जीवनसाथी हा मानवी नात्यांचा सुंदर लेख वाचून मला हे दोघेच आठवले.
दुपारच कळकळीत ऊन खिडकी बाहेर मोकळ्या अर्धवट बांधलेल्या प्लॉटवर वेगवेगळी झाडे झुडप उगवली आहेत.काही ओळखीचे उंबर ,बोरीच ,टनटनीच,निंबाच आणि काही अनोळखी रानटी झाड आहेत .मोकळा पडीक असूनही एक जैवविविधतने भरलेली ही जागाच आहे.माझ्या स्वयंपाक करण्याच्या रोजच्याच चक्रात करमणुकीचा टी व्ही च जणू इवल्याशा निसर्गाचा वेगवेगळा तुकडाच!
वेगवेगळ्या रंगांनी नटलेली वेगवेगळी फुलपाखर दिवसभर बागडत राहतात.मेंदूच्या उजव्या बाजूला मनाशी जोडत राहतात.चिमण्या तळहातापेक्षा चिमुकल्या काही फिक्कट हिरव्या तर गर्द काळी चिमणी उन्हात चमकली की निळसर मोरपंखी रंगांत चमकते.खारुताई आधी यायच्या पण आता पलीकडच्या आंब्याच्या झाडावर त्यांनी बस्तान मांडलाय तिथूनच त्यांची सोय चांगली होती.कधी कधी मांजरी फिरत असतात,एखाद्या पाखराची शिकार करायला.पण मुलखाच्या भित्र्या वाटतात ,जरासा मोठा आवाज झाला की पळून जातात.पाळीव आहेत त्या ,लाडावलेल्या आहेत . त्यांच्यापेक्षा ही स्वैर पाखर बिनधास्त वाटतात.
शेवटची पोळी करून बाजूला होत होते तर तेवढ्यात हे दोघे दिसले.पानगळीत थोड्याफार पानांचा साज ल्यायलेल्या अस्तावस्त वाढलेल्या बोरीच्या झाड्याच्या फांद्यांवर उंबराच्या थंड सावलीत एकमेकांशी खूपच जवळ बसलेले दोन पक्षी!राखाडी रंगांचे डोक्यावर झुबकेदार तुरे ,लांबट शेपूटाची पिसे असलेले बुलबुल .काय कुजबुज चालली होती कोण जाणे.मी आपली दोन क्षण न्हायाळलं आणि दुसऱ्या कामाला लागले.
दुसऱ्या दिवशी जोडप्याच पुन्हा दर्शन झाल आणि आता रोजच होत.कधी कधी नाही येत ,दुसरीपण एखादी जागा असेल त्यांची अशीच .
तासंतासन गुलू गुलू बोलत असतात बर.पाखर सकाळी किलबिलाट करत उंच उडत दाणा,किडे-कीटक टिपायला जातात .घरटी बांधतात .पिल्लांची काळजी घेतात.हे दोन बुलबुल तासंतास इथेच बसून राहतात.शांत कधी कधी एकमेकांकडे पाहतात बारीक आव्वाज करतात. भांडत वा गाणीही गात नाहीत.नुसत्या गप्पा मारतात.आयुष्याच्या उतारावर आले आहेत का हे?नवरा बायको आहेत की प्रेमी?असे काही बाही प्रश्न मला सतावू लागले.पण पक्ष्यांमध्ये कुठे नात्याचा दोर असतो त्यांच्यात असतो तो फक्त निसर्ग!
पण अशी शांत पक्ष्यांची जोडी मला निराळीच होती नाहीतर लाईटच्या तारेवर मोठमोठ्याने गुटूरर्र करणारे पारवे,जोडपी दिवसभर फिरतात त्यात काही नाविन्य वाटतच नाही.या बुलबुल जोडप्याची सगळी कर्तव्ये संपलेली असतील नाहीतर दोन क्षण निवांत म्हणून उन्हापासून मुक्ती घेत एकमेकांच्या सानिध्यात विसावत असावेत.
एकदा एक मांजर टक लावून या दोघांकडे पाहत होती ,माझी तर ही झडप घालते काय म्हणून घालमेल झाली ,हिला शुक शुक करावी तर दोघांची समाधी मोडायची.पण प्रसंग टळला.मांजारीबाई नेहमीप्रमाणे काही न करत निघून गेल्या.पण दोघांना काहीच फरक पडत नाही.
पण मला वाटत त्यांनी कधीतरी समाधी तोडून कोकिळेसारख सुरांत सूर मिसळावे.पण हे दोघे खरच वेगळे आहेत,एखादा हळूच उडून जातो आणि दुसरा तिथेच असतो ,पुन्हा तो आला की दोघेही उडून जातात.असे घट्ट विणलेले जीवनसाथी सारख्या गाथा पक्षांतपण आहे पाहून मन सुखावलं.
---भक्ती
प्रतिक्रिया
28 Apr 2021 - 3:48 pm | मुक्त विहारि
आवडलं
28 Apr 2021 - 10:11 pm | Bhakti
:)
29 Apr 2021 - 10:58 am | गॉडजिला
29 Apr 2021 - 1:30 pm | प्रचेतस
छान लिहिलंय.
29 Apr 2021 - 3:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान लिहिलंय आवडलं. त्या दोघांचा फोटो प्लीज. :)
मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाची आठवण झाली.
-दिलीप बिरुटे
29 Apr 2021 - 5:50 pm | Bhakti
:)
ते दोघे आले की नक्की फोटो देईन.
30 Apr 2021 - 1:22 pm | सिरुसेरि
सुरेख निरीक्षण आणी मांडणी .
30 Apr 2021 - 3:20 pm | Bhakti
:)