पुणे ते लोणावळा

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in भटकंती
21 Aug 2021 - 9:46 am

‘दख्खनच्या राणी’ला व्हिस्टा डोम डबा जोडला जाणार अशी बातमी आली. त्या डब्यात बसून बोर घाटामधलं निसर्गसौंदर्य आणखी स्पष्टपणे न्याहाळायला मिळणार या विचाराने ‘दख्खनच्या राणी’च्या चाहत्या प्रवाशांमध्ये आणि तथाकथित रेल्वेप्रेमींमध्ये उत्साह संचारलेला होता. परिणामी भाडं जास्त असूनही पहिल्या दिवशी या डब्याचं आरक्षण पूर्ण झालं होतं. अनेकांचं प्रतीक्षा यादीतील तिकीट प्रतीक्षा यादीतच राहिलं.
15 ऑगस्टपासून ही नवी सुविधा ‘दख्खनच्या राणी’त उपलब्ध होत होती. त्यामुळे मीही या गाडीचं आरक्षण केलं होतं. मीही या निमित्ताने ‘दख्खनच्या राणी’नं छोटासा प्रवास करून येऊ, असा विचार करून पुणे ते लोणावळा आणि परत असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. पण मी व्हिस्टा डोमचं आरक्षण मुद्दामच केलं नाही.

त्या दिवशी सकाळी लवकरच पुणे जंक्शनवर पोहचलो होतो. तेव्हा तिथे यूट्यूबर तथाकथित रेल्वेप्रेमींची गर्दी जमू लागली होतीच. मीही गाडीत बसण्याआधी त्या डब्याजवळ गेलो. ‘दख्खनच्या राणी’बरोबर व्हिस्टा डोम पहिल्यांदाच धावणार होता, म्हणून त्याला आतून-बाहेरून फुग्यांनी सजवण्यात आलं होतं. ‘15 ऑगस्ट’ असल्यामुळे सजावटीसाठी तिरंगी फुग्यांचा वापर करण्यात आलेला होता.
व्हिस्टा डोमच्या दोनच डबे पुढे माझा डबा होता. गाडी सुटायला अजून 15 मिनिटं होती. त्यामुळं माझा डबा बऱ्यापैकी मोकळा होता. पण तो पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये एकदम भरून गेला. मी बाकीच्या गाडीचं निरीक्षण करून माझ्या आरक्षित जागेवर जाऊन बसलो होतोच. गाडीत ‘चाय-चाय-चाय’ करत रेल्वेच्या केटरिंग सेवेच्या कर्मचाऱ्यांची तुरळक येजा सुरू होती.

गाडी सुरू करण्याचे इंजिनापासून कंट्रोल रूमपर्यंत आणि स्टेशन मास्टरपासून गार्डपर्यंतचे सर्व ठिकाणचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर ठीक सव्वासातला चॉकलेटी रंगातल्या कल्याणच्या डब्ल्यूसीएएम-2 कार्यअश्वासह फलाट क्रमांक 5 वरून ‘दख्खनच्या राणी’ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने निघाली. फलाट सोडतानाच्या चाकांच्या त्याच टिपिकल ठेक्यात गाडी फलाट सोडणार तोच कोणी तरी साखळी ओढली आणि गाडी थांबली. लोको पायलटनेही सांकेतिक हॉर्न वाजवून तशी सूचना द्यायला सुरुवात केली. पण काही सेकंदांमध्येच ‘दख्खनच्या राणी’नं पुन्हा गती घेण्यास सुरुवात केली. एव्हाना आपापल्या आसनांवर स्थानापन्न झालेल्यांमध्ये जे एकेकटे प्रवास करत होते, त्या तरुणाईने कान कधीच हेड बंद करून घेऊन हातातल्या भ्रमणध्वनीमध्ये डोळे खुपसले होते. जे आपल्या ओळखींच्यांबरोबर प्रवास करत होते त्यांच्या गप्पांना आता कुठे सुरुवात झाली होती. त्यात अजून रंग यायला वेळ होता.
शिवाजीनगर, खडकी, दापोडी अशी स्थानकं ओलांडत असतानाच ‘दख्खनच्या राणी’चा विशेष मेन्यू प्रवाशांच्या सेवेत येऊ लागला. पहिल्यांदा आले गरमागरम साबुदाणा वडे. पण मी घेतले नाहीत, कारण मी ‘दख्खनची राणी’ची स्पेशल कटलेटची वाट बघत होतो.

घड्याळात 7.34 झाले होते. ‘दख्खनची राणी’ आता चिंचवड ओलांडत होती आणि तिने वेगही चांगला घेतला होता. आता गरमागरम कटलेटही आणले गेलेच. मी त्यांचा आस्वाद घ्यायला सुरुवात करणार तितक्यात शेजारच्या डाऊन मेन लाईनवरून वेरावळहून आलेली 01087 वेरावळ-पुणे जं. विशेष एक्सप्रेस डब्ल्यूएपी-4 कार्यअश्वासह पुण्याच्या दिशेने निघून गेली. आज ती गाडी थोडी उशीराने धावत होती. पुढच्या 4च मिनिटांत ‘दख्खनची राणी’ने देहू रोड गाठले. तिथे लूप लाईनवर कर्जतच्या दिशेने जाणारी बीसीएन वाघिण्यांची मालगाडी गडद पिवळ्या-निळ्या रंगाच्या तिच्या डब्ल्यूडीजी-4 या कार्यअश्वांसह ‘दख्खनची राणी’ पुढे जाण्याची वाट पाहत उभी होती. सेक्शन कंट्रोलरच्या आदेशावरून त्या मालगाडीला देहू रोडमध्ये बाजूला काढून ‘दख्खनच्या राणी’ला प्राधान्याने मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. अशा पद्धतीने दुसऱ्या गाडीला ओलांडून पुढे जाताना ऐकू येणारा चाकांचा खडखडाट खूपच आनंददायी असतो. देहू रोडला पुणे जं.-लखनौ जं. एक्सप्रेसचा मोकळा रेक डाऊन लूप लाईनवर उभा करून ठेवलेला होता. सध्या ती गाडी बंद असल्यामुळे ती निमूटपणे तिथे उभी होती.
देहू रोडच्या बाहेरच 02940 जयपूर जं.-पुणे जं. विशेष एक्सप्रेस आपल्या पांढऱ्याशुभ्र कार्यअश्वाच्या साथीने (डब्ल्यूएपी-7) आपल्या अंतिम लक्ष्याच्या दिशेने धडाडत गेली. आता रुळांच्या आसपास दाटीवाटीनं असलेली घरं विरळ होऊ लागली होती. त्यामुळे पावसाने झालेला हिरवागार परिसर स्पष्टपणे, अगदी जवळ दिसू लागला होता. बाहेर बरसणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी पाहत माझा गरमागरम कटलेटचा आस्वादही घेऊन झाला होता.

पुढच्या चार मिनिटांत तळेगावही गेले. आता जरा पावसाचा जोर वाढलेला होता. बाहेर पावसाळी वातावरण, त्यामुळे झालेला हिरवागार परिसर, त्यातून पळणारी ‘दख्खनची राणी’ आणि हातात गरमागरम चहा! घड्याळात ठीक 7.50 झाले होते. चहा हातातला संपत असतानाच डाऊन लाईनवरून बीसीएन वाघिण्यांची मालगाडी पुण्याच्या दिशेने गेली. कल्याण लोको शेडचे दोन डब्ल्यूसीएजी-1 कार्यअश्व तिचे नेतृत्व करत होते. कामशेतमध्ये स्थानकाच्या आणि रुळांच्या शेजारून वाहणारी इंद्रायणी नदी पाहत असतानाच डाऊन लाईनवरून पांढऱ्याशुभ्र डब्ल्यूएपी-7 अश्वासह 02944 इंदौर जं.-दौंड जं. विशेष एक्सप्रेस पुण्याकडे गेली. अगदी वेगाने! ‘दख्खनची राणी’ आणि ती गाडी दोघीही वेगाने पळत होत्या, त्यामुळे हे क्रॉसिंग खूपच झटकन झाले.

आज ‘दख्खनची राणी’ लोणावळ्यात नियोजित वेळेच्या आधी पोहचत होती. पावसाळ्यामुळे लोणावळ्याच्या जवळपासच्या हिरव्यागार डोंगररांगा ढगांमागे लपलेल्या होत्या. ‘दख्खनची राणी’ लोणावळ्यात शिरली, तेव्हा अपला जाणाऱ्या दोन मालगाड्या तिथे उभ्या होत्या. दोघींनाही डब्ल्यूडीजी-4 आणि डब्ल्यूडीजी-4डी हे दोन्ही कार्यअश्व जोडलेले होते. एक मालगाडी बीसीएन वाघिण्यांची आणि दुसरी बॉक्सएन वाघिण्यांची होती. त्या वाघिण्यांची तिथे तपासणी सुरू होती. ती पूर्ण झाली की, त्या कर्जतच्या दिशेने प्रस्थान करणार होत्या. त्यावेळी डाऊन दिशेने जाणारी बीटीपीएन वाघिण्यांची तिसरी मालगाडी दोन डब्ल्यूडीजी-4 कार्यश्वांसह पुण्याच्या दिशेने निघण्यासाठी स्टार्टर सिग्नलची वाट बघत उभी होती. तिला अजून तिथं रोखून धरण्यात आलं होतं, कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या ‘इंद्रायणी विशेष’ एक्सप्रेसला मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. नियोजित वेळेच्या तीन मिनिटं आधीच ‘दख्खनची राणी’ फलाटावर पोहचत असताना ‘इंद्रायणी विशेष’ शेजारून निघून गेली.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/08/blog-post_21.html

दख्खनची राणीपुणे-लोणावळारेल्वे प्रवास

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

21 Aug 2021 - 5:26 pm | चौथा कोनाडा

व्हिस्टा डोमच्या निमित्ताने सादर केलेला वृतांत आवडला !
+१

कुठल्याही डब्यात बसलो तरी भर पावसाळ्यात "तळेगाव ते लोणावळा" रेल्वे प्रवास (आपल्या जागेवरून जेव्हढा दिसेल, अनुभवाता येईल तेव्हढा) अनुभवणे म्हणजे स्वर्गसुखच !

तुषार काळभोर's picture

21 Aug 2021 - 5:45 pm | तुषार काळभोर

दिल चाहता है

हे युट्यूबवरच्या वाडिओतून कळले. डेक्कन क्वीनच्या अगोदर डेक्कन एक्सप्रेसला आणि सूरत - केवडिया # गाडीला
विस्टाडोम जोडले होते.
(#केवडिया - पटेलांचा पुतळा आहे तिथे जाण्यासाठी स्टेशन.)
१) सामान ठेवण्यासाठी डब्यात बाहेर जागा केली आहे त्यातच ठेवावे लागते.
२) मुंबई - पुणे गाडीला कर्जतला मागे तीन एंजिनस लावतात. मागच्या काचेचा घाटात उपयोग होत नाही. घाटातून खाली येताना मागे एंजिन नसते. तिथे उपयोग होईल. पण घाटातून खाली येणाऱ्या मार्गावर धबधबे कमी आहेत. वर जाण्याच्या मार्गावर अधिक आहेत.
३) आपल्याकडे ऊन कडक असते. मोठ्या खिडक्यांंजवळ बसणे अशक्य होते. काचा काळ्या नाहीत. पडदे लावले तर खिडकीचा उपयोगच नाही.

पराग१२२६३'s picture

21 Aug 2021 - 9:40 pm | पराग१२२६३

डेक्कन एक्सप्रेसच्या व्हिस्टा डोमच्या मागच्या मोठ्या खिडकीसमोर फक्त कर्जत-लोणावळ्यादरम्यान इंजिनं असतात. पण मुंबईला जाताना शेवटपर्यंत इंजिन असते. दख्खनच्या राणीच्याबाबतीत उलट परिस्थिती आहे. पुण्याहून मुंबईपर्यंत मागच्या इंजिनांचा प्रश्न नाही; पण परतीच्या प्रवासात शेवटपर्यंत काचेसमोर इंजिन असते.

फारएन्ड's picture

23 Aug 2021 - 9:46 pm | फारएन्ड

पराग - डेक्कन क्वीनला शेवटपर्यंत का इंजिन असते परतीच्या प्रवासात? काही गाड्यांना पुश-पुल मेकॅनिजम करता दोन इंजिने लावली जात आहेत तसे काही आहे का?

तसेही डेक्कन क्वीनला या डब्याचा फायदा मुंबईकडे जाताना जास्त आहे- सकाळच्या वेळेत. येताना हिवाळ्यात घाटात ऑलरेडी अंधारून येत असते. तेव्हा इतके छान दिसणार नाही. त्यापेक्षा जाताना डेक्कनला व येताना सिंहगडला लावला तर दोन्ही वेळेस मस्त दिसेल.

पराग१२२६३'s picture

23 Aug 2021 - 10:36 pm | पराग१२२६३

डेक्कन क्वीनला शेवटपर्यंत का इंजिन असते परतीच्या प्रवासात?
- परतीच्या प्रवासात व्हिस्टा डोमच्या पुढे इंजिन असते. कारण हा डबा मुंबईला जाताना शेवटचा आणि पुण्याला येताना पहिला असतो.

फारएन्ड's picture

23 Aug 2021 - 10:46 pm | फारएन्ड

ओह ते लक्षात आले नव्हते :) मला वाटले इंजिनाबरोबर त्याचेही शंटिंग करून नंतर पुन्हा मागे लावत असतील.

चौथा कोनाडा's picture

23 Aug 2021 - 8:40 pm | चौथा कोनाडा

म्हण्जे एकंदरीत "देखावा घुमटा" वर काट मारावी काय ?

कंजूस's picture

22 Aug 2021 - 5:20 am | कंजूस

मागच्या काचेतून दिसणारा मोठा निसर्ग पाहायच्या हेतूने गेल्यास निराशा होते.

अरेरे, एका चांगल्या कल्पनेचा विचका झाला दिसतोय :-(

निनाद's picture

26 Aug 2021 - 6:43 am | निनाद

https://www.youtube.com/watch?v=VOGRsrTyMlo येथे तर मस्त दिसते आहे सगळे.

चौथा कोनाडा's picture

26 Aug 2021 - 10:05 am | चौथा कोनाडा

+१
मस्त वाटले हे !

अनन्त्_यात्री's picture

26 Aug 2021 - 11:14 am | अनन्त्_यात्री

कवी वसंत बापट यांची "दख्खन राणी" आठवली:
===========================

दख्खन राणीच्या बसून कुशीत

शेकडो पिल्ले ही चालली खुशीत

सुंदर मानव तुंदील अंगाचे

गालीचे गुलाब शराबी रंगाचे

फेनील मृदुल रेशमी वसनी

ठेविल्या बाहुल्या बांधुनी बासनी

गोजिरवाणी लाजीरवाणी

पोरटी घेऊन पोटाशी कुशीत

दख्खन राणीही चालली खुशीत ॥१॥

निसर्ग नटला बाहेर घाटात

पर्वत गर्वात ठाकले थाटात

चालले गिरीश मस्तकावरून

आकाश गंगांचे नर्तन गायन

झेलून तयांचे नुपूर घुंगूर

डोलती डौलात दुर्वांचे अंकुर

मोत्याची जाळी घालुन भाळी

रानची चवेणी जाहली प्रफुल्ल

दख्खन राणीला नव्हती दखल ॥२॥

नटीच्या फोटोत जवान मश्गुल

प्रेयसी करीते कानात किलबील

किलवर चौकट इस्पिक बदाम

टाकीत टाकीत जिंकती छदाम

नीरस वादाचे पोकळ मृदुंग

वाजती उगाच खवंग सवंग

खोलून चंची पोपटपंची

करीत बसले बुद्धिचे सागर

दख्खन राणी ही ओलांडी डोंगर ॥३॥

बाहेर घाटाची हिरवी पिवळी

सोनेरी पोपटी मायाही आगळी

पाखरे पांढरी गिरकी घेऊन

रांगोळी काढती अधुन मधुन

निळा तो तलाव तांबूस खाडी ती

पांढरा प्रपात हिरवी झाडी ती

अवती भवती इंद्राचे धनुष्य

दख्खन राणीत मुर्दाड मनुष्य ॥४॥

धावत्या बाजारी एकच बालक

गवाक्षी घालून बैसले मस्तक

म्हणाले आई ग ! धबधबा केवढा !

पहा ही चवेणी पहा हा केवडा !

ढगाच्या वाफेच्या धूसर फेसात

डोंगर नाहती पहा ना टेचात

म्हणाली आई पुरे ग बाई

काय या बेबीची चालली कटकट

दख्खन राणीचा चालला फुंफाट ॥५॥

ड्युकचे नाकाड सरळ अजस्त्र

राहिले उभे हे शतके सहस्र

त्याच्याही पाषाण ह्रदया कळाली

सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी

पाहुनी वर्षेचा आनंद विलास

उल्हासे धावते नाचते उल्हास

सौंदर्य पाहुन अमृते नाहुन

बाभळी बोरींना रोमांच फुटले

दख्खन राणीला कौतुक कुठले ॥६॥

दख्खन राणीच्या बसुन कुशीत

शेकडो पिल्ले ही चालली खुशीत

मनाने खुरटी दिसाया मोठाली

विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी

बाहेर असू दे ऊन वा चांदणे

संततधार वा धुक्याचे वेढणे

ऐल ते पैल शंभर मैल

एकच बोगदा मुंबई पुण्यात

दख्खन राणीही चालली वेगात ॥७॥

- कवी :वसंत बापट

चौथा कोनाडा's picture

27 Aug 2021 - 1:03 pm | चौथा कोनाडा