खर्चाची बाराखडी

Primary tabs

साहना's picture
साहना in काथ्याकूट
30 Mar 2021 - 12:21 pm
गाभा: 

गुंतवणूक ह्या विषयावरील माझे सर्व ज्ञान स्वानुभवाचे ज्ञान आहे. MBA फायनान्स ची मी सुरुवात केली होती पण २ महिन्यात सोडून दिली. ह्यांत टिप्स आणि ट्रिक्स नसून गुंतवणुकीचे तत्वज्ञान मांडले आहे आणि स्वानुभवाने ते मी कसे प्राप्त केले ह्यांचे किस्से लिहिले आहेत. सिरियसली घेऊ नये.

बचत ह्या विषयावर जास्त विचार करण्याआधी खर्च ह्यावर जास्त चिंतन करायला पाहिजे. खर्च नेहमीच कमी करावा असे काही लोक समजतात. दुर्दैवाने हे खरे नाही. कुठेही अति करू नये तसेच योग्य वेळेस फाटलेला कापड शिवला नाही तर काही वेळाने तो चिंधी होतो हे सुद्धा खरे आहे.

खर्चाचे अनेक प्रकार असतात.

- अनुभवावरील खर्च. - प्रवास, डिनर, चित्रपट वगैरे.
- वस्तूवरील खर्च - टीव्ही घेणे, कपडे घेणे.
- लायेबिलिटी वाढवणारे खर्च (म्हणजे एकदा घेऊन होत नाही ह्यावर पुन्हा पुन्हा खर्च करायला पाहिजे) : घर, गाडी, मुले, लग्न इत्यादी.
- गुंतवणूक म्हणून दुहेरी बाजू असणारे खर्च : घर , शिक्षण, व्यवसायाला लागणारे साधन इत्यादी.
- अनपेक्षित खर्च : आरोग्य, आईवडिलानाच्या आरोग्यावरील खर्च इत्यादी.
- धर्मादायी खर्च.

हे सर्व खर्च तारतम्य दाखवून केले तर त्यातून बरीच बचत होते. आणि बचत केलेला प्रत्येक रुपया हा एका अर्थाने तुम्ही नवीन कमावलेला रुपया असतो.

अनुभवावरील खर्च :

माझ्या मते हा सर्वांत महत्वाचा खर्च आहे. पृथ्वीवर आपले अस्तित्व मर्यादित काळापर्यंत आहे. आपल्या जीवनाची सांगता कुना कॉर्पोरट ऑफिसांत खर्डेघाशी करत राहण्यात किंवा गिर्हाईकाशी हुज्जत घालण्यात नाही. उलट आपली करमणूक, आपल्या प्रियजनासोबत वेळ घालविणे ह्यांत आहे. त्यामुळे ह्या गोष्टीवर आपण चांगला खर्च करत आहो कि नाही ह्यावर नेहमीच नजर ठेवावी. काही परिवाराला कधी शहराबाहेर घेऊन जात नाहीत पण मारताना बँकेत लक्षावधी रुपये ठेवून मरतात.

वाचायला पुस्तके, पर्यटन, पाहायला चित्रपट, प्रियजनांना भेटवस्तू, बाहेर डिनर ह्या गोष्टी प्रमाणात कराव्यात. त्याशिवाय हे पैसे फक्त आपण आपल्यावरच खर्च न करता इतर लोकांवर सुद्धा कराव्यात त्यामुळे सर्वच अनुभव द्विगुणित होतो. अनेक वेळी मंडळी "ती युरोप टूर वर गेली म्हणून मला सुद्धा जायला पाहिजे" अश्या प्रकाराने खर्च करतात. असे कधीही करू नये. उलट जास्त लोक घेत नाहीत असे अनुभव आपण घेतल्यास त्याची मजा और असते आणि तिथे पैश्यांची बचत सुद्धा होते. उदाहरण म्हणजे पुस्तके विकत घेऊन वाचण्याऐवजी लायब्रेरीत जाऊन वाचल्यास स्वस्त पडतात आणि इतर वाचकांची ओळख होते. पुस्तके विकत घेतल्यास १ वर्षांत सेकंड हॅन्ड म्हणून विकून टाकावीत किंवा कुणाला दान करावीत.

पर्यटनाचे सुद्धा असेच आहे. प्लॅनिंग व्यवस्थित करावे, आपल्याला जे अनुभव पाहिजेत त्याला प्राधान्य द्यावे आणि बहुतेक वेळा उगाच टूर सोबत जाण्याऐवजी आपण स्वतः गेलात तर स्वस्त पडते. माझ्या साठी नाईट लाईफ, रस्ते आणि अन्न ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे मी त्या दृष्टीने प्लॅनिंग करते. आजपर्यंत कधीही टूर घेतला नाही.

पर्यटन, डिनर, चित्रपट ह्यांना एकवेळचे प्रॉजेक्त्त म्हणून पाहण्याच्या ऐवजी एक रेगुलर प्रोजेक्त म्हणून पाहा. २०३० साली मी युरोप टूर करणार आणि त्यासाठी हि RD केली आहे असा विचार करावा. २०३० मध्ये युरोप टूर ची किंमत साधारण ५ लाख रुपये येईल तर तुम्हाला दर दिवशी १५० रुपये बचत करणे आवश्यक आहे. इथे मी गुंतवणुकीवर परतावा हा विचार केला नाही. आपले सध्याचे इन्कम, ते कसे वाढेल हे सर्व विचार करून हि टूर परवडेल कि नाही हा विचार करावा.

त्यासाठी आधीच यौटूंब वरून रिसर्च करावा त्यामुळे २०३० तुमच्याकडे बरीच माहिती असेल आणि तुम्ही खूप पैसे वाचवू शकालाच पण नक्की काय पाहायला हवे आहे हे सुद्दा तुम्हाला ठाऊक असेल. हाच नियम सर्व प्रवासाला लागू करावा.

ह्याच्या अगदी उलट सुद्धा करता येते. फक्त पैश्यांचे टार्गेट ठेवावे. आणि मग एक दिवस अचानक गाडी घेऊन कुठेही जावे आणि अनपेक्षित पणे सर्व अनुभव घ्यावेत. पण अश्या अनुभवांना अनुभवण्यासाठी काही सामान्य ज्ञान (सुरक्षिततेच्या दृष्टीने) घेणे गरजेचे आहे. माझा एक वर्गमित्र असाच एक दिवस कुठे ट्रेक साठी एकटाच गेला आणि ८ वर्षांनी त्याचा सापळा कुणाला तरी सापडला. रिस्क घ्यावी पण मूर्ख पणाने नको. पर्यटनात सुद्धा आपले वय वाढते तशी आपली शारीरिक क्षमता कमी होत जाते हे लक्षांत असू द्या. एवरेस्ट बेसकैम्प जायचे असेल तर शक्य असेल तेंव्हा लवकर जा. लंडन आपण कधीही जाऊन पाहू शकतो.

- वस्तूवरील खर्च - टीव्ही घेणे, कपडे घेणे.

हा सर्वांत चुकीचा खर्च. अर्थांत टीव्ही किंवा कपडे घेणे आवश्यक आहेच पण इथे तारतम्य दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. महिला वर्गाला वस्त्र आणि दागिने प्रिय असतात. आपण एखादा कापड घेतला कि त्याची किमंत दुसऱ्या दिवशी शून्य आहे. पण दागिने तसे नसतात, ह्यांना किंमत असते. पण अनेक महिला घेतलेले दागिने विकत नाहीत. माझ्या मते दागिने भरमसाठ किमतीचे न घेता छोटे सटल प्रकारचे घ्यावेत आणि काही वर्षांनी विकून दुसरे घ्यावेत. ह्यातून दागिने प्रकाराबद्दल आपले ज्ञान वाढत जाते. पेहेरावांत व्हरायटी येते आणि उगाच दागिन्यात आपले मन अडकून राहत नाही. दागिने लॉकर मध्ये कुजत ठेवण्यात अर्थ नाही. वर्षाला किमान १०-१५ वेळा तरी घालायला मिळावेत, प्रवासांत न्यायला मिळावेत असे घ्यावेत.

वस्तूवरील खर्च माझ्या मते नेहमी "बाय वन्स अँड फोरगेट" प्रकारचा करण्यावर भर द्यावा. हाईक साठी ८००० रुपयांचे वूडलॅंड चे भारी बूट घेतले होते शेकडो मैल चालून ७ वर्षे झाली तरी आहे तसेच आहेत. सन ग्लासेस मध्ये रॅन्डॉल्फ आणि अमेरिकन ऑप्टिकल चे ग्लासेस मी ५ वर्षांपूर्वी घेतले होते. मी मेल्यानंतर सुद्धा कुणी तरी वापरू शकेल असली प्रकरणे आहेत. त्याशिवाय ह्या वस्तू दशको दशके वापरण्याची एक स्टाईल आहे ती वेगळी. काही सेलेब्रिटी मंडळी हातांत जुनाट घड्याळ अभिमानाने घालतात आणि सांगतात कि माझ्या आजोबानी द्वितीय युद्धांत घातलेले हे घड्याळ आहे. ह्यांत शान आहे आणि पैश्यांची बचत सुद्धा आहे. टीव्ही, संगणक, फोन वगैरे गोष्टी दर वर्षी बदलण्यासाठी न घेता किमान ५ वर्षे वापरली जातील अशीच घ्यावी.

घरांत शो पीस वगैरे कधीही महागडे घेऊ नयेत. परिवारातील लहान मुलांनी काढलेली चित्रे. आजीने शिवलेली गोधडी. स्वतः काढलेली चित्रे लावावीत. हि बेढब वाटली तरी त्यातून घराचे जे सौंदर्य वाढते ते पैश्यांनी वाढवले जाऊ शकत नाही.

अनेक खर्च हे शेवटी रिकरिंग असतात, सौंदर्य प्रसाधने, अन्न, औषधें, दररोज चे कपडे इत्यादी. इथे अनेक लोक चूक करतात कि गरज पडेल तेंव्हा पाहिजे त्याच वस्तू घेतात. असे करून नये. ग्रोसरी रन महिन्याला १-२दाच करावी आणि बक्कळ सामान घरी आणून ठेवावे. तांदळाचे अक्खे पोते. घी चे ४ डबे, कोलगेटच्या ६ ट्यूब्स म्हणजे आपल्या कुटुबांची साईझ पाहून ह्या गोष्टी घ्याव्यात. होलसेल मध्ये आणि ठराविक ठिकाणीच घेतले तर स्वस्त पडते. त्याशिवाय भरपूर गोष्टी घेतल्या कि आपण इतरानावश्यक गोष्टी घेण्याच्या नादांत पडत नाहीत.

कपड्याच्या बाबतीत आपले २-३ ब्रॅण्ड्स ठरवून तेच घ्यावेत. त्यांच्या ऑनलाईन सर्व्हिस ला सबस्क्राईब करावे म्हणजे तुम्हाला कुपोन्स वगैरे येतील ती वापरावीत. सर्वसाधारण कपडे एकदम ६-७ घेऊन ठेवावेत.

अनेक लोक वाट्टेल तेंव्हा जीन्स घेतात आणि तिला मग ३-४ वर्षे झिजवतात. वर्षाला भले २-३ जीन्स घ्या पण एक ठराविक प्रकारची घ्या म्हणजे लेवाईस ५०१ स्किन फिट वगैरे. ह्यातून पैसे वाचतात करत वर्षाला ठराविक वेळा ह्यांचा सेल येतो. ह्यांचे डिसाईन आणि दर्जा कालजयी आहे.

खर्चाच्या ह्या कक्षेत एक गोष्ट टाळायची असते ती म्हणजे इम्पल्सिव्ह होऊन काहीही घ्यायचे नाही. नवीन फोन, कुल घड्याळ, काहीही नको. घ्यायचे असेल तर किमान १ आठवडा नाहीतर एक महिना थाम्बावे. त्याशिवाय आपल्याला पाहिजे ती गोष्टच घेऊन मॉल मधून बाहेर पडावे. आणखीन काही आवडले तर मग "पुढच्या रविवारी घेऊ" असा विचार करून घरी यावे.

आणि घरात वापरात नसलेल्या ज्या गोष्टी असतील त्या ताबतोब विकून काढाव्यात. व्यायामाची साधने, जुने फोन, बूट्स पुस्तके, स्वेटर, इत्यादी नाहीतर घरी कामाला येणाऱ्या लोकांना दान म्हणून द्यावे.

महागड्या गोष्टी लायकी पाहूनच घ्याव्यात. महागडी गोष्टी घेऊन त्यावर चिंता करत बसणे ह्या पेक्षा दळिद्री मानसिकता नाही. लोन काढून आयफोन घेतात आणि त्याला मोठे चिलखत वगैरे घालतात आणि नाजूक पणे वापरतात. मग तो हरवेल किंवा मॉडेल म्हणून प्रचंड भीती सतत मनात घेऊन वावरतात. गाडी घेतली कि आठवड्याला दहा वेळा घासून चालक्ति करतील मग कुठला रास्ता खराब किंवा कुठे तरी पार्किंग मध्ये कुणी लावेल म्हणून रिक्षाने फिरतात. ह्याला अर्थ नाही. अशी भीती वाटत असेल तर स्वस्त माल घ्यावा. जास्त खर्च करून त्या वस्तूवर चिंता करणे निरर्थक आहे.

लायेबिलिटी वाढवणारे खर्च

हे खर्च थोडे विचित्र आहेत. कारण इथे पैश्यांच्या दृष्टीने नुकसान होत असले तरी एकूण आयुष्य जगण्याच्या बाबतीत ह्यांचा फार परिणाम होतो. मुले नसल्याने तुमच्याकडे खूप जास्त पैसे असतील पण त्या ओघाने येणारे इतर अनुभव नसतील. त्यामुळे इथे फक्त आर्थिक समीकरण जुळून चालत नाही, भावनिक सुद्धा पाहिजे त्याच प्रमाणे फक्त भावनिक होऊन चालत नाही थोडे तारतम्य सुद्धा पाहिजे.

घर हि एक अशी गोष्ट आहे. है घरात तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी ते महत्वाचे आहे. कदाचित संपुन आयुष्यांत तुम्ही ते कधीही विकणार नाहीत त्यामुळे तुमच्या दृष्टिकोनातून त्याची गुंतवणूक म्हणून किंमत शून्य सुद्धा असू शकते.

माझ्या मते अश्या गोष्टी घेताना फक्त घर, जोडीदार, गाडी ह्यांच्याकडे न पाहता त्यांचा लाईफटाईम व्हॅल्यू काय आहे हे पाहावे. कधी कधी ४ बेडरूम चा मोठा फ्लॅट घेण्याऐवजी २ बेडरूम चे आजूबाजूचे फ्लॅट घेणे फायदेशीर ठरू शकते कारण तो भांड्याला दिला जाऊ शकतो किंवा आईवडिलांना तिथे राहायला दिले जाऊ शकते. माझ्या मते एकत्र कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली असली तरी दोन पिढ्यानी जवळपास पण वेगळे राहणे माझ्या मते चांगले आणि प्रॅक्टिकल आहे.

अनेक लोक घर आणि गाडी घेताना इतर लोकांना इम्प्रेस करण्यासाठी घेतात. ह्याच्या पेक्षा चुकीची गोष्ट दुसरी नाही.

घर, गाडी, सोफा, खाट, गाडी, फरशी, बाथरूम, नळ, किचन काउंटर ह्या गोष्टीकडे लोक जास्त लक्ष देत नाहीत पण तुम्ही आधी हे गणित केले पाहिजे कि दिवसाला किती तास आपण ह्यांच्या सानिध्यांत खर्च करतो. आपण साधारण ८ तास गादीवर झोपतो त्यामुळे गाडी आणि बेड घेताना खूप विचार करावा. आपण गरोदर होणार असाल तर त्याची उंची वगैरे व्यवस्थित आहे ना हे पाहून घ्यावे. कधी कधी तुम्हाला बेड वर बसून पुस्तक वाचायची हौस असेल तर त्याचा हेडबोर्ड कसा आहे हे पाहावे. त्याच न्यायाने गाडी, गाडीचे सीट पाहावे. नाहीतर काही लोक बेड आणि गाडी इथे काही हजार रुपये वाचवण्यासाठी तडजोड करतात आणि उतारवयात मग लक्षावधी रुपयांच्या कंबरदुखीने किंवा निद्रानाशाने त्रस्त होतात. भांडी घेताना नेहमी उच्च दर्जाची घ्यावी जी १०-१२ वर्षे टिकतील. कास्ट लोखंडाचे तवे ऑम्लेट करण्यासाठी छान असतात. हे शेकडो वर्षे टिकू शकतात.

घर घेतल्याशिवाय माणूस सेटल झाला नाही अशी समजूत भारतीयांची आहे त्यामुळे कुठल्या तरी इमारतीत तो काँक्रीट चा ठोकला मिळवण्यासाठी जीवापाड मेहनत केली जाते आणि त्यांत गैर काहीच नाही. पण शक्य असेल तर घरांत अश्या गोष्टीवर खर्च करावा ज्यामुळे घराचे मूल्यवर्धन होईल. उदाहरणार्थ चांगला दरवाजा, व्यवस्थित ग्रील केलेली गॅलरी, उच्च दर्जाचे किचन काऊंटर्स इत्यादी. ह्या उलट फर्निचर वगैरे सर्व काही डेप्रिशिएटिंग असेट असल्याने उगाच इम्प्रेस करण्यासाठी काहीही घेऊ नका.

घर घेताना हे मी ३० वर्षांनी विकणार अश्या मानसिकतेने घ्या. तुम्ही सध्या ३० वर्षांचे असाल तर आपली मुले आपली काळजी घेतील हा हव्यास आणि स्वार्थ सोडून द्या. निवृत्त झाल्यानंतर स्वस्त पण चांगल्या दर्जाचे जीवनमान असलेल्या शहरांत किंवा वृद्धाश्रमात जाण्याची तयारी ठेवावी आणि घर हे त्यासाठी गुंतवणूक म्हणून घ्यावे. नाहीतर हे घर विकून मुलांच्या जवळ दुसरा फ्लॅट घेण्याची तयारी करून ठेवावी.

गुंतवणुकीचे खर्च

बचत वेगळी आणि गुंतवणूक म्हणून खर्च केलेली गोष्ट वेगळी. शिक्षणावर केलेला खर्च हा अनेक वेळा गुंतवणूक म्हणून पहिला जाऊ शकतो पण शिक्षण त्या पात्रतेचे असेल तरच. उगाच BSE BCOM ह्यावर भरमसाठ पैसे खर्च करू नका. साधारण कॉलेजांत प्रवेश घेतला तरी चालेल, क्लास ला दांड्या मारलाय तरी चालतील पण शिकवणीवर भर द्या. इंग्रजी भाषा ह्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी पैसे खर्च करा. ड्रायविंग, मोटार सायकल इत्यादी लवकर शिकून घ्या. डिग्री पेक्षा स्ट्रीट स्मार्ट बनवणारे शिक्षण चांगला परतावा देते. प्रचंड चतुर असलेल्या मुली दादरच्या गर्दींत ट्रेन मध्ये घुसायला घाबरतात. हे बरोबर नाही. स्ट्रीट स्मार्टनेस लवकारांत लवकर आत्मसात करावे.

सगळ्यांत महत्वाची गुंतवणूक म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य. २५ वर्षे झाली कि दार वर्षी ब्लड चेकअप केलाच पाहिजे. लिव्हर, साखर इत्यादी सर्व पाहून वजन नियंत्रणात आणलेच पाहिजे. ह्यावर काही हजार रुपये वर्षाला खर्च होतील किंवा २ तास दिवसाला खर्च झाले तरी हरकत नाही. जिम पाहिजेच असे नाही, टेनिस, पोहणे, बॅडमिंटन सुद्धा चालेल. ह्यातून आपले सोशल सर्कल सुद्धा वाढते. मधुमेहासारखा एक रोग म्हणजे किमान १०-१५ लाखांचे नुकसान आणि किमान १० वर्षे आयुष्य कमी.

मानसिक आरोग्यासाठी "घनिष्ट मैत्रिणी/मित्र" महत्वाचे. हि सुद्धा एक गुंतवणूकच आहे त्यामुळे कुना जवळच्या मैत्रिणीचे काही पैसे उधार मागितले म्हणून नाक मोडू नका. मी विद्यार्थी असताना माझ्याकडे विशेष पैसे नव्हते. एकदा मला ५० हजार रुपयांची गरज पडली. मी माझ्या एका श्रीमंत मैत्रिणीकडे उधार मागितले मला ७ दिवसांत परत देण्याची क्षमता होती. पण त्या ७ दिवसांसाठी सुद्धा ती मला पैसे द्यायला घाबरली. व्यसने मित्रपरीक्षा !

जुगार, दारू सिगारेट इत्यादी व्यसने असली तरी प्रमाणात केली असता मित्र परिवार वाढतो. पण व्यसने करायलाच पाहिजे असेहि नाही. तारतम्य ठेवावे.

आपल्या व्यवसायाला ज्या गोष्टींची गरज आहे, लॅपटॉप असो किंवा ड्रिलिंग मशीन. तिथे तडजोड करू नये. चांगली गुणतंवणूक करावी.

त्यामुळे काही प्रकारचे खर्च हे वरून खर्च वाटले तरी प्रत्यक्षात खूप मोठा परतवा देणारी गुणतंवणूक असू शकते.

अनपेक्षित खर्च

प्रत्येकाच्या आयुष्यांत अनपेक्षित गोष्टी घडतील त्यामुळे त्यासाठी खर्च केलाच पाहिजे. आपले आणि प्रियजनांचे आरोग्य, घर गाडी ह्यांच्या रिपेर साठी खर्च, कुना मित्राला मदत वगरीए गोष्टीवर आपला खर्च होईल आणि त्यासाठी वर्षाला किती बजेट लागेल ह्यावर विचार करून ठेवावा. एक इमरजेंसी फंड ठेवावा आणि ह्या फंड ला इतर कुणी ऍक्सेस करू शकेल अशी व्यवस्था करावी. (तुम्हाला अपघात झाला तरी इतर कुणी तरी ते पैसे काढू शकेल ह्या साठी).

विमा महत्वाचा आहे पण उगाच गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नये. आपला जोडीदार नोकरी करत असेल तर त्याला पैश्यांची गरज आहे असे नाही. किंवा विम्याच्या पैशायंवरच त्याने जगायला पाहिजे असे नाही. साधारण होम लोन वगैरेची परतफेड होईल इतकाच विमा घेऊन ठेवावा.

धर्मादायी खर्च.

देवाने आपल्याला चांगले हातपाय दिले, बुद्धी दिली आणि लक्ष्मीने आपल्यावर कृपा केली आहे. दोन वेळचे जेवण ताटात असणे आणि घरी कोणी वाट बघत असणे हि फार चांगली गोष्ट आहे त्यामुळे त्यासाठी आपण आभारी असले पाहिजे. आणि आपल्यापेक्षा जे कमी नशीबवान आहेत त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे दर वर्षी काही पैसे धर्मादायी गोष्टींवर खर्च करावे. सरकारी नियंत्रणात असलेली मंदिरे आणि सरकारी फंड ह्यांना मी शक्यतो टाळते. आपली जात, धर्म, प्रांत ह्यांच्याशी निगडित ज्या छोट्या संघटना आहेत किंवा थेट गरजू लोकांना मी मदत करते.

त्याशिवाय आपल्या आजूबाजूला असणारे गरीब लोक (पण प्रामाणिक) त्यांना सुद्धा मदत करावी. मदत करताना दान हे सत्पात्री असले पाहिजे आणि गुप्त ठेवले पाहिजे.

शेवटी :

शेवटी पैसे हे जाणारच आहेत. तुम्ही काही वर घेऊन जाणार नाहीत त्यामुळे आपले मानसिक समाधान आणि आपल्या परिवाराचे मानसिक समाधान ह्याला नेहमीच प्राधान्य द्या. जोडीदाराच्या हातून काही मोडले किंवा मुलाने काही हरवले म्हणून त्याच्यावर ओरडू नका विनाकारण भांडणं करू नका. शेवटी हि गोष्ट "कृष्णार्पणमस्तु" झाली असे समजावे आणि कामाला लागावे. १० वर्षांनी तुम्ही ह्या घटनेचा विचार कराल तेंव्हा ती चिंता किती निरर्थक होती हे लक्षांत येईल. त्यामुळे वस्तूंत गुंतू नका, पाहिजे तर माणसांत गुंता.

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

30 Mar 2021 - 12:36 pm | वामन देशमुख

माझ्या आयुष्यात मी जे काही करतो त्यातलं बरंचसं इथं तपशीलवार वाचून मौज वाटली. किंचित विस्कळीत वाटला तरी मस्त लेख लिहिलाय!

BTW, लेखाच्या शीर्षकातील "बाराखडी" हा शब्द वाचून, हा लेख सध्या चालू असलेल्या स्टॉक-मार्केट लेखमालिकेशी संबंधित आहे असे वाटले होते.

हो प्रेरणा त्याच लेखापासून मिळाली म्हणून तसे शीर्षक ठेवले.

> माझ्या आयुष्यात मी जे काही करतो त्यातलं बरंचसं इथं तपशीलवार वाचून मौज वाटली.

एकम सत विप्रा बहुधा वदन्ति

Rajesh188's picture

30 Mar 2021 - 1:11 pm | Rajesh188

पहिल्या वेळेस च तुमची मत जी ह्या लेखात व्यक्त केली आहेत ती पटली.
बाकी आपली मत नेहमी विरूद्ध असायची.
पेट्रोल महाग वाटत असेल तर गाडी घेवूचं नये.
आपण जी वस्तू खरेदी करणार मग तो एसी असेल तर वीज बिल बघत बसू नका.एन्जॉय करा.
गाडी असेल तर पेट्रोल चे भाव बघू नका एन्जॉय करा.
हेच माझे पण मत आहे.

साहना जी लेख छान लिहिलेला आहे.

थोडे माझे वयक्तीक मते सांगतो.

२०१८ अगोदर पर्यंत , माझे खर्च हे खुप होते, ते व्यर्थ नव्हते परंतु कायमच गरजेच असावेत असे ही नव्हते. मी उधळा ह्या श्रेणीत बसणारा, जे मनाला पाहिजे ते कायम घेवुन राहणारा ( अजुनही तसाच आहे) आणि घर घेतानाच मी EMI च्या चक्रात अडकलो.. आणि नंतर अडकत गेलो.

खर्च महत्वाचे आहेतच. माझी तर अवस्था कमाईपेक्षा खर्च जास्त अशी होउ लागली, आणि मग हे कुठे तरी थांबावे असे वाटले. मी जे करतोय ते काहीतरी चुकीचे आहे त्यामुळे काही तरी बदल हवा असे वाटु लागले.. आणि यात मी खर्च कमी केलेले नाहीत.
माझे Gym, सायकलिंग संबंधी, ट्रेक साठी खर्च जास्त आहेतच. पण जर मला एक शर्ट हवा तर मी ३ घेवुन नाही आलो पाहिजे यावर तारतम्य ठेवु लागलो.

आणि
आधी saving आणि expense यात नेहमी मी expense ला महत्व द्यायचो, त्यात थोडा बदल केला.
आधी थोडीशी saving स्टार्ट केली.. मग माझे स्किल्स वाढवले आणि
saving व expense मध्ये आधी saving ला पैसे टाकायला लागलो..यातुन खरेच खुप चांगले बदल झालेत आणी expense मध्ये पण एक चांगला पणा आलाय.

येथे तुम्ही नमुद केल्या प्रमाणे
Insurance हा खरेच महत्वाचा आहे, या बाबत मी खुप माहीती घेतली. term आणि health हवेतच हवेत.
त्या नंतर तुमची wealth grow झाली पाह्जे , म्हणुन थोडी गुंतवनुक गोल्ड मध्ये ही करत गेलो..
आणि सगळ्यात महत्वाचे खर्च, tax यांचा व्यवस्थीत ताळमेळ घातला..

घर घेताना हे मी ३० वर्षांनी विकणार अश्या मानसिकतेने घ्या. तुम्ही सध्या ३० वर्षांचे असाल तर आपली मुले आपली काळजी घेतील हा हव्यास आणि स्वार्थ सोडून द्या. निवृत्त झाल्यानंतर स्वस्त पण चांगल्या दर्जाचे जीवनमान असलेल्या शहरांत किंवा वृद्धाश्रमात जाण्याची तयारी ठेवावी आणि घर हे त्यासाठी गुंतवणूक म्हणून घ्यावे. नाहीतर हे घर विकून मुलांच्या जवळ दुसरा फ्लॅट घेण्याची तयारी करून ठेवावी.

विचार करण्या जोगे आहे हे. यावर मी काहीच विचार केलेला नाही..

Rajesh188's picture

30 Mar 2021 - 3:20 pm | Rajesh188

मुलांना शिक्षण देणे इथपर्यंत च आपली जबाबदारी आहे.
त्या नंतर जास्तीत जास्त नोकरी लागे पर्यंत .
त्या नंतर कोणत्याच भावनिक जंजाळ मध्ये न अडकत आपण जी संपत्ती कामवाली आश आहे.ती पूर्ण आपली आहे .ती विकून पंच तरणकित जीवन जगता येते .
मुलांची गरज नाहीच

कंजूस's picture

30 Mar 2021 - 2:59 pm | कंजूस

काही मूलभूत गोष्टी दिल्या आहेत त्या आवडल्या.
पद्यरचना करा कुणीतरी.

कंजूस's picture

30 Mar 2021 - 3:00 pm | कंजूस

काही मूलभूत गोष्टी दिल्या आहेत त्या आवडल्या.
पद्यरचना करा कुणीतरी.

चौकटराजा's picture

30 Mar 2021 - 3:46 pm | चौकटराजा

अर्थशास्त्रात मायक्रो व मॅक्रो असा विचार आहे ! आपल्या एकूणच आयुष्यात असा विचार करणे महत्वाचे आहे .खर्च हा आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असल्याने त्याचा विचार देखील होणे गरजेचे असते ! यात अनेक अडचणी अशा असतात की एकाच कुटुंबात एका अर्थाने एका मिनी अर्थव्यवस्थेत निरनिराळ्या व्यक्तींचे हट्ट निराळे असतात . कोणी भावनेला महत्व देतो, कुणी लोकलज्जेला, कोणी प्रतिष्ठेला ,कोणी स्थळ काळ व्यक्ती महात्म्याच्या आहारी जाऊन कोणाला एखादे व्यसन असते ई . मग यात अगदी प्राधान्य कशाला द्यायचे तर माझ्या मते दोन गोष्टीना हे खर्च काळाशी संबंधित आहेत ते . व जे खर्च अधिकात अधिक जणावर होतात ते.

उदा .मला संगीताचा नाद आहे पण घरातील बाकीच्यांना नाही पण टी वी पाहणे सर्वाना आवडते मग मॅक्रो विचार करून प्रथम टी वी आणायचा . सिंथेसायझर नंतर !
काही खर्च हे त्या त्या वयात करणे चांगले कारण काळाचे चक्र मागे धाडता येत नाही . लग्नातील सर्व खरच टाळून पैसे वाचवता येतील पण हनिमूनचा खर्च टाळू नये .ते दिवस परत आणता येत नाहीत. परस्परांच्या परिचय प्रक्रियेत काटकसरी चा मुद्दा मीठ टाकू शकेल!

माझ्या आयुष्यात मी काही खर्च लांब ठेवले आहेत ती धोरणे अशी...
मनाने फेसटीव्ह राहू नका . याकाळात सर्व गोष्टीचे भाव वाढू शकतात .वाढदिवस आला ,सण आला म्हणून इतर लोक खर्च करतात पण तुम्ही त्या मोहात पडू नका ! सदरा फाटला की नवा विकत घ्या ,दिवाळी आली म्हणून नको !

आयुष्य हे जर वस्त्र मानले तर भावना हा फक्त त्याचा काठ आहे ,बाकी वस्त्र विवेकाने बनले आहे . भावनेशिवाय आयुष्य कोरडे म्हणून भावनेला लक्षात ठेवा तिच्या आहारी खर्च करताना जाऊ नका ! उदा खंडेनवमीला पूजेला थोडी फुले पुरतात पण भावना म्हणते घे चार किलो झेंडू ! इथे मोह आवरता आला पाहिजे !

देणेघेणे या प्रकारामुळे आपण निष्कारण इतरांचा उत्कर्ष घडवून आणत असतो .अनावश्यकपणे मग पॅन्ट पिसेस ,शर्ट पीसेस यांनी सुटकेस भरण्या पलीकडे काहीही होत नाही !
खरे तर असे वीस पंचवीस मुद्दे डोक्यात आहेत पण टंकाळा आला आता !

Bhakti's picture

30 Mar 2021 - 4:24 pm | Bhakti

टंकाळा प्लीज! तुमचा अनुभव भारी असतो.

मुलीच्या बारशाला नवर्‍याने आहेराला इतक्या भारी साड्या घेतल्या...मी नको म्हणत होते तरी..तरी बायकांनी ही अशी ती तशी नाक मुरडली..(अशा डोक्यात गेल्या तेव्हापासून.. भावनांची काही कदर नाही?) तेव्हा पासून कानाला खडा..मी कोणालाच आहेर देत नाही,आणि घेत नाही(घरी या भरपूर जेऊ घालेन..)
मुलगी होण्याआधी बाकी लोकांवर प्रतिष्ठेसाठी,मानापायी फार खर्च केला.पण मुलगी झाल्यावर फक्त स्वतः वर आणि तिच्यावर योग्य खर्च करते.आता फक्त आरोग्य विषयकच खर्च, गुंतवणूक करणार आहे.

मुक्त विहारि's picture

30 Mar 2021 - 6:05 pm | मुक्त विहारि

प्रेम असेल तर, भगवान श्रीकृष्ण, विदुराच्या पत्नीकडून, केळ्याची साल खातो...

आणि आपण कितीही उत्कृष्ट जेवण दिले तरी, पंगतीत जेवणारा माणूस, आपली सालं काढतो.

मी कुठल्याही घरगुती समारंभात, कुणाकडूनही काहीच घेत नाही आणि कुणाला देत पण नाही...

परवा मुलाचा साखरपुडा आहे, आम्ही घरची फक्त तिघेच जण जाणार आहोत...

मुलीकडच्या मंडळींना पण हेच सांगीतले आहे की, देणेघेणे अजिबात ठेवायचे नाही..

अर्थात, साखरपुडा झाला की, मी आणि व्याही, बियर पार्टी करूच. ते पण, बियरचा खर्च माझा आणि जेवणाचा खर्च त्यांचा
ह्याच अटीवर...

चौकटराजा's picture

30 Mar 2021 - 6:27 pm | चौकटराजा

मी असे पाहिले आहे की स्त्री वर्गास देण्या घेण्याचा सोस अधिक असतो. एखादे लग्न निघाले की " ती तुला साडी घेणार आहे ..... अशा बातम्या अगोदरच परस्पराना दिल्या जातात ,मग ती मला साडी घेणार आहे की मग मला तिला घ्यावीच लागेल हे गणित नवरोजी पुढे मान्डले जाते. मग रीत म्हणून नवराही तयार होतो स्वतः ला एक ला एक पँट घ्यायला झाली आहे असे असले तरी !
मग एका कपाटात साड्या मावत नाहीत म्हणून दुसरे कपाट देखील घ्यावे लागते ! मग साडी आली की ब्लाऊज आला ,त्याला अस्तर आले .कापडापेक्षा शिलाईचाच खर्च जास्त ! मग आपल्याला आवड आहे ना तरी आपण ब्लाउज शिवायला शिकायचे मात्र नाही !
बरे देण्याघेण्याच्या साड्या मध्ये प्लेन साड्या ,इरकली प्रकारच्या साड्या ,चेकचे डिझाईन असलेल्या साड्या ,जॉर्जेट अशा साड्या कोणी देत नाही ! मग व्हेरिएशन हवे म्हनून त्यांची खरेदी आणखीनच वेगळी .आलेली साडी तिचा पोत ,रंग,,डिझाईन तुम्हाला आवडलेले असेलच असे नाही ! तसे तुम्ही दिलेली साडी त्या व्यक्तीला आवडेलच असेही नाही .सबब साराच मामला आचरटपणाचा !

लहानपणी मी पोपट असतो तर किंवा मी पोस्टमन असतो तर असे निबंध आपण लिहीत होतो तसा विचार करून मी स्त्री असतो तर आजच्या काळात फार खर्च न करता
काय धोरण ठेवले असते ... ते असे ..
साधारणपणे तीन चार प्रसंगांना शोभतील अशा साड्या घ्यायच्या असा विचार प्रथम करायचा ! उदा समजा चार एक साड्या समारंभासाठी ,चार साड्या सोसाटातील गेट टुगेदर साठी ,चार तलम धागा असलेल्या दोन तीन एकदम युनिक डिझाईन असलेलया जसजसे पैसे मिळतील तास तसा पोत ,रंग डिझाईनचा प्रकार उदा सेल्फ डिझाइन असा विचार करीत धोरणात्मक रीतीने आपली खरेदी करायची . कोणाकडे सांत्वन स्वरूपात भेटायला जायचे असेल तर एकदम साधी पांढरी साडी पण पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाला पांढरी पण जरा विरळ बुट्ट्या असलेली साडी असे काहीतरी जरूर करता येते. यासाठी मात्र देण्याघेण्यातून साड्यांचा ढीग जमाविण्यापेक्षा धोरणात्मक रित्या एक चांगला कपड्याचा संग्रह करता येईल.

तीच गोष्ट पुरुषांची चेकचे दोन तीन शर्ट एक दोन स्ट्रीप वाले , पिकनिकला शोभेल असे भडक रंगाचे टी शर्ट ,रंग ,पोत ,धागा यांचा विचार करून खरेदी करता येईल ,पण अहो जनरीत पाळावी लागते याला कोण काय करणार ? असे म्हणून देण्याघेण्यामुळे आपण नाहक एकमेकांच्या अर्थव्यवस्थेत नाक खुपसत असतो.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Mar 2021 - 6:40 pm | प्रकाश घाटपांडे

गंमत म्हणजे आपल्या बायकोने असे खर्च करणे हे काही पुरुषांना देखील प्रतिष्ठेच वाटते. बायकोची हौसमौज पुरवणे हे त्यांना पुरुषार्थाचे लक्षण वाटते. मामलेदारीण बाईचा तोरा गावात असलाच पाहिजे. पाटालीण बाईने अंगभर सोने ल्यायलेच पाहिजे. अशी अप्रत्यक्ष कंपल्शन्स ही असायची

चौकटराजा's picture

30 Mar 2021 - 6:51 pm | चौकटराजा

ह ना आपटे यांच्या " पण लक्षात कोण घेतो " या प्रसिद्ध कादंबरीत या मानसिकतेचा उल्लेख आला आहे ! जे समाजात दिसते ते साहित्यात येते असे म्हणतात ! " आम्ही बायका म्हणजे आमच्या नवर्याच्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणाऱ्या दागिन्यांच्या पेट्या ' असे त्यावेळचे वास्तव होते !

मुक्त विहारि's picture

30 Mar 2021 - 6:56 pm | मुक्त विहारि

समारंभाचा उपयोग, आर्थिक समृद्धि दाखवायलाच केला जातो.....

ज्या दिवशी, लोकं गुणांची पुजा करायला लागतील, तो सुदिन...

मी लग्नाचा कोट, मित्राकडून उसना आणला...

कंपनीने दिलेले सेफ्टी शूज घालूनच, लग्नाला उभा राहिलो...

भेंडी, आमच्या सारख्या सतत यंत्राशी खेळणार्या मंडळींना, कोटाची गरजच काय?

मुलाचा साखरपुड्याचा ड्रेस पण, त्याच्या मित्राने दिला...

मी अद्याप तरी, मुंबईतल्या लोकांना, लग्नातील कोट घालून, दररोज लोकलने प्रवास करतांना बघीतलेले नाही..

मला, 4 हाफ पॅन्ट, 4 हाफ शर्ट, 2-3 वर्षे पुरतात.... आणि 2 जीन्सच्या पॅन्ट आणि 2 फुल शर्टस्, 4-5 वर्षे पुरतात ....

शूज तर कंपनीच देत होती, शूज आणि नौकरी, एकाच वेळी सोडली...

गाॅगलचा शौक नाही...

मुलाने टाकून दिलेला मोबाईलच वापरतो...तो दर 3-4 वर्षांनी मला, त्याचा मोबाईल देतो...

पण, पुस्तक आणि दिवाळी अंक खरेदी मात्र चालूच असते...

ह्या जगांतील, प्रत्येक पुस्तक, माझ्याकडे हवेच, हे एक माझे आवडते दिवास्वप्न आहे...

प्रकाश घाटपांडे's picture

30 Mar 2021 - 7:13 pm | प्रकाश घाटपांडे

१९९२ ला माझे लग्न नोंदणी पद्धतीने झाले. साधा एक समारंभ केला व बुफे ठेवला. बायकोला हौस म्हणून ( इथे माझी हौस) पाच हजाराचा शालू घेतला. आता २०१७ ला मुलीच्या लग्नात हौसेसाठी भरपुर खर्च केला.कुणालाही कमतरता पडू दिली नाही. नियोजन असल्याने कुठलाही ताण आला नाही.खर्च निम्मा निम्मा केला. नातेवाईकांनी माझ्या लग्नाच्या वेळी राहिलेला हिशोब दामदुपटीने वसूल केला. मीही तो आनंदाने केला. मुलीचे लग्न धार्मिक पद्धतीने झाले. जावई व व्याही हे लष्करी अधिकारी असल्याने त्या इतमामास साजेसा बार, बुफे व रोषणाई होती. महासैनिक लॊन्स या त्यांच्या लग्नसमारंभास असलेल्या लॊन्स मधे सागरसंगीत लष्करी बँड सह स्वागत समारंभ होता. यात माझ्या साधेपणामुळे इतरांच्या प्रतिष्ठेस बाधा येउ नये याची दक्षता मला घ्यावी लागली. सूट शिवला. जो माझ्या लग्नात पण शिवला नव्हता. ड्रिंक्स सामिष मुळे मित्रमंडळी खूश होती.मी ही खूष होतो.

Bhakti's picture

30 Mar 2021 - 7:15 pm | Bhakti

जेब्बात
असे म्हणून देण्याघेण्यामुळे आपण नाहक एकमेकांच्या अर्थव्यवस्थेत नाक खुपसत असतो

मी अशीच साड्यांची विभागणी केलीय..
मी साडी ,त्यावरची डिजाइन ज्वेलरी, वेशभूषा(बरचेदा स्वतः डिझाईन्स करते) खुप आधीपासून ठरवते..गंमत अशी ह्या सगळीजणी कौतुकाने हे असं हे कस करून हैराण करतात.. Uniqueness असेल तर कोणतीही साडी उठून दिसते.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Mar 2021 - 6:49 pm | प्रकाश घाटपांडे

खरे तर असे वीस पंचवीस मुद्दे डोक्यात आहेत पण टंकाळा आला आता !

अहो लिवा लिवा. सामाजिक दस्त ऐवज आहे हा. खर्च गुंतवणूक हा मानसशास्त्राचा मुद्दा आहे आता. उदा
https://en.wikipedia.org/wiki/Compulsive_buying_disorder
आपले मिपाकर जयंत कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले पैशाचे मानसशास्त्र परवा विकत घेतले

वामन देशमुख's picture

30 Mar 2021 - 4:27 pm | वामन देशमुख

मराठवाड्यातल्या माझ्या परिचयाच्या राजस्थानी कुटुंबांमध्ये असा सल्ला दिला जायचा -

डूबेगा रे तीन जणां।
कम पूँजी व्यापार घणां।
पैसा कमती खर्चा घणां।
जोर कमती गुस्सा घणां।

आणि जो हा सल्ला मानणार नाही त्याची अशी अवस्था व्हायची -

म्हारो बेटो घणों हुशार, सोलह सौ का करो हज़ार।

मराठवाडी मराठी व्हर्जन -

लाखाचे बारा हजार करून आणणारा मुलगा

प्रकाश घाटपांडे's picture

30 Mar 2021 - 6:33 pm | प्रकाश घाटपांडे

साहना सध्या आमच्या घरात या विषयावर चर्चा चालू आहे.आमची पीपीएफ,एफडी, कौटुंबिक सोने अशी सुरक्षित व आपत्कालीन गुंतवणूक मोडून उत्साहाच्या भरात हौसेसाठी शेतजमीन घेणे व त्यानंतर फार्महाउस बांधणे असा बायकोचा प्रस्ताव आहे. ज्याला माझा विरोध आहे. हौसेला मोल नसते पण कॉस्ट असते त्यासाठी आपण काय किंमत मोजतो आहोत? याचे मूल्यमापन कसे करायचे?
हा मुद्दा हौसेचा किती? प्रतिष्ठेचा किती? व महत्वाकांक्षेचा किती? असे अनेक प्रश्न माझ्या मनात सध्या आहेत फार्महाउस की नुसतीच हौस हा http://www.misalpav.com/node/36570 या धाग्यावर चर्चा झालीच आहे.

चौकस२१२'s picture

1 Apr 2021 - 7:50 am | चौकस२१२

हा मुद्दा हौसेचा किती? प्रतिष्ठेचा किती? व महत्वाकांक्षेचा किती
हौसेचा किती? = याला मोल नाही त्यामुळे गणित मांडता येणार नाही
प्रतिष्ठेचा किती? याला मोल नाही त्यामुळे गणित मांडता येणार नाही
महत्वाकांक्षेचा किती: हा येथे मात्र व आहे विचार करायला वाव .... समजा असे हे फार्म हौस ( कोविद नाही असे गृहीत धरू ) छोटेखानी ब्रेड अँड ब्रेकफास्ट / गेस्ट "हौस " असा जोड धंदा करता येईल का? अर्थात काम आले आणि धोका आणि कटकट हि आली आणि संधी पण
हा विडिओ जरूर पहा... यात हिमाचल मधेय एका कुटुंबाने असे केलेल दिसतंय
https://www.youtube.com/watch?v=-ijXT0lCXE0

हौसेला मोल नसते पण कॉस्ट असते त्यासाठी आपण काय किंमत मोजतो आहोत? याचे मूल्यमापन कसे करायचे?

रिटायरमेंट मध्ये माणुस जास्त secured होऊन जगताना पाहतो.बरोबर आहे.

पण जर तुमच्या वाईफ अजूनही त्यांच्या स्वप्नांना पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करत आहेत, तर मला वयक्तिक रित्या तो निर्णय चांगला वाटतो..

कारण स्वतःचे आयुष्य पाहिजेल तसे जगण्यात आनंद असतो..

फक्त एक खबरदारी घ्या.. तुमची १००% saving त्यात न गुंतवता निम्म्या अधिक पैश्याचे farm house घ्यायला तयार व्हा..
आणि हे राहिलेले पैसे तुम्हाला अडी अडचणीला कामी येतील हे त्यांना समजावून सांगा. त्या ऐकत नसतील तर तुम्ही हि ऐकू नका :-)

Farm house हे लोकेशन wise चांगले घ्या, म्हणजे त्यातून उत्पन्न पण मिळू शकेल असे.. किंवा resale value पण असेल.
पानसेत, महाबळेश्वर गेला बाजार लोणावळा किंवा चांगल्या लोकेशन ला.. जेथे माणसे पण कामाला मिळतील आणि लोकेशन मुळे त्याची value कायम राहिल..

उगाच कमी पैश्यात घ्यायचे म्हणुन कुठे तरी पार आत आडमार्गांवर घेऊ नका, त्याचा मनस्ताप होईल.. त्या पेक्षा तुम्ही वर्षाला काही दिवस कुठे तरी असे फार्महाउस मध्ये भाड्याने राहिलेले परवडले असते असे वाटत राहिल.

मुद्दा -

माणसाने secured असावे जरूर, पण अती secured च्या नादात आपली स्वप्ने पुर्ण न करता secured amount वाढवण्यात कसले आलेय जगणे?
गोष्टीला सिमा असते, secured amount सिमीत करा.. स्वप्ने नाहीत..
आनंद हा स्वप्न पूर्ती मध्ये असतो.. आपल्याकडे बँकेत किती पैसे आहेत यावर तो depend नसतो.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Apr 2021 - 2:43 pm | प्रकाश घाटपांडे

Farm house हे लोकेशन wise चांगले घ्या, म्हणजे त्यातून उत्पन्न पण मिळू शकेल असे.. किंवा resale value पण असेल.

दोन्हीही नाहीये. http://www.misalpav.com/comment/1097616#comment-1097616

राहण्यासाठी दुसरे घर घ्यावे अशी माझी मनीषा होती. पण तो विचार शेवटी टाकून दिला. मी स्वतःला विचारलेले प्रश्न इथे मांडते.

- फार्म-हाऊस घेण्यासाठी तुमच्या एकूण आर्थिक संपत्तीचा किती भाग खर्च होत आहे. ( - फार्म हाऊस पासून नक्की काय अपेक्षित आहे ? कधी कधी जाऊन राहायचे ? भांड्याला द्यायचे ? त्यातून शेती उत्पन्न येईल काय ?
- फार्म हाऊस वर महिना किती खर्च होईल ? (वीज बिल इत्यादी)
- ह्याच गोष्टी फार्म हाऊस भाड्याने घेऊन करणे शक्य आहे काय ? त्यांत किती खर्च येतो ?

माझ्या मते हा प्रोजेक्त घेण्याच्या आधी गोवा, मालवण भागांत अनेक फार्म हाऊस भाड्याने काही दिवसांसाठी मिळतात. आठवडाभर घेऊन बिनधास्त बायकोला घेऊन राहा. हा अनुभव कसा वाटतो तो पहा.

अनेकदा आपण हॉटेल मध्ये राहण्याचा विचार करतो तेंव्हा सर्वांत स्वस्त हॉटेल पाहून तिथे राहतो. फार्म हाऊस ऐवजी मोठ्या महागड्या रिसॉर्ट मध्ये काही दिवस राहिलात तर ?
बायकोला ते जास्त आवडेल का ?

माझ्या मते फार्म हाऊज चे पैसे गुंतवून त्यातून आलेले व्याज तुम्ही कुठंतरी जाऊन काही दिवस राहण्यासाठी खर्च करू शकता.

अभिजीत अवलिया's picture

30 Mar 2021 - 6:43 pm | अभिजीत अवलिया

छान लेख.

बचत यात दोन महत्वाचे मुद्दे म्हणजे
१) आयकर ..
२) आयुष्यातील सर्वात मोट्ठे कर्ज म्हणजे गृहकर्ज
देशादेशा प्रमाणे या दोन गोष्टींचे नाते वेगवेगेल असते
त्यातील एक कल्पना मांडतो ( अशी सोय भारतात आहे कि नाही माहित नाही )
"ऑफसेट अकाउंट" हि ती कल्पना
- साधारणपणे गृहकर्जाचाच दर "क्ष" असेल तर बचत खात्यातून मिळणार क्ष - काहीतरी असा असतो
तर कल्पना अशी कि
- गृहकर्ज असेल त्यावर रोजचे व्याज आकारले जाते आणि महिन्याचं राहणी ला जमेच्या बाजूला एकदम पगार येतो आणि दर दिवशी खर्च होत असतो ..
- त्यामुळे आपल्या कडे जे काही पैसे "येत" असतील ते इतरत्र कोठेही ना ठेवता गृहकर्जाच्या खात्याला जोडलेल्या "ऑफसेट" अकाउंट मध्ये ठेवणे , ऑफसेट मधील हि रक्कम जणू काही मूळ कर्जात परत केली आहे असे बँक गृहीत धरते आणि त्यामुळे वरील उल्लेख केलेल्या "रोजचे व्याज " कमी होते,
- मग रोजचे खर्च त्याच काय? तर ते क्रेडिट कार्ड वर करणे आणि महिनाअखेर क्रेडिट कार्ड पूर्ण भरून टाकणे
म्हणजे असे कि गृहकर्ज 8% दराने असेल तर जे पैसे तुम्ही ऑफसेट मध्ये ठेवता ते एकार्थी 8% दर मिळवते आणि ते सुद्धा "आयकराच्या विळख्यात ना येता"

अर्थात कोणी म्हणेल कि मी ते ऑफसेट मध्ये ना ठेवता इतर म्युच्युअल फंडात ठेवून १५% कामवेन ( त्यावर टॅक्स भरला तरी मला १२% मिळतील म्हणजे ८% वाचवण्या पेक्षा बरे नाही का ) इथे एक फरक लक्षात घेतला पाहिजे कि हे १५% जे मिळत असतात ते मार्केट रिस्क म्हणू असतात किंवा जर पतपेढीत ९% मिळाले तरी पेढीची सुरक्षा धोका असतो त्यासाठी १% जास्त मिळतो... त्यामुळे एकसारखी तुलना कार्याची तर ऑफसेट ची इतर राष्ट्रीय बँक शी करावी लागेल की जिथे मुदत ठेवी वॉर गरहूकर्जच पेसकः जास्त दराने मिल्ने अवघड आहे आणि मिळाले तरी आयकर आला
असो हे भारताबाहेरील आयकर आणि दरांवर बेतलेले आहे त्यामुळे कदाचित भारतात लागू होणार नाही परंतु विचार केला कि कल्पना म्हणून मांडावे (वरिल दर अंदाजाने भारतातील असावेत असे गृहीत धरून लिहिले आहे

नि३सोलपुरकर's picture

1 Apr 2021 - 5:03 pm | नि३सोलपुरकर

कल्पना रोचक आहे ,

विनंती , चौकस२१२ किंवा जाणकार मिपाकरांनी अधिक प्रकाश टाकावा ( जसे भारतात असे अकाउंट उघडता येते का..)

रच्याकने - लेख आवड्ला , वैयक्तिक रित्या बरेच विचार साहना यांचे शी जुळ्तात . धन्यवाद

ऑफसेट अकाउंट संबंधी जाणण्यास उत्सुक .
नि३

बोका's picture

1 Apr 2021 - 9:46 pm | बोका

एस बी आय मॅक्सगेन
ही स्किम जवळपास अशीच आहे.
बँक ऑफ बरोडा , एच एस बी ची यांच्याही अशा योजना आहेत.

मराठी कथालेखक's picture

31 Mar 2021 - 11:44 pm | मराठी कथालेखक

मी विद्यार्थी असताना माझ्याकडे विशेष पैसे नव्हते. एकदा मला ५० हजार रुपयांची गरज पडली. मी माझ्या एका श्रीमंत मैत्रिणीकडे उधार मागितले मला ७ दिवसांत परत देण्याची क्षमता होती. पण त्या ७ दिवसांसाठी सुद्धा ती मला पैसे द्यायला घाबरली. व्यसने मित्रपरीक्षा !

कृपया मैत्रिणीचा राग मानू नका असे मी सुचवेन. मैत्रीण श्रीमंत होती म्हणजे श्रीमंत घरातली ना ? तुम्ही विद्यार्थिनी होता म्हणजे ती तुमच्या बरोबरीचीच असेल असे मी गृहीत धरले तर ती स्वतः कमवत नव्हती असे ध्वनीत होते. मग घरच्यांच्या श्रीमंतीच्या आधारे ती तुम्हाला ५० हजार कसे देणार ?
दुसरा मुद्दा तसेही ५० हजार ही मोठी रक्कम आहे.. अगदी आजही. तुम्ही लिहिला तो किस्सा केव्हाचा हे कळायला मार्ग नाही तरी तुम्ही ३५+ वयोगटातल्या असाल असाल असे गृहीत धरले तर निदान १५ वर्षापुर्वीचा किस्सा असेल.
तिसरी गोष्ट तुम्ही विद्यार्थिनी होता म्हणजे तुमची स्वतःची कमाई नसेल किंवा फार कमी असेल (माझे गृहीतक) मग अशा वेळी तुमच्या परतफेडीच्या क्षमतेबद्दल तुमच्या मैत्रिणीने खात्री बाळगावी ती कशी ?
असो. मुद्दा असा की कुणाबद्दल मनात नकारात्मक भावना ठेवण्याआधी आपण पुर्ण परिस्थितीचा वस्तुनिष्ठपणे विचार करायला हवा.

साहना's picture

1 Apr 2021 - 9:24 am | साहना

राग अजिबात नाही. तिच्या पैश्यांवर माझा अधिकार शून्य. मी मास्टर तर ती नोकरी करत होती. ५० हजार रुपये तिच्यासाठी काहीच नव्हते. मला विदेशांतून शोध प्रबंध प्रकाशित करण्यासाठी अचानक कॉल आला होता, तिथे जायचे तर विमानाचे तिकीट विकत घेऊन व्हिसा अप्लाय करायला मला फक्त ५-६ दिवस होते. आणि त्यासाठी काही पैसे कमी पडत होते. माझ्या FD होत्या पण बँकेत जाऊन त्या मोडणे वगैरेत वेळ गेला असता.

वाईट मला स्वतःचे वाटते कि अश्या वेळी मला मदत करू शकणारे कुणीच नव्हते.

मराठी कथालेखक's picture

1 Apr 2021 - 6:39 pm | मराठी कथालेखक

तुमची मैत्रीण नोकरी करत होती तर संदर्भ काहीसा बदलतो (माझ्या आधीच्या गृहीतकापेक्षा) पण नोकरी करत असली तरी किती स्त्रियांना पुर्णपणे अर्थिक स्वातंत्र्य असते वा अर्थिक निर्णय त्या घेवू शकतात हा प्रश्नच आहे. लग्न झालेले नसेल तर आई-वडील व लग्न झालेले असेल तर पतीचा सहभाग अशा निर्णयात महत्वाचा ठरला असू शकतो.

चौकटराजा's picture

1 Apr 2021 - 8:04 pm | चौकटराजा

अध्यात्मिक विचारवंत श्री वामनराव पै यांनी मानवी समजुतीतील एक घोटाळयाचे विवेचन केले होते. माणसाला अधिकाधिक पैशाची हाव असण्याचे कारण पुढच्या पिढीसाठी काहीतरी तजवीज करून ठेवणे हे आहे .त्यांचे म्हणणे की " मी तुझ्या वासना , तुझा चरितार्थ याबाबद्दल तुझी धडपड समजू शकतो पण पुढच्या अनेक पिढ्या ची सोय करण्यासाठी तू धावाधाव करायचे कारणच काय मुळी ? माझे वडील मला म्हणत " आमच्या वडिलांनी आम्हाला काही इस्टेट दिली नाही तेंव्हा तुम्ही ही आमच्याकडून ती अपेक्षा करू नका !

मग मी माझे जीवन असे जग गेलो. की कर्ज काढले नाही .सदैव कर्ज देणाऱ्यांत माझी गणना कशी होईल याची काळजी घेतली . तरीही मला अनेक गोष्टीची आवड असल्याने संगीताच्या बाबतीत ,बुलबुलतरंग,,हार्मोनियम ,,,यामाहा की बोर्ड व आता कॅसिओ अरेन्जर सिंथ अशी प्रगती करत गेलो. संगणक मी २००१ पासून वापरीत आहे त्याचे कॉन्फिगरेशन असेच वाढवत नेले .अनिमेशन ,रेखन फोटो एडिटिंग , थ्री डी ग्राफिक्स असा आनंद वाढवीत नेला.

प्रवासाच्या बाबतीत सरकारी नोकरीत असताना एल टी सी चा वापर करून प्रथम भेडाघाट ,खजुराहो अशी ट्रीप एकटयाने केली तो ही छंद वाढवीत सहकुटुंब अशा भारतात ८ ते १२ दिवसांच्या एकूण १७ ट्रीप्स स्वतः: व्यवस्थापन करून केल्या . शिवाय युरोपातील तीन देखणे देश पाहिले .

साहित्यात प्रथमी लायब्ररीतून पुस्तके, सवलतीत खरेदी ई मार्ग चोखाळले व रहस्य कथा ,कूट कथा संदेह कथा , कैदी ते चारली चॅप्लिन आत्मचरित्र , प्रवास वर्णने ,फ्रेडरिक फोरसिथ ,हेरॉल्ड रॉबिन्स, चेस , आयर्विंग वॅलेस ,शेल्डन,,मॅक्लिन यांची पुस्तकेही वाचली . ते ही फार खर्च ना करता !

आपल्या पुढच्या पिढीची काळजी करताना आयुष्यातील असे आनंद न भोगता आलेले ई लोक आजूबाजूला पाहिलेत . आपल्याला जसे दैवाने काही मिळते तसेच पुढच्या पिढीच्या दैवाचे असले पाहिजे असा माझा निर्धार आहे. सबब या वयात आपल्या पुढच्या पिढीला आयता चांदीचा चमचा मिळावा म्हणून मी उगीच पार्ट टाईम , नोकरी कर ,ट्रेडिंग कर असले उद्योग करीत बसलेलो नाही. माझ्या मते फक्त २५ टक्के इस्टेट पुढच्या पिढीला मिळून बाकी ७५ टकके रक्कम सरकारात एका अर्थाने समाजास जमा झाली तर अचाट हव्यासाचा मार्ग बंद होईल !

मला ५० लाखाचा इन्हेरिटनस पत्नीचे बाजूने मिळाला आहे तरीही माझी खरी संपत्ती भावनेच्या आहारी न जाता रसिकपणे विवेकाची कास धरून आयुष्य जगणे ही आहे असे मी मानतो . मरताना माझा ब्लॉक ,बँक बॅलन्स माझे बरोबर येणार नाही .शेवटच्या क्षणी आपण मस्त जगलो बुवा असे वाटणे हा आयुष्याचा खरा अर्थ आहे !

प्रकाश घाटपांडे's picture

1 Apr 2021 - 8:54 pm | प्रकाश घाटपांडे

वामनरावांचा कोट कुठे संपतो?

चौकटराजा's picture

1 Apr 2021 - 9:39 pm | चौकटराजा

अध्यात्मिक विचारवंत श्री वामनराव पै यांनी मानवी समजुतीतील एक घोटाळयाचे विवेचन केले होते. माणसाला अधिकाधिक पैशाची हाव असण्याचे कारण पुढच्या पिढीसाठी काहीतरी तजवीज करून ठेवणे हे आहे .त्यांचे म्हणणे की " मी तुझ्या वासना , तुझा चरितार्थ याबाबद्दल तुझी धडपड समजू शकतो पण पुढच्या अनेक पिढ्या ची सोय करण्यासाठी तू धावाधाव करायचे कारणच काय मुळी ?". माझे वडील मला म्हणत " आमच्या वडिलांनी आम्हाला काही इस्टेट दिली नाही तेंव्हा तुम्ही ही आमच्याकडून ती अपेक्षा करू नका !"