वाटेकरी

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
17 Jan 2021 - 7:59 pm

वाटेकरी
------------------------------------------------------------------------------------------------
रात्रीची वेळ . अंधार . एक मोठा रस्ता .त्या रस्त्याला रात्रीच्या वेळी कोणी नसायचंच. त्यात पाऊस. शहराचा तो भाग रिकामा होता . तिथे ना दुकानं होती ना घरं . कारण तो कॅंटोन्मेंट हद्दीचा भाग होता . दिवसा मन प्रसन्न करणारी तिथली झाडं आत्ता मात्र भुतांची आश्रयस्थानं वाटत होती . मधूनच एखादी सर्र्कन पाणी उडवत जाणारी गाडी . त्या गाड्यांनाही कसली घाई ! एखादा मरून पडला तरी कोण बघतंय आणि कोण थांबतंय .
वरून धोधो पाऊस अन खाली रस्त्यांचे झालेले नाले . रस्त्यावरून वाट काढत, मोठयाने खळखळत खोलगट भागाकडे पळणारं पाणी . घोट्यापर्यंत आलेलं . पूर्ण रस्ताच पाण्यात . एखाद्याची गाडी पाणी जाऊन बंद पडली तर सरळ सरळ बोंबच ! तशा वेळेस , पाण्यातून , पावसात गाडी ढकलायची म्हणजे ? ...
अशा ढगफुटी पावसात तो त्याच्या बाईकवरून चालला होता . त्याच्या अंगात पूर्ण रेनसूट होता. डोक्यावर हेल्मेट. आकाशात कडाकड विजा चमकत होत्या . अगदी काळजात धडकी भरवणाऱ्या. बाईक भारी होती,उंच होती. तिचा सायलेन्सरही उंच होता. त्यामुळे त्याला त्या साठलेल्या पाण्याची भीती नव्हती . खतरनाक पळणारी बाईक आणि पळवणाराही तसाच खतरनाक ! किश त्याचं नाव . यशाचे नवनवीन झेंडे रोवित तो पुढे चालला होता... पण गुन्हेगारीत !
-----
थोडाफार शिकलेला होता अन बोलायला स्मार्ट होता . शरीराने तो दणकट होता . अंगात रग होती . छोट्या मोठ्या मारामाऱ्या करता करता तो हळूच गुन्हेगारीकडे वळला होता . तो एक कमालीचा रायडर होता . कुठलीही चांगली बाईक एकदा का त्याच्या हातात आली की झालंच , तो वाऱ्याशी स्पर्धा करत सुटायचा . अन नुसती बाईकच नाही तर कुठलीही. अगदी कुठलीही गाडी तो खलास चालवायचा . खेळाडू बनता तर नाव काढता . पण त्याला चांगल्या गोष्टींसाठी त्याचं कौशल्य वाया घालवायचं नव्हतं .
त्यामुळे पहिल्यांदा तो बायकांच्या गळ्यातल्या साखळ्या चोरायला लागला . वयस्कर बायकांच्या. एकवेळ पोरी मंगळसूत्र घालणार नाहीत ; पण वयस्कर बायकांचं तसं नसतं . समोरासमोर नवऱ्याला झापतील पण त्याच्या नावाने घातलेलं मंगळसूत्र गळ्यात घालून कुरवाळतील !
अशा बायकांच्या सोनसाखळ्या चोरून गाडीवरून पळणं त्याला फारच सोपं होतं . मग पुढे तर तो सराईत झाला . पुढे तो कुठल्याही बायकांच्या गळ्यातल्या साखळ्या चोरायला लागला . पण तो एकदाही पोलिसांच्या तावडीत सापडला नव्हता . मग त्याचा रुबाब वाढला.त्याचं डेरिंग वाढलं . आपण भारी आहोत , हे दाखवण्यासाठी तो काहीही करायला तयार असायचा . कुठलंही आव्हान स्वीकारायला तो तयार असायचा .
हातात पैसा खेळू लागला आणि त्याचे षौकपाणी वाढले . कशातही तो मागे नव्हता . कमी वयातच त्याची सारी व्यसनं करून झाली होती .
एका डामच्याने त्याला हेरलं. त्याचे गुण, त्याचं गाडी चालवण्याचं कौशल्य पारखलं . आणि त्याला गुन्हेगारीच्या दलदलीच्या वाटेला लावलं. ज्यामध्ये माणूस रुतत जातो , पण बाहेर कधीच पडू शकत नाही , अशी दलदल !
-----
त्या तशा साठलेल्या पाण्यातही तो वेगात चालला होता . मागून-पुढून एक गाडी नव्हती की नजरेत एक माणूस नव्हता . सगळं कसं चिडीचूप . एक पावसाचा ताशा सोडता . तरीही त्याने मागे वळून पाहिलं - एखादी गाडी मागून येतेय का ते . खरं म्हणजे पाठलाग वगैरे करतीये का ते पहायला . काहीतरी गडबड असली की माणूस उगाच सावध राहायला लागतो .
त्याच्या पाठीवरच्या लाल सॅकमध्ये पैशाची बंडलं होती. घबाड !
नुकतीच त्याने ती गलेलठ्ठ सॅक उचलली होती . एका ठरलेल्या ठिकाणाहून .
आणि त्याच्या मनात विचार चाललेले - या पैशाचे तर आपण दोघेच वाटेकरी आहोत . निम्मा पैसा आपला आहे . पहिल्यांदाच एवढा मोठा हात मारलाय आपण . काय करायचं या पैशाचं ? कुठं उधळायचा ? कायकाय घ्यायचं ? की भारताबाहेर एक गुलाबी ट्रिप मारायची ? का धंद्याला काही नवीन मार्ग ? राजा तर साला, घर घेऊन सेटल व्हायचं म्हणत होता. पण एक आहे - हा XXX चा राजा, साला ! ... काही खबर लागू देत नाही . तो त्याच्याबद्दल आपल्याला नीट काहीच कळू देत नाही . कामाशी काम ठेवतो . आपण त्याच्यावर पूर्ण भरंवसा ठेवतो . पण त्याचं तसं नाही . हा झटका एकदा पूर्ण झाला की साल्याची साथ सोडायला पाहिजे . आपलं आपण बघू नाहीतर दुसरा एखादा जोडीदार बघू .
-----
तो जो डामचा होता , त्याचं नाव राजा होतं . ज्याच्याकडे पाहून फार काही चांगलं मत होणार नाही अशा शरीराचा, एकूण अवताराचा ,अन चेहऱ्याचा . त्यानेच किशला वेगळे रस्ते दाखवले होते .
शहरात एक बिल्डर होता . उत्तुंग डेव्हलपर्स म्हणून . त्याची कामं कमी होती . पण इतर कामंच जास्त होती . तो इतर बिल्डर्सची काळी माया जिरवायचं काम करायचा . आणि त्यात स्वतःची पोळी भाजून घ्यायचा. केस पांढरे झाले तरी त्याची पैशाची हाव काही संपत नव्हती . त्याला एकच पोरगी होती आणि तिचा एक छोटा मुलगा . पोरगी घटस्फोटित . त्याचा नातू , तो गोड पोरगा त्याचा जीव की प्राण होता .
किशने अन राजाने मिळून त्या पोराला किडनॅप केलं होतं. त्याच्या शाळेजवळून . त्याला घेणारी कार घरून यायच्या आधी त्याला अलगद उचललं होतं . कोणाच्या लक्षात यायच्या आत . लक्षात आलं तेव्हा खूप उशीर झाला होता . किश कार चालवत होता . मागे तो पोरगा अन त्याचं तोंड दाबून बसलेला दणकट पंजाचा राजा . पोरगं गोरंपान . निष्पाप . गोड . सात -आठ वर्षांचं.
किशने गाडी बुंगाट काढली होती . झपाझप ! अगदी शहराच्या गर्दीमधूनसुद्धा. राजाने कुठून कार पैदा केली होती , कोणास ठाऊक ? जुनाट होती . पण पळायला भारी होती . लवकरच ते शहराच्या दुसऱ्या भागात पोचले होते. एक जुनाट बंगल्याला त्यांनी त्यांचा अड्डा बनवला होता . ती बंगल्यांची गल्ली अंगावर शांतता पांघरून नेहमीच गप पडलेली असायची . झाडांमध्ये लपलेली . क्वचित एखादा माणूस दिसायचा .
त्यांनी त्या पोराला तिथे बंदी बनवून ठेवलं . राजाने त्या पोराचा जीवच घ्यायचं ठरवलं होतं ; पण किशने त्याला तीव्र विरोध दर्शवला होता . राजाला ते आवडलं नव्हतं . कारण पोरगा अगदीच लहान नव्हता . त्याला बऱ्यापैकी कळत होत . पण प्लॅन त्याचा असला तरी तो पूर्णपणे किशवर अवलंबून होता .
मग त्यांनी दुसऱ्याच एका लोकेशनला जाऊन त्या म्हाताऱ्या बिल्डरला फोन केला होता आणि सिमकार्ड फेकून दिलं होतं . बिल्डर हवालदिल झाला . त्याचं काळीज विरू लागलं. त्यामुळे पुन्हा जेव्हा फोन आला , त्याने गपगुमान पैसे द्यायचं कबूल केलं .
पैसे कुठे ठेवायचे आहेत, ते त्याला सांगण्यात आलं होतं. तोही शहराचाच एक निर्मनुष्य भाग होता.
राजा म्हणाला होता - कुठलीही चलाखी , कुठलाही शहाणपणा करायचा नाय . पोलिसांना वगैरे सांगायचं नाय . कारण थोडी जरी गडबड झाली तरी आम्ही पकडले जाऊ ; पण नातू जिवंत हातात मिळणार नाय . आमची गॅंग आहे आणि आमच्या माणसांचं तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे.
गॅंग - बिंग ! ... राजाने सरळ फेक टाकली होती . बोलायला तो स्मार्ट होता .
बिल्डरला नातू महत्त्वाचा होता . त्याच्यासाठी पैसा तो काय ? अजून एका व्यवहारातच त्याने तो वसूल केला असता .
“ एक कोटी ! एक कोटी मागितले आहेत XXXनी ! “अशा शिव्या घालत त्याने सांगितल्याप्रमाणे एक सॅक तयार केली . लाल रंगाची . त्यात दोन हजाराच्या लाल नोटांची पन्नास बंडलं . हिशोब संपला .
-----
त्या रस्त्याला वर्दळ नव्हती . एके ठिकाणी राडारोडा पडलेला होता . तिथेच कोणीतरी कचऱ्याचा डंपर उलटा केला होता. तिथे बिल्डरच्या माणसाने ती एक लाल रंगाची सॅक ठेवली . तेव्हा पूर्ण अंधार पडला होता . सात वाजले होते . पाऊस भरून आल्याने आकाश काळवंडायला लागलेलं ; पण अंधारामुळे ते कळून येत नव्हतं .
तो माणूस तिथे थांबला नाही . तसं सांगण्यातच आलं होतं . बऱ्याच वेळ रस्त्याला कोणीच नव्हतं . त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमधून तिथे एक भिकारी आला . खाण्यासाठी तो कचरा चिवडू लागला . खरं तर त्या कचऱ्यात खाण्यासाठी काहीच नव्हतं . त्याला ती लाल रंगाची सॅक मिळाली . कुतूहलाने त्याने ती हातात घेतली अन ती सॅक तो खालीवर करून पाहू लागला . तेवढ्यात एक बाईकस्वार आला अन त्याने शिताफीने ती सॅक त्याच्या हातातून पळवली . त्याने घातलेल्या मोठ्या हेल्मेटने आणि रेनसूटने तो कसा दिसतोय याचा काहीच अंदाज येत नव्हता . एका हाताने तो गाडी पळवू लागला . मग त्याने हॅन्डलवरचे दोन्ही हात सोडून ती सॅक हेल्मेट असतानाही पाठीवर टाकली . जराही न डगमगता , दोन्ही बंदांमधून हात घालून . गाडी अगदी सरळ रेषेतच चालली होती . त्याने एकदा मागे पाहिलं , मागे कोणी नव्हतं . मग त्याने हँड्लची मूठ आवळली अन तो फुल्ल स्पीडने सुटलाच .
आजूबाजूलाही कोणी नव्हतं . आधीही अन आत्ताही . तसा तो भिकारी समाधानाने हसला . तो राजा होता . अन तो त्या वेशात अगदी शोभत होता . तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या रिकाम्या भागात शिरला . त्याने डोक्यावरचं कांबळं फेकलं . अंगावरचा घाणेरडा , मळका कोट फेकला . तो भाग मातीचा होता . खुरटी झुडपं , बाभळीची छोटी , मोठी झाडं आणि काही मोठीही झाडं . त्यामधून तो चालत पलीकडच्या समांतर रस्त्यावर गेला . तेव्हा पावसाला सुरुवात झाली होती .
राजा त्याच्या कारमध्ये बसला . मागच्या सीटवर एका पोत्यात तो पोरगा बांधून पडलेला होता . बिचारा ! कोणीही घाबरेल अशी ती गोष्ट . मग ते तर लहानच लेकरू. राजा त्याला ठराविक ठिकाणी सोडणार होता. तसा निरोप त्या म्हाताऱ्या बिल्डरला देणार होता . विषय संपला . त्याच्या भाषेत फाईल रफादफा !
किश आता त्या ठिकाणापासून खूप लांब पोचला होता . त्याच्या मागे कोणी नव्हतं . तसा त्याच्या मनावरचा ताण गेला . अर्थात , कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायला तो तयार होताच अन त्याची गाडी पळायला .
राजा पुढच्या एका साध्या ढाब्यावर त्याची वाट पाहत थांबणार होता . अजून बरंच अंतर होतं .
पाठलागावर कोणी नव्हतं . रस्त्यावर कोणी नव्हतं . किश त्यामुळे मस्त गुणगुणत चालला होता , “ क्यूँ पैसा पैसा करती है ? “ किश त्या भर पावसातही एन्जॉय करत होता . अन त्याचं लक्ष एका बसस्टॉपकडे गेलं . स्टॉपवर एक तरुणी उभी होती . पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेली. स्टॉपच्या अलीकडे एक टू-व्हीलर लावलेली . पोरगी बघून त्याचा गाडीचा वेग आपसूक कमी झाला .
तो क्षणभर विचारात पडला आणि शेवटी थांबलाच . त्याचं स्त्रीदाक्षिण्य उगा उफाळून आलं . बिनकामाचं !
रात्रीची वेळ . त्यात पाऊस , निर्मनुष्य रस्ता अन पोरगी ! ... एकटी ? दिसायला सुंदर आहे का ते कळत नव्हतं . कारण स्टॉपवर थांबल्याने तिच्या चेहऱ्यावर नेमका अंधार पडला होता .
मागे झाडंही खूप होती . पावसाचे थेंब ओघळवणारी .
तो गाडी लावून चालत तिच्या जवळ आला . शेडमध्ये आल्यावर त्याने हेल्मेट काढलं . त्याच्या रेनसूटवरून आणि हेल्मेटवरून पाणी गळत होतं .
जाताजाता पोरगी गळाला लागली तर बरंच आहे, अशा विचारात तो होता . त्याला वाटलं - रात्रीची वेळ , त्यात पाऊस , ती एकटीच अन गाडी बंद पडलेली . हिचा टाईम खराब आहे . नक्कीच !
हेल्मेटवरचं पाणी झटकत त्याने विचारलं , “ एनी हेल्प ? “
“ न ... नाही ... नको ! “ ती सुंदर तरुणी त्याच्याकडे पाहत, त्याचं निरीक्षण करत म्हणाली . तो ऑफ़िसवरून घरी चाललेला एखादा बॅचलर तरुण असावा . असं वाटत होतं . त्याच्या पाठीवर एक सॅकही होती .
“अहो , काही प्रॉब्लेम आहे का ? रात्रीची वेळ, त्यात पाऊस , तुम्ही एकट्या ! “ तो काळजीच्या स्वरात म्हणाला .
“ हं ! गाडी बंद पडलीये .” ती म्हणाली .
“ मग तुम्ही फोन करून कोणाला बोलवून का घेत नाही ? “ त्याने विचारलं .
“माझा फोनही पाण्यात पडल्याने बंद पडलाय ,” ती म्हणाली .
त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं . हिचा टाईम नक्कीच खराब आहे . त्याला पुन्हा वाटलं. फोनही बंद आहे .
“ओह ! काय करावं ? एक काम करतो, मी तुम्हाला लिफ्ट देतो . गाडी तुम्ही उद्या सकाळी ताब्यात घ्या .”
ती रस्त्याकडे बघत , अंग चोरत “ राहू दे “ म्हणाली.
“बरं, ठीक आहे. मी तुमच्यासोबत थांबतो ,बस येईपर्यंत .”
“नको नको .आता या वेळेला बस कधी येईल सांगता येत नाही … जा तुम्ही .”
आता त्याने तिचं नीट निरीक्षण केलं . ती खरंच खूप सुंदर होती . नाजुकशी . तिचे ओठ अन भुवया किंचित जाडसर होत्या . पण त्यामुळेच तिचा चेहरा आणखी गोड भासत होता . तिला गार लागत असावं . हात पोटाशी धरून , अंग आवळून ती उभी होती .
अशा पावसात . तिच्याकडे पावसाळी काहीच नव्हतं . रेनकोट वगैरे . त्यामुळे ती भिजली होती . तिचे केस भिजले होते . तिचं मूळचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं . त्यात तिचा ड्रेस भिजलेला , अंगाला चिकटलेला ... पांढरा ड्रेस . तिचं सौंदर्य आव्हानात्मक बनवणारा !
त्याला त्या पोरीचं काही गणितच कळेना . त्याला उगा शंका आली की ती पोरगी - तसली तर नाही ? पण तिचे कपडे , खांद्यावरची मॅचिंग पांढरीच पर्स पाहता ती एकदम डिसेंट मुलगी वाटत होती .चांगल्या घरातली . मग या वेळी इथे ? का उगा नाटक करतीये , सोज्वळ असण्याचं ?
त्याच्या विचारांनी वेगळं वळण घेतलं .
त्याने तिचं निरीक्षण केलं . पोरगी दिसायला तर छान होती आणि सरळही वाटत होती … क्वचित चांगल्या घरातल्या पोरीही ... पैशासाठी ... पाऊस तसा अचानक आलेला . ती बाहेर पडली असावी अन पावसात अडकली असावी .
आकाशात ढगांची गडगड होती अन त्याच्या मनात विचारांची खळबळ ! तो त्याचं कामही विसरला . त्याचे विचार तारुण्याच्या जोशात त्याच्या गाडीसारखे वेगात पळू लागले . वेगळ्याच दिशेने ...
त्याला वाटलं , “साली ! जबरा आहे . भर पावसातही आग लावेलशी !”
तो तिच्याजवळ सरकला . त्याचा हेतू लक्षात येऊन ती लांब सरकली . त्याने तिचा हात धरला . तशी क्षणभर तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली.
“ प्लिज , सोडा मला , “ ती म्हणाली .
कदाचित पोरगी चांगलीही असावी . पण आता - ती पोरगी अशी आहे का तशी ? या गोष्टीशी त्याला काहीएक घेणंदेणं नव्हतं . त्याला आयतीच शिकार गवसली होती. आज एवढा मोठा डल्ला मारला होता, तो सेलिब्रेट व्हायलाच हवा होता ! बस ! ...
तो त्याला जे वाटलं ते तिला थेट विचारण्याच्या बेतात असताना , एका कारचे दिवे पावसाच्या धारांना चमकवताना दिसले . तिच्याही डोळ्यांत चमक आली . ती काळी कार त्यांच्याजवळ येऊन थांबली. तिची काच खाली झाली .
आत राजा होता , तो म्हणाला , “ किश !... “
राजा अन गाडी पाहून पाहून किश हसला . समाधानाने . आता पुढचा प्रवास कारमध्ये होता . मागच्या सीटवर बसून , त्या पोरीला कुशीत घेऊन . बाईक चोरीची होती . ती तिथेच सोडायची होती . जरा रस्ता सोडून, आत कुठेतरी .
आंधळा मागतो एक डोळा अन देव देतो दोन! तसं झालं होतं. मजा येणार होती. आधी नुसता पैसाच होता अन आता पोरगीही ! ...
त्या आनंदात , राजा ढाब्याच्या आधीच आपल्याला येऊन कसा चिकटला ? हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं .
किशने एकदा राजाकडे पाहिलं अन तो त्या पोरीकडे आसुसलेल्या नजरेने पाहू लागला . तो तिच्याकडे पहात असतानाच, त्याला कळण्याआधीच सायलेन्सर लावलेल्या राजाच्या पिस्तुलातून निघालेल्या गोळीने त्याचा वेध घेतला होता. तो रस्त्यावर कोसळला . त्याच्या नजरेत अविश्वास होता . त्याचा रेनसूट रक्ताने लाल झाला . मग अजून एक गोळी . थेट काळजातच . हळूहळू लालभडक रक्त वेगाने पाण्यात मिसळू लागलं .
भर पावसातही किशच्या छातीत आग लागली होती ! अन ती त्या पोरीने लावली नव्हती ... त्याच्याच मित्राने लावलेली. क्षणात ती आग पूर्ण विझली . कायमची !
राजाच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं . किशची फाईल रफादफा झाली होती .
पावसाच्या धारा कारच्या टपावर टपटप वाजत होत्या .
ती तरुणी कारजवळ आली .
राजा म्हणाला , “ काजल , त्याच्याजवळची सॅक घे अन चल लवकर .”
तिने किशजवळची सॅक घेतली . राजा समाधानाने हसला . कारण त्याचा प्लॅन यशस्वी झाला होता . आता तो खरंच राजा झाला होता . पैसा अन जोडीला काजल !
किशला उडवायचं हे त्याने आधीच ठरवलेलं होतं . त्याला या पैशात वाटेकरी नको होता म्हणून .
काजलने तिथे थांबायचं हे राजाने आधीच ठरवलेलं . लक्ष ठेवायला , वाटेत पिकअप करायला . तिला किश माहिती होता ,पण किशला मात्र ती माहिती नव्हती . ते राजाचं गुपित होतं . किशला मृत्यू गाठणारच होता. काजलजवळ, नाहीतर पुढे कुठेतरी . ते नक्कीच होतं !
तिने सॅक घेतली . चेन उघडून हात आत घातला . त्यातल्या प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवलेल्या नोटांच्या बंडलांवरून तिने हात फिरवला . तो गार पडलेला पैसाही तिला उबदारच वाटला .
त्यावरून हात फिरवताना तिच्या बोटांना किशचं पिस्तूल लागलं .
क्षणात तिने किशचं पिस्तूल बाहेर काढलं आणि राजाला गोळ्या घातल्या . शांतपणे , शांततेत . त्याच्याही नजरेत अविश्वास होता .त्याही पिस्तुलाला सायलेन्सर लावलेलं होतं. फक्त फट फट असा आवाज काय तो आला . किशला गोळ्या घालताना जसा आवाज आला तसाच. तो आवाज पावसाच्या पाण्यात कुठे विरून गेला .
त्याचीही फाईल ... !
बिचारा किश ! त्याला त्या XXXX राजाची साथ सोडायची होती खरी ; पण आता तो नरकातही त्याला सोबतीला होताच !
पावसाच्या धारा कारच्या टपावर टपटप वाजतच होत्या .
तिला राजा कधीच आवडलेला नव्हता . तो माणसात जमा नव्हता . कुठल्याच बाबतीत. तो साला जनावरासारखा तुटून पडायचा. अन आत्ताही तो मेला नसता तर थोड्या वेळाने त्याचं जनावरात रूपांतर झालंच असतं !
राजाला उडवायचं हे तिनेही आधीच ठरवलेलं होतं . असं नाही तर तसं !
तिने मोबाईल ऑन केला आणि कोणालातरी फोन लावला .
फोन ठेवल्यावर तिने तिची टू व्हीलर सुरु केली . ती एका झटक्यात चालू झाली . आणि ती भर पावसात निघाली . तशीच . भिजत .
पाऊस बिचारा. निर्विकार. मुकाट पडत राहिला अन पडतच राहिला . त्या मुकाट पडलेल्या दोन प्रेतांवर .
तिलाही आता धंद्याचा कंटाळाच आला होता .
तिलाही त्या पैशात, कोणीच वाटेकरी नको होता !

------------------------------------------------------------------------------------------------

हे ठिकाण

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Jan 2021 - 8:12 pm | मुक्त विहारि

कथा आवडली

nutanm's picture

22 Jan 2021 - 7:33 am | nutanm

आवडली. छान!! शेवट धक्कादायी, खूनकथा.

nutanm's picture

22 Jan 2021 - 7:33 am | nutanm

आवडली. छान!! शेवट धक्कादायी, खूनकथा.

तुषार काळभोर's picture

23 Jan 2021 - 10:18 am | तुषार काळभोर

अगदी झकास!

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jan 2021 - 10:33 am | ज्ञानोबाचे पैजार

एकदम वेगवान आणि सरळ सोट कथा आवडली
लिहित रहा
पैजारबुवा,

सौंदाळा's picture

23 Jan 2021 - 5:47 pm | सौंदाळा

थोडासा अंदाज आला होता
कथा आवडली.

Rajesh188's picture

24 Jan 2021 - 12:59 am | Rajesh188

छान कथा.पण कथानक सरळसोट होते.
पुढे काय होईल ह्याचा अंदाज आला होता

बिपीन सुरेश सांगळे's picture

3 Feb 2021 - 11:13 pm | बिपीन सुरेश सांगळे

मंडळी खूप आभारी आहे आपला .