मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

साखळीचा किल्ला (Sanquelim Fort), नानुस किल्ला / Nanuz Fort /Nanus Fort

Primary tabs

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
17 Jan 2021 - 11:39 am

छ्त्रपती संभाजी महाराजांच्या गोवा स्वारीत अगदी सुरवातीलाच उल्लेख येतो, तो या साखळी किल्ल्याचा. वास्तविक संभाजी राजांची गोवा मोहीम होति, या गोमांतक भुमीतून फिरंग्याचे उच्चाटन करण्यासाठी, पण या मोहीमेला विरोध दाखविला तो आमच्याच लोकांनी, गोव्यातील देसायांनी, नाईलाजाने राजांना त्यांच्यावरही कारवाई करावी लागली. यामध्ये साखळीच्या रुद्राजी राणे आणि येसोबा यांनी आपली कुटूंबे पोर्तुगीज सरकारच्या आश्रयाला पाठवून संभाजी राजांविरुध्द बंड केले. साखळीचा किल्ला सावंतवाडीच्या खेम सावंतांनी बांधला असे इतिहासकार सांगतात. वाळवंटी नदीतून चालणार्‍या जलवहातुकीवर नजर ठेवण्यासाठी याची उभारणी केली असावी. छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण करताना शापोरा, फोंडा, साखळीचा किल्ला जिंकून घेतला. नंतर १७४६ साली तो पोर्तुगीज सेनापती "मार्कीस दि अलोर्ना" याने जिंकला आणि त्यानंतरचा इतिहास हा अज्ञात आहे. पोर्तुगीज कागदपत्रात याचा उल्लेख येतो तो फोर्ट डे साव टीयागो डे बेन्स्तरी / Forte de São Tiago de Benastarim या नावाने.

हा किल्ला बघायाला जायचे असेल तर म्हापसा बिचोली रस्त्याने बिचोली आणि पुढे साखळी (Sanquelim) गाव गाठायचे. हे अंतर ४५ कि.मी. पडते. मात्र नुकताच खांडोला- अमोण पुल वहातुकीसाठी खुला झाल्याने, पणजीपासून साखळीचे अंतर थेट २८ कि.मी.ने कमी झाले आहे. मार्कळ बायपासने आपण साखळीला लवकर पोहचु शकतो.
वाळवंटी नदीच्या काठावर एकेकाळी हा किल्ला अस्तित्वात होता, असे आता म्हणावे लागेल.

साखळी हे गाव राणे घराण्याचे मुळ गाव म्हणून ओळखले जाते.

साखळी गावातून वहाणार्‍या वाळवंटी नदीच्या एका तीरावर दत्त महाराजांचे मंदिर आहे.

तर दुसर्‍या तीरावर विठ्ठल रखुमाई मंदिर आहे.या शिवाय साखळी गावात विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूस भवानी माता मंदिर हे संभाजी महाराजांच्या काळात बांधले असावे.

या मंदिरासमोर रेडेबळीची शिळा आहे.. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या ह्या दगडी चिरे वापरून बांधल्या आहेत. या मंदिराकडून थोडे मागे गेल्यास काही भग्न इमारती नजरेस पडतात.

विठ्ठल मंदिरच्या पलीकडच्या बाजूस खाली वाळवंटी नदीकडे जाणार्या पायऱ्या आहेत.इथे खाली पुरातन घाट पाहण्यास मिळतो.
याच वाळवंटी नदीच्या पुर्व किनार्‍यावर साखळीचा किल्ला उभारलेला होता. अर्थात सध्या याची पुर्ण दुरावस्था झालेली आहे. थोडीफार तटबंदी शिल्लक असली तरी बाकीचा भाग पाडून राजकीय आशीर्वादाने दुकांनानी किल्ल्यावर आक्रमण केले आहे. घाटावरुन येणार्‍या मालाची नदीतुन जलमार्गे वहातुक चालायची, त्यावर करडी नजर ठेवण्यासाठी हा किल्ला तटबंदीवर तैनात केलेल्या आठ तोफांसह सज्ज होता. या तोफा किल्ल्यावर सन १८१७ पर्यंत अस्तित्वात होत्या. मात्र १९ व्या शतकाच्या सुरवातीपासूनच या किल्ल्याच्या नशीबी दुर्दैवाचे भोग आले आणि हा किल्ल्याची पडझड सुरु झाली.

मात्र १८६० मध्ये अँटोनियो लोपेझ मेंडेस या परकिय प्रवाशाने काढलेले या किल्ल्याचे चित्र उपलब्ध आहे

या गावात साखळीच्या किल्ल्याचे काही अवशेष तग धरून आहे.सध्या या किल्ल्याचे काही अवशेष नगरपालिकेच्या इमारतीसमोर आहेत.
दक्षिणेकडे काही सैनिकांच्या खोल्या नजरेस पडतात.

साखळी गावातील भग्न मंदिरे आणि काही इमारती इथे किल्ला असल्याची साक्ष देतात.

सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ऑफिस आणि प्रोग्रेस हायस्कुलने या किल्ल्याचा बहुतेक भाग व्यापलेला आहे. थोडे बुरुज आणि जिन्याचे अवशेष दिसतात. याशिवाय एक आयताकृती विहीर आहे, जीचे पाणी आतील रहिवाशी वापरतात. मात्र वेळीच लक्ष दिले नाही, तर गोव्याच्या इतिहासाशी संबंधीत आणखी एक वास्तु काळाच्या ओघात लुप्त होणार हे निश्चित आहे.

साखळी गाव सह्याद्रीच्या पायथ्याला वसलेले असल्याने सह्याद्रीतून उगम पावणार्‍या नद्यांच्या पाण्याचा वापर करुन एकेकाळी या परिसरात थेट परदेशाशी आणि परिसरातील ईतर खेड्यांशी व्यापार चालायचा. आजची साखळी गावाची अवस्था बघीतली तर कोणे एके काळी हे व्यापार केंद्र होते यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
खुद्द साखळीच्या किल्ल्यात आवर्जून पहावे असे काही राहीले नाही. मात्र परिसरात पर्यट्कांना आकर्षीत करुन घेतील अशी दोन ठिकाणे आहेत

हरवळेचा धबधबा. साखळी गावापासून हा धबधबा फक्त अर्धा कि.मी.वर आहे.

आणि हरवळेची लेणी

नानुस किल्ला

उत्तर गोवा जिल्हयात सातारी तालुक्यात सर्वकाही हरवून बसलेला एक चिमुकला किल्ला आहे. ईतिहासात फार उल्लेख नसणारा आणि वर्तमानतही दुर्लक्ष्याचा धनी असणारा हा किल्ला म्हणजे नानुस किल्ला. सतराव्या शतकात या किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी केली असे मानले जाते. मात्र पुढे पोर्तुगीजांनी याचा ताबा मिळवला. पुढे याचा उल्लेख येतो तो थेट १९ व्या शतकात. पोर्तुगीजांनी शेतकर्‍यांवर नवे जुलुमकारक कर बसवीले. दीपाजी राणे आणि त्यांच्या सैन्याने या नानुस किल्ल्याला आपले मुख्य ठाणे करुन, या अन्यायाचा कडवा विरोध केला. दीपाजींनी आधी सातारी, क्वेपे आणि काणकोण महाल मुक्त केला आणि बारदेश व तिसवाडी तालुक्यातील खेड्यांवर छापे घालून पोर्तुगिजांशी संघर्ष चालु केला. अर्थातच पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली आणि निमुटपणे तहाच्या अटी मान्य केल्या. अर्थात पोर्तुगीजांनीच आपला दिलेला शब्द पाळला नाही. नंतर क्वेपे आणि पणजी येथील लष्करी तळावरचे सैन्य आणून नानुसचा ताबा पोर्तुगीजांनी घेतला आणि हे बंड मोड्ले गेले.


इतिहासाशी दुवा जोडणारी या किल्ल्याची दोन मुळ चित्र उपलब्ध आहेत, ईतकीच काय ती समाधानाची बाब.

आज या किल्ल्याचे अतिशय अल्प अवशेष अस्तित्व दाखवत उभे आहेत.

वाळपेई गावाजवळ्चा हा किल्ला पहायचा असेल तर स्वताच्या वाहनाशिवाय पर्याय नाही. फोंड्यापासून हा किल्ला जवळ आहे.

एका टेकडीवर उभारलेल्या या किल्ल्यावर आज फक्त एक स्मृतीस्तंभ बघायला मिळतो.
खाली पोर्तुगीज भाषेत नानुसचे नाव लिहीलेला शिलालेख आणि अल्प तटबंदी.

सध्या हा किल्ला पाटील ईस्टेट या खाजगी जागेत असून तिथे असलेल्या राखणीच्या कुत्र्यांच्या भितीने त्या परिसरात कोणी जात नाही असे समजले. एकंदरीत वर्तमानकाळातही नानुस किल्ल्याची उपेक्षा थांबायला तयार नाही, हाच याचा अर्थ.

( महत्वाची तळटीप :- काही प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )

माझे सर्व लिखाण आपण येथे एकत्रित वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची
संदर्भः-
१) https://itsgoa.com/forts-in-goa-know-more-about-them/ हे संकेतस्थळ
२ ) ‘Fortresses & Forts of Goa’- P P Shirodkar
३) www.durgwedh.blogspot.in हा श्री. विनीत दाते यांचा ब्लॉग
४ ) पोर्तुगीज-मराठा संबंध- श्री. स.शं. देसाई
५) चला माझ्या गोव्यात- मिलींद गुणाजी
६ ) ईंटरनेटवरुन मिळालेले संदर्भ

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Jan 2021 - 9:03 pm | मुक्त विहारि

आता गोव्याला गेलो की, महिनाभर तरी मुक्काम ठोकावा लागेल असे दिसत आहे .

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jan 2021 - 11:09 pm | राजेंद्र मेहेंदळे

छान माहिती आहे. एकदा समुद्रकिनारी किल्ल्यांची मोहिम करायला पाहिजे. मुंबईपासुन सुरु करुन खाली गोव्यापर्यंत (हे ही एक स्वप्न)

बाप्पू's picture

18 Jan 2021 - 10:26 am | बाप्पू

10-15 दिवसात गोव्याला जाणार आहे.. तुम्ही ओळख करून दिलेल्यापैकी 1-2 किल्ले तरी पाहणार आहे.

गोरगावलेकर's picture

18 Jan 2021 - 2:14 pm | गोरगावलेकर

आवडले.
गोव्याच्या किल्ल्यांबद्दल खूप चांगली माहिती मिळते आहे.

अपरिचित किल्ल्यांची उत्तम ओळख.
धन्यवाद.

दुर्गविहारी's picture

22 Jan 2021 - 8:25 pm | दुर्गविहारी

मुक्त विहारि,राजेंद्र मेहेंदळे,बाप्पू, गोरगावलेकर,प्रचेतस आणि असंख्य वाचक यांचे मनापासून आभार.