाच मेनू, पण तिखट आंबट चवीचे ते सांभार मी आजवर खाल्लेले जगातले सर्वात भारी सर्वोत्तम सांभार होते.

६. हिमाचल प्रदेशात मणिकरण इथे "गुरुद्वारा मणिकरण" साहेब आहे, गरम पाण्याचे झरे वगैरे असलेला उत्तम स्पॉट आहे, तिथं लंगरमध्ये पालक पनीर, भात, डाळ मखनी अन शिरा असतो, उत्तम चव.

लास्ट बट नॉट द लिस्ट

७. गावातील भंडारा - तिखट जाळोत्तम उडदाचे शाक, मोकळा भात, फिक्क्या पुरणपोळ्या, सोबत गुळवणी आणि कधीतरी लैच दौलत असेल मंदिरात तर ताक. ती चव विसरणेच अशक्य होय राव.

aschinch's picture

10 Nov 2021 - 6:55 pm | aschinch

खूप उपयोगी माहिती. यातील शेगाव आणि गोंदवले येथील प्रसाद मी पण चाखला आहे.

अनन्त अवधुत's picture

11 Nov 2021 - 3:35 am | अनन्त अवधुत

कारंजा-लाड ला जाण्याचा कधी योग आला नाही. शेगांव, सज्जनगड, गोंदवले, खाली एका प्रतिसादात सौंदाळा यांनी उल्लेखलेले पावस येथील प्रसाद ग्रहण केले आहेत. आत्माराम तृप्त होतो. गजानन महाराज संस्थानच्या इतर शाखांमधला प्रसाद पण चांगला असतो (उदा. पंढरपूर, त्र्यंबकेश्वर)

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Nov 2021 - 12:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

नीस्डेन मध्ये महाराष्ट्र मंडळात गेला होतात की नाही? एका वर्षी गणपतीच्या दिवसात तिथे जायचा योग आला होता, तेव्हा तिथला भव्य गणेशोत्सव बघुन भारावुन गेलो होतो. https://www.mmlondon.co.uk/

काही वर्षे कॅनडात असताना विनिपेग आणि रजायना मधील मंदिरात नेहमी जाणे व्हायचे ते दर्शन आणि प्रसाद या कारणासाठीच, विशेषतः बॅचलर लोकांना ही मंदिरे म्हणजे मोठा आधारच असतो परदेशात.

परदेशातील मंदिरे ही अधिक आपल्यासाठी खूप आधार देतात. Nisden महाराष्ट्र मंडळात जाण्याचा काही योग आला नाही.

सौंदाळा's picture

10 Nov 2021 - 1:01 pm | सौंदाळा

चविष्ट धार्मिक लेख.
वर बऱ्याच जणांनी भारतातील काही देवस्थानच्या भोजनाबद्दल लिहिले आहे, त्यात थोडी भर
स्वामी स्वरूपानंद मंदीर पावस येथील मूग डाळ खिचडी, दत्तमंदिर (टेम्भे स्वामी) माणगाव येथील रुचकर जेवण, मंगेशी, महालक्ष्मी, शांतादुर्गा गोवा येथील गोवन पद्धतीचे भरपूर खोबरे वापरून केले जाणारे जेवण (फरसबी, चवळी शेंगाची उसळ, मूग बटाटा उसळ, मिरची भजी, गोड म्हणून गोवन स्पेशल मनगणे) सुंदर चव.

aschinch's picture

10 Nov 2021 - 5:50 pm | aschinch

पावस मधील प्रसाद चाखला आहे. खरंच चविष्ट

चौथा कोनाडा's picture

10 Nov 2021 - 5:57 pm | चौथा कोनाडा

"प्रासादि"ल लेखन !

मध्येच "वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतह” अशा प्रार्थनाही ते म्हणतात. त्यामुळे आपण केवळ अन्नभक्षण करत नसून तो प्रसाद आहे याची जाणीवही होते.

असा प्रसाद घेताना कोणत्या देवाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या रंगरुपांच्या माणसांचा आहे, आपण आस्तिक की नास्तिक असल्या सर्व शंका-कुशंका विरुन जातात. आपण मनोमन नतमस्तक होऊन जातो.

आटोपशीर लेखन अर्थातच आवडले !
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत !

aschinch's picture

10 Nov 2021 - 7:01 pm | aschinch

खरे आहे, खूप धन्यवाद

बोलघेवडा's picture

10 Nov 2021 - 6:43 pm | बोलघेवडा

विद्यार्थी दशेत हे सर्व अगदी जवळून अनुभवले आहे. त्यामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या. लेख आवडला.

aschinch's picture

10 Nov 2021 - 7:01 pm | aschinch

धन्यवाद

चामुंडराय's picture

10 Nov 2021 - 7:33 pm | चामुंडराय

देवळातील जेवणाबद्दल आणि त्याच्या गुणवत्तेबद्दल वरती भरपूर लिहिले आहे त्यामुळे त्याबद्दल लिहीत नाही परंतु इकडील देवळांनी सर्वधर्म समभावासारखा सर्वदेवो समभाव शिकवला आहे. पहिल्यांदा जेव्हा देवळात गेलो होतो तेव्हा सर्व देवांची ओळीने उपस्थिती बघून आश्चर्य तर वाटलेच होते परंतु कोणापासून नमस्कार करायला सुरुवात करावी कळेना. भारतामध्ये एकेका देवाची वेगवेगळी देवळे असतात. फारतर विठ्ठल-रुखमाई किंवा श्रीराम भार्या, अनुज आणि सेवक हनुमानासोबत एकत्र असतील. इथे मात्र गणपती, राधा-कृष्णापासून ते दुर्गा, शिवशंभो, बालाजी पर्यंत सगळे डायसवर उपस्थित (त्याला आल्टर म्हणायचं म्हणे). आता एकापासून सुरवात करावी तर न जाणो दुसऱ्याचा अपमान व्हायचा! मोठाच प्रश्न होता.

शॉवरात् पतितं तोयं यथा गच्छति ड्रेनेजम् ।

ज्याप्रमाणे पाणी अडवा - पाणी जिरवा किंवा मधेच बाष्पीभवन झाले नाही तर आकाशातून पावसाच्या स्वरूपात पडलेले पाणी हे नद्यांच्या वाटे समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे सर्व देवांना केलेला नमस्कार अंतिमतः केशवाला जाऊन मिळतो हे आठवले आणि मग सरळ ओळीने सुरवात करून एकाचवेळी मल्टिपल पुण्य प्राप्त केले होते, ते आठवले.

मित्रहो's picture

10 Nov 2021 - 8:22 pm | मित्रहो

मंदिरे आणि तिथल्या जेवणाची छान माहिती दिली आहे. मला वाचल्याचे आठवत स्टिव्ह जॉब्स पण मंदिरात जेवायला जायचा मी परदेशात मंदिरात गेलो नाही. इकडे दक्षिणेत पोंगल प्रसाद म्हणून मिळतो. मस्त असतो

सुधीर कांदळकर's picture

11 Nov 2021 - 6:31 am | सुधीर कांदळकर

प्रसादाचे सार्वजनिक भोजन असतेच. प्रसादाचे जेवल्यास पुण्य लाभते अशा श्रद्धेमुळे अनेक भाविक तिथे जेवतात. तर काही देवस्थानांच्या दुर्गम स्थानांमुळे तिथे सोय म्हणून पोटपूजा करावी लागते. काही मंदिरातील भोजनात स्वच्छता बरी असते. नारायणपूरनजीकच्या कुवळे गावतील बालाजी मंदीर, निगडीचे कृष्ण मंदीर या ठिकाणी मी जेवलो आहे.

ओरिसातल्या नृसिंहनाथ मंदिरात मी सोय म्हणून जेवलो आहे.

छान लेख. फोटो सुरेखच. लेख आवडला. धन्यवाद.

अनिंद्य's picture

11 Nov 2021 - 5:04 pm | अनिंद्य

मस्त लेख आहे. पोटपूजेच्या मिषाने का होईना देवपूजा व्हावी असाच हेतू असेल देवळांचा :-) अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही.

बाहेरदेशी देवळात आणि गुरुद्वारात अधेमधे भोजन केले आहे. भारतात दक्षिणेकडे प्रसाद भोजन उत्तम असते आणि उत्तरेत गुरुद्वारांचे. काही ठिकाणी चुकून आधी भोजनशाळा बघण्याची चूक केली आणि मग अस्वच्छता बघून काहीही न खाता परतलो आहे.