हंस दर्शन

Primary tabs

जुइ's picture
जुइ in भटकंती
7 Jun 2021 - 12:41 am

हिवाळ्याच्या सुरुवातीपासून फेसबुकच्या स्थानिक फोटोग्राफी समुदायांवर हंसांचे फोटो बरेचदा दिसू लागले. आम्ही राहतो त्या मिनेसोटातल्या इतर ठिकाणी व ट्वीन सिटिजमधेही काही ठिकाणी हंस जवळून पाहता येतात असे कळले.

ते फोटोज पाहून आपणही हंस पाहायला जावे असे प्रकर्षाने वाटू लागले. अखेर २७ फेब्रुवारीला उत्तम हवामान अन इतर गोष्टी जुळून आल्या अन आम्ही Vadanis Heights येथील Sucker Lake ला जायला निघालो. घरुन जालावर शोधून Sucker Lake Pavilion 2 चा पत्ता ठरवला होता. परंतु फोनच्या जीपीएस प्रणालीत नेमका Sucker Lakeच्या दक्षिणेकडल्या पार्कींग लॉटचा पत्ता टाकला गेला. तेथील ट्रेलवर २० मिनिटे पायपीट केल्यावर गोठलेल्या तळ्यात हंसच काय इतरही पक्षांचे दर्शन होत नसल्याने आमची चलबिचल होऊ लागली.

हंस निघून गेले की काय असाही विचार मनात येऊ लागला. अखेर जॉगिंग करणार्‍या एका भल्या माणसाकडे चौकशी केली. तो म्हणाला मी स्वतः अजुन पाहिले नाहीये. परंतु इतर लोक तिथून पुढे उत्तरेकडे सरळ चालत जाऊन झाडीतल्या पायवाटेने उजवीकडे जाऊन तिथल्या ओढ्याजवळ हंस बघायला जात असतात. त्याच्याकडून ही मोलाची माहिती मिळताच आमच्यात पुन्हा उत्साह संचारला. आमची पावले ट्रेलवर वेगाने पडू लागली.

झाडीतल्या पायवाटेने पुढे गेल्यावर लांबवर एका पायावर उभा असलेल्या धानस्थ हंसाचे दर्शन झाले. शेजारी बरीच बदके होती.

पायवाटेने आणखी पुढे गेल्यावर लोकांची वाढणारी वर्दळ व त्यांच्या चेहर्‍यांवरचा उत्साह जाणवू लागला.

अखेर आम्हीही त्या ओढ्याजवळ पोचलो अन हंसांच्या समुहाचे पहिले दर्शन झाले.

पर्यटकांच्या वर्दळीचा हंसांवर कुठलाही परिणाम होताना दिसत नव्हता. ते स्थितप्रज्ञासारखे इकडून तिकडे फिरत होते किंवा त्यापैकी काही ओढ्यापलिकडे बर्फाच्छादित जमिनीवर उभे होते.

काही हंस तर ओढ्याच्या किनार्‍यावर येऊन पर्यटकांना एकदम जवळून दर्शन देत होते.


अचानक एका हंसाने आवाज काढला. तो Trumpet आवाज सारखाच होता. ते पाहून आमच्या कन्येने चौकशी केली की त्या हंसाने Trumpet कुठे लपवले आहे. ते हंस Trumpeter Swans प्रकारचे होते. मिनेसोटातले Trumpeter Swans फारसे स्थलांतर करायच्या फंदात पडत नाहीत.

लहानपणापासून हंसांचे वांङमयीन वर्णन बरेचदा वाचले होते. पण मनातल्या प्रतिमेहूनही त्यांचे प्रत्यक्ष दर्शन अधिक उत्कट असल्याची जाणीव यावेळी झाली.
तिथे १०-१२ मिनिटे घालवल्यावर आमची पावले परत फिरली. हंसांचे विलोभनीय रूप मनात साठवून आम्ही तृप्त भावनेने घरी परतलो ते दर हिवाळ्यात हंसाचे दर्शन घ्यायचे मनोरथ ठरवूनच.

योगायोगाने परवा फेसबुकवर कुणीतर हंसांच्या जोडप्याचा त्यांच्या पिलांसह फोटो टाकला. ते तळं आमच्या घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर होते. वीकांताच्या मुहूर्तावर आम्ही तिथे सकाळीच जाऊन धडकलो. त्या तळ्यात भरपूर जलपर्णी व वॉटर लिलीची रोपे दिसत होती. त्यामुळे सहजपणे हंस दिसत नव्हते. दुर्बीण वगैरे घेऊन फिरणार्‍या काही जणांकडे चौकशी केली असता ते बदक तळ्याच्या दुसर्‍या कोपर्‍यात आहेत असे कळले.

आम्ही आमचा मोर्चा तळ्याभोवतीच्या वाटेने तिकडे वळवला. एका ठिकाणी मासेमारीसाठी उभारलेला डेक होता. त्या शेजारून जाणार्‍या आजी आजोबांकडे चौकशी केली असता त्यांनी हाताने इशारा करून सांगितले की ते पहा हंसांचे कुटुंब आपल्या दिशेनेच येत आहे. ते पाहून आमचा उत्साह अनेक पटींनी वाढला. आम्ही डेकवरून त्या कुटुंबाचे मनसोक्त दर्शन घेतले. जोडप्याला ७ पिले होती. त्यापैकी सहा एका पालकाजवळ अन सातवे दुसर्‍याजवळ राहत होते किंवा एकटेच फिरत होते.

जलपर्णींमुळे फोटो स्पष्ट निघू शकले नाहीत.

एकाच वर्षांत दोन ऋतूंमध्ये हंसांचे दर्शन झाल्याने आम्हाला आत्यंतिक समाधान मिळाले.

हंस

प्रतिक्रिया

कंजूस's picture

7 Jun 2021 - 4:42 am | कंजूस

मिनेसोटातले Trumpeter Swans फारसे स्थलांतर करायच्या फंदात पडत नाहीत.
पक्के मिनेसोटाकर आहेत. 😀

चौथा कोनाडा's picture

7 Jun 2021 - 5:15 pm | चौथा कोनाडा

Trumpeter Swans म्हणत असतील ...
ठेविले बायडने, तैसेचि रहावे ... !

Bhakti's picture

7 Jun 2021 - 9:08 am | Bhakti

सुरेख!

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jun 2021 - 9:57 am | ज्ञानोबाचे पैजार

हंस: श्वेतो बक: श्वेतो को भेदो बकहंसयो: |
नीरक्षीरविवेके तु हंस: हंसो बको बक: ||

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

7 Jun 2021 - 11:05 am | तुषार काळभोर

नीरक्षीरविवेकबुद्धीचा स्रोत इथे आहे!

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2021 - 2:04 pm | श्रीगुरुजी

नीरक्षीरविवेके हंस आलस्यम् त्वम् एव तनुषे चेत्
विश्वस्मिन् अधुना अन्य: कुलव्रतं पालयिष्यति क:?

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jun 2021 - 2:41 pm | ज्ञानोबाचे पैजार

यत्रापि कुत्रापि गता भवेयु, हंसा महीमण्डलमण्डनाय ।
हानिस्तु तेषां हि सरोवराणां , येषां मरालैः सह विप्रयोग ।।

पैजारबुवा,

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2021 - 3:01 pm | श्रीगुरुजी

व्याघ्रः सेवति काननं च गहनं सिंहो गुहां सेवते
हंसः सेवति पद्मिनीं कुसुमितां गृधः श्मशानस्थलीम् ।
साधुः सेवति साधुमेव सततं नीचोऽपि नीचं जनम्
या यस्य प्रकृतिः स्वभावजनिता केनापि न त्यज्यते ॥

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jun 2021 - 11:26 am | ज्ञानोबाचे पैजार

ॐ सरस्वती मया दृष्ट्वा, वीणा पुस्तक धारणीम् ।
हंस वाहिनी समायुक्ता मां विद्या दान करोतु में ॐ ।।

पैजारबुवा,

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2021 - 2:46 pm | श्रीगुरुजी

हेलया राजहंसेन यत्कृतं कलकूजितम् ।
न तद् वर्षशतेनापि जानात्याशिक्षितुं बकः ॥

काकस्य गात्रं यदि काञ्चनस्य माविक्यरत्नं यदि चञ्चुदेशे ।
एकैकपक्षे ग्रथितं मणीनाम् तथापि काको न तु राजहंसः ॥

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jun 2021 - 6:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

माता शत्रुः पिता वैरी येन बालो न पाठितः ।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ।।

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

8 Jun 2021 - 6:51 pm | प्रचेतस

एकेन राजहंसेन या शोभा सरसो भवेत्।
न सा बकसहस्रेण परितस्तीरवासिना॥

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2021 - 6:54 pm | श्रीगुरुजी

नैर्मल्यं वपुषः तवास्ति वसतिः पद्माकरे जायते
मन्दं याहि मनोरमां वद गिरं मौनं च सम्पादय ।
धन्यस्त्वं बक राजहंसपदवीं प्राप्नोषि किं तै र्गुणैः
नीरक्षीरविभागकर्मनिपुणा शक्तिः कथं लभ्यते ॥

प्रचेतस's picture

8 Jun 2021 - 7:05 pm | प्रचेतस

कर्तुं यच्‍च प्रभ‍वति महीमुच्छिलीन्‍ध्रामवन्‍ध्‍यां
तच्‍छत्‍वा ते श्रवणसुभगं गर्जितं मानसोत्‍का:।
आकैलासाद्विसकिसलयच्‍छेदपाथेयवन्‍त:
सैपत्‍स्‍यन्‍ते नभसि भवती राजहंसा: सहाया:।।

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2021 - 7:36 pm | श्रीगुरुजी

काकस्य गात्रं यदि काञ्चनस्य माविक्यरत्नं यदि चञ्चुदेशे ।
एकैकपक्षे ग्रथितं मणीनाम् तथापि काको न तु राजहंसः ॥

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2021 - 7:38 pm | श्रीगुरुजी

अरेरे, चुकून परत टाकला. त्याऐवजी हा घ्या.

काकः पद्मवने रतिं न कुरुते हंसो न कूपोदके
मूर्खः पण्डितसंगमे न रमते दासो न सिंहासने ।
कुस्त्री सज्जनसंगमे न रमते नीचं जनं सेवते
या यस्य प्रकृतिः स्वभावजनिता केनापि न त्यज्यते ॥

सुबोध खरे's picture

10 Jun 2021 - 6:56 pm | सुबोध खरे

वा ! सुभाषितमाला सुंदर आहे.
सर्वच्या सर्व श्लोकांचा शब्दशः अर्थ कळला नाही तरी गोषवारा समजण्याइतके त्रोटक संस्कृत येते त्यामुळे मजा आली

सुबोध खरे's picture

10 Jun 2021 - 6:59 pm | सुबोध खरे

बक: श्वेत: हंस : श्वेत:
को भेदो बक हंसयो:
नीर क्षीर विवेकेतु
हंसो हंसो बको बक :

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2021 - 10:03 am | श्रीगुरुजी

भाग्यवान आहात. सुंदर प्रकाशचित्रे!

गॉडजिला's picture

7 Jun 2021 - 10:41 am | गॉडजिला

:)

गुल्लू दादा's picture

7 Jun 2021 - 12:32 pm | गुल्लू दादा

चित्रे सुंदर आहेत....धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2021 - 2:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हसंदर्शनाअगोदरची ती शुभ्र बर्फाच्छादित आणि मधे असलेला रस्ता असलेला पहिल्या लंबरचा फोटो लैच आवडला. ”ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा” बाकी छायाचित्र अतिशय सुंदरच. ’एका तळ्यात होती, हंसपीले सुरेख. एखादं पीलू वेगळं होतं का....! :)

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

7 Jun 2021 - 5:16 pm | चौथा कोनाडा

वा वा, किती सुंदर !
हंस दर्शने मन प्रसन्न प्रसन्न !

मदनबाण's picture

7 Jun 2021 - 10:27 pm | मदनबाण

सुंदर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim Walsh

प्रचेतस's picture

8 Jun 2021 - 8:08 am | प्रचेतस

भारी आहेत हे हंस

गोरगावलेकर's picture

9 Jun 2021 - 8:06 pm | गोरगावलेकर

सुंदर हंस दर्शन

धर्मराजमुटके's picture

10 Jun 2021 - 12:02 am | धर्मराजमुटके

लेखातील वर्णन प्रकाशचित्रे आणि त्यावरील संस्कृत प्रतिसादमाला ! मन तोषले. मात्र मला हा एकच हंस राहून राहून आठवतो. उतार वयाकडे झुकू लागल्यावर असले काही आवडते की मन वैरागीपणाकडे झुकू लागल्यावर असे होते कोणास ठाऊक !

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2021 - 10:37 am | चौथा कोनाडा


हा एकच हंस


+१

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2021 - 7:04 pm | श्रीगुरुजी

अजून एक -

राजहंस किमिति त्वमिहाSSगतोऽसि
योSसौ बकः स इह हंस इति प्रतीतः |
तद्गम्यतामनुपदेन पुनः स्वभूमौ
यावद्वदन्ति च बकं खलु मूढ लोकाः ||

रायनची आई's picture

16 Jun 2021 - 10:19 pm | रायनची आई

फारच सुन्दर.. सर्व फोटोज खूप आवडले. अगदी जवळून हंस बघत असल्यासारख वाटल..

जुइ's picture

19 Jun 2021 - 1:16 am | जुइ

सर्व वाचकांना व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.
सुभाषितांसाठीही धन्यवाद.

चौकस२१२'s picture

15 Jul 2021 - 11:06 am | चौकस२१२

मिनेसोटा म्हणलं कि ""फार्गो" मालिका आठवते आणि अंगावर शहारा येतो !
त्याचा पहिला भाग आणि बोली बॉब थॉर्नटन चा अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन

https://en.wikipedia.org/wiki/Fargo_(TV_series)

Nitin Palkar's picture

15 Jul 2021 - 6:58 pm | Nitin Palkar

त्यातील एक कलहंस तटी निजेला
जो भागला जलविहार विशेष केला
टाकी उपानह पदे अतिमंद सेवी
हस्ती करी वलय उंच अशा उपायी
भूपे हळूच धारील कलहंस पायी
--- रघुनाथ पंडीत

मदनबाण's picture

15 Jul 2021 - 7:40 pm | मदनबाण

धागा परत उघडला... १४ वर्ष मागे गेलो.
अस्मादिक हंसाना स्वतःच्या जवळ बोलवताना... स्थळ :- डेन्मार्क मधील एक सुंदर तलाव.

P1

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - I know that I am intelligent, because I know that I know nothing. :- Socrates

टर्मीनेटर's picture

3 Aug 2021 - 7:39 pm | टर्मीनेटर

सुंदर वर्णन आणि फोटोज 👍