1

भटकंती किल्ले कर्नाळा

Primary tabs

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
13 Sep 2021 - 7:06 am

घरापासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या कर्नाळ्याला गेल्या काही वर्षांपासून एकदा तरी भेट दिली जाते. काही वेळा फक्त पक्षी अभयारण्यात फेरफटका तर काही वेळा किल्ल्यावर चढाई. गेल्या वर्षी करोना काळामुळे संधी हुकली पण सध्या अभयारण्यात जाण्यास परवानगी आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत थेट किल्ल्यापर्यंत मुसंडी मारली.
किल्ल्याची ऐतिहासिक माहिती वगैरे गोष्टी मिसळपाववर पूर्वी आलेल्या आहेत तसेच जालावर सुद्धा माहिती आहेच.
आज फक्त फोटोंमधून किल्ल्यापर्यंतची भटकंती.
अभयारण्यात सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० पर्यंत येथे प्रवेश दिला जातो.

तिकीट दर

अभयारण्याचे प्रवेशद्वार

मुलांसाठी खेळण्यासाठी बाग

पक्षांसाठीचे पिंजरे. (पक्षी उपचारासाठी वगैरे फक्त काही काळासाठी येथे ठेवले जातात. नंतर त्यांना मुक्त करण्यात येते असे कळते)

थोडेसे पुढे गेल्यावर छोटासा बंधारा आहे. हा पार करून किल्ल्यावर एक वाट जाते. परंतु सध्या ती बंद करण्यात आली आहे.

पायथ्यापासून किल्ल्याची वाट जवळपास अडीच किलोमीटरची आहे. बहुतेक वाट दगड धोंड्यातून जपून पावले टाकत चढावी लागते.
किल्ले चढाईची सुरुवात. खडकाळ वाट तसेच झाडांच्या मुळांमुळे तयार झालेल्या नैसर्गिक पायऱ्या.

एका ठिकाणाहून कर्नाळा सुळक्याचे दर्शन

वाटेत एक सुंदर धबधबा . पाऊस सुरु असल्याने धबधब्याला बऱ्यापैकी पाणी होते.

अळिंबी

नागेश पॉईंट. साधारण चढाईचा मध्य. येथपर्यंत आम्हाला एक तास लागला.
येथून डोंगराच्या पलीकडील रसायनी भागाचे दर्शन होते.

काही वेळ आपल्याला रसायनीच्या बाजूचे तसेच काही ठिकाणी गोवा हायवेचे असे दोन्ही बाजूचे दृश्य नजरेस पडते. पुढे परत खडकाळ चढण सुरु होते.
करोना काळामुळे येथील वर्दळ फारच कमी झाली आहे. काही ठिकाणी तर वाढलेल्या गवतात जेमतेम दिसणाऱ्या पायवाटेहून पुढे जावे लागते.

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले भवानी मातेचे मंदिर

येथून पुढे कठडे असलेली चढण आहे. (कठडे बऱ्याच ठिकाणी तुटलेले आहेत)

तटबंदीचा पहिला दरवाजा.

आत शिरल्यावर डावीकडे किल्ल्याचा प्रवेश दरवाजा लागतो. पूर्वी आलो तेव्हा फक्त दगडी चौकट होती पण आता त्यात लाकडी दरवाजा बसवलेला पाहावयास मिळाला.

आत प्रवेश केला कि काही पडके अवशेष दिसतात. कोठार वगैरे वास्तू असाव्यात.

जवळून दिसणारा धुक्यातील सुळका

सुळक्याच्या कातळातच पाण्याचे टाके खोदलेले आहेत

सुळक्याच्या पलीकडे परत एक दरवाजा आहे. येथून पुढं गेल्यावर आजूबाजूच्या परिसराचे विलोभनीय दर्शन होते. पण या फेरीत धुक्यामुळे काहीच दिसत नव्हते. मस्त वारा सुटला होता.अधून मधून पावसाच्या सरी भिजवून जात होत्या. थोडा वेळ थांबून परतीचा मार्ग धरला.

परतीच्या मार्गाहून परत एकदा कर्नाळा सुळक्याचे दर्शन

किल्ल्यावर पाण्याची अथवा खाद्य पदार्थ मिळण्याची सोय नाही.
घरून खाद्य पदार्थ आणले असतील तरी खूप सांभाळून खावे लागतात. माकडांच्या टोळ्या सतत आसपास फिरत असतात.
पायथ्याशी उपहारगृह आहे तसेच लागूनच गोवा हायवेला हॉटेल देखील आहे.
किल्ल्यापर्यंत जाऊन पायथ्याशी येण्यास पाच तास तरी हवेत. तरुण मुलं लवकर येऊ शकतील .

धन्यवाद

खादाडी

नुकताच गणेश लेख मालिकेतील जीवनसाथी विषयावरचा 'आजी' चा छान लेख वाचनात आला.
दोन हृदयविकाराचे झटके, एक अर्धांगवायूचा झटका, दोन वेळा अँजिओ प्लास्टी, पाच स्टेण्ट असून सुद्धा भटकंतीत साथ देणारा माझा जीवनसाथी.
"स्टेंटमॅन"

प्रतिक्रिया

लिंगोबाचा डोंगर आभाळी ग्येला,
ठाकर गडे तिथं कदी नाय ग्येला.

मस्त भटकंती, पावसाळ्यात कर्नाळ्याचे सौंदर्य अधिकच खुललेय. निसरड्या वाटांमुळे कर्नाळा तसा पावसाळ्यात धोकादायक आहे मात्र.
तुमच्या जीवनसाथीला सलाम.

गोरगावलेकर's picture

13 Sep 2021 - 9:25 pm | गोरगावलेकर

खरंच. कर्नाळा म्हटलं की जैत रे जैत आठवतोच.

गॉडजिला's picture

13 Sep 2021 - 7:07 pm | गॉडजिला

हेचं खरं समाधान आहे... (म्हणजे खादाडी असेल तर)

आपल्या मिस्टरांना मनोमन सलाम... इतकं सगळं झाल्यावर किल्ले फिरणे मला तरी जमणार नाही _/\_

लगे रहो.

गोरगावलेकर's picture

13 Sep 2021 - 9:26 pm | गोरगावलेकर

खादाडी असतेच. भटकंतीत मिस्टरांना देखील काही वर्ज नाही. घरी सर्वांसाठी बनेल तेच साधे जेवण. त्यांच्यासाठी वेगळे काही बनत नाही अथवा बनवू देत नाही असे म्हटले तरी चालेल. (मला त्यांच्यासाठी वेगळा त्रास नको हाही उद्देश असावा)

श्रीयुतांचा उत्साहही आवडला.
खादाडी म्हणजे थोडे पेणच्या दिशेने जवळच 'हॉटेल कर्नाळा' आहे त्याची कांदा भजी खासच. ( नेपाळी आचारीच बनवतात .)शिवाय तिथे आलेल्या मराठी कलाकारांच्या सह्या असलेला फळा आहे. मिलिंद गुणाजीचे आवडते होटेल.
दुसरे एक म्हणजे घसीटारामचेही आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट. इतर टपऱ्या अभयारण्य गेटपाशी होत्या त्या मागेच उडवल्या. आता काय माहिती नाही.

मी दोनतीनदा आपटा / रसायनी या कर्नाळ्याच्या मागच्या बाजूने चढून गेलो आहे. एकूण परिसर फारच छान आहे.

थोडं पुढे असलेल्या युसुफ मेहेरल्ली सेंटर ( ग्रीन थंब नर्सरीजवळचे) इथेही नाश्ता चहा मिळतो. राहायची आणि शिबिरासाठी व्यवस्था स्वस्त आणि चांगली आहे.

-----------
पनवेलपासून दुसरी जवळची छान जागा म्हणजे जांभिवली तलाव. (रिलाअन्स कंपनीच्या मागच्या डोंगरपायथ्याशी). पनवेल - कोन- रसायनी -गेस्ट हाऊस - सिद्धेश्वर - चांदवली-जाभिवली - सवणे बस जाते.) सवणेहूनही तलाव जवळ आहे. काही लोक यास सवणे तलावही म्हणतात. मागे जो गड आहे तो माणिकगड. पक्षी आणि साप आहेत. कारण पाण्याचा ओहोळ सतत वाहत असतो.
जांभिवली तलावापाशी उन्हाळ्यात ही छान वाटते.
इकडे गेला आहात का?

गोरगावलेकर's picture

13 Sep 2021 - 9:27 pm | गोरगावलेकर

हॉटेल कर्नाळ्याची कांदा भाजी खाल्ली आहे. छानच असते. कलाकारांच्या सह्या असलेला फळा व मिलिंद गुणाजींचे आवडते ठिकाण ह्याबद्दल आताच कळले.

*'इतर टपऱ्या अभयारण्य गेटपाशी होत्या त्या मागेच उडवल्या'*
आता एक कोंकण कर्नाळा म्हणून हॉटेल झाले आहे. तेथेच खाल्ले. किल्ला उतरून आल्यावर सडकून भूक लागली होती. कांदा भजी बनायला वेळ लागणार होता म्हणून बटाटा भजीवर समाधान.

युसूफ मेहराळी सेंटरला भेट दिली आहे पण त्यादिवशी सुटी असल्याने केंद्र फक्त बाहेरूनच बघता आले.
सवणे तलाव व माणिकगड नाही पहिला अजून. नक्की जाईन .

Bhakti's picture

13 Sep 2021 - 8:27 pm | Bhakti

मस्तच फोटो !
तुम्हां उभयतांना नमस्कार_/\_

Bhakti's picture

13 Sep 2021 - 8:27 pm | Bhakti

मस्तच फोटो !
तुम्हां उभयतांना नमस्कार_/\_

सुक्या's picture

13 Sep 2021 - 9:42 pm | सुक्या

मस्त. सगळे फोटो झकास आहेत.
तुम्हाला व तुमच्या स्टेंटमन ला सलाम . . .

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Sep 2021 - 2:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

पावसाळ्यात घरबसल्या फिरायला मिळाले. फोटो आणि भटकंती आवडली.

टर्मीनेटर's picture

14 Sep 2021 - 3:14 pm | टर्मीनेटर

स्टेंटमॅनना मानाचा मुजरा!
बाकी लेखन आणि फोटो नेहमीप्रमाणेच मस्त 👍
होम - टु - विकेंड होम च्या रस्त्यावरच कर्नाळा लागत असल्याने अनेकदा इथे भेट दिलेली आहे, पण पावसाळ्यात कधिच वरती किल्ल्यावर गेलो नाही. फोटोंमधुन पावसाळ्यातली द्रुष्येही पहायला मिळाली.
धन्यवाद.

गोरगावलेकर's picture

18 Sep 2021 - 11:37 am | गोरगावलेकर

@Bhakti, सुक्या, राजेंद्र मेहेंदळे, टर्मीनेटर प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार

इरसाल कार्टं's picture

18 Sep 2021 - 2:22 pm | इरसाल कार्टं

कर्नाळ्याला जायचे कधीपासून ठरतंय पण लोकडाऊन मुले जाऊ देतात नाही हे माहित नव्हते. आता नक्की जाऊन येतो.

सतिश गावडे's picture

18 Sep 2021 - 2:48 pm | सतिश गावडे

धागा झरझर सरकवत चित्रे पाहत होतो, भजीच्या थाळीत वाटीत जांभळे काय हे विचारण्यासाठी प्रतिसाद द्यायला खाली आलो आणि शेवटच्या वाक्याने आणि छायाचित्राने थबकलो.

माझ्या जिल्ह्यातील माहीती असलेला हा किल्ला, मुंबईत कामाला असताना अभयारण्य ओलांडताना नेहमी ठरवत असे की एकदा जाऊ या किल्ल्यावर. पण काही योग आला नाही.

आता ताम्हिणी चढताना आणि उतरताना दूरवर कर्नाळ्याचा सुळका दिसतो तो पाहून समाधान मानतो.

अवांतर: मी शाळेत असताना नावात कर्नाळा शब्द असणारा एक दिवाळी अंक बहूतेक पनवेलहून प्रकाशित होत असे. त्यात स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा असत. अंक हाती लागला की झपाटल्यासारखे वाचून काढत असे.