छायाचित्रण कला स्पर्धेचे परिक्षण दोन प्रकारे करायचे ठरले होते. एक म्हणजे मिपाकरांचा कौल आणि दुसरे म्हणजे या क्षेत्रातील जाणकरांना या छाया चित्रांविषयी काय वाटते?
या करता किल्लेदार, स्पा आणि MipaPremiYogesh यांनी एकत्रित विचार करुन आलेल्या छायाचित्रांवर आपले मत दिले.
परिक्षकांनी वेळात वेळ काढून केलेल्या या परखड परिक्षणाचे संपादक मंडळ स्वागत करीत आहे व या टिपण्णीचा हौशी मिपाकरांना नक्की उपयोग होईल याची खात्री बाळगत त्यांचे मत आपल्या समोर मांडत आहोत.
-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-
सर्वप्रथम छायाचित्र स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांचे आभार.
मिपावर आजवर बऱ्याच छायाचित्र स्पर्धा झाल्यात आणि त्याला भरभरून प्रतिसादही मिळाला. बरीच उत्कृष्ट छायचित्रे बघायला मिळाली. यावेळी खरंतर तीन विषय एकाच वेळी असल्यामुळे जास्त प्रवेशिका येतील अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही.
निसर्गचित्रे/मुक्त विभाग हे तसे सोपे विषय आहेत. थोडे नियम पाळले की एक उत्कृष्ट छायाचित्र काढता येऊ शकते. आपले छायाचित्र चांगले आले का नाही यासाठी आता पूर्वीप्रमाणे छापील फोटो हातात यायची वाट बघावी लागत नाही किंवा त्यासाठी फार महागडा कॅमेरा असायचीही गरज नाही. कुठलाही साधा फोन उत्तम फोटो घेऊ शकतो. फोनच्या सहा बाय तीन इंचाच्या चौकटीत समोरच्या दृश्यातून आपल्याला हवे तेवढेच नेमके बाजूला काढता येणे हे किमान कौशल्य सहज साध्य होण्यासारखे आहे.
मिपावरची ही स्पर्धा म्हणजे घरातल्या घरातली असली तरी शेवटी स्पर्धाच आहे. प्रवेशिका देताना सर्व स्पर्धकांनी छायाचित्रावर थोडी मेहनत घेणे अपेक्षित आहे. सर्वप्रथम प्रवेशिका विषयाला अनुसरून असावी. लॉकडाऊन चा पेपर बहुतेक सर्वच स्पर्धकांना कठीण गेला. आपल्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नसले तर जसे परीक्षेत आपण काहीतरी लिहून येतो तसे या विभागातली छायाचित्रे बघताना वाटले. आंतरजालावर कुठल्याही विषयावरची उत्तमोत्तम छायाचित्र बघता येतात आणि त्यातूनही नव्या कल्पना आपल्याला सुचू शकतात. चांगल्या छायाचित्रासाठी असा थोडासा अभ्यासही आवश्यक आहे.
सरतेशेवटी "परीक्षक" नाही तर छायाचित्रणाची मनापासून आवड असलेले "प्रेक्षक" म्हणून छायाचित्रात काय बघायला आवडले असते ते सांगायचा थोडासा खटाटोप.
३. निसर्गचित्रे
निसर्गचित्रे -१
निसर्गचित्रे -२
निसर्गचित्रे -३
निसर्गचित्रे -४
निसर्गचित्रे -५
निसर्गचित्रे -६
निसर्गचित्रे -७
निसर्गचित्रे -८
निसर्गचित्रे -९
निसर्गचित्रे -१०
निसर्गचित्रे -११
निसर्गचित्रे -१२
निसर्गचित्रे -
छायाचित्र आकर्षक वाटेल आणि बघणाऱ्याची दृष्टी छायाचित्रावर खिळून राहील यासाठी काही सोपे नियम आहेत जसे
१. क्षितिजरेषा (Horizon) समांतर ठेवणे - प्रवेशिका १ आणि ५
प्रवेशिका १ - क्षितिजरेषा समांतर असली/रुल ऑफ थर्ड वापरला तरी छायाचित्रकाराला नेमके काय दाखवायचे आहे हे स्पष्ट होत नाही.
प्रवेशिका ५ - थोडे मागे जाऊन डावीकडील झाड पूर्णपणे चौकटीत बसवले असते तर चांगला परिणाम मिळाला असता
२. रुल ऑफ थर्ड - चित्राला तीन समान भागात विभागून त्याप्रमाणे क्षितिजरेषा ठरवणे - प्रवेशिका १, ५ आणि ८
३. लीडिंग लाईन्स - प्रवेशिका २ आणि ३
प्रवेशिका २ - या छायाचित्रात रस्त्याची दिशा बघणाऱ्याच्या दृष्टीला चौकटीच्या बाहेर घेऊन जाते. रस्त्याच्या वेगळ्या कोनातून चांगला परिणाम साधता आला असता.
प्रवेशिका ३ - यात लीडिंग लाईन्सचा चांगला उपयोग केलेलाआहे. किंचित उजव्या बाजूने फोटो काढला असता आणि क्षितिजरेषा मधोमध न ठेवता खाली ठेवली असती तर जास्त चांगला परिणाम साधता आला असता.
४. नैसर्गिक चौकट - प्रवेशिका ९ आणि १०
या दोनही छायाचित्रात नसर्गिक चौकटीचा अनावश्यक भाग टाळून अजून चांगला वापर करता आला असता.
५. विषयाला अनुसरून छायाचित्राची उभी किंवा आडवी चौकट ठरवणे - प्रवेशिका ६ आणि ११
... इत्यादी इत्यादी
१. मुक्त विभाग
मुक्त विभाग -१.
मुक्त विभाग -२.
मुक्त विभाग -३.
मुक्त विभाग -४.
मुक्त विभाग -५.
मुक्त विभाग -६.
मुक्त विभाग -७.
मुक्त विभाग-८.
मुक्त विभाग -९.
मुक्त विभाग -१०.
मुक्त विभाग -११.
मुक्त विभाग -
मुक्त विभाग म्हणाल तर खरं तर सोपा आणि तेवढाच कठीण. स्पर्धक आणि परीक्षक दोघांसाठीही. निसर्गचित्रणात सांगितलेले नियम इथेही लागू होतात मात्र त्याव्यतिरिक्त सर्वात महत्वाचा घटक म्हणजे विषय वस्तू (Subject Matter).
मुक्त विभागात असल्यामुळे छायाचित्रकाराला नेमके काय दाखवायचे आहे याची जबाबदारी छायाचित्राचीच असते. त्यासाठी ते तेवढेच सशक्त हवे. तेव्हा छायाचित्राची विषय वस्तू, रंग, प्रकाशयोजना, चौकटीची रचना या मूलभूत गोष्टी तसेच छायाचित्र काढण्यामागचा दृष्टीकोन/संकल्पना आणि त्याचा दर्शकावर पडणारा प्रभाव या सगळ्यांचाच विचार करायला हवा.
प्रवेशिका २, ५ आणि ७ - या तीनही छायाचित्रात त्यातील "पॅटर्न" अजून आकर्षक पद्धतीने दाखवता आला असता. उदा. प्रवेशिका २, मध्ये पाण्यावरचे तरंग थोड्या दुरून काढले असते किंवा पानांच्या नैसर्गिक चौकटीत बसवला असता तर अजून आकर्षक झाला असता. प्रवेशिका ३ मध्ये चौरसाकृती चौकट कदाचित जास्त चांगली दिसली असती. प्रवेशिका ७ मध्ये फक्त मोड आलेले मूग,मोड आणि जाळी असा फक्त पॅटर्न छान दिसला असता.
प्रवेशिका ३, ६ आणि ९ - या तीनही प्रवेशिकांमध्ये विषय वस्तू आकर्षक असल्या तरी चौकटीत थोडे बदल करून अजून छान दिसू शकल्या असत्या. जसे गणपतीच्या चौकटीत आणखी काही वस्तू दाखवता आल्या असत्या पायाखाली थोडीशी अजून मोकळी जागा सोडायला हवी होती. घरट्या-खालचा पंजा पूर्ण घेऊन थोडी चौरस चौकट आकर्षक वाटली असती. खेकडा थोड्या वेगळ्या कोनातून आणि पूर्ण घेता आला असता तर छान दिसला असता.
प्रवेशिका ११ - यात छायाचित्रकाराने चर्मकार, त्याच्या आजूबाजूला पसरलेल्या इतर गोष्टी/साधनं, प्रकाशयोजना आणि एकंदरीत मूड चौकटीत छान टिपल्या आहेत. उजवीकडची जागा थोडी मोकळी वाटते. कदाचित त्यात काही बसवता आले असते तर छायाचित्र अजून परिणामकारक झाले असते.
२. लॉकडाउन
२-१
२-२
२-३
२-४
२-५
२-६
आधीच उल्लेख केल्याप्रमाणे या विभागात एकही समर्पक छायाचित्र बघायला मिळाले नाही. आंतरजालावर या विषयावरची बरीच उत्तम छायाचित्रे बघायला मिळाली. उदाहरणादाखल काही देत आहोत. यात कौशल्य कॅमेराचे नाही तर चौकटीत नेमके काय दाखवायचे आहे त्यामागच्या कल्पनेचे आहे.
मिपाकर एस यांचे छायाचित्रणावर उत्कृष्ट लेख आहेत. सर्व धागे वाचनीय असले तरी छायाचित्रणाची माफक आवड असणाऱ्यांनी जरूर वाचावा असा एक धागा खाली देत आहोत.
प्रतिक्रिया
2 Aug 2021 - 8:47 pm | संजय पाटिल
तरी पण मि पयला!
2 Aug 2021 - 9:23 pm | श्रीरंग_जोशी
सर्व परिक्षकांना व स्पर्धेच्या आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद.
>> ५. विषयाला अनुसरून छायाचित्राची उभी किंवा आडवी चौकट ठरवणे - प्रवेशिका ६ आणि ११
या दोन प्रवेशिकांमधे हा नियम पाळला गेला आहे की नाही ते कृपया स्पष्ट करावे.
मुक्त विभागातल्या प्रवेशिका क्र. ८ बाबत काही परिक्षकांनी अभिप्राय द्यावा ही विनंती.
3 Aug 2021 - 12:39 am | किल्लेदार
प्रवेशिका ११ मध्ये हा नियम पाळला गेला आहे पण उजव्या बाजूची जागा मोकळी असल्यामुळे थोडे cropping करून छायाचित्र कदाचित अजून आकर्षक वाटले असते.
प्रवेशिका क्र. ८ योग्य रचनाविचाराअभावी अनाकर्षक वाटते. चारही बाजूने थोडी मोकळी जागा सोडून आणि एक वेगळ्या कोनातून काढला असता तर परिणामकारक झाला असता. कुठलेही पोर्ट्रेट काढताना त्या व्यक्तीचे डोळे बघणाऱ्याच्या दृष्टीला खिळवून ठेवतात. कार साठी हेडलाईट डोळे समजून त्या कोनातून एकदा प्रयत्न करून बघा...:)
3 Aug 2021 - 12:42 am | श्रीरंग_जोशी
सविस्तर अभिप्रायासाठी धन्यवाद.
तुम्ही दिलेल्या सूचना अमलात आणण्याचा प्रयत्न करीन.
2 Aug 2021 - 9:52 pm | गुल्लू दादा
मस्त. पुढल्या वेळी या बाबी लक्षात ठेवून छायाचित्रे काढल्या जातील. धन्यवाद.
2 Aug 2021 - 10:09 pm | मदनबाण
निकाल जाहिर झाला आहे आणि आता परिक्षकांचे मत दिले गेले आहे, तेव्हा स्पर्धकांनी व्यक्त होण्यास काही हरकत नसावी असे समजुन मी माझे स्पर्धक म्हणुन मत / माहिती देतो.
सर्व प्रथम एक सांगावेसे वाटते ते म्हणजे या धाग्यात जसे मोठ्या किंवा मूळ आकारात फोटो दिले गेले आहेत तसेच ते स्पर्धा घेण्यात आली तेव्हा केले असते तर अधिक उत्तम झाले असते.
मुक्त विभाग -३. गणपती बाप्पा [ बाल गणेश ]
हा मी नोकिया ७.१ मोबाइल वापरुन काढलेला फोटो आहे. माझ्या हापिसात माझ्याच फ्लोअरवर एक मुलगी होती जिच्याकडे डेस्कवर मी काही कामा निमित्त्य मी गेलो असता तिच्या डेस्कवर हा बाप्पा पहुडलेला दिसला ! मूर्ती पाहताच पहिली गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तीकार विशाल शिंदे [ त्रिमूर्ती आर्ट्स ] यांच्या घडणावळीतली आहे. मी त्या मुलीला मूर्ती कुठुन घेतली हे विचारुन याची खात्री करुन घेतली. मग पटकन तिला विचारुनच बाप्पाचे वेगवेगळ्या कोनातुन फोटो घेतले. स्पर्धेत दिलेल्या फोटोचे माझ्या दृष्टीने वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बाप्पाला कोणत्याही कोनातुन जरी पाहिले तरी बाप्पा तुमच्याचकडे पाहत आहे असे प्रतित होते. :)
या निमित्त्याने त्या मूर्तीकाराची मुलाखत देउन जातो...
जाता जाता :-
पुढच्या महिन्यात १० तारखेला बाप्पाचे आगमनाचे वेध हे अगदी आत्ता पासुन लागले आहेत. :) हा उत्साह असाच दिवसागणीक वाढत राहो म्हणुन अजुन काही अधिकचे व्हिडियो देउन जातो. :)
फेटा बांधलेला गणपती बाप्पा अधिक मनमोहक दिसतो...म्हणुन फेटा कसा बांधावा ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Love Me Like You Do - Ellie Goulding / Veena Cover by Wageshan
3 Aug 2021 - 4:27 am | तुषार काळभोर
फोटोग्राफी करताना काही मूलभूत चौकट म्हणून या लेखाचा खूप उपयोग होईल.
परीक्षकांचे मार्गदर्शनासाठी आभार...
3 Aug 2021 - 12:43 pm | प्रचेतस
उत्तम मार्गदर्शन.