body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
कवितेची जन्मकथा :- 'तुमचं काय गेलं?' - मंगेश पाडगावकर
मराठी भाषेतील एक अवलिया कवी म्हणजे मंगेश पाडगावकर. पाडगावकरांच्या अनेक कविता अजरामर झालेल्या आहेत. भावगीत गायक अरुण दाते, संगीतकार श्रीनिवास खळे, वेगवेगळे गायक-गायिका यामुळे तर भावगीत प्रांतामध्ये मंगेश पाडगावकर कायमस्वरूपी लक्षात राहणारे गीतकार कवी म्हणून ओळखले जातात. आनंदयात्री म्हणून ओळखले जाणारे मंगेश केशव पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या गावी झाला. वयाच्या साधारण चौदाव्या वर्षापासून काव्यलेखन करणारे मंगेश पाडगावकर मुंबईमध्ये स्थिरावले, विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रभर ते काव्यासाठी ओळखले जाऊ लागले. अरुण दाते आणि मंगेश पाडगावकर यांचे एकमेकांशी कोणत्या जन्माचे नाते होते, हे सांगणे खरच कठीण असले, तरी त्यांचे शब्द आणि स्वर या पूरक संबंधाने संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात 'या जन्मावर या जगण्यावर', 'भातुकलीच्या खेळामधली', 'शुक्रतारा मंद वारा' ही भावगीते पोहोचवली. मंगेश पाडगावकर यांच्या भावगीतांना श्रीनिवास खळे यांच्या संगीताचाही लाभ झाला. नादमाधुर्य, लयबद्धता आणि संपन्न आशयघनता ह्या सुरेख मेळामधून पाडगावकर यांची गीते कविता कायम स्मरणात राहतात.
अनेक वेळा भातुकलीच्या खेळामधली, किंवा या जीवनावर या जगण्यावर अशा गीतांमुळे पाडगावकरांच्या वास्तवदर्शी कवितांवर विचारच होत नाही, असे मला वाटते. पाडगावकर खऱ्या अर्थाने जीवनातील व्यंग टिपणारे आणि यावर परखड भाष्य करणारे कवी होते. अशीच त्यांची व्यंगात्मक, खेळकर, खोडकर वाटणारी, पण तितकीच वास्तववादी कविता म्हणजे 'तुमचं काय गेलं?' ही कविता मंगेश पाडगावकर ह्यांच्या बोलगाणी ह्या संग्रहातील आहे. खरे म्हणजे हा प्रश्न निरर्थक गोष्टीवर काथ्याकूट करत स्वतःचे जीवन एका प्रश्नचिन्हासमान करून ठेवणाऱ्या महाभागांवर आहे. त्यातच प्रेम ही संकल्पना असल्यामुळे कवितेची रंगत आणखी वाढत जाते. आता ही कविता पाडगावकर ह्यांच्या मनात कशी जन्मली असेल त्याचा विचार माझ्या मनात आला. आणि पाडगावकर ह्यांचा स्वभाव, त्यांचे व्यक्तित्व, त्यांची मिश्कील प्रवृत्ती ह्यातून त्यांची ही कविता अशी जन्मली असेल, ह्याचा मी शोध घेऊ लागलो. एकंदर ही कविता मनामध्ये फार मुरत जाऊन टप्प्याटप्प्याने घडली असावी, असे मला वाटत नाही. कवींनी एक साधा प्रसंग पाहिला आणि लगेच त्यांच्या मनातील खोडकर आणि खेळकर कवीने तो शब्दबद्ध केला असावा, असे ही कविता वाचताना वाटते. 'तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला, नको तितका अंगाशी जाऊन खेटला' ह्या ओळीतून कदाचित मुंबईसारख्या शहरात बागेत किंवा एखाद्या कोपऱ्यात प्रणयराधन करणारे तरुण जोडपे कवीला दिसले असावे आणि गंमत म्हणून त्यावर लिहिता लिहिता कवींनी मानवी प्रवृत्तीवर नेमके बोट ठेवले.
त्याने प्रेम केले किंवा तिने प्रेम केले,
करू दे की!
मला सांगा, तुमचं काय गेलं?
अशी सुरुवात असलेल्या या कवितेतून कवीने तरुणाईवर सातत्याने होत आलेल्या प्रेम सुलभ आरोपाबद्दल भाष्य केले आहे. ते आपले कोणीच नसतात, त्यांचा आपला यथार्थ आणि काहीही संबंध नसतो, तरीही त्यांच्याबाबत सातत्याने कानगोष्टी आणि कुजबुज सुरूच असते. ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात नाहीत, ज्याबद्दल आपण काही करू शकत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपल्या जीवनात कोणताही फायदा किंवा तोटा नसतो, त्याबद्दल आपण उगाच चर्चा का करतो? अशा भावनेतून आपल्या कवितेची सुरुवात करत कवी सरळच विचारतात की त्यांचे - म्हणजे त्या तरुण-तरुणीचे तसे जे वागणे आहे, त्या वागण्यामुळे तुमचे-माझे काही नुकसान आहे का? नाही ना? मग आपण का त्याबद्दल विचार करतो? कदाचित ते जे करत आहेत ते आपल्याला करायला मिळाले नाही, ह्याबद्दल मनाच्या कोपऱ्यात असूया तर निर्माण झाली नाही ना? तसेही जगाला कामसूत्र आणि खजुराहोच्या संस्कृतीमधून ज्ञान देणाऱ्या भारतीयांच्या इच्छा आणि त्याचे मानसशास्त्र हे भारतीय संस्कृतीत दमन आणि अतृप्त ह्यांची साक्ष देणार आहे, हे आपण नाकारत असलो तरी सत्य आहे. त्यातूनच कवींनी जो प्रसंग पाहिला असावा, त्याबद्दल लिहीत ते आपल्या कवितेत म्हणतात,
तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला?
नको तितका जवळ जाऊन अंगाशी खेटला?
लाल लाल गुलाबाचं फूल होऊन पेटला?
भेटला तर भेटू दे की, पेटला तर पेटू दे की!
तुमचं डोकं कशासाठी इतक गरम झालं?
त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करू दे की! मला सांगा तुमचं काय गेलं?
या कडव्यामध्ये पाडगावकरांनी बागबगिचांमध्ये, उद्यानांत किंवा सिनेमागृहांत सातत्याने दिसणारे दृश्य, त्यावर कुत्सित नजरा, कुचकट बोलणे असे काहीसे संमिश्र चित्र पाहायला मिळते, त्यावर भाष्य केले आहे. यामध्ये प्रेमाचे प्रतीक समजले जाणारे गुलाबाचे फुल त्यांनी अतिशय चपलखपणे वापरले आहे. या सर्व प्रकारामुळे कुणालाही डोके गरम करून घेण्याची गरज नाही, असेसुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्याच वेळी हा प्रसंग मुंबईत रहिवासी असल्याने त्यांनी प्रत्यक्ष पाहिला की एखाद्या सिनेमात, हाही प्रश्न पडतो. की एखादेवेळी त्यांनी असे तरुण-तरुणी चोरून लपून भेटताना पाहिले आणि मग नंतर एखाद्या सिमेनातील दृश्यामुळे त्यांची कविता पुढे सरकली, ते नक्की सांगता येईल असे मला वाटत नाही. मात्र अशा वेळी क्षणभर पाडगावकर स्वैराचाराचे समर्थन तर करत नाहीत ना? असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात मराठी साहित्यातील एक धाडसी कवी असल्याने ते तसे करू शकत होते. पण ह्या पडलेल्या प्रश्नाचे उत्तर कविता जशी जशी पुढे सरकत जाते तसे तसे मिळत जाते.
एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली?
पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली?
घरात तेव्हां कोणीच नव्हतं म्हणून त्यांच फावल?
त्याने तिला जवळ घेऊन चक्क दार लावलं?
लावलं तर लावू दे की, फावलं तर फावू दे की!
तुमच्या माझ्या पूर्वजांनी दुसरं काय केलं?
त्याने प्रेम केले किंवा तिने प्रेम केले, करू दे की!
मला सांगा, तुमचं काय गेलं?
या कडव्यामधून कवीने बेधुंद तरुणाईची आणखी पुढची पायरी वर्णित केली आहे. पावसाच्या ओढीतून एकांतात भेटणारे प्रेमी आणि त्याच वेळी आकर्षणातून निर्माण होणारे प्रेम सरतेशेवटी शारीरिक ओढीकडे झुकतेच आणि येथेच तरुण पिढीचे चुकतेय असे सांगूनही तारुण्यसुलभ क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या अशाच असणार यात काही पाप नाही, आणि असते तर शारीरिक ओढीतून सृष्टीची वाढ करणारे आपले सर्व पूर्वजसुद्धा पापी ठरतील.. कारण त्यांनी यापेक्षा वेगळे काहीही केलेले नाही, असे सांगून त्यांच्या प्रेमाला नावे बोट ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाही, कारण त्यामुळे आपला काही फायदा नाही तसेच तोटाही नाही, असे कवी म्हणतात. मात्र आज अशा चोरट्या संबंधातून जे सामाजिक प्रदूषण झाले आहे, त्याचा विचार मात्र आपल्याला आज करावा लागणार आहे. पुरुष नामानिराळा राहून स्त्रीला नको ते सोसावे आणि भोगावे लागते, हेसुद्धा लक्षात घेण्यात गरज आहे. मात्र 'आमच्या वेळी नव्हती बाई अशी थेरं' असा टोमणा सकाळी उशिरा उठणाऱ्या नवविवाहित सुनेला मारणाऱ्या सासूने एकदा तरी स्वतःच्या पूर्वायुष्यात डोकावून पाहावे. जे दमन आपल्या पिढीच्या वाट्याला आले होते, तेच इच्छा दमन नवीन पिढीने भोगलेच पाहिजे का? हाही विचार करावा.
घरात जागा नसते त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण!
ते थोडेच बसणार आहेत पाणिनीचं घोकीत व्याकरण?
गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच!
कुणीतरी कुणाला जवळ ओढून घेणारच!
घेतलं तर घेऊ दे की, व्हायचं ते होऊ दे की!
तुमच्या घरच बोचक त्यांनी उचलून थोडंच नेलं?
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केले, करू दे की!
मला सांगा तुमचं काय गेलं?
या कडव्यामध्ये बाहेर सुरू असलेली सर्व प्रकरणे अनैतिकच असतात असे नव्हे, तर कधी कधी काही वैयक्तिक समस्यांमुळेसुद्धा मनाचा कोंडमारा होत असतो. तसेच जागेच्या समस्यामुळे मनातील भावनांचा कल्लोळ टॅक्सीमध्ये सुद्धा उघड होतो. या बाबतीत पिया का घर या चित्रपटातील 'ये जीवन है, इस जीवन का यही है रंगरूप' या गाण्याची प्रकर्षाने आठवण येते. किंवा व.पु. काळे ह्यांची अशीच एका छोट्या घरात राहणाऱ्या दोन भावांच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या होणाऱ्या मानसिक कुचंबणा दर्शवणाऱ्या कथेची आठवण होते. 'गुलाबी थंडीचे परिणाम होणारच' या वाक्यामधून निसर्ग आपले काम करत राहतो, माणसाच्या नैसर्गिक भावनासुद्धा थांबू शकत नाहीत, हे वैज्ञानिक सत्य अध्यात्माच्या पुढे जाऊन मान्य करण्याचा सल्ला कवीने दिलेला आहे. त्यातही पाणिनीच्या व्याकरणाची संकल्पना मला फार आवडली. आपल्याशी काहीही अर्थ नसलेल्या गोष्टीचा आपण किती विचार करतो, ह्याचे ते उदाहरण आहे. जसे वधू पाहण्यास गेलेले लोक तिला विणकाम येते का? गाणे येते का? नृत्याची आवड आहे का? असे प्रश्न विचारतात ... पुढे किती लोक तिला गाणे म्हणायला लावतात, तिचे नृत्य पाहतात.... अर्थात कालांतराने ते स्वतःच तिच्या इशाऱ्यावर नाचतात, तो भाग वेगळा, पण मी स्वतः माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या पत्नीला तुला गणिताची आवड आहे का? आणि तुला इतिहासातील कोणता महापुरुष आवडतो? असे प्रश्न का विचारले होते, हे मला स्वतःला अजूनही कळलेले नाही. कारण तिने गणित आवडते आणि इतिहासात ...... हे फार आवडतात असे सांगितले होते, मात्र २० वर्षांच्या संसारात तिने कधीही त्या इतिहास पुरुषाचा विषय काढला नाही आणि मीही त्याबद्दल तिला एकही शब्द विचारला नाही.
संसार हा भावनिक आणि शारीरिक पातळीवरील करार असतो, हे समजून घेतले की पाणिनीचे व्याकरण ह्यावर कोणी वधुपरीक्षेत तरी प्रश्न विचारणार नाही, असे वाटते.
कानटोपी घातलीत म्हणून फुलं काय बोलणार नाहीत?
तुमच्या रुद्राक्षांना भिऊन पाखरं काय झुलणार नाहीत?
फुलली तर फुलू दे की, झुलली तर झुलू दे की!
खिडकीतून फुकट सगळं बघता तर आलं?
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की/
मला सांगा, तुमचं काय गेलं?
या कडव्यामधून आपण सज्जनतेचा आव आणला, भावनांचा कल्लोळ अव्यक्त ठेवला याचा अर्थ बाकीचे लोक तसे वागतील असे नाही, ज्याप्रमाणे फुले आपले फुलण्याचे काम करतात, त्याचप्रमाणे लोक आपल्या भावना व्यक्त करण्याचे काम करणार. रुद्राक्ष घातले म्हणजे एखादेवेळी भीती नष्ट होईल, पण त्यामुळे आनंदाने झुलणारी पाखरे आपले झुलणे थांबवणार नाहीत, आपण या गोष्टीमुळे कासावीस न होता फुलणाऱ्या फुलाला फुलू द्यावे, झुलणाऱ्या पाखरांना झुलू द्यावे, कारण आपले निर्बंध त्यांच्यावर लागू होत नाहीत. थंडी वाजते, मग घाला स्वेटर, पाऊस आला की काढा छत्री इतके टिपिकल जगल्यापेक्षा एखादेवेळी पावसात चिंब भिजत चालावे, थंडीही अंगाला वाजली पाहिजे, तेव्हा कोठे आपण चौकटीतून बाहेर पडतो. या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा. व्यंगाने का होईना, पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे खिडकीतून फुकट सगळे बघता तर आले? याप्रमाणे मनोरंजनात्मक दृष्टीने या सर्वांकडे पाहून आनंद घेतला पाहिजे, असे कवी म्हणतात.
एक अतिशय काळाकुट्ट मित्र माझ्याकडे येतो, त्याचा तो डार्क काळा रंग त्यांच्या स्वच्छ आणि प्रामाणिक मनापुढे फिका आहे. तो सोबत असला म्हणजे त्याच्याकडे कोणी टक लावून पाहत असेल की तो स्वतःच म्हणतो, "किती टक लावून पाहता माझे हे सौंदर्य! तुमच्यासारख्यांची नजर लागू नये, म्हणून जन्मताच अंगावर काळा टिका लावून पाठवणार होते मला, पण देवाचा हाथ थरथरला आणि सगळ्या अंगभर काळी शाई पसरली..." मग हा मित्र समोरच्या खळखळून हसणाऱ्या मित्राचा जिवलग मित्र होऊन जातो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. खरे म्हणजे फक्त प्रेमच नव्हे, तर इतर अनेक गोष्टी असतात, ज्या आपल्या अख्यात्यारीत नसतात, आपण त्याबाबत काहीही करू शकत नाही. मात्र आपण त्या गोष्टीमुळे स्वतःला त्रास करून घेत असतो. आपल्या जीवनाचा आनंद उपभोगायचे सोडून निरर्थक बाबींवर चर्चा आणि काथ्याकूट करत जगण्यापेक्षा आनंदाने समोर येईल त्यावर आनंदाची उधळण करत जीवन जगले पाहिजे. प्रेम ही माणसाची स्वाभाविक वृत्ती आहे. त्यामुळे त्या बाबीकडे हसतखेळत बघून जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, असा मोलाचा सल्ला आनंदयात्री म्हणून ओळखले जाणारे चिरशब्दतारुण्य लाभलेले कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी 'तुमचं काय गेलं' या कवितेतून दिला आहे असे मला वाटते.
त्याने प्रेम केले किंवा तिने प्रेम केले,
करू दे की!
मला सांगा, तुमचं काय गेलं?
तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला?
नको तितका जवळ जाऊन अंगाशी खेटला?
लाल लाल गुलाबाचं फूल होऊन पेटला?
भेटला तर भेटू दे की, पेटला तर पेटू दे की!
तुमचं डोकं कशासाठी इतक गरम झाल?
त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करू दे की! मला सांगा तुमचं काय गेलं?
एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली?
पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली?
घरात तेव्हां कोणीच नव्हतं म्हणून त्यांच फावल?
त्याने तिला जवळ घेऊन चक्क दार लावलं?
लावलं तर लावू दे की, फावलं तर फावू दे की!
तुमच्या माझ्या पूर्वजांनी दुसरं काय केलं? त्याने प्रेम केले किंवा तिने प्रेम केले, करू दे की!
मला सांगा, तुमचं काय गेलं?
घरात जागा नसते त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण!
ते थोडेच बसणार आहेत पाणिनीच घोकीत व्याकरण?
गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच!
कुणीतरी कुणाला जवळ ओढून घेणारच!
घेतलं तर घेऊ दे की, व्हायचं ते होऊ दे की!
तुमच्या घरच बोचक त्यांनी उचलून थोडस नेलं?
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की!
मला सांगा तुमचं काय गेलं?
कानटोपी घातलीत म्हणून फुलं काय बोलणार नाहीत?
तुमच्या रुद्राक्षांना भिऊन पाखरं काय झुलणार नाहीत?
फुलली तर फुलू दे की, झुलली तर झुलू दे की!
खिडकीतून फुकट सगळं बघता तर आलं?
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की मला सांगा, तुमचं काय गेलं?
किरण शिवहर डोंगरदिवे,
वॉर्ड नं 5, समता नगर, मेहकर।
ता. मेहकर जि. बुलढाणा पिन 443301
मोबा क्र 7588565576
kiran shivhar Dongardive
प्रतिक्रिया
14 Nov 2021 - 10:34 pm | नूतन
छान
16 Nov 2021 - 7:12 pm | तुषार काळभोर
तुम्ही सुंदर रित्या उलगडून दाखवली आहे.
17 Nov 2021 - 8:31 am | गुल्लू दादा
खूप आवडलं. धन्यवाद.
17 Nov 2021 - 12:36 pm | ज्ञानोबाचे पैजार
फारच छान लिहिले आहे.
तुम्ही इथे दिवाळी टु दिवाळी न लिहिता नियमित लिहिलेत तरी आम्हाला वाचायला आवडेल.
पैजारबुवा,
18 Nov 2021 - 11:35 pm | चौथा कोनाडा
सुंदर रसग्रहण. छान आहे लेखनशैली. आणखी लेख वाचायला आवडतील.