एक कथा आणि काही प्रश्न !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
7 May 2021 - 8:13 pm

नमस्कार !
आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती सांगता सांगता टप्प्याटप्प्याने काही प्रश्न विचारतो. त्यांची उत्तरे मनात देत रहा.

मग चालू करूयात ?

१. एका गरीब रिक्षाचालकाच्या रिक्षेत एक तरुणी बसली आहे. गाडी सिग्नलला थांबलीय. तेवढ्यात रस्त्यावरची एक भटकी मुलगी त्या तरुणीची पर्स पळवते आणि जोरात पळू लागते. अशा प्रसंगी तो रिक्षाचालक रिक्षा थांबवून आणि आपला कामधंदा सोडून त्या चोर मुलीचा पाठलाग करेल, की त्या तरुणीला उतरवून आपले भाडे घेऊन निघून जाईल ?

२. त्या चोर मुलीला पळता पळता अन्य एका गाडीची धडक बसून ती रस्त्यावर बेशुद्ध पडली आहे. समजा, त्या रिक्षाचालकाने तिचा पाठलाग केलेला असता, तर आताचे दृश्य पाहून तो निघून जाईल की त्या मुलीला रुग्णालयात नेईल?

३. समजा, त्याने तिला रुग्णालयात नेलेच तर तो तिथे डॉक्टर व पोलिस यांच्या ताब्यात तिला देऊन निघून जाईल, का त्या अनोळखी चोर मुलीची काळजी घ्यायला तिथेच थांबेल ? रिक्षातील प्रवासी तरुणी या प्रकरणात लक्ष घालेल की नाही ?

४. एक श्रीमंत वृद्ध माणूस दिल्लीमध्ये भटकायला निघाला आहे. तो शोध घेतोय खऱ्याखुऱ्या प्रामाणिक माणसाचा ! त्याच्या जवळ भरपूर संपत्ती आहे आणि त्याला स्वतःचे मृत्यूपत्रही करायचे आहे. तो जाणून आहे की त्याची मुले व्यसनी, जुगारी व अप्रामाणिक आहेत. आता योगायोगाने हा श्रीमंत माणूस वरच्याच रिक्षाचालकाच्या रिक्षात बसलाय. त्याचा पंधरा-वीस मिनिटे प्रवास होतो. त्या दरम्यान रिक्षाचालकाशी जीवनासंबंधी काही मूलभूत गप्पा होतात. पुढे रिक्षा इच्छितस्थळी पोहोचते. हा प्रवासी पैसे देतो. मीटरनुसार झालेले पैसे दिलेल्या रकमेपेक्षा फक्त तीन रुपयांनी कमी आहेत. तर रिक्षाचालक आपणहून ते तीन रुपये सुटे परत करेल का ? समजा, एवढी क्षुल्लक रक्कम परत घ्यायची प्रवाशाची तयारी नसली तरीसुद्धा हा चालक ते ३ रु. परत करायचा आग्रह धरेल का ?

५. वरच्या घटनेनंतर तो श्रीमंत माणूस मरण पावलाय. मृत्यूपूर्वी त्याने एका मित्राच्या साक्षीने त्याचे जुने मृत्युपत्र बदलून नवे स्वहस्ताक्षरात लिहिलेय. त्याद्वारे त्याने आपली संपत्ती कोणाला देऊ केली असेल ? तो ज्याचा शोध घेत होता तो प्रामाणिक माणूस त्याला सापडला असेल काय ?

६. आपल्या गोष्टीतील मुद्दा क्रमांक १ मधल्या चोर मुलीची तब्येत आता बिघडली आहे. ती अनाथ आहे. सदर रुग्णालय खाजगी आहे. त्या मुलीवर मोठी शस्त्रक्रिया करायची आहे व तिचा खर्च बऱ्यापैकी आहे. हे सर्व त्या रिक्षाचालकाला कळलेले आहे. आता तो स्वतःला या सर्वापासून अलिप्त ठेवेल की त्याच्या आवाक्याबाहेरील तो खर्च करेल ? समजा त्याने तो केलाच तर त्याला यश येईल की अपयश ?

७. आता पुन्हा श्रीमंत माणसाकडे वळू. त्याला अपेक्षित असलेला प्रामाणिक माणूस सापडला होता. अर्थातच तो पूर्ण अनोळखी आणि त्याच्या राहण्याचा पत्तासुद्धा माहीत नसलेला. त्यावर एका फटक्यात त्याने मृत्युपत्रात आपली सर्व संपत्ती या अनोळखी माणसाला देऊ केली आहे. श्रीमंताच्या मृत्यूनंतर त्याचे मृत्युपत्र एक वकील जाहीर करणार आहे. त्यात एक अट घातलेली आहे. त्यानुसार वकिलाचे कर्तव्य आहे की तो प्रामाणिक माणूस ठराविक मुदतीत शोधून काढणे. मात्र जर का तो सापडलाच नाही तर मग संपत्ती जैविक वारसांना जाणार आहे.

८. प्रामाणिक माणूस शोधण्याचे काम त्या श्रीमंताच्या साक्षीदार मित्रावर सोपवलेले आहे. श्रीमंताच्या एका मुलाने या मित्राला वश करून घेतले आहे व (प्रामाणिक माणूस न शोधण्याबद्दल) संपत्तीचा काही भाग द्यायचे कबूल केले आहे. मग आता हा मित्र कसा वागेल ? तो कष्ट घेऊन संबंधित प्रामाणिक माणूस शोधेल की स्वार्थ महत्त्वाचा मानेल ?

९. समजा, अखेरीस तो प्रामाणिक माणूस सापडला आहे आणि तो म्हणजे आपल्या गोष्टीतील रिक्षाचालकच आहे ! आता वकिलाने या गरीब चालकाला सर्व परिस्थिती समजावून सांगितली आहे. मृत्युपत्राची अंमलबजावणी करण्याची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. सदर संपत्ती ३० कोटी रुपये आहे ! ही संपत्ती खरच त्या रिक्षाचालकाला मिळेल काय? समजा, मिळणार असेल तर ते कळून तो आनंदाने बेभान होईल का ?

१०. आपला रिक्षाचालक व मुद्दा १ मधील त्याच्या रिक्षातील प्रवासी तरुणी यांचे एव्हाना काही ‘नाते’ जुळत आले असेल का ?

११. स्वकष्टार्जित कमाई आणि कष्टाविना झालेला प्रचंड धनलाभ यात काय श्रेष्ठ समजायचे ? या प्रश्नाचे कल्पनेतील नैतिक आणि वास्तवातील उत्तर एकच असते की वेगळे ?

बस्स !

आता माझी गोष्ट संपली त्यातील प्रश्नांना तुम्ही मनात उत्तरे तयार केली असतीलच. आता तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत. एक तर तुमच्या विचारांनुसार त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची किंवा.........

सरळ ‘प्राईम’वरचा ‘अमल’ हा हिंदी चित्रपट बघायचा !
….
….
….
चित्रपटाबद्दल मी एवढेच लिहीतो :

• 2008 चा रिची मेहता दिग्दर्शित
• Genie पुरस्कार प्राप्त ( सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व नायक दोघांना)
• हिंदी व इंग्लिश मिश्र भाषेत
• रिक्षाचालकाच्या (अमलकुमार) अप्रतिम भूमिकेत रुपिंदर नागरा
• श्रीमंत माणूस अर्थातच नासिरुद्दीन शाह
• वकील स्त्रीच्या भूमिकेत सीमा बिस्वास.

सुंदर चित्रपट ! मला आवडला.

ok

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

कॉमी's picture

7 May 2021 - 8:21 pm | कॉमी

बघायला लागतोय.

सनईचौघडा's picture

7 May 2021 - 8:58 pm | सनईचौघडा

लेखकाने एखादा चित्रपट सांगितल्यावर त्याची यु ट्युब वरिल लिंक लगेच द्यावी अन्यथा दुसराच कुठला तरी चित्रपट पहाण्यात येतो.

मी केदार शिंदेंनी त्यांच्या धाग्यात सांगितल्यानंतर प्रेमम हा चित्रपट शोधला तर मला दाक्षिणात्य २ प्रेमम वेगवगळे कथा असलेले पहयला मिळाले दोन्हीही खुप सुंदर आहेत.

तसेच प्रेमम-२ प्रेमम-३ हे पण आहेत.

आपण सांगितलेला चित्रपट खालील लिंक वर आहे.

https://www.youtube.com/watch?v=kw9XhaAsvmE

चौथा कोनाडा's picture

10 May 2021 - 10:09 am | चौथा कोनाडा

धन्यवाद, सनईचौघडा "अमल" च्या तूनळी धाग्यासाठी !
आता वेळ काढून बघतो एकदा !

(घागाकर्त्याची चित्रपटाची ओळख करुन द्यायची पद्धत खुप भारी !

कुमार१'s picture

7 May 2021 - 9:11 pm | कुमार१

कॉमी जरूर पहा व इथे पुन्हा या !

सचौ,
सूचनेबद्दल धन्यवाद. मी हा प्राईमवर पहिल्याचे लेखात नमूद केलेच आहे.
तिथे एकच अमल आहे.

कथेवरुन (व स्टारकास्ट वरुन) प्रकरण समांतर डावखुरे वगैरे वगैरे वाटत आहे... आपलं धाडस नाही बघायचं असलं काही पण तुम्ही रेकमेंड करत आहात तर थोडा कोलोटी टायम इस्पेंड क्रावा म्हंटो.

कुमार१'s picture

7 May 2021 - 9:34 pm | कुमार१

प्रकरण समांतर डावखुरे वगैरे वगैरे

नाही हो ! एक छान चित्रपट आहे.
मला डावे/उजवे नाही कळत. एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला आवडला.
कलाकारांची कामे अप्रतिम.
रिक्षा प्रवासाचे सुरेख चित्रण.

तुषार काळभोर's picture

7 May 2021 - 9:57 pm | तुषार काळभोर

डॉक्टरांकडून चक्क चित्रपट परीक्षण + रेकमेंडेशन !

भावना भिजवून तुमचा खिशातील पैसे त्यांच्या खिशात जावेत. प्रत्येक प्रेक्षक गटाची आवड काय हे निर्माते दिग्दर्शक ओळखून असतात.
तर अशी ही सत्य घटना आहे. वरच्या कारणासाठी तरी अवश्य पाहावा.
( भिजवलेला प्रतिसाद.)

मित्रहो's picture

8 May 2021 - 10:28 am | मित्रहो

चित्रपटाची ओळख करुन द्यायची पद्धत आवडली. चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली

लई भारी's picture

8 May 2021 - 11:58 am | लई भारी

शेवटपर्यंत अंदाज नाही येऊ दिला कशाबद्दल लेख आहे :-)
चित्रपटाची ओळख करून देण्याची पद्धत आवडली. जरूर बघेन.

कुमार१'s picture

8 May 2021 - 12:22 pm | कुमार१

मी एक सामान्य प्रेक्षक म्हणून हा चित्रपट पाहिला.
मला तो आवडला. त्याचा इथे परिचय सरधोपट मार्गाने करून देण्यापेक्षा लेखनाची एक वेगळी पद्धत आजमावून पाहिली.
😀

एखादा चित्रपट आवडणे/ नावडणे हे व्यक्तिसापेक्ष आहे याबद्दल दुमत नाही
आभार !

आग्या१९९०'s picture

8 May 2021 - 1:46 pm | आग्या१९९०

आवडला चित्रपट. केवळ आणि केवळ आपल्या अनोख्या लिखाणशैलीमुळे उत्सुकता ताणली गेली आणि मी चित्रपट बघितला.
धन्यवाद डॉक्टर.

सुधीर कांदळकर's picture

10 May 2021 - 6:33 am | सुधीर कांदळकर

नावीन्यपूर्ण, कल्पक रसास्वाद. आवडला.

कुमार१'s picture

10 May 2021 - 10:41 am | कुमार१

अभिप्राय व उत्सुकता दाखवल्याबद्दल वरील सर्वांचे मनापासून आभार !

कुमार१'s picture

14 Nov 2021 - 1:31 pm | कुमार१

या चित्रपटाच्या कथेशी साधर्म्य दाखवेल अशी वास्तवातील घटना:

वृद्ध महिलेने रिक्षाचालकाला दिला तीन मजली बंगला आणि करोडोंची संपत्ती
https://www.loksatta.com/trending/the-old-woman-gave-the-rickshaw-puller...

चित्रपट तुकड्या तूकड्याने पाहिला होता.. त्यामुळे कदाचित आवडला नसावा. परत एकदा पाहीन.