श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (३)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in लेखमाला
14 Sep 2021 - 10:52 am

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}

श्रीगणेश लेखमाला २०२१

सिध्दार्थला जाग आली त्यावेळी त्याच्या घडाळ्याचा अलार्म वाजत होता आणि खोलीमध्ये सूर्यप्रकाश शिरला होता.

सिद्धार्थ उठून बसला आणि त्याने सवयीने मोबाईल हातात घेतला आणि त्याला धक्का बसला. त्याला कृष्णाने आदल्या रात्री १२ वेळा फोन केला होता. मोबाईलच्या स्क्रीनकडे बघताना एकदम त्याला कालची रात्र आठवली आणि तो ताठ बसला. त्याची नजर शेजारी असलेल्या त्या पेटीवर गेली. ती पेटी उघडली गेली होती हे खरं होतं. त्याने एकीकडे कृष्णाला फोन लावला आणि दुसरा हात पेटीच्या दिशेने नेला.

त्या दोन क्षणात देखील त्याच्या मनात एक विचार शलाके सारखा येऊन गेला. 'मी हात लावायच्या अगोदरच ही पेटी नाहीशी तर नाही होणार न?' पण तसं काहीच झालं नाही. सिध्दार्थने उघडी पेटी हातात घेतली आणि त्याचवेळी कृष्णाने फोन उचलला.

"कमाल करतोस सिद्धार्थ! किती फोन करायचे? तू फोन उचलत नव्हतास म्हणून मी घरी आईंना फोन केला तर त्या म्हणाल्या मी गेल्यानंतर तू जो खोलीत गेला आहेस तो बाहेर नाही आलास. गोपाळने जाउन एक दोन वेळा दार वाजवलं देखील. पण तू उत्तर देखील दिलं नाहीस."

"ओह, अग झोप लागली होती मला काल लवकर." सिध्दार्थ म्हणाला.

काही क्षण शांतता होती फोनवर; आणि मग कृष्णा शांत आवाजात म्हणाली; "सिद्धार्थ, there is something wrong for sure. If you do not wish to tell me; that's fine. But don't lie. That's not you."

सिद्धार्थ मंदस हसला आणि म्हणाला; "कृष्णा, आपण भेटूया. माझ्या किंवा तुझ्या घरी नको. सात वाजलेत ना? आठला तुला pick up करतो तुझ्या घराकडे. आज काही महत्वाचं काम आहे का first half मध्ये?"

कृष्णाने हलकेच श्वास सोडल्याचं जाणवलं सिध्दार्थला. "अहं, तसं काही फार महत्वाचं नाहीय. का रे?"

"Let's go for breakfast.... Lonavla!" सिद्धार्थ.

"Oh! Thats so sweet. Done! मी आठला तयार असेन." कृष्णा म्हणाली.

अर्ध्या तासात तयार होऊन खोलीतून बाहेर आला. समोर डायनींग टेबलावर आई-बाबा नेहेमीप्रमाणे ब्रेकफास्ट करायला बसले होते.

"काय? आज सकाळीचं स्वारी कुठे निघाली?"

त्याला बाहेर पडायच्या तयारीत बघून आईने विचारले. "अग, कृष्णा म्हणत होती ब्रेकफास्टला भेटूया का? दोघे जातो आहोत." सिद्धार्थ हसत म्हणाला.

वडिलांनी पेपरमधून मान वर करत म्हंटलं; "Thats good. Give our regards to Krushna. Enjoy. पण सिद्धार्थ, कालच्या मीटिंगचा रिपोर्ट मला तुझ्याकडून देखील हवा आहे; आणि आजच मिळाला तर बरं."

"Dont worry baba. Second half of the day I am going to be in office. Will meet you in your cabin then."

"OK. Bye." असं म्हणून बाबांनी परत पेपरमध्ये लक्ष घातलं. सिद्धार्थ दाराच्या दिशेने जायला लागला तशी वैदेही उठली आणि दाराकडे आली.

"सिद्धार्थ, भांडण नक्की नाही झालेलं तुमच्यात. पण तरीही.... काल कृष्णाने रात्री उशिरा मला फोन केला होता. तू फोन उचलत नव्हतास म्हणून. मी गोपाळला तुझ्या खोलीत डोकावायला सांगितलं तर तो म्हणाला की तू खोली लॉक करून बसला आहेस. म्हणून मी आले होते हाक मारायला. तू खोलीतून काहीही उत्तर दिलं नाहीस.... झोपला असशील असं वाटून मी मागे फिरले... पण आतून तू कोणाशीतरी बोलत असल्याचा आवाज आला मला. मी मागे वळले पण मग दार नाही वाजवलं परत..... सिद्धार्थ..... तुझ्या खोलीमधून एक मंद सुगंध येत होता आणि हलकासा हिरवा प्रकाश दाराच्या फटीतून...." वैदेही बोलायची थांबली; पण सिध्दार्थने काहीतरी बोलावं या अपेक्षेने. मात्र त्याक्षणी तरी सिध्दार्थला काहीच सांगायची इच्छा नव्हती. त्याने एकदा आईकडे बघितलं आणि हसत म्हणाला; "come on mom. तुला काहीतरी भास झाला असेल. एक तर तुझी झकास perfums... तोच सुगंध तुला जाणवला असेल आणि...."

सिध्दार्थला थांबवत वैदेही म्हणाली; "निघ तू बेटा. आपण नंतर निवांत बोलू."

सिध्दार्थने दार उघडलं; वैदेहीने त्याचा खांदा धरून त्याला स्वतःकडे वळवलं आणि त्याच्या हातात काहीतरी ठेवलं. सिद्धार्थने हातात काय आहे म्हणून बघितलं तर त्याच्या हातात एक हेअरपिन होती.... अंगभूत हिरव्या रंगाने ती चमकत होती. सिध्दार्थने चमकून आईकडे बघितलं. वैदेही मंद हसत होती आणि तिने 'bye' म्हणायला हात वर केला तर तिच्या डाव्या हाताची बोटं देखील असाच काहीसा हिरवा प्रकाश फेकत होती.

सिध्दार्थचे डोळे एकदम मोठे झाले. तो काहीतरी म्हणणार होता; पण तिने ओठांवर बोट ठेवत मंद स्मित केलं आणि हळूच म्हणाली; "निघ बेटा; कृष्णा वाट बघत असेल."

सिध्दार्थची मनस्थिती क्षणभरासाठी द्विधा झाली खरी. पण त्याला खात्री होती त्याची आई त्याला सगळं सांगेल. त्याने एकदा वळून वडिलांकडे बघितलं.

"तुझ्या बाबांना काहीही माहीत नाहीय. मला देखील! सिद्धार्थ.... काल रात्री कृष्णाने मला तुमच्या कालच्या अनुभवाबद्दल सांगितलं. मला माहीत आहे; तू पूर्ण विचार करूनच करशील जे काही करशील ते. पण तरीही... काळजी वाटते. सांभाळून राहा हं बेटा." इतकं म्हणून वैदेहीने परत एकदा त्याला अच्छा केलं आणि आईला जवळ घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवून सिद्धार्थ पटकन घराबाहेर पडला.

सिद्धार्थ गाडी चालवत होता आणि कृष्णा शेजारी शांतपणे बसली होती. सिध्दार्थने काहीतरी बोलावं म्हणून ती वाट बघत होती; आणि नक्की कुठून सुरवात करावी आणि काय सांगावं हिला याचा विचार सिद्धार्थ करत होता.

"....... तर तू खोलीत जाऊन दार लावून घेतलंस आणि..... ??? घे! सुरवात करून दिली मी. कसं सांगू हा प्रश्न सोडवला! आता बोल...." हलकंस हसत कृष्णा म्हणाली आणि गाडी चालवताना एकदा तिच्याकडे कटाक्ष टाकून सिद्धार्थ देखील हसला.

"खरंय ग! काय नक्की सांगू असा प्रश्न पडला होता.... तर मी पलंगावर बसलो ती पेटी घेऊन आणि विचार करता करता मला झोप लागली...."

एकदा सांगायला सुरवात केली आणि मग मात्र सिद्धार्थ थांबला नाही.... सिद्धार्थ बोलायचा थांबला त्यावेळी कृष्णा देखील विचारात गढून गेली होती. सिध्दार्थने तिला भानावर आणलं आणि दोघे गाडीतून उतरून मचाण रेस्टॉरंटमधल्या सिध्दार्थच्या आवडत्या टेबलाच्या दिशेने निघाले. सिध्दार्थने लोणावळा म्हंटल्याक्षणी कृष्णाने फोन करून त्यांचं टेबल बुक केलं होतं. सिध्दार्थला मनातललं काही बोलायचं असलं की तो कृष्णाला घेऊन तिथेच यायचा. त्याने तिला प्रपोज देखील तिथेच केलं होतं. सिद्धार्थ-कृष्णाला स्टाफ देखील चांगलं ओळखत होता. दोघे टेबलावर बसले आणि दोघांच्या आवडीचा मेन्यू टेबलावर मांडला गेला. सिध्दार्थने कृष्णाकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला आणि तिने एक लाजरं smile दिलं त्याला.

दोघे काही क्षण तसेच बसले होते. कृष्णाने सिध्दार्थला तंद्रीतून जागं केलं आणि म्हणाली; "तू कालपासून काहीही खाल्लेलं नाहीस. अगोदर खाऊन घे; मग गप्पा मारुच."

सिध्दार्थने हसून खायला सुरवात केली.... समोर गरम फिल्टर कॉफी आली आणि सिद्धार्थ म्हणाला;

"कृष्णा मला आज जाग आल्यापासून फक्त आणि फक्त एकच प्रश्न सतत सतावतो आहे...."

"खरंय! Why you? तुझी निवड का?" हसत कृष्णा म्हणाली. आणि सिद्धार्थ देखील हसला.

"Exactly!!! You nailed it." सिद्धार्थ म्हणाला.

"कदाचित सिद्धार्थ...." कृष्णा त्याच्याकडे थेट बघत म्हणाली; आजच्या पिढीप्रमाणे तू आपल्या पुराण कथांना थेट टाकाऊ म्हणत नाहीस म्हणून. किंवा; किमान सत्यासत्यता पटेपर्यंत खोटं ठरवत नाहीस म्हणून"

"कृष्णा... पण माझ्यासारखा विचार करणारे अनेक असतीलच की. तुझंच उदाहरण घे. तू तर अशाच विषयाचा अभ्यास करते आहेस."

"Exactly! सिद्धार्थ.... अरे आपल्या पिढीत एकतर या विषयाचा अभ्यास करणारे आणि शास्त्रीय रित्या त्याची कारणमीमांसा करणारे आहेत; किंवा सरळ या कथांना टाकाऊ म्हणणारे आहेत. तू थोडा वेगळा आहेस. तू अगदीच शास्त्रीय दृष्टिकोनातून सतत नाही बघत आपल्या पुराण कथांकडे.... आणि चेष्टा देखील नाही करत. विश्वास आहे तुझा... आणि तरीही खात्री करून घ्यायची इच्छा देखील आहे. कदाचित म्हणून तू.... सिद्धार्थ आठवतं जेव्हा आपली नुकतीच ओळख झाली होती आणि आपण अनेकदा या पुराण कथा आणि पुराण काळ याबद्दल बोलायचो... त्यावेळी तू मला तुझं असं एक लॉजिक सांगितलं होतंस."

"हो आठवतंय! ते लॉजिक नाही कृष्णा... माझं ठाम मत आहे. हे बघ.... आपल्याला माहीत आहे की शिवाजी महाराज खरे आहेत. ती काही कुठली कथा किंवा बनवून सांगितलेली गोष्ट नाही. शिवाजी महाराज पन्नास वर्ष जगले. त्यांनी लहान मोठ्या लढाया साधारण वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केल्या... म्हणजे त्याचं स्वराज्यासाठी ऍक्टिव्ह participation किमान 30 वर्षं तर नक्की होतं. पण त्यांच्या आयुष्यातल्या फार तर सात ते आठ महत्वाच्या घटना सोडल्या तर आपण कधीही जास्त खोलात जातो का ग? शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले सर केले... इतकं एकच वाक्य त्यांच्या पराक्रमाबद्दल? तुला आठवत असेल; आपण इतके ट्रेक केले आहेत पुण्याच्या आजूबाजूच्या किल्ल्यांचे. केवळ रसद ठेवायला दोन किल्ले होते.... पण काही घटनांमध्ये बांधून टाकलं आपण त्यांच्या पराक्रमाला. दुसरा त्याहूनही जास्त महत्वाचा मुद्दा; जो माझ्या मानत सतत फिरत असतो... कृष्णा; एक वदंता अशी निर्माण झाली आहे की शिवाजी महाराजांना स्वतः भवानी मातेने येऊन तलवार दिली. अग, हे सांगणाऱ्या व्यक्तीला देखील माहीत असेल की असं काही नसतं. पण शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या अपार भक्तीपाई आणि प्रेमापोटी ही वंद्यता निर्माण केली गेली आहे न? मग आपण हेच लॉजिक आपल्या पुराण कथांना का नाही लावायचं ग? कृष्ण निळा होता..... अग निळा रंग असतो का कोणाचाही? तो काळा होता..... व्यवस्थित काळ्या रंगाचा होता कृष्ण! पण त्याच्या बद्दलच्या प्रेमापोटी त्याला निळा केला... त्यात देखील त्याकाळात कदाचित त्याला आकाशाच्या रंगाचा; म्हणजे अजून उजाडलेलं नसतं किंवा संध्याकाळ संपून रात्र होत असते त्यावेळचं आकाश... असं उल्लेखलं गेलं असेल... पण आपण मात्र त्याला निळ करून टाकलं.

अशीच लॉजिक्स इतर कथांना लावू शकतो न ग?" सिद्धार्थ अत्यंत भावनिक होऊन बोलत होता; आणि या संपूर्ण विषयाबद्दलची त्याची भावना माहीत असल्याने कृष्णा शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेत होती.

"सिद्धार्थ; हेच तुझे मुद्दे आणि मतं ऐकून माझ्या मानत महाभारतीय युद्धाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि म्हणून मी तो विषय घेतला आहे अभ्यासासाठी; आणि हेच माझं म्हणणं आहे. कदाचित तुझे हे विचार आणि मतं... आणि तरीही तुझं या विषयात नवखेपण ... ही कारणं असतील तुलाच निवडण्याची! पण एक सांगू का? तुझ्या मनात मीच का हा प्रश्न येतो आहे... माझ्या मनात दुसराच प्रश्न पिंगा घालतो आहे..." सिध्दार्थकडे बघत कृष्णा म्हणाली.

तिच्याकडे चमकून बघत सिध्दार्थने विचारलं; "अजून कोणता प्रश्न कृष्णा?"

"सिद्धार्थ, now you really need to come out of the box and think out of the box. काल आपण जी पेटी बघितली होती....." कृष्णाला थांबवत सिद्धार्थ म्हणाला; "मी आणली आहे ती सोबत. दोघे मिळून बघू म्हणून...." क्षणभर त्याच्याकडे टक लावून बघून मग कृष्णा हसली आणि म्हणाली; "बघ, हेच तुझं रॉ असणं... म्हणून तू...." सिध्दार्थला ती काय म्हणते आहे ते कळलं नाही. त्याच्या कपाळावर आठ्या आल्या आणि काहीसं वैतागून तो म्हणाला; "कृष्णा उगाच कोड्यात बोलू नकोस. अगोदरच मी पूर्ण गोंधळलो आहे." त्यावर हसत कृष्णा म्हणाली; "सिद्धार्थ, त्या पेटीचं प्रयोजन संपलं आहे. आपल्या खुणा त्या हेअरपिनवर आणि काकूंच्या बोटांवर ठेऊन तिने तिचं असणं आपल्यापुरत संपवलं आहे. आता जरी तू ती पेटी उघडलीस तरी तुला त्यात काहीही दिसणार नाही आहे."

कृष्णाने असं म्हणताच सोबत आणलेल्या बॅग मधून सिध्दार्थने ती पेटी बाहेर काढली आणि घाईघाईने उघडली. आत खरंच काहीच नव्हतं. सिध्दार्थला पूर्ण खात्री होती की काल त्याने त्या पेटीतून हिरवा रंग प्रकाशित होताना बघितला होता. त्याची साक्ष त्याच्या आईच्या पिनवर आणि बोटांवर होती. पण तरीही आत्ता त्याच्या समोर फक्त एक लाकडी पेटी होती... बस्!

त्याने नजर उचलून कृष्णाकडे बघितलं आणि तिने मंद स्मित केलं.

"मग आता या पेटीचं काय करायचं?" सिध्दार्थने गोंधळून तिला विचारलं.

"पेटीचं काही करायचं नाही. इच्छा असेल तर संग्रहात ठेवायची. पण तिच्या वरच्या श्लोकाचा विचार मात्र आपण नक्की करायला हवा आहे." कृष्णाचा आवाज काहीसा गंभीर झाला होता.

सिध्दार्थने परत एकदा ती पेटी बंद केली आणि त्याची नजर पेटीवरच्या श्लोकावर गेली...

राजगुरू कृपाचार्य: पेटकम् अस्तु तत:!
यदि भवती प्रयत्नात पुन: मिलति जायते!

कृष्णाsssssss अगsssssss

कृष्णाने झट्कन सिध्दार्थच्या हातातून पेटी घेतली आणि तो श्लोक काहीसा मोठ्याने वाचला....

"सिद्धार्थ, तुला पहिला श्लोक आठवतो आहे का?" तिने त्याच्याकडे बघत त्याला विचारलं. सिद्धार्थ स्वतःच्याच विचारात गुंतला होता.

"सिद्धार्थ....."

"अं? काय? काय ग!?" त्याने तिच्याकडे हरवलेल्या नजरेने बघत म्हंटलं.

"तुला कालचा श्लोक आठवतो आहे का?" तिने परत एकदा तिचा प्रश्न विचारला.

"नाही ग.... फक्त तू सांगितलेला अर्थ आठवतो आहे.

ही पेटी चौथी आहे आणि अशा सात पेट्या आहेत. ही पेटी जर तुला मिळाली असेल तर याचा अर्थ हा आहे की तुला बाकी सर्व पेट्या मिळतील. हो न? हाच होता न अर्थ?" सिध्दार्थने कृष्णालाच विचारलं.

"हो! हाच होता अर्थ." ती म्हणाली आणि दोघेही एकदम शांत झाले...

किती वेळ गेला दोघांनाही कळलं नाही. हॉटेलच्या स्टाफ पैकी एकाने येऊन कृष्णाला विचारलं; "मॅडम, कॉफी थंड झाली आहे. दुसरी आणू का?"

त्याच्या बोलण्याने दोघेही भानावर आले. एकदा कॉफीकडे बघून कृष्णा हसली आणि म्हणाली; "नको. बिल आणा. आम्ही निघतो आहोत."

सिद्धार्थ आणि कृष्णा गाडीत बसले आणि सिद्धर्थने गाडी चालू केली. मचाण तसं काहीसं आड बाजूला असलेलं हॉटेल असल्याने तिथून मुख्य रस्त्याला येईपर्यंत रस्ता बराच खडबडीत आणि मातीचा होता. रस्त्यावर एकही वाहन नव्हतं; त्यामुळे दोघेही आपल्याच तंद्रीत होते. अचानक गाडी कशाला तरी जोरात आपटली आणि मागचं चाक गरगर फिरायला लागलं आणि दोघांची तंद्री तुटली. सिध्दार्थने गाडी थांबवून खाली उतरून बघितलं. गाडीचं मागचं चाक काहीसं अडकलं होतं आणि पुढचा बंपर एका मोठ्या दगडाला आपटून त्यात घुसल्यासारखा अडकला होता. सिद्धार्थ एकदम वैतागला. कृष्णा गाडीखाली उतरली आणि तिने देखील एकूण परिस्थिती बघितली.

"आता?" तिने सिध्दार्थला विचारलं.

"तुला मुख्य रस्त्यापर्यंत नेऊन बसमध्ये बसवून देतो. मग बघतो काय करायचं ते." सिद्धार्थ स्वतःवर वैतागत गाडीला लाथ मारत म्हणाला.

इतक्यात मागून एक मोठी गाडी येताना दिसली. गाडीवर मचाण हॉटेलचा लोगो होता. त्यांच्याजवळ येऊन गाडी थांबली आणि ड्राईव्हरने खाली उतरून सिध्दार्थला सलाम केला. "नमस्ते साब. मै मचान का ड्राईव्हर. क्या हुवा?"

"अरे, गाडी पथ्थरपर टकराकर बंद हो गई है." सिद्धार्थ म्हणाला.

"अरे साब, आपको वापस छोड दु क्या हॉटेलमे? या फिर हायवे पे छोडता हु. मै वही तो जा रहा हु. pick up है अभि मेरा नही तो रुककर गाडीका काम कर के देता." ड्राईव्हर म्हणाला.

सिध्दार्थने त्याच्याकडे बघितलं आणि कृष्णाकडे बघत म्हणाला; "कृष्णा, तू याच्या बरोबर जा. मी गाडीचं काय ते बघतो आणि येतो. माझी चिंता नको करुस. बरं, रेंजमध्ये गेलीस की आईला फोन करून सांग. नाहीतर काळीजी करत राहील.... आणि हो! प्लिज बाबांना पण फोन कर आणि सांग मला उशीर होईल ऑफिसमध्ये पोहोचायला. पण नक्की येतोय म्हणून सांग." कृष्णा काहीतरी बोलणार होती... पण मग तिने तिचे शब्द मागे फिरवले आणि काही एक न बोलता गाडीतून पर्स काढून घेऊन ती मचाणच्या गाडीत जाऊन बसली. ड्राईव्हरने सिध्दार्थकडे बघून म्हंटलं; "साब, मै मेरे दोस्त को फोन करता हु आगे जा के. इधर रेंज नही है. वो आएगा और सबकुछ करके देगा. मै रुकता था; लेकिन मेरा pick up है ना. वो लोगोको लेकर आता हु तब तक मेरा दोस्त भी आ जाएगा."

सिध्दार्थने त्याच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं. ड्राईव्हर गाडीत बसला आणि त्याने गाडी सुरू केली. कृष्णाने सिध्दार्थला बाय केलं आणि गाडी पुढे निघून गेली.

मचाणची गाडी गेली आणि सिध्दार्थने शांतपणे त्याच्या गाडीतून ती पेटी काढून हातात घेतली आणि गाडी बंद करून तो पूर्व दिशेने चालायला लागला. समोर एक टेकाड होतं. ते चढून सिद्धार्थ एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसला. त्याने हातातल्या पेटीकडे परत एकदा बघितलं. 'श्लोक कसा बदलला गेला असेल?' या श्लोकाचा अर्थ....

राजगुरू कृपाचार्य यांची ही पेटी आहे; जर व्यक्तीने प्रयत्न केला तर परत भेट होईल.

'पेटी जर कृपाचार्यांची... तर काल बिभीषण? परत भेट!? म्हणजे परत बिभीषण? हे काय आहे नक्की?' सिद्धार्थ विचार करून थकला होता. पण विचार थांबत नव्हते. त्याच्याही नकळत तो विचारांच्या नादात आकाशाकडे टक लावून बघत होता. असा काहीसा वेळ गेला असेल आणि सिध्दार्थला जाणवलं की त्याच्या शेजारी कोणीतरी आहे. त्याने बाजूला नजर फिरवली. पण खूप वेळ प्रखर सूर्यप्रकाशाकडे बघितल्याने त्याच्या डोळ्यांसमोर काहीशी अंधारी आली होती. त्यामुळे शेजारी नक्की कोण आहे ते त्याला कळेना.

"कोण आपण?" सिध्दार्थने अत्यंत हळुवारपणे विचारलं.

उत्तर आलं नाही. ड्राईव्हरने सांगितल्याप्रमाणे त्याच्या मित्राला पाठवलं असावं असं वाटून त्याने हिंदीत तोच प्रश्न केला...

"कौन हो आप?" बोलताना सिद्धार्थ डोळे चोळत होता.

"सिद्धार्थ, आत्ताच तू ज्या श्लोकाचा अर्थ स्वप्रयत्नाने शोधलास; त्या श्लोकामध्ये उल्लेखलेले राजगुरू कृपाचार्य म्हणजे मी!"

एक गंभीर आवाज सिध्दार्थच्या कानावर पडला आणि डोळे चोळायचे थांबवून किलकिल्या डोळ्यांनी सिध्दार्थने आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघण्याचा प्रयत्न केला.

"पुत्रा, काही क्षण डोळे घट्ट बंद कर आणि मग उघड. म्हणजे तुझी दृष्टी तुझ्या मनाप्रमाणे स्वच्छ होईल."

परत एकदा तोच आवाज.

त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे सिध्दार्थने डोळे घट्ट मिटले आणि उघडले..... ही कृती करायला जी तीन-चार सेकंद लागली त्यात त्याच्या मनात आलं.... जर ही व्यक्ती कृपाचार्य आहे; तर त्यांनी फक्त माझ्या डोळ्यांवर हात ठेवला असता तरी पुरेसं होतं की. त्यांच्याजवळ असलेल्या शक्तीमुळे मला नीटच दिसलं असतं. बस्! विचार आला आणि गेला. कारण तोपर्यंत त्याने डोळे उघडले होते आणि त्याला नीट दिसत देखील होतं.

समोर एक स्वच्छ शुभ्र धोतर आणि तसाच स्वच्छ कुर्ता घातलेली पांढरी दाढी असलेली व्यक्ती बसली होती. त्यांच्याकडे पाहाताच सिध्दार्थचे डोळे मोठे झाले.... त्याने काही म्हणायच्या आत त्या व्यक्तीने त्याला 'थांब' अशा अर्थाची खूण केली आणि बोलायला सुरवात केली....

"पुत्रा... सिद्धार्थ..... तू स्वतः परस्परविरोधी विचार करतो आहेस याची तुला कल्पना आहे का? तू काही वेळापूर्वी तुझ्या प्रेयसीला जे सांगत होतास त्याचा सारांश हाच होता न की प्रत्येक कालखंडात घडणारी गोष्ट पुढे जाऊन काहीशी आपभ्रंशीत होते... त्याचं कारण काहीही असो.... आणि त्यामूळेच त्या सत्य घटनेकडे एक कपोलकल्पित कथा अशा दृष्टीने पाहिलं जात. तुमच्या कालखंडात ज्याला जादू असं म्हणतात.... जी खरी हातचलाखी असते..... हे तुला माहीत आहे न? ही दोन्ही सत्य ज्ञात असूनही काही क्षणपूर्वी तुझ्या मनात इच्छा जागृत झाली होती की मी काहीतरी जादू करून तुझी दृष्टी परत पूर्ववत करावी. म्हणजे द्वापार युगातील कौरव-पांडवांचे गुरू; हस्तिनापुराचे राजगुरू; कृपाचार्य; यांनी तुझे डोळे नीट करावेत ही इच्छा म्हणजे तू स्वतःच्याच विचारांशी केलेली प्रतारणा नाही का? बालका; मी केवळ माझ्या युगाबद्दल सांगू शकतो... आणि हे नक्की आहे की त्या कालखंडात घडलेल्या अनेक घटना या अतिरंजित किंवा अविश्वसनीय वाटू शकतात.... परंतु तूच दिलेलं उदाहरण काहीसं वाढवून सांगायचं तर.... उत्तुंग व्यक्तिमत्व आणि देशहित परायण श्री शिवछत्रपती महाराज यांच्या कालखंडामध्ये जो निसर्ग होता; तो आता तुमच्या कालखंडामध्ये आहे का? त्याकालात क्षुधा शांतीसाठी जे अन्न भक्षण केलं जात होतं... त्यातील काही अंशी अन्न भक्षण आजचा मानव करू शकेल का? तद्ववत... काही हजार वर्षे पूर्व कालातील आम्ही जगलेलं प्रतिदिन जीवन वेगळंच असणार. त्यामुळे आमची शारीरिक आणि मानसिक जीवनाशक्ती वेगळी असणारच न?

त्या सर्वसाक्षी सर्वदाता परमेश्वराने... निसर्गाने.... जे दिलं ते आम्ही जपलं; जमेल तसं वृद्धिंगत केलं; त्याचं फलित काही अतींद्रिय शक्ती जागृत होण्यात झालं. वत्सा; आत्मविश्वास आणि स्वप्रजल्पनं.... स्वतःशी साधलेला संवाद.... ही दोन सुखी मानवीय आयुष्याची सत्य आहेत. मात्र आजचा मानव या दोन सत्यांपासून दूर जातो आहे; हे दुर्दैव आहे.

पंचमहाभूतांनी दिलेली शिकवण नाकारून आजच्या मानवाने स्वनिर्मितीची घमेंड करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता ज्ञान हे दान आहे आणि दाता आणि युयुत्सु दोघेही आपापल्या जागी योग्य असणे आवश्यक आहे; हे सार्वभौम सत्य लयाला जाते आहे. अशा या काळामध्ये जिवीतकार्यहीन असे हे माझे जीवन मला किंकर्तव्यमूढ करते आहे. त्यागणे शक्य नाही आणि जगणे नाकारावे तर ते कोणापुढे या प्रश्नाने मी ग्रासलो आहे.

पुत्रा... सिध्दार्थ... तुझ्या या नवीन प्रवास कार्यामध्ये जर खरंच तुझी भेट त्या सर्वसाक्षी परमपित्याशी झालीच... तर माझ्या मनीची व्यथा उद्धृत नक्की कर....."

समोरची व्यक्ती बोलायची थांबली आणि मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकणारा सिध्दार्थ काहीसा भानावर आला.

अचानक दूरवरून त्याला कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला आणि अगदी नकळत त्याची मान वळली.... तत्क्षणी त्याच्या लक्षात त्याची चूक आली होती...... परत गर्रकन समोर मान वळवली सिध्दार्थने... परंतु तिथे कोणीही नव्हतं... ज्याची त्याला जाणीव होती.

.......आणि बसलेल्या ठिकाणावरून शांतपणे उठून सिध्दार्थ टेकाड उतरून खाली जायला निघाला.

क्रमशः

श्रीगणेश लेखमाला २०२१

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2021 - 12:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

बिभिषण आणि कृपाचार्य यांचे संवाद लक्षात घेता विषयाचा अंदाज यायला लागला आहे.
पुढील भाग अजुन रंगत जाणार यात काही शंका नाही.
पैजारबुवा,

गॉडजिला's picture

14 Sep 2021 - 5:50 pm | गॉडजिला

अजुन पाच भाग प्रत्येक चिरंजीवीच्या नावे… वाचायचे. अन शेवटी सिध्दार्थ हिमालयात जातो(प्रेयसी आहे म्हणजे जरा कठीण आहे पण होउ शकते) अथवा एक महान वैज्ञानीक शोध वा दिव्य (?) संदेश सिध्दार्थ ला उपलब्ध्द होतो अशी मनात उत्सुकता दाटुन राहीली आहे…

(तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी चा चाहता)- गॉडजिला

तुषार काळभोर's picture

14 Sep 2021 - 12:53 pm | तुषार काळभोर

मस्त, झकास - अशा शब्दांनी प्रतिसाद देणे चुकीचं वाटतं.
नक्की काय विषय आहे, ते लक्षात येत नाहीये, पण वाचताना काहीतरी अद्भूत वाचल्याचा अनुभव मिळतोय.

पौराणिक आणि आधुनिक काळाची सांगड घालत कथानक सादर करण्याची कल्पना मस्त आहे!
मजा येत आहे वाचायला, आता पुढच्या भागासाठी उद्याची वाट पाहणे आले 😊

प्रचेतस's picture

15 Sep 2021 - 6:06 am | प्रचेतस

हेच म्हणतो.

अनन्त अवधुत's picture

15 Sep 2021 - 6:44 am | अनन्त अवधुत

.

तुमच्या कालखंडात ज्याला जादू असं म्हणतात.... जी खरी हातचलाखी असते..... हे तुला माहीत आहे न?

खुप छान स्पष्टीकरणं…

बाकी कृपाचार्य बरेच कंफ्युज वाटत आहेत… पण तुर्तास… कथानक वाचत आहे अजुन काहीच स्पष्ट होत नाहीये