ज्ञात अज्ञात पंढरपूर ९ संत चोखामेळा समाधी, पंढरपूर

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in भटकंती
25 Jan 2021 - 4:30 pm

chokhamela samadhi
chokhamela
विठ्ठल मंदिरासन्मुखची नामदेव पायरी जवळची महाद्वारातील संत चोखोबारायांची समाधी ज्ञात नाही असा पंढरपूरकर क्वचितच असेल. आणि जर कुणाला ज्ञात नसेल तर तो पंढरपूरकर नव्हे.
एखाद्या जीवाने परमात्मा विठोबाची भक्ती किती करावी याचे साक्षात जीते जागते उदा म्हणून कितीतरी संतांची मांदियाळी दाखविता येईल पण मरणोपरांतहि भक्तिचे उदाहरण म्हणजे एकमेव संत चोखामेळा होय. भक्ति कीती तर हा नश्वर देह पडल्यावरही त्यांच्या अस्थि "विठ्ठल विठ्ठल" जप करित होत्या. त्यामुळेच त्या नामदेवरायांना गोळा करून पंढरीत आणता आल्या.
संत नामदेवरायांना साक्षात पंढरीरायांनेच तशी आज्ञा दिली होती की "माझा भक्त मंगळवेढ्यात गावकुसाचे काम चालू असताना भिंत पडून चिरडून गेला (१२६० शके) आहे. त्याचे मला दु:ख झालेय, त्याचे मला रडू येतेय. त्याचे संगती शिवाय मला चैन नाही. तू त्याच्या अस्थि पंढरीत आण." पण नामदेवरायांनी "तिथे गावकुसाचे कामी अनेकांचा अंत झालाय मी त्या ओळखाव्या कशा?" म्हणता देवाने खूण सांगितली
देव म्हणे नाम्या त्वा जावे तेथे |
त्याच्या अस्थी येथे घेऊनि याव्या ||
नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या |
विठ्ठल नाम जयामधे निघे ||
याप्रमाणे नामदेवरायांनी मंगळवेढ्यास जावून तेथून शोधून चोखोबांच्या अस्थि पंढरीत आणल्यावर देवाने आपल्या भरजरी वस्त्रात त्या घेतल्या आणि देवाला रडू आले. देवाने माझा परमभक्त सदैव माझ्या सन्निध रहावा या हेतूने आपल्या पायाजवळ स्वहस्ते त्या अस्थिला समाधी दिली.
किती विलक्षण सद्भाग्य चोखोबारायांच्या नशिबी आले. प्रत्यक्ष परमात्म्याने स्वहस्ते और्देहिकाचे कार्य करावे. पुराणे, इतिहात वाचता असे भाग्य केवळ काहि परम भक्तांनाच प्राप्त झाल्येचे दिसते. ते हि केवळ २ जणांनाच. एक त्रेता युगी रामावतारात शबरीमातेला, अन् दुसरे द्वापार युगाचे अंती कृष्णावतारात महारथी दानवीर कर्णाला. ते ही त्यांना देवाला वरदान म्हणून मागून घ्यावे लागले. मात्र कलियुगी चे चोखोबारायांचे बाबतीत देवाने तो त्यांनी न मागता स्वत:हून हे कार्य केले. चोखोबाराय इतके परमभक्त होते. परमपदाला पोहोचलेले संत होते. इतकी त्यांची भक्ती होती की देवही वेडावला. त्यामुळेच कर्ण आणि शबरी पेक्षाही चोखोबाराय काकणभर सरस ठरतात. नामजपाचा महिमा त्रेता अन् द्वापाराहून कलीयुगी जादा ठरला.
दशग्रंथी वैदिक विद्वानांनाही जे भाग्य मिळाले नाही ते भाग्य शबरीमाता जी वनवासी जातीत जन्मली, कर्ण जो सूतपुत्र म्हणून हिणवला तसेच शूद्र जातीत जन्मूनही चोखोबारायांना ते भाग्य प्राप्त जाले. ते केवळ निस्सिम भक्तीच्या बळावर. भगवद् प्राप्ती काही विद्वानांना वा ठराविक जातींच्याना होत नसून ती सद्भक्ताना होते हेच यातून दिसते.
देवदानवांचे समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत म्हणजे अमरत्वाचे पेय.
जे स्वर्गीचे ते देव इच्छिताती अमृत | असे स्वर्गीचे अमृतच एकदा नासले. स्वर्गात शितोष्ण बाधा न व्हावी असे हवामान असते तिथे इंद्राला ताक ही दुर्लभ कारण दुधाला विरजण लागून त्याचे दहीच बनत नाही तिथे अमृत नासले. अन् इंद्राला प्रश्न पडला हे शुद्ध कसे करावे. त्याला उपाय सुचेना. तो इतरांकडे चौकशी करता झाला. त्यावर त्याला देवर्षी नारदांनी उपाय सांगितली, यात भगवंताचे परमभक्त चोखामेळा यांनी केवळ करंगळी जरी बुडविली तरच याची शुद्धी होइल.
झाले इंद्रासह देवलोकीच्या सर्वांची जत्रा चोखोबारायांकडे आली. अन् त्यांना विनवणी करू लागली. पण चोखोबा इंद्राचे काय म्हणून ऐकतील? ते तर विठोबाचे भक्त. बळिया माझा पंढरीराव | तो या देवांचाही देव| हा चोखोबांचा भाव. ते विठोबाचेच ऐकतील. अन् यावेळी तो परमात्मा बसला होता वाळवंटी नामदेवांच्या कीर्तनात. त्यासाठी वाळवंटी कीर्तन करत असणाऱ्या नामदेवाकडे ही देवमंडळी आली. देवाकडे आपले गाऱ्हाणे सांगितले अन् चोखोबांना तुम्ही सांगितल्याशिवाय ते काही करायला तयार नाहीत न्हणूनही सांगितले. मग साक्षात विठोबाने सांगितल्यावरच चोखोबांनी अमृतशुद्धी केली. पण त्या आधी देवाला भुक लागली ती भागविली चोखोबांनी.
चोख्याचे अंगणी बैसल्या पंगती |
स्त्री ते वाढीती चोखयाची ||
चोखयाची स्त्री चोखा दोघेजण |
शुद्ध अमृत येणे केले देखा ||
चोखियाच्या घरी शुद्ध होय अमृत |
एका जनार्दनी मात काय सांगू ||
साक्षात परब्रह्म परमात्मा पांडुरंग, आई रुक्मिणी, देवर्षि नारद, देवराज इंद्र, अन्य देवगण, अन् संत नामदेवरायांची पंगत चोखोबारायांचे अंगणी बसली. पात्रे घातली आणि वाढ केली चोखोबा अन् त्यांच्या बायकोने. अर्थात पंगतीला बसलेल्या देव आणि संतांनी अमृत पिले नाहीच कारण
चोखामेळा म्हणे काय हे अमृत |
नामापुढे मात काय त्याची ||
अशा या परमभक्त चोखोबारायांची हि पंढरीतील समाधी. विठ्ठल मंदिराचे समोर महाद्वारात डौलात उभी आहे. जमिनीपासून कमरेएवढा उंच १० चौरस फुटाचा दगडी कट्टा त्याचे मधोमध चौरस स्मृती शिला. या शिलेमागे पितळी प्रभावळ वर छत्र प्रसंगपरत्वे शिळेवर रांगडा, शानदार पितळी मुखवटा ठेवून पुजा केली जाते. त्यामागे भिंत आणि वर सावलीची व्यवस्था. त्यावर शिखर. असं लहानुलेसं हे समाधीस्थान. पूर्वी येथे केवळ चोखोबारायांची सृतिशिला होती. १९५६ साली फलटण संस्थानचे राजे मालोजीराजे तथा नानासाहेब नाईक निंबाळकर यांनी मोठा खर्च करून कट्टा आणि त्यावरचे सावली चे छत, शिखर उभारले. नुकतेच मंदिर समितीने त्याचे जीर्णोद्धार केला आहे. नुतनीकरणानंतर या समाधीला प्राचिन दगडी लुक दिला आहे.
नित्य सकाळी नामदेवरायांचे वंशीय चोखाबारायांचे पुजन करतात. वैशाख व|| ५ ला चोखोबारायांचे पुण्यतिथी निमित्त येथे नामदेववंशी नामदास महाराजांकडून नामसप्ताह होतो. तसेच ज्येष्ठ शु|| १३ ला देवाने समाधी दिली त्याचे स्मरण म्हणून समस्त बडवे मंडळींकडून चोखोबारायांची विधीवत महापूजा केली जाते. याशिवाय श्रावण पौर्णिमेला पंढरीतील ब्राह्मण मंडळी श्रावणी म्हणजे नूतन यज्ञोपवित धारण करणेचा संस्कार करतात. त्यानंतर पहिले देवकृत्य म्हणून समस्त बडवे आणि अन्य ब्राह्मण मंडळी रेशमी वस्त्रे परिधान करून देवदर्शनाला जातात त्यावेळी याठिकाणी येवून आधी संत चोखोबारायांचे दर्शन करून मगच विठ्ठल दर्शनाला जातात.
अन्य क्षेत्रापेक्षा हे पंढरी क्षेत्राचे विलक्षण सांस्कृतिक वारसास्थळ त्यामुळे लोकमानसात सदैव पुज्य आहे. आज वैशाख व|| ५ चोखाबारायांची पुण्यतिथी त्या निमित्त या महान भगवद् भक्ताचे चरणी हि शब्दसुमनांजली अर्पण!
©आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

25 Jan 2021 - 5:05 pm | चौथा कोनाडा

चोखोबांच्या अमृतशुद्धीची कहाणी रोचक आहे !

स्वर्गात शितोष्ण बाधा न व्हावी असे हवामान असते तिथे इंद्राला ताक ही दुर्लभ.

असे हवामान पृथ्वीवर कुठे कुठे असेल. स्वर्ग म्हणजे ते प्रदेश असे मानायला जागा आहे का ?

Ashutosh badave's picture

28 Jan 2021 - 5:12 pm | Ashutosh badave

हिमालय

अजय देशपांडे's picture

25 Jan 2021 - 5:23 pm | अजय देशपांडे

संत चोखामेळा हे श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज यांचे समकालीन होते. त्यांची बायको सोयराबाई, बहीण निर्मलाबाई व मुलगा कर्ममेळा असे सर्व कुटूंब विठठल भक्त होते. त्यांनी पुष्कळ अभंग लिहीले असून ते प्रसिध्द आहेत. त्यांनी विवेक दिप म्हणून एक ग्रंथ लिहीला आहे. मंगळवेढे येथे किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असता ते एकाएकी कोसळले व त्याखाली श्री चोखोबाराया आणि अनेक मजूर मयत झाले ही घटना शके १२६० म्हणजे इ.स. १३३८ मध्ये वैशाख वद्य पंचमीस झाली. पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेढ्यास आले व ज्या अस्थिमधून विठ्ठ्ल विठ्ठ्ल असा आवाज होता त्या अस्थि श्री चोखोबारायांच्या आहेत असे ओळखून त्यांनी त्या पंढरपूरी विठठल मंदिरापुढे सध्या नामदेव पायरीम्हणून जी पायरी दाखविली जाते त्या पायरीसमोर वद्य त्रयादशी रोजी नेऊन ठेविल्या. मंगळवेढे येथे त्यांची पुण्यतिथी वद्य पंचमीस होते व पंढरपूरी वद्य त्रयोदशीस होते. त्या समाधी स्थानावर श्री राजे निंबाळकर फलटण यांनी चांगली घुमटी बांधली आहे. मंगळवेढे येथे त्यांच्या निधनाच्या जागे वर एक शोभिवंत घुमटी बांधावी अशी सुचना ना. बाळासाहेब खेर यांनी मंगळवेढयास आल्यावेळी केली होती. त्याप्रमाणे श्री. संत चोखामेळा स्मारक समिती म्हणून एक समिती स्थापन होऊन त्या समितीने निम्मी वर्गणी जमविली व सरकारांतून निम्मी वर्गणी मिळाली. व एक चांगले सुशोभित स्मारक त्याठिकाणी झाले आहे. या घुमटीचे उदघाटन श्रीमंत राजेसाहेब सांगली यांनी ता १४/०३/१९६० रोजी केले आहे

शशिकांत ओक's picture

25 Jan 2021 - 8:56 pm | शशिकांत ओक

त्यांची बायको सोयराबाई, बहीण निर्मलाबाई व मुलगा कर्ममेळा असे सर्व कुटुंब विठ्ठल भक्त होते.
अजय देशपांडे यांच्या माहितीत जरा भर या कुटुंबाशिवाय सोयरावाईचा भाऊ बंका हादेखील विठ्ठल भक्त होता त्यांचे ही काही अभंग लिहिलेले मिळतात.

अजय देशपांडे's picture

25 Jan 2021 - 5:26 pm | अजय देशपांडे

chokhamela mangalwedha

अजय देशपांडे's picture

25 Jan 2021 - 5:27 pm | अजय देशपांडे

फोटो अपलोड होत नाही