.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
जोजो मोयेस यांनी लिहिलेली ऐतिहासिक घटनेवर आधारित कादंबरी The Giver of Stars याच वर्षी वाचली. अमेरिकेतील (संयुक्त अमेरिकी संस्थाने) केंटकी राज्यात १९३६ ते १९४३ या काळात घोड्यावरून ग्रंथालयातील पुस्तकांचे वितरण केले जात असे. असे वितरण करणाऱ्या महिलांची कथा कादंबरीत सांगितली आहे. तत्कालीन अमेरिकेत सुरु झालेल्या या अभिनव प्रकल्पाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
अमेरिकेतील केंटकी राज्याचा पूर्व भाग दऱ्याखोऱ्यांचा आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला साधारण समांतर असलेल्या ऍपलाचियन पर्वतांच्या पश्चिमेकडचा हा प्रदेश आहे. रस्ते, वीज यांचा अभाव, हिवाळी महिन्यातील हिमवर्षाव यामुळे हा प्रदेश थोडा मागे राहिला होता. १९३० साली झालेल्या जनगणनेत केंटकी राज्यात निरक्षरता १२% होती, मात्र पूर्व केंटकी मध्ये हाच दर १९-३१% असा होता. अशा परिस्थितीत इथे घोड्यावरून पुस्तके वितरित करण्याचे काम १९३६ ते १९४३ या काळात करण्यात आले. हा उपक्रम सत्यात येण्यासाठी अमेरिकेतील सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रयत्न आणि महामंदीची घटना कारणीभूत आहेत. तत्कालीन अमेरिकेत सुरु झालेल्या या अभिनव प्रकल्पाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
अमेरिकेतील सार्वजनिक ग्रंथालये
अमेरिकेतील सार्वजनिक ग्रंथालयांना दीर्घ इतिहास आहे. अमेरिकेतील पहिले सार्वजनिक ग्रंथालय १७९० मध्ये मॅसॅचुसेट्स येथे बेंजामिन फ्रँकलिन यांनी दान दिलेल्या पुस्तकांतून उभे राहिले. १८५४ मध्ये सुरु झालेल्या बॉस्टन ग्रंथालयात सोळा हजार पुस्तके उपलब्ध होती. अशा ग्रंथालयांची संख्या वाढत जाऊन १९२० पर्यंत अमेरिकेतील सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ३५०० पर्यंत गेली. अँड्र्यू कार्नेगी या प्रसिद्ध उद्योगपतींनी त्यापैकी साधारण १७०० ग्रंथालये जनतेकरता स्वतःच्या पैशातून उभारली. कार्नेगी ग्रंथालये या नावाने ती प्रसिद्ध आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून याच सार्वजनिक ग्रंथालयांनी आपापल्या शहरांचा विस्तार जसा होत जाईल तश्या आपल्या छोट्या छोट्या शाखा उघडण्यासही सुरुवात केली . त्याहूनही पुढे जाऊन या ग्रंथालयांनी फिरती सेवाही सुरु केली. मेरीलँड येथे विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात घोडागाडीतून पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आली. शहरात जिथे वाहनांचा वापर शक्य होता तिथे वाहनांचा वापर करून पुस्तकांचे वितरण शहराच्या कानाकोपऱ्यात करण्यात आले. दुर्दैवाने अशा प्रकारच्या विविध प्रयत्नांना अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीमुळे धक्का बसला.
महामंदी आणि न्यू डील
१९२९ सालापासून अमेरिकेला आर्थिक मंदीने ग्रासले. १९२९-१९३९ हे दशक अमेरिकेतील महामंदीचे दशक म्हणून ओळखले जाते. या काळात सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) १९२९ च्या तुलनेत ३० टक्क्यांनी घटले आणि सामान्यपणे १० टक्क्यांच्या आसपास असलेली बेरोजगारी २० टक्क्यांच्या पुढे निघून गेली. घटलेले औद्योगिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणात बेरोजगारी यातून कसे बाहेर पडत येईल याबाबत तेव्हा काही मतप्रवाह अस्तित्वात होते. शासनाने फार हस्तक्षेप न करता मागणी पुरवठ्याच्या संबंधातून अर्थव्यवस्था पुन्हा गती घेईल आणि बेरोजगारी कमी होईल असा एक मतप्रवाह होता. ब्रिटन मधील अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांनी वेगळे मत व्यक्त केले. शासनाने मंदी आणि बेरोजगारीच्या काळात पुढाकार घेऊन रोजगार उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून जनतेच्या हातात पैसे येतील आणि त्यातून आर्थिक चक्राला गती येईल. अमेरिकेच्या तत्कालीन शासनाने केन्स यांच्या मताशी सुसंगत मार्ग निवडला. या मंदीतून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन डी. रूजवेल्ट यांनी १९३३ पासून विविध योजनांचा आणि आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरु केला. तो न्यू डील या नावाने ओळखला जातो. या कार्यक्रमांतर्गंत विविध सरकारी संस्था उभ्या राहिल्या. त्यांच्या मार्फत रस्ते, पूल, धरणे इ मूलभूत सुविधांची कामे सुरु करून लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्या हातात पैसे यावा हाच सर्व कार्यक्रमांचा उद्देश होता. महाराष्ट्रात १९७७ पासून सुरु असलेली रोजगार हमी योजना आपल्या ओळखीची आहे. आपल्याकडे उत्पादनक्षम आणि रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना काम देऊन त्यांच्याकडून सार्वजनिक उपयोगाची कामे करून घेण्यात आली. अशाच प्रकारची रोजगार उपलबध करून देणारी पण संपूर्ण देशभर चालू झालेली आणि रोहयोपेक्षा व्यापक योजना म्हणजे न्यू डील.
न्यू डील बाबत एक विशेष गोष्ट अशी की आपल्याला सर्वत्र दिसणाऱ्या रस्ते, पूल इ भौतिक सुविधांच्या पलीकडे जाऊन एकूणच मनुष्यबळाची प्रगती होईल अशाही काही योजना त्यात समाविष्ट होत्या. वर्क्स प्रोग्रेस ऍडमिनिस्ट्रेशन (WPA) या संस्थेने चित्रकार, लेखक, रंगमंचावरील कलावंत यांनाही रोजगार मिळेल अशी कामे सुरु केली. उदाहरणार्थ, आपल्याकडे जिल्ह्याची माहिती देणारे गॅझेट असते त्याप्रमाणे तिकडे प्रत्येक राज्याची माहिती देणारे ग्रंथ निर्माण करण्याचे काम WPA च्या सहाय्याने करण्यात आले.
ग्रंथालयांना सहाय्य
न्यू डील अंतर्गत सहाय्य मिळालेला महत्वाचा घटक म्हणजे ग्रंथालये आणि त्यांचे वाचक. सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या अमेरिकेत खूप असली तरी प्रादेशिक असमानता होतीच. केंटकी राज्यात ६३% लोक अजूनही ग्रंथालयांच्या सेवेविना होते. आर्थिक मंदीमुळे ग्रंथालयांच्या आणखी लोकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली. तर या ग्रंथालयांना संजीवनी देण्याकरता अर्थसहाय्य न्यू डील कार्यक्रमातून मिळाले. बांधकामासारख्या क्षेत्रात महिलांना कमी संधी मिळेल हे जाणून महिलांसाठी खास तरतूद न्यू डील मध्ये करण्यात आली होती आणि महिलांकरिता काढली जाणारी कामे ही समाजोपयोगी असावीत हे उद्दिष्ट हे एकूणच न्यू डीलच्या ध्येयाशी सुसंगत होते. त्यामुळे ग्रंथालये आणि वाचक अशा दोधांनाही लाभदायक आणि अनेक महिलांना रोजगार मिळतील अशा कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. या काळात काही ठिकाणी केलेल्या कामांची उदाहरणे प्रशंसनीय आहेत. सनफ्लॉवर कौंटी मिसिसिपी येथे १९३४ मध्ये एकही सार्वजनिक ग्रंथालय नव्हते. न्यू डील मध्ये रोजगार मिळालेल्या लोकांनी एक वर्षात ३००० पुस्तके गोळा केली, १८ वाचनकक्ष, ८५ पुस्तक वितरण केंद्र स्थापित केली. मिसिसिपी राज्यातच नदीकाठी राहणाऱ्या वस्त्यांवर पुस्तके होडीतूनही वितरित केली. ओहायो राज्यात एके ठिकाणी किराणा दुकानात पुस्तके ठेवली जात आणि दर आठवड्याला ग्रंथालयातून एक महिला कर्मचारी नवी पुस्तके आणण्याचे काम करत असे. जुन्या पुस्तकांची डागडुजी करण्याचे कामही हाती घेण्यात आले. त्यामुळे पैशांची बचत होऊन अधिक पुस्तके उपलब्ध झाली आणि अकुशल हातांनाही काम मिळाले. न्यू डील मधून येणारे पैसे दरवेळी स्वयंपूर्ण ग्रंथालय सुरु करण्यास पुरेसे नव्हते. अशावेळी स्थानिक जनतेचा सहभाग महत्वाचा ठरला. जिथे खास इमारत उपलब्ध नाही तिथे तात्पुरते तंबू, किराणा दुकाने, शाळा, न्यायालये, चर्च येथील उपलब्ध जागेचा वापर पुस्तके साठवण्यासाठी करण्यात आला. जिथे अतिरिक्त पुस्तके उपलब्ध असतील अशा ठिकाणी पुस्तके दान करण्याचे आवाहन करण्यात आले आणि त्यास भरगोस प्रतिसादही मिळाला. स्थानिक शिक्षण विभागांनी अशा ठिकाणांचे भाडे, प्रकाश आणि उष्णता (काही ठिकाणी हिवाळ्यात बंदिस्त इमारतीतही कृत्रिम उष्णतेची गरज असते), घोड्यावरून पुस्तके वाटत असतील तर अशा घोड्यांचे भाडे देण्याचे काम केले. १९३५ सालात संपूर्ण अमेरिकेत १२,००० महिलांना रोजगार हा केवळ वाचनालयाशी संबंधित कामातून उपलब्ध झाला. आणि मुख्य म्हणजे वाचनालयांची सेवा सर्व वाचकांना विनाशुल्क उपलब्ध करण्यात आली होती.
WPA च्या मदतीने आणि केंटकीमधील भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत असा घोड्यावरून पुस्तके वितरित करण्याचा कार्यक्रम १९३६ साली सुरु झाला. प्रत्येक ग्रंथालयात एक ग्रंथपाल आणि पुस्तक वितरणाकरता ५-६ कर्मचारी अशी रचना होती. १९३७ पर्यंत अशी ३० वाचनालये उभी राहिली. त्यांनी एकूण २६,००० कुटुंबांना महिन्याला ६०,००० पुस्तके वितरीत करण्याचे काम केले. वितरण सर्व प्रकारच्या हवामानात वर्षभर चालू राहिले. घोडेस्वारांना काही ठिकाणी पायी जाऊनही पुस्तके द्यावी लागत. केंटकी येथील वाचकांनी केवळ कथा कादंबऱ्या या मध्ये सीमित न राहता त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित जसे की आरोग्य, स्वयंपाक, शेती, बालसंगोपन, अन्नाचे जतन अश्या व्यावहारिक विषयांवरील साहित्य वाचण्याचा उत्साह दाखवला. नॅशनल जिओग्राफिक या मासिकाचीही मागणी खूप होती. लहान मुलांसाठीच्या पुस्तकांची मागणीही खूप होती. लिहिता वाचता येणारी लहान मुले घरात मोठ्याने अशी पुस्तके वाचून दाखवत. पुस्तक वितरकांनी अशिक्षित प्रौढ नागरिकांना आणि शाळेत जाऊ न शकणाऱ्या लहान मुलांना पुस्तके वाचून दाखवण्याचेही काम केले. काही लोकांनी छपाई केलेले बायबलही पहिल्यांदाच बघितले आणि वितरकांना त्यातील काहीतरी मजकूर वाचून दाखवण्याची विनंती केली. पुस्तकांची मागणी केंटकी मध्ये एवढी वाढली कि जुनी फाटलेली पुस्तके, मासिके यातील सुस्थितीत असलेली पाने काढून त्यांचेच एक निराळे पुस्तक शिवून तयार करण्याची वेळ आली. वाचता वाचता खूण म्हणून पाने दुमडून ठेवण्याची सवय तेव्हाही अस्तित्वात होती. त्यावर उपाय म्हणून जुन्या कार्डांपासून तयार केलेले बुकमार्कही वाचकांना वाटण्यात आले.
१९२९ नंतर साधारण दशकभराच्या कालावधीनंतर अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेऊ लागली आणि दुसर्या महायुद्धामुळे अर्थव्यवस्थेचे रूप बदलले. त्यामुळे WPA आणि एकूणच न्यू डील यांचे कार्य, जे की रोजगार निर्माण करून अर्थव्यवस्थेला गती देणे हे होते, संपुष्टात आले. ग्रंथालयांचे अर्थसहाय्य १९४३ साली बंद झाले. त्यामुळे घोड्यावरून पुस्तके वितरित करणारा केंटकी मधील कार्यक्रमही संपुष्टात आला. मात्र त्यानंतर साधारण दशकभराच्या कालावधीनंतर या ग्रंथालयांच्या चळवळीला नवसंजीवनी प्राप्त झाली ती कार्ल पार्किन्स यांच्या मुळे. कार्ल पर्किन्स या प्रतिनिधींच्या पुढाकाराने केंटकी राज्याने पुन्हा एकदा फिरती ग्रंथालये सुरु केली. तत्पूर्वी पर्किन्स हे केंटकी राज्यात एका छोट्या शाळेत शिक्षक होते आणि पूर्वी सुरु असलेल्या फिरत्या ग्रंथालयांचा लाभ त्यांच्या शाळेला झाला होता. त्याचे स्मरण ठेवत त्यांनी तो उपक्रम पुन्हा सुरु करण्यास सहाय्य केले. १९५६ साली त्यांनी आणलेला कायदा मंजूर झाला आणि ग्रंथालयांना अमेरिकेच्या केंद्रीय शासनाचे अर्थसहाय्य्य पुन्हा एकदा सुरु झाले.
विविध भौगोलिक परिस्थितीत पुस्तके वितरित करण्याचे काम करण्याचे काम करणाऱ्या महिलांची चिकाटी आणि वाचकांचे पुस्तकांप्रती प्रेम काही तत्कालीन नोंदींमध्ये दिसून येते. WPA ग्रंथालयात काम करणाऱ्या एका कर्मचारी महिलेने तिच्या वरिष्ठांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की अचानक येणाऱ्या पावसाने माझी तारांबळ उडते, एका हातात पुस्तकांची जड पिशवी आणि एका हाताने कपडे सावरत गुडघाभर पाण्यातून जावे लागते. एका वाचक महिलेने दिलेल्या अभिप्रायात म्हटले आहे की दिवसभर काम करून आम्ही रात्री बराच वेळ वाचतो आणि ग्रंथालये म्हणजे आमच्या आत्म्याची संजीवनी आहेत. एकूणच या कार्यक्रमातून लोकांना मदत करताना प्रशासनाने दाखवलेली कल्पकता, सहाय्य घेणाऱ्या लोकांनी दाखवलेला उत्साह, आणि त्यांना लाभलेले जनतेचे सहकार्य या तीन प्रशंसनीय गोष्टी समोर येतात.
आपण काय करू शकतो
भारतात इंग्रजी अंमल स्थापन झाल्यावर लगेचच आधुनिक ग्रंथालयांच्या स्थापनेस सुरुवात झाली. मुंबई (१८१८), पुणे (१८२३), रत्नागिरी (१८२८) इ. येथे ग्रंथालये आधी युरोपीय लोकांना वापरकरता स्थापन झाली आणि पुढे जाऊन सर्वांना खुली झाली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या संस्थानात ग्रंथालयांच्या प्रसारासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच होडीतून आणि बैलगाडीतून पुस्तके वितरित करण्याचे काम भारतातही झालेले आहे. तरीही सध्या भारतातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या संख्येबद्दल आणि त्यांच्या स्थितीबद्दल एकवाक्यता नाही.
अमेरिकेतील त्या काळात झालेला हा प्रयोग प्रशंसनीय आहे. त्यामुळे आपणही आपल्याकडे त्यात कालानुरूप आणि परिस्थितीनुरूप बदल करून काय करू शकतो याबद्दल विचार केला पाहिजे. भारतातील शहरांचा विस्तार एवढा झाला आहे की वाहतूक करून सर्वत्र पुस्तके वितरित करणे अवघड आहे. डिजिटल माध्यम आत्मसात करण्यावाचून अन्य मार्ग दिसत नाही. ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी आता पूर्ण डिजिटल स्वरूपात देशाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेनेही याबाबतीत आदर्श घालून दिलेला आहे. संस्थेच्या संग्रहात असलेली साधारण ८२०० पुस्तके जगाच्या कानाकोपऱ्यात कुणालाही वाचनासाठी सशुल्क उपलब्ध आहेत. ज्यांना डिजिटल माध्यमे उपलब्ध नाहीत अशा आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही चालती - फिरती ग्रंथालये वापरावी लागतील. लहान वयाच्या वाचकांनाही कदाचित सुरुवातीला छापील पुस्तकांचा वापर करून वाचनाची सवय लावावी लागेल. त्यांच्यासाठीही चालते-फिरते ग्रंथालय गरजेचे ठरेल. दिल्ली पब्लिक लायब्ररीचे उदाहरण इथे देता येईल. दिल्ली पब्लिक लायब्ररीच्या अशाच उपक्रमांतर्गत ४ गाड्या दिल्लीत ७० ठिकाणांना भेट देतात आणि ४२०० सभासदांना पुस्तके पुरवतात. २००९ मध्ये नॅशनल बुक ट्रस्टने केलेल्या सर्वेक्षणानुसार देशात ३३.३ कोटी साक्षर युवक आहेत (१३-३५ वयोगट). त्यातील केवळ २५% युवक हे वाचक असल्याचे म्हटले आहे. शहर आणि ग्रामीण भागातल्या टक्केवारीत फारसा फरक नाही (शहर ३१% आणि ग्रामीण २१%). साक्षर युवकांची संख्या आता वाढली असणार आणि त्यातील वाचकांचीही संख्या वाढलेली असणार. त्यामुळे त्यांच्या पर्यंत पुस्तके पोहोचवणे ही गरज आणि एक संधीही आहे.
संदर्भ:
[1] A History of US Public Libraries, Online Exhibition, Digital Public Library of America
[2] Boyd, Donald C. “The Book Women of Kentucky: The WPA Pack Horse Library Project, 1936-1943.” Libraries & the Cultural Record, vol. 42, no. 2, 2007, pp. 111–128
[3] Schmitzer, Jeanne Cannella. “Reaching Out to the Mountains: The Pack Horse Library of Eastern Kentucky.” The Register of the Kentucky Historical Society, vol. 95, no. 1, 1997, pp. 57–77.
[4] Boyd, Donald C. “The WPA Packhorse Library Program and The Social Utility of Literacy, 1883-1962” PhD Thesis, University of Florida, 2009.
[5] Swain, Martha H. “A New Deal in Libraries: Federal Relief Work and Library Service, 1933-1943.” Libraries & Culture, vol. 30, no. 3, 1995, pp. 265–283.
[5] Pells, Richard H. and Romer, Christina D.. "Great Depression". Encyclopedia Britannica, 30 Nov. 2020, https://www.britannica.com/event/Great-Depression. Accessed 29 May 2021.
[6] Britannica, The Editors of Encyclopaedia. "New Deal". Encyclopedia Britannica, 11 Jan. 2021, https://www.britannica.com/event/New-Deal. Accessed 29 May 2021.
[7] https://vishwakosh.marathi.gov.in/22593/ ग्रंथालय
[8] https://vishwakosh.marathi.gov.in/41000/ महाराष्ट्र राज्य (ग्रंथालय)
[9] He kept library movement afloat www.thehindu.com/features/metroplus/when-books-travelled-in-bullock-cart...
[10] When books travelled in bullock carts https://www.thehindu.com/features/metroplus/when-books-travelled-in-bull...
[11] https://dpl.gov.in/index.php/mobile-library-services
[12] National youth readership survey 2009 www.researchgate.net/publication/330081377_IndianYouth-Demographics_and_...
-केदार भिडे
प्रतिक्रिया
19 Sep 2021 - 10:01 am | कंजूस
मला वाटलं पुस्तकं कुणाला दिली की परत येत नाहीत यावर लेख आहे.
20 Sep 2021 - 5:24 pm | केदार भिडे
पुस्तके प्रवास करून लोकांपर्यंत जाऊ लागली म्हणून असे शीर्षक दिलेले आहे.
19 Sep 2021 - 1:19 pm | चौथा कोनाडा
अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेख ! अशी माहिती प्रथमच वाचण्यात आली !
🦋
घोड्यावरून कधी काळी पुस्तकांचे वितरण केले जात असेल असा कधी विचारच मनात आला नाही !
न्यू डील बाबत एक विशेष गोष्ट अशी की आपल्याला सर्वत्र दिसणाऱ्या रस्ते, पूल इ भौतिक सुविधांच्या पलीकडे जाऊन एकूणच मनुष्यबळाची प्रगती होईल अशाही काही योजना त्यात समाविष्ट होत्या. वर्क्स प्रोग्रेस ऍडमिनिस्ट्रेशन (WPA) या संस्थेने चित्रकार, लेखक, रंगमंचावरील कलावंत यांनाही रोजगार मिळेल अशी कामे सुरु केली. उदाहरणार्थ, आपल्याकडे जिल्ह्याची माहिती देणारे गॅझेट असते त्याप्रमाणे तिकडे प्रत्येक राज्याची माहिती देणारे ग्रंथ निर्माण करण्याचे काम WPA च्या सहाय्याने करण्यात आले.
असे कधी भारतात व्यापक प्रमाणावर झाल्याचे आठवत नाही. कोविडपश्चात अशी एखादी योजना राबल्यास कलावंतांना मोठा आधार मिळेल.
कोविड काळात त्या बिचाऱ्याची किती पडझड झाली असेल याची माहिती फारच कमी जणांना असेल !
वाचन आणि ग्रंथालय चळवळीला न्यू डील ने सशक्त केले ही बाब खुपच एक्सआयटींग आहे !
हा लेख वाचून पुस्तकाबद्दल, ग्रंथालय बद्दल आशा पल्लवित झाल्या !
19 Sep 2021 - 1:19 pm | टर्मीनेटर
माहितीपुर्ण लेख आवडला 👍
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
20 Sep 2021 - 5:25 pm | केदार भिडे
धन्यवाद
19 Sep 2021 - 7:10 pm | अनिंद्य
वेगळा विषय आणि सविस्तर आढावा. आवडला लेख. शीर्षक थोडे वेगळे असायला हवे होते असे वाटले.
'आपण काय करू शकतो' हे परिशिष्ट लेखात समाविष्ट केल्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन !
20 Sep 2021 - 5:23 pm | केदार भिडे
पुढच्या वेळी शीर्षकाबद्दल अधिक विचार करेन.
शेवटचा भाग हा मला एका मित्राने सुचवला, ज्याला मी आधी लेख वाचायला दिला होता.
20 Sep 2021 - 6:58 am | सुधीर कांदळकर
जिव्हाळ्याचा विषय. घोड्यावरून तसेच होडीतून पुस्तके - आवडले.
मुंबईत ५० - ६० च्या दशकात अनेक लोक आपली फिरती छोटेखानी ग्रन्थालये चालवीत. दादरला एक भागवत नावाचे गृह स्थ होते. धुवट पांढरा लेंगा. वर फिक्या रंगाचा ३ बटनांचा धुवट शर्ट. सायकलला एक कापडी पिशवी. पिशवीत मासिके. ४ - ४ मजले पण चढून जात त्यांच्या वर्गणीदारांना गल्लीगल्लीत घरपोच मासिके पोचवीत. मासिक वर्गणी अडीच रुपयापासून सुरु झाली होती. मुख्य म्हणजे सायकलला टाळे न लावता बिनधास्त जात. पण कधी त्यांच्या सायकलीला काही झाले नाही.
पिंपरी चिंचवडमध्ये टेंपोमधून फिरणारे फिरते ग्रंथालय आहे. आठवड्यातून एकदा एका ठिकाणी चार तास उभे राहते. दिवसाला दोन वेगळी ठिकाणे घेते. दर आठवड्याला सहा दिवस याप्रमाणे बारा ठिकाणे घेते.
आता डिजिटल माध्यमामुळे प्रकाशकांचा, मुद्रकांचा शालेय शिक्षणाच्या पुस्तकांना देखील विरोध आहे. पण बदलत्या काळाला सामोरे जावेच लागणार.
छान जिव्हाळ्याच्या विषयावरील लेखाबद्दल धन्यवाद.
20 Sep 2021 - 5:22 pm | केदार भिडे
मुंबईतील ही माहिती पूर्णपणे नवीन आहे माझ्यासाठी .
पिंपरी चिंचवड या प्रमाणे अन्य ठिकाणीही छोट्या प्रमाणत उपक्रम सुरु आहेतच. वृत्तपत्रात वेळोवेळी बातम्या येत असतात.
20 Sep 2021 - 7:47 pm | ज्ञानोबाचे पैजार
आपण काय करु शकतो हा भाग तर "मननिय" झाला आहे. ते चेरी ऑन द केक म्हणतात ना तसा
लेखनशैली सुध्दा छान आहे, लिहित रहा
पैजारबुवा,
22 Sep 2021 - 12:52 pm | अथांग आकाश
माहितीपुर्ण लेख! छान लेखनशैली!!
23 Sep 2021 - 7:57 pm | तुषार काळभोर
अमेरिकेत प्रत्येक गावात आणि शहरात ग्रंथालये असण्याचं मूळ कदाचित या उपक्रमात असेल.
23 Sep 2021 - 10:41 pm | केदार भिडे
तसे असेल तर उत्तम.
मला अमेरिकेतील ग्रंथालयांची अधिकृत आकडेवारी मिळाली होती (२०१७ मध्ये ९०४५ सार्वजनिक ग्रंथालये https://nces.ed.gov/fastfacts/display.asp?id=42) पण भारतातील तशी आकडेवारी काही मला मिळाली नाही त्यामुळे शेवटच्या भागात दोघांची आजच्या काळात तुलना करता आली नाही.
न्यू डील येण्याआधीही ग्रंथालयांचा चांगला होत होताच तिकडे.